Sunday, February 25, 2007

एक बरबाद पंधरा ऑगस्ट

आज दुपारी टी.व्ही. वर 'हंट फॉर रेड ऑक्टोबर' लागलेला.
मग तो बघुन झाल्यावर कम्युनिज्म, रशियन एकॉनॉमी, अफघाणिस्तान यावर माधुरीशी सविस्तर गप्पा मारल्या.
हल्ली मला अभ्यास करायला लावण्यापासुन परावृत्त करण्यासाठी मी माधुरीशी कुठल्याही विषयावर गप्पा मारतो!
परवा तिची आई तिला कुठल्यातरी नातेवाईकाबद्दल सांगत होती. मुलगी नको म्हणुन त्या नातेवाईकाने बायकोस पाचव्या महिन्यात ऍबॉर्शन करायला भाग पाडलं.
माधुरीला तो सगळा प्रकार भयानक 'सिक' वाटला.
मी म्हटलं - खरंय, काही लोक करतात तसं. तसं करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण हॅलो - इट हॅपन्स! आज जेवायला काय आहे?
माधुरी म्हणे - तुला काहीच कसं वाटत नाही?
म्हटलं - बाई, आज तुम्ही सकाळपास्नं काय केलंत? आठव - उठुन कॉफी, मग माझ्यासाठी 'टर्की सॅन्डविच' (डोशाचं पीठ नीट भिजलं नव्हतं म्हणुन टर्की सॅन्डविच - आनंद आहे), मग मेल चेक, मग सिऍटल टाईम्स आणि मायक्रोसॉफ्ट वेबसाईट वर जाऊन काल मायक्रोसॉफ्टला जो 'बिलियन डॉलरचा' फटका बसला त्याची बातमी, गूगल, सिस्को वर नजर -
मग?
मग काय? टेक्नॉलॉजी पेज सोडुन कधी फ्रंट पेज वाचलंयस? मी मागचे वीस वर्ष वाचतोय. अशा प्रकारांवर राग येऊन येऊन रागच आता एवढा बोथट झालाय कि....
पण अशा गोष्टिंबद्दल काहीच नाही करायचं?
वेल, आपल्यापुढे दोन पर्याय आहेत - एकतर काहीच नाही करायचं, गप्प बसायचं किंवा निदान आपल्यापुरती न्याय्य वाटेल अशी कृती करायची. अशा माणसांशी संबंध तोडायचे, अशांचे अपराध चव्हाट्यावर आणायचे, अशा लोकांना निर्भीडपणे त्यांनी केलेल्या कृत्यांचा जाब विचारायचा. आहे हिंमत? असेल तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला असं कर किंवा तसं सांगणार नाही. तुला योग्य वाटेल ते कर - आय ऍम शुअर तू करशील ते योग्यच करशील.

आता त्या नातेवाईकाची शामत नाही.
बऱ्याच लोकांना माझं व्यक्तिमत्व आक्रमक वाटतं.
याचं कारण त्यांनी माझ्या बायकोला (अजुन) पाहिलेलं नाहिये.
'इजाझत' मधली 'सुधा' आठवतिये?
माधुरी बऱ्याचदा मला सुधा सारखी वाटते - सच और सही!
ती ज्या एकाग्रतेने (आणि आक्रमकपणे) कुठलाही प्रॉब्लेम सोडवते ते पाहिलं कि मला मी तिचा प्रतिस्पर्धी नसल्याबद्दल 'बरंच बरं' वाटतं!
यावेळचे दोन पर्याय मी सुचवले पण युजुअली तिचे फंडे वाईट क्लिअर असतात.
तिला भेटायच्या आधी मी बऱ्याच गोष्टिंबाबत सतत वैतागलेला असायचो - मराठी साहित्य/चित्रपट यांची परिस्थिती ते रस्त्यावरचं ट्राफिक. पण ती 'शॉशॅन्क' मधल्या रेडच्या थंडपणे 'गेट बिझी लिव्हिंग ऑर गेट बिझी डाइंग' म्हणते आणि मुख्य म्हणजे ते आचरणात आणते.
जाऊदे माझं 'बायको पुराण' खूप झालं नाहीतर 'कसं काय' वरुन संगिताचं टिकास्त्र यायचं - मराठी ब्लॉग्ज बायकोत फार गुरफटलेत म्हणुन! :)

