आज आंघोळ करताना चमकलं कि -
च्यायला आंघोळ करतानाच भन्नाट गोष्टी कशा आणि का सुचतात ते कळत नाही. कदाचित पाण्याचा प्रभाव असावा.
तर आंघोळ करताना सुचलं कि च्यायला लिहायचं नाही तर नाही पण ऍटलीस्ट प्रयत्न करत होतो असं तरी लिहुन ठेऊ. तसा प्रयत्न करतोय हे दाखवायला मी कुणाचं काही देणं लागत नाही, पण माझेच स्वत:शीच एवढे हिशेब खोळंबलेले असतात कि म्हटलं तसं करु.
आता लिहायचं नाहीच आहे असं ठरवल्याने काय लिहायचं वगैरे बंधन नाही. फक्त नियमीत लिहायचं - लिहायला येत नाही म्हणुन लिहायचं. लिहावंसं वाटत नाही म्हणुन लिहायचं. वेल यात काही फारसा दम नाही - म्हणजे लिहावंसं वाटतंय म्हणुन तर लिहितोय ना?
च्यायला ’न लिहिण्यात’ पण ’फंडे गोल’ ची चुत्येगिरी आहेच का?
लिहायला कारणं पाहिजेत तशीच न लिहायला, वाटायला आणि न वाटायलाही? भेंडी आयुष्यात थियरी चा एवढा चिखल होतोच कसा? आधी स्वत:च्याच हाताने स्वत:चे पाय बांधायचे, मग तोंडात बोळा कोंबायचा आणि मग हात पाठीमागे नेऊन हातात बेड्या ठोकायच्या असा प्रकार झाला.
पण च्यायला पाय बांधायची गरज काय?
म्हणजे मोबिलिटी शून्य. म्हणजे इतर कुणाकडे मदत मागायला जाता येणार नाही.
पण तोंडात बोळा असताना मदत मागणार कशी?
अरे माणसा तो दुसरा माणुस बोळा काढणार नाही का?
च्यायला मी कसला अर्थशून्य आणि पकाऊ लिहितो....
पण च्यायला काही लिहायचंच नाहिए तर कायको काळजी करा?
-------------
आजही काही लिहाय़चं नाही....हरे रामा - अवघड आहे!
काल टी.व्ही. बघत खालीच सोफ्यावर झोपुन गेलो. आज सकाळपासुन मान अवघडलिए. च्यायला प्रिंट केलेली ड्रॉइंग्स उचलुन आणणंही मेजर कष्ट वाटताहेत. च्यायला आधी उल्हास त्यात फाल्गुन मास! आता फाल्गुन म्हणजे कधी? आषाढ, श्रावण, भाद्रपद. आयची जय - मराठी महिने पण आठवत नाहीत आता! विकिपिडिया न उघडता ट्राय मारतो. चैत्र, वैशाख, आषाढ, श्रावण, भाद्रपद - अडलं गाड! आणि फाल्गुन! ’वसंत’ ऋतू झाला - महिना नाही. आयला नेहमीची गोची. तो पाडवा कधी येतो? गुढी पाडवा एप्रिल मध्ये. मग दिवाळीत पण पाडवा नावाचा प्रकार असतो ना? संक्रांत जानेवारीत. बाकी नागपंचमी वगैरे सण श्रावणात - म्हणजे जुलै ऑगस्ट मधे. च्यायला मराठी सण तरी कोणते? संक्रात, पाडवा, गणपती, दिवाळी, दसरा - एवढेच? आणि नागपंचमी! आईशपत मी प्राथमिक शाळेत किती झोपा काढाव्यात?
नुसते महिने आणि सण नाही - आपण रंग बघु.
आता दिवाळं काढायचंच ठरवलंय तर आख्खं काढु.
पांढरा. आणि काळा. आणि ते तानापिहिनिपाजा. ता म्हणजे - तांबडा (म्हणजे लाल!), ना म्हणजे नारिंगी (म्हणजे orange?), पि म्हणजे पिवळा, हि म्हणजे हिरवा, नि म्हणजे निळा. पा म्हणजे पांढरा नाही. नक्की. पा म्हणजे पारवा! च्यायला पारवा म्हणजे कबुतर ना? जे रंगांचं तेच पक्ष्यांचं! आता पक्षी काढायच्या आधी - जा म्हणजे जांभळा. आणखी रंग कुठले? मोरपंखी माहितिए. ते म्हणजे मोरासारखा दिसतो आणि छावीचा एक ड्रेस त्या कलरचा होता म्हणुन. गुलाबी! च्यायला हा कसा विसरलो!! ब्राऊन म्हणजे कुठला? पाणचट या शब्दाचा अर्थ एक आख्या जन्मात कळणार नाही मला. चावट हा आणखी एक शब्द. जो माणुस लई चावतो - म्हणजे लई बोर मारतो, तो चावट का? डबल मीनिंग जोक मारणाऱ्याला पण चावट म्हणतात ना? जो माणुस शाळा करतो त्याला पण चावट म्हणतात ना? ’चल, चावट कुठला’ - म्हणजे पोरीला मी आवडतो कि नावडतो! श्या! मराठी म्हणजे हजामगिरी आहे!
किलो म्हणजे शेर नाही ना? मग पावशेर म्हणजे किती, आतपाव म्हणजे काय, छटाक म्हणजे एकदम तोळ्यात का?
एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम - बरोबर? जर म्हणजे काय? म्हणजे ते जर, जोरु, जमीन मधली जर! इथुन तिथुन सिंगल पीस कापडातला पदर कोणता हे बायकांना कसं कळतं? साड्यांना पिको करतात - त्यातला पिको हा शब्द कुठल्या भाषेतला? शिलाई देणे म्हणजे - न्हाव्याला (च्यायला हा एक आणखी झोल) सॉरी शिंप्याला त्याचे पैसे देणे, तर मग हातशिलाई म्हणजे काय? रेडिमेड साड्या का विकत नाहीत? म्हणजे साड्या विकतानाच फॉल आणि पिको का करत नाहीत - कि बायकांना त्या निमित्ताने आणखी खरेदी करण्यासाठी कंपल्सरी परत बोलावणे हा त्यामागचा चतुर विचार?
न्हावी म्हणजे चप्पल दुरुस्त करणारा - नाही तो चांभार! न्हावी म्हणजे केस कापणारा. शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. धोबी म्हणजे कपडे धुणारा. इस्त्री हा मराठी शब्द आहे का? गवळी हा शब्द अजुन वापरात आहे का? मग दूधवाला शब्द का वापरतात? कामवाली हे लेटेस्ट असेल तर आधी तिला काय म्हणायचे? मोलकरीण? त्या आधी? दासी? त्या आधी?
हात, पाय, डोळे, नाक ठीक आहे - पण घोटा हा अवयव कुठे येतो? कंबर, गुडघे ठीक आहे - thigh ला काय म्हणतात? ओह मांडी! च्यायला मी हजाम आहे. नडगी माहितिए, टाच माहितिए - ढोपर कुठे येतं? ढोपर म्हणजेच कोपर का?
पायच्या बोटांना वेगवेगळी नावे आहेत का?
हाताच्या बोटांना आहेत - अंगठा, करंगळी माहितिएत. पाचापैकी दोन आली, म्हणजे चाळीस टक्के! सुटलो!!
