Tuesday, May 06, 2008

वहाँ दासताँ मिली....

बर्फ आणि धुक्याचा राडा

सगळीकडे नुसतं धुकं, बर्फ, पाऊस, बोचरा वारा, डोंगर, त्यांचे सुळके, जागा मिळेल तिथे उगवलेलं, उंचच उंच वाढलेलं पाईनचं जंगल, गोठलेलं भलं मोठं तळं, डोंगरउतारावर रस्ता काढायच्या नादात बनलेले उंचच उंच कडे, त्याच्यावरुन निखळणारे दगड, सततची ऍव्हलान्शची भिती, आणि मान वर करुन कड्याच्या वरच्या जंगलाकडे पाहिलं तर अस्वल दिसेल अशी मनात भंपकसारखी घर करुन राहिलेली भावना.

आणि हो - मी.

मी -
सुरुवात इथुन होते आणि झोपायच्या आधी शेवट इथेच होतो.

काल दुपारी कंट्री सॉंग्ज ऐकत घरुन निघालो या साईटवर यायला. नविन जॉब घेतला. नविन म्हणजे तसा जुनाच. ब्लॉग लिहायला सुरुवात केली - म्हणजे मराठीत ब्लॉग लिहायला - तेव्हा ज्या इंटर्व्ह्युला निघालो होतो, तोच जॉब दोन वर्षांनंतर स्विकारला. त्यात बायको माहेरी गेलेली असताना त्यांनी - महिनाभर साईटवर जाशील का म्हणुन विचारल्यावर बोरियतमध्ये हो म्हटलं. इतर सगळे लोक जायला नाही का म्हणत होते, ते इथं आल्यावर कळलं.
म्हणजे अगदी कुठे स्मशानात वगैरे काम नाहिए, पण सुरुवातीला म्हटलं तसं - सगळीकडे नुसतं धुकं, बर्फ, पाऊस, बोचरा वारा, डोंगर, त्यांचे सुळके....आणि मी.

हे अमेरिकेतलं बरंच फेमस स्कीईंग रिसोर्ट.
पण हिवाळा संपायला (आणि यांचा सिझन संपायला) आणि मी इथं यायला काहीतरी विक्षिप्त टायमिंग जुळायला लागतं - तसा मी इथे. च्यायला काय करावं?
येताना - एवढा एकांत मिळतोय तर भरपुर लिहावं असा विचार केलेला, पण असा विचार डोक्यात येणं याचा अर्थच मुळी अश्या विचाराला नाट लागणं असा होतो. त्यामुळे प्रयत्न करुनही काहीही सुचणं अशक्य.

ऍलन टेलर चुत्या आहे.
’चुत्या’ हा माझा सिग्नेचर शब्द बनायला लागलाय कि काय अशी शंका मला यायला लागलिए.
काहिही लिहायचं म्हणजे - चुत्या म्हटल्याशिवाय मला बहुतेक माणसात आल्यासारखं वाटत नाही.
तर - ऍलन टेलर चुत्या आहे.
५०० मिलियनचा प्रोजेक्ट आहे (असं ऐकुन आहे). प्रोजेक्ट टीम २-३ ठिकाणी डिजाईन्स करतिए. वॉल्स आणि फाउंडेशनची डिजाईन्स मला करायचिएत, प्रोजेक्ट २ वर्षांपुर्वी सुरु झालाय आणि पुढच्या २ वर्षांत संपवायचाय आणि आमचं गाडं अजुन कन्सेप्चुअल डिजाईनपाशीच अडकलंय. त्यात बरेच लोक सोडुन गेले - म्हणुन माझ्यासमोर पायघड्या. मला या प्रोजेक्टबद्दल पप्पु एवढा गंध. पप्पु म्हणजे गुल्टी चिंच-गुळाची आमटी - म्हणजे मला या प्रोजेक्टचा आमटीएवढा गंध. (याचा अर्थ गंध नाही).
आणि म्हणुन ऍलन टेलर चुत्या.
आज ड्रिलिंगचा पहिला दिवस आणि बाप्पुला ड्रिलिंग लोकेशन्स माहित नाहीत, जी.पी.एस. कसा वापरायचा माहित नाही, ड्रिलर्सवर वचक कसा ठेवायचा माहित नाही, बर ते कमी म्हणुन त्याच्या जोडीला यिन आणि यॅंग.
दोघंही चिंकु.
यिन चिंकु - वय वर्ष ४६.
यॅंग चिंकु - वय वर्ष ४७.
आज या दोघांनी (अगदी छापा-काटा करुन) माझा एकेक कान वाटुन घेतला.
दिवस संपेपर्यंत आपापल्या वाट्याला आलेल्या कानाचा पार चावुन चावुन चोथा करुन टाकला.
च्यामायला - दोघं चिंकुत बोलतात. त्यांना म्हटलं - अरे चिंकुत काय बोलताय? तर ते एकदम ऑफेन्सिव्ह झाले - म्हणे हे चिंकु नाही - मॅन्डॅरिन आहे. च्यायला मला एकदम ’दलाई लामा झिंदाबाद!’ म्हणायची उबळ आली.
नंतर ते दोघही माझ्याशी मॅन्डॅरिनमध्ये बोलायला लागले - मग मी उचकलो - म्हटलं - बाप्यो, मला ही मॅन्डॅरिन येत नाही! तर म्हणे मॅन्डॅरिन कुठे? आम्ही तर आत्ता इंग्लिशमध्ये बोललो!
मग म्हटलं - जाऊ द्या राव - आपल्या खाणाखुणांतुन अर्थ पोचल्याशी मतलब. या लोकांना फोन करायचा म्हणजे अंगावर काटा येतो.
तर हे यिन आणि यॅंग.
चावु असले तरी हुशार आहेत.
म्हणुनच ऍलन टेलर आणखीनच डोक्यात जातो.
च्यायची जय!
कामाचा गंध नाही, उगीच झुलपं उडवत फिरतो, बायकोला बरोबर घेऊन आलाय, गरज पडेल तेव्हा हमखास नसतो, असला तर त्याला (पप्पुचा) गंध नसतो.
हा माणुस झोल करणार.

