Monday, July 31, 2006

स्पॅघेटी ते बरिटो 'बोल'

वीकेंड चांगला गेला.

शुक्रवारी मीच अजित ला म्हटलेलं कि घरीच जेवू. बटाट्याची भाजी करीन.
तो सहाला निघाला पिट्सबर्गहून, पण मला ऑफ़िसमधून निघता निघता आठ वाजले. तिथुन पुढे (मागच्या महिन्याभरात न केलेली) ग्रोसरी, मग तांदुळ विसरलो म्हणून परत हेलपाटा, घरी येउन बटाटे उकडायला ठेवले तेवढ्यात लक्षात आलं कि (माधुरी ने वारंवार आठवण देउनही) टोमॅटो प्युरी राह्यली. तोवर हे लोक बेल्टवेवर पोचलेले. अजित 'चिपोटले' मध्ये जाण्यात फार उत्सुक नव्हता. देसी रेस्टॉरंट मध्ये मी. अजितला जबरा भूक लागलेली. घरही आवरायचं होतंच. मग म्हटलं उगीच घाई करण्यापेक्षा पटकन होईल अशी स्पॅघेटी करावी. (न विसरता आणलेली) बिअर आणि स्पॅघेटी मस्त बेत होइल.

हल्ली मी स्पॅघेटी छान करायला शिकलोय. पुर्वी नूडल्स सारखी करायचो. फूड नेटवर्क वर बघून बघून बर्याच सुधारणा होतायेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात - फोडणी टाकुन कांद्याच्या आधी ढोबळी मिरची थोडी बारीक चिरुन फ्राय करायची. मग थोडा मोठा कापलेला कांदा (लांब नव्हे, मोठा) थोडा कच्चा राहिल असा फ्राय करायचा. आलं लसुण तव्याला चिकटून काळे पडतात, त्यामुळे तिकडे लक्ष द्यायचं, बाजुला स्पॅघेटी शिजत असतेच. मग काय - थोडा मसाला, भरपूर स्पॅघेटी सॉस, मीठ - स्पॅघेटी वाईट होऊच शकत नाही. पुढच्या वेळेस रेड वाइन मध्ये मॅरिनेट केलेलं चिकन वापरायचा विचार करतोय. मीटबॉल वगैरे अजून करता येत नाही म्हणून बीफ ची भूक चिकन वर....
बॅकग्राऊंडला छान गाणी, निवांत केलेला राजमा अथवा चिकन, हाताशी असणारी, जिभेवर (अजुन) विरघळणारी, पॅलेट मध्ये रेंगाळणारी लालचुटुक मर्लो, मी सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवतोय याकडे लक्ष द्यायला माधुरी असेल तर दुधात साखर!....
स्वैपाक बनवणे 'कॅन बी अ व्हेरी रेलॅक्सिंग एक्सपीरियन्स'!!
कधी बायकोला कामाच्या रगाड्यातून सुट्टी देऊन असा प्रकार करुन पहा.....मर्लो काय मार्गारिटाचीही परवानगी मिळेल!!!

टी.व्ही. वर पकाउ कार्यक्रम आणि थोडा 'मुन्नाभाई' बघत जेवण झालं. मग रात्री उशिरापर्यंत गप्पा. मी पुढच्या ब्लॉग वर काय लिहिणार याबद्दल अजित आणि विकी चे तर्क ऐकुन मात्र मजा आली. अजितचं सकाळ संध्याकाळ पल्लवीला 'हाजरी' देणं चालू होतं. तिला ह्याचे (हार्ड ड्रिंक्स ने) सर्दी घालवण्याचे प्रकार ऐकून नक्कीच टेंशन आलं असणार.