अरंगळी करंगळी मधलं बोट चापेकळी. यात चापेकळी कि चाफेकळी?
अरंगळी कुठलं?
फुलांची नावं काय? चाफा, गुलाब, झेंडू.
जास्वंदी (ब्लॉग लिहिते म्हणुन माहिती) - पण ते फूल कसं दिसतं?
ट्युलिप हे फूल मराठीत मिळतं का?
च्यायला पोरींची नाव फुलांची का ठेवतात - आणि त्यात पण काही काही फुलांचीच का?
पोरींची आणि त्यामुळे फुलांची आणखी नावं कुठली? गुलबकावली हे फूल आहे का? गुलबकावली हे पोरीचं नाव कसलं विनोदी होईल ना? पोरी पोरी....ससुराल गेंदा फूल! लिली ला मराठी शब्द काय? आठवलं - आय मीन मराठी फुलाचं नाव आठवलं! सदाफुली! च्यायला एवढीच फुलं?
आमच्या सेक्रेटरीचं नाव ऍझेलिया आहे - हे एका फुलाचं नाव आहे.
चवी - अळणी माहितिए. खारट तिखट माहितिए. तुरट काय प्रकार असतो? आंबट माहितिए. सेक्साट पुस्तकं वाचणाऱ्यांना आंबटशौकीन का म्हणतात?
एवढं सगळं माहिती नसुन मी मराठीत कसा लिहितो?
पण मी लिहितोय कुठे?
न लिहिण्याच्या प्रयत्नात सापडलेले हे विनाकारण प्रश्न!
----------
आज सीडर पार्क क्रिसेंटवर राईट टर्न मारताना -
च्यायला सीडर पार्क क्रिसेंट का सीडर आणखी काहीतरी आहे?
मी माझ्या घराचा पत्ता पाठ करुन ठेवलाय पण तरी कधी कधी झोल होतोच. पण पाठ करण्याचा प्रयत्न करुनही मला माझ्या घरी कसं यायचं हे पाहुण्यांना सांगता येत नाही. मी आपला शहाण्या मुलासारखा त्यांना फुल्ल पत्ता देतो - आणि ’फिगर आऊट युअरसेल्फ’ म्हणतो. तर त्या सीडर पार्क क्रिसेंट वर वळताना विचार आला कि मी म्हणजे रायन, आलोक कि हरी?
म्हणजे त्याचं आहे असं कि मी सध्या ’फाईव्ह पॉइंट समवन’ (परत) वाचतोय. मला परत परत पुस्तकं वाचायला, पिक्चर पहायला आवडतात. मी बऱ्याचदा क्रिकेटच्या मॅचचे हायलाईट्सही परत परत बघतो! आय नो - मी हजाम आहे!
तर मी जे पुस्तक वाचत असतो त्याचा माझ्यावर प्रभाव पडतो. म्हणजे मी एक शॅलो प्रकारचा माणुस आहे - असंही मला वाटतं. पण इनहेरंट आळसामुळे ’आता पडतो तर पडतो - अब क्या बच्चेकी जान लेगा?’ विचार करुन मी तो प्रभाव पडू देतो. तर सध्या माझ्यावर ’फाईव्ह पॉईंट समवन’ चा प्रभाव मी (परत) पाडुन घेतोय. का? तर काय माहित? कुठला ना कुठला प्रभाव पडणारंच आहे तर हा बरा असा विचार केला असावा बहुतेक. एनी वे - बाकीची पुस्तकं पण अधुन मधुन हाताला लागतात आणि या प्रभावांची मेजर भेसळ होते. मी आर्थर हॅलेचं ’हॉटेल’ ही (परत) वाचतोय. लई कौतुकाने मी आमच्या लायब्ररी मधून ’एका रानवेड्याची शोधयात्रा’ आणलं. पण तो कृष्णमेघ कुंटे कि थिटे कि कोण प्राणी स्वत:बद्दलंच एवढं बोलत बसलाय कि मला पुढे वाचवेना. आई म्हणाली चांगलं आहे. (कृष्णमेघ कुंटे - म्हणजे त्याचे मित्र त्याला के के म्हणत असतील का? कि काळा ढग म्हणत असतील?)
आज सकाळी स्वप्न पडलं कि पोलीस माझ्या मागे लागलेत. फुल टु हेलिकॉप्टर वगैरे. आणि माझी टोटल फाटलिए वगैरे. क्रिस आणि मी दोघंही पळत होतो. आय मीन बसमध्ये होतो पण तरी पळतच होतो. म्हणजे शब्दश: नाही - पण कमॉन - यु गॉट इट राईट? पी.एम.टी. स्वारगेटला आली तेव्हा पकडले जाणार हे जवळपास नक्की झालं होतं. क्रिसला म्हटलं तु लक्ष्मीनारायणमध्ये पिक्चरला जा - आय विल फिगर इट आऊट. पण मग मी पण तिकडेच गेलो, पण मला पिक्चर आवडला नाही कुठला. एनीवे - आम्ही बांधत असलेल्या वॉलमध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाल्याने पोलीस शोधत असणार असं जाग आल्यावर वाटलं. मग बरं वाटुन परत झोपलो.
परवाची मान कालही दुखतंच होती. आजही थोडी दुखतिए पण आज नो बिग डील. ’बिग डील!’ म्हणणारे लोक मला अजिबात आवडत नाहीत. तर काल मान दुखत असुनही ऑफिसला चाललो होतो. बस आली. बसलो. मग लक्षात आलं कि चुकीच्या बसमध्ये बसलोय. मग चुकीच्या बसने चुकीच्या ठिकाणी गेलो. मग विचार केला कि आज ऑफिसला दांडी मारुन पिक्चर टाकावा. पण मग विचार केला कि चुकीच्या रस्त्याने ऑफिसला जाऊ. शेवटी तासाभराने ऑफिस सापडलं.
तर सांगत काय होतो - फाईव्ह पॉईंट समवन...
तर मी रायन कि आलोक कि हरी?
असे आपण कुठलं पात्र कधीच नसतो. नेहमीच आपली सगळ्या पात्रांची सरमिसळ. पण मग वाचताना एकेक पात्राची स्वतंत्र व्यक्तिमत्वं आहेत असं का वाटतं? कि लेखक आपल्यातलीच पात्र वेगवेगळी लिहितो? मी स्टोरी लिहायचा प्रयत्न करतोय - यु नो - गोष्ट! पण मला काही म्हणता काही सुचत नाहिए. मी माझ्यातली पात्र वेगवेगळी करुन त्यांची गोष्ट लिहिली पाहिजे.
मी हजाम आहे. कुठल्याही परिक्षेआधी मी त्या परिक्षेत जागतिक विक्रम वगैरे किती मार्कांचा आहे हे शोधुन काढतो आणि तो मोडण्याच्या विचाराने अभ्यासाला (म्हणजे अभ्यासाच्या विचाराला) लागतो. परिक्षा जसजशी जवळ येत जाते तसतसा मी ’रिऍलिस्टिक’ होत जातो आणि शेवटी अभ्यास न करता काठावर पास होतो. पण मी कधी नापास झालो नाही आणि अगदीच निकड नसताना मी कधी अभ्यासही केला नाही.
अकरावीत असताना आमच्या ग्रुपमध्ये आम्ही कॉपी करायचं ठरवलं. त्या वेळी आम्ही एकमेकांना डॉन म्हणत असु. त्यातल्या एकाही मित्राचं मला नावही आठवत नाही. एनीवे. ही अगदीच पकाऊ आठवण झाली.
