अरे रुक जा रे बंदे!
नविन जॉब सुरु केल्यापासुन बसने ऑफिसला जातोय.
बसमधले अलिखित नियम -
खिडकीशेजारची जागा मोकळी असताना इकडे तिकडे बसु नये.
शक्यतो एकेकटे बसावे.
इतरांशी बोलु नये.
स्मितहास्य वगैरे वर्ज्य.
अगदीच जागा नसली तर कुणाच्या शेजारी बसायला हरकत नाही.
त्यातही पुरुषांनी पुरुषांच्याच शेजारी बसावे (आणि बायकांनी बायकांच्या) - किंवा गेला बाजार आपापल्या बायकांच्या.
पण काहीही झालं तरी - म्हणजे अगदी जग पालथं झालं तरी - देसींनी देसींशेजारी बसु नये!
तसा प्रयत्न करु नये - अपमान होईल.
म्हणजे अगदी अपमान वगैरे नाही होत - पण मग तो देसी फोन काढुन गुल्टित किरकिर करायला लागतो.
मग आपली - ’जागा नको पण फोन आवर’ परिस्थिती होते!
एनीवे -
अशात काल गंमत झाली.
मी आपला आयपॉडवर गाणी ऐकत एक रिपोर्ट रिव्ह्यु करत होतो तर एक (अर्थात आयटम) देसी पोरगी माझ्या शेजारी येऊन बसली. म्हटलं चला! अजुन कशात काही नाही पण नियमाला अपवाद - हे ही नसे थोडके!!
म्हणुन मग मी कालच बायको ने प्रेझेंट दिलेला छोटुकला आयपॉड शफल खिशातुन बाहेर काढुन इंप्रेशन मारायच्या तयारीने बसलो.
मग ’चायना गेट’ मध्ये नासीर ज्या सहजतेने मागच्या खिशातुन भला मोठा सुरा काढतो - त्या आवेशात आयटमने (मागच्या खिशातुन) तिचा आयपॉड नॅनो काधला! (मग मी (ओघाने) चाट पडलो वगैरे वगैरे).
तिने तो नुसता बाहेर काढला नाही तर त्यावर ’परदेसी परदेसी जाना नहीं’ हे कर्णबधीर गाणं लावलं.
मग मी कैलाश खेरला ओरडायला लावुन तिचा आवाज मिट्टीमध्ये मिळवला (भा.पो.).
ऐक ना - पुढे आणखी गंमत.
(च्यायला मी लिहायला लागलो कि मला नको नको ते फाटे फुटत जातात.
म्हणजे या गमती वगैरे लिहायचं हे डोक्यातच नव्हतं.
बर ही सांगतो आधी).
म्हणजे झालं असं कि ओव्हरलेकला पोचेपर्यंत बाईंचा पाय माझ्या पायाला लागतोय अशी मला (खात्रीपूर्ण) शंका आली!
मग मी माझ्या दोन्ही हातातल्या ’strategic’ अंगठ्या वगैरे (दोन्ही हातांनी) फिरवत ’बाई - गैरसमज होतोय’ वगैरे (चिल्ला चिल्लाके) समजावण्याचा प्रयत्न सुरुवात करता करता कानात ’अरे रुक जा रे बंदे’ सुरु झालं.
इथे मी ऍक्चुअली थांबलो. (का ते माहित नाही).
पुढे ’अरे थम जा रे बंदे’ वर मी एक (खोल) श्वास घेतला.
पण ’के कुदरत हस पडेगी....होsss!’ वर माझी टोटल फाटली.
मग ’च्यायला - रुक जा काय!’ वगैरे वगैरे प्रश्न (मनातल्या मनात मनाला) विचारत मी काढता पाय घेतला.
च्यायला! ’काढता (आणि) पाय (आणि) घेतला’ या वाक्याने मला चांगलंच बुचकळ्यात टाकलंय!!
म्हणजे सांगायचा मुद्दा असा कि - माझाच पाय मीच बाजुला घेतला.
पण मॉन्टलेकला पोचेपर्यंत पुन्हा तेच!
च्यायला मग मी उखडलो आणि ’ओ बहेनजी - आपको बाप भाई नहीं है क्या?’ च्या आवेशात तिच्याकडे पाह्यलं तर कळलं कि बाई झोपल्यात! यावर मला हायसं आणि निराश असं एकत्र वाटलं.
पुढे आणखी गंमत आहे, पण ते जाऊ दे.
तर सांगायचा मुद्दा असा कि देसी देसींचं असं अगदी विटाळ नसलं तरी टाळाटाळ नातं असताना, घरी परत येताना १० मिनिटं माझं निरिक्षण करुन (सगळे अलिखित नियम धुडकावुन) सिराज माझ्या शेजारी येऊन बसला तेव्हाच मला तो अमेरिकेत नवा असल्याची खात्री पटली.
त्याने कागदावर लिहिलेला पत्ता दाखवत ’इथे जायला स्टॉप कुठला?’ हे विचारलं आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.
म्हणजे बोलत मी होतो आणि ऐकत तो. (असल्या ’गप्पा’ मला भयंकर आवडतात).
गप्पांना - त्या पण ’एवढ्या’ गप्पांना कारणही तसंच होतं.
म्हणजे - ’तु कुठला?’ वर (’चीनी कम’ मधल्या कोलगेटच्या टोनमधे) ’हाईद्राबाद’ असं उत्तर मिळाल्यावर मी त्याला आणखी थारा देण्याचा काही स्कोपच नव्हता, पण का कुणास ठाऊक मी माझ्या सासुरवाडीचं (अ)ज्ञान पाजळायला म्हणुन ’हायद्राबाद - म्हणजे प्रॉपर कि....’ विचारलं आणि तो ’गुन्टकल’ म्हणुन गेला.
म्हणुन गप्पा सुरु झाल्या.
झाल्या त झाल्या - लांबल्या.
लांबल्या त लांबल्या - त्याला जेवायला घरी घेऊन गेलो तिथे सुरु राहिल्या.
गप्पा म्हणजे - आयुष्यातली एकमेव दुपार ज्या गुन्टकल मध्ये काढली त्या दुपारच्या आठवणींना उजाळा.
आता तो उजाळा आयपॉडमधुन, ओरहान पामुकच्या ’स्नो’ मधुन, तेराव्या मजल्यावरुन दिसणाऱ्या समुद्राच्या पाण्यातुन - आणि न लिहिलेल्या ’यात्रा’ तुन पुन्हा एकदा झिरपत राहिलाय.
कुठल्याही गोष्टीचं एवढं विश्लेषण करु नये - नाहीतर तुमचा ’विदुषक’ होतो - असं जी.ए. म्हणतात.
ते बहुतेक खरं असावं.
(sort of अपूर्ण - पूर्ण व्हायचा स्कोप कमी).