तर - आज पहिल्याच दिवशी एवढा कावलो आणि हॉटेलवर परत आलो.
म्हणजे यायला निघालो.
आत्तापर्यंत कंट्री सॉंग्जचा कंटाळा आलेला.
ग्लव्ह कंपार्टमेंटमध्ये हात घातला आणि हातात आलेली पहिली सी.डी. (Abhi the great - vol. 3) प्लेयरमध्ये टाकली.
परत एकदा - धुकं, घाट, बर्फ आणि मी.
आणि नेमाडे.
भालचंद्र नेमाडे ’कोसला’ वाचायला लागले!
सुर्शाचं आधीपासुनच मराठी होतं - इथपासुन गाडी सुरु झाली ते महामहोपाध्यायांनी एसवीसन एकोणिशशे ऐंशी बद्दलची काय मतं मांडली येईपर्यंत हॉटेलवर पोचली.
बेचिराख बर्फाकडे पहात किती वेळ नेमाडे ऐकत गाडीत बसलो काय माहित.
तिरिमिरीत वाटलं ट्रंकमधुन फील्ड नोटबुक काढावी आणि नेमाड्यांचे शब्द ऐकत ’कोसला’ लिहावी.
दरवाजा उघडला तर बोचरी थंडी वाजली - मग गुपचुप हॉटेलमध्ये येऊन बसलो.
टी.व्ही. लावला, आंघोळ केली - पण डोळे बंद केले तरिही बर्फमिश्रीत धुक्याचा पापुद्रा डोळ्यांसमोरुन हटत नाही.
खिडकी उघडली तर समोर चार इंचांवर कुणीतरी पांढऱ्या कापडाचा मांडव घालावा तसा बर्फ! च्यायला घरातली एक भिंत बर्फाची असल्यावर खिडकीसाठी पडद्यांचीही गरज नाही. आता तर डोळ्यांसमोर पापुद्रापण नाही - आख्खी भिंतच.
च्यायला धुकं बिकं म्हटलं कि आपल्याला ’माया मेमसाब’ आठवायचा - आता च्यायला इतक्या धुक्यात ऍव्हालान्श आला तर काय करायचं याचीच भिती. याबद्दलचं (मानसिक) ट्रेनिंग ’रारंगढांग’ पुरतं मर्यादित....

आणि त्यात परत ऍलन टेलर चुत्या.

