Wednesday, March 19, 2008

चि. विश्वनाथ - हजामा, आठव!

आज ठरवुन बोर लिहायचा विचार आहे!
आय मीन - न ठरवताही बोर लिहिणार असेल तर च्यायला ठरवुन काही केल्याचं समाधान तरी का नको?
शिवाय युजुअली मन:स्थिती जशी असेल तसं लिहिलं जातं - त्यामुळे unpretentious लिहायचं असेल आणि जसं आहे तसं दाखवायचं असेल (बघणार कोण आहे म्हणा) तर बोरियत बाहेर पडणार.

काय विशेष नाय - सकाळी उठुन बायकोबरोबर ऑफीसला जातो.
घरापासुन पाच मिनिटांच्या अंतरावर बायकोचं ऑफीस - सहाव्या मिनिटाला माझं. (च्यायला आम्ही तरीसुद्धा दोन दोन गाड्या का विकत घेऊन ठेवल्यात काय माहित).
मग ऑफिसात जरा इकडे तिकडे, मग कॉफी, मग मेल्स, मग न्युज, मग थोडं काम, मग लंच, मग काहीतरी रटाळ काम आणि मग बायकोला घेऊन घरी.
तर हा दिनक्रम - त्यामुळे त्यात लिहिण्यासारखं काय घडणार?
गोष्टी बिष्टी लिहायच्या फडतुस विचारात अडकुन सहा एक महिने घालवले (त्यात एकही गोष्ट सुचली नाही).
ऑफिसमधल्या सनसनाटी (!) घटनांमध्ये मलाच इंटरेस्ट नसतो - त्यामुळे त्यातही विशेष काही नाही.
वीकेंड्स....सगळ्यांच्या वीकेंड्स सारखे हळुहळु येतात आणि भरभर जातात. शिवाय रविवार हा आठवड्यातला सगळ्यात भीषण दिवस! त्याच्यापेक्षा गुरुवार शुक्रवार कितीतरी प्रेमळ!
सर्किट म्हणतो त्याप्रमाणे आयुष्याची पानं उलटत रहायची - मग त्यात काय लिहिणार?

बाबाची मागच्या पोस्टवरची कमेंट वाचुन वाटलं, च्यायला खरंच मी माझ्या कामाबद्दल का नाही लिहीत? जेव्हा दुनियेतली सगळी जनता एकाच प्रकारची मगझमारी करत असते - तेव्हा मी तरी ’हटके’ काम करतो....
साईट - मग ती कुठलीही असेना - हा एक भन्नाट प्रकार असतो.
पण त्याबद्दल लिहिणं म्हणजे लिखाण टेक्निकल होण्याची भिती.
टेक्निकॅलिटी शिवायचा त्याबद्दलचा दुसरा प्रॉब्लेम असा कि सिव्हिल इंजिनियरिंग - या विषयाबद्दल लिहायचं म्हणजे ते ’रारंगढांग’, ’आम्ही भगिरथाचे पुत्र’ आणि काही प्रमाणात ’द फाउंटनहेड’ च्या तोडीचं नाही झालं तर त्यात काही राम वाटणार नाही अशी एक निष्कारण भिती.
निष्कारण कारण....जे इनएव्हिटेबल आहे ते झालं तर काय - अशी भिती वाटुन घेण्यात काय हशील?

तर - प्रोफेशन बद्दल लिहावं.

तर प्रोफेशन.
एकेकाळी माझेही रविवार प्रसन्न होते! त्यावेळी वय अवघे अकरा असल्याने असेल कदाचित, पण अशाच एका प्रसन्न रविवारच्या प्रसन्न सकाळी फिजिक्स लॅबमध्ये बसुन पोंक्षे सरांबरोबर ’ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ पाहिला आणि सिव्हिल इंजिनियर बनायचं ठरवलं.
असं आता आठवतंय - पण इतर आठवणींसारखंच - एवढं धडधडीत विधान करणं योग्य का असा प्रश्न पण मनात येतोय. कारण एवढं ठरवलं वगैरे असतं तर भविष्यातल्या झका मी का मारल्या असत्या?
मे बी ’जंजीर’ बघुन जसं इन्स्पेक्टर बनावंसं वाटलेलं तसंच ’ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ बघुन सिव्हील इंजिनियरिंग बद्दल वाटलं असणार.
ठरवलं नक्की कधी याबद्दल माझंच कन्फ्युजन आहे, पण तसं वाटलेलं हे नक्की.
पुढे (गोनीदांच्या) ’आम्ही भगिरथाचे पुत्र’ ने ती ओढ वाढली.
(प्रभाकर पेंढारकरांच्या) ’रारंग ढांग’ ने आणखीनच तीव्र झाली. (हे पुस्तक वाचुन BRO - Border Roads Organization - साठी काम करण्याची इच्छा अजुनही अधुन मधुन मान वर काढते).
पण एवढं होऊनही - मी CME - म्हणजे College of Military Engineering - च्या परिक्षेला कल्टी मारली ही फॅक्ट आहे. तशीच INS शिवाजी मध्ये Naval Architecture चा प्रवेश नाकारला ही पण. कदाचित तेव्हा भोपाळच्या SSB - Service Selection Board - मध्ये ऐकलेला ’अंधे लौडे फौजमें दौडे’ हा सुविचारही त्याला कारणीभूत असेल.
मग बारावी झाल्यावर (रिझल्ट यायच्या आधीपासुनच) ’मी सिव्हिल इंजिनियरिंग करावं कि नाही’ यावर पप्पांशी घुमशान लढाया सुरू झाल्या. (पुन्हा) एवढं सगळं करुन - सुखासुखी मिळणारी सिव्हिल इंजिनियरिंगची ऍडमिशन नाकारुन मी Instrumentation & Controls या शाखेत प्रवेश घेतला!

