दशद्वार
समर ऑफ नाइंटी सिक्स.....
पहिल्या सेम च्या डिस्टिंक्शन च्या जोरावर घातलेला धुमाकुळ.
परिक्षेच्या अल्याड-पल्याड वाचलेली - कळ्या नि सत्यजित ने दिलेली - 'दशद्वार से सोपान तक', 'आमचा बाप अन आम्ही', 'काजळमाया', आणि 'द फाउंटनहेड'.
मिन्ना शी अविदा च्या राजीनाम्यावर झालेले वाद.
भाबडं ऊन नि एकट्या कविता....
आज मिन्ना ची माझ्या शाळेचा पर्यवेक्षक झाल्याची मेल आली आणि कधीकाळी वाचल्या पुस्तकासारखा 'समर ऑफ नाइंटी सिक्स' ओझरता दिसला.
आंबेडकरांबद्दल खराखुरा आदर 'आमचा बाप...' ने शिकवला आणि - जो मणक्यात हरतो तो खरा 'दलित' - हे ही. शाळेत वडापावची ऐपत नसताना आंबेडकरांच्या 'दिवसाला एका सॅंडवीच वर पीएचडी' ची 'जय भीम - कुठंही हिंड' च्या जोशात प्रमाणाबाहेर टवाळी करायचो. अस्पृश्यतेवर मात करुन कोलंबिया युनिव्हर्सिटीतून पोलिटिकल सायन्स आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी मिळवलेला हा माणुस भारतात परतुन फक्त कायदा किंवा राजकारण नव्हे तर सोम्यागोम्याचं आयुष्य कसा पालटवु शकतो हे या पुस्तकात आणि आजुबाजुच्या अनेक मित्रांत दिसलं.
आज दळभद्री कारणं सांगुन भारतात परतायचं टाळणाऱ्या माझ्यासारख्या माझ्यांची कीव आली आणि 'दलित' झाल्यासारखं वाटलं.
'काजळमाया' ने प्रचंड डिप्रेशन आणलं.
'अजुन बरेच वर्षे जी.ए. वाचायचा नाही' हे ठरवून नि पाळूनही 'काजळमायाची काजळी' अजुन जिथे तिथे सापडते. काजळमायाची काजळी आणि फाउंटनहेड चा उजेड!
हे पुस्तक वाचताना आलेली 'धिस इज इट' ची भावना आज इतके वर्ष टिकेल हे तेव्हा सांगुनही खरं वाटलं नसतं!!
हरिवंशराय बच्चनच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडाचं नाव 'दशद्वार से सोपान तक'!
दशद्वार त्यांच्या पहिल्या घराचं नाव - सोपान शेवटच्या.
पण आजचा विषय ही पुस्तकं नाहिच.
काल माधुरीला आमच्या नविन घराच्या चाव्या मिळाल्या.
गुल्टी प्रथेप्रमाणे तिने तिच्या बहीण आणि मेव्हण्याबरोबर नविन घरी जाऊन दूध उतू जावू देवून वगैरे 'वास्तुशांत' केली.
मग फोन वर तिची अखंड बडबड - इथे असं आहे, तिथे ते ठेऊ, खुर्च्यांची कव्हर्स, शेजारी कोण रहातं, बाहेर झाडांची दाटी किती, तुझे जुने कपडे आणि बाथरुम मधलं मॅट आणलंस तर खबरदार!
माझा सगळ्याच गोष्टींत जीव अडकतो. (च्यायला हे कंफरटर - रेड क्रॉस, विशाल, सिध, अजित आणि मागच्या चार वर्षांत घरी आलेले अनेक मित्र एवढा प्रवास करुन माझ्यापर्यंत पोहोचलंय....ते काय असंच टाकुन द्यायचं?)
तिच्या सगळ्या गोष्टींना हो हो म्हणुन मी ते मॅटच काय घरातली रद्दीही घेउन सिऍटल ला जायचा विचार करतोय!
तिला कॉन्व्हर्सेशन मोनोपोलाइज करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हैदराबाद ला जाताना तिच्या (न पिणाऱ्या) बाबांसोबत स्टील च्या ग्लासातुन कशी हेयवर्ड-५००० पिली याची 'रोमहर्षक' गोष्ट सांगितली. आश्चर्य म्हणजे तिलाही ती खरी वाटली! असं कुणी हळुच 'बाटलीत' आल्यावर धमाल येते!!
मग तिला म्हटलं - चल आपल्या नव्या घराला एक छान नाव देऊ!
तिला काही सुचेना.
ती म्हणे 'अभिजित-माधुरी' म्हणुयात.
च्यायला हे काय नाव झालं?
त्यापेक्षा त्याचा शॉर्ट फॉर्म करुन 'अधुरी' म्हणू वगैरे विनोद झाले.
मग तिला म्हटलं 'दशद्वार' ठेऊ!
तिला त्यामागची गोष्ट सांगितली.
बच्चन.
मधुशाला.
'दशद्वार'.
'सोपान'.
आणिही सुचेल ते.
तिलाही नाव आवडलं....
आमचं 'सोपान' कुठे असेल - माहित नाही.
या घराला दहा दारं नसतीलही -
पण या घराला सुखाच्या, एकमेकांबद्दलच्या आदराच्या, प्रेमाच्या दाही दिशा खुल्या राहो ही 'स्थपती' कडे प्रार्थना.
