Friday, March 30, 2007

एक डाव भुताचा

शाळा कॉलेजात असताना परिक्षा आली कि वादळ, भूकंप, दंगल वगैरे काहीतरी होऊन परिक्षा पुढे ढकलली जावी असं वाटायचं. आता ही परिक्षा कधी एकदाची संपतिये असं झालं असताना 'वॉशिंगटन बोर्ड ऑफ प्रोफेशनल इंजीनियर्स' चं पत्र कि मी एक फॉर्म भरायला विसरल्याने एप्रिल मध्ये परिक्षा देऊ शकत नाही!
च्यायला पोपट!!
मी आऊच्या काऊला सांगुन ठेवलेलं माझ्या परिक्षेबद्दल.
आता परत अभ्यास, परत टेन्शन, आणि ऐन फुटबॉल सीझन च्या स्टार्टला परिक्षा!
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे 'रिव्ह्यू क्लास' आत्ता अटेंड करतोय तो पुन्हा करावा लागणार नाही. :)

त्या रिव्ह्यू क्लासवरुन आठवलं - आयटमचं भूत!
त्याचं झालं असं कि या क्लाससाठी मला युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटन मध्ये जावं लागतं. पार्किंगच्या आणि ट्राफिकच्या (जागतिक) प्रश्नाने बरीचशी जनता बसने येते. मला बसने वगैरे जायचं म्हणजे लई वैताग येतो. मग मी रेहमान ची गाणी वगैरे ऐकत १५ मिनिटांच्या रस्त्यावर तासभर काढुन युनिव्हर्सिटीत पोचतो.

पहिल्याच दिवशी वर्गात गेलो तर - आयटम पहिल्या बाकड्यावर बसलेली दिसली.
मी सवयीने शेवटच्या रांगेत गेलो.
आयटम म्हणजे - उंच, नाजुक, ब्राऊन ब्लॉन्ड केस, नाजुक चष्मा वगैरे.
क्लासमध्ये आणखी पोरी नाहियेत असं नाही, पण मास्तर शिकवत असताना ही हरणासारखी मान पुढे ओढुन पाण्याच्या बाटलीतुन पाणी (अर्थात नाजूकपणे) पिते आणि (मागच्या बाकावरुन) समोर बघणाऱ्या अनेक माना मग आपसुक उजवीकडे वळताना दिसतात.
आयटमचं पाणी पिणं, चष्मा नीट बसवणं, आसनं बदलणं - हे अडीच तास अखंडपणे चालू असतं.

तर पहिल्याच दिवशी पार्किंग लॉटकडे चालत जाताना कुणीतरी तिला विचारलं - तु कुठे रहातेस?
ती म्हणे - रेडमंड.
च्यायला मी पण रेडमंडलाच चाललेलो.
ती बस स्टॉपकडे जाताना मी विचार केला कि तिला विचारावं का कि मी सोडु का?
म्हणजे त्यामागचा (आणखी एक) उदात्त हेतू म्हणजे - दोघं असल्यावर एच.ओ.व्ही. (हाय ऑक्युपन्सी व्हेहीकल) लेन मध्ये गाडी चालवता येईल आणि ट्राफिक आपसुकच टळेल.
पण च्यायला (तेंडल्यासारखं) फुटवर्क आणि टायमिंग - दोन्ही गंडलं.
बॉल गेल्यावर बॅट फिरली.
ती बस स्टॉपकडे चालत गेली.
पण तिचं भूत गाडीत येऊन बसलं!

