मला लिहायचंय.
काय लिहायचंय माहितिए - पण बाहेर पडत नाही.
एक मैत्रीण म्हणते ’गोगोल’ बद्दल लिही.
दुसरी म्हणते ’रसना’ बद्दल.
तिसरा मित्र ’नाना’ च्या मागे लागलाय.
चौथ्याला म्हणालो - अरे पोस्ट म्हणजे काय उसाचं कांडं आहे कि घातलं चक्कीत नि काढला रस?
पाचवी म्हणे मी सुरुवात वाईट करतो -
(गॉड.....मला मैत्रिणी किती????)
अगस्त्य सेन आणि दादरु मागे लागलेत - लिही लिही म्हणुन.
लेस्टर बर्नहॅमने वीकेंड खाजवला!
पण -
रिदम पायजे.
लिहायला -
रिदम पायजे.
संथ तशी संथ आणि
द्रुत बडव द्रुत अशी -
रिदम पायजे.
मनात येईल तेव्हा -
रेंगाळली पाहिजे.
जिभेवर उतरली की -
चढली पाहिजे.
कानात पडली कि -
आठवली पाहिजे....
रिदम पाहिजे.
वाजव!
च्यायला टी.व्ही. समोर बसु.
नको - बेड बरा.
अगस्त्य सेन, मदना, बेडुक, साठे.
या....साठेचं काय करायचं?
जोम्पानाचं अरण्य, भिंती वरच्या पालींची पडझड, दिल्लीचा डिस्को आणि कोलकत्यातलं मॉस्को - पानावर कसं उतरायचं?
(रिदम रिदम.
रिदम रिदम....)
त्यापेक्षा बार बरा.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
मागचे तीन वर्ष गेलो नाहिये पण आता बार मध्ये जाऊ.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
बारटेंडरला सांगु - बाबा रे, मी ब्लॉग लिहितो.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
हल्ली मी लेखक झालोय.
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
मला लिटरेचरचं नोबेल मिळणारे! (माहित्ये का?)
दारू वाढ!!
(आरकेस्ट्रा.....)
च्यायला हे अतीच.
मी असं काही लिहिलं तर लोकांना काय वाटेल?
काही झालं तरी माझ्या मागच्या पोस्टला २६ कि काय प्रतिक्रिया!!
(त्यातल्या दोन-चार माझ्याच!)
छानच!!!
लोकप्रसिद्धी साठी पर्सेंटेज लिहावं.
ऍश-अभीचं लग्न!
यावर आयोडेक्स, डिस्को पुढे अर्ध्या तासाचं भाषण ठोकलं - कि आपण त्यांचा विचार करणं कसं व्यर्थ आहे!
च्यायला भरकटलो -
विषय - रिदम.
बाबा - रिदम!
अभ्या - रिदम!!
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
बारमध्ये गेलो.
आयटम एकटीच बसलेली.
कि देसी होता कुणी?
एकटाच?
देशातल्या आयटमला दारुत बुडवणारा?
देसी कि आयटम?
आयटम कि देसी?
(ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
नको - देसी बरा.
आयटम मागच्याच पोस्ट मध्ये झालिए.
उगीच लोकांचे गैरसमज होतात.
"हाय!"
"हाय."
"मी लेस्टर."
"मी दादरु."
"बसु इथे?"
"बस."
"काय पितोयस - बियर?"
"नाही - कैरीचं पन्हं! - सॉरी..... हो - बियर."
"कुठली?"
"काय फरक पडतो?"
"खरंय."
तेवढ्यात टेबल पुसत ’बारक्या’ मख्ख चेहऱ्याने समोर उभा.
"काय ऑर्डर साहेब?"
"मी ३ वर्षांनी कुठल्या बारमध्ये आलोय. इथे काय मिळतं?"
"सादा डोसा मैसुर डोसा मेदु वडा बटाट वडा वडा सांबार पुरी भाजी सामोसा कचोरी इडली चटनी इडली सांबार काय पायजे बोला साहेब टाईम नाय साहेब!"
