आई शपत -
हे असं पहिल्यांदाच होतंय.
युजुअली लिहायला वेळ काढायचा फक्त प्रश्न असतो. लिहायला आपोआप सुचतं. मग धाडधाड लिहित जायचं, एकदा वाचायचं आणि पोस्ट करायचं. (मग जनता त्याचे काय काय अर्थ लावते ते पहात हसत बसायचं).
पण मागच्या काही दिवसांत ऍब्सुल्युटली काहिही सुचत नाहिए.
नाही म्हणायला २ आठवडे फक्त समुद्र बघत काढले तेव्हा लिहायचं होतं - लिहिलंही, पण पोस्ट करण्याच्या दर्जाचं झालं नाही.
दोन आठवडे रंग वाळताना पाहिला तेव्हा एक गोष्ट सुरु केली, पण ती ही पुर्ण नाही झाली. यात एक धमाल झाली पण. म्हणजे गोष्टीत एक मुलगा आणि एक मुलगी. मग नुसते डायलॉग्ज लिहायचे कि परिस्थितीवर्णन वगैरे करत बसायचं याच्या झोल मधे आणखी झोल झाले. म्हणजे त्याचं असं कि डायलॉग्ज लिहायला लागलो तर लक्षात आलं कि च्यायला - पोराचे डायलॉग्ज लिहिता येताहेत, पण पोरीचे कसे लिहिणार?
म्हणजे हातानेच - पण कसे म्हणजे - नक्की पोरी बोलतात कशा?
आमच्या शाळेत पोरी होत्या पण त्यांच्याशी बोलल्याचं कधी आठवत नाही. अकरावी- बारावीत नाही, इंजिनियरिंगची पहिली दोन वर्ष नाही. मग पुढचे दोन वर्ष एक छावी होती - पण तो प्रकार वेगळा होता.
परत कधी कुठल्या मराठी पोरीशी बोलायचं कारण पडलं नव्हतं.
त्यामुळे - मुली नक्की बोलतात कशा - हा एक (गहन) प्रश्न पडला.
यावेळी - जॅक निकल्सन चं 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधलं तत्व पण वापरुन पाह्यलं - म्हणजे त्याचं असं कि निकल्सन त्यात एक (प्रसिद्ध वगैरे) लेखक असतो. मग त्याची एक चाहती (अगं बाई अरेच्चा करत वगैरे) त्याला - तुम्ही बायकांच्या मनोवृत्तीचं वर्णन इतक्या छान प्रकारे कसं करता विचारते. हा प्राणी आधीच (आणि कायमचा) वैतागलेला असल्याने उत्तर देतो - हे बघा बाई, त्याचं असं आहे कि बाईच्या मनोवृत्तीबद्दल लिहिताना मी एक पुरुष घेतो आणि त्यातुन लॉजिक आणि अकाउंटॅबिलिटी काधुन टाकतो! व्हॉला!!
तर - ते लॉजिक पण वापरुन बघितलं. पण ते पटेना.
मग एकदा (ऑफकोर्स 'वन टू मेनी' झाल्यानंतर) 'धडक धडक' लिहायला घेतलेलं - ते एवढं पुचाट झालं कि मी ते परत परत डिलीट केलं - अगदी लॅपटॉप फॉरमॅट करावा का एवढं वाटेपर्यंत!
तर सांगायचा मुद्दा - मध्यंतरी लिहायचा प्रयत्न केला पण जमेना.
आता तर प्रयत्न करायलाही जमेना व्हायला लागल्यावर म्हटलं - च्यायला हे जरा अतीच होईल. कॉलेज फुटबॉल बघताना 'ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी' सुरु झाला - आणि आपोआप सुचायला लागलं....
'ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी'....हुरुहुरींची ऐतिहासिक कहाणी - कि ऐतिहासिक हुरहुरींची?....