म्हणजे झालं असं कि पार्किंग लॉटमधुन गाडी काढुन कॅम्पस रोडवर संथपणे जायला लागलो.
म्युजिक सिस्टिम वर 'तु हि रे....' सुरू झालं.
तेव्हा वाटलं, आयटम गाडीत असती तर मी ते पटकन बंद करुन नॅशनल पब्लिक रेडिओ किंवा तत्सम काहीतरी लावलं असतं.
मग ती म्हणाली असती - असु दे ना! (या एका 'ना' ने पुरुषांच्या जगात किती उलथापालथ होते हे पोरीबाळींना काय कळणार....)
मग तिने मला गाण्याबद्दल विचारलं असतं.
मग मी तिला म्हणालो असतो - हा पिक्चर वेगळाच. याला लव्ह स्टोरी, अ व्हायलंट लव्ह स्टोरी, किंवा लव्ह ड्युरिंग रायट्स वगैरे कसलीच विशेषणं फिट्‍ होत नाहीत. आमच्याकडे ना, एकतर हिंदु मुसलमान वगैरे लग्न चालत नाहीत. खेडेगावामध्ये वगैरे तर नाहीच नाही. तर पिक्चरची स्टोरी अशी कि -
तो, ती, निळंशार पालम्पुर, समुद्र, किल्ला....
किल्ला - हां....तर तिथे हे गाणं घडतं.
म्हणजे हा पिक्चर आला तेव्हा याच्यासारखं काही आम्ही कधी पाहिलंच नव्हतं.
म्हणजे आमच्याकडे प्रेम वगैरे प्रकार असतो आणि तो आमच्या पिक्चरमध्ये रापचिक प्रकारे वगैरे दाखवतातही, पण हे म्हणजे अगदीच 'रॉ' होतं.
अगदी खरं वाटावं एवढं रॉ....
अजुन कशात काही नाही आणि व्याकुळ होऊन हीरो रडतोय.
अजुन कशात काही नाही आणि सगळं काही सोडुन हीरोईन जीव तोडुन पळत येतिए.
अजुन कशात काही नाही आणि जगातली शेवटचीच असल्याप्रमाणे प्रत्येक लाट किनाऱ्यावर आपटतेय....
अजुन कशात काही नाही आणि आम्ही चिंब भिजत पिक्चर बघतोय....

मला त्या काळात तो हीरोने घातलेला पट्ट्या-पट्ट्याचा टी-शर्ट घ्यायचा होता.
पुढे जाऊन त्याच्यासारखं 'जर्नालिजम' करावं का असा विचार केल्याचंही आठवतंय.
हीरोचं नाव? अरविंद स्वामी.
ते सोड.
हिरोईन होती मनीषा कोईराला!
तिचे वडिल कि आजोबा नेपाळचे पंतप्रधान वगैरे होते, पण ती ऍक्टिंग करायची.
का?
ते महत्वाचं नाहिये.
तर हिरोईन मनीषा होती.
असं म्हटल्यावर तुफान हळहळ आणि गुदगुल्या वगैरे वगैरे आम्हाला तेव्हाही व्हायच्या आणि आताही होतात!
कारण....
ते जाऊ दे.
पण या पिक्चरने तुफान कॉन्ट्रोव्हर्सी झालेली. म्हणजे जनतेच्या धार्मिक भावना वगैरे दुखावल्या.
नाही या गाण्याने नाही, पण दंगली, राजकारण, राममंदीर वगैरे....

संगीत?
रेहमान. सवालच नाय....
साधना मावशीच्या घरी कुठल्याशा पूजेला व्हि.डि.ओ. वर 'रोजा' नामक कुठलासा मद्रासी पिक्चर लागलेला. खतरनाक स्टार्ट वगैरे झाल्यावर 'दिल है छोटासा...' म्हणत धबधब्या खालच्या लोखंडी शिडीवर उभं राहुन आम्ही - बरसणारा रेहमान झेलायचा प्रयत्न तेव्हा जो सुरू केला तो आजतागायत चालू आहे....