तर हॉवर्ड रॉर्कच्या नादाला लागुन मी एक किरकोळ सिव्हिल इंजिनियर झालो. हे पण पकाऊ आहे.
तर मी भैरप्पा, मार्केझ, कॉफमन वगैरेंच्या नादाला लागुन गोष्टी लिहायचा प्रयत्न करतोय. त्यात एवढा तोंडघशी पडलोय कि एकही पात्र आतुन निघणं वगैरे सोडा - बाहेरुनही येत नाही. त्यामुळे मी हल्ली फक्त माझ्या गोष्टींची नावं लिहुन ठेवतोय. पहिल्या गोष्टीचं नाव ’ऍडॅप्टेशन’ दुसरीचं नाव ’अरुचा प्रोजेक्ट’. अरुचा प्रोजेक्ट एवढी डेंजर आहे कि मी लिहायच्या आधीच तिला ’प्रौढांसाठी’ सर्टिफिकेट देऊन टाकलंय. मी असाच ’न लिहीत’ राहिलो तर मी पहुतेक कुठल्यातरी पॉर्न साईटवर गोष्टी लिहायला लागीन असं मला वाटायला लागलंय.
एनीवे - मला सुचणाऱ्या - म्हणजे न सुचणाऱ्या गोष्टी पण माझ्या नाहीत. ऍडॅप्टेशन कॉफमनची आहे, अरुचा प्रोजेक्ट आणखी कुणाची. हेमिंग्वेची पण एक गोष्ट ढापायचा विचार करतोय. च्यायला मी नदीम श्रवण, अन्नु मलिक प्रभृतींना शिव्या घालणं बंद केलं पाहिजे. कारण ढापणं ही ही एक कला आहे. ते येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!
तर - मला ढापायलाही जमत नाहिए. मी हेमींग्वेचं एक पान ढापायचा प्रयत्न केला.
एनीवे - तर मला गोष्टी लिहायच्यात आणि मला जमत नाहीत.
आय मीन माझा झोल असा होतोय कि तीन लोक एकमेकांशी कसे बोलतील? मी दोन लोकांना एकमेकांशी बोलवु शकतो. तीनांचा (कि तिनाचा?) प्रयत्न नाही केला कधी - पण the thought bogs me down.
मी आता ’गोष्ट कशी लिहायची’ याचा क्लास लावायचा विचार करतोय.
ऍडॅप्टेशनमध्ये कॉफमनचं पण असंच झालं होतं - असं वाटुन मला बरं वाटतंय. पण ते तितकंसं खरं नाही. कारण कॉफमनचं असं झालं नव्हतं. त्याने त्याच्या एका पात्राबद्दल असं घडवलं होतं. बोरियत इंटरेस्टिंग करुन सांगायला शिकलं पाहिजे. म्हणजे उपमन्यु चॅटर्जी. ’इंग्लिश ऑगस्ट’ वाचताना बोर बोर होतं, पण पुस्तक खाली ठेववत नाही.
असं काहीतरी लिहायला पाहिजे.
मध्यंतरी मी रॉ वगैरे वर एक ढिंगचँग फटका गोष्ट लिहायचा विचार करत होतो. पण मग वाटलं कि मी काही हेर वगैरे नाही. म्हणुन मग ऑथेंटिसिटी साठी मी रिसर्च वगैरे करायला लागलो. एका सी.आय.ए. च्या झोलरला वगैरे पण गाठलं. पण त्याने लई बोर मारलं. मग मी विषय सोडुन दिला.
माझ्या बसमध्ये कधी कधी फटका देसी पोरी असतात.
त्यातल्या एकीशी माझं चांगलंच सूत जमलंय. म्हणजे आम्ही कधी (म्हणजे कध्धी कध्धीच) एकमेकांशी बोललो वगैरे नाहियोत. पण आम्ही एकमेकांकडे संशयास्पद रित्या बघतो. म्हणजे ही मुलगी माझ्याशी बोलायला आली तर? अशी मला गुदगुल्या भिती वाटते. तशीच भिती तिलाही वाटते.
मी हसण्याची टक्केवारी केलेली एकदा. म्हणजे आरशा समोर उभं राहुन जास्तीत जास्त हसरा चेहरा करायचा. त्याला शंभर टक्के म्हणायचं. मग स्केल कमी कमी करत जात पाच वर आणायचं. असं प्रयत्न केला कि जमतं. असं मला वाटतं. त्या हसण्यात गूढता, भिती, हुरहुर वगैरे वगैरे हजार भावना मिसळता येतात. त्यामुळे प्रत्येक टक्केवारीत कलर शेडिंग वगैरे असतं.
तर ती पोरगी आणि मी एकमेकांकडे बघुन गूढ पाच टक्के हसतो. म्हणजे मग ते ग्रे आणि पिंक मिक्स केला कि कसं दिसेल, तसं दिसत असणार. म्हणजे लांबुन स्टॉपवर बघुन आम्ही अस्फुट हसतो आणि जवळ आल्यावर इकडे तिकडे बघायचा प्रयत्न करतो.
एनीवे - तर पुढच्यावेळी ती दिसली तर तिला ’हाय’ म्हणायचं असं मी बरेच दिवस ठरवतोय.
तिच्यावर गोष्ट लिहायची हे ही मी बरेच दिवस ठरवतोय. पण पहिल्या भेटीच्या पुढे गोष्ट कधी सरकतच नाही. पहिली भेट कसली, तिला ’हाय’ म्हणायचे इतके सिनॅरियो मी ट्राय केलेत कि - आणि शिवाय पुढे गोष्टच नाहिए काही!
म्हणजे ठीके - एक दिवस मी हाय म्हटलो, किंवा - गोष्टीत हाय म्हटलो तरी पुढे काय?
गोष्ट म्हणजे त्यात काहीतरी व्हायलाच पाहिजे!
असं मला वाटत होतं, पण काल बस चुकल्यावर - म्हणजे चुकीची बस पकडल्यावर असं वाटलं कि च्यायला - काहीतरी व्हायला मी काहीतरी घडवायलाच पाहिजे असं कोण म्हणतं? चुकुन चुकीच्या बसमध्ये बसुन जग वेगळं दिसु शकतं आणि बिनपात्राचीही गोष्ट बनु शकते!
पण आता सुचतिए ती गोष्ट म्हणजे अरुची गोष्ट.
म्हणजे एक असते अरु.
अरुचं नाव अरुंधती. (’अरुंद - ती’ असा एक जोक मला आत्ताच फ्रेश फ्रेश सुचला).
अरुंधतीच्या नवऱ्याचं नाव सुरेश! (च्यायला मला पण असली पकाऊ नवं सुचतात ना! सुरेश!! च्यायला हे काय नाव झालं?)
तर सुरेश.
आणि तिला दोन मुलं.
चावट आणि फाजील - मला या दोन्ही शब्दांचे अर्थ माहित नाहीत आणि शिवाय मी जोक करण्याच्या नादात गोष्टीचा सिरियसनेस ऑलरेडी हरवत चाललोय.
तर अरुंधतीला दोन मुलं - नावं आपण नंतर शोधू.
अरुंधती आणि सुरेश रहातात ऑस्ट्रेलियात.