--------------------------

बऱ्याच प्रोजेक्ट्स बद्दल बरंच लिहावंवंसं वाटतं, पण राहुन जातं.
आता अनायासे करायला (म्हणजे हॉटेलवर परत येऊन करायला) काम धंदा नसल्याने लिहु म्हणतोय.
२० दिवसांचा प्रोजेक्ट आहे, एकच दिवस झालाय.
लाईव्ह पहिल्यांदाच लिहितोय - त्यामुळे अर्थातच पुढे काय होणार माहित नाही.
सगळी पात्रं अर्थातच खरी आहेत, आणि अर्थातच त्यांची नावं बदललिएत. ऍलन बॉर्डर आणि त्यानंतरचा मार्क टेलर - त्यामुळे ऍलन टेलरचं नाव ऍलन टेलर पडलं - त्याला मी जबाबदार नाही.
लेखाचं नाव - बर्फ आणि धुक्याचा राडा असं ठेऊ.
भाग बिग नको म्हणुन - इथुन पुढचं इथेच.
तरी रेफरन्स मध्ये झोल नको म्हणुन प्रत्येक भागाचं नाव वेगळं ठेऊ.

--------------------------

दिल दर्द का टुकडा है....

आज यॅंग चिंकु परत गेला आणि मी दिवसभर यिन चिंकुशी सुरक्षित अंतर ठेवलं.
असं म्हणेतो संध्याकाळी त्याने मला गाठलंच.
रॉक कोर सँपल्स लॅबला पाठवण्याची तद्दन गावठी प्रोसीजर त्याने लई रंगवुन दोन तास समजावुन दिली. ती ऐकुन इतका वैताग आला कि याला सहन करतो म्हणुन ऍलन टेलर बद्दलही मला सहानुभुती वाटली!
त्या कावाकावीचा विचार करत करत परतत होतो तर एक्झिट चुकुन आठ अधिक आठ असा सोळा मैलांचा वळसा पडला....
पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली आणि म्हटलं गेलं उडत सगळं - मी चाललो फिरायला.

शॉर्ट कट मारुन इथलं वर्णन करायचं म्हटलं तर निकल्सनचा ’द शायनिंग’ पाह्यलाय का? तर तिथल्या हॉटेलचं करावं लागेल. सिझन संपुन ओसाड पडलेलं एक सहलीचं ठिकाण. आणि गारीगार एकटेपणा वगैरे वगैरे....
वेल, इट डिपेंड्स.
आज धुक्याने मूड बदलला आणि महाबळेश्वरात भर पावसाळ्यात फिरतोय असं वाटायला लागलं.
मागच्या वेळेस इथे आलो होतो तो माधुरी, आयोडेक्स आणि डिस्को बरोबर. तेव्हा सहा एक फूट बर्फ होता, तो आता पंधरा फूट वगैरे झालाय.
बर्फ इतका असला तरी, तापमान शुन्याच्या वर गेल्यानं तो वितळायला लागलाय आणि म्हणुन स्कीइंग बंद.
माझ्या गुहेतल्या बर्फाच्या भिंतीच्या एका टोकाकडुन बर्फाची शुभ्रता वाढत चाललिए असंही मला वाटायला लागलंय....
बर्फ वितळला कि त्याचं पाणी होतं! (असं वाक्य मीच लिहु शकतो, हे माझं मलाच पटल्याने मलाच माझं कौतुक वाटायला लागलंय! :))
पण त्यामुळे होतं असं कि सगळीकडुन पाणी गळत असतं किंवा बाहेर पडल्या पडल्या पाण्याचाच आवाज आधी जाणवतो. धुकं तर नेहमीचंच - त्यामुळे पावसाची रिपरीप सतत चालु आहे का असं वाटत रहातं....
धुक्याचं आणि सुर्यकिरणांचं युद्ध दिवस चालु झाल्यापासुन सुरु होतं ते संध्याकाळपर्यंत संपत नाही. पण बहुतेक वेळ धुक्याचाच माज जास्त चालतो.
साईटवर तळं, डोंगर, बर्फ, आणि मधुन मधुन पडणारं ऊन - हे निसर्गदृश्य दिवसभर धुक्याला टांगलेलं रहातं.
सगळ्यात वैतागाची गोष्ट म्हणजे अशा थ्री डायमेन्शल व्ह्यु मध्ये विचार करायला भरपूर वेळ मिळतो आणि इथेच गोची होते.
कॉलेजमध्ये रॉयसी आणि राजेश दोघं बॅकी होते - मी लेफ्ट मिडफील्ड खेळायचो. तसा माझा खेळ कबड्डी, पण अकरा लोक भरायचे म्हणुन फुटबॉल टीममध्ये मी पण. तेव्हा रॉयसी ने एक टेक्निक शिकवलं होतं. तो म्हणे बॅकीचं काम सगळ्यात सोपं. बदाबदा धावत फॉरवर्ड बॉल घेऊन येत असेल नुसतं त्याच्या समोर उभं रहायचं. त्याच्या मनात तुमच्या दसपट जास्त टेन्शन्स असतात. त्यात तो एवढा गुरफटतो कि स्वत:च काहितरी चूक करतो आणि बॉल आपसुक तुमच्याकडे येतो! मला खरं नव्हतं वाटलं, म्हणुन थोडे दिवस बॅकी होऊन पाह्यलं आणि विश्वास बसला.
तर सांगायचा मुद्दा असा कि विचार बिचार करायला वेळ मिळाला कि मी त्या फॉरवर्ड सारखा होतो आणि माझा एक्झिट येईपर्यंत माझी गोची झालेली असते.
आजची गोची म्हणजे - का कुणास ठाऊक आज भर दुपारच्या कोवळ्या उन्हात मला ’अस्तित्व’ आठवला.
थोडा आणखिन प्रयत्न केल्यावर तब्बु बद्दल मजबुत सहानुभुती वाटल्याचंही आठवलं. आणि सचिन खेडेकर आणि सुनील बर्वेला खरंच शिव्या का घालाव्यात असंही वाटुन गेलं.
तेवढ्यात स्काय नावाच्या एका हेल्परने पांढऱ्या शेपटाची घार दाखवली.
तिचे फोटो काढले.
मग अचानक एक सहा फुटी खडक डोंगरावरुन गडगडत खाली आला. त्यावर जरा हाय हुय झालं. त्याच्या धक्क्याने एक झाड पडलं.
रस्तारुंदीत आधीच कापलेले कडे आणखी कापायचे कि रस्ता तळ्यात ढकलायचा यावर जुगलबंदी चालु असताना या रस्त्यावर एक कॉंक्रीटचा बोगदा बांधुन वरुन येणारा ऍव्हालान्श बोगद्यावरुन तळ्यात जाऊन द्यावा असा एक सनसनाटी विश्वनाथी विचार माझ्या डोक्यात तळपुन गेला. रारंग ढांगात डंपी लेव्हल ठेवायला जागा नव्हती - मग एवढ्या उतारावर ड्रिल रिग ठेऊन सॉईल सॅपल्स कशी घेणार या कारणावरुन विश्वनाथाला जेम्स राईटने कटवलं होतं. इथं आमचे जेम्स राईट म्हणताहेत कि - त्यात काय? आपण हेलिकॉप्टरने ड्रिल रिग उचलुन ढांगावर ठेऊ.
म्हटलं ठेऊ तर ठेऊ.
माझा आणि राईट साहेबांचा अजुन तरी सुखसंवाद चालु आहे. पण मध्ये नायरसारखे देणं घेणं नसलेले आणि बंबा सारखे बधीर लोकही आहेत. ऍव्हालान्श थांबवु तर शकत नाही - पण दर वेळेस रस्ता बंद करण्याची तसदी कशाला या कारणाने निर्मिती चालु.