हे पुढचं ऐक.
बोगद्यात जाता जाता हे गाणं सुरू होतं.
बोगद्यात अंधार.
आय नो - ते ऑबव्हिअस आहे, पण तरीही.
अंधार.
मागुन कुठुन आर्त - राजस्थानी वाटावेत असे 'जिनके सर हो इष्ककी छॉंव....' चे सूर येईतो बोगद्यातुन बाहेर पडता पडता जगण्याची टोटल उर्मी एकेक ठेक्यात तोलत शाहरुख जे....
आई शपत - तुला कसा माहित शाहरुख?
हा....तोच.
पण तो पिक्चर 'वीर जारा' कि झारा होता.
अशा चुका होतात लोकांकडुन अधे मधे.

मी गाडी फास्ट तर चालवत नाहिये ना?
पण मला सवयीचा आहे रस्ता.
शिवाय स्पीड लिमिटला गाडी चालवली कि मला मी आयुष्यातला वेळ वाया घालवतोय असं वाटतं.
म्हणजे तो वाचवुन मी काही फार तीर मारतो अशातला भाग नाही, पण वाटतं.

च्यामारी - 'जब पास है तो एहसास है तू' चा अर्थ....
एवढ्या डीटेल मध्ये नको जाऊस.
आमच्या सारखा गुलजार 'फील' करायला शीक.
म्हणजे त्याचं असं कि - गुलजार गुलजार म्हणजे काय चीज आहे, ते आम्हाला 'माया मेमसाब' पाह्यल्यावर कळलं. म्हणजे एकतर पिक्चर टॅक्स-फ्री, ते पण 'वेस्ट-एंड' ला, शिवाय त्यात दीपा साहीचा एक बोल्ड सीन आहे वगैरे आवश्यक माहिती काढून मी आणि योगेश तो पहायला गेलेलो.
१५ ऑगस्ट १९९३ ला!
आता काय करणार....रहातं असलं काही माझ्या लक्षात....
हो तर - बोल्ड सीन होताच, आणि तो कधी नव्हे ते पिक्चरच्या कथानकासाठी आवश्यकही होता, पण 'इस दिल मे बस कर देखो तो....यह शहर बडा पुराना है' ने एवढं झपाटलं कि त्या एका दिलापायी हजार शहरं बदलत आम्ही अजुन भटकतोय....

तर सांगायचा मुद्दा असा कि गुलजार असा फील करायचा असतो!
पण तो सगळ्यांनाच झेपत नाही.
खोटं कशाला बोला, कधी कधी मला पण झेपत नाही.
नाही ग्रेस वगैरे एवढा अवघड नाहिये, पण एकंदर अवघडच.
म्हणजे नाही कळला तरी अवघड आणि कळला तर आणखीनच अवघड....

या गाण्यात लडाखमधल्या कुठल्याशा तळ्याकाठी एका चादरीत शाहरुख आणि मनीषा जे काही करतात - नाही ते एवढं ऑबव्हिअस नाहिये, पण ते हिंदी पिक्चरमध्ये न भूतो न भविष्यति आहे. सतरंगी गात ते दोघे जे काही एक रूप, एक रंग होतात आणि त्यावर शाहरुख एका सूफी धुनीत जे पिसाळल्यासारखं नाचतो, ते लक्ष्मीनारायण मध्ये अपर-स्टॉल्स मध्ये बसुन जेव्हा पाह्यलं तेव्हा वाटलं कि आता या पिक्चरनंतर मणिरत्नम, रेहमान, गुलजार, मनीषा, शाहरुख या सगळ्यांनीच संन्यास घ्यावा....
कारण पर्फेक्शन कॅनॉट बी इम्प्रुव्हड्‍.....
बऱ्याच लोकांना हा पिक्चर पटला नाही आणि मला त्यांना तो ग्रेट का आहे ते कधीच समजावुन देता आलं नाही.

असो.
चार गाण्यात घरी - नॉट बॅड!

आठवड्यात दोन दिवस क्लास - आणि या दोन दिवसांत क्लासवरुन येताना मी आणि आयटमचं भूत.
आणि आमच्या गप्पा!