हल्ली कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं.
एकेकाळी 'एक बरबाद पंधरा ऑगस्ट' वाचुनही पेटणारा मी हल्ली कुठल्याही सामाजिक प्रश्नांबाबत थंड का झालोय? रादर थंड झालोय का?
तर उत्तर - हो आणि नाही.
हो - कारण त्याने नुसतीच चिडचिड होते, कृती शून्य. मग आणखी चिडचिड आणि त्याचा हातातल्या कामांवर होणारा परिणाम.
नाही - कारण प्रचंड विचार करुन आणि देशाचं भलं करण्याचे प्लॅन्स आखुन आपण शेवटी वेळ येते तेव्हा बदल करु शकतो का? मग ते महत्वाचं नाही का - असा प्रश्न पडतो.
मग आजुबाजुला कुणी गरज नसताना राखीव जागा अडवायला लागला, हुंडा घ्यायला लागला, मुलगी नको म्हणुन भ्रुणहत्या करायला लागला, भ्रष्टाचार करु लागला कि मी त्या व्यक्तीला त्या कृत्याचा जाब विचारणे ही माझी नैतिक जबाबदारी मानतो. ती जर सगळ्यांनीच पाळली तर या गुन्ह्यांना मिळणारं 'सामाजिक संरक्षण' कमी होईल असं माझं (अर्थात वैयक्तिक) मत.
ए.पी.जे. अब्दुल कलामांना एकाने एकदा विचारलं - भ्रष्टाचार दूर कसा होऊ शकेल?
त्यांचं उत्तर असं होतं कि भ्रष्टाचार तीनच लोक दूर करु शकतात - तुमचे पालक आणि तुमचे प्राथमिक शिक्षक.
हे नैतिकतेचे धडे तुम्हाला तुमच्या पालकांकडुन अथवा शिक्षकांकडुन मिळाले नसतील तर तुमचं दुर्दैव!
मिळाले असतील आणि तरीही तुम्ही षंढत्वाचा पर्याय स्विकारला असाल - तर तुमच्या पोरांचं दुर्दैव!!
वर उद्या तो नातेवाईक प्राणी त्याला जाब विचारल्याबद्दल आमच्यावरच डाफरला कि भाऊ - अमेरिकेत बसुन असे फंडे पाडणं सोपंय, इथे हुंड्यावाचुन पोरींची लग्न अडतात - तर काय करायचं?
तर जमेल तेवढं करायचं.
शेवटी त्याला मला नाहीतर कुणालातरी कधी ना कधी जाब द्यावाच लागणार आहे.....

आज खरं तर लिहायला काही 'सलग' विषय नाहिये.
दरम्यान फोरसिथचं 'आयकॉन' पूर्ण केलं (ते सध्या माधुरी वाचतेय), स्टीफन किंगचं 'डिफरंट सीझन्स' वाचलं. (बहुतेक ह्याचा उल्लेख आधीच्या कुठल्यातरी पोस्टमध्ये 'थ्री सीझन्स' म्हणुन केलेला). गंमत म्हणजे किंग भयकथांसाठी प्रसिद्ध आहे - आणि मी त्याचं एकही 'भयानक' पुस्तक वाचलं नाहिये!
उपमन्यु चॅटर्जीचं 'इंग्लिश ऑगस्ट' मिळवायचा प्रयत्न चालू आहे. (यावर याच नावाचा एक पिक्चर निघालेला १०-१५ वर्षांपुर्वी. त्यातला शिवाजी साटमचा रोल चांगलाच लक्षात राह्यलाय.) 'हू किल्ड डॅनियल पर्ल?' हे ही मिळवायचा प्रयत्न करतोय.
पुस्तकांचा विषय फक्त 'अपडेट' देण्यासाठी.
खरंतर आज योगेशच्या अवचटांवरच्या लेखाने बऱ्याच आठवणींत नेलं.
मग माधुरीला अवचट, अन्वर काका, अरुणा काकू आणि 'जुई अन्वर अरुणा', त्यावरुन विनय सर, मुक्तांगण, पु.ल., याबद्दल भरपुर सांगितलं.
ही सगळी डिस्कशन्स 'हंट फॉर रेड ऑक्टोबर', 'कॉन्टॅक्ट' आणि 'थेल्मा ऍन्ड लुई' च्या अवतीभवती बागडत राहिली.

