हजाम
आज 'एन.पी.आर.' वर एका पोलीश माणसाचे 'केस कापून घेण्याचे' अनुभव ऐकले आणि धमाल आली. म्हटलं हा एक चांगला विषय आहे लिहायला! - माझ्या आयुष्यातले न्हावी!!
भोरला यायच्या आधीच्या न्हाव्यांबद्दल फारसं आठवत नाही.
नाही म्हणायला तोपर्यंत - 'चम्मन गोटा लाल बटाटा, उद्या सकाळी पेढे वाटा' म्हणायला शिकलो होतो. आणखी एक आठवण म्हणजे - कुणी मला तसं म्हटलं तर - 'माझ्या डोक्यात छोटे छोटे चाऊ झालेले, म्हणुन बाबांनी माझे केस कापले' असं (बहुतेक) आईने म्हणायला शिकवलं होतं.
भोरची आठवण म्हणजे - आमराई आळीच्या कोपऱ्यावर एक (निळा रंग दिलेलं) न्हाव्याचं दुकान होतं. त्याच्या काचेवर मस्तपैकी 'कोंबडा' पाडलेला अमिताभ कुणीतरी रंगवलेला. तो काळ म्हणजे आम्ही लोक अमिताभचे 'मर्द', 'आखरी रास्ता', 'गिरफ्तार' वगैरे पाहुन येडे झालेले! मग तो 'कोंबडा' पाडायचे कोण प्रयत्न!! आमच्या वाड्यामागे वाळी शेजारच्या चिंचेच्या झाडाखाली क्रिकेट खेळुन झाल्यावर जनतेची 'सभा' भरायची. (त्याच वाड्यामागे वडील लोकांनी नेट वगैरे लावून 'आऊटडोर' बॅडमिंटन कोर्ट केलेलं - त्याबद्दल नंतर) तर त्या सभेत 'मोठ्या' (म्हणजे वय वर्ष १०-१२) लोकांचे दंडात बेटकुळी काढणे, हाताने केलेल्या बिड्या ओढणे, हाताने विटा फोडणे वगैरे प्रकार चालायचे. ही मोठी पोरं 'डेंजर' होती. त्यांनी फाटक वाड्यामागे बेडकाला दोरा बांधुन आणि त्याचं आमिष दाखवुन साप बिळातुन बाहेर काढुन मारलेला व्यवस्थित आठवतोय.
बर तर सांगायचा मुद्दा म्हणजे ते लोक केस वळवायचे आणखीनच डेंजर उपाय सांगायचे - म्हणजे फुंकणी तापवुन ती केसातुन फिरवायची वगैरे. असले प्रयोग तर रमेश आणि बंटी पण करायचे नाहीत - तिथे आपली काय....
केस वळवायला २५ रुपये लागतात ही माहिती काढण्या एवढं 'डेरिंग' मात्र माझ्यात आलेलं तोपर्यंत.
पण पप्पा तिथे काय कुठल्याच न्हाव्याकडे जाऊ द्यायचे नाहीत. दर महिन्याला एखाद्या रविवारी सकाळी एक न्हावी आमच्या घरी यायचा आणि घरासमोरच्या बागेत (पोत्यावर) बसुन रंजूचे आणि माझे केस (नको इतके) बारीक कापायचा.
पुण्याला आल्यावर भारतज्योतीचं 'श्रीनिवास' रेग्युलर झालं. का कुणास ठाऊक पण त्या न्हाव्याचं नाव पण श्रीनिवास होतं असा माझा दाट संशय आहे! पण तोपर्यंत (कोण्या एका) शाहरुखची 'फौजी' बघुन केस वळवायची आस जाऊन 'सोल्जर कट' ची सवय लागलेली. (नाही म्हणायला 'गंगा जमुना सरस्वती', 'अजुबा' वगैरे आल्यावर अमिताभ स्टाईल केस ठेवणं म्हणजे जरा धाडसाचंच झालेलं) 'श्रीनिवास' केस कापायचा पण मस्त - म्हणजे केस ओढले वगैरे जायचे नाहीत. नाहितर लहानपणी न्हावी म्हणजे लही सासुरवास असायचा. ते त्यांचं साग्रसंगीत गळ्यात 'बेडशीट' बांधणं (च्यायला गळफास लावल्यासारखं वाटायचं), (माझी) मान पर्फेक्ट अवघडलेल्या ऍंगलमध्ये ठेवणं, कात्रीची लई किरकिर करुन शेवटी कानाला लागेल असा कंगवा फिरवणं, मानेवरचे केस वस्तऱ्याने परफेक्ट दुखेल असं कापणं वगैरे वगैरे.....इन्फॅक्ट न्हाव्याने न सांगता त्याच्या पोजीशनप्रमाणे मान कलवायला मला जेव्हा जमलं तेव्हा मला 'आपण मोठे झालोयत' हे पुरेपुर पटलं!