वेल - आय ऍम शुअर - प्रत्येकाचंच 'युं होता तो क्या होता' होत असेल वेगवेगळ्या गोष्टिंबाबत!
समुद्राचं सांगत होतो.
एका मिलियन डॉलर घराची (बँड-एड लावुन) डागडुजी करायला एका समुद्राकाठी जात होतो दोन आठवडे मध्यंतरी....
जाता येता फेरीमध्ये सामंतांचं 'अश्वथ' वाचत होतो. सुरुवातीला वाटलं - सामंत वाचावा तो समुद्राला साक्षी ठेऊनच....
डागडुजी करायला इतर लोक होते - त्यामुळे मला समुद्राकडे बघत बसणं याशिवाय दुसरं काम नव्हतं.
का कुणास ठाऊक - असं उगाचंच वाटायचं कि (जेव्हा कधी) असं समुद्राकडे बघत काही दिवस काढीन तेव्हा त्याच्या गूढतेबद्दल वगैरे येड लागेल.
तुम्ही कधी असे समुद्राकडे पहात बसलायत का?
अथांग, निळा, लाटा आणि पाण्याने भरलेला समुद्र?
अशा वेळेस पटतं कि समुद्राबद्दल अवाढव्य विषेशणं वापरणारे लोक तरी च्युत्ये आहेत किंवा आपणतरी!
आय मीन - असला आळशी समुद्र पाहिला कि असं वाटतं कि सुर्य, चंद्र, तारे आणि जगातली तमाम बदकं झक मारतात!!
हे आणि असंच काहितरी लिहिलं होतं - ते पण कागदावर.
बहुतेक तेव्हाच तो आळशी समुद्र मला चावला.
मग मागचा महिनाभर - शक्यतो आलेली कुठलीही मेल ओपन करायचं टाळणे, लायब्ररीची पुस्तकं मुदत उलटल्यानंतरही परत न करणे, ५ तारखेच्या सकाळपर्यंत रेन्ट भरणं लांबवणे वगैरे - डिप्रेशन मधले रेग्युलर प्रकार डिप्रेशन शिवाय अनुभवले.
आळशीपणा म्हणजे धमाल असते पण - म्हणजे काहीच करायचं नाही. म्हणजे रात्री उशिरा पर्यंत झोपेशी लढत जागायचं आणि सकाळी उशिरापर्यंत गजराशी लढत झोपायचं. प्रॉब्लेम म्हणजे गिल्ट! च्यायला जाता जात नाही. आणि मग त्याच्यामुळे आळस एन्जॉय करता येत नाही....
हे सगळं लिहिताना दिवस होता.
आता रात्र झाली.
म्हणजे आता सन्नाट्यात काहीतरी अल्टिमेट सुचेल!
भेंडी च्यायला हे अल्टिमेट वगैरे सुचतं कसं पण?
अभ्यास करताना ट्रान्स मध्ये गेल्यावर जसं वेळेचं भान रहात नाही, तसा ट्रान्स मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक सेकंदाला किटकिट करुन हॉलमधलं घड्याळ मला बेभान होऊ देत नाहिए.
च्यायला पावणे बारा! म्हणजे भुतंखेतं पंधरा मिनिटांत येणार....
आणि हा लॅपटॉप मिटवुन डोक्यावर गच्च पांघरुन ओढुन झोपायला १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार. त्यापेक्षा जाऊदे ना! येऊ दे भुताला.
त्याला माझ्या पॅरानॉईया च्या गोष्टी सांगीन.
पॅरानॉईया म्हणजे....
म्हणजे एखाद्या गोष्टीची विनाकारण भिती वाटते ना - त्याला पॅरानॉईया म्हणतात!
