Tuesday, April 24, 2007

रिदम ऑफ लाईफ

मला लिहायचंय.
काय लिहायचंय माहितिए - पण बाहेर पडत नाही.
एक मैत्रीण म्हणते ’गोगोल’ बद्दल लिही.
दुसरी म्हणते ’रसना’ बद्दल.
तिसरा मित्र ’नाना’ च्या मागे लागलाय.
चौथ्याला म्हणालो - अरे पोस्ट म्हणजे काय उसाचं कांडं आहे कि घातलं चक्कीत नि काढला रस?
पाचवी म्हणे मी सुरुवात वाईट करतो -
(गॉड.....मला मैत्रिणी किती????)
अगस्त्य सेन आणि दादरु मागे लागलेत - लिही लिही म्हणुन.
लेस्टर बर्नहॅमने वीकेंड खाजवला!
पण -
रिदम पायजे.
लिहायला -
रिदम पायजे.
संथ तशी संथ आणि
द्रुत बडव द्रुत अशी -
रिदम पायजे.
मनात येईल तेव्हा -
रेंगाळली पाहिजे.
जिभेवर उतरली की -
चढली पाहिजे.
कानात पडली कि -
आठवली पाहिजे....
रिदम पाहिजे.

वाजव!

च्यायला टी.व्ही. समोर बसु.
नको - बेड बरा.
अगस्त्य सेन, मदना, बेडुक, साठे.
या....साठेचं काय करायचं?
जोम्पानाचं अरण्य, भिंती वरच्या पालींची पडझड, दिल्लीचा डिस्को आणि कोलकत्यातलं मॉस्को - पानावर कसं उतरायचं?
(रिदम रिदम.
रिदम रिदम....)

त्यापेक्षा बार बरा.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
मागचे तीन वर्ष गेलो नाहिये पण आता बार मध्ये जाऊ.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
बारटेंडरला सांगु - बाबा रे, मी ब्लॉग लिहितो.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
हल्ली मी लेखक झालोय.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
मला लिटरेचरचं नोबेल मिळणारे! (माहित्ये का?)
दारू वाढ!!
(आरकेस्ट्रा.....)

च्यायला हे अतीच.
मी असं काही लिहिलं तर लोकांना काय वाटेल?
काही झालं तरी माझ्या मागच्या पोस्टला २६ कि काय प्रतिक्रिया!!
(त्यातल्या दोन-चार माझ्याच!)
छानच!!!
लोकप्रसिद्धी साठी पर्सेंटेज लिहावं.
ऍश-अभीचं लग्न!
यावर आयोडेक्स, डिस्को पुढे अर्ध्या तासाचं भाषण ठोकलं - कि आपण त्यांचा विचार करणं कसं व्यर्थ आहे!
च्यायला भरकटलो -
विषय - रिदम.
बाबा - रिदम!
अभ्या - रिदम!!
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)

बारमध्ये गेलो.
आयटम एकटीच बसलेली.
कि देसी होता कुणी?
एकटाच?
देशातल्या आयटमला दारुत बुडवणारा?
देसी कि आयटम?
आयटम कि देसी?
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)

नको - देसी बरा.
आयटम मागच्याच पोस्ट मध्ये झालिए.
उगीच लोकांचे गैरसमज होतात.