"भोसडीच्या..."
"सॉरी साहेब - हा दादरु इथे दुपारपासुन लावत बसलाय. त्याला वाढता वाढता मी पण सारकॅस्टिक झालो....बोला काय आणु?"
"हा घेतोय ते मलाही आण."
"सॅम ऍडम्स - राईट ऑन सर्री!"
"तर दादरु -
साला काहीही म्हण पण तुझं नाव अजब आहे! काय करतोस?"
"काही नाही."
"म्हणजे? आय ऍम सॉरी - आय डोन्ट वॉन्ट टु इनट्रुड इन युअर पर्सनल लाईफ, पण इथे अमेरिकेत राहुन काहीच न करणं म्हणजे....."
"अनिल बर्वे - नाव ऐकलंयस?"
"हो....’थॅन्क यु मि. ग्लॅड’ - राईट?"
"तेच. त्यांची एक गोष्ट आहे.
गोष्ट अशी -
तो.....बी. टेक. होता.
तो ऍश ट्रे पास कर इकडे.
थॅंक्स!
तर -
तो बी. टेक. होता.
३० वर्षांचा होता.
अलिकडेच मुर्त्या कोरायला लागला होता.
दिवसभर फॅक्टरीत काम करायचा आणि रात्री घरी येऊन टकटक मुर्त्या कोरायचा.
हे आयुष्यात इतक्या उशिरा कसं सुचलं - आता किती काम होणार हातुन - असा वैतागायचा आणि मुर्त्या कोरायचा."
"आठवली! मग तो शेजारी वगैरे...."
"हां. तीच."
"तिचं काय पण?"
"काही नाही - अशीच आठवली. तो मुर्त्या करायचा. मी लिहितो."
"वॉव! तुम्ही लेखक लोक म्हणजे भाई!!"
"चुना लावायचा तर ती आयटम पलिकडे बसलिए. तिथे. इथे नाही."
"सॉरी. तसं नाही, असंच म्हटलं. काय लिहितोयस सद्ध्या?"
"एका बेडकाबद्दल लिहितोय!"
"व्हॉ....आय ऍम सॉरी - डिड यु जस्ट से ’बेडुक’?"
"हो बेडुक.
दचकायला काय झालं?
दादरु ऍक्चुअली एका बेडकाचं नाव.
म्हणुन माझं.
म्हणजे - तात्पुरतं."
"मग तुझं खरं नाव काय?"
"हरिश पंड्या."
"ओह! ओ.के.!"
"रे पांडु - पकवु नको! माझं खरं नाव काय त्याने काय फरक पडतो?"
"वेल - व्हॉटेव्हर....बेडकाबद्दल सांगत होतास....."
(बेडुक बेडुक
डराव डराव
ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग ढिन्चॅन्ग ढिचॅन्ग)
"तर दादरु ऍक्चुअली एका बेडकाचं नाव.
म्हणजे सायंटिफिक नाव वगैरे नाही.
तर हिरव्या पिवळ्या शेवाळल्या गुळगुळीत कातडीच्या या लठ्ठ प्राण्याला अगस्त्य सेन ने ठेवलेलं नाव.
बारक्या - आणखी एक.
तु घेणार?
टरफलं खाली टाक.
चालतं इथे.
नको - मला नको.
बियर बरोबर शेंगदाणे खाल्ले कि माझं डोकं दुखतं.
तर अगस्त्य सेन - आय.ए.एस.
असिस्टंट कलेक्टर (इन ट्रेनिंग), मदना.
अगस्त्य सेन - एक कंटाळलेला माणुस.
अगस्त्य सेन - सॉरी - ऑगस्ट.
इंग्लिश ऑगस्ट - मित्रांसाठी.
मित्र म्हणजे - असे जन्मजन्मांतरीचे वगैरे नाही, पण मित्र.
म्हणजे यु नो - शाळा, कॉलेजात एकत्र असणारे, सोबत काम करणारे, दारु पिणारे, सुट्टा मारणारे.
मित्र.
आपल्यासारखे.