सकाळी सकाळी - म्हणजे भल्या पहाटे सव्वा सहाला सगळे इथल्या फायर स्टेशन कम वर्कशॉपमध्ये जमतात.
दोन महिन्यांपुर्वी इथल्या एका जवळच्या गावातल्या काही बिल्डिंग्ज चं साईज्मिक रिट्रोफिटिंग केलं - म्हणजे ऍक्चुअली केलं नाही - नुसते रिपोर्ट लिहिले - कसं करायचं याचे. असे नाकर्ते रिपोर्ट्‍स लिहिले कि चिडचिड होते.
साईज्मिक रिट्रोफिटिंग म्हणजे - भुकंप झाला तर ही उभी असलेली बिल्डिंग ’ढेर’ होऊ नये म्हणुन त्यात जे काय बदल करतात ते.
तर त्या दरम्यान काही फायर स्टेशन्स पाहिली - म्हणजे अग्निशामन विभागाची दुकानं. तिथल्या फायर फायटर लोकांशी गप्पा मारल्या. त्यांनी आगीशी लढायचा खेळ शिकवणारी घरं फुल टु आग वगैरे लावुन दाखवली. पण सगळ्यात जास्त कौतुकाने दाखवलं ते त्यांचं जिम! म्हणजे असं कि - रोज रोज सकाळ संध्याकाळ काय आगी लागत नाहीत. मग उरलेल्या वेळात शक्तिप्रदर्शन म्हणुन जिम. वेल एक्झॅक्टली शक्तिप्रदर्शन नाही - त्याचे त्यांच्या व्यवसायात होणारे फायदेही बक्कळ आहेत, पण तरी....
तर हे असं फायर स्टेशन.
रोज सकाळी सकाळी २३ पुरुष ’आज काय करायचं?’ याच्या मीटिंगला बसले कि जे व्हायचं ते होतं. Testosterone नुसतं भरभरुन वहात असतं.
रस्त्यावरच्या वहानांपासुन आणि इतर नैसर्गिक आपतत्तींपासुन बचाव म्हणुन आम्हाला एक दहा लोकांचा भीमकळप दिला गेलाय. शरीरयष्टी सोडली तर हे लोक आणि आपल्या शिक्षण संचालनालयातले कर्मचारी यांच्यात मला तरी फरक जाणवत नाही. म्हणजे असं कि SSC, HSC बोर्डातल्या लोकांना वर्षभर कसं कुत्रं विचारत नाही, पण परिक्षा, रिझल्ट, ऍडमिशन आल्या कि या लोकांची चलती असते - तसं.
म्हणजे कडे बिडे कोसळले, आकाशातुन ढिगभर बर्फ पडला, पुर बिर येऊन रस्ता बुडाला कि या लोकांना शक्तिप्रदर्शनाची संधी मिळते. अशा वेळेस हे लोक अशक्य कोटीतलं काम करतात. इतर वेळेस वादळवाऱ्याचा धावा करत झोप घालवण्याचा प्रयत्न करतात.