"हाय!"
"हाय."
"मी लेस्टर."
"मी दादरु."
"बसु इथे?"
"बस."
"काय पितोयस - बियर?"
"नाही - कैरीचं पन्हं! - सॉरी..... हो - बियर."
"कुठली?"
"काय फरक पडतो?"
"खरंय."
तेवढ्यात टेबल पुसत ’बारक्या’ मख्ख चेहऱ्याने समोर उभा.
"काय ऑर्डर साहेब?"
"मी ३ वर्षांनी कुठल्या बारमध्ये आलोय. इथे काय मिळतं?"
"सादा डोसा मैसुर डोसा मेदु वडा बटाट वडा वडा सांबार पुरी भाजी सामोसा कचोरी इडली चटनी इडली सांबार काय पायजे बोला साहेब टाईम नाय साहेब!"
"भोसडीच्या..."
"सॉरी साहेब - हा दादरु इथे दुपारपासुन लावत बसलाय. त्याला वाढता वाढता मी पण सारकॅस्टिक झालो....बोला काय आणु?"
"हा घेतोय ते मलाही आण."
"सॅम ऍडम्स - राईट ऑन सर्री!"
"तर दादरु -
साला काहीही म्हण पण तुझं नाव अजब आहे! काय करतोस?"
"काही नाही."
"म्हणजे? आय ऍम सॉरी - आय डोन्ट वॉन्ट टु इनट्रुड इन युअर पर्सनल लाईफ, पण इथे अमेरिकेत राहुन काहीच न करणं म्हणजे....."
"अनिल बर्वे - नाव ऐकलंयस?"
"हो....’थॅन्क यु मि. ग्लॅड’ - राईट?"
"तेच. त्यांची एक गोष्ट आहे.
गोष्ट अशी -
तो.....बी. टेक. होता.
तो ऍश ट्रे पास कर इकडे.
थॅंक्स!
तर -
तो बी. टेक. होता.
३० वर्षांचा होता.
अलिकडेच मुर्त्या कोरायला लागला होता.
दिवसभर फॅक्टरीत काम करायचा आणि रात्री घरी येऊन टकटक मुर्त्या कोरायचा.
हे आयुष्यात इतक्या उशिरा कसं सुचलं - आता किती काम होणार हातुन - असा वैतागायचा आणि मुर्त्या कोरायचा."
"आठवली! मग तो शेजारी वगैरे...."
"हां. तीच."
"तिचं काय पण?"
"काही नाही - अशीच आठवली. तो मुर्त्या करायचा. मी लिहितो."
"वॉव! तुम्ही लेखक लोक म्हणजे भाई!!"
"चुना लावायचा तर ती आयटम पलिकडे बसलिए. तिथे. इथे नाही."
"सॉरी. तसं नाही, असंच म्हटलं. काय लिहितोयस सद्ध्या?"
"एका बेडकाबद्दल लिहितोय!"
"व्हॉ....आय ऍम सॉरी - डिड यु जस्ट से ’बेडुक’?"
"हो बेडुक.
दचकायला काय झालं?
दादरु ऍक्चुअली एका बेडकाचं नाव.
म्हणुन माझं.
म्हणजे - तात्पुरतं."
"मग तुझं खरं नाव काय?"
"हरिश पंड्या."
"ओह! ओ.के.!"
"रे पांडु - पकवु नको! माझं खरं नाव काय त्याने काय फरक पडतो?"
"वेल - व्हॉटेव्हर....बेडकाबद्दल सांगत होतास....."
(बेडुक बेडुक
डराव डराव
ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
"तर दादरु ऍक्चुअली एका बेडकाचं नाव.
म्हणजे सायंटिफिक नाव वगैरे नाही.
तर हिरव्या पिवळ्या शेवाळल्या गुळगुळीत कातडीच्या या लठ्ठ प्राण्याला अगस्त्य सेन ने ठेवलेलं नाव.
बारक्या - आणखी एक.
तु घेणार?
टरफलं खाली टाक.
चालतं इथे.
नको - मला नको.
बियर बरोबर शेंगदाणे खाल्ले कि माझं डोकं दुखतं.
तर अगस्त्य सेन - आय.ए.एस.
असिस्टंट कलेक्टर (इन ट्रेनिंग), मदना.
अगस्त्य सेन - एक कंटाळलेला माणुस.
अगस्त्य सेन - सॉरी - ऑगस्ट.
इंग्लिश ऑगस्ट - मित्रांसाठी.
मित्र म्हणजे - असे जन्मजन्मांतरीचे वगैरे नाही, पण मित्र.
म्हणजे यु नो - शाळा, कॉलेजात एकत्र असणारे, सोबत काम करणारे, दारु पिणारे, सुट्टा मारणारे.
मित्र.
आपल्यासारखे.
भेटुन न भेटलेले.
मित्र.
तर ऑगस्ट -
ऑगस्ट ला कंटाळा आलाय.
पण नक्की कशाचा कंटाळा आलाय हे त्याला कळत नाहिये.
मदना, जॉब, उकाडा, डास, कुमार, श्रीवास्तव, साठे, जोशी, दारू -
माहित नाही.
त्याचा प्रॉब्लेम असा कि - जे आहे ते नको असं नाही पण नक्की काय हवंय हे ही कळत नाही.
हे दादरु ला कळतंय.
म्हणुन ऑगस्टने दादरुला पाळलंय.
किंवा दादरुने ऑगस्टला.
किंवा दोघांनीही एकमेकांना.
किंवा....डिपेंड्स.
कुणी कुणाला पाळलंय याचा निर्णय घ्यायचाही ऑगस्ट (आणि दादरु) ला कंटाळा आलाय.
दोघही एकमेकांच्या आणि आपापल्या अस्तित्वाचा अर्थ वगैरे शोधताहेत.
दोघांनाही एकमेकांचा हेवा वाटतोय.
म्हणजे ऑगस्टला दादरुचा वाटतोय हे नक्की कारण तसं पुस्तकात लिहिलंय.
दादरुलाही ऑगस्टचा वाटतोय हे आपलं माझं मत."
"इंग्लिश ऑगस्ट. उपमन्यु चॅटर्जी! राइट?
डॉन!! ऑगस्ट आणि त्याचा जीवघेणा नाही पण जीव खाणारा आयडेन्टिटी क्रायसिस....भारी! हे माझ्यासारखं झालं!!"
"म्हणजे?"
"म्हणजे मी लेस्टर - म्हणजे खरा नाही, पण लेस्टर.
’अमेरिकन ब्युटी’ चा.
परफेक्ट जॉब, परफेक्ट बायको, परफेक्ट घर.
आणि आयुष्यातला कंटाळा.
आयुष्य हातातुन निसटत चाललंय.
म्हणजे काय?
तर माहित नाय.
पण माझ्याकडे बेडुक नाही.
म्हणुन मग मी स्वत:लाच पाळतोय!"
"आणि हे काय मग? बारमध्ये येऊन स्वत: पाळलेल्या स्वत:चे लाड?"
"हो! ते आणि म्हटलं बघु आज बारमध्ये कुणी बेडुक भेटतोय का?"
"हा हा - व्हेरी फनी!
लकी आहेस. मी भेटलो. कुणी बेडकीण भेटली असती तर तुला हळवी दु:ख वगैरे राडा ऐकत बसायला लागला असता."
"दु:ख वरुन आठवलं - परवा गुलजारची कुठलीशी कॅसेट ऐकत होतो. तो म्हणे -
एक दिन जिंदगीके रुबरू आ बैठे.
जिंदगीने कहा - गम क्या है आखिर?
क्यु होता है?
कहा होता है ये भी तो....
हसायला काय झालं?"
"सॉरी - तु ’गम क्या है’ म्हणालास आणि मी ’काम क्या है’ ऐकलं!"
"च्यायला तु पण!
हे भारी पण - जिंदगी आपल्याला विचारणार -
काम क्या है आखिर?
क्यु होता है?
कहा होता है ये भी तो पता नही चलता....
मुझसे नाराज न रहा करो.
आखिर मै तुम्हारी जुडवा हु...."
"झाट जुडवा!
च्यामायला तो गुलजार आणि त्याची ती जिंदगी.
राखी त्याला सोडुन गेली त्याचं त्याने एवढं भांडवल केलं कि त्यावर अजुन कविता पाडतोय तो. म्हणे ’तेरे मासूम सवालोंसे हैरान हु मै’....
च्यायला यांची जिंदगी बरी यांना मासूम वगैरे सवाल विचारते.
च्यायला आपण कुणाचं घोडं मारलंय म्हणुन आपल्याला असे - असे - काय म्हणतात असल्या प्रश्नांना?"
"बोअर?"
"हजाम शब्द आहे - बोअर!
पण दुसरा शब्दही सुचत नाहिए.
म्हणुन बोअरच.
आपल्यालाच बरे असे बोअर प्रश्न पडतात!"
"काय प्रश्न पडलाय तुला?"
"आय डोन्ट नो! पण बोअर झालंय. तुला नाही झालं?"
"झालंय. पान त्याआधी एक गोष्ट - तुला जरा ऑकवर्ड नाही वाटत? आय मीन....तुला असं नाही वाटत का कि बारमध्ये, ते पण पर्टिक्युलर्ली अमेरिकेतल्या बार मध्ये दोन पुरुष एकत्र गप्पा मारत बसले कि - पुरुष सोड स्त्रीया पण - लोक संशयाने बघायला लागतात?"
"दुनिया गई तेल लेने - इथे आधीच जिंदगी बोअर मारतिए, कुठं दुनियेचा विचार करतो....
हे बघ तो बबन बसलाय पलिकडे - त्याला विचारतो.
का रे बबन्या - तुला काही प्रॉब्लेम आम्ही इथे गप्पा मारतोय तर?"
"च्यायला हजाम आहेस तु. त्याचा चेहरा पाह्यलास? कसला कन्फ्युज झालेला? एकतर तु त्याला मराठीत विचारलं - तुला काही प्रॉब्लेम आहे का म्हणुन!"
"तोच तर पॉइंट आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे हे बघ. ’इंग्लिश ऑगस्ट’ मधला बेडुक आणि ’अमेरिकन ब्युटी’ मधला लेस्टर बर्नहॅम जर एकमेकांना भेटले तर कुठल्या भाषेत बोलतील?"
"आय डोन्ट नो! बेडुक भाषेत?"
"बेडुक भाषेत किंवा पाली, स्वाहिली, हिब्रु किंवा अगदीच नडले तर जावा किंवा तत्सम कोड मध्ये. त्या बबन्याला हे सगळंच फ्रेंच. मग मराठी काय किंवा इंग्लिश काय, माणुस काय किंवा बेडुक काय - काय फरक पडतो?"
"खरंय!"
"तर - तुला नाही बोअर झालं? वेट अ मिनिट. तुलाही बोअर झालंय. तु तुझ्या जॉबला, लाईफला पकलायस. तुझ्या पोरीच्या मैत्रिणीवर लाईन मारतोयस....
च्यायला हजाम आहेस.
पोरीची मैत्रीण काय?
तुला लाईन मरायला कुणी समवयस्क किंवा गेला बाजार कुणी अनोळखी पोरगी नाही भेटली?"
"आणि तुला बेडका व्यतिरिक्त कुणी दुसरा प्राणी नाही मिळाला पाळायला? यु नो - अ रेग्युलर वन - म्हणजे कुत्रा, मांजर, पोपट, ससा, कासव?"