आता कारणं नकोत! रहातात म्हटलं कि रहातात.
एनी वे - बोर झालं.
थोडक्यात अरुच्या नवऱ्याची अरु कशी ’लावते’ अशी गोष्ट आहे. पण मला ती झेपणार नाही.
शिवाय मला नको नको ते डीटेल नको नको त्या वेळेस सुचत जातात.
म्हणजे मुक्ता आता इमिटेशन वगैरे करायला लागलिए. टाटा म्हटलं हि हात हलवते. हाय म्हटलं तरी हात हलवते. तिला नाही म्हणता येतं वगैरे वगैरे. पण तिला ’ससा तो ससा’ गाणं भयानक आवडतं. म्हणजे सध्या आवडतं. याच्याआधी तिला ’सांग सांग भोलानाथ’ आवडायचं आणि हल्ली ती ’येडगुंना येडगु’ ऐकायला लागलिए.तर सांगत काय होतो तर परवा मी तिला ससा आणि कासवाची गोष्ट सांगायला लागलो. म्हणजे एकदा झालं माहितिये का? ससा आणि कासव जंगलात भेटले वगैरे.
पण ती स्टोरी एकदमच छोटी आहे, म्हणुन मग मी त्यात पाणी घालायला लागतो. कि तुला माहितिये का जंगल कसं असतं? तिथे खुप खुप झाडं असतात,धमाल धुमुल फुलं असतात वगैरे वगैरे. पुढे पुढे मी ससा आणि त्याने रेस लाईटली का घेतली असावी अशा सायकॉलॉजीत शिरायचा प्रयत्न करतो. मग ती ’अरे याला आवरा कुणीतरी!’ असा चेहरा करते वगैरे वगैरे.
तर सांगायचा मुद्दा असा कि मी मग ती स्टोरी वळवत वगैरे रहातो.
तर मला असं वाटायला लागलंय कि मला मुक्तासारखा साऊंडिंग बोर्ड वगैरे शोधायला पाहिजे.
आता बास.
आणि आपण बसमधल्या पोरीला इथुन पुढे नेहा म्हणु.
ती दिल्लीची असेल तर (आणि तिला बहिण असेल तर) तिच्या बहिणीचं नाव पूजा.
येडगुंना येडगु वेंकटरमणा येडगु - का असंच काहितरी.
-----------------
काल रात्री काहीतरी लिहायला लागलो पण मुक्ता रडायला लागली म्हणुन तसंच राहुन गेलं.
एनीवे -
आज बाहेर ऊन पडलंय!
ऊन पडलंय ही आमच्याकडे न्युज होते!
सिऍटलमध्ये वर्षातले ३०० दिवस ढगाळ वातावरण असतं. त्यामुळे कच्छ मध्ये लोक कसे - आज काय विशेष? या प्रश्नावर ’आज पाऊस पडला’ असं उत्तर देतील तसं - ’आज ऊन पडलंय’.
मी काही दिवसांपुर्वी एक गोष्ट लिहिली. ती एका मित्राला आवडली. दुसऱ्यालाही आवडली पण डिप्रेसिंग वाटली. मग पहिला पण मत बदलुन - हो राव! डिप्रेसिंग आहे म्हणाला. मला वाटलेलं गोष्ट ओ.के. आहे. दु:खांत म्हणुन डिप्रेसिंग असेलच असं काही नाही. पण लिहिताना मी डिप्रेस्ड होतो. ती काल वाचली. ओ.के. वाटली.
रांबा हो हो हो हो हो
रांबा हो हो हो हो हो
ऐ दुनिया....तुझको सलाम, तुने मेरा नाम भुला दिया था....
मला असली भुक्कड गाणी म्हणायला लय आवडतं.
काल लायब्ररीत ’डॅडी’ सापडला. उत्साहाने माधुरीला दाखवायला गेलो तर तो रशियन निघाला.
रांबा हो हो हो हो हो
बहुतेक मला कविता सुचतिए.
रांबा हो हो हो हो हो
पण मला पुढची लाईन सुचत नाहिए
रांबा हो हो हो हो हो
तशीच रेटत रहा
रांबा हो हो हो हो हो
पुढे काय?
रांबा हो हो हो हो हो
माहित नाही
रांबा हो हो हो हो हो
जाऊदे. उगीच आपली री पकडायची आणि आळवत बसायची यात काही राम नाही.
आज आणखी काही सुचत नाही.
दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल - साबरमती के सं त तुने कर दिया कमाल....
च्यायला आज बोर गाणी पण आठवत नाहिएत.
आज बसमध्ये नेहा नव्हती.
आज डब्यात सांडग्याची भाजी आणली होती.
च्यायला सांडगा कसा बनवत असतील? आय मीन कसा बनवतात ते माहितिए. लहानपणी ते वाळवणे वगैरे प्रकार करायचो. पण सांडगा कसा बनवायचा यचा सर्च मारला पाहिजे. मग इथे ३०० दिवस सांडगा बनवायचा आणि उरलेल्या ६५ दिवसात तो वाळवायचा. सांडगा मायक्रोवेव्ह मध्ये वाळवता येतो का याचा सर्च पण केला पाहिजे. म्हणजे मग ३६५ दिवस बनवता आणि वाळवता येईल. मग सांडग्यांचं मास प्रॉडक्शन सुरु करता येईल.
एका माकडने काढलंय दुकान
एका माकडने काढलंय दुकान
आली गिर्हाईके छान छान
आली गिर्हाईके छान छान छान छान
अस्वल आले हलवीत पाय
म्हणाले मधाचा भाव काय काय काय
एका माकडने काढलंय दुकान
आणखी एक:
एक मुलगा गेला तळ्याच्या काठी
विसरला पुस्तक विसरला पाटी
तळ्यात होता बेडुक त्याने पोशाख केला - टणॅटणी टणॅटणी
तळ्यात होता बेडुक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला!
संस्कृतच्या मास्तरांचा तास झाला सुरु
बेडुक लागला मधे मधे डराव डुरु करु
असं एक गाणं मुक्ताला धमाल आवडतं.
फालतु गाणी आठवण्याच्या प्रयत्नांच मला फक्त दर्जेदार गाणी आठवताहेत.
आता मी दर्जेदार गाणी आठवण्याचा प्रयत्न करतो.
आता मला दर्जेदार गाणीही आठवत नाहिएत.
माझ्यात मेजर आळस संचारलाय.
मला काहीच करावंसं वाटत नाहिए.
माझ्या डोक्यात कुठलेही विचारही येत नाहियेत. अध्यात्मात या स्टेटला काहीतरी नाव असावं. या स्टेट साठी लोक तपश्चर्या वगैरे करत असावेत. पण मला तपश्चर्या न करताही असं ब्लॅन्क वाटतंय. म्हणजे छान.
दम मारो दम.... हे दर्जेदार गाणं झालं का?
काल मला कुठलंही स्वप्न पडलं नाही. किंवा पडलं असेल तर आठवलं नाही. वेल...एक आठवतंय, पण ते काल पडलेलं का - याबद्दल शंका आहे! सिऍटल महाराष्ट्र मंडळ वीकेंडला ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ दाखवतंय टोटेम लेक सिनेमा मध्ये. च्यायला हे अप्ण काय थिएटरचं नाव झालं? थिएटरचं नाव म्हणजे कसं - अलका, विजय, प्रभात, राहुल, निलायम, मंगला, अप्सरा - असं पाहिजे.