गम्मत आहे.
हे बरेच दिवस मनात घोळत होतं, पण लिहायला जमलं नव्हतं.
भूत पण शिस्तीने फक्त क्लासवरुन येतानाच गाडीत असायचं.
पण आज हे लिहायला घेतलं आणि क्लासवरुन येताना आयटमचं भूत हरवलं.
किंवा यायला विसरलं.
आज आयटमने स्वत:ची गाडी आणलेली.
कदाचित ते तिच्याबरोबरच गेलं असेल.

भुताबरोबर गप्पा मारताना कधी पडला नव्हता तो प्रश्न पोस्ट लिहायला घेतल्यावर पडला.
प्रश्न म्हणजे असा कि जणु काही अभ्या म्हणतोय कि मामा काय हे - आता लग्न बिग्न झालंय तुझं!
मग मी पण विचारात पडलो.
च्यायला हो की!
मग असं भूत गाडीत येऊन बसलंच कसं?
मी त्याला बसु दिलंही कसं?
पण का कुणास ठाऊक, मला याबद्दल फारसं गिल्टी वगैरे वाटत नाही.
भूत मी न विचारता आलं.
बसलं.
आणि आम्ही (खरं तर मी) रेहमानच्या गाण्यांवर आठवणींना उजाळा दिला - हे खरं.
आठवणींना उजाळा तो पण कसला?
१५ ऑगस्ट १९९३ च्या त्या रात्रीचा?
कि 'बॉम्बे' पाह्यल्यावर पहिल्यांदा प्रकर्षाने प्रेमात पडावंसं वाटलेलं - त्याचा?
काय माहित.
तसं आज मी भुताला मिस पण केलं नाही.
त्यात एक बबन रस्ता अडवुन स्पीड लिमिट मधे गाडी चालवत होता. त्याला ओव्हरटेक करेपर्यंत घर जवळ पण आलेलं.

तर मी या भुताला अभ्याच्या त्या 'टुटा सितारा तो...' च्या पोस्टमधल्या मित्राप्रमाणे मानतो.
कदाचित भुताला त्या तुटलेल्या सिताऱ्यात इंटरेस्ट नसेलही, पण मी त्याला माझा इंटरेस्ट न चुकता ऐकवतो.
या निमित्ताने मग ते भूत मला आवडणाऱ्या गोष्टी मला का आवडतात ते नव्याने आठवायला लावतं.
सवयीच्या आवडी मग फक्त सवय न रहाता फक्त आवडी म्हणुन रहातात.
त्यांची उगमस्थळं आठवली कि कात काढल्यासारखं 'नविन' वाटतं.

पुढे जाऊन जर्नालिजम कधी केलं नाही.
टी-शर्ट बद्दल तर सपशेल विसरुनच गेलो.
स्वत:च्याच शहरात अजुन भटकतोय आणि सापडत नाहिये.
पण त्या बुरुजावरच्या लाटांचा ध्रोंकार अजुन ऐकु येतोय.
तेव्हा लागलेली ओढ आणि ओल अजुन जाणवतेय.

आणि का कुणास ठाऊक -
बरं वाटतंय....

28 comments:

  1. masta lihilayes mama. :-)

    najuk hariNi, ticha bhoot, driving, Bombay, Dil-Se ani Gulzaar. Kaay sahi gumphale gelet ekach post madhye. :)

    married asatana asha bhutashi gappa maranyala harakat nasavi re. Ni:shabd pahilas? Bachchan cha explaination layy bhaarii ahe, tyala Jiah baddal prem ka vaTala he sangatanacha. te aThavala.

    swat:chya awaDi nivaDi, mann aaNi vichar taruN aNi energeTic ThevaNyasaThii "kuchh bhi".. mag hya "kuchh bhi" madhye jar gharatali maNas^ dukhavali geli naahit, tar BesTach.

    ReplyDelete
  2. Sundar lihile ahe.
    Item che bhut ganyabaddal vicharate hi kalpana avadali. Satrangi pan mala bhayankar avadate. 'Dil se' avadleli amachya samasta hostel madhe mi ekatich hote.

