अधिवेशन - पेज २ ऑफ २
म.टा. ने पोपट केला.
म्हणजे त्यांनी लेख इथे पाठवा - म्हणुन दिलेला ऍड्रेस चुकीचा निघाला.
म्हणजे - आग्रहाने जेवायला बोलवायचं आणि चुकीचा पत्ता द्यायचा - तसं काहीतरी.
एनीवे - आज सोमवार, म्हणजे अधिवेशन संपुन दिवस लोटलाय. अधिवेशनाची लाईव्ह कमेंट्री करायचा विचार होता - अर्थात बाहेर बसुन, पण वीकेंडच्या इतर कामांमुळे ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे आता जसं आठवेल तसं लिहितो.
मागचा लेख लिहिल्यावर मलाच अधिवेशनाबद्दल उत्साह कि काय ते आला. मग गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर श्रीखंड सोडुन मी सहकुटुंब सहपरिवार अधिवेशनाची तयारी बघायला गेलो. नेहमीच्याच पार्किंगच्या तुटवड्याला वैतागुन गाडी ४-५ ब्लॉक्स लांबच लावायला लागली. कन्व्हेन्शन सेंटरकडे जायला लागलो तसे मराठी देसी दिसु लागले. त्यावर काय वाटलं ते आता नीटसं आठवत नाहिए किंवा शब्दांत मांडता येत नाहिए. म्हणजे (टाय शिवाय) कोट घालुन किंवा पंजाबी ड्रेसेस घालुन कॅरी ऑन लगेज कुणी साईड वॉकवरुन ओढुन जाताना दिसलं तर काय वाटेल? अंगात जरा उत्साह आला. अरे - आपलीच माणसं आहेत, असं वाटलं. गावचा माणुस शहरात भेटल्यावर वाटायची तेवढी आपुलकी वाटली. ’काही मदत करु का?’ असं विचारण्याचा विचार प्रत्येक मराठी दिसला तेव्हा आला. पण ते लोहचुंबकाचे एकाच पोलॅरिटीचे पोल जवळ आले कि कसे ’रिपल्स’ करतात, तसं रिपल्शन जाणवलं. शेवटी एक काका-काकु समोरुन आले.
म्हणजे मी काका-काकु म्हणण्या एवढे मोठे नव्हते ते लोक, मे बी मिड-थर्टीज असतील. पण दोघेही सुबक, सुंदर, ठेंगणे. अशा लोकांना लहानपणी पासुन काका-काकु म्हणायची जी सवय लागलिए ती अजुन मोडवत नाही.
मी हसलो.
काका हसले.
काकुंचा नक्की कुठलं एक्सप्रेशन द्यावं यावर गोंधळ झाला.
मग काकांच्या चेहऱ्यावरचं हसु टोटल वाईप आऊट होऊन पुन्हा १ ते ३२ प्रकटलं!
मी ’नमस्कार’ म्हणालो.
ते म्हणे - ’तुम्ही रेडलाईन मधुन आलात का?’
मी इथल्या बसेस वगैरे फारश्या वापरत नाही - त्यामुळे रेडलाईन कि ग्रीनलाईन वगैरे माझ्या सपशेल डोक्यावरुन.
मी म्हटलं - ’मला रेडलाईन बद्दल माहिती नाही, पण तुम्हाला जायचंय कुठे नक्की?’
’नाही नाही, आम्हाला वाटलं तुम्हीपण रेडलाईन हॉटेल मधुनच येताय.’
’ओह! हॉटेल....’
मी आजुबाजुला रेडलाईन नावाचं काही पाहिलं कि नाही ते आठवायचा प्रयत्न केला पण आठवेना.
मग तेच म्हणाले ’असु द्या - आम्ही शोधतो. आमचा हा डावीकडे कि उजवीकडे घोळ तिसऱ्यांदा होतोय.’
मी ’सॉरी’ म्हटलं.
आलेल्या लोकांमधले भारतातुन किती आलेत आणि ’इथलेच’ (म्हणजे अमेरिकेतले) किती हे नीटसं कळत नव्हतं. अर्थात ते कळणार तरी कसं? कारण (जेवढं काही ऐकु आलं त्यावरुन) सगळेच लोक ऍक्सेन्ट दाखवण्याच्या अथवा त्याची टिंगल करण्याच्या प्रयत्नांत. यावर मला (लहानपणी) गावाला गेल्यावर ’मला आईसक्रीम हवंय!’ असं म्हटल्याची आठवण झाली. आजींनी खुदुखुदु हसत ’गारीगार पायजे व्हय तुला?’ म्हणुन १० पैसे दिले होते. आमच्यातल्या लग्नकार्यात पण असंच होतं. गावाकडची माणसं गावचा ऍक्सेन्ट लपवण्याच्या प्रयत्नांत आणि पुण्यातले लोक पुणेरी ऍक्सेन्ट दाखवण्याच्या प्रयत्नांत. मग जे व्हायचे ते झोल इथेही होताना दिसले.