बर ते सगळं नंतर.

संध्याकाळी फिरायला गेलो आणि लगेचच धुक्याने वेढलं.
रिसोर्टकडे चालत राहिलो.
मग मध्येच बर्फाचं मैदान लागलं.
मग कळलं कि सगळीकडे पांढराच पांढरा बर्फच बर्फ.
वर पाहिलं तर तीन तीन बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं.
डावीकडाच्या दरीतनं येणारं धुकं समोरच्या कड्याला वळसा घालुन घाई घाईत डोंगराकडे चाललेलं.
च्यायला - कॅमेरा गाडीत राहिला.
मग म्हटलं चांगलं झालं गाडीत राहिला.
मग डोंगराखालच्या कुठल्यातरी घराच्या धुराड्यातनं येणारा धूर दिसला.
मग अचानक एखादं पीस उडत यावं तसे नकळत रस्त्याकाठचे दिवे लागले.
मग मला बर्फात पंजे दिसले.
मला वाटलं - आयला! अस्वल!!
पण पंजे अगदीच छोटे होते - कुणाचंतरी कुत्रं वगैरे असणार.
मग म्हटलं - कायको रिस्क लेनेका?
मग परत आलो.

आलो तर यिन चिंकुचा मेसेज - भायसाबको कलका डिस्कशन करना है!
मग त्याला मॅन्डॅरिनमध्ये शिव्या घातल्या.

-----------------------------

दिवस ३

आज ऍलन टेलरशी पंगा झाला.
त्याचा मुर्खपणा, बेजबाबदारपणा, आणि बौद्धिक दारिद्र्य याचे परिणाम मला भोगावे लागल्यानं त्याच्यावर उखडलो.
करतोय त्या कामातलं त्याचं अज्ञान इतकं टोकाचं अगाध आहे कि झिणझिण्या येतात....

झिणझिण्या जास्त झाल्याने पोस्ट उद्या.

-----------------------------

.....और पर नालोंसे खून बहें.....

या टायटलचा आणि जे काही लिहीन त्याचा काहीही संबंध नाही.
आज दुपारी गुलजारचं हे गाणं गुणगुणत होतो म्हणुन हे टायटल.
च्यायला प्रत्येक टायटल मध्ये गुलजार असलाच पाहिजे का? असा प्रश्न मलाच पडायला लागलाय.
सिव्हिल मध्ये ’प्रोजेक्ट’ म्हणजे काय, आमचं काम कसं चालतं - कंपनीचं स्ट्रक्चर कसं असतं वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणजे तुम्हा लोकांना यिन, यॅंग, टेलर, बंबा, राईट वगैरे लोकांची माहिती मिळेल.
पण ते सांगत बसलो तर बराच वेळ जाईल.
सकाळी उठुन बाहेर पडेपर्यंत दात घासणे, एकावर एक हजार कपडे चढवणे, दिवसभरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे तपासणे आणि शूज घालणे या सगळ्या गोष्टींना मिळुन मी दहा मिनिटं ठेवलेली असतात.
आज परत आल्यावर टबमध्ये सूर मारताना - दोनेक तास तरी लिहू असं ठरवलं होतं - ते आता १४ मिनिटांवर आलंय - त्यात जेवण इनक्ल्युडेड! :-(
माझ्यासाठी साधे स्पोर्ट शूज घालणे हा ही एक मोठा कार्यक्रम असतो - स्टील टो शूज घालणे सा तर आणखीच मोठा कार्यक्रम होतो.
पण मला हे शूज आवडतात.
एक तर यांची लेस कधी निघत नाही (हे मुख्य कारण), शिवाय यातुन थंडी कधी वाजत नाही.
स्टील टोज मुळे थंडी वाजते असं लोक म्हणतात - पण माझं (नेहमीसारखंच) उलटं असतं.
शिवाय - स्टील टो शूज आणि हेल्मेट घातलं कि लई भारी वाटतं हे एक वेगळंच.
परवा सेफटी जॅकेट घातलेलं माधुरीने पहिल्यांदाच पाहिलं - ती म्हणे तु यात किती वेगळा दिसतोस....