    ReplyDelete
  3. या निमित्ताने मग ते भूत मला आवडणाऱ्या गोष्टी मला का आवडतात ते नव्याने आठवायला लावतं.
    सवयीच्या आवडी मग फक्त सवय न रहाता फक्त आवडी म्हणुन रहातात.
    त्यांची उगमस्थळं आठवली कि कात काढल्यासारखं 'नविन' वाटतं.

    Hey lai khara bolala rao.
    Ashi bhut bhetavitach. Swtahashi tutalela samwaad an swatahachich visaraleli olakh punha navyaan karun detat.

    ReplyDelete
  4. You are back with a bang! Mastach ahe post. Ekdum Abhijit'style. Fresh ani danakyat arthapoorna! Maza aagaya...

    ReplyDelete
  5. Hey pharach lihitos !
    Visit kele aani aakha blog vachun kadhla
    Keep it up!!

    ReplyDelete
  6. Abhijit, mast aahe! Bhut aavadal aaplyala.. :) Hope you must have heard 'Pray for my brother' of Rahman. 'Dil se' chi gaaNi ha eka dusrya postcha vishay aahe!! BTW Itemchya barobar tujha bhut jaat hota ka yacha shodh ghyayla harkat nahi!! ;)

    ReplyDelete
  7. Hi,

    Your blog has been added to MarathiBlogs.com - Marathi Blog Reader. I would appreciate if you can give a link to MarathiBlogs.com from your blog.

    -- Punit

    ReplyDelete
  8. hey... as usual.. very nice post.. :)

    Ashi bhta kadhi kadhi bolayla bari padtat khup.. !!! mhanje agadi kahi bhid na balagata bolata yeta tyanchashi.. :)
    Keep writing..

    -Parag.

    ReplyDelete
  9. Sahi post aaahe. baryach diwsaanni kalel ase lihile aahes - enjoyed it. 'Baban' ha prakar avadla!

    ReplyDelete
  10. भायलोग -

    माझ्या ब्लॉगवरचं बाकी काही वाचा न वाचा.
    कमेंट दिली नाहीत तरी चालेल, पण प्लीज - हे वाचा.

    http://nileshgadre.blogspot.com/2007/03/blog-post_30.html

    ReplyDelete
  11. The best post on this blog so far!

    माम्या - च्यायला कधी कधी तुझे पोस्ट्स वाचुन लई हेवा वाटतो! आपल्याला असं का लिहिता येत नाही?

    इतकं मोकळेपणाने... इतकं स्वैर... इतकं इन्फ़ॉर्मल आणि तरीही किती खरं! सुरेख!

    तुझ्या लिहिण्याची "भट्टी" मस्त जमतेय मामा - कीप इट अप!

    बाबा.

    ReplyDelete
  12. काय अशक्क्य सही लिहीलय!! फार आवडलं पोस्ट!! अशीच भूतं भेटूदे तुला..आणि असेच छान पोस्टत राहा!!
    (btw माझ्या बाबांच्या ब्लॉगवरच्या कमेंटसाठी धन्यवाद! त्यांच्याऐवजी मीच देतीय़..त्यांनी एकच पोस्ट कसंबसं लिहीलय.. :) )

    ReplyDelete
  13. निलेशच्या ब्लॉगची लिंक दिल्याबद्दल Thanks.
    हीच परिस्थिती थोडे डोळे उघडे ठेवून पाहिली तर महाराष्ट्रातही दिसेल.

    मागच्या महिन्यात वासोट्याला गेलो होतो. बोटीतून जायला लागतं पायथ्यापर्यंत.
    तिथं आम्ही बसलेली बोट कोण चालवणार म्हणून दोघात वादावादी झाली.
    एकाचं म्हणणं की सोसायटीच्या रुलप्रमाणे त्याचा नंबर आहे. दुसर्‍याचं म्हणणं असं की त्याचा नंबर होता तेव्हा एक पण गिर्‍हाईक मिळालं नाही.
    शेवटी दोघातला एकजण आला.