"ससा कासवा वरुन आठवण झाली - परवा ’कथा’ पाह्यला - बऱ्याच वर्षांनी. मी जेव्हा जेव्हा ’कथा’ पाहतो किंवा आठवतो तेव्हा मला अभ्या बरोबर त्यावर केलेलं डिस्कशन आठवतं. ते आणि दीना पाठकचा प्रश्न - शेवटी कासव जिंकलं....पर ये भी कोई जीत हुई?....
सॉरी तुला परत परत थांबवतोय. तु तुझ्या बोरियत बद्दल सांगत होतास...."
"दॅट्स ओ.के.
तु जसं म्हणालास कि ऑगस्टला प्रश्न पडलाय - जे आहे ते नको असं नाही पण काय हवंय ते कळत का नाही?
माझ्या मते तो प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो.
तु काय, मी काय, दादरु काय, लेस्टर काय, हा बारक्या, तो बबन, ती आयटम - हा प्रश्न प्रत्येकालाच असतो.
प्रत्येक जणच कमीअधिक प्रमाणात हा प्रश्न टाळत असतो.
मला आधी - म्हणजे ’अमेरिकन ब्युटी’ पाह्यला तेव्हा - वाटायचं कि हा ’मिड-लाईफ क्रायसिस’ असतो. तो ’मिड-लाईफ’ मध्ये येतो. २८ म्हणजे मी लेस्टरपेक्षा य तरुण आहे. पण....मे बि नॉट."
"उपाय काय मग?"
"माहित नाही. लेस्टरने आयुष्य बदलायचं ठरवलं. म्हणजे आहे तिथे राहुन बदलायचं."
"आणि ऑगस्ट ने सबॅटिकल घेतली. अ इयर ऑर टु ऑफ - टु डिस्कव्हर हिमसेल्फ...."
"च्यायला या ऑगस्टच्या - तुला सांगतो - हा प्राणी दोन वर्ष टाईम-पास करुन परत येईल, आणि येईल तेव्हाही तो एवढाच कन्फ्युज्ड असेल...."
"दॅट्स पॉसिबल."
"तुला काय वाटतं - काय उपाय असेल?"
"उपाय....उपाय सांगणं अवघड आहे.
प्रत्येकानेच तो शोधायचा.
किंवा जिंदगीच्या रुबरू आल्यावर तिलाच विचारायचा.
पण भेंडी तिच्यायची ती पण काही सांगत नाही. नुस्तीच आपली ’मी तुझी जुडवा, मी तुझी जुडवा’ गात बसते.
तु कधी विचार केलायस? कि लेस्टर नक्की कधी बोअर झाला?
आय मीन - असं कधीच होत नाही कि सगळं कसं छान छान चाललय आणि आपण उठुन बसतो किंवा फॉर दॅट मॅटर आंघोळ करुन बाहेर येतो किंवा एखादं पुस्तक संपवतो आणि आपल्याला उजाडतं कि हार जीत राहिली दूर - आयुष्याची टेस्ट मॅच रटाळ ड्रॉ होतिए....."
"क्रिकेटच्या उपमा देऊ नको. नाहीतर चॅपेलची आई माई निघेल."
"चल नाही देत. पण लेस्टरला नक्की कळतं कधी कि जे आहे ते बदलायला पाहिजे? कि उगीच आपलं पिक्चरमध्ये दाखवायचं म्हणुन - एक बार जिंदगीके रुबरू आ बैठे - तगडक तगडक तगडक तगडक, टॅणॅ टिणी... - भाईसाब बेहेनजी, गुलजारकी दर्दभरी आवाज मे सुनिये - ’गम क्या है’ - जी नही ये फेविकॉल कि ऍड नही - ये है जिंदगीका मासूम सवाल....संगीत दिया है आर.डी. बर्मन ने, और फिल्म है ’आंधी’.....जी नही भाईयो - अंधी नही....ऑंधी...."
"और आप सुन रहे है फौजी भाईयोंका रंगारंग कार्यक्रम ’दादरुकी हवेली’.....
च्यायला पकवु नको.
उपाया बद्दल सांगत होतास."
"हो. तेच. उपायाबद्दलच सांगत होतो. म्हणजे पिक्चर आहे म्हणुन काहीही दाखवायचं. म्हणजे हा पट्ठ्या नोकरी बिकरी सोडुन भजी तळायला लागणार. याची पोरगी पळुन जाणार. बायको किडे करुन याची कन्फ्युजन्स मिटवणार. शेवटी याला स्वप्नातली पोरगी वगैरे मिळणार आणि ’सोडवायला प्रश्नच उरला नाही - आता काय करायचं’ अशी भिती वाटुन डायरेक्टर याला मारुन टाकणार....
च्यायला आमचा डायरेक्टर रुबरू सोड - ओळख दाखवायला तयार नाही...."
"च्यायला मगासपास्नं बघतोय - तुझं आपलं रुबरू रुबरू चाललंय. उपाय माहित नाही, पण मला आणखी एक प्रश्न म्हणजे - जगात एवढी लोकं आहेत, आणि हा प्रश्न जर सगळ्यांनाच पडतो तर यावर कुणी ’प्रश्न-उत्तर रुपावली’ का नाही लिहित? त्या रुबरू वाल्या गुलजारने काय केलं?
कधी कधी मला वाटतं कि राखीने त्याला सोडुन जायचं त्याने भांडवल नाही केलं.
तो एकच प्रश्न, एकच आठवण उगाळत बसला. दु:खात स्वत:ला कोंडुन घेतलं.
शोधत शोधत कधी जिंदगी आली कि - घे पेन, पाड कविता - केलं.
कंटाळुन मग जिंदगी निघुन गेल्यावर उगीच निरर्थक तिची शोधाशोध केली...."
"म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं.....किंवा स्वत:च्या शेपटीचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यासारखं!"
"भंकस उपमा नको देऊ.
च्यायला आवडली तर आणखी घोळ व्हायचा.
म्हणजे पुढच्या वीकेंडला आपण परत याच बार मध्ये. मी कुत्रा आणि -"
"मी शेपुट!"
"हो ना!"
"पण तुला असं नाही वाटत - लेस्टर जन्मत: दु:खी नव्हता. इनफॅक्ट तो आणि त्याची बायको - दोघेही.
मी ही ऑगस्ट बद्दल विचार करतो - या प्राण्याकडेही चांगल्या आठवणी आहेत. याच्याकडेही कर्तृत्व आहे. उगीच कुणी मटके मारुन आ.ए.एस. होत नाही. मग आता काय झालंय?"
"आता सुख झालंय.
नव्हतं तेव्हा मिळवायची आस होती.
शिक्षण, घर, गाडी, सुख.
पाठलाग चालु होता तेव्हा तो उपभोगायची उसंत नव्हती.
आता उसंत आहे तर सुख बोचायला लागलंय.
कदाचित त्या गुलजारचं असंच काही झालं असेल. यश, सुख, कौतुक, प्रसिद्धी इतकी झाली असेल कि त्याने आयुष्यभर पुरेल एवढं दु:ख निर्माण केलं. अजुन दळतोय...."
"मग दु:ख निर्माण करणं हा उपाय होऊ शकतो का - क्रायसिस वर?"
"आय डोन्ट थिंक सो.
मला वाटतं तो रड्या उपाय झाला.
झगडणं आणि नुसतंच झगडणं नाही तर झगडुन मिळवणं....त्या मिळवण्याच्या गार गार अनुभवाचा झणझणीत साईड एफेक्ट असा कि सशाला कासवाची जरब!"
"यु मीन स्पर्धा!"
"नाही स्पर्धा नाही आणि स्वत:च्या शेपटीचा पाठलागही नाही.
अभ्या म्हणतो तसं आता पुन्हा सिंदबाद सारखी शिडं उभारायची आणि शस्त्र पारजायची सुरुवात करायला हवी."
"अरे प्राण्या, पण तोच तर प्रश्न नाही का - लेस्टर आणि ऑगस्ट - दोघांनाही?
शिडं उभारणं आणि शस्त्र उगारणं ठीक आहे, पण जायचं कुठे आणि मारायचं कुणाला?"
"कुणाला म्हणजे? प्रॉब्लेमला!
ऍटॅक द प्रॉब्लेम.
हाण तिच्या मायला..."
"लेस्टर - यासाठी रेग्युलर बार मध्ये यावं.
३ वर्षांनी आलायस आणि तुला जास्त झालिए."
"दादरु - पकवु नको. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. यालाही असेल."
"हा शोध ’गुगल’ वर लावलास?"
"तसं नाही पण काय करायचं?"
"आय डोन्ट नो - मे बि वाट बघायची.
मी बघतोय.
ऑगस्ट परत यायची.
त्याच्या सबॅटिकल हुन.
मे बि तुला वाटतंय कि तो परत येईल तेव्हाही एवढाच कन्फ्युज्ड असेल.
मे बि.
मे बि नॉट!
होप फ्लोट्स मॅन...."
"होप फ्लोट होतो कि नाही माहिती नाही. पण आता मी फ्लोट व्हायला लागलोय. च्यायला झक मारली आणि तुझ्या सोबत बसलो."
"नाहीतर काय आयटम बरोबर बसुन रेहमान आळवला असतास?"
"मे बि!
मे बि नॉट!!
च्यायला - तु पण!!!
जाऊ दे घरी पळतो.
आणखी थांबलो तर मला घरी जाऊन उठाबशा काढाव्या लागतील!
पन बाय द वे - लेस्टरला तर पिक्चरमध्ये संपवला.
तो संपला नसता तर त्याचं काय झालं असतं?"
"तर पिक्चर लांबला असता!"
"कमॉन - सिरियसली!"
"टेल यु व्हॉट - रियल लाईफ लेस्टर संपला नसता.
इन फॅक्ट रियल लाईफ लेस्टर ने असे रॅडिकल डिसिजन्स ही घेतले नसते.
भजी तळणे ही इतिश्री नव्हे!
मे बि त्याने जॉब बदलला असता. मुलीशी नातं सुधारायचा प्रयत्न केला असता. सुट्टा मारला असता. स्वत:ला इम्प्रेस करायला जिम लावला असता. निर्हेतुक मनोरंजनासाठी अहिंसक मार्ग शोधले असते.
आय डोन्ट नो मॅन....
अशा क्रायसिस मध्येच मोठे लोक मोठे होतात का?
आणि मग स्वत:च्या लहान पोरांना सांगतात का कि - तुला काय माहित तुझा बाप काय चीज होती?
लाईफ हॅपन्स म्हणतात लोक. हे होणं, यातुन तरणं म्हणजे लाईफ हॅपन्स का?
यातुन तरणं म्हणजे काय?
आख्खं जग यातुन जातं तर कुणी यावर बोलत का नाही?
कि पराभुताला मत नसतं म्हणुन सगळेच गप्प?
आय मीन - फाईन.
आपापले मार्ग शोधत आपण यातुन सुलाखुन वगैरे निघु.
निघाल्यावर कदाचित बरंही वाटेल.
च्यामायला पण मग आपलीच स्टोरी दीना पाठक कुणाला तरी सांगत बसेल - आखिर जीत कछुएकी हुई. मगर ये भी कोई जीत हुई?
पण मग ससा तरी जिंकला का?
पण कुणीतरी जिंकलंच असणार!
सगळेच कसे काय हरणार?"

