अधिवेशन - १
म.टा.!
नमस्कार!!
काल तुमच्या पेपरात तुम्ही आमचा - म्हणजे अधिवेशनाच्या निमित्ताने सिऍटल मध्ये येणाऱ्यांचा - ’तुम्हीच आमचे रिपोर्टर’ म्हणुन उल्लेख केलात म्हणुन म्हटलं - चला, रिपोर्ट पाठवु!
आता रिपोर्ट पाठवताना पहिलीच गोची म्हणजे मी एक (तुमच्या जितकी ताणु तितकी ताणल्या जाणाऱ्या संज्ञेतही) ’अर्धवट रिपोर्टर’ आहे. म्हणजे त्याचं आहे असं - कि मी सिऍटलमध्ये आहे, पण अधिवेशनासाठी नाही. म्हणजे - मी इथेच रहातो. त्यामुळे मी अधिवेशनासाठी न जाता अधिवेशनच माझ्याकडे आलंय असं तुम्ही म्हणु शकता!
आई शपत - खरं सांगतो - त्याला मी जबाबदार नाही!
ऍक्चुअली खरं सांगु का? माझ्याच गावातल्या अधिवेशनाबद्दल मी ’म.टा.’ मध्ये वाचतो! आता यात वृत्तपत्र म्हणुन तुमचं सामर्थ्य आणि मराठी माणुस म्हणुन माझा नतद्रष्टपणा किती - या घोळात आपण जायला नको! कसं?
तर - अधिवेशन.
यावर आमच्या घरात रोज चर्चा होते.
म्हणजे आई-बाबा इथे आलेत याच महिन्यात - त्यामुळे त्यांना त्याचं कोण अप्रुप. बायको मराठी शिकतेय - त्यामुळे तिलाही अप्रुप. (अर्थात त्याचं कारण ’शिवाजी’ ची तिकिटं न मिळणे हे ही असु शकतं!). आणि मला....वेल ये झोल क्या है - असं राहुन राहुन वाटतंय.
कालचं तुमचं आवाहन, त्यात परत परागनं ऑरकुट वर मेसेज ठेवला - ’अरे या अधिवेशनात असते तरी काय?’ मग म्हटलं च्यायला लिहुच. अधिवेशनात जाणारे लिहायचे ते लिहोत - आपण ’बाहेरुन’ लिहु. बर लिहायचं ते पण कुठे? तुम्ही भले लेख मागवलेत - पण पेपरात लिहिणं म्हणजे (टिपिकल मराठी) टेन्शन. त्यापेक्षा मी बापडा माझ्या ब्लॉगवर लिहितो. छापायचं तर छापा. इथे जरा बरं आहे - म्हणजे उगीच तुमच्या पानावरची जागा अडवतोय असं होणार नाही, आणि मला माझ्या संकोचांबद्दल नि:संकोच बोलता येईल.
पाल्हाळ झाला ना? जाऊ द्या.
या अधिवेशनाचे पडघम कि काय ते बरेच दिवस वाजताहेत - महाराष्ट्रात! ८-९ महिन्यांपुर्वी मी या गावात रहायला आलो तेव्हा आल्यावर मला पण कळलं - कि ’यंदा इकडे’!! पटेल आणि जाधव येताहेत माहित होतं, पण पाटेकर, भांडारकर, पिळगावकरांबद्दल या आठवड्यातच कळलं. छान!!
आता एक प्रॉब्लेम आहे -
त्याचं आहे असं कि - मला थोडक्यात बोलता येत नाही.
म्हणजे - या अधिवेशनाबद्दल किंवा याच्या निमित्ताने म्हणा - मराठी माणसाबद्दल बोलायचं म्हणजे - सलीलच्या शब्दांत - मागे जाऊन बरंच पुढे जावं लागतं. म्हणजे कसं, तर विसर्जनाच्या मिरवणुकीत नुसता दगडुशेट चा फोटो दाखवला तर सगळं पोचतं का? नाही. मग ढोल ताशांचे आवाज शब्दांतुन पोचवायला लागतात - तसं.
तर - मराठी माणुस.
म्हणजे - अमेरिकेतला मराठी माणुस.
हा एक तुफान विचित्र प्रकार आहे.
म्हणजे त्याचं असं कि - गुल्टी (म्हणजे तेलुगु) म्हटला कि चिरु (चिरंजीवी हो! त्याचं ते ’लाडकं’ नाव आहे), लुंगी म्हटला कि रजनी, मल्लु म्हटला कि ’लॅन्ड ऑफ लगुन्स’, बंगाली - रसगुल्ला - हे कसे टिपिकल प्रकार. पण मराठी म्हटलं कि - अंधार!
नाहीतर प्रकाश!!
किंवा जे असेल ते - पण चित्र काहीच नाही.
म्हणजे हे मला प्रकर्षाने कि काय ते - जाणवतं. म्हणजे नाना आपला, माधुरी आपली, मंगेशकर ही आपले - पण आता हे लोक ’सगळ्यांचेच’ इतके आहेत कि ’केवळ माझा सह्यकडा’ म्हणायला ’सह्यकड्या’ शिवाय काही दिवा घेऊनही सापडत नाही.
बरं - इथलं म्हणालात तर - अमेरिकेत मराठी माणुस मुळात रहातंच नाही!
म्हणजे - रहातो, पण घरात. म्हणजे अगदी दाराबाहेर ’अपमान होईल’ वगैरे पाट्या नसतात, पण तरी - रहातो घरात!