मी आयुष्यात किती ठिकाणी पिक्चर पाहिलेत? हे वरचे सगळे आणि भरत, वेस्टएंड, एम्पायर, लक्ष्मीनारायण, भोरमध्ये मराठा आणि दुसरं एक. इथे बेलव्ह्युत एक बेस्ट.
परवा मी ऑफिसमधुन पळुन जाऊन 'हँग-ओव्हर’ पाहिला. हा ऑफिसातुन पळुन जाऊन पहाण्यासारखा पिक्चर आहे.
या आठवड्यात ’कन्नथिल मुथमित्तल’ (परत), ’ऍलेक्झांड्राज प्रोजेक्ट’, ’बॅन्डिट क्वीन’ (परत) पाहिले.
मी असा डायरी लिहिल्यासारखा का लिहितोय?
मी उगीच वेळ घालवण्यापेक्षा गोष्ट लिहायचा प्रयत्न केला पाहिजे.
ह्या - हे असं सगळं कुणी वाचलं तर लोक मला वेडसर म्हणतील.
पण झपाट्याने डोक्यात येणारे विचार त्यांनी (झपाट्याने) लिहुन ठेवले तर कदाचित मी त्यांना वेडसर म्हणीन.
ही डायरी नाहिये.
मी डायरीत काय लिहायचो? बहुतेक आज काय काय केलं हे लिहायचो. आज काय काय वाटलं हे लिहायचाही प्रयत्न करायचो, पण काय काय केलं च्या लिखाणात काय काय वाटलं चं लिखाण दबुन जातं. आयुष्याच्या लहानपणी ’डायरी ऑफ ऍन फ्रॅन्क’ वाचू नये. कारण मग आपल्या आयुष्यात काहीच होत नाहिए असं आपल्याला निष्कारण वाटत रहातं.
मी एक असा विषय पकडुन मुद्देसूद लिहिलं पाहिजे.
संवेदनं विषय पकडुन धर्मावर काहीतरी लिहिलं होतं. मग मेघनानं तोच मुद्दा पकडुन आणखी काहीतरी लिहिलं. मग असं बऱ्याच लोकांनी लिहिलं. मग मूळ मुद्दा कुठला वगैरे अशी काहीतरी बाचाबाची झाली बहुतेक.
माझा धर्म कुठला?
संवेद हजाम आहे. मला असला प्रश्न कधीही पडत नाही. माझा धर्म हिंदू. माझी जात मराठा. मराठा म्हणजे ब्राम्हण नाही. मला ब्राम्हण आवडत नाहीत. बोलायची बात नस्से.
पण मला मराठेही आवडत नाहीत.
आणि गुल्टी तर अजिबातच आवडत नाहीत.
देसींचा मला वैताग येतो. इन जनरल ते ’हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’ मध्ये के.के. मेनन चं कॅरॅक्टर आहे ना - तसा मी असणार. के.के मेनन जो कुठला रोल करतो - मी तसा तसा आहे असं मला वाटतं. असं मी खुप पुर्वी नाना पाटेकर बद्दल वाटवुन घ्यायचा प्रयत्न केला होता. पण मला तसं वाटलं नाही. पण मला नाना पाटेकर आवडतो.
आणि मला माधुरी दीक्षित आवडते. पण मला तिचा ’प्रहार’ आणि ’परिंदा’ सोडुन दुसरा कुठलाही रोल आवडत नाही. परवा माधुरीला - म्हणजे आमच्या माधुरीला म्हटलं कि दीक्षितांची माधुरी शेजारच्या सोसायटीत शिफ्ट होतिए. तर माधुरी म्हणाली - अरे ती फ्लोरिडाला होती ना? मी म्हटलं होती. मग तिथुन अटलांटाला शिफ्ट झाली. आता शेजारच्या सोसायटीत येतिए. माधुरीला खरं वाटलं.
तर.
तरी.
तर्र.
तरतरी.
तारा.
तरातरा.
तीर.
तिरीमिरी.
मराठी हजाम आहे.
हे पोस्टावं का?
मोठं झालंय.
पण सगळंच एवढं पकाऊ आहे कि काटछाट तरी कुठे करणार?
एवढं लिहुनही मी ’लिहिलं’ काहीच नाही.
अनंत सामंत पकाऊ लिहितात. केवळ त्यांच्या वेगळ्या अनुभवविश्वामुळे त्यांच्या गोष्टी वेगळ्या वाटतात असं म्हणणारा कुणीतरी उपटसुंभ एकदा निघाला होता. उपटसुंभ चा अर्थ काय?
तर मी लिहिलं काहिही नाही.
हे माझं पर्फेक्ट झीरो पोस्ट आहे. काही पोस्ट लिहुन बरं वाटतं. काही लिहुन चिडचिड होते. हे लिहुन काहीच वाटत नाही. स्वत:बद्दलच्या अपेक्षा कमी केल्या कि अपेक्षाभंग होत नाही.
जब तारे जमींपर आते है
आकाश जमीं हो जाता है
वो चांद नहीं फिर घर जाता
रात यहीं सो जाता है....का असंच काहितरी.
चला - काय नाहीतर दर्जेदार तरी!
मला परवाचा रेस्टरुममधला गमतीदार किस्सा आठवला - पण तो इथे अप्रस्तुत.
मी ’न लिहायचा’ ’प्रयत्न’ करतोय का?
नाही.
मला लिहायला काही सुचत नाहिए का?
हो.
मला असं नेहमीच होतं का?
म्हणजे कसं?
म्हणजे सुचत नाही असं?
असं काही नाही! सुचतं अधुन मधुन!!
मग मी लिहित का नाही?
कारण मला जे सुचतं ते लिहावंसं वाटत नाही. लिहावंसं वाटावंसं सुचलं कि लिहिता येत नाही. मला इकडुन तिकडुन ढापुगिरी कराविशी वाटते. पण मला ती जमत नाही.
मग याच्यावर उपाय काय?
च्यायला मला काय विचारतो? इथे एक्सपर्ट मी का मी?
मी.
मग?
म्हणजे - प्रश्नाचा उद्देश असा कि याच्यावर उपाय काय असं ’मला’ वाटतं?
मला वाटतं कि....मी लिहायला पाहिजे. म्हणजे जमत बिमत वगैरे जरी नसलं तरी लिहायला पाहिजे. म्हणजे भुक्कडची का होईना, पण प्रॅक्टिस रहाते. पण मला आळसामुळे आणि तत्वामुळे तसं करावंसं वाटत नाही.
कुठलं तत्व?
-------------------
दोन-चार दिवसापुर्वी लिहिलेलं हे वाचलं आणि कुठलं तत्व हे आठवेना. जे आठवत पण नाही त्याला मग तत्व म्हणावं का? का म्हणावं? का म्हणु नये? तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याचा विचार करा. माझ्याकडे वेळ आहे, पण मी विचार करणार नाही. विचार न करायला मला लई आवडतं पण तरी मी फार विचार करतो असे सगळेजण मला काळजीयुक्त टोनमध्ये म्हणतात. मी असा विचार करतो, असा लिहितो म्हणजे मी नक्कीच ऍबनॉर्मल माणुस आहे, अशी मला खात्री आहे. या कंडिशनला मानसशास्त्रात काहीतरी नाव असणार. ते कुणीतरी मला कधीतरी सांगेल. त्या दिवसाची मी वाट बघतोय.
