Monday, October 23, 2006

अख्तर ऍन्ड अख्तर

हल्ली 'फाईव्ह पॉइंट समवन' पुन्हा एकदा वाचतोय.
हे एक असं पुस्तक आहे कि कधीही कुठेही कुठल्याही पानापासुन वाचायला सुरुवात करावी आणि गुंगुन जावं....'दिल चाहता है' सारखं!
रायन, हरी, आलोक - अजित, सिध, कळ्या, मन्या, निल्या, रव्या, अभ्या, बाबाची आठवण करुन देतात.

आजचा 'बेकारी'चा पहिला दिवस चांगला गेला.
आमच्या एच. आर. डिरेक्टर, ब्रान्च मॅनेजर - यांचे झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी वगैरे व्यक्त करणारे फोन आले.
३ बियर, १ तास व्यायाम, निवांत लंच आणि मग ताणून झोप - हे सगळं माधुरी घरी यायच्या आत उरकलं!
उद्यापासून रोज एक ट्रेक करायचा असा विचार केला. इनफॅक्ट आजच 'लिटल साय' ला जाऊन येणार होतो.

बाय द वे - मागच्या एका पोस्ट मधे वर्णन केलेला तो 'रांगडा पहाड' वगैरे म्हणजे 'माऊंट साय'!
मागच्या वीकेंडला माधुरी आणि मी 'लिटल साय' केला (माऊंट साय चा बेस कॅंप म्हणू).
निघायला तसा उशीरच झालेला आम्हाला, पण माधुरीने न दमता, तक्रार न करता तो ३ तासांचा ट्रेक कंप्लिट केला. तसा फार अवघड नव्हता - फारतर सिंहगड चढण्याएवढा. 'ट्रेक' म्हटल्यावर 'वर' पोचल्यावर भारावून जायची वगैरे सवय झालिए भारतात, इथे तसं काही होत नाही. मग आपलं आपण उगीच कुठल्या सुळक्यावर बसुन इथल्या रेड इंडियन्सच्या इतिहासावर तर्क करत बसायचे.
जाताना कुठल्याशा युरोपियन देशातले ट्रेकर्स रॅपलिंग करताना दिसले. येताना अंधार पडेपर्यंत त्यांचं रॅपलिंग चालू होतं.
मध्येच आम्हाला सिऍटलच्या एका ट्रेकर च्या स्मरणार्थ स्थापलेलं एक बाकडं दिसलं - तो एव्हरेस्ट सर करुन उतरताना बेपत्ता झाला. कोण कुठचा तो हिमालयात येऊन हरवतो, आणि कोण कुठचे आम्ही त्याला श्रद्धांजली वहातो.....

येताना (उतरताना) वाट चुकलो.
एकतर जंगल, निसरडी वाट शोधण्याचा वायफळ प्रयत्न, आणि एवढा वेळ 'अस्वल दिसलं तर काय करायचं' याची मी बिल्ट-अप केलेली भिती यामुळे माधुरी प्रचंड घाबरली. पण माझा अनुभव असा कि दोन पैकी एक माणुस घाबरला कि दुसरा आपोआप शूर होतो!
शूर वगैरे ठीक, वाट लगेच सापडली आणि सूर्यास्ताच्या आत खाली पोचलो हे ही ठीक, पण खरंच अस्वल दिसलं असतं तर काय केलं असतं - हे इमॅजिन करुनच भिती वाटते.

अस्वल दिसण्याची भिती वाटली तर काय करावं?
अस्वल शोधण्याचा प्रयत्न करावा.
ऍटॅक द प्रॉब्लेम!
'ऍटॅक द प्रॉब्लेम' वरुन व.पुं. ची एक कविता आठवली. ती त्यांच्या पुस्तकात होती हे आठवतंय, पण त्यांचीच होती का - याबद्दल शंका आहे.
शिवाय मी 'व.पु.' 'कोट' करतोय या विचारानेच मला 'अळणी' वाटतंय....असो.

बेदम आठवण आली तर काय करावं?
बेदम आठवण काढावी!
माळेचे मणी न मोजता
जपाची माळ ओढावी!

आणखी दोन कडवी आठवताएत, पण ते इथे फारसं रेलेव्हंट नाहिये.