    बोटीत त्याच्याबरोबर बोलताना विचारलं की बाबा तुला पगार किती? (हे लोकं मोकळेपणाने सांगतात) तो म्हणाला गिर्‍हाईक मिळालं तर महिना १३०० रुपये. आणि नाय मिळालं तर ८०० रुपये.

    पोटात ढवळून आलं.

    आम्ही पूर्ण ट्रीपसाठी केलेला पर हेड खर्च हे त्याचं महिन्याचं उत्पन्न!

    पण आता लाजबिज काय वाटत नाही. असं वाटलं का घरी येऊन टीव्हीवर कोणताही चॅनेल लावावा. भारतात सगळ्यांची किती मजामजा चालू आहे असं वाटतं.

    बायदवे,
    मणिरत्नम, रेहमान, गुलजार, मनीषा, शाहरुख या सगळ्यांनीच संन्यास घ्यावा....
    कारण पर्फेक्शन कॅनॉट बी इम्प्रुव्हड्‍.....


    नायकन आणि मौनरागम नंतरच मणीरत्नमने संन्यास घेतला असता तरी चालला असता. नंतरचे इरुवर आणि कन्नथिल मुथमित्तल, रोजा, बॉम्बे हे त्याच्या स्टॅंडर्डच्या जवळपास जाणारे होते.

    अरविंद स्वामी, शाहरुख, अभिषेक बच्चन असल्या फडतूस लोकांना घेऊन मणीरत्नम त्यांचं स्टॅंडर्ड का वाढवतो?

    ReplyDelete
  14. मित्रांनो -
    कमेंट्स साठी धन्यवाद.
    आय होप तुम्ही निलेशचा ब्लॉगही वाचला असेल - ऍटलिस्ट त्याचं ते लिंक दिलेलं पोस्ट.
    बाबा - तु म्हणतोस तसं हे पोस्ट जरा बरं जमलंय असं मी पण समजत असताना निलेशचं ते पोस्ट वाचलं.
    इथे ज्या हळव्या वगैरे आठवणींची आठवण या भुताने करुन दिली, तशीच बधीर करणऱ्या आठवणींची आठवण निलेशच्या पोस्ट ने करुन दिली. योगेश म्हणतो तशी महाराष्ट्रातली परिस्थिती मी ही पाह्यलिए. पालीजवळ पडसऱ्याल आम्ही आदिवासी मुलांना '१०० दिवसांच्या शाळेत' शिकवायला जायचो. ते काय किंवा ऊसकामगारांच्या मुलांसाठी प्रबोधिनीने चालवलेल्या साखरशाळा काय, किल्लारी भुकंपाने विस्थापित झालेल्यांचे, अथवा नर्मदा सरोवर किंवा गेला बाजार कृष्णा खोरे विकास प्रकल्पात विस्थापित झालेल्यांचे प्रश्न काय - हे निलेशने नोंद केलेल्या डॉक्युमेन्टरी पेक्षा वेगळे नाहीत.
    फरक असा कि बांगलादेश-बर्मा च्या 'लॉ-लेसनेस' मधले हे प्रश्न भीषण वाटतात, पण सुसंस्कृत महाराष्ट्रात ते वाटत नाहीत.
    मुंबई दर वर्षी बुडते - आपण पोहतो आणि जगलो वाचलो तर स्वत:चीच पाठ थोपटतो.
    आपले रस्ते दर वर्षी वाहुन जातात - आपण खड्डे चुकवत सहन करतो.
    पुण्यासारख्या शहरात अथवा पुणं कशाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात हजारो लोक अपघातात मरतात.
    दर वर्षी.
    आपण एक स्टॉप साईन लावु शकत नाही.
    लोकशाहीचं प्रतीक म्हणुन जमावगिरी करत सामुहिकरित्या सिग्नल तोडतो.