मी पोटाचे स्नायु कडक करु शकतो. त्यामुळे माझ्या पोटावरुन ट्रक गेला तरी मला काही होणार नाही असा माझा लहानपणापसुन समज आहे. माझ्या वयाचे, माझ्या बॅचमधले लोक आता काय करत असतील - असा मी अधुनमधुन विचार करतो. माझ्या बॅचमधल्या एका मुलाचं वेबपेज मी एकदा चाळत होतो. तेव्हा त्याचे १५ कि २० वगैरे पेपर पब्लिश झालेले. माझे दोनच. म्हणुन मग मी डिप्रेस वगैरे झालो. मग सिद्धेश मला म्हणाला - अरे अभिजित्, तुला २० पेपर पब्लिश करायचे आहेत का? मग जे कधी नकोच होतं ते न मिळाल्याचं दु:ख का? मग मला एकदम फ्रेश वगैरे वाटलं. अजुनही मला जेव्हा काही मिळत नाही तेव्हा ते वाक्य आठवतो आणि मला बरं वाटतं. मला जे हवं होतं ते नाही मिळालं तरी मी - ते मला नकोच होतं, त्यामुळे मला दु:ख वाटायची काही गरज नाही असं स्वत:ला समजावतो आणि बरं वाटुन घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला गोष्ट लिहिता येत नाही. म्हणजे झाटा येत नाही. मी गोष्टी वाचतो आणि च्यायला आपल्याला का जमत नाही म्हणुन झुरत बसतो. पण तरी ’जिस गांव जाना ही नहीं उस रस्ते चलनेसे क्या फायदा?’ वगैरे वगैरे डायलॉग पण म्हणतो.
एनी वे - हे सगळं सांगायचंच नव्हतं. लहानपणापासुन माझ्या डोक्यात आणखी एक विचार पक्का आहे. कि मी कधी जेल मध्ये वगैरे गेलो तर मी भरपूर वाचन करीन. हा विचार माझ्या डोक्यात कुठुन आला माहित नाही. बहुतेक भगतसिंग वगैरे लोक किंवा जवाहरलाल नेहरु वगैरे लोक जेल मध्ये जाऊन भरपूर वाचन करीत - असं कुठेतरी वाचलं असेल. त्यामुळे जेल म्हणजे कन्फाइनमेंट आणि भरपूर मोकळा वेळ अशी माझी कन्सेप्ट आहे. दोन्ही गोष्टी मला आवडतात. म्हणजे मला बाहेर जायलाही आवडतं. म्हणजे मी ट्रेक वगैरेही करतो, पण दारं बंद करुन टी.व्ही. पहाणे किंवा पुस्तक वाचणे वगैरे गोष्टीही मी करु शकतो. तर - पण कंपल्सरी दुसऱ्या कुणी तुमच्यासाठी दारं बंद करुन तुम्हाला कोंडुन ठेवलं तर कदाचित पुस्तक वाचायचा मूड जाईल असं मला हल्ली हल्ली वाटायला लागलंय. बहुतेक मी मोठा होतोय.
मी विक्षिप्त लिहितोय. माहितिये. मी नेहमीच असा लिहितो. मी मुद्दाम असं लिहितो का? नाही. मी आपला मनात येईल ते वाक्य लिहित जातो. माझा टायपिंग चा स्पीड बीड पण चांगला आहे. आणि मुळात म्हणजे मला मी आत्ता या क्षणी पुढचं वाक्य काय लिहिणार आहे हे माहित नाहिये. बहुतेक हा माझा यु.एस.पी. असावा. यु.एस.पी. या शब्दाचा अर्थ मला एकेकाळी माहित होता. तो मला आता आठवत नाही.
सगळेच लोक माझ्यासारखे भरभर आणि सुचेल ते लिहित गेले तर ते माझ्यासारखंच होईल का? कदाचित नाही, कारण बहुतेक जसा प्रत्येक माणुस वेगळा दिसतो तसं लेखन वेगळं असणार. मी एका ब्लॉगरचे लेख कधीकधी वाचतो. तो चांगला लिहितो असंही मला कधी कधी वाटतं. त्याने मध्यंतरी एक भुक्कड गोष्ट लिहिली. म्हणजे तो ही याच फेजमधुन गेला असणार. पण तो झुरलाय आणि आयुष्यात एकटा आहे असं मला वाटतं.
हे एक आणखी - मला माहिती असलेला - किंवा माहिती नसलेलाही माणुस असा असा असणार याबद्दल माझं ठाम मत असतं. असं बहुतेक प्रत्येकाचं प्रत्येकाबद्दल असेल. पण माझं मत ठाम असतं.
मला युजुअली भरपुर कमेंट्स मिळतात, पण त्या नेटवर इतर कुठेही काहिही वाचणेबल असण्याची वानवा असते म्हणुन मिळतात. म्हणजे तुम्ही ’च्याय़ला आज लई काम आहे’ म्हणत ऑफिसमध्ये येता आणि काम सोडुन पेपर वाचणे किंवा - whatever that you do - करत बसता आणि मग तुम्हाला फार फार कंटाळा येतो. आणि काम न केल्याचं गिल्ट वाढतंच जातं आणि तरी, अजुन थोडं, अजुन थोडं करत तुम्ही अत्यंत गिल्टी टाईमपास रेटत रहाता तेव्हा तुम्हाला - ’आई शपत मॅन, आपल्यासारखंच आणखी कुणाला पण होतं!’ असं माझा ब्लॉग पाहुन वाटतं. मग तुम्ही त्या अर्थाची कमेंट लिहिता. त्यात चुकीचं काहीच नाही. किंवा असेल तर मला माहित नाही. पण हे जे लिहितोय याला साहित्य म्हणत नाहीत. पण माझे असले चुत्याप्स झोल असतात कि -
मला साहित्य लिहायचंय का?
मे बी!
पण मग हे साहित्य का नाही? मी ईमानदारीत लिहितोय. जे वाटेल ते लिहितोय. त्याला आगा ना पिछा नसेल, पण तो असावा - अशी वेसण मलाच का गरजेची वाटतिये? वेसण हा शब्द मला आत्ताच सुचला. तो योग्य का नाही याचा विचार करायला मला जरा थांबावं लागेल. पण मी असा थांबलो तर मग आधीच्या वाक्यांमध्ये पण अलंकारीक शब्द घुसडत राहील. मग अलंकारीक, ड्रामॅटिक करण्याच्या प्रयत्नांत वाक्य बदलीन. विचार तोच ठेवतोय असं स्वत:ला समजावीत राहीन. भेंचोद - ते सगळं करप्शन झालं.
मी माझ्या लेखांमध्ये शिव्या का वापरतो?
मी वापरत नाही. त्या येतात. माझ्या लेखांत सगळंच येतं. मी आणत काहीच नाही. मी पण येतो. स्वत:ला आणत नाही. रियल लाईफमध्ये मी कधी शिव्या बिव्या देत नाही. म्हणजे पळत पळत जाऊनही बस वगैरे चुकली तर मी भेन्चोद वगैरे म्हणतो - पण ते तेवढ्यापुरतं. वाक्यावाक्याला फक फक म्हणणारे लोक मला आवडत नाहीत. अधुन मधुन फक म्हणणारे लोकही मला आवडत नाहीत. एक्सट्रीम शब्दांचा एक्सट्रीम ठिकाणीच वापर करणारे लोक मला आवडतात. ते शब्द मग शिव्या असतील तरी माझी त्याला ना नसते.