इथे एक मेजर गोष्ट झाली. पहिलं वर्ष संपलं आणि वाचंच म्हणुन सत्यजितने माझ्या हातात ’द फाउंटनहेड’ कोंबलं. आता मेजर गोष्ट म्हणजे - या पुस्तकात मला हॉवर्ड रॉर्क रुपी देव भेटला (ज्याची जागा आजतागायत कुणी माईका लाल घेऊ शकलेला नाही) आणि त्याने मला पुढची तीन वर्ष ’जिस गांव जाना नहीं उस रस्ते चलनेसे क्या फायदा?’ म्हणत मरणाचं छळलं! ही छळवणुक सोसत आणि (एक दिवस) सिव्हिल इंजिनियर बनायची स्वप्नं पहात मी Instrumentation इंजिनियर झालो!

BE झाल्यावर (म्हणजे अगदी नुक्ता नुक्ता - गरम गरम - झाल्या झाल्या - म्हणजे शेवटचा पेपर दिल्या दिल्या) टोटल राडा.
अगदी हाथी घोडा पालकी....करत आणि Absolute विध्वंस mode मध्ये मी Instrumentation ला रामराम ठोकला, आणि स्वत:ला Civil Engineer ही पदवी प्रदान केली.
एकतर रॉर्कचं भूत मानेवर संवार आणि ’जर मला उरलेलं आयुष्य सिव्हिल इंजिनियर म्हणुन घालवायचंय तर त्याची सुरुवात आजच आणि झालीच पाहिजे’ हा एक विचार.
तर थोडक्यात सांगायचं म्हणजे - पुढे २ वर्ष भारतात कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम करुन मी अमेरिकेला कल्टी मारली. मग इथे निवांतपणे (हे जरा अगदीच निवांतपणे झालं) सिव्हिल इंजिनियरिंगचं उच्चशिक्षण वगैरे घेऊन मागचे चारेक वर्ष इमानेईतबारे (हे फक्त म्हणायला) चाकरी करतोय.

हे सगळं लिहिताना मला मी माझा रेझ्युमे इथे का लिहितोय असा प्रश्न पडायला लागलाय!

तर आता माझी आणखी जास्त लाल करण्यापेक्षा आपण भारतात सिव्हिल इंजिनियरिंगचा धंदा कसा चालतो याच्या सुरस कथा ऐकु.
म्हणजे मी सांगतो - तुम्ही ऐका.
आय मीन - वाचा.

आता इथे काही disclaimers (म्हणजे बहुतेक नकारघंटा) टाकले/टाकल्या पाहिजेत.
१) मी स्वत:ला सिव्हिल इंजिनियर असं डिक्लेअर वगैरे करुन काही फायदा झाला नाही (तो होणार नव्हताच - पण तरी - झाला नाही). रॉर्कच्या नादाला लागल्याने मला ’काम’ करायचं होतं - कुठलंही आणि कुठेही. ते मी केलं.
२) Unofficially मी designs वगैरे केली - पण officially मी contractor म्हणुन काम केलं. (तसंही designs करायला logic आणि common sense शिवाय फार काही लागत नाही - तरिही...)
३) इथे नमुद केलेले (म्हणजे करीन ते) अनुभव माझे वैयक्तिक आहेत - तुमचे अनुभव वेगळे असु शकतील.
४) इथे नमुद केलेल्या (मी सोडुन) प्रत्येक व्यक्तीचे नाव बदललेले आहे.
५) भारतात प्रचंड भ्रष्टाचार चालतो, पण भ्रष्टाचार करणारा माणुस बुद्धीने तल्लख असणं आवश्यक असतं. त्यामुळे सिस्टिम कितीही disgusting असली तरी भारतात तल्लखबुद्धी सिव्हिल इंजिनियर्सची कमी नाही. रस्त्यांवर कितीही खड्डे असोत, गटारं कितीही वाहती (अथवा न वहाणारी) असोत आणि दरवर्षी मुंबई कितीही बुडो, ही सेना - अनियमीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आणि नियमीत मिळणाऱ्या (आणि नाईलाजाने स्वीकारल्या जाणाऱ्या) लाजिरवाण्या लाचेवर - देश चालवते ही वस्तुस्थिती आहे. (तरीही त्यांनी केलेला भ्रष्टाचार समर्थनीय नाही).
६) भारतात राहुन, भ्रष्टाचार न करता सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये जागतिक तोडीचं काम करणारे लोक आहेत - अशा काही लोकांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. पण त्यांची संख्या (काळजी वाटावी एवढी) कमी आहे.