    मी ही हे लिहितोय तर बरेच लोक हार्दिक नावाच्या माझ्या एका मित्रासारखे - 'तो तूने क्या किया?' असं मनात म्हणत असतील.
    जाऊदे उगीच चिडचिडीत वीकेंड वाया जायचा....
    ज्याला जमेल त्याने जमेल तेवढं करावं.
    उगीच त्रागा तरी किती करणार?

    योगेश - कमेन्ट साठी थॅंक्स. कलाकारांच्या (आपापल्या) आवडीनिवडि वेगवेगळ्या असु शकतात, पण रोजा, बॉम्बे मध्ये अरविंद स्वामी, दिल से मध्ये शाहरुख, आणि युवा मध्ये (तो कबड्डीचा सीन सोडुन) अभिषेक चपलख बसले होते कि!

    ReplyDelete
  15. फरक असा कि बांगलादेश-बर्मा च्या 'लॉ-लेसनेस' मधले हे प्रश्न भीषण वाटतात, पण सुसंस्कृत महाराष्ट्रात ते वाटत नाहीत.

    निषेध! निषेध!

    महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणून शिवी दिल्याबद्दल जाहीर निषेध. गेल्या ५ वर्षापासून महाराष्ट्रात रोज सरासरी २ शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि महाराष्ट्र सुसंस्कृत असल्याच्या बाता आपण महाराष्ट्रीय लोक मारत आहोत.

    जेव्हा एखाद्या माणसाला स्वत:चा जीव घेण्याएवढी एक्स्ट्रीम स्टेप उचलावी लागते... जगण्याचं कोणतंच कारण, आशा त्याच्यासमोर राहत नाही. इतर लोक, सरकार वगैरे लोक काहीतरी करतील असंही त्याला वाटत नाही... आणि असं पाऊल एकटादुकटा माणूस उचलत नसून साथीच्या रोगासारखं हजारो माणसं उचलत आहेत तेव्हा कोणती संस्कृती इथं अभिप्रेत आहे?

    भीषण वगैरे म्हणाल तर एका माणसाने स्वत:चाच जीव घेणं यापेक्षा भीषण काय आहे?

    ReplyDelete
  16. abhijeet, sundar lihila.n aahes. nilesh cha blog pan vachala...

    ReplyDelete
  17. bhau....tumhi baryach lokanna mazya blog vachayla udyukta kelyabaddhal thanks.....tuza lekh saahi utaralay...especially mala khaas avadla te mhanaje vichar tasechya tase mandanyachi hatoti....far kami loka vichar kartat tase lihu shaktat....good on you....ha tuza ekach post me vachalay.....akkha blog vachun zala ki parat lihin...

    Yogesh - Tuza mhanna patatay. maza rokh tyanche problems mothe maharashtrache lahan asa navata...problems sagalikadech aahet......apan kiti responsive aahot tya problems na? maza nehami asach hota......problem janavato...sunna karato pan mag pushacya dancing with the stars ne sagla back to normal yeta...mazya lihinyacha rokh tyavar jasta hota..

    ReplyDelete
  18. निलेश, अरे त्यांचे प्रॉब्लेम्स लहान आपले मोठे असं म्हटलंच नाही मी.

    प्रॉब्लेम्स सगळीकडेच आहेत. आपल्याकडचे प्रॉब्लेम्स इतक्या प्रभावीपणे कोणी मांडत नाहीत.

    आणि आपण फार काही करु शकत नाही याचा ह्ताशपणा तुला जसा वाटतो तसाच मला वाटतो.