एनी वे - मला भरपुर कमेंट्स येतात. त्या आल्या कि मला बरं वाटतं. वाचलेलं काही आवडलं तर लेखकाला तसं सांगितलंच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी भरपूर किंवा कमी भरपूर कमेंट्स लिहितो.
मला येणाऱ्या कमेंट्स ठिकठाक असतात. पण मी लिहितोय हे किती लोकांना आणि किती कमी कळतं याचं मला आश्चर्य वाटतं. आणि मला त्याचं बरंही वाटतं. कुठलीतरी कमेंट एकदम म्हणजे एकदम वर्मी बसते - म्हणजे साधीसुधी कमेंट लेख आणि मी कळल्याचं एवढं स्पष्ट सांगुन जाते कि मेजर इनसिक्युअर वाटायला लागतं. मग च्यायला आपण स्वत:ला एवढं रिव्हील नाय करायला पाहिजे असं मी ठरवतो. पण तरी अशी कमेंट यावी, आणि त्यापेक्षाही जास्त लोकांना मी कळावो (कि कळो) वगैरे मला वाटतं. पण तसं कधी झालं नाही, होत नाही. इथे नाही. बाहेर नाही. त्याबद्दल कॉलेज बिलेज मध्ये असताना विषाद वगैरे वाटायचा. तो वाटायचा बंद कधी झाला ते आठवत नाही.
एनीवे - हे एकदम फिलॉसॉफिकल झालं.
आता मी कंप्लिट ब्लॅन्क आहे आणि मझ्या डोक्यात परत कधीच कुठलाच विचार येणार नाही, असं मला अचानक वाटलं. याला एक शब्द आहे. तो मला आठवत नाहिये. मी तो आठवायचा प्रयत्न करतोय. आठवला. याला विरक्ती येणं म्हणत असावेत. बहुतेक. एकदम प्युअर स्टेट.
एनीवे - विचार येतच रहातील आणि कागदावर उतरतंच रहातील.
भेंचोत एक गोष्ट लिहायचिए तरीपण....
हो. ’एवढं’ लिहिण्याएवढा मोकळा वेळ मला मिळतो.
ReplyDeleteमी हजाम आहे.
हा..हा..हा.. :) जबर्राट लिहीलंयेस. पण खरंच, का दिसत नाहीये ही एण्ट्री मराठीब्लॉग्ज.नेट वर? गेली ६ महिने तू काहीच न लिहील्याने तुझा ब्लॉग पवनसाहेबांनी "मॄत ब्लॉग" म्हणून घोषित केला की काय?
ReplyDeleteबाय द वे :
१. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पौष, मार्गशीर्ष, माघ, फ़ाल्गुन!! (मार्गशीर्ष आणि माघ चा सिक्वेन्स चुकल्याची शंका आहेच.)
२. जाऊदे.. पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मलाच बोअर झालंय.
३. दिक्षीतांची माधुरी तुला आवडत असली तरीपण ब्राह्मणच बरं का! ;)
"पुढे पुढे मी ससा आणि त्याने रेस लाईटली का घेतली असावी अशा सायकॉलॉजीत शिरायचा प्रयत्न करतो. मग ती ’अरे याला आवरा कुणीतरी!’ असा चेहरा करते" .. हे लय भारी! गोष्टीत घातलेलं पाणीच काय मुळात गोष्टच कळण्याइतकं माझं बाळ मोठं झालेलं नसल्याने मी तिला काहीही पकवतो. ते चुकून बायकोनं ऐकलं तर ती थक्क होते, म्हणून मी किचनचं दार ओढून घेऊन बॅकयार्डात फ़ेऱ्या मारत पकवतो.
गोष्ट लिहीशील तेव्हा लिही, पण ते ’नेहा’ चं पुढे काय झालं ते सांग मात्र. ;)
bapare.. itka??... LOL.. hmm....
ReplyDeleteasha pratikriya manat alya he sagla vachtana!
however, atta samplyavar exact kay reply dyava kalat nahiye..
tari sahi lihlay asa mhanin! :)
नेहमी बघत असतो तुज्या ब्लॉग वर .... काही लिहिलंय का? आज बर्याच दिवसांनी वाचायला मिळाले .... मला पण लिहिण्याच्या बाबतीत असाच अनुभव आहे ... म्हणजे जे डोक्यात असते ते लिहिता येत नाही वैगरे ..वैगरे .. कधी विचार करतो का करायचा एवढा अट्टाहास ... मरो च्यायला... काहीच नसला कि मग फ़क़्त रामगोपाल वर्माचा ब्लॉग वाचतो... माणूस बेक्कार आहे ...
ReplyDeleteअसाच जेंव्हा वाट्टेल तेंव्हा वाट्टेल ते लिहित जा ... आणि विरक्ती ची भावना ती पण तशीच येते .... पण मी त्याला "रिक्त पणा" म्हणतो... म्हणजे कशाचच काहीही वाटेनासे होते... काही आवडत नाही... चीड नाही... आनंद नाही.. वैगरे
करप्शनबद्दल -
ReplyDeleteहिचकॉक प्रत्यक्ष एडिटिंग खूप कमी करत असे म्हणे. याचा अर्थ तो एडिटिंगच करत नसे का? च्याक्, शक्यच नाही. त्याच्या डोक्यात त्या त्या गोष्टीवर काम करत असतानाच पुष्कळ काटछाट-भर-पुढेमागे-खाडाखोड होत असेल. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे एकदा गोष्ट डोक्यात धड उतरली, की मग उरतं ते फक्त सिनेमा त्याबरहुकूम तयार करण्याचं बोअरिंग काम. पण मग प्रत्यक्ष - टेबलवर होणारं एडिटिंग म्हणजे करप्शन झालं का? तुझ्याच म्हणण्याप्रमाणे तू तुझ्या डोक्यात येणारे विचार जसेच्या तसे उतरवत जातोस. तसं करताना त्याच्यावर आधी काहीच प्रोसेसिंग करत नाहीस का? कळत - नकळत? जर नाही - तर मग डोक्यात एखादी गोष्ट आहे, लिहून होईल तेव्हा होईल, असं आपण म्हणतो, तेव्हा थांबलेले असतो ते नक्की कशासाठी?
असं प्रोसेसिंग करण्यात चुकीचं काय आहे? किंबहुना मी एखाद्याला एखादी घडलेली खरीखुरी घटना सांगतानाही नकळत स्वत:शी त्याची काहीएक रचना करते. ती घटना सांगताना आपोआप माझ्या दृष्टिकोनातून सांगते. किंवा जे काही सांगते त्याला माझ्या आकलनाची, माझ्या अनुभवविश्वाची, माझ्या अनाहूत मताची - आणि मी कळत-नकळत करू इच्छित असलेल्या फसवणुकीचीही - चौकट असतेच. माझं सांगणं कितीही उत्स्फूर्त, कितीही प्रामाणिक आणि खरंखुरं असलं तरीही.