खुप छान!
ReplyDeleteFountainheadचा उजेड :D. खरं आहे. ह्या पुस्तकाने खर्या अर्थाने being yourself असणे म्हणजे काय सांगितले. माझ्यामते तरी Roark is the IDEAL man. All erroneous and all perfect(आणि तो तसा का आहे/का नाही ह्यावर झेवियर्सच्या canteenमधे शाब्दीक मारामार्या व्हायच्या:P). so focused on his art and creation:)
जीएं ची सगळी पुस्तके माझ्या आईबाबांच्या पुस्तकांच्या कपाटात मी कायम पहात आले होते तरी कधी उघडून वाचली नव्हती. पण मग एक दिवस पालेकरांचा कैरी पाहिला आणि आईच्या मते चित्रपट चांगला असूनही कथेच्या पातळीपर्यंत कुठेच पोचत नाही असं जरास तीव्र ऐकल तेव्हा कुतुहलाने पहिल्यांदा पिंगळावेळ मधून कैरी शोधून काढली.
आणि मग त्यातला तो दोन बदामी पंख पसरुन 'काळेपणाने उडून जाणारा' भारद्वाज आणि 'दिसला तर दुसर्याला दाखवावा, नाही दिसला तर तक्रार करु नये' शिकवणारा हिरव्या नीळ्या वीजेसारखा मोर पाहिला आणि ताप चढावा तसे जीए मला चढले. झपाटल्यासारखी काजळमाया, हिरवे रावे, निळासावळा वाचून काढले. आई ने warn केलं असूनही की जीए असे एकदम वाचू नयेत. पण त्यांच ऑर्फ़ियस, स्वामी, यात्रीक चं विश्व, त्यातली ती 'पाण्याने निथळत असलेल्या कड्यांमधून फिकट सापाप्रमाणे वर वर चढत जाणारी पायवाट'.. असली भाषा, रुपके ती अटळ गूढ नीयती ह्यांनी मला संपूर्ण वेढून टाकल होत. पण मग तो डोस इतका ओव्हर झाला की (डीप्रेशन च म्हणायच त्याला) त्यानंतर परत ती कधी वाचली नाहीत हेही खरे. भारतातून येताना एकही पुस्तक आणल नाही त्यांच. नकोच वाटत मुद्दाम ती वाचून अस्वस्थ वाटून घेणं.
नव्या घरासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा. इथे दिल्या जाणार्या blessing प्रमाणे
May the roof above us never fall in
And may we good companions beneath it never fall out
आमेन, मामा.. आमेन..! तुम्हां दोघांचे नव्या 'दशद्वारा'च्या वास्तुशांतीबद्दल अभिनंदन! पुस्तकांचा संदर्भही सुरेख लिहिलयेस!
ReplyDeleteक्लास!
ReplyDeleteआयुष्यात स्वकमाईने घर घेण्याइतकं satisfying क्वचितच काही असेल!
कॉंन्ग्रॅट्स मामा आणि माधूरी - तूम्हा दोघांना!
घराचं नाव छान आहे पण खरं सांगू? बच्चनच्या लाईफ़चा संदर्भ असलेल्या नावापेक्षा तूझ्या आयुष्याशी निगडित नाव मला जास्त आवडलं असतं.
विचार कर! नक्की सुचेल!
आणि हो - घराचे फ़ोटोज पोस्ट कर इथे!
बाबा -
ReplyDeleteस्वकमाईचं वगैरे ठीक आहे, पण मी विकत घेत नाहिये.
भाड्याचंच आहे, आणि स्वतंत्रही नाही - अपार्टमेंट आहे.
तू म्हणशील - स्वत:चं नाही, स्वतंत्र नाही, दहा दारं नाहीत, नावामागचा रेफरन्स ही माझा नाही - मग का?
तर इन्स्टिंक्ट! (आणि बिकॉज आय कॅन)
त्या वेळेस वाटलं, ठेवलं.
हे सगळेच प्रश्न मला पडले नाहीत असं नाही.
पण ती पश्चातबुद्धी.
आता घर तर नाव घेऊन बसलंय.
आणि सोडतही नाहिये - क्या करनेका?
ट्युलीप -
ReplyDeleteहात आखडता न घेता लिहिलेल्या कॉमेंट बद्दल धन्यवाद. हॉवर्ड रॉर्क कि जय हो!
अभ्या, बाबा -
कदाचित 'अपब्रिंगिंग' मुळं असेल, पण 'लार्जर दॅन लाईफ' गोष्टी करताना बरं वाटतं.
किंवा घराला नाव देणं हे मलाच भयानक सुंदर वगैरे वाटतंय!
इथे आपण मागच्या काही दिवसातल्या विशेष गोष्टीच लिहितो. कधी मागची पोस्ट, मागच्या डायऱ्या, मागची पत्र वाचली कि असं वाटतं कि उगीच थोड्या वेगळ्या गोष्टिंना 'लार्जर दॅन लाईफ' वगैरे म्हणवून घ्यायचं म्हणजे अतीच झालं....
बाबा - तू आमच्या गावातल्या घरी आलेलास ना? कळ्या आणि त्या वेळच्या त्याच्या रूममेट्स ने त्याचं नाव 'चष्मेबद्दूर' ठेवलेलं!