अभ्यास टाळण्यासाठी काहीही....

19 comments:

  1. wA, chAn lihitios tu. straight from heart!

    ReplyDelete
  2. Hi Abhijit, sorry to ask, but whats significance of title? I mean is there any article linked with it? If yes, please send link if possible. Your posts are always different and very original!
    - Sneha

    ReplyDelete
  3. सुमेधा - थॅन्क्स फ़ॉर द कमेन्ट!
    स्नेहा - बरं झालं तू विचारलंस टायटल बद्दल ते!!
    यूजुअली माझी टायटल्स पोस्ट मधल्या ऍक्चुअल कंटेन्टशी निगडीत असतात, पण या ब्लॉगचं टायटल 'एक बरबाद पंधरा ऑगस्ट' या अविनाश धर्माधिकारींच्या एका कवितेवर आधारित आहे. त्यांच्या सामाजिक कविता फारच वाचनीय असतात. आमच्या शाळेतील (आम्ही दोघं काही वर्षांच्या फरकाने एकाच शाळेत शिकलो) एका माजी विद्यार्थिनीचा तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी खून केला, या घटनेनंतर त्यांनी ती कविता लिहिलेली.
    सध्या तरी ती कविता माझ्याकडे नाहिये, पण तिचं टायटल आणि 'सातबाऱ्याच्या उताऱ्यावर रक्ताचे डाग असतात' ही त्यातली ओळ चांगलीच लक्षात आहे.

    या अनुशंगानंच मागच्या ब्लॉगचं टायटल -
    एकेकाळी दूरदर्शन वर 'पचपन खंबे लाल दीवार' नावाची एक भयानक डिप्रेसिंग सीरियल यायची. तिचं ते टायटल आणि कुठल्याश्या दिल्लीतल्या कॉलेजचे ओळीने दिसणारे ते ५५ खांब हे सगळं 'डिप्रेशन' या विषयाशी एवढं निगडीत झालं, कि त्या वेळी त्या पोस्टसाठी आणखी समर्पक शीर्षक सुचेना.

    ReplyDelete
  4. Abhijit, thanks for the reference. After reading the background of poem, I am eager to read it. 'Satbaryachya utaryavarche raktache daag'.. aah!! It reminds me Narayan Surve's poems.
    - Sneha

    ReplyDelete
  5. अभिजित - तुझी लिहिण्याची स्टाईल मस्त आहे. एकदम मनापासुन आणि थोडे अस्वस्थ topics.

    ReplyDelete
  6. काल ब्लड डायमंड बघताना विचित्र अनुभव आला.

    चित्रपटातल्या अगदी इन्टेन्स सीनमध्ये देखील पडद्यावरच्या आफ्रिकन लोकांना थेटरमधले काही लोक ऐकू येईल इतक्या जोरात हसत होते, शेरे मारत होते.

    अशा वेळी खूप राग येतो पण आपण काय करु शकतो.

    btw, अविनाश धर्माधिकारींची ही कविता कुठे मिळेल का? पेपराबिपरात आली असेल तर संपलंच मग काय मिळायची नाही. पण पुस्तकात असली तर बरं.

    ReplyDelete
  7. PaN nehameechee energy aaNi baaMdhesoodapaNaa naaheey. Arthaat he maaz mat..