मग या प्रोसेसिंगबद्दल आकस का? आलंकारिक किंवा अनलंकृत यांचा त्याच्याशी काय संबंध? जोवर मला जे सांगायचंय ते मी योग्य त्या परिणामकारकपणे - जास्त नाही, आणि कमीही नाही, माझ्यापुरत्या समाधानकारकपणे - सांगतेय, तोवर काय प्रॉब्लेम आहे? हां, जर त्यामुळे गोष्टीच्या परिणामाला धक्का लागत असेल, तर ते अश्लीलच. तो निर्णय वाचणार्याचा.
पण मुळात प्रोसेसिंग म्हणजेच करप्शन - हे मला झेपलेलं नाहीये.
साहित्याबद्दल -
कविता-कथा-दीर्घकथा-लघुकथा-रूपककथा-कादंबरी-लघुकादंबरी-चरित्र-प्रवासवर्णन यांखेरीज दुसरं काहीच ’साहित्य’ नाही असं म्हणायचं असेल, तर मग वाचनालयांतून ’संकीर्ण’ किंवा ’विविध’ या प्रकाराखाली ज्याचं वर्गीकरण केलं जातं ते सगळंच बाद ठरवायला लागेल. पण तसं नसतं. नाहीतर मग ’किमया’ किंवा ’मौनराग’ किंवा ’स्टुडिओ’ असं सगळं न-साहित्य ठरलं असतं. असा ढोबळ आडाखा - तोही नियम नव्हे - दिसतो की; आत्मचरित्र, प्रवासवर्णन, आणि हे कुठलाच ठाम फॉर्म नसलेलं ’ललित’ साहित्य हे सर्वसाधारणपणे लेखकाच्या खर्या आयडेंटिटीला लपवत नाही. त्यात कल्पनाविस्तार कमी आणि ’सत्य’ (आय नो, हे वादग्रस्त आहे) जास्त असतं, असा समज आहे. तोही धाब्यावर बसवता येतोच. मग कसली वेसण?
तत्त्वाबद्दल -
कुठलं तत्त्व?!
बाकी -
...चला - काय नाहीतर दर्जेदार तरी!...
...तर. तरी. तर्र. तरतरी. तारा. तरातरा. तीर. तिरीमिरी...
...मग ती ’अरे याला आवरा कुणीतरी!’ असा चेहरा करते वगैरे वगैरे....
...मी हसण्याची टक्केवारी केलेली एकदा. म्हणजे आरशा समोर उभं राहुन जास्तीत जास्त हसरा चेहरा करायचा. त्याला शंभर टक्के म्हणायचं. मग स्केल कमी कमी करत जात पाच वर आणायचं. असं प्रयत्न केला कि जमतं. असं मला वाटतं. त्या हसण्यात गूढता, भिती, हुरहुर वगैरे वगैरे हजार भावना मिसळता येतात. त्यामुळे प्रत्येक टक्केवारीत कलर शेडिंग वगैरे असतं...
...आता दिवाळं काढायचंच ठरवलंय तर आख्खं काढु...
...लिहायला कारणं पाहिजेत तशीच न लिहायला, वाटायला आणि न वाटायलाही? भेंडी आयुष्यात थियरी चा एवढा चिखल होतोच कसा?...
हे सगळं मस्त आहे! पण शेवटी ’अरे, तू सांगणार होतास ना काहीतरी? काय झालं?’ अशी प्रतिक्रिया होते. तीच तुला हवी होती असेल, तर मग योग्य चाललंय. वेसणबिसण गेली खड्ड्यात.
वाचून संपेपर्यंत तुझ्या विचारांसोबत वहावत वेगवेगळे विचार येत राहिले कमेंट टाकण्यासाठी. पण शेवटाला "आता मी कंप्लिट ब्लॅन्क आहे आणि मझ्या डोक्यात परत कधीच कुठलाच विचार येणार नाही, असं मला अचानक वाटलं." असंच वाटलं. :-)मेघनाला मानलं पाहिजे, सर्व वाचून झाल्यावरही तिला काय म्हणायचं होतं हे तिच्या लक्षात राहिलं. :-) पण ती म्हणतेय ते खरंय. कितीही उत्स्फूर्त लिहायचं म्हटलं तरी तू ’एकदा गोष्ट लिहायची आहे’ हा एक मुद्दा मध्यभागी ठेवून लिहिलं आहेस हे मान्य आहे.
ReplyDeleteबाकी तुझा लिहिण्याचा स्पीड खरंच सॉलिड आहे हं.हे पोस्ट ’Partly Funny' असं म्हणणं योग्य होईल. :-))
-विद्या.
कठीण आहे. प्रतिक्रिया काय लिहावी किंवा मला काय कळालं याचा भयंकर अंदाज घेऊन बघितला पण कळालं नाही. मधली काही वाक्य नेहमी प्रमाणे बाठेय-चमकदार आहेत पण एकूणात जरा लांबण लागली आहे असं वाटलं. आपण ज्यात चांगले आहोत तेच सतत करुन पर्फेक्शनिस्ट व्हावं की सतत प्रयोग करुन एक्सपेरिमेन्टल व्हावं हा कायमच वादाचा मुद्दा आहे.
ReplyDeleteएक्दम कवटीच आहेस...लिही की काही तरी
ReplyDeleteतू लेखक म्हणून मरणपंथाला लागलास / मेलास का? की अजून थोडीफार धुगधुगी / आशा शिल्लक आहे?
ReplyDeleteMama - moth mothya lekhakanchi ji pustake aapan vachato ti "edited" astaat ha vichar kelayes kadhi?? You have got many gems in here. Edit them. Put them into a coherent theme. Vichar dokyaat yetana asech randomly yetaat - or so I think from personal experience. I am too lazy to write blogs anymore but the thinking and working out problems at work also happens in a haphazard way. The challenge, the fun is in expressing them coherently to others. Ignore faapat pasara and weave the gems right. I am sure you have it in you to become a powerful writer. Think about it as an alternate profession. Tujha to nhavi kaam Karnara college cha mitra athavatoye?
ReplyDeleteLooking forward to an edited version of this - will you do one for me? Baba.
prayatna karunahee ha blog visaraNe kaTheeNa vaaTate. Sadhyaa nakki kaay karataay ?
ReplyDeleteSatish Waghmare
अभिजीत बाठे या हजामाची माझ्याशी दुश्मनी कुठली तेच मला कळत नाही. या कलाकारामुळं मला माझ्या बायकोच्या नेहमी शिव्या पडतात. आरे म्हणजे ... हा लिहीतो छान म्हणून वाचायला घ्या ... आणि हा काही संपता संपत नाही आणि हसू आवरता येत नाही ... त्यात आम्ही पडलो निशाचर आणि बायकोला "झोप आवर, लाख रुपै देईन" म्हटल तरी पापणी आवरत नाही ... म्हणजे याच्या ब्लॉगने बायकोच्या झोपेचं खोबरं आणि नारळ आमच्या डोक्यावर.
ReplyDeleteबाबारे ... एकुलतं एक लग्न आणि एकुलती एक बायको आहे माझी ... का मोडायच्या मागे लागलायस. म्हणजे मोडलंच तर मी धन्यवाद म्हणीन ... पण असा फ़ुसका यत्न नको ...
जरा आणखी जोरात होवून जावू दे की.
एकही पात्र आतुन निघणं वगैरे सोडा - बाहेरुनही येत नाही. हे खरच...पण तुम्ही अंतर्बाह्य स्पष्ट होता ..हे ही खर..
ReplyDelete