हे सगळं आधी लिहिलेलं - का? ते आठवत नाही.
आज बेकारीचा चौथा दिवस - रोज एक ट्रेक वगैरे प्रकार काही झाला नाही.
दरम्यान 'सतरंजी' ने मी परत आल्यावर मला सिऍटल डाऊनटाऊन मधली एक बिल्डिंग फाऊंडेशन डिझाईन साठी द्यायचं ठरवलंय. आत्तापर्यंत ४ ब्रिजेस, हायवेज, काही छाट्छुट बिल्डिंग्ज याची फाऊंडेशन्स डिझाईन केलिएत, पण ही माझी पहिलीच 'हाय राईज' बिल्डिंग असेल. (हॉवर्ड रॉर्क च्या बरोबर नाय तर नाय - ऍटलिस्ट 'पाया'शी तरी पोचता येईल!)

गुरुवारी ऑफिसमध्ये ५ तासांचं फर्स्ट एड आणि सी.पी.आर. ट्रेनिंग अटेंड करायला गेलो होतो. तिथे अत्यंत सुत्ती (तेलुगु शब्द) जखमांपासुन ते - बोट तुटलं तर आधी बोट शोधा, मग ते बर्फात न ठेवता पाण्यात धुवुन खिशात ठेवा - असलं ट्रेनिंग.
तो मास्तर (जो दिवसा 'फायरफायटर' म्हणुन काम करतो आणि 'फावल्या वेळात' हे सगळे धंदे करतो) या सगळ्या गोष्टी इतक्या एकसुरात सांगत होता कि - मला वाटलं मी चुकुन 'इमर्जन्सी वॉर्ड' मधल्या नर्सेसच्या ट्रेनिंगसाठी वगैरे आलोय कि काय!
होपफुली जॉबसाईट वर या गोष्टी उपयोगात आणण्याची गरज पडणार नाही, पण ट्रेक्समध्ये चांगलाच उपयोग होऊ शकेल.

मी ऑल्मोस्ट विसरलोच सांगायला - ट्रेनिंगच्या वेळेस एक अत्यंत 'फ ट का' मुलगी माझ्याशेजारी येऊन बसली.
म्हणजे एसी, बीसी, एमसी वगैरे कॅटॅगरी नाही.
हिच्यासाठी मला नविन 'फ ट का' कॅटॅगरी ओपन करायला लागली.
आईशपथ सांगतो - मी तिथे आधी बसलो होतो. (बाबा - फॉर युअर काईंड इन्फॉरमेशन....)
मला मीटिंग्ज मध्ये बोर व्हायला लागलं कि मी डाव्या हाताने लिहायला लागतो.
माझा डाव्या हाताचा स्पीड कमी आहे, पण मी अगदी आवर्जुन डाव्या हाताने मी माझ्या शेजारी बसली होती हे लिहुन ठेवलं. म्हटलं घरी जाऊन माधुरीची 'य' चिडचिड करू.

या ट्रेनिंगमध्ये कुणाच्या घशात काही अडकलं तर काय करायचं याचं प्रात्यक्षिक आमच्या मास्तरने माझ्यावर केलं.
म्हणजे अगदी साग्रसंगीत!
मी आपला वर्गाकडे तोंड करुन उभा. (जनतेसमोर उभं राहिल्याने कान आपसुक तापलेले.)
मग तो मागुन येउन खांद्यावर हात ठेऊन म्हणणार - तू ठीक आहेस का? तुझी काही मदत करु का? वगैरे वगैरे.
मग - हे बघा, खोकत असलेल्या माणसाचा श्वास अडकलेला असेल, तो तुमच्याशी बोलु शकणार नाही.
असे त्याच्या मागे उभे रहा.
त्याच्या दोन पायांच्या मध्ये तुमचं उजवं पाऊल ठेवा.
मग त्याला त्याचे हात दोन्ही बाजूने उचलायला सांगा.
मग त्याला मागुन मिठी मारुन तुमचे हात त्याच्या पोटासमोर नेऊन पकडा.....