अजुन काही disclaimers आत्तातरी सुचत नाहिएत! सुचले तर जेव्हा सुचतील तेव्हा लिहीन.

मयुरेश आणि शची या जवळच्या मित्रांनी अमेरिकेला रामराम ठोकुन भारतात सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये काम करायचं ठरवलंय. Believe me - सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये (अजुनही) हा धाडसी निर्णय आहे. हा लेख त्यांच्यासाठी!
मयुरेश, शची (आणि राधा, अर्जुन) (आणि तुमच्या आधी गेलेला मंदार) - Best of luck - लढा!

----------------

कंत्राटदार हा एक भिकारचोट शब्द आहे.
कॉन्ट्रॅक्टरला कंत्राटदार कुणी म्हणत नाही. आपल्याकडे पेपरमध्ये बोली भाषेतले शब्द वापरण्याची प्रथा नाही आणि तिथे कॉन्ट्रॅक्टरचा कंत्राटदार होतो. कॉन्ट्रॅक्टर ही जगातली बहुतेक सगळ्यात बदनाम जात. यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिनकामाचे पैसे घेणे - हा आरोप या जातीवर सर्रास होतो. तो बऱ्याचदा रास्त असतो.

मी काम करायला लागलो एका नातेवाईक मामांबरोबर. ते earthwork contractor होते. खरंतर माझे आजोबा (आईचे बाबा) ही contractor होते एकेकाळी, पण त्यांच्यानंतर त्यांचा व्यवसाय कुणी चालवला नाही. पुरंदर गडावर जाणारा गाडीरस्ता त्यांनी बांधला असं आई सांगते.
तर मी माझ्या या मामांबरोबर काम करायला लागलो.
आता earthmoving contractor म्हणजे काय? तर जो contractor माती एका ठिकाणुन उचलुन दुसऱ्या ठिकाणी टाकतो त्याला earthmoving contractor म्हणतात.
आता तुम्हाला वाटेल यात विशेष ते काय?
खरं सांगु का?
काहीच नाही!
I mean - खरं तर इन जनरल - सिव्हिल इंजिनियरिंग या व्यवसायाबद्दल विशेष असं काहीच नाही. लोक जेव्हा माझाच (म्हणजे त्यांचाच) धंदा कसा महत्वाचा - याबद्दल वाद घालायला लागतात तेव्हा माझी सॉलिड चिडचिड होते! खरं सांगायचं तर कुठलाच धंदा महत्वाचा नाही किंवा सगळेच महत्वाचे - किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं - उगीच मला पटवायच्या फंदात पडु नका.
आता कृती असते एवढीशी - कि एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी नेउन टाकायची - पण त्यात हजार झंझटी येतात. म्हणजे - ही कृती करायला तुम्ही शे-पाचशे मजुर लावणार आहात कि earthmoving machinery?
हल्ली या कामासाठी मजुर (आणि माती वाहुन न्यायला गाढवं) वगैरे कुणी वापरत नाही - आमच्याकडे यासाठी JCB आणि Poclain नावाची machinery होती - आणि हो - डंपर! (खरं तर मी कार बीर नंतर चालवली - ’ड्रायव्हिंग’ शिकलो ते या डंपरवर!)

JCB हे एक ट्रॅक्टर सारखं दिसणारं मशीन असतं (याला इकडे अमेरिकेत Back hoe म्हणतात), आणि त्याला हातासारखा दिसणारा अवयव असतो! ज्याला arm म्हणतात (duh!) आणि त्याला जोडलेलं - माती उचलणारं (हाताच्या पंजासारखं) - bucket. पुढे bulldozer सारखं दिसणारं (आणि त्याच्यासारखंच वागणारं) पातं असतं. हे एक मजबूत काम करणारं यंत्र - पण इतर मोठी यंत्रं पाह्यली कि ’हे म्हणजे काहीच नाही’ असं वाटु शकेल.