भेटुन न भेटलेले.
मित्र.
तर ऑगस्ट -
ऑगस्ट ला कंटाळा आलाय.
पण नक्की कशाचा कंटाळा आलाय हे त्याला कळत नाहिये.
मदना, जॉब, उकाडा, डास, कुमार, श्रीवास्तव, साठे, जोशी, दारू -
माहित नाही.
त्याचा प्रॉब्लेम असा कि - जे आहे ते नको असं नाही पण नक्की काय हवंय हे ही कळत नाही.
हे दादरु ला कळतंय.
म्हणुन ऑगस्टने दादरुला पाळलंय.
किंवा दादरुने ऑगस्टला.
किंवा दोघांनीही एकमेकांना.
किंवा....डिपेंड्स.
कुणी कुणाला पाळलंय याचा निर्णय घ्यायचाही ऑगस्ट (आणि दादरु) ला कंटाळा आलाय.
दोघही एकमेकांच्या आणि आपापल्या अस्तित्वाचा अर्थ वगैरे शोधताहेत.
दोघांनाही एकमेकांचा हेवा वाटतोय.
म्हणजे ऑगस्टला दादरुचा वाटतोय हे नक्की कारण तसं पुस्तकात लिहिलंय.
दादरुलाही ऑगस्टचा वाटतोय हे आपलं माझं मत."
"इंग्लिश ऑगस्ट. उपमन्यु चॅटर्जी! राइट?
डॉन!! ऑगस्ट आणि त्याचा जीवघेणा नाही पण जीव खाणारा आयडेन्टिटी क्रायसिस....भारी! हे माझ्यासारखं झालं!!"
"म्हणजे?"
"म्हणजे मी लेस्टर - म्हणजे खरा नाही, पण लेस्टर.
’अमेरिकन ब्युटी’ चा.
परफेक्ट जॉब, परफेक्ट बायको, परफेक्ट घर.
आणि आयुष्यातला कंटाळा.
आयुष्य हातातुन निसटत चाललंय.
म्हणजे काय?
तर माहित नाय.
पण माझ्याकडे बेडुक नाही.
म्हणुन मग मी स्वत:लाच पाळतोय!"
"आणि हे काय मग? बारमध्ये येऊन स्वत: पाळलेल्या स्वत:चे लाड?"
"हो! ते आणि म्हटलं बघु आज बारमध्ये कुणी बेडुक भेटतोय का?"
"हा हा - व्हेरी फनी!
लकी आहेस. मी भेटलो. कुणी बेडकीण भेटली असती तर तुला हळवी दु:ख वगैरे राडा ऐकत बसायला लागला असता."
"दु:ख वरुन आठवलं - परवा गुलजारची कुठलीशी कॅसेट ऐकत होतो. तो म्हणे -
एक दिन जिंदगीके रुबरू आ बैठे.
जिंदगीने कहा - गम क्या है आखिर?
क्यु होता है?
कहा होता है ये भी तो....
हसायला काय झालं?"
"सॉरी - तु ’गम क्या है’ म्हणालास आणि मी ’काम क्या है’ ऐकलं!"
"च्यायला तु पण!
हे भारी पण - जिंदगी आपल्याला विचारणार -
काम क्या है आखिर?
क्यु होता है?
कहा होता है ये भी तो पता नही चलता....
मुझसे नाराज न रहा करो.
आखिर मै तुम्हारी जुडवा हु...."
"झाट जुडवा!
च्यामायला तो गुलजार आणि त्याची ती जिंदगी.
राखी त्याला सोडुन गेली त्याचं त्याने एवढं भांडवल केलं कि त्यावर अजुन कविता पाडतोय तो. म्हणे ’तेरे मासूम सवालोंसे हैरान हु मै’....
च्यायला यांची जिंदगी बरी यांना मासूम वगैरे सवाल विचारते.
च्यायला आपण कुणाचं घोडं मारलंय म्हणुन आपल्याला असे - असे - काय म्हणतात असल्या प्रश्नांना?"