तोपर्यंत वर्गात खसखस पिकायला लागली होती.
मी त्याला म्हणणारच होतो कि - भाय मेरे, तुम आदमी तो ठीक टाईप के हो ना?
मला कळेना हा रॅगिंगचा वगैरे तर प्रकार नाही ना!
तेवढ्यात तो म्हणे - मग पकड घट्ट करुन दोन्ही हातांच्या जॉईंटने पोटावर जोरात हिसका द्या.
च्यायला घशात काय, पोटात अडकलेलंही बाहेर पडलं असतं!

मग तो म्हणे आता हेच प्रात्यक्षिक आपापल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीवर ट्राय करा!
प्रकाश पडायला एक क्षण अंमळ जास्तच लागला.
उजेड पडल्यावर एकाच क्षणात मला - तुताऱ्या, ताशे, ढोल, ड्रम्स सगळं ऐकायला यायला लागलं.
प्रात्यक्षिकावेळी वर्गासमोर उभं राहून तापलेले माझे कान आता आग ओकायला लागले.
आम्ही (म्हणजे आम्ही दोघेही) अवघडुन उभे.
हे कुठंही लिहायचं नाही हे माझ्या डाव्या हाताने उजव्या हातालाही सांगितलं!
कारण या प्रकारावरची माधुरीची चिडचिड मला जन्मभर पुरली असती.
मग मी कंबरेत किती वाकुन तिच्या पोटासमोर हात नेले हे माधुरीला आठवुन सांगताना आम्हा दोघांचीही हसुन हसुन पुरेवाट झाली!
त्या पोरीने अगदी मला विचारलंही - 'आरंट यू सपोज्ड टु बी क्लोजर टु मी?'
पण तिला बोलुन गेलो - 'इट्स ऑलराईट - यू गॉट इट, राईट?'
च्यायला असले अनुभव लग्नाच्या आधी का नाही येत! (प्रचंड चिडचिड)

आज बेकारीचा सहावा दिवस.
आज अख्तरची (जावेद - शोएब नव्हे) 'आज तीसरा दिन है' ही कविता आठवतिए.
काल 'डॉन' पाहिला.
'दिल चाहता है' च्या स्केल वर याला १० पैकी १० पॉईंट्स दिलेच पाहिजेत!!!
स्टोरी कळायच्या आत लवकरात लवकर हा पिक्चर बघुन घ्या. फरहान अख्तरने त्याच्यावर (मी) टाकलेला विश्वास सार्थ ठरवलाय़.
जुना 'डॉन' मला फारसा आठवत नाही, पण तो पाहुन याच्यापेक्षा जास्त आनंद झालेलाही आठवत नाही!
एका पॉईंटला तर मला एवढा धक्का बसला कि माझ्या 'व्हॉट?' वर चार लोकांनी माझ्याकडं वळुन बघितलं.

परवा लिहायचं होतं पण विसरलो - 'डिपार्टेड' पाहिला. जॅक निकल्सन पिक्चर मधे असल्यावर डि कॅप्रिओ, मॅट डेमन, ऍलेक बाल्डविन, मार्टिन शीन, या नावांची तशी गरज नसते.
ती का नसते हे निकल्सन या पिक्चर मध्ये सिद्ध करुन दाखवतो!
सांगायचा मुद्दा असा कि 'डॉन' ने 'डिपार्टेड' एवढंच खिळवुन ठेवलं!!
शाहरुख निकल्सन एवढा 'मोठा' ऍक्टर नसेलही, पण त्याने 'डॉन' अमिताभच्या तोडीचा केलाय यात शंकाच नाही!!!
कुणीतरी आतातरी या दोन्ही डॉन्सना घेऊन 'शक्ति' करा रे......