अधिवेशनाची ’थीम’ ही ’विश्वची घर माझे’/’सेतु बांधा रे’ अशी होती. आता विश्वच घर असल्यावर घरातल्या घरात सेतु का बांधायचा असला अघोरी विचार माझ्या मनात आला, पण म्हटलं जाऊ द्या - आपल्याला काय?
वातावरण सांगायचं झालं तर टिळक रोडवर ’बादशाही’ च्या चौकात जेवढं मराठी वाटेल - तेवढं आणि तेवढंच मराठी वाटायला लागलं होतं. त्याच चौकात टिळक स्मारकच्या कॉर्नरच्या कॅसेट शॉप मध्ये एकदा भक्ती बर्वे दिसली होती. इथेही नजर कुणी ओळखीचं दिसतंय का म्हणुन भिरभिरत होती, पण कुणी दिसत नव्हतं. काही अंधुक ओळखीचे चेहरे होते पण ते कधी आणि कुठल्या मालिकेत वगैरे पाहिले ते आठवत नव्हतं. माधुरीला त्या मराठी वातावरणामध्ये ’मराठी’ काही दिसत नव्हतं.
वर गेलो आणि जब्बार पटेल दिसले!
आई-शपत माझी कॅमेरा विसरल्याबद्दल प्रचंड चरफड झाली. ते दीपा श्रीराम आणि आणखी लोकांबरोबर गप्पा मारत उभे होते. मग आम्ही कुठले कार्यक्रम किती वाजता आणि कुठल्या सभागृहात आहेत याचे फलक बघत बसलो.
नमुद केलंच पाहिजे असं म्हणजे - लोकांना माहिती देणारी व्यवस्था चोख होती. प्रत्येकाला कार्यक्रमांचे डीटेल्स देणाऱ्या पुस्तिका रजिस्ट्रेशन करतानाच दिल्या जात होत्या. त्या पुस्तिका, बीएमएम शिक्का असलेल्या पिशव्या (आता या पुणंभर वर्ष दोन वर्ष दिसतील!), ’पर्सिस्टंट’ ची जाहिरात असलेली रजिस्ट्रेशन बॅजेस इत्यादी गोष्टी रजिस्ट्रेशन डेस्कवरच मिळत होत्या. नमुद केलंच म्हणजे केलंच पाहिजे ते म्हणजे - रजिस्ट्रेशन डेस्क वरचे व्हॉलंटियर्स अत्यंत सौजन्यशीलतेने लोकांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत होते.
विषयपालट झाला.
तर - वर गेलो आणि जब्बार पटेल दिसले!
मी ढगात जातोय आणि माधुरी मला खाली खेचतिए अशी परिस्थिती व्हायला लागली. म्हणजे मी भीड चेपवत ’जाऊन बोलावं का?’ कि ’कशाला उगीच डिस्टर्ब करायचं!’ या झोल मध्ये आणि माधुरी - ’हे कोण?’ या प्रश्नात अडकलेली. मग पटकन जब्बार पटेल किती थोर आहेत याबद्दल माधुरीला माहिती दिली. मनात मात्र ’तु तलम अग्नीची पात’ गुणगुणत राहिलं. अधिवेशनाचं ब्रीदवाक्य ’एलायझा एलायझा’ ठेवायला पाहिजे होतं असंही उगीच वाटुन गेलं.
आता परत विषयांतर करत ’मुक्ता’ कडे जातो. अविनाश नारकर, सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, श्रीराम लागु अशी तगडी स्टारकास्ट असलेला मुक्ता ’प्रभात’ ला पाहिला होता तेव्हा खरंतर जातीभेदाची - म्हणजे अगदी खरंच सांगायचं तर राखीव जागांमुळं दलितांबद्दलची चीड - बरंचसं आयुष्य व्यापुन होती. ’मुक्ता’ - ढसाळांच्या रांगड्या, मल्लिकाच्या तलम आणि महानोरांच्या हळुवार शब्दांत ’डीप इंम्पॅक्ट’ करुन गेला होता.
भेद हा वाईटच. मग तो दलित असण्याने वाटो अथवा जानवं दिसण्याने, बबन असण्याने वाटो अथवा....
श्रीराम लागुंचं ’एलायझा’ ऐकलंयत?
च्यायला गाणं बघताना न दाखवलेलं, घोड्यावर खेचुन लुटुन नेलेलं दु:ख - लख्ख दिसलं होतं.
माझ्या आजोबांची इथल्या बबनशी ओळख करुन देणारे जब्बार पटेल - म्हणुनच या संमेलनाचे अध्यक्ष म्हणुन पर्फेक्ट होते.
पण आता मला त्यांना बघुन एवढं सगळं वाटलेलं - ते त्यांना कसं सांगणार?
ते जायला निघाले तेव्हा अगदीच रहावलं नाही, म्हणुन भेटायला गेलो. म्हटलं - ’नमस्कार! मी अभिजित बाठे!!’ त्यांनीही ’नमस्कार’ केला. आणि च्यायला मला काय बोलावं सुचेना. ’आय फील हॉनर्ड टु मीट यु’ म्हणालो. ’अरे! थॅन्क यु!!’ म्हणुन त्यांनी मधाळ स्माईल करत त्यांचा उबदार हात पुढे केला आणि च्यायला खचलोच!