Poclain ला Poclain का म्हणतात माहित नाही - खरं तर ही (poclain) एक फ्रेंच कंपनी - ज्यांनी hydarulic excavation machinery बनवायला सुरुवात केली, पण ते १९७० च्या सुमारास! नंतर ही कंपनी विकली गेली आणि blah blah blah - पण कसंतरी त्या सुमारास हे नाव भारतात पोचलं आणि या particular यंत्राला चिकटलं! - ते आजतागायत!! (अशी कित्येक नावं कित्येक गोष्टींना चिकटलेली असतात, शिवाय सिव्हिल ही इंजिनियरिंग ची अशी एक शाखा - जिथे अनपढ लोकांशी बराच संबंध येऊ शकतो - त्यामुळे साध्या सुध्या इंग्रजी शब्दांचेही भयानक अपभ्रंश पहायला मिळतात - त्या अपभ्रंशांची मुळं शोधणं हा एक जबरा exciting खेळ होऊ शकतो).

तर poclain हे एक रणगाड्यासारखं tracks वर चालणारं यंत्र असतं, आणि JCB सारखा यालाही हातासारखा अवयव असतो - फरक एवढाच कि हे यंत्र स्वत:भोवती गोल गोल फिरु शकतं - डंपर ’लोड’ करायला त्याच्यामुळे य बरं पडतं - शिवाय हे मशीन कुठेही जाऊ शकतं - काट्याकुट्यातुन, झाडाझुडपातुन, चिखल-राड्यातुन....
मी पहिल्यांदा हे मशीन पाह्यलं त्याची एक स्टोरीच आहे!

साईट होती - पुण्यापासुन तीसेक किलोमीटर वर.
असं फक्त म्हणायला!
तीसेक म्हटलं कि तीस ते शंभर - याच्या अधेमध्ये कुठेतरी असणार असं समजायचं.
या साईटबद्दल सांगायचं म्हणजे - पुणे नगर रोडवर (तीसेक किलोमीटरवर) आम्ही रस्ता (पुणे - नगर) सोडला आणि एका खेड्याकडे घुसलो.
आम्ही म्हणजे - मी, सुन्या मोहिते (contractor), आणि शंकर नावाचा poclain ऑपरेटर.
मग डांबरी रस्ता संपुन खडीचा रस्ता लागला.
मग तो संपुन बैलगाडीचा!
सगळीकडे उजाड माळरान, काट्याची झाडं (ज्याला बाभळी म्हणतात), अधुनमधुन येणाऱ्या टेकड्या, randomely पसरलेले दगड....

च्यायला या दगडाचीपण स्टोरीच आहे!
Contractor लोक (ऍटलिस्ट भारतातले - वेल, अमेरिकेतले फार काही वेगळे नसतात, पण आपण सध्यातरी भारतातल्या contractor लोकांबद्दल बोलु) फारसे शिकलेले नसतात. म्हणजे अगदीच अनपढ असतात असं नाही, पण त्यांना अर्धशिक्षित म्हणु.
काही लोक पदवीधर वगैरे पण असतात, पण B.A., B.Com. केलेले.
काही लोक डिप्लोमे (Diploma in Civil Engineering - यांना बोली भाषेत ’डिप्लोमे’ म्हणतात) असतात.
अगदी rarely वगैरे BE सापडतात, त्यांच्याकडे इतर contractor लोक कीवमिश्रीत आदराने बघतात.
यांना आयदर सॉलिड पोलिटिकल बॅकिंग असतं - किंवा हे लोक पराकोटीचे उद्विग्न असतात.
बर ते नंतर - तर contractor लोक इन जनरल (किंवा टेक्निकली) - अर्धशिक्षित असतात.
इंग्रजी शब्द वापरुन हे अर्धशिक्षण लपवण्याचा मग ते पराकोटीचा प्रयत्न करतात - हे सगळं पुढे (कदाचित) येईलच, पण इथे सांगायचं कारण म्हणजे - साधारण १ फुट diameter च्या sphere एवढ्या दगडाला - ज्याला आपण दगड किंवा छोटा दगड म्हणु शकु - अशा दगडाला हे लोक आवर्जुन boulder म्हणतात. (सुरुवातीला मला हे असे इंग्रजी शब्द वापरणं लई विनोदी वाटायचं - नंतर सवय झाली).