निघतो निघतो करत रात्री उशिरापर्यंत लेस्टर आणि दादरु गप्पा मारत बसले.
दोघांनीही आपापल्या विजय-पराभवाच्या कन्सेप्ट्स एकमेकांना ऐकवल्या.
हायपोथेटिकल प्रश्नांवरच्या हायपोथेटिकल उत्तरांवर चर्चा केली.
पुन्हा भेटुयात म्हणत एकमेकांची नावं विचारायला विसरुन गेले.
तो बारही नंतर बंद पडला.
दोघांनीही गावं बदलली.
दोघांनीही आपापल्या प्रश्नांकडे कानाडोळा करत दुसऱ्याने त्याच्या प्रश्नावर काय केलं असेल याचे आडाखे बांधले.
दोघंही (एकेकटे) जेव्हा विचार करतात तेव्हा दोघांनाही एकमेकांची आठवण येते.
दोघांनाही दिवसांच्या, तासांच्या, डेडलाईन्स च्या रुटीन मधुन छोटे-छोटे ’रुबरू’ प्रश्न विचारायला आणि सोडवायला वेळ मिळाला नाही.
दोघंही तो ’मिड-लाईफ’ क्रायसिस येईल तेव्हा पाहु म्हणत त्याची वाट पहात राहिले.
तो आलाच नाही.
किंवा तो आला पण त्यांना कळलाच नाही.
दोघंही त्यातुन तरले आणि उरले.