म्हणजे....म्हणजे मी तिसरीत असताना माझ्या मित्रांनी मला सांगितलं कि सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त ताकद गव्यात असते! तर गवा तुमच्या मागे लागला तर तुम्ही वाचु शकत नाही. तुम्ही कितीही जोरात धावलात तरी गवा तुम्हाला शिंगावर उचलतोच! मग उपाय एकच. कधीही सरळ रस्त्याने किंवा गोलात धावायचं नाही. काटकोनात पळायचं! (कारण बहुतेक गव्याचा पिकअप कमी असतो!). तर तेव्हापासुन मला काटकोनातले रस्ते आवडतात!!! (बहुतेक म्हणुनच मला 'कल डी सॅक' मधलं घर नकोय)....
पाचवीत असताना घरी थोडी तंगी आलेली. त्यातच आम्ही पुण्याला शिफ्ट झालेलो आणि टि.व्ही. वर सतत लहान मुलांना किडनॅप करणाऱ्या चोरांबद्दलचे कार्यक्रम लागायचे. मग मला सतत अशी काळजी कि मला किडनॅप केलं तर आई-बाबा पैसे कुठुन आणणार? तेव्हापासुन बसमध्ये शिरल्या शिरल्या बसमधल्या प्रत्येकाचा चेहरा पाहुन तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करण्याची सवय लागली ती आजतागायत.
ती एक सवय तशीच कुठल्याही हॉटेल मध्ये गेलं तरी जागा निवडताना - जिथुन दरवाजा दिसेल अशी निवडायची सवयही! सबब - आपला पाठलाग करणऱ्या माणसाला हुलकावणी जरी देता आली नाही तरी निदान तो कोण आहे ते कळावं!
आता आमच्या घरातलं भुत पण माझ्या शेजारी बसुन खुदुखुदु हसायला लागलंय!
आमच्या घरातलं भूत म्हटलं कि गम्मत वाटते ना? पण खरंच आमच्या घरात एक भूत आहे! इथे आल्याआल्याच त्याला ओझरतं पाहिल्यासारखं वाटुन २-४ वेळा दचकलो होतो, पण मग त्याने - ते पण मला बघुन असाच दचकलं होता सांगितल्यावर आम्ही शक्यतो एकमेकांना घाबरवायचं नाही असं ठरवलंय!
का कुणास ठाऊक - भूत म्हटलं कि (ऑफकोर्स लहानपणा पासुन) ते निळू फुलेंसारखं दिसत असावं असा समज!
आता भूत पण मुडात आलंय! मला - त्याच्या पॅरानॉइयाच्या गोष्टी सांगायला! पण मी त्याला कटवतोय. बाबा रे - बारा पाच झाले. तुझी वेळ संपली. आता मला पकवु नकोस. जा बाहेर जाऊन टी.व्ही. बघत बस. आणि हो - तो रिमोट उद्या सापडेल अशा जागी ठेव! च्यायला इथे (बायको उदार मनाने देईल त्यातलं) निम्मं आयुष्य टी.व्ही. बघण्यात आणि उरलेलं निम्मं रिमोट शोधण्यांत चाल्लंय!
कधी कधी हे भूत एवढ्या रात्री टी.व्ही. वर काय बघत असेल याचं मला नवल वाटतं. कारण एवढ्या रात्री (रात्रीच काय - दिवसाही) कुठले 'सन टी.व्ही.' वगैरे आमच्याकडे दिसत नाहीत. पण आम्ही एकमेकांना न घाबरवण्याची प्रतिज्ञा (रात्रीही) पाळतो.
साडे बारा!
म्हणजे बहुतेक भुताबरोबरच काहीतरी भन्नाट सुचण्याची शक्यताही मावळलेली दिसतिए!
त्या मुला मुलीच्या गोष्टी बद्दल सांगत होतो.
ती सुरू केली तेव्हा - पुर्वग्रह दूषित ठेवायचे नाहीत असं ठरवलं होतं.
म्हणजे - म्हणजे ते दोघं प्रेमात पडत नाहीत असं दाखवायचं!
का? तर ऑबव्हियस नको म्हणुन.
ते का? - माहित नाही.
मग विचार केला कि - उगीच यांना असं बांधुनही ठेवायचं नाही.