एनीवे -

टेलरला म्हटलं - चल बीयर मारु.
मग बोलता बोलता त्याला कुठकुठल्या गोष्टींची माहिती पाहिजे याबद्दल बोललो.
तो पण परवाच्या गोष्टीबद्दल सॉरी म्हणाला.
हे निस्तरतंय तर यिन आणि मी एकच काम वेगवेगळ्या प्रकारे करतोय हे लक्षात आलं.
त्यात कन्सिस्टंसी असणं महत्वाचं आणि ती आहे हे पहाणं यिंगचं काम - त्याचा अर्थातच त्याला पत्ता नाही.
बंबा शी बोलतो म्हटलं यिन ला तर यॅंग पेटला.
म्हटलं त्याला उभा आडवा घ्यावा - पण परत विचार केला कि जुम्मा जुम्मा दोन आठवडे झालेत जॉब जॉईन करुन. एकाच वेळेस समस्त जनतेशी पंगे घेणं बरोबर नाही.
मॅनेजमेंट में जाना है तो इन्ही लोगोंसे अपने तरीकेसे काम करवाना पडेगा - असं सत्यातल्या भिकु म्हात्रेच्या (देख - करना है, तो करना है) स्टाईलमध्ये स्वत:ला सुनावलं - मग ते ही मिटलं.

आता चार मिनिटं राहिली.

आज एक आर्मी कॉनव्हॉय साईटवरुन गेला.
७० माईल पर आवर ने जातानाही त्यांच्या हम्व्ही वर तीन तीन बाजुंनी मशीनगन्स धरुन सैनिक बसले होते - वाटलं च्यायला बगदाद वरुन परत आलोयत याचा मेमो या लोकांना मिळालाय कि नाही?
माझा एक मित्र अफघाणिस्तानात काम करायचा - म्हणजे त्याने थोडे दिवस केलेलं आणि दुसरा एक्सप्लोजिव्ह्ज एक्स्पर्ट होता - म्हणजे ’detect and destroy' पथकात.
त्यांच्या स्टोर्याही सांगितल्या पाहिजेत कधीतरी.

च्यायला एकदा गम्मतच झाली - काम करता करता रात्र झाली.
४ वर्षांपुर्वीची गोष्ट ही - बाल्टिमोर ला होतो - अजुन लग्न वगैरे झालं नव्हतं - त्यामुळे काम करता करता रात्र झाली वगैरे बद्दल फारसं काही वाटायचं नाही.
रॉजर रिग दुरुस्त करत होता तेव्हा त्याच्या हेल्परशी बोलायला लागलो.
तर तो म्हणे सी.आय.ए. मधुन रिटायर झालो!
च्यायला - म्हटलं तिथे काय करायचास?
डिटेक्टिव्ह होता - पण तो म्हणे बऱ्याच लो लेव्हलला होतो.
मग त्याने कुणाचा पाठलाग कसा करायचा, होणारा पाठलाग कसा टाळायचा वगैरे वगैरे लई भारीमध्ये सांगितलं.

च्यायला - सांगत वेगळंच होतो. आर्मीच्या बोटिंबद्दल.

ते आता उद्या.

ओळ अशी होती -
छतपर आकर गिध बैठे और पर नालोंसे खून बहे....
अरे कौन कटा है कौन गिरा है किसे मातम है कौन कहे....

त्याबद्दलही नंतर. (नाहीतर उद्या मला अनवाणी साईटवर जावं लागेल....) :))

-----------------------------

?

Discontinued for good....