हल्ली दोघांनाही स्वतंत्रपणे दीना पाठकची भिती वाटते.
आणि गुलजार त्यांना हसत बसलाय.

20 comments:

  1. मी वाचायला लागले आणि २५-३० ओळीनंतर माझा संय़म संपला.:-) मग सोडून दिलं, मस्त जेवण केलं आणि परत वाचायला लागले. आता उगाचच बारमध्ये बसलेल्या लेस्टरमध्ये मी दिसतेय...बहुतेक....डोन्ट नो... :-) I had a impression as if there is no sense in the post, but then at the end it does make all the sense and yes it does not answer for the question even I am having.:-)

    "आता सुख झालंय.
    नव्हतं तेव्हा मिळवायची आस होती.
    शिक्षण, घर, गाडी, सुख.
    पाठलाग चालु होता तेव्हा तो उपभोगायची उसंत नव्हती.आता उसंत आहे तर सुख बोचायला लागलंय.
    मग दु:ख निर्माण करणं हा उपाय होऊ शकतो का - क्रायसिस वर?
    आय डोन्ट थिंक सो.

    Even I dont think so, then what is the answer?

    पुन्हा सिंदबाद सारखी शिडं उभारायची आणि शस्त्र पारजायची सुरुवात करायला हवी."
    "अरे प्राण्या, पण तोच तर प्रश्न नाही का - लेस्टर आणि ऑगस्ट - दोघांनाही?
    शिडं उभारणं आणि शस्त्र उगारणं ठीक आहे, पण जायचं कुठे आणि मारायचं कुणाला?"

    Problem ला मारायचं? पण बरेचदा प्रोब्लेम काय हेच तर कळत नाहि, मग उगाचच एकातून सुटका करण्य़ासाठी दुसऱ्यात अडकून जायचं? पण तिथेही चार दिवस झाले हा Problem डोके वर काढतोच.

    "आय डोन्ट नो - मे बि वाट बघायची.
    मी बघतोय.
    ऑगस्ट परत यायची.
    त्याच्या सबॅटिकल हुन.
    मे बि तुला वाटतंय कि तो परत येईल तेव्हाही एवढाच कन्फ्युज्ड असेल.
    मे बि.
    मे बि नॉट!"

    मलाही असंच वाटतं, he will still be confused even after 2 yrs.Anyway, may be we'll pass this phase as well and not know.May be...... :-(

    Btw, did i say Nice post ! Again !
    :-)
    -Vidya.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Hey Abhi,

    Jyala comment dilyashivay swastha bastach yet nahi asa post ahe.
    Tyamule Roman marathi madhe tasech dadpoon lihinar ahe.
    I feel this is your first post which is really creative.
    Mhanje bakiche creative navte ase nahi pan swatala poorna pane ghusaloon kadhlela ha pahilach.

    Baryach vela asa hota ki kay lihaycha te mahit ahe pan kasha baddal te mahit nahi ..ani lihavasa tar vattay..ani mag nakalat khapli udte ani jeevghene ase kahitari baher padta..Tasa jhalay...
    He baher padlela kahitari thoda olkhicha asta tar thoda anolkhi..

    Correct me if I am wrong...

    Tujhe post jabardast awdaycha karan mhanje Flow that u maintain ani dusra mhanje lihitanacha pramanikpana...Hats Off...
    Ya madhe jarasudha mitra mhanun stuti nahiye...

    Ata tujhya post chya vishayabaddal..

    Ata me jara Guess marto..

    Shikhan.. Nokri.. Ghar.. Gadi.. Paisa.. Byko... ithe kahi jan Hushha kartat...
    tar kahi jan jhala.. ata pudhe kay asa vichartat..

    Kahi janancha paper hoto lawkar sodvun ani mag bakichya saglya vargala paper lihitana baghtana lay bore hota...

    Jagnyat sangharsha nahi...
    sangharsha shivay natya nahi..
    Ani natyashivay karmanook nahi..

    Ashakya Kantala + ya Vaitag = Bore?

    Identity crisis + Existentialism = Alber Camu cha Outsider..
    Tar prashna tevdha gambhirhi nahi...

    Match draw jhalyacha dukha nahi pan Draw hot alyacha feel vait...

    Apan nuste Khalashi nahi ani Sindbad hi nahi..

    Post cha end chhan pan samantar cinemachya end sarkha vatto...

    Majhi ek maitrin kavitechya shewti nehmi prashna chinha thevaychi..
    Post chya shewti thevla tar kay bighadta...

    Prashna asla ki kahitri ardhavat ahe asa ka vatava?

    Rather nuste prashna astitvat asu shaktat..
    Rather majha asa mhanna ahe ki Prashna ani Uttar swatantra pane astitvat asuch shaktat nave astat..
    Apan ugich tyanchi sangad ghalnyacha prayatna karto.
    Aplyala shalet ashahi kahi bhukkad goshti shikavlya jatat mhanun...
    e.g. Prashna: Tujha Nao kay?
    Uttar : Majha nao Rahul.

    He donhi vegla kela tari tyala tyacha swatantra artha ahech..
    Tujha nao kay ha prashna uttarashivay hi astitvat asu shakto..Ani ..Majha nao rahul he goshta kontyahi prashanvina hi astitvat asu shakte..
    Fakta aplyalach donhi chi link lavlyashivay chain padat nahi..
    Ani apan tya donhi goshtina chota karun takto..pangla karun takto...
    He theory patli ka?

    Ani shewti virangula mhanun kinva Unavoidable mhanun mhana..koni konala palaycha ha prashan yeto teva Kahi jan Prashna paltat Tar kahi jan Uttara...

    Asha tarhene satha uttarachi kahani pacha uttari sufal sampoorna?????

    ReplyDelete
  4. whenever i read any of your posts, i feel exhausted at the end of it. i am forced to think; i feel challenged, exhilarated, let down, motivated - basically, khup jaasti chid-chid hote swat:chi.

    'english august' mee vaachla naahiye. 'american beauty' pan naahi paahila aahe.
    but the way, u have juxtaposed the 2 central characters in a bar - hats off to you. and then thrown in gulzar to make matters worse(?) or actually better.

    all said n done, sukh tochta hech khara aahe. even i wonder at times, having achieved/almost achieved so much, why do i feel unhappy at times? do i really keep searching for misery? maybe not, maybe yes.

    have u seen 'good will hunting'? have u listened to 'do u miss me, miss misery?' i am sure u must have. i was reminded of this song while i was reading your post.

    one thing i know for sure is its a good sign tht i remain restless. the challenge is in channelising that restlessness into something productive, something i should feel good about.

    you do a wonderful job in channelising that restlessness of yours in writing this blog. in a way, there is a beautiful rhythm in that restless chaos of yours. good for you! and even better for us who read this blog and can identify themselves with what you write.

    keep writing.
    ~ketan

    ReplyDelete
  5. I dont know mama what to say!

    As some people here in the comments say:

    there definitely is rhythm in the post;

    it shows the restlessness;

    it shows your creativity;

    it gives an insight into your mind;

    and yet the ESSENCE of this blog is none of these things!

    I dont know what that essence is either.

    The true essence remains elusive.

    Like the questions and answers it talks about.

    Like the very opening of this post - malaa lihayachay. Kaay lihayachaya mahitiye pan baher padat nahiye.

    I'll take it a step further - baaher padla tari arth laagat nahiye.

    What this blog achieves, however, is capturing your state of mind as it was when you were writing this blog.

    It does make a good reading for everyone.

    However, the real value of this post is that a few years down the line you will read this post and it will be able to RECREATE the entire feel of your life as you have it today.

    THAT's AMAZING.

    The real value of this post is for your children. When they get older and feel confused about their father - What kind of a man my father is?

    Reading this blog will show them many facets of your personality that they FELT through their life but could never put their fingers to where they could say - THIS IS IT. THIS IS MY FATHER.

    And that gives me the answer about what this blog captures - this blog RECREATES mama bathe as he was on the day he wrote it.

    Baba.

    ReplyDelete
  6. भाऊ...
    जिवन एवढेही भकास होईल ही कल्पना नाही करवत. कदाचीत मी या कल्पनेसाठी बराच लहान आहे. पण असो ... तुमची लेखनशैली आवडली. आणि माझ्या ब्लोग साठी वापरायची इच्छा आहे. साहित्यचौर्य वगैरे काहीसे वाटू लागले म्हणुन परवानगी साठी हा comment टाकतोय.