"बोअर?"
"हजाम शब्द आहे - बोअर!
पण दुसरा शब्दही सुचत नाहिए.
म्हणुन बोअरच.
आपल्यालाच बरे असे बोअर प्रश्न पडतात!"
"काय प्रश्न पडलाय तुला?"
"आय डोन्ट नो! पण बोअर झालंय. तुला नाही झालं?"
"झालंय. पान त्याआधी एक गोष्ट - तुला जरा ऑकवर्ड नाही वाटत? आय मीन....तुला असं नाही वाटत का कि बारमध्ये, ते पण पर्टिक्युलर्ली अमेरिकेतल्या बार मध्ये दोन पुरुष एकत्र गप्पा मारत बसले कि - पुरुष सोड स्त्रीया पण - लोक संशयाने बघायला लागतात?"
"दुनिया गई तेल लेने - इथे आधीच जिंदगी बोअर मारतिए, कुठं दुनियेचा विचार करतो....
हे बघ तो बबन बसलाय पलिकडे - त्याला विचारतो.
का रे बबन्या - तुला काही प्रॉब्लेम आम्ही इथे गप्पा मारतोय तर?"
"च्यायला हजाम आहेस तु. त्याचा चेहरा पाह्यलास? कसला कन्फ्युज झालेला? एकतर तु त्याला मराठीत विचारलं - तुला काही प्रॉब्लेम आहे का म्हणुन!"
"तोच तर पॉइंट आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे हे बघ. ’इंग्लिश ऑगस्ट’ मधला बेडुक आणि ’अमेरिकन ब्युटी’ मधला लेस्टर बर्नहॅम जर एकमेकांना भेटले तर कुठल्या भाषेत बोलतील?"
"आय डोन्ट नो! बेडुक भाषेत?"
"बेडुक भाषेत किंवा पाली, स्वाहिली, हिब्रु किंवा अगदीच नडले तर जावा किंवा तत्सम कोड मध्ये. त्या बबन्याला हे सगळंच फ्रेंच. मग मराठी काय किंवा इंग्लिश काय, माणुस काय किंवा बेडुक काय - काय फरक पडतो?"
"खरंय!"
"तर - तुला नाही बोअर झालं? वेट अ मिनिट. तुलाही बोअर झालंय. तु तुझ्या जॉबला, लाईफला पकलायस. तुझ्या पोरीच्या मैत्रिणीवर लाईन मारतोयस....
च्यायला हजाम आहेस.
पोरीची मैत्रीण काय?
तुला लाईन मरायला कुणी समवयस्क किंवा गेला बाजार कुणी अनोळखी पोरगी नाही भेटली?"
"आणि तुला बेडका व्यतिरिक्त कुणी दुसरा प्राणी नाही मिळाला पाळायला? यु नो - अ रेग्युलर वन - म्हणजे कुत्रा, मांजर, पोपट, ससा, कासव?"
"ससा कासवा वरुन आठवण झाली - परवा ’कथा’ पाह्यला - बऱ्याच वर्षांनी. मी जेव्हा जेव्हा ’कथा’ पाहतो किंवा आठवतो तेव्हा मला अभ्या बरोबर त्यावर केलेलं डिस्कशन आठवतं. ते आणि दीना पाठकचा प्रश्न - शेवटी कासव जिंकलं....पर ये भी कोई जीत हुई?....
सॉरी तुला परत परत थांबवतोय. तु तुझ्या बोरियत बद्दल सांगत होतास...."
"दॅट्स ओ.के.
तु जसं म्हणालास कि ऑगस्टला प्रश्न पडलाय - जे आहे ते नको असं नाही पण काय हवंय ते कळत का नाही?
माझ्या मते तो प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो.
तु काय, मी काय, दादरु काय, लेस्टर काय, हा बारक्या, तो बबन, ती आयटम - हा प्रश्न प्रत्येकालाच असतो.
प्रत्येक जणच कमीअधिक प्रमाणात हा प्रश्न टाळत असतो.