तर कुठे होतो आपण - हां - तर आम्ही असे डोंगर, बाभळी, भरपुर गवत आणि इतस्तत: विखुरलेले ’बोल्डर’ यांच्यामधुन गेलेली बैलगाडीची वाट फॉलो करत जात राहिलो.
अधुन मधुन बाभळी, गवत आणि बोल्डर - यांचं प्रमाण कमीजास्त होत होतं, पण तेवढंच.
इथे कुठलातरी मेजर प्रोजेक्ट चालु असेल अशी सुतरामही शंका वाटत नव्हती.
अशात - आपण मस्तपैकी हातातल्या काठीने आजुबाजुचं गवत हाणत जात असताना अचानक समोर गवा दिसावा - तशी दाण्‍कन ती हवेली आमच्यासमोर आली!
आय मीन - it was ridiculous!
इथे आजुबजुला काहीच नाही, रस्ता नाही, बाभळीचं जंगल, अशात कोण मरायला इथे रहाणार - असा प्रश्न आम्हा तिघांनाही पडला.
हवेली ऐतिहासिक वाटत होती.
ऑफकोर्स - तिचं आता खंडहर झालं होतं - पण एकेकाळची शान लपत नव्हती.
कुंपणात गवत माजलेलं - दारं-खिडक्या लोकांनी बाकायदा (म्हणजे बा च्या कायद्यानं) पळवलेली.
मागं उरलेला आणि आत अडकलेला - अनामिक इतिहास!
हे बघत आम्ही हवेलीच्या गेटसमोर थांबलो.
जीप बंद केली.
आणि पहिल्यांदाच भरदुपारी रातकिड्यांचा प्रचंड गोंगाट ऐकु आला!
प्रचंड कलकलाट करणारं ते स्तब्ध रान, काळी पडत चाललेली ती कोठी कि हवेली, आणि जीपने उडवलेला धुरळा खाली बसला कि आपले पुतळे होऊन आपणही या इतिहासाचा भाग होणार असं काहीसं आलेलं फीलिंग.
फारशी चर्चा न करता तिथुन कल्टी मारलीच पाहिजे यावर एकमत झालं.
मग आम्ही (ताबडतोब) तिथुन कल्टी मारली.