मग काय? तर बोलु देत.
प्रेमात बिमात पडायचं तर पडू देत.
कोरी पाटी घेऊन सुरुवात करु देत.
आता मीच माझ्याकडे कोऱ्या पाटीचा हट्ट धरल्याने, भेटले तेव्हा त्यांना त्यांची नावं आठवेनात.
पण मुलगा मुलत:च हुशार असल्याने (!) त्याने स्वत:चं नाव - 'चि. च' असं सांगितलं!
आणि मुलगी संकोच सांभाळुन बिनधास्त असल्याने तिने मुलाची री ओढुन -
वेट अ मिनिट - इतके वर्ष विचार केल्यावर मला आज कळतंय - री ओढणे म्हणजे टांग ओढणे!
तर मुलीनेही मुलाची (शाब्दिक) री ओढत तिचं नाव 'कु. क' असल्याचं सांगितलं.
पण मुलाला (तो पुण्याचा असल्याने) 'आज माझ्या गाडीला सॉल्लीड अपघात होता होता वाचला. पण एकच्या आत चितळ्यांकडे पोचायचं असल्याने एकशे वीसने लक्ष्मी रोडने सुसाट सुटलो. वाहतुकीच्या खोळंब्याने नागनाथाला कट मारुन शनिपाराला गाडी लावतो तो पोपट! चितळ्यांनी शटर खाली ओढलेलं!!' - या किंवा अशाच काहीशिवाय बोलणं सुचेना.
मग मुलीनेही त्याला कट मारुन तिच्या कझिनच्या (!) घोड्यावर मांड ठोकली, आणि (टिपिकल पुणेरी आवेशात) घोड्याला (कि कझिनला?) टाच मारली.
ते तिघेही (कु. क, कझिन आणि घोडा) मग 'एकशे वीस' ने (चौखूर) उधळले - हे सांगणे न लागे!
उसळले धुराचे मेघ सात निमिषांत -
वेडात मराठे वीर दौडले रस्त्यात.....
च्यायला एक वाजला आणि मला विडंबनं सुचताहेत.....
तर - अशा तऱ्हेने गोष्टीचा पोपट झाला.
मीनव्हाईल - बरीच जनता मी का लिहित नाहिए यावर बोंब मारतिए व माझ्या जिवंत असण्याचे पुरावे मागतिए - हे पाहुन मौज वाटली आणि 'आईना मुझसे मेरी पेहलीसी सूरत मांगे' हे गाणं आठवलं. तसा मौजेचा आणि गाण्याचा अगदी बादरायणही संबंध नाही, पण आठवलं. बरेच लोक भुमीगत झालेत आणि आपापल्या अभयस्थानांवरुन मला आंदोलन चालु ठेवण्याबद्दल (सांकेतिक) प्रोत्साहन देताहेत हे पाहुनही मौज वाटली. अर्थात - यावेळी 'आईना मुझसे मेरी....' आठवलं नाही!
थोडक्यात काय - तर गाणं आठवो न आठवो - मौज वाटली.
इतर जनता (म्हणजे ट्युलीप) कम्युनिस्टांच्या आवेशात 'सरकार पाडु!' चा आव आणत दुकान चालु ठेऊन आहेत याचा विषेश आनंद वाटला. मी पण मग संघाच्या आवेशात 'अखंड भारत' चा नारा दिल्याप्रमाणे 'आमचंही दुकान चालु आहे' चा नारा देतोय!
अर्थात - दुकान चालु असल्याचं दाखवणं आणि दुकान चालवुन दाखवणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहेच. आमचं दुकान दिवाळखोरीत गेलं तरी चालु रहाणार याची हमी. आता ते चालवायला आम्हाला किती जमतंय ते बघु!
तोपर्यंत -
'टु एन्शियन्ट ईव्हिनिंग्ज ऍन्ड डिस्टन्ट म्युझिक'....