’तुमचे पिक्चर्स पाहिलेत, ’मुक्ता’ पाह्यलाय’ म्हणालो आणि वाटलं - च्यायला काय पकवतोय मी....
मग नेहमी प्रमाणे अवघड परिस्थितीत अडकल्यावर वाचा जशी इंग्रजीचा आधार शोधते तसा म्हणुन गेलो ’आय डोन्ट नो व्हॉट टु से.....’
दोन फुल्ल सेकंद त्यांनी डोळ्यात पाहिलं (किंवा मला तसं वाटलं), आता दोन्ही हातात माझा हात घेऊन म्हणाले ’थॅन्क्स अ लॉट!’....
बरं झालं कॅमेरा विसरलो. नायतर तो क्षण बापजन्मात पकडता आला नसता....
व्हॉव....हे जरा जास्तच सेन्टी होतंय!
तर - मग आणखी उगीच इकडे तिकडे करुन घरी आलो.
दुसऱ्या दिवशी आई-बाबा जाणार होते पुस्तक प्रदर्शन बघायला. म्हटलं - थांबा, मी सोडतो. मग प्रदर्शनात साधुंचं ’सिहासन’ घेतलं. अर्ध्याच तासाचं पार्किंग मिळालेलं, मग गाडी हलवुन दुसऱ्या जागेवर लावुन बाहेर आई-बाबांची वाट बघत बसलो तर तेवढ्यात समोर अविदा दिसले!
च्यायला आता परत पोपट.
म्हणजे सगळं टीनेज ज्यांचा पाठलाग करण्यात आणि भाषणं ऐकण्यात आणि आमचंही दशक अस्वस्थ करुन घेण्यात घालवलं ते अविदा दत्त म्हणुन समोर!
मग गेलो भेटायला.
’नमस्कार अविदा! मी अभिजित बाठे!! आपण प्रबोधिनीत....’ म्हणेतोवर ’अरे बऱ्याच वर्षांनी! केवढा बदललायस!!’ करत अविदांनी डायरेक्ट जुनी ओळख काढली. च्यायला आता तर मला अस्मान ठेंगणं व्हायला लागलं! ते त्यांच्या ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या भावाबरोबर - शंतनु बरोबर आले होते. मग आई-बाबा आल्यावर शंतनुने आमचा एक मस्त फोटो काढला. उभ्या उभ्या अविदा, आई-बाबा, शंतनु, (डॉ) भुषण - वगैरे गप्पा चालु होत्या तर - मरुन कलरचा झब्बा पायजमा घालुन, पांढरी दाढी असलेले एक गृहस्थ भरभर चालत अविदाला भेटायला आले. त्यांच्या मराठी - इंग्रजीत भरभर गप्पा चालु झाल्या, त्या थांबवत अविदा म्हणाले ’तुमची ओळख करुन देतो. हा अभिजित बाठे - इथे सिऍटलमध्ये सिव्हिल इंजिनियर आहे, आणि अभिजित, हे डॉ. नरेन्द्र जाधव!’
म्हटलं आता बासच!
यावेळी तर बोलण्याचा प्रयत्न करण्याचाही प्रयत्न नाही केला.
उपयोग काय? च्यायला कुणाच्या एका शब्दाने आयुष्य उधळणारे, घडवणारे आणि त्या अनुभवाच्या बोलांनी कित्येक आयुष्य बदलवणाऱ्या लोकांशी इतिहास बोलतो. आपण कशाला तो मेरु उचला?
ते निघुन गेल्यावर स्वत:शी बोलल्यागत अविदांशी बोललो - ’आमचा बाप....’ वाचुन काय वाटलं होतं....
मग अविदा आणि शंतनुला घरी जेवायला बोलावलं, दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या भाषणानंतर माऊंट रेनियरचा प्लॅन बनवला आणि जोरावर असलेलं लक आणखी टेस्ट न करता काढता पाय घेतला. आत मधुर भंडारकरची मुलाखत सुरु होत होती.
मी पाहिलेलं अधिवेशन खरंतर इथेच संपतं. कारण कुठलाही कार्यक्रम पाह्यला मी आत गेलो नाही. त्यामुळे आतल्या वातावरणाबद्दल मी काही बोलु शकत नाही. अविदांना लास्ट मिनिट कार्यक्रमांमुळे घरी येता आलं नाही, आणि त्यांचं भाषण आणि त्यानंतरची प्रश्नोत्तरं लांबल्याने रेनियर कॅन्सल झालं. पण मग त्यांनीही झाकीर हुसेनचा कार्यक्रम सोडुन मी, देवदत्त, कुणाल आणि कुणालचे आई-बाबा यांच्याशी दोन तास अल्टिमेट गप्पा मारल्या.
त्या गप्पा या एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत आणि त्यावर लिहायचा प्रयत्न करतोय.
हे इथेच सोडुन द्यायचं म्हणजे अर्धवट होईल.
पण आता कंटाळा आला - म्हणुन - समाप्त.