अंदाजाने थोडा वेळ गवतातुन जात राहिलो आणि अचानक हिरालाल कोठारींची हिरवीगार केळीची बाग दिसली.
काम इथेच चालु होतं.
हिरव्यागारीचं कारण म्हणजे - बाजुने वहाणारी, तुडुंब भरलेली, संथ नदी!
हिरालाल कोठारी आणि केळी - यांचा खरंतर बादरायणही संबंध नाही. पण कुठल्यातरी शासकीय अधिकाऱ्याने कोठारींना सांगितलं कि ’कोठारी - आता तुम्ही शेतकरी व्हा!’ म्हणुन कोठारी शेतकरी झाले.
म्हणजे - कागदावर!
पैसे कमावणे हा कोठारींचा एक आवडता छंद (आणि conscience धुवुन बिवुन स्वच्छ करण्या करता वेळ मिळेल तेव्हा तिरुपतीच्या खेपा घालणे - हा दुसरा). त्यात चोरांपासुन (म्हणजे - शासनापासुन) पैसा वाचवायचा असेल तर दाखवायला म्हणुन शेतीसारखा टॅक्स-फ्री धंदा नाही!
त्यात शासनाने केळीशेती वाढावी म्हणुन भरमसाठ सबसिडी डिक्लेअर केलेली.
म्हणुन केळी.
आणि अगदी काहीच न लावता पैसा लाटायचा हे बरं दिसत नाही म्हणुन हा प्रपंच, आय मीन - प्रोजेक्ट.
शेती ’लेव्हल करणे’.
शेती ’लेव्हल करणे’ हा सधन शेतकऱ्यांचा (आणखी एक) आवडता छंद. (इतर छंदांसाठी चौफुला वगैरे आहेच, अधिक माहितीसाठी एका माजी गृहमंत्र्यांना गाठावे). कारण शेती अशी ’लेव्हल’ असेल तर मोठमोठी यंत्रं वापरुन शेती करणं सोयिस्कर ठरतं.
हे सिद्ध करणारं संशोधन उपलब्ध आहे.
पण कुठे? तर अमेरिकेत!
यावर अवचटांनी ’माती आणि पाणी’ मध्ये लई भारी लिहिलंय.
एनीवे - तर तिथे मी पहिल्यांदा poclain पाह्यलं.
शंकर म्हणाला - ’चलिए भैय्या - आपको अंदरसे मिशन दिखा दुं!’ (राज ठाकरे - तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे कि महाराष्ट्रात रहायचं असेल तर पराभुत राजकारणाचं प्रतीक असलेला मरणप्राय बिहार तुम्हाला महाराष्ट्रात निर्माण करता येणार नाही. पण असं असुनही 'मावळत्या उन्हात, केवड्याच्या/बाभळीच्या बनात’ poclain चालवायला मराठी माणुस मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे).
तर मी शंकरला म्हटलं - ’चलो, दिखा दो!’
तुम्ही लोक gaming या प्रकाराचे रसिक असाल तर तुम्हाला joy stick म्हणजे काय प्रकार असतो ते माहित असेल.
असं रिमोटच्या आकारचं खेळणं असतं.
अशा त्या खेळण्याने हे अजस्त्र धुड हलतं.
अजस्त्र म्हणजे केवढं तर त्याच्या दोन बकेटमध्ये डंपर नुसता भरत नाही, तर वजनाने कुरकुरायला लागतो! त्याचं बकेट म्हणजे एक मोठा हौद असतो ज्यात पाच-सात माणसं आरामात मावतील. आणि हे सगळं - शिवाय tracks आणि गरगर motion - या joystick ने चालतं. (ही मशीन्स अमेरिकादी देशांत विकसित झाल्याने) operator ल बसायला प्रशस्त आणि AC केबिन असते.
त्या केबिनमध्ये बसवुन शंकरने मला त्याचं काम समजावुन सांगितलं.
तेवढ्यात सुन्या म्हणाला - ’चल अभि, तुला गंमत दाखवतो!’
मी त्या रणगाड्यातुन उतरता उतरता सुन्या आणि शंकरमध्ये काही खाणाखुणा झाल्या आणि मी आणि सुन्या बकेट बघायला गेलो.
त्या अजस्त्र बकेटला तीक्ष्ण लोखंडी वगैरे दात होते.
सुन्या म्हणे - ’जा बकेटमध्ये!’
म्हटलं - ’कशाला?’
’अरे जा तर - गंमत दाखवतो!’
’भाय मेरे - काय करणार आहेस ते सांग आधी’.
तर सुन्या म्हणे - ’अरे काय घाबरतो!’
असं म्हणुन सुन्या बकेटमध्ये जाऊन literally 'बसला'!
मग भीड चेपवत मी पण जाऊन बसलो.
मग शंकरने हत्तीच्या सोंडेच्या टोकासारखं बकेट आत वळवलं आणि त्याच सोंडेसारखा poclain चा हात वर उचलला. वर उचलत सरळ केला.
आता आम्ही जमिनीपासुन पंचवीसेक फुटांवर - हवेत!
तिथुन नदी, केळीची हिरवीगार बाग, त्याच्यापलिकडचं गवताचं पिवळंशार रान आणि बाभळी - नको इतक्या स्पष्ट दिसायला लागल्या.
वीस वर्षांचा होऊन ओरडणं प्रशस्त दिसत नाही म्हणुन मीपण ’सही है मॅन, सही है मॅन’ असं मोठयाने (आणि परत परत) म्हणायला लागलो!
मग शंकरने खालुन आम्हाला ’थम्स अप’ केलं. हसत हसत सुन्याने पण केलं. मला काहीच न कळल्याने मी पण.
मग शंकरने तो poclain चा हात मशिनभोवती बऱ्याच वेळा गोल गोल फिरवला! आयची आण - आजतागायत अमेरिकेतल्या कुठल्याही रोलर कोस्टरमध्ये माझी एवढी फाटली नाहिए जेवढी त्या दिवशी शंकरच्या poclain मध्ये फाटली!
खाली आल्यावर मग मलाही सहत सहत टाळ्या देणाऱ्या सुन्या आणि शंकर बरोबर हसायला लागलं! (हे सहत सहत चुकुन झालेलं नाहिए - ती चक्कर आठवली कि माझी अक्षरं अजुनही पुढे मागे होतात).
मग सुन्याने मला ’प्रोजेक्ट’ समजावुन सांगितला.
त्यात विशेष काही नव्हतं - इकडची माती तिकडे.
सिव्हिल इंजिनियरिंग - particularly construction - मध्ये इंजिनियरिंग पेक्षा मॅनेजमेंट - मशीन्स आणि माणसांचं - महत्वाचं ठरतं. १९९९ मध्ये मी पहिल्यांदा जेव्हा poclain (आतुन) पहिलं तेव्हा आम्ही ते तासाला रु.१२००/- या दराने भाड्याने देत होतो. त्याची किंमत तेव्हा - ४५ लाख रुपये होती. असं असताना हे मशीन रोज कमीत कमी १२ तास चालणं आवश्यक होतं. इतकं चालवल्यावर मशीनचं आयुष्य चार सहा वर्षापेक्षा जास्त असु शकत नाही. अशावेळेस डिझेल, इंजीन किंवा हायड्रॉलिक ऑईल, किंवा इतर मेकॅनिकल ब्रेकडाऊन्स मुळे मशीन २-४ तास न वापरता उभं ठेवणं परवडत नव्हतं. अजुनही नाही. शिवाय प्रॉब्लेम कितीही छोटा असला तरी असल्या अशक्य जागी - जिथे सायकल मेकॅनिक मिळणं मुश्किल - तिथे हे मशीन दुरुस्त करणं दुरापास्त होतं. मग अशावेळेस २-३ Operators (एक आजारी पडला तर काय घ्या!), स्पेअर पार्ट्स, ऑईल्स वगैरे तयार ठेवायला लागायचं.
एनीवे - हे सगळं कधी तर अजुन मी BE पण व्हायचो होतो.