    ReplyDelete
  7. आग लागली आहे वाटते! झाले काय असे अचानक? पण जे काही झाले ते चांगलेच म्हणायचे. एकदम ढवळून काढलेला पोस्ट आहे. मंथन वगैरे चांगले शब्द पुन्हा कधीतरी.

    आग अशीच धुमसत राहु दे. नाहीतरी अशा गोष्टी आत दाबून ठेवणे चांगले नसते. :-)

    ReplyDelete
  8. वाईट मस्त लिहीलंयेस मामा! टू बॅड की मी इतक्या उशीरा हा पोस्ट वाचला. इन्ग्लिश ऑगस्ट नाही माहीत मला, पण अमेरिकन ब्युटी, सिंदबाद, गुलजार, आणि कथा चे संदर्भ 'शब्दश:' समजले! :-)

    राहूल म्हणतो तसं काहीजणांचं आयुष्य बेसिक अचीव्हमेण्ट्स पाशी येऊन रेंगाळतं, आणि काहींचं नवे प्रश्न निर्माण करून त्यांना सोडवायच्या मागे धावू लागतं. दुसऱ्या प्रकारचे सगळे सिंदबाद! ते हॉवर्ड सारखे एका ध्येयाला आयुष्य वाहून घेणाऱ्याइतके ग्रेट नाहीत, बाबाने माझ्या सिंदबादच्या पोस्ट ला कॉमेंटमधे लिहीलेल्या ट्रॉयच्या कथानायकासारखे 'हीरो' नाहीत. सिंदबाद म्हणजे अंगात असलेली तुफ़ान एनर्जी आणि साहस खर्च करत रहाणारे; आणि सुख+समाधानाला (आपल्या गावाकडच्या बाजारपेठेतल्या गुज्जू आणि मड्डू व्यापाऱ्यां-सावकारांप्रमाणे) गालांवर आणि ढेरीवर चरबीच्या रूपात ऍक्युम्युलेट होवू न देणारे. (म्हणून सिंदबाद हा हॉवर्ड आणि ऍचिलेस पेक्षा कमी ग्रेट असतो.)

    केतन म्हणतो तसे हे सिंदबाद यशाची एक पायरी चढल्यावर सुख आणि समाधान यांचा एक प्रदीर्घ श्वास घेतात, तिथे बसून घेत नाहीत. नवी पायरी शोधतात चढण्यासाठी!

    बाबा म्हणतो तसं फ़क्त हे पोस्टच नव्हे, तुझं आयुष्यही एक मोटिव्हेटिंग कादंबरी वाटली पाहिजे तुझ्या मुलांना. बोले तो, वो क्या बोलते है ना भाय - डिफ़िकल्ट मराठीमे - 'अभिमानास्पद'. हा, ऐसे कुछ करके दिखानेका. नाहीतर ते म्हणतील आमच्या बापात २८ व्या वयापर्यंतच 'आग' होती. आवडत नसलेल्या इंस्ट्रूत बीई करून धमक दाखवून सिव्हिलमध्ये जीआरई वर अमेरिकेत एमेस करून नोकरी मिळवली. विरोधांना न जुमानता आंतरभाषीय लव्हमॅरेज केलं. पण नंतर आमचा बाप एकदम विझला. पुढे नवीन काहीच नाही. मग तो पुढची ४० वर्शे त्याच अमेरिकेत तीच नोकरी करत करत आनंदाने म्हातारा झाला.

    don't worry! I was just trying to frighten & peTav you. ;-)

    (बाय-द-वे, 'तुझसे नाराज नही जिंदगी' हे 'मासूम' मधलं).

    And yes, a very good post!

    ReplyDelete
  9. I second Meghana,"बाप रे"..हा प्रकार काही ऑफीस मधे बसून वाचण्याचा नाही, मजकुरासाठी नाही रे पण झेपायच्या दॄष्टीने:). त्यामुळे घरी जाणार आणि शांत पणे वाचणार आणि परत (?) कॉमेंट टाकणार.
    तुला माहीतीय का, चित्र्यांच्या "एकूण कविता-१" च्या ब्लर्ब वर विंदांनी एक छान वाक्य टाकलय की त्याची कविता म्हणजे पंचमहाभुता पैकी एक भुत आहे. तुझा आजच ब्लॉग वाचुन तुला ही भुत घोषित कराव असं वाटायला लागलय (तसा ही तुझा भुतांवर "विशेष" लोभ आहेच म्हणा!)

    ReplyDelete
  10. हा मजकूर मी कितव्यांदा तरी वाचूनसुद्धा मला अजून त्याला नेमकी दाद व न्याय देणारं, समर्पक, साजेसं असं काही म्हणायला जमलेलंच नाहीय. अभिजीतच्याच भाषेत सांगायचं तर माझी ’य’ चिडचिड होते : ’का हा माणूस इतकं चांगलं लिहितो? याला काय अर्थ आहे? हे वाचून माझी लिहायची इच्छा मरते त्याचं काय? बरं, आपलं लिहिणं इतकंही काही महत्त्वाचं नाही, की त्यासाठी याचं वाचणं सोडून द्यावं...’ इ.
    तर संवेद, तुला मनासारखी कमेंट टाकायला जमली तर तुझं अभिनंदन.

    ReplyDelete
  11. Tomatto ketchup chyya add sarkhe mhanavese vatate: "Mama is different!!"

    ReplyDelete
  12. सुखाच्या एक टोकाला माणुस किंचीत घाबरतोच. भिती तिथून खाली घसरण्याची नसतेच rather ती असते पुढच्या अर्थशुन्यतेची. त्या टोकाला माणूस saturate तरी होतो किंवा अस्तित्व शोधाच्या तरी मागे लागतो. परत तोच सनातन प्रश्न "कोहम"..
    ज्याने त्याने करायचा हा शोध...तू सुरु केलास..मस्त वाटलं
    आणि हो, तुझा पक्का "कवी" झालाय रे बाबा..

    ReplyDelete
  13. दादानुं, लै दिस झाले तुम्मी पांढर्यावर काळं करुन..लिवा की काय तरी भलं
    तुम्च लिवणं म्हंज्जी रोज्च्या सवयीगत झालय बगा...वाच्ल नाय तर करमत नाय
    तर आता तुम्मी होवून जाउ द्या

    ReplyDelete
  14. Thanks for your comments Abhijit. Esp for the frank one. I love your blog, I wont take your comments negatively for sure(I got 'English August' from library after reading this post :-) still reading.. )

    About 'Inspection' even I felt that the story ended abruptly but it was tough to extend it without much of contents....or may be I was out of ideas. :-) Thanks for your comment again.
    And I do agree with Sanved, we are waiting for ur next post.
    -Vidya

    ReplyDelete
  15. 'रिदम' बद्दल -

    'फाइंडिंग फॉरेस्टर' मध्ये विलिअम फॉरेस्टर म्हणतो कि - 'डॅम इट, तुला जर 'मला ऍक्चुअली असं म्हणायचं होतं' असं म्हणावं लागत असेल तर तु पहिल्यांदा लिहितानाच तसं का म्हणाला नाहीस?'
    तर विलिअम फॉरेस्टरचा आव आणत मी ही म्हणतो कि 'मला ऍक्चुअली असं म्हणायचं होतं' असा या कमेंटचा उद्देश नाही.

