Thursday, December 08, 2011

लॅंड डेव्हलपमेंट हॅंडबुक

लहानपणी शाळेतल्या बाई ज्याला ’हुशार आहे, पण मनावर ताबा नाही’ म्हणायच्या त्याला आता ’हॉरिझॉंटल थिंकिंग’ म्हणतात.

हे असं आठवायचं कारण कि मन उड्यांवर उड्या मारत रहातं.
१९३१ ची कुठली गोष्ट वाचत असलो कि च्यायला त्या वेळेस डिप्रेशन कसं असेल, प्रोहिबिशन मध्ये लोक कसे जगत असतील, त्याचा भारतावर परिणाम काय झाला, तेव्हा आपण क्रिकेट खेळायचो का - असं बरंच काही.

कॉपर म्हणजे तांबं का?
तर एकेकाळी कॉपरची नाणी बनवत - कारण ते स्वस्त होतं.
आज दहा पैशाच्या नाण्याची किंमत ते वितळुन विकलं तर त्याला २० पैसे मिळतात, तर कुणी ते का करु नये?

मला आज काम करावंसं वाटत नाहिये, त्यामुळे माझं हॉरिझॉंटल थिंकिंग चाललंय.

रसिका कि स्वप्ना आंबोळे हे नाव काल कुठे ऐकलं?
इथे हॉरिझॉंटल थिंकिंग शक्य नाही.
कि स्वाती?
हां बरोबर.
ती कविता बिविता करते.
चला कविता लिहु.

तुम्हारी लौ को पकडके जीनेकी आरजुमें जब अपनेही आपसे लिपटकर सुलग रहा था
बता दो उस वक्त मैं कहां थां?
बता दो उस वक्त तु कहां थीं?

तुम्हारे जिस्मके साहिलसे दूर दूर कहीं
वो ढुंढती थी कि मिलेगा वो खुशबुओं का नूर कहीं
बडे हसीन थे जो राहमें गुनाह मिलें
तुम्ही से जनमुं तो शायद मुझे पनाह मिलें

लबोंसे चूम लो ऑंखोंसे थाम लो मुझको
तुम्ही से जनमुं तो शायद मुझे पनाह मिलें

आज मायकल म्हणाला कि एकदा त्याच्या बायको सोबत रस्त्याने जाताना त्याला त्याची जुनी छावी भेटली. त्याने त्याच्या छावीची ओळख बायकोला करुन दिली. आणि मग बायकोची ओळख करुन देताना त्याला त्याच्या बायकोचं नावच आठवेना!
यातला ऑबव्हियस विनोदाचा भाग सोडला तर - यावर त्याच्या छावीला काय वाटलं असेल असा प्रश्न अर्थात मला पडला.
हॉरिझॉंटल थिंकिंग कधी नीट हसु देत नाही.
आणि नको तिथं हसु आणतं.
म्हणजे आगरकर आवडायचा पण त्याने अ‍ॅडलेडच्या आधी आणि नंतर कधीच एका मॅचमध्ये तीन पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नाहीत. हे वाचुन मला त्याची लॉर्ड्स ची सेंच्युरी आठवली. अ‍ॅक्च्युअली हा पी.जे. मला नीट सांगता आला नाही. अ‍ॅन्डी झॅल्ट्समन तो लई भारी सांगतो.

तर असं.

राज ठाकरे म्हणाले कि उड्डाणपुलाच्या बांधकामा आधी सगळ्या लोकांची मतं विचारात घ्या.
हे योग्य आहे.

आज कुणास ठाऊक का वीणा मलिक या व्यक्तीचा एका पाकिस्तानी चॅनलवरचा इंटरव्ह्यु पाहिला.
ऐकला नाही, कारण कॅप्शन्स होती.
त्यात ती रडत रडत बिग बॉस बद्दल बोलत होती.
हा काय प्रकार आहे ते एकदा पाहिलं पाहिजे.

ग्लास अर्धा सरला आहे म्हणायचं कि अर्धा भरला आहे म्हणायचं?
ग्लास व्हिस्कीचा असेल तर - आधी ग्लास संपवुन टाकायचा.
मग ग्लास आख्खा सरला आहे म्हणायचं.

एकदा एका कंपनीत कुठल्यातरी पोझिशनसाठी इंटरव्ह्यु चालु होते.
हा जोक सांगायचा होता, पण बरंच लिहायला लागेल असं वाटुन कंटाळा आला.