मशीन वगैरे बघुन झाल्यावर जवळच्या एका विहिरीपाशी जाऊन बसलो - हिरवीगार झाडी, मागची नदी, केळीचं बन - सगळाच खतरनाक प्रकार होता. तिथे स्वैपाकाला ठेवलेल्या आजीबाईंनी मग आम्हाला गरम गरम भाकऱ्या आणि बोंबलाचं कालवण आणुन दिलं.
आता इथे नमुद केलंच पाहिजे म्हणजे - (शिवाय माझं लेखन ’प्रॉडक्टिव्ह’ वगैरे करण्यासाठी तुमच्यापैकी मला कुणी जेवायला वगैरे बोलावलंच तर) संगीत, खवैय्येगिरी वगैरे प्रकारांबद्दल अगदी ’अहाहा’ करुन हळहळ वगैरे व्यक्त करणारे लोक असतात.
मी त्यातला नाही.
मी काहीही खाऊ शकतो, काही न खाताही राहु शकतो. फक्त जेव्हा जेवीन तेव्हा मला ’क्वान्टिटी’ लागते - क्वालिटीशी माझं फारसं देणंघेणं नसतं. (MS करताना मी Taco Bell मध्ये जाऊन ७५ पैशांचा ’बीन बरिटो’ खाल्ला होता. रोज. सलग सहा महिने!)
एवढं सगळं असुन त्या वातावरणात खाल्लेलं बोंबलाचं कालवण आठवुन अजुनही तोंडाला पाणी सुटतं.
तट्ट जेवण झाल्यावर नदीत राईड मारुन यायची कि तिथेच झाडाखाली पडी टाकायची असा विचार सुन्या करायला लागला. म्हटलं - अरे आपण इथे काम करायला आलोय - पडी काय टाकायची?
तर सुन्या म्हणे - अरे अभि, आपण कामच करतोय! ही मशीन्स चालु आहेत ना - म्हणजे आपले मीटर पूर्ण क्षमतेने चालु आहेत - त्यातला कुठला बंद न पडु देणं हे आपलं काम.
मला Civil Engineering मध्ये दिग्विजय करायचे होते - आणि मला वाटायला लागलं - च्यायला मी इथे वेळ वाया घालवतोय.
पण तिथे, मग तिथुन पुढे, मग ब्रायसन बरोबर स्कुल मध्ये, एरिक, शिवा, सुरी बरोबर अमेरिकेत - कळत गेलं कि Civil Engineering म्हणजे एक युद्ध असतं.
एक असं युद्ध जिथे सैनिक जन्मभर खंदक खोदत रहातात - शत्रुपासुन बचावासाठी.
शत्रु म्हणजे निसर्ग -
स्थपति!
त्याच्याबद्दलचं, त्याला समजण्याचा प्रयत्न करणारं शास्त्र ते - स्थापत्य!

हे निसर्ग वगैरे प्रकारावरुन आणखी एक आठवण आठवली.
भोपाळला SSB च्या interview च्या वेळेस interview घेणारा कमांडर म्हणाला - मी तुला मला एक प्रश्न विचारायची संधी दिली तर काय विचारशील?
मी म्हटलं - तुमचं शिक्षण काय?
तो म्हणे - मी मेकॅनिकल इंजिनियर आहे.
मग म्हटलं - आणखी एक प्रश्न....
तर तो म्हणे - एकाची संधी होती, एक झाला.
म्हटलं ठीक आहे.
तर तो म्हणे - मी प्रत्येक interview मध्ये प्रत्येकाला ही संधी देतो आणि प्रत्येकाचे प्रश्न ठराविक असतात, पण आत्तापर्यंत ’माझं शिक्षण किती’ - हे कधी कुणी मला विचारलं नव्हतं. तुला असा प्रश्न का विचारावासा वाटला?
मी म्हटलं - तुम्ही अशी संधी प्रत्येकाला देता हे बाहेर येऊन प्रत्येक जण सांगतो - मग प्रत्येक जण काहीतरी जबरा प्रश्न विचारुन तुम्हाला थक्क वगैरे कसं करायचं याचे आराखडे बांधतो - मला ती सगळी चुत्येगिरी वाटली. पण तरी - मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला याचं कारण ऐकायचं असेल तर मला दुसरा प्रश्न विचारणं आवश्यक आहे.
तर तो म्हणे - विचार.
म्हटलं - मेकॅनिकल इंजिनियर असुनही, infact मेकॅनिकल इंजिनियर असल्यानेच - तुम्हाला Indian Navy चा motto ’शं नो वरुण:’ ऐवजी ’शं नो यंत्र:’ करावासा कधी वाटला नाही का?
तर त्यावर तो (काळा कभिन्न) कमांडर हसला आणि म्हणाला - तुझं वय (मग कागद चाळुन - ) सतरा असल्याने तुला असं वाटणं साहजिक आहे, पण तंत्रज्ञान कितीही पुढारलं आणि शत्रुला नेस्तनाबुत करण्याची तुमची ताकद कितीही वाढली तरी निसर्गाला टक्कर देऊन नेहमीच त्यावर विजय मिळवतील अशी यंत्र अजुन बनली नाहीत. Navy जॉईन कर - ऍटलिस्ट अशी यंत्र बनवायचा अटेम्प्ट करता येईल तुला.
(मला अजुनही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, पण) तेव्हा मला त्याचं उत्तर फारसं पटलं नव्हतं!