    प्रतिक्रिया क्रमश: -

    विद्या - माझं कुठलंच पोस्ट 'सेन्सलेस' नसतं. कधी कधी लोकांना कळत नाही इतकंच. :) मला लिहायला आवडतं याचं कारण मला जे जसं वाटतं ते तसं लिहिता येतं. ते नेहमीच जमतं असंही नाही, पण नाही जमलं तर मी ते सहसा पोस्ट ही करत नाही. संदीपला एकदा 'स्वर टिपेचा आज वेचा....' चा अर्थ विचारला होता. तो त्याने सांगण्यापुर्वीच म्हटलं - छोड, मी लावतो अर्थ. तसं काहीसं. मी जे लिहिलंय ते तुला आवडलं, त्याने तुला विचारात पाडलं, कि ते तुझं होतं - मग त्याचं 'माझं' इंटरप्रिटेशन इम-मटेरिअल. (अर्थात ते स्वत:चं म्हणुन कुठे पोस्ट ही करु नकोस!) :))
    दुसरा प्रश्न - उपाय काय? तर ध्येय. जे प्रत्येकाकडेच असतं आणि ज्याचा प्रत्येकालाच कुठेतरी विसर पडतो. जसा लेस्टर आणि ऑगस्टला पडलाय. ते नियमीत आठवता आलं तर माणुस रॉर्क होतो. नाहीतर कीटिंग! (संदर्भ - द फाऊंटनहेड).
    म्हणजे ते आठवता, जगता आलं तर - तुम्ही आयुष्य जगता. विसरलात किंवा जगता नाही आलं तर - आयुष्य तुम्हाला जगवतं!....असं काहीतरी.

    राहुल - खरंय. मलाही हे पोस्ट सगळ्यात जास्त आवडलं. 'इंग्लिश ऑगस्ट' वाचलेलं, आणि त्यावर लिहिण्याच्या विचारात असताना 'अमेरिकन ब्युटी' पाह्यला. लेस्टर, ऑगस्ट आणि मी (अमेरिकन, इंग्लिश आणि इंडियन?) असा त्रिकोण झाला आणि त्यातले दोन कोन काढुन टाकणं आवश्यक झालं! :)
    उगीच पुस्तक अथवा चित्रपट परिक्षण लिहुन स्वत:ला (आणि जनतेला) पकवण्यात काही पॉइंट नव्हता. 'एक्झॅक्ट्ली हेच वाटतंय' असं होऊनही लेस्टर आणि ऑगस्ट एकमेकांना भेटत नव्हते. विचार करकरुन आठवड्याचा आणि वीकेंडचा भुगा झाला आणि रविवारी रात्री साडेबाराला चुकुन हे दोघे बार मध्ये भेटले आणि कधी नव्हे ते माधुरीला ही मी 'बरं लिहिलंय' असं वाटलं! :))
    तु जसं म्हणतोस कि जे बाहेर पडतं ते थोडं ओळखीचं असतं थोडं अनोळखी - हे शब्दश: खरं आहे! म्हणजे - आय ऍम प्रिटी शुअर कि अनिल बर्वेंचं उदाहरण ऍक्चुअली दादरुला सुचलं! किंवा ते लेस्टरचं - 'बेडुक भाषा' पण! दॅट वॉज हिलेरियस! आणि हे शब्दच्छळ सोड - पण उत्तर माहिती असल्यावर सगळेच प्रश्न सोपे वाटतात. आपल्या आयुष्याचा आख्खा पिक्चर आपल्यालाच कुणी दाखवला तर त्यात काही एक्साईटिंग पण वाटणार नाही - शेवट सोड, पुढचा सीन शोधण्यात खरी गंमत. त्यात, आणि त्याचा गतआयुष्याशी बादरायण का होईना संबंध लावण्यात.
    बाकी - प्रश्नांच्या अपुर्णतेबद्दलचं तुझं ऑब्जर्व्हेशन अल्टिमेट आहे. मानसी नावाची माझी एक मैत्रीण म्हणते कि बरेचदा माझी वाक्य आगापीछा नसणारी संदर्भरहीत उडत उडत येतात. तिला तुझं 'माझं नाव राहुल' ऐकवायला पाहिजे!
    शेवट समांतर सिनेमा सारखा वाटतोय हे ही खरं आहे, पण तो 'पण सगळेच कसे हरणार?' वर केला असता तर त्रास देणारा समांतर सिनेमा झाला असता!!! तो आणखी अवघड. मला का कुणास ठाऊक यांना एकत्र आणल्यावर पुन्हा आपापल्या दिशेला पाठवण्याची गरज वाटली! आणि यांचं पुढे काय होतं हे जाणुन घ्यायची उत्सुकता....
    शिवाय - 'आणि शेवटी विरंगुळा म्हणुन किंवा अनव्हॉइडेबल म्हणुन म्हण....कोणी कोणाला पाळायचं हा प्रश्न येतो तेव्हा काही जण प्रश्न पाळतात तर काही जण उत्तरं...' हे तुझं वाक्य केवळ अल्टिमेट आहे! जिओ!! च्यायला असलं भारी कधी मला का नाही सुचत?

    केतन - तुझ्या कमेंट्स वाचल्यावर कधीकधी वाटतं कि च्यायला मी लिहुन जातो आणि लोक बळंच लई विचार करतात! :)) पण तुझ्या कमेंट्स छान असतात. बाकी 'गुड विल हंटिंग' पाह्यलाय, पण 'डु यु मिस मी....' आठवत नाही. शिवाय रेस्टलेसनेस चॅनलाईज करायचं म्हणशील तर - ते ही जमत नाही. म्हणजे रेस्टलेस नसताना तसं काहीतरी केलं पाहिजे वगैरे वाटतं, पण ऍक्चुअली रेस्टलेस असताना ते जमत नाही. हे लिहायचं वगैरे म्हणजे उगीच खाजवुन घ्यायचे किडे. (आय डोन्ट नो - कधी कधी लिहिणं म्हणजे वाईट एम्बॅरेसिंग वाटतं. छोड - नंतर कधीतरी).

    किंग, मेघना, राहुल एम - प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
    स्नेहा - काय आवडलं/आवडलं नाही हे ऐकायला जास्त आवडेल.