मला आधी - म्हणजे ’अमेरिकन ब्युटी’ पाह्यला तेव्हा - वाटायचं कि हा ’मिड-लाईफ क्रायसिस’ असतो. तो ’मिड-लाईफ’ मध्ये येतो. २८ म्हणजे मी लेस्टरपेक्षा य तरुण आहे. पण....मे बि नॉट."
"उपाय काय मग?"
"माहित नाही. लेस्टरने आयुष्य बदलायचं ठरवलं. म्हणजे आहे तिथे राहुन बदलायचं."
"आणि ऑगस्ट ने सबॅटिकल घेतली. अ इयर ऑर टु ऑफ - टु डिस्कव्हर हिमसेल्फ...."
"च्यायला या ऑगस्टच्या - तुला सांगतो - हा प्राणी दोन वर्ष टाईम-पास करुन परत येईल, आणि येईल तेव्हाही तो एवढाच कन्फ्युज्ड असेल...."
"दॅट्स पॉसिबल."
"तुला काय वाटतं - काय उपाय असेल?"
"उपाय....उपाय सांगणं अवघड आहे.
प्रत्येकानेच तो शोधायचा.
किंवा जिंदगीच्या रुबरू आल्यावर तिलाच विचारायचा.
पण भेंडी तिच्यायची ती पण काही सांगत नाही. नुस्तीच आपली ’मी तुझी जुडवा, मी तुझी जुडवा’ गात बसते.
तु कधी विचार केलायस? कि लेस्टर नक्की कधी बोअर झाला?
आय मीन - असं कधीच होत नाही कि सगळं कसं छान छान चाललय आणि आपण उठुन बसतो किंवा फॉर दॅट मॅटर आंघोळ करुन बाहेर येतो किंवा एखादं पुस्तक संपवतो आणि आपल्याला उजाडतं कि हार जीत राहिली दूर - आयुष्याची टेस्ट मॅच रटाळ ड्रॉ होतिए....."
"क्रिकेटच्या उपमा देऊ नको. नाहीतर चॅपेलची आई माई निघेल."
"चल नाही देत. पण लेस्टरला नक्की कळतं कधी कि जे आहे ते बदलायला पाहिजे? कि उगीच आपलं पिक्चरमध्ये दाखवायचं म्हणुन - एक बार जिंदगीके रुबरू आ बैठे - तगडक तगडक तगडक तगडक, टॅणॅ टिणी... - भाईसाब बेहेनजी, गुलजारकी दर्दभरी आवाज मे सुनिये - ’गम क्या है’ - जी नही ये फेविकॉल कि ऍड नही - ये है जिंदगीका मासूम सवाल....संगीत दिया है आर.डी. बर्मन ने, और फिल्म है ’आंधी’.....जी नही भाईयो - अंधी नही....ऑंधी...."
"और आप सुन रहे है फौजी भाईयोंका रंगारंग कार्यक्रम ’दादरुकी हवेली’.....
च्यायला पकवु नको.
उपाया बद्दल सांगत होतास."
"हो. तेच. उपायाबद्दलच सांगत होतो. म्हणजे पिक्चर आहे म्हणुन काहीही दाखवायचं. म्हणजे हा पट्ठ्या नोकरी बिकरी सोडुन भजी तळायला लागणार. याची पोरगी पळुन जाणार. बायको किडे करुन याची कन्फ्युजन्स मिटवणार. शेवटी याला स्वप्नातली पोरगी वगैरे मिळणार आणि ’सोडवायला प्रश्नच उरला नाही - आता काय करायचं’ अशी भिती वाटुन डायरेक्टर याला मारुन टाकणार....
च्यायला आमचा डायरेक्टर रुबरू सोड - ओळख दाखवायला तयार नाही...."
"च्यायला मगासपास्नं बघतोय - तुझं आपलं रुबरू रुबरू चाललंय. उपाय माहित नाही, पण मला आणखी एक प्रश्न म्हणजे - जगात एवढी लोकं आहेत, आणि हा प्रश्न जर सगळ्यांनाच पडतो तर यावर कुणी ’प्रश्न-उत्तर रुपावली’ का नाही लिहित? त्या रुबरू वाल्या गुलजारने काय केलं?
