अब तक छप्पन!
सुचना: हे माझं सगळ्यात दळभद्री पोस्ट आहे. उगीच काहीतरी लिहायचं म्हणुन लिहिलंय. टाळता येत असेल तर अवश्य टाळा!
लहान मुलं कशी रांगायला शिकतात, आणि मग जनता त्यांचं य कौतुक करते - तसं काहीसं माझं झालं.
म्हणजे - येणाऱ्या कमेंट्स ने असेल कदाचित, पण मीच मला जरा सीरियसली घेतलं.
कि चला - आता आपण लिहु शकतो.
तर - चला आता आपण लिहु.
मग मागच्या पोस्ट नंतर काही चांगले विषय वगैरे सुचुनही - नको, सतत लिखाणाने दर्जा घसरेल वगैरे खुळचट फंडे स्वत:लाच बजावुन ठेवले.
मग उगीच विसरतील वगैरे म्हणुन फील्ड बुक मध्ये सुचलेले विषय वगैरे व्यवस्थित नोंदवुन ठेवले. म्हणजे एका रात्री काम करताना सुर्य मावळताना कसा पाह्यला आणि मग थोड्या वेळाने त्याच जागेहुन वाफाळती कॉफी पिता पिता तो उजाडताना कसा पाहिला वगैरे वगैरे.
आता म्हटलं - चला, मागचं पोस्ट लिहुन महिना झाला, आता काही तरी लिहु - तर च्यायला काहीच सुचत नाहिये.
आय मीन - जे लिहितोय ते असं काहीतरी पकाऊ सुचतंय.
म्हणजे - मी पण बोअर आणि हे वाचणारा पण.
एखाद्या जंगलात उन्हाळ्यातल्या भर दुपारी - काडीमात्र वारा नसताना - ह्युमिडिटी कशी धुक्यासारखी पसरते - अगदी हाताने कापता येते - तसं काहीसं फीलिंग.
काहीना काही वाचन चालु. या वर्षाचं उद्दिष्ट याच महिन्यात पुर्ण होईल कदाचित - आता बाकीचे पाठलाग काय होते ते तपासलं पाहिजे. नव्या घरासाठी नाव शोधणे, पॅकिंग, मुव्हिंग, आई पप्पांचा पहिला परदेश प्रवास वगैरे गोष्टिंनी एका बाजुला वाईट 'हायपर' मध्ये दिवस चाललेत तर दुसऱ्या बाजुला - लिखाण ऑल्मोस्ट बंद.
काही चांगले पिक्चर्स बघतोय पण त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे स्वत:चीच लिमिटेशन्स स्वत:ला कबुल करण्यासारखं. आणि माझ्यासारख्या 'अहंगंडी' (च्यायला याचा अर्थ 'इगॉटिक' घ्यावा कि 'सतत गंडलेला'?) - तर माझ्यासारख्या 'अहंगंडी' माणसाला - असले कबुलीजवाब नामंजुर!
आता इथवर वाचत अलाच असाल तर - लेट मी ट्राय टु मेक युअर व्हिजिट वर्थ द एफर्ट....:)
छप्पन्न
पायात तुटकी चप्पल होती
पाय तुटक्या चपलेत होता
हे आता इतिहासजमा होईल
सतेज रंग डोळ्यांत होते
डोळ्यांत डोळ्यांची झाक होती
हे आता इतिहासजमा होईल
अगदी सुरुवातीपासून
आढावा घेतला तर
मागे वळून खूप पुढे जावं लागेल
मला त्या वेळी सगळंच बोलायचं होतं
मी ऐनवेळी काही बोलू शकलो नाही
कदाचित निवळेल आयुष्य आज ना उद्या ह्या हिशोबानी
मी सगळे डिटीपी जॉब फार
तत्परतेने केले स्वत: आणि हस्तलिखितं
आणि नमुने एकत्र स्टेपल करुन ठेवले
याची इतिहासदफ्तरी नोंद होईल
माझ्यावर लाटालाटांनी पसरत गेलेली
सुन्न आणि संथ संध्याकाळ
मी कडेकडेने निरखत राह्यलो
याला इथुन पुढे आता
ऐतिहासिक महत्व प्राप्त होईल
लिव्हिंग इज अ डिफरंट प्रोजेक्ट
नॉलेज इज अ डिफरंट प्रोजेक्ट
लिव्हिंग कॅनॉट बी पोस्टपोन्ड्
प्रेमात हरलो प्रेमाबाहेर हरलो
त्यागात हरलो भोगात हरलो
ज्याची वाट पाह्यली वाट पाह्यली वाट पाह्यली
ते धर्मयुद्ध शेवटपर्यंत झालंच नाही
इकडे आपणच येडे ठरलो.
- सलील वाघ.