    संवेद - मे बी तु म्हणतोयस ते खरं असेल - म्हणजे ते 'कोहम' वगैरे. पण मी तसं काही करतोय असं म्हटलं तर खुशाल मी थापा मारतोय असं समज. तो एक वांझोटा प्रश्न आहे. आय डोन्ट थिंक मी एवढा टोकाचा सुखी आहे कि मला असे प्रश्न पडावेत. वेल, मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय कि तुम्हा बऱ्याच लोकांना - लेस्टर आणि दादरु एवढे दु:खी वगैरे का वाटताहेत? आय मीन एका बार मध्ये चुकुन भेटलेले हे दोघं कुणीतरी 'समबडी' आहेत असं नाही होऊ शकत का? ते फक्त बोअर झालेत. ते कशानेही होऊ शकतात. बोरियत वगैरे फक्त एक मूड असतो. स्टेट ऑफ माईन्ड. मूड सुधारल्यावर तेच जग, त्याच लोकांसकट सुंदर वगैरे ही वाटु शकतं! जनता विनोदी लिहिते, रहस्यात्मक लिहिते, भन्नाट लिहिते - तसंच 'इंग्लिश ऑगस्ट' हे एक बोअर पुस्तक आहे! खरंच!! वाचुन बघ. संदिपची एक 'रेंगाळत, रेंगाळत' नावाची कविता आहे - ती खरंच इतकी रेंगाळते कि बोलायची सोय नाही. तसंच उपमन्यु चॅटर्जी ने हे पुस्तक प्रचंड ताकदीने रेंगाळवलंय. मला तीच बोरियत या पोस्ट मधुन पोचवायची होती. ती जरा जास्तच जोरात पोचलेली दिसतेय! :))
    पण आवडली तुझी कमेंट - तुझ्या पहिल्या कमेंट नंतर गॅसवर होतो कि बापरे - आता हा काय म्हणणार आहे म्हणुन! वाचत रहा आणि वाचुन तुला काय वाटतंय ते असंच कळवत रहा! :)

    अभ्या - तुझ्या कमेंटने पेटवलं हे पूर्ण मान्य! :) हॉवर्ड काय, सिंदबाद काय किंवा तो बाबाचा ट्रॉय कि कोण काय - जे जे कुणी कुणी जिथे कुठे लढले - कशासाठीही - ते ते प्रेरणादायीच. कधीमधी आपण एकमेकांच्या प्रेरणा बनतो. बाकि - अभिमान वगैरे ठीक आहे, पण कुणाच्या अभिमानासाठी कुणी काही करणं गैरच. उद्या माझ्या पोरांनी माझा ब्लॉग वाचलाच (च्यायला बायको ने नाही वाचला अजुन - तर पोरं काय वाचणार?), आणि त्यांना माझा अभिमान नाही वाटला - तर काय करणार? पण मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. बाकी तु ते - माझे पराक्रम लिस्ट केलेस ते ऐकुन बरं वाटलं! :) पण च्यायला तुला मला माहित कि बरीच जनता याच्यापेक्षा बऱ्याच जास्त गोष्टी फारसा गाजावाजा न करता करते. आता तुझ्या आडुन रोहित वर गोळीबार करायचा तर - अगेन यु आर जंपिंग टु कन्लुजन्स - कि दादरु आणि लेस्टर महाभयंकर दु:खी आहेत. आणि ते माझी मनस्थिती रिफ्लेक्ट करताहेत....माझ्या मते ते एवढे बुद्धिवान आहेत कि ते सेल्फ ऍनॅलिसीस फार उत्तम प्रकारे करु शकतात. आपण त्यांच्या कन्ल्युजन्स शी सहमत नसलो म्हणुन ते चूक किंवा दु:खी असतीलंच असं नव्हे!
    अभ्या - कमिंग बॅक टु यु - या पोस्ट चा शेवट मिळमिळीत किंवा 'यशराज' ला शह म्हणुन कॉमेडि वगैरे करायचा असुरी विचारही काही काळ डोक्यात आला. खरं सांगायचं तर शेवटचा पॅरेग्राफ सोडला तर बाकीचं सगळंच सहज जमलं. तु, मी, बाबा - असा आपला आपापले वैयक्तिक कोन सांभाळत चाललेला त्रिकोण - आणि त्यातल्या त्या त्याच त्याच काचांनी बनलेल्या कॅलिडोस्कोप च्या आकृत्या....मग अशाच बऱ्याच आकृत्यांतली एक - शेवटचा पॅरेग्राफ म्हणुन आली....

    बाबा - जिओ!
    मला हे पोस्ट सगळ्यात जास्त आवडण्याचं कारण म्हणजे या पोस्टला आलेल्या - विचार करुन दिलेल्या प्रतिक्रिया.
    विद्या, राहुल, केतन, अभ्या आणि संवेद - आणि हो, मानसी - तुमच्या कमेन्ट्स आणि बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या वेगवेगळ्या रिऍक्शन्स - भरपुर विचार करायला लावणाऱ्या वगैरे होत्या.
    पण बाबा - तु आयदर एक्झॅक्ट्ली ओळखलंस कि काय लपवलंय किंवा काय अर्धवट दाखवलंय, किंवा काय सांगितलंय किंवा काय सांगता सांगता सोडुन दिलंय - किंवा तु त्याच्या जवळपास पोचलायस. राहुल तु ही - तु य मॉडेस्ट होत - शेवटाला शिव्या घालण्याची इच्छा दडपलेली दिसतेयस!:))
    आणि अभ्या तु पण ते - हर मुश्किल सवाल को किसी खुबसुरत मोड पे छोड जाना वगैरे प्रकार केल्यासारखा....

    परवा बॉर्डर्स मध्ये अशीच पुस्तकं चाळत होतो आणि तिथे स्टीफन किंगचं एक शॉर्ट स्टोरीज चं पुस्तक मिळालं. त्याच्या मनोगतात तो म्हणतो कि 'तुम्ही जे वाचता - तुम्ही ते बनता'. बाबा तु मागे कधीतरी म्हणालेलास कि मला अजुनही पुस्तकं इतकी कशी भिडतात वगैरे. मे बी मी जरा जास्तच विचार करतो आणि मला मग नसनसते ऍन्गल दिसायला लागतात. पण एखाद्या पिक्चरसारखा आणि कुठल्याही पिक्चरपेक्षा मोठा पुस्तकांचा इफेक्ट होतो आणि तो जास्त वेळ रेंगाळतो. बाकी काही का असेना - इथे कमेंट देणारे काय किंवा इतर मित्र मैत्रिणी काय - एकाचवेळेस ४-५ लोक 'इंग्लिश ऑगस्ट' वाचताहेत हे ही नसे थोडके! :)

    दरम्यान मागचे काही दिवस आई बाबांचा व्हिसा, नविन (भाड्याचंच) पण मोठं घर, लास व्हेगास ची (धुमाकुळ) ट्रिप वगैरे राडा चाललाय. आठवड्याभरात ४० तास झोपेच्या आसपास पोचलो तर नविन पोस्ट लवकरच....
    तावत शुभमस्तु.

    ReplyDelete
  16. बाबा - The true essence remains elusive....
    तसाच काहिसा प्रयत्न होता आणि तो सफल झाल्याचा आनंद वाटतोय.
    आता हे वाचुन झाल्यावर तो काय होता हा प्रश्न निरर्थक - तो ज्याचा त्याने शोधायचा. माझा काय होता हा विचार करत बसशील तर -

    ढुंढते रह जाओगे!.....:))

    ReplyDelete
  17. vachakanchya pratikriyanna dileli poch - pohochali. :-)

    ReplyDelete
  18. पांडुरंग सांगवीकर इन सिएटल,, दोनचार वेळा वाचायला लावलं राव तुम्ही. आणि आम्हाला " कॉम्प्लेक्स "आणलात.
    पण कॉंप्लेक्स नाही , कारण तुमचा ' नेमाडे ' पथ, आमचा लक्षीबाई टिळक.
    Too Good! keep it up ! God bless you.

    ReplyDelete