मध्यंतरी कुठलं तरी गाणं रोज ऐकत होतो.
आता ते आठवत नाही.
आठवायचा प्रयत्न केला कि डोक्यातली चाकं - लिव्हर पुलीज - सगळं यंत्र हळु हळु जागं होत असल्याचं दिसतं.
तर आठवुन बघु.
नेटवर न बघता.
गाणं गुलझार चं होत.
नासीर होता.
ती डर्टी पिक्चरची हिरोईन होती गाण्याच्या कव्हर वर

कोई तो रोके कोई तो टोके
इस उम्रमें अब खाओगे धोके
डर लगता है इश्क करनेमें जी
दिल तो बच्चा है जी

तर असं.

च्यायला आणखी लिहावं का?
कुणी बघत नाहिए - लिहुन टाक.
माझ्या ऑफिसमध्ये माझं स्वतंत्र ऑफिस आहे.
तिथे मी यायच्या आधीपासुन एका मोठ्या कुंडीत एक पाच सहा फूट उंच झाड रहातं.
आल्या आल्या मी त्याला आपलं काही जमणार नाही असं सांगुन टाकलं.
शमसा आपापल्या झाडांना पाणी घाला असा मेसेज पाठवते.
मग मी त्याला माझ्या ग्लासात उरलं वगैरे असेल तर पाणी घालतो.
एक दोनदा किचनमध्ये जाउन ग्लासभर पाणी आणल्याचं आठवतंय.
त्याला बहुतेक पानं येत रहातात लांब लांब.
मग त्यातली काही वाळतात.
म्हणजे पानाचा एखादाच मधला अधला भाग वाळतो.
मग मी तो कात्रीने कापुन टाकतो.
म्हणजे माझं त्याच्याशी वैर वगैरे नाही.
बऱ्याचदा ते तिथे आहे हे मला जाणवतही नाही.
जोपर्यंत ते स्वत:चं बघतं तोपर्यंत मला हरकत नाही.
त्याला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहित नाही.
त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल का हा प्रश्न मला आधीचं वाक्य लिही पर्यंत पडला नव्हता.
यालाच बहुतेक हॉरिझॉंटल थिंकिंग म्हणतात.
आणि हॉरिझॉंटल रायटिंग.
या झाडासारखा माझा एक रुममेट होता कॉलेजात असताना.
त्याला माझ्यासोबत रहायचं होतं.
मला कुणासोबत तरी रहाणं आवश्यक होतं, पण मला त्याच्या सोबत रहायचं नव्हतं.
मग त्याने मन्याकडे वशिला लावला.
मन्याने मला टिपिकल वाण्याच्या भाषेत समजावुन सांगितलं.
पुढचे सहा महिने आम्ही एकत्र राहिलो.
कि तीन?
असंच काहितरी.
त्या काळात मी त्याचं त्या रुम मधलं अस्तित्व मान्य केलं नाही.
त्याच्याशी काही जुजबी बोलल्याचंही आठवत नाही.
मग त्या तीन कि सहा महिन्यांनंतर मी त्याला सरावलो कदाचित.
मग मी रोज घरी यायचो, बॅग फेकायचो, बोल बोल बोलायचो.
तो ऐकुन घ्यायचा.
तु बोलत का नाहीस विचारलं तर तु बोल तुझं ऐकायला बरं वाटतं म्हणायचा.
बाकिच्यांशी बोलायचा.
माझ्याशीही.
क्वचित.
मग मी छावीला पत्र लिहायचो.
मग त्याला ते वाचुन दाखवायचो.
तो - मामा तु भारी लिहितो - म्हणायचा.
त्याच्या माझ्यात मैत्री होण्यासारखं काहीच नव्हतं असं मला वाटायचं.
तसं मी त्याला म्हणायचो.
त्याला हरकत नव्हती.
पॅऱ्या मग माझा खूप जवळचा मित्र झाला.
मलाही हरकत नव्हती.

तर झाड.

पानं कापुन बरेच दिवस झालेत.
पाणी घालुनही.

झाड आहे, पॅऱ्या आहे, मी आहे.
अजुन लिहायला काही नाही.

आता एवढं लिहिल्यावर झाडाच्या अपेक्षा वाढणार का?
च्यायल नसतं झेंगट.

काल चारच तास झोपलो.
आज कॉफिच्या दुकानात काहितरी घेणं आवश्यक असल्याने डबल शॉट एस्प्रेसो असा प्रकार मागितला. त्याने मुक्ताच्या बाहुल्यांच्या ग्लासाच्या आकाराच्या पेल्यात मला तो दिला.
तो कसा प्यायचा माहित नसल्याने मी तो ऑफिसात घेऊन आलो.
झोप येतिये असं वाटलं कि मी तो ओठावर टेकवल्यासारखं करतो.
मग भारतातली बिडी ओढल्यावर ओठांवर निकोटिनची जशी चव येते तशी कॉफिनची चव येते.
झोप जाते.

रे बाबा रे बाबा रे....