कधी कधी मला वाटतं कि राखीने त्याला सोडुन जायचं त्याने भांडवल नाही केलं.
तो एकच प्रश्न, एकच आठवण उगाळत बसला. दु:खात स्वत:ला कोंडुन घेतलं.
शोधत शोधत कधी जिंदगी आली कि - घे पेन, पाड कविता - केलं.
कंटाळुन मग जिंदगी निघुन गेल्यावर उगीच निरर्थक तिची शोधाशोध केली...."
"म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं.....किंवा स्वत:च्या शेपटीचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यासारखं!"
"भंकस उपमा नको देऊ.
च्यायला आवडली तर आणखी घोळ व्हायचा.
म्हणजे पुढच्या वीकेंडला आपण परत याच बार मध्ये. मी कुत्रा आणि -"
"मी शेपुट!"
"हो ना!"
"पण तुला असं नाही वाटत - लेस्टर जन्मत: दु:खी नव्हता. इनफॅक्ट तो आणि त्याची बायको - दोघेही.
मी ही ऑगस्ट बद्दल विचार करतो - या प्राण्याकडेही चांगल्या आठवणी आहेत. याच्याकडेही कर्तृत्व आहे. उगीच कुणी मटके मारुन आ.ए.एस. होत नाही. मग आता काय झालंय?"
"आता सुख झालंय.
नव्हतं तेव्हा मिळवायची आस होती.
शिक्षण, घर, गाडी, सुख.
पाठलाग चालु होता तेव्हा तो उपभोगायची उसंत नव्हती.
आता उसंत आहे तर सुख बोचायला लागलंय.
कदाचित त्या गुलजारचं असंच काही झालं असेल. यश, सुख, कौतुक, प्रसिद्धी इतकी झाली असेल कि त्याने आयुष्यभर पुरेल एवढं दु:ख निर्माण केलं. अजुन दळतोय...."
"मग दु:ख निर्माण करणं हा उपाय होऊ शकतो का - क्रायसिस वर?"
"आय डोन्ट थिंक सो.
मला वाटतं तो रड्या उपाय झाला.
झगडणं आणि नुसतंच झगडणं नाही तर झगडुन मिळवणं....त्या मिळवण्याच्या गार गार अनुभवाचा झणझणीत साईड एफेक्ट असा कि सशाला कासवाची जरब!"
"यु मीन स्पर्धा!"
"नाही स्पर्धा नाही आणि स्वत:च्या शेपटीचा पाठलागही नाही.
अभ्या म्हणतो तसं आता पुन्हा सिंदबाद सारखी शिडं उभारायची आणि शस्त्र पारजायची सुरुवात करायला हवी."
"अरे प्राण्या, पण तोच तर प्रश्न नाही का - लेस्टर आणि ऑगस्ट - दोघांनाही?
शिडं उभारणं आणि शस्त्र उगारणं ठीक आहे, पण जायचं कुठे आणि मारायचं कुणाला?"
"कुणाला म्हणजे? प्रॉब्लेमला!
ऍटॅक द प्रॉब्लेम.
हाण तिच्या मायला..."
"लेस्टर - यासाठी रेग्युलर बार मध्ये यावं.
३ वर्षांनी आलायस आणि तुला जास्त झालिए."
"दादरु - पकवु नको. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. यालाही असेल."
"हा शोध ’गुगल’ वर लावलास?"
"तसं नाही पण काय करायचं?"
"आय डोन्ट नो - मे बि वाट बघायची.
मी बघतोय.
ऑगस्ट परत यायची.
त्याच्या सबॅटिकल हुन.
मे बि तुला वाटतंय कि तो परत येईल तेव्हाही एवढाच कन्फ्युज्ड असेल.
मे बि.
मे बि नॉट!
होप फ्लोट्स मॅन...."