पण श्रीनिवास चांगला होता. प्रॉब्लेम एवढाच होता कि रविवारी सकाळी त्याच्याकडे 'य' गर्दी असायची आणि तो नेहमी माझ्या नंतर आलेल्या लोकांची कटींग माझ्याआधी करायचा. माझ्या भिडस्तपणाने मी काही म्हणायचो नाही पण य वैताग यायचा. च्यायला घरी परत जाऊन (बळजबरी आंघोळ करुन) खेळायला जाईपर्यंत मित्रांच्या आया त्यांना हाकापण मारायला लागलेल्या असायच्या!
न्हाव्याच्या दुकानातलं (फिल्मी) साहित्य हा एका नविन लेखाचा विषय होईल, पण जे न पाहे रवी ते पाहे न्हावी असं म्हणण्याएवढी पुस्तकं न्हाव्याच्या दुकानात सापडायची. इंटरनेटपुर्वीच्या बॉलीवुड गॉसीप साठी न्हाव्याच्या दुकानाला पर्याय नसायचा.
आमच्या गावच्या एका नाव्ह्याने जवळच त्याचं दुकान टाकलेलं. पप्पा पुण्यात असायचे तेव्हा त्याच्याकडे जायचे आणि आम्हाला आग्रह करायचे कि त्याच्याकडे जा म्हणुन. मला त्याच्याकडे जायला फारसं आवडायचं नाही - कारण त्याला गावच्या चांभारचौकशांमध्ये (!) फार रस असायचा.
(यावरुन आठवलं - न्हाव्याच्या दुकानात रेग्युलर सापडणारी 'रोमियो गॅंग' पाहिलिये कुणी? हे शुक्रजंतू रोजच्या रोज चकचकित दाढी करून आणि मायक्रोस्कोपिक कटींग करून आख्खा दिवस संध्याकाळच्या 'कट्ट्या'साठी जगतात - असो.)
एनी वे - कॉलेज मध्ये होस्टेल मध्ये असताना पहिल्यांदा दाढी केली - तेव्हा त्या न्हाव्याने माझी 'कात काढलिए' असं वाटण्याएवढं फ्रेश वाटलेलं! तो एक न्हावी चांगला होता. त्याची (लेडीज होस्टेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर) टपरी होती. मला दाढी करायला आवडायचं नाही. लहानपणा पासून पप्पांची (प्रणय रॉय सारखी) दाढी बघुन मी पण दाढी (यायची) वाट पाहिलेली. मग महिन्या दोन महिन्याने जेव्हा कटिंगकरता जायचो तेव्हा दाढी करायचो. अर्थात तेव्हा दाढी फार यायचीही नाही....
यायला लागल्यावर कॉलेज मध्ये दाढी, शबनम साठी प्रसिद्ध झालो होतो (असं नंतर पॅऱ्या म्हणाला - त्याच्या मते मी नेहमी काहीतरी वेगळं करायचो आणि जे करायचो त्याची फॅशन व्हायची - हे ऐकुन मला एवढं 'भरुन' आलेलं कि सांगता सोय नाही. आता कळतंय पॅऱ्या फक्त 'चुना' लावत होता.....)
तो प्राणी नुसता कटिंगच नाही तर फुल टु तेल मालीश पण करायचा. ते एवढं भारी वाटायचं कि मी दर महिन्याला कटिंग करायला लागलेलो. शिवाय जेव्हा पुण्यात कटिंग दर रु.२५/- व्हायला लागलेले, तेव्हाही हा रु. १०/- आकारायचा.
पुढे त्याने त्याच्या दुकानात एक पोऱ्या ठेवला आणि मी जुनं गिऱ्हाईक म्हणुन त्याचा 'गिनी पिग' बनायला लागलो. पण तोपर्यंत ईंजीनियरींग संपायला आलेलं - शिवाय विविध वैताग चालू होतेच - मग सरसकट केस आणि दाढी वाढवली.
अरे हो - हे सांगायलाच विसरलो - 'फाऊंटनहेड' वाचल्यापासुन 'केस कसे कापायचेत?' हे न्हाव्याला सांगणं बंद केलं. बंद केलं म्हणजे - त्याच्या या प्रश्नावर 'हे बघ बाबा - मी माझे केस बघू शकत नाही. इतरांना ते कसे वाटतात याबद्दल मला पर्वा नाही. तू 'प्रोफेशनल'. मी तुला केसांबद्दल काही सांगणं म्हणजे तुझ्या स्किल बद्दल अविश्वास दाखवण्यासारखं आहे. मी 'तुझ्या'कडे आलोय याचा अर्थ माझा तुझ्या स्किलवर विश्वास आहे - बाकी माझ्या 'डोक्याचं' काय करायचं हा तुझा प्रश्न!' असं उत्तर द्यायला लागलो.