    ReplyDelete
  8. hey abhijit... tht ws nice post..
    आणि माझ्या ब्लॉग वरच्या कमेंटबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  9. पराग, मेघना, भाग्यश्री - धन्यवाद.
    योगेश -
    तू 'ब्लड डायमंड' भारतात पहात होतास असं मी गृहीत धरतो. तर अशावेळेस 'अरे च्युत्या - बापाबद्दल असं बोलू नये' असा आवाज टाकायचा. हशा पिकतो.
    मग पलिकडुन शिवी येते, पण त्यात तितकासा दम नसतो. म्हणतात ना - बुंद से गई वो हौद से नही आती....
    थेटरात मारामारी करायची या लोकांची हिम्मत नसते, कारण तुझ्यासारखं बाकीचं पब्लिकही वैतागलेलं असतं - अंधाराचा फायदा सर्वांना! जनता हात धुवुन घेते मग.
    झालंच तर - 'अकेला आता है या सबको लु?' किंवा 'यो' प्राणी असेल तर 'Are you trying to be stupid or is it natural?' असे डायलॉग्ज तयार ठेव.
    अंतिम विजय सत्याचा (म्हणजे आपला) असतो. झापड फारशी लागत नाही - अपमान लागतो.

    फक्त याच्याबरोबर एक काम कर - कुणी तुला अमेरिकेत काळ्यांवर किती अत्याचार करतात आणि 'रेसिजम चा धिक्कार असो' अशी मेल फॉर्वर्ड केली तर हा किस्सा नमूद करायला विसरू नकोस.

    ReplyDelete
  10. BTW mi English August ghetlay. Send me your home address and i ll send it over.

    As always nice post !

    ReplyDelete
  11. छान लिहिलं आहेस. नेहमीप्रमाणेच!
    मला कविता वाचायलापण आवडेल.

    ReplyDelete
  12. abhijit,
    sadhyaa abhyaas chaalu aahe ka?
    baryaach divsaat kaahi lihila naahiyes...

    ReplyDelete
  13. मला आवडलं तुझं लिखाण. खूप खूप मनापासून लिहिलं आहेस. लिहित रहा... माझ्या लिखाणावरील प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  14. मला आवडलं तुझं लिखाण. खूप खूप मनापासून लिहिलं आहेस. लिहित रहा... माझ्या लिखाणावरील प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  15. नाइस पोस्ट!

    माधुरीबद्दलच्या तुझ्या कॉमेण्ट्स वाचुन तिला भेटावंसं वाटतंय!

    कधी भेटतोयेस? आणि भेटवतोयेस??

    ReplyDelete
  16. अरे मित्रा (हा माझ्या एक तर्फी प्रेमाचा अविष्कार), मघाशी एक comment टाकला, मग पुढचे post वाचायला घेतले. मग सगळे जुने post एका दमात वाचले. राहावलं नाही म्हणून परत लिहायला घेतलं. एका वाक्यात सांगायचं झालं तर..झकाsssस.
    मझा आगया...पुस्तक, पिक्चर, मित्र-मैत्रिणी...एकदम मझा आला...

    ReplyDelete
  17. अभिजित,
    बर्‍याच दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर फिरकले आणि माझा संदर्भ वाचून ह्सू आलं. बघ, सगळ्यांना धाक आहे की नाही माझा? :)D)
    माधुरीचं वर्णन ऐकून एके काळच्या माझंच वर्णन आहे असं वाटायला लागलं. आता माझ्यात पण बराच बोथटपणा आला आहे.
    माझ्या भावाला पहिली मुलगी झाली. त्यानंतर अनेक जणांनी "पुढच्यावेळी चेक-अप करून घ्या" असा सल्ला दिला. (अर्थातच त्यांनी तो पाळला नाही).
    कधी कधी तर असं वाटतं की अशा लोकांच्या पोटी मुली जन्माला आल्यापेक्षा नं आलेल्याच बर्‍या. आयुष्यभराच्या जाचापेक्षा अस्तित्व नाकारणंच बरं. अर्थात हा फार अतिरेकी आणि निराशाजनक विचार आहे हे ही पटतं.
    काही तरी करायला पाहिजे, पण काय? माझ्या ओळखीपैकी कोणीतरी असं केल्याची कुणकुण आहे. पण आपण त्यांना जाब विचारायला गेलं आणि त्यांनी ते सपशेल नाकारलं तर काय करणार?
    लोकसंख्येचा प्रश्नामुळे हा प्रश्न फारच गुंतागुंतीचा होतो. नाही तर सरसकट इथे राईटविंग लोक करतात तशी "प्रो लाईफ" कायदे करायची मागणी करता आली असती.

    ReplyDelete