मग मॉल्स मध्ये वगैरे कुजबुजत मराठी ऐकु येतं पण त्याची झेप संभाषणापर्यंत जात नाही. गेलीच आणि ’चला चहा मारु’ ऐकलंत तर खुशाल जागं व्हायचा प्रयत्न करावा.
तर - अशा अस्तित्व नसलेल्या, अथवा ते अस्तित्व यशस्वीरित्या लपवलेल्या लोकांचा सोहळा वगैरे म्हणजे - य झकास. मग आल्याआल्या खटॅक करुन मी मराठी मंडळाची वेबसाईट तपासली. अर्थात ती इंग्लिशमध्ये होती. मग मला इंग्लिश शिकल्याबद्दल बरं वाटलं. मग मी शिस्तीत तिकिट वगैरे किती आहे ते बघु म्हटलं. माणशी १७५ डॉलर - फक्त! १०० डॉलर कि काय ते - फराळाच्या कुपनचे - एक्स्ट्रा! मला मराठी असण्याचा अभिमान वगैरे आहे, पण २७५ गुणिले ४ - म्हणजे मी भारतात जाऊन (परत) येतो. तरी अधिवेशन वगैरे म्हणजे छानच.
सॉरी - हे कदाचित थोडं सारकॅस्टिक वाटत असेल तर खरंच सॉरी. कारण मराठी माणसांनी एकत्र येऊन असा काही कार्यक्रम करणं आणि ’आवाज कुणाचा’ ऐकवणं हे खरंतर स्तुत्यच. आणि शिवाय यात माझा काहिही सहभाग नसताना मी त्यावर नाराजीचा सूर काढणं हे ही चूक. पण आहे हे असं आहे. मला असं वाटतं - आणि वृत्तपत्र म्हणुन तुम्हालाही खऱ्यातच इंटरेस्ट आहे ना? कि तुम्हीही अजुन ’जलसा’ च्या आसपास घुटमळताय?
नानाची मुलाखत, अविदाचं भाषण, गेला बाजार विलासराव पण बोलणार. मग यात माझी ’मुक्ता’च्या कॅसेटवर जब्बारची आणि ’आमचा बाप....’ वर डॉ. जाधवांची सही घ्यायचं राहुन जाणार. बाकी इतर लोक म्हणजे थातुर-मातुर. मला या अधिवेशनाबद्दल उत्सुकता होती (आणि आहे) ते पटेल आणि जाधवांमुळे.
त्याचं असं आहे ना - कि इथे कुठल्याही मराठी मंडळाच्या साईटवर जाऊन पहा. जोशी, कुलकर्णी, गोखले, आगाशे पाह्यल्यावर आम्हालाच अस्पृष्य झाल्यासारखं वाटतं. मग त्यात असा बापाला ’बाप’ म्हणणारा जाधव आला कि आम्हाला घरी आल्यासारखं वाटतं! अगदी ’चित्तपावन’ गाडगीळांची उपस्थिती असुनही....!
देशमुखांमुळं नाही वाटत पण.
सॉरी विलासराव - आम्ही इथे नोकरी बोकरी करताना राजकारणावर वगैरे चर्चा करायचो, तेव्हा ’आमचा पंतप्रधान इकॉनॉमिस्ट, आणि राष्ट्रपती फिजिसिस्ट’ म्हणताना - दोन वीत भाता दोन बोटं मोठं व्हायचा. आता ’बाबांच्या’ अंगात येऊन ’ताईंना’ राष्ट्राध्यक्षाचा ’आशिर्वाद’ मिळाल्यावर त्याबद्दल आम्ही काही बोलणं उचित नाही, पण ताई - पाटिल ऐवजी शेखावतच लावा - असं ’अधिवेशनाच्या’ संध्याकाळी म्हणावंसं वाटतं! अर्थात - मराठी बाण्याची डरकाळी फोडणाऱ्या वाघाची जिथे शेळी झालीए तिथे विलासराव तुम्ही तरी काय करणार म्हणा....
जे जाधवांचं - तेच पटेलांचं.
मराठी असण्याबद्दल ज्या ज्या लोकांमुळे अभिमान वाटतो - त्यातले हे एक - पटेल. मग ज्यांनी ’मुक्ता’ दिला, ’सामना’ दिला, ’विदुषक’ दिला, त्यांच्या मांडीला मांडी लावुन निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष शिवायचं ’साठेचं काय करायचं?’ बघणं म्हणजे....पटत नाही.
निखिलचा ’साठे...’ पाह्यल्यावर ’प्रवेशमुल्य ऐच्छिक’ असुनही आणि परवडत नसतानाही खिशातले सगळे पैसे ’स्नेहसदन’ च्या दाराबाहेरच्या टोपीत टाकुन मराठी असण्याबद्दल जे बरं वाटलेलं ते - कॅलिफोर्नियातला ’साठे’ पाह्यल्यावर वाटेल कि नाही अशी रास्त शंका वाटते.
आता शंका पुराण फार झालं.
तुम्हाला उत्सुकता असेल - अधिवेशनाची.
बिल गेट्सच्या गावात, कुंद हवेत, उन उन पावसांत, दोन दोन ज्वालामुखींना साक्षी ठेऊन मराठी मावळे आलेच आहेत तर बघुयात - स्पेस नीडलला शहारे आणत तुतारी किती घुमतेय, डाऊनटाऊन हादरवत ढोल किती धडकी भरवतायत, पाईक प्लेसला स्तब्धत ताशा किती कडाडतोय आणि अटकेपारचे मराठी झेंडे खबरदार टापा वाजवत ’हर हर महादेव’ चा जोष कोणत्या टिपेला नेताहेत.....
होऊन जाऊ द्या.