यात ऍन रँडचं लॉजिक प्रॅक्टिकली किती पॉसीबल आहे हे पडताळायचा हेतू होताच, तसाच - बघू तरी काय होतंय, केस काय महिन्यात परत येतील असा विश्वासही होता.
माझा अनुभव असा कि - कुठल्याही न्हाव्याला असली काही 'फिलॉसॉफी' ऐकवली कि त्याला मी 'ठार येडा' आहे असं वाटतं, पण मी काहीच सजेशन देत नाही म्हटल्यावर ती कटिंग त्याच्यासाठी 'प्रतिष्ठेची' बनते. तो त्यावर एवढी मेहनत घेतो कि वाटतं - बरं झालं याला काही सांगितलं नाही - असे काप आणि तसे काप म्हणुन!
पुण्याला परत आलो तेव्हा गाववाल्याकडे जायला लागलो - तो मन लावुन केस कापायचा.
आणि मुख्य म्हणजे भरपुर वेळ कापायचा.
तो काळ असा होता कि केसांशी खेळायला न्हाव्याशिवाय काही पर्याय नव्हता!
त्याच्या ड्रॉप ईयर मध्ये गिऱ्या त्याच्या मामाच्या दुकानात जाऊन 'हजामगिरीचं' ट्रेनिंग घ्यायला लागल्याचं कळलं तेव्हा गिऱ्यावर भयंकर भडकलो.
केवळ वडिलांशी वाद म्हणुन मेरिट मध्ये आलेल्या मुलाने त्यांना राग आणण्यासाठी इंजीनियरींग मध्ये 'ड्रॉप' घेणं मी समजू शकतो. (ऍटलीस्ट तेव्हा समजू शकत होतो) पण डायरेक्ट 'हजामगिरी' सुरू करायची म्हणजे अतीच. मला 'जरासी जिंदगी' मधला डॉ. लागु आणि कमल हसनचा सीन आठवला.
पण गिऱ्या भलताच 'कूल' निघाला. म्हणे - अभ्या, उद्या नोकरी नाही मिळाली किंवा इकॉनॉमी डुबली तरी माझ्या हातचं हे स्किल कुणी कधी घेऊ शकणार नाही....
खरंय गिऱ्या -
हे आणि या सारख्या कुठल्याही 'स्किल' बद्दल आदर बाळगायला अमेरिकेत आल्यावर शिकलो.
म्हणजे - अमेरिका काही मला (आदराने) चावली वगैरे नाही, पण तिने (खिशाला) चटका मात्र दिला.
पहिल्यांदा १५ डॉलर मोजून झिंज्या (असम) कापुन घरी परतताना जे डिप्रेशन आलेलं, ते फॉल च्या जादूनेच जाऊ शकलं होतं....
२-३ वेळा त्या केस उपटणाऱ्या (कापणाऱ्या नव्हे) बाईकडे जाऊन आल्यावर शेवटी शिस्तीत अथेन्स मध्ये एक 'बलुतेदार' न्हावी शोधला. (त्याच्या आधी एवढी वाईट परिस्थिती आलेली कि टब मध्ये (मी) बसुन अतनुने माझे केस कापले होते). हा (खरं तर हे - तिघं जण होते ते) शिस्तीत केस कापायचा. अगदी भारतातल्या न्हाव्यासारखे. फक्त त्याची टायमिंग्ज विचित्र होती. म्हणजे - तो फक्त स. १० ते दु. ४ - या वेळेतच काम करायचा. त्यामुळे त्याच्याकडे जायचं म्हणजे पैशाबरोबरच क्लासेस, जॉब, रिसर्च, सगळं 'मॅनेज' करायला लागायचं. (त्याची टायमिंग बघुन वाटायचं - ही बहुतेक त्याची दुसरीच 'शाखा' असणार - पहिली सदाशिवात नाही तर गेला बाजार आप्पा बळवंत च्या जवळपास)
एकाच बाबतीत त्याची भारतातल्या न्हाव्यांवर मात म्हणजे - त्याच्या दुकानातली मासिकं!
त्याच्या कडे वर्षभरातले झाडुन सगळे - प्लेबॉय, हस्लर वगैरे चे 'खंड' असायचे.
माझ्या वेळेअभावी त्याच्याकडे अशाच वेळी जायला जमायचं जेव्हा त्याच्याकडे रांग नसायची. आणि मला कधी नव्हे ते कटिंगसाठी वाट न पहाण्याचा खेद व्हायचा.
(वाईट) अनुभवातुन शिकुन बाल्टिमोरलाही असाच 'बलुतेदार' शोधुन ईमानदारीत दोन वर्ष त्याच्याकडे काढली.