"होप फ्लोट होतो कि नाही माहिती नाही. पण आता मी फ्लोट व्हायला लागलोय. च्यायला झक मारली आणि तुझ्या सोबत बसलो."
"नाहीतर काय आयटम बरोबर बसुन रेहमान आळवला असतास?"
"मे बि!
मे बि नॉट!!
च्यायला - तु पण!!!
जाऊ दे घरी पळतो.
आणखी थांबलो तर मला घरी जाऊन उठाबशा काढाव्या लागतील!
पन बाय द वे - लेस्टरला तर पिक्चरमध्ये संपवला.
तो संपला नसता तर त्याचं काय झालं असतं?"
"तर पिक्चर लांबला असता!"
"कमॉन - सिरियसली!"
"टेल यु व्हॉट - रियल लाईफ लेस्टर संपला नसता.
इन फॅक्ट रियल लाईफ लेस्टर ने असे रॅडिकल डिसिजन्स ही घेतले नसते.
भजी तळणे ही इतिश्री नव्हे!
मे बि त्याने जॉब बदलला असता. मुलीशी नातं सुधारायचा प्रयत्न केला असता. सुट्टा मारला असता. स्वत:ला इम्प्रेस करायला जिम लावला असता. निर्हेतुक मनोरंजनासाठी अहिंसक मार्ग शोधले असते.
आय डोन्ट नो मॅन....
अशा क्रायसिस मध्येच मोठे लोक मोठे होतात का?
आणि मग स्वत:च्या लहान पोरांना सांगतात का कि - तुला काय माहित तुझा बाप काय चीज होती?
लाईफ हॅपन्स म्हणतात लोक. हे होणं, यातुन तरणं म्हणजे लाईफ हॅपन्स का?
यातुन तरणं म्हणजे काय?
आख्खं जग यातुन जातं तर कुणी यावर बोलत का नाही?
कि पराभुताला मत नसतं म्हणुन सगळेच गप्प?
आय मीन - फाईन.
आपापले मार्ग शोधत आपण यातुन सुलाखुन वगैरे निघु.
निघाल्यावर कदाचित बरंही वाटेल.
च्यामायला पण मग आपलीच स्टोरी दीना पाठक कुणाला तरी सांगत बसेल - आखिर जीत कछुएकी हुई. मगर ये भी कोई जीत हुई?
पण मग ससा तरी जिंकला का?
पण कुणीतरी जिंकलंच असणार!
सगळेच कसे काय हरणार?"
निघतो निघतो करत रात्री उशिरापर्यंत लेस्टर आणि दादरु गप्पा मारत बसले.
दोघांनीही आपापल्या विजय-पराभवाच्या कन्सेप्ट्स एकमेकांना ऐकवल्या.
हायपोथेटिकल प्रश्नांवरच्या हायपोथेटिकल उत्तरांवर चर्चा केली.
पुन्हा भेटुयात म्हणत एकमेकांची नावं विचारायला विसरुन गेले.
तो बारही नंतर बंद पडला.
दोघांनीही गावं बदलली.
दोघांनीही आपापल्या प्रश्नांकडे कानाडोळा करत दुसऱ्याने त्याच्या प्रश्नावर काय केलं असेल याचे आडाखे बांधले.
दोघंही (एकेकटे) जेव्हा विचार करतात तेव्हा दोघांनाही एकमेकांची आठवण येते.
दोघांनाही दिवसांच्या, तासांच्या, डेडलाईन्स च्या रुटीन मधुन छोटे-छोटे ’रुबरू’ प्रश्न विचारायला आणि सोडवायला वेळ मिळाला नाही.
दोघंही तो ’मिड-लाईफ’ क्रायसिस येईल तेव्हा पाहु म्हणत त्याची वाट पहात राहिले.
तो आलाच नाही.
किंवा तो आला पण त्यांना कळलाच नाही.
दोघंही त्यातुन तरले आणि उरले.
हल्ली दोघांनाही स्वतंत्रपणे दीना पाठकची भिती वाटते.
आणि गुलजार त्यांना हसत बसलाय.