    अभिजितभाऊ, तुमच्या ब्लॉगवरची बरीच जागा खाल्ली आहे :)

    ReplyDelete
  19. Bathesaheb,

    asha bhutana kadhimadhi ikdehi pitala, tevdhach aapla virangula ya thaklya (and eligible) jeevala. :-)

    ReplyDelete
  20. Aprtim lekh...!
    sahaj ani sundar...parat parat wachala...khup goshti jawalchya watlaya....ani'rehman'...shyaa,...yachi pratyek tune wed lawte...!!!

    ReplyDelete
  21. Tu ka mhanun itak changal lihitos?

    ReplyDelete
  22. मेघना - कमॉन यार - हे अतीच झालं....
    मला आता (ऑफिस मध्ये असल्याने) टेबलाखाली जाऊन बसावंसं वाटतंय!
    इनफॅक्ट मी हे पोस्ट लिहिल्यानंतर आज पहिल्यांदाच परत जाऊन वाचलं आणि वाटलं मी काय पकाऊ - एखादा निबंध लिहिल्यासारखा - लिहितो....

    या ’कौतुकावरुन’ आठवलं -
    काल (ऑथेन्टिक इटालियन) स्पॅघेटी आणि (ऑथेन्टिक गावरान) वांग्याचं भरित बनवत असताना बीअर पीत सुनीता देशपांडेंचं आरती प्रभुंच्या कवितांचं काव्यवाचन ऐकत होतो (सुख म्हणजे आणखी काय असतं?). त्यात त्यांनी आरती प्रभुंच्या नावाच्या जन्माची एक अल्टिमेट गोष्ट सांगितली.
    त्याबद्दल नंतर कधीतरी, पण ते आणि त्यानंतर ’सत्यकथे’त मिळणारी प्रसिद्धी याने हा माणुस एवढा ओशाळला कि त्यांनी त्यावर ’ये रे घना, ये रे घना....’ ही कविता लिहिली!
    माझ्या अवकादीच्या माणसाने त्यावर ’ये रे ये रे पावसा....’ लिहिली असती! :))

    या दर्जात्मक फरकाने - तुझ्या कमेंटमुळे निर्विवाद गुदगुल्या झाल्या हे मान्य करुनही - ती कमेंट फारशी सीरियसली घ्यायची नाही हे लगेच ठरवुन टाकतो!

    ReplyDelete
  23. Ugach vinay wagaire dakhawanyachya bhanagadit padu nakos. :)
    Pan lihinyachya process'madhe tari ya asalya baherchya 'kautuka'cha wata shoonyach.
    'sanbhawya comments gelya zak marat, mala asach lihaychay, mi asach lhinar' ashich tuzi reaction asel. Please ashich rahu de.

    ReplyDelete
  24. You wrote this blog on Mar 30. Today is Apr 13 (Friday-13th!. What I am supposed to read in between?

    ReplyDelete
  25. Abhijit.
    Aapli kadachi olakh nasel. Pan internet var "olakh laagane" ha prakar tasa nasatoch muli.

    Tuza Bhutacha daav aavadala. Mhanaje agadi zapatnya saarakhach aahe aani mi dekhil to zapatalya saarakhach vaachala - agadi 3 vela.

    Sarvat aawadala mhanaje Gulzar la samajoon ghena "Nahi samazalaa tar avaghad aani samazala tar aanakhinach avaghad." Agadi kasa nirbhel satya aahe he.

    Aani ho, swatahasathi thoda vel kaadhoon Blog-at jaa. Mhanaje aamha phukatya lokancha vel jaato.

    Keep blogging.

    ReplyDelete
  26. lekh aavadala, mast jamalay.

    ReplyDelete
  27. छान लिहिलंय. सुरुवातीला वाटले एका टोकाकडून सुरूवात करून दुसरीकडेच गेला.
    पण नंतर वेळ देऊन नीट वाचले, तेव्हा कळले, मस्त वाटले.

    ते काय आहे नं......
    जाउ दे आता
    स्वतःबद्दल काय लिहिणार ;)

    (बाकी : आर्यभट्टा F११ च ना? मी F१० वाला :) )

    ReplyDelete