7 comments:

  1. अभिजित,
    एकदम झक्कास पोस्ट आहे. अस्वलाबरोबर 'अटॅक द प्रॉब्लेम' ही बेस्ट स्ट्राटेजी तो समोर येई पर्यंतच असते, नाही का?
    ती 'फ ट का' मुलगी समोर उभी राहिल्यावर पण ही 'अटॅक द प्रॉब्लेम' स्ट्राटेजी वापरायची होती ना. ;-)
    'डिपार्टेड' मला पण सॉलिड आवडला, 'डॉन' अजुन पाहिला नाहिये; फरहान अख्तर कडुन माझ्या पण खूप अपेक्षा आहेत, ह्या वीकेंडला कळेल मला की 'डॉन' कितपत आवडतो. :-)

    ReplyDelete
  2. मॉन्सुर - तुझी कमेन्ट आवडली!
    एकदा मेहता पब्लिशिंग हाऊस चे संपादक अनिल किणीकर यांच्याशी एका नाटकाबद्दल चर्चा करत होतो. (ही खरं तर माझी 'लाल'. ते माझ्याशी चर्चा करत होते हा त्यांचा मोठेपणा.) त्यावेळी त्यांनी ही वाक्य कशी 'अर्धसत्य' असतात हे उदाहरणांसहित दाखवलं होतं. मग ते 'गॉडफादर' चं - बिहाईंड एव्हरी ग्रेट फॉर्चुन देअर इज अ क्राईम - असो कि अन्य कुठलं.
    ती अर्धसत्य असतात याबद्दल वाद नाही, पण नाहीतरी सत्य-सत्य तरी असतं काय?
    माझा अनुभव असा कि बरेचदा अस्वल, पोरगी अथवा अन्य काही - खरा प्रॉब्लेम नसतोच. खरा प्रॉब्लेम आपले आपणच असतो. आपण आणि आपण स्वतःच स्वतःवर लादुन घेतलेल्या लिमिटेशन्स.
    त्यामुळे 'ऍटॅक द प्रॉब्लेम' ही स्ट्रॅटेजी 'जादू की झप्पी' नसली तरी बऱ्याचदा तिच्या जवळपास पोचते!
    ही स्ट्रॅटेजी त्या पोरीवर वापरायला काही प्रॉब्लेम नव्हता कारण ती पोरगी हा प्रॉब्लेम नव्हतीच!! (पोटेन्शियल) प्रॉब्लेम माझी बायको होती. (माझं आणि 'सिंबॉल्स'चं वाकडं आहे, त्यामुळे मी डोळे मिचकावतोय असं समज.)

    बाकी कधीतरी निकल्सन वर पोस्ट लिहिलंच पाहिजे.

    बघु.

    ReplyDelete
  3. एकदम झकास...
    जॅक निकोलसन असल्यावर आणखी कोण आहे हे वाचायची गरजच पडत नाही. अगदी पटलेलं आहे...
    वरची कमेंट पण मस्तच
    जॅक निकोल्सन वर प्लीज एकदा लिहाच तुम्ही.

    ReplyDelete
  4. lol abhijit :)
    baki tuze te AC, BC etc che fullforms sang ki....
    ani fataka mulagi pan deshi hoti kaa?

    ReplyDelete
  5. Snehal -

    AC - Apsara Category.
    BC - Bayako Category.
    MC - Maal Category.
    Also, the girl wasnt desi. If she was, she wouldnt have sat next to me. I guess desi girls find me very....shall we say resistible? :)

    ReplyDelete
  6. mala nahi awadala SRK cha DON. layy pakau kelaye. pan "hya" vayat hi to bara udya marato ani nachato he matr manayala pahije. ;-)

    farahan hi DCH sarakha punha chamakat nahiye. eka kavitene afaaT prasiddhi milalyavar ekhadya kavi ne (Tulip cha arop ahe Sandeep Khare var) lagech kavita "paaDaayalaa" suruwat karavi, tase vatale mala farahan che lakshya ani don.

    tya manane Nagesh Kukunoor chi pratibha khulat chalaliye.. HydBlues, 3Walls & now Dor. ultimate maturity! :-)

    btw, ur blog is cool. :D

    ReplyDelete
  7. मामा, तुझ्या ब्लॉग इतक्याच मला तुझ्या ब्लॉगवरच्या लोकांच्या कॉमेंट्स वाचायला मजा येते! :-)

    तु लिहितोसच इतकं कॉन्ट्रोवर्शियल (पण छान!)! ;-)

    पण ती तुझी स्टाइल आहे म्हणा!

    ह्याच्या पुढ्च्या माझ्या कोमेण्ट्चा एक ब्लॉगच तयार झालाय! इथे बघा - himan8pd.blogspot.com

    ReplyDelete