सिऍटलला आलो तेव्हा - आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांबरोबरच - न्हाव्याचा प्रश्न सोडवणंही क्रमप्राप्त होतं. 'ग्रेट क्लिप्स' मध्ये केस कापल्यावर सलग महिनाभर कंपल्सरी टोपी वापरली.
मागच्या तीन महिन्यात केस एवढे वाढले कि रोजच्या रोज माधुरीची भुणभुण - केस काप म्हणुन!
भायलोग - 'अरे संसार संसार' म्हणताना हजार शक्याशक्यतांचा हजारो वर्ष विचार करुन झालेला. एवढ्या मंथनातुन 'बायकोची केस कापण्याबद्दल भुणभुण' ही शक्यता कशी सुटली कळत नाही. क्रायसिस मॅनेजमेंट मध्ये मी बाप असुनही (कारण बरेचसे क्रायसिस माझीच पिल्लं असतात) ह्या क्रायसिस वर - चांगला न्हावी नाही - याशिवाय माझ्याकडे उत्तरच नव्हतं....
घर सोडल्यापासुन लग्न करेपर्यंत - मधली जवळपास (आई ते बायको मधली - आणि शांततेची) १२ वर्ष - संपल्याची (क्रूर) जाणीव मला व्हायला लागली.
शेवटी ३-४ दुकानांची टेहाळणी केल्यावर (हे करायला फार विशेष स्किल लागत नाही - बाहेर पडणाऱ्यांचे चेहरे पाह्यचे. लोक स्वत:च ते लपवत असतील तर पुढे जायचं) मी एका दुकानात घुसलो.
इथे मला जो अनुभव आला तो वर्णनातीत आहे!
ती बाई एका पोरीचे 'आयब्रोज' करत होती. (याला 'करत होती' म्हणतात कि आणखी काही माहित नाही).
तिने बसायला सांगितलं.
चहा आणि कुकीज आणुन दिल्या!
यावर माझे सगळे ऍन्टिने (बूस्टर्स सकट) बाहेर आले.
च्यायला केस कापायच्या आधी एवढं आगत-स्वागत.....'बाई - रेट काय?' हे तरी कसं विचारणार?
तेवढ्यात तिला कुणाचा तरी फोन आला - अपॉइन्टमेन्ट साठी.
त्या प्राण्याने बहुतेक तिला 'किती होतील?' विचारलं.
तिने 'अठरा' म्हटल्यावर माझा जीव (हातातल्या चहाच्या) भांड्यात पडला!
तिने 'स्पेशल कटिंग - ३ डॉलर एक्स्ट्रा' म्हटल्यावर मी म्हटलं - नको नॉर्मलच कर. पण मला नक्की फरक कळला नाही. एकतर (जिवापाड जपुन - प्रसंगी जिवावर उदार होऊन - वाढवलेले) केस माझे जाणार. मग ते कसे जाणार याने काय फरक पडतो?
पण बहुतेक - फक्त कात्रीने कापायला ३ डॉलर एक्स्ट्रा असं गणित होतं.
तिनं केस मन (आणि वेळ) लावुन कापले.
तिचं नाव फाजी.
वय ५० एक असेल.
(लग्नानंतर बायकोसमोर कुठल्याही पोरीचं नाव घेतलं कि मीच पटकन 'लग्न झालंय किंवा ठरलंय किंवा वय वर्ष ५० च्या आसपास' हे सांगुन टाकतो. माधुरीला काही प्रॉब्लेम नसतो - पण मलाच 'हायसं' वाटतं!)
फाजी ईराणची आहे.
वडिल पारशी होते - मुंबईत वाढले.
तिने आणखी कोण नातेवाईक कुठे असतात हे न विचारता सांगुनही टाकलं.
आणि मला - लग्न झालंय का? (बायकोलापण इकडेच यायला सांग केस कापायला) - मुलं किती? (ती होतील तेव्हा त्यांनाही इकडे आण - आम्ही स्पेशल 'विमानावर' बसुन त्यांची कटिंग करतो वगैरे सांगितलं) आणखीही कायकाय विचारत बसली.
एकुण काय - न्हाव्यांच्या चांभारचौकशा संपत नाही. (बाय द वे, विशेष नोंद - मला थोड्याही चौकशा करणारा चांभार कधीच भेटलेला नाही)
तुम्हा लोकांना असं फीलिंग कधी आलंय कि नाही माहित नाही - कदाचित वारंवार घर बदलल्याने अभ्याला आलं असेल - पण फाजी च्या दुकानातुन बाहेर पडल्यावर 'चांगला न्हावी (कि न्हावीण) मिळाल्याचं' गार-गार फीलिंग आलं....
चला - एक प्रश्न तर सुटला.
नेक्स्ट.....?