च्यायला फाटा कुठे फुटला?
तर खंदक!
Civil Engineering मध्ये प्रत्येक सैनिक जन्मभर असे खंदक खोदत रहातो - स्वत:भोवती, सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाभोवती, प्रत्येकासाठी, प्रत्येकाकडुन असे खंदक खोदुन घेत रहाणं हा त्याचा व्यवसाय बनतो. जुन्या जाणत्या सैनिकांनी निसर्गाचा संहार पाहिलेला असतो. त्यांच्याकडुन शिकत, कधीकधी त्यांच्याशीही लढत, जो सैनिक लढत आणि कणा शाबुत ठेऊन दिवसाच्या शेवटी त्याची स्टोरी सांगायला जिवंत रहातो - तो झाड.
बाकीची लव्हाळी.

हे नंतर कळलं पण.
कळत गेलं - अजुन कळतंय.
पण तेव्हा माझी सॉलिड चिडचिड होत होती.
निसर्गाचा संहार मी लिंबाळ्यात पाहिला होता, जेव्हा याच navy चे भाऊबंद याच poclain ने खड्डे करत होते, याच डंपर्समधुन प्रेतं येत होती, पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या त्या प्रेतांनी हेच खड्डे भरत होते, त्यांच्यावर हेच बुलडोझर्स माती ढकलत होते....
इयत्ता अकरावीत होतो, पण तोवर मी कधी प्रेत पाहिलं नव्हतं.
लिंबाळ्यात इतकी पाहिली कि काही न वाटण्याएवढा बधीर झालो होतो.
त्या बधीरतेत जीपमध्ये बसुन केळी खाताना आलेला एक अनुभव सांगता सांगवत नाहिए....

च्यायला हे असं काही स्क्रीनवर उमटलं कि असं वाटतं कि माझ्या लहानपणी मला आलेल्या विदारक वगैरे - म्हणजे ’दीवार’ मधल्या ’मेरा बाप चोर है’ सारख्या अनुभवांमुळे तर मी Civil Engineer नाही ना झालो! (मग मला - मी earthquake resistant structures वगैरे बांधुन हजारो लोकांचे जीव वगैरे वाचवुन हीरो होतोय वगैरे वगैरे स्वप्न पडायला लागतात).
वेल, मी हीरो नाही.
आय मीन - अजुनतरी नाही.
त्याचा निवाडा व्हायला अजुन बरीच वर्ष जायचीत.
हीरो रॉर्क असतो, अमिताभ असतो, 'प्रहार’ चा नाना असतो, ’धारावी’ चा ओम पुरी असतो, (its funny but) ’राम जाने’तला शाहरुख असतो आणि माझ्याशी जागतिक युद्धं करुनही मला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक लढाईत लढायला उकसवणारा माझ्या बापासारखा बाप असतो!

असं असताना - विहिरीशेजारच्या त्या झाडाखाली, सतरंजीवर झोपुन, काम करणाऱ्या अजस्त्र यंत्रांकडं पहात - माझी चिडचिड होत होती.
ज्या शत्रुची इतके दिवस वाट पाहिली, तो शत्रु मला दिसत नव्हता.
त्याच्याशी लढायला तो लढाईच करत नव्हता.
नको तेव्हा झाड बनुन मलाच सावली देत होता

विहिरीशेजारच्या त्या झाडाखाली, सतरंजीवर झोपुन, मनात एकच विचार घुमत होता -

आत्ता - माझ्याजागी - रॉर्क असता तर -

त्याने काय केलं असतं?

-------------------

(मला ते भाग बिग पाडुन लिहायला आवडत नाही - शिवाय हे म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारखं लांबतच चाललंय -
त्यामुळे इथुन पुढचं - इथेच).

-------------------

उत्खनन

सिव्हिल मध्ये एक भारी असतं - पावसाळ्यात (This is incomplete - will work on it offline and publish it whenever ready).