शनिवार उशिरा उजाडला.
मी उठेपर्यंत दोघंही तयारही होऊन बसलेले.
तिघांनाही खूप (बफे शिवाय न भागणारी) भूक लागलेली -
अजित (सद्ध्या) नॉनव्हेज खात नाही, म्हणून चायनीज कटअप. मला तो उर्मट मालक आवडत नाही म्हणून 'इंडिया पॅलेस'. म्हणून मग 'अकबर' ला निघालो होतो ते 'काठमांडु किचन' ला पोचलो! (जाते थे जापान पहोंच गये चीन समझ गये ना!). मग (सहनाववतू सहनौ भुनक्तु म्हणुन) मटण, चिकन, (अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी) बटाट्याची भाजी, पालक पनीर, खीर, गुलाबजाम असा (खाते पिते घरके बढते बच्चोंका) आहार करून बाहेर पडताना चालवंत नव्हतं.

तिथुन निघून गनपावडर फॉल्स जवळच्या माझ्या आवडत्या स्टील ट्रस ब्रिज कडे निघालो ते एका दाट जंगलानं वेढलेल्या तळ्यापाशी जाऊन पोहोचलो. (परत एकदा - जाते थे जापान.....).
फोन वर बोलता बोलता अजित जंगलात हरवला! (म्हणून याला आम्ही कुठे नेत नाही.)
जंगलात!
ते ही फोन वर बोलत!
मग - 'जातोय कुठे? येईल' म्हणत मी आणि विकी तळ्याकाठी बदकं आणि बगळे बघत बिडी मारत बसलो.
परत निघालो ते आम्हीपण गंडलो. च्यायला अजित माझी चप्पल घालून फिरत होता म्हणून मी माझी (लग्नातली) कोल्हापुरी घालून बाहेर पडलेलो. (असं जंगलात हरवणार माहित असतं तर शूज नसते घातले?). मग चपलांवरून घसरत गाड्यांच्या आवाजाच्या दिशेने जात मध्येच दाट जंगल साफ करून आकाशातून पडलेल्या मीटिऑरॉईड सारख्या दगडाजवळ पोहोचलो.
विकीने हात देऊन वर खेचलं.
तेवढ्यात फोन वाजला.
त्या किर्र जंगलात उंच दगडावर उभं राहुन (फोन वर) बोलताना मला टारझन झाल्यासारखं वाटलं!
फोन वर अजित.
'अभ्या कुठंयस?'
'मला माहित नाय मी कुठंय, तुला काय कप्पाळ सांगू?'
एका कानात अजित तर दुसर्यात विकी - 'आवाज आवाज' कि असंच काहीतरी - म्हणत ओरडत होता.
मग अजित 'अभ्या थोडा हाल' म्हणाला.
तो कुठंय माहिती नसल्याने मी शंकरपाळी शेप मध्ये चारी दिशांनी हललो.
मग 'दिसला दिसला' ची आरोळी. (दोन्ही कानात).
अजित आमच्या पासुन ३०-४० फुटांवर. मध्ये थोडा उतार आणि त्यावर गवत. पण त्याला आमच्यापर्यंत पोचायला १० मिनिटं लागली.
मधेच तो 'अरे अभ्या मधे पाणी दिसतंय' म्हणाला.
'च्य़ायला पाण्यातल्या मगरी वगैरे नाही का दिसत?' म्हणायची हुक्की मनातच ठेवत त्याला येऊ दिला.

तिथुन निघून मग अंकलकडुन 'बीईंग सायरस', 'डरना जरुरी है', मॅंगो ज्यूस आणि 'पॅडोनिया लिकर्स' मधुन जॅक डॅनियल्स चा खंबा घेऊन घरी आलो.
टी सी एम वर 'ट्वेल्व्ह ऍंग्री मेन' लागलेला. मी अजुन हेन्री फोंडा चा वाइट पिक्चर बघायचोय, पण हा म्हणजे ड्रामा मधला कहर पिक्चर. विकी ने पाहिला नव्हता. मग अजित ने झोपून, मी पेंगत आणि विकी ने जागून - तो पिक्चर बघितला. मग तो संपल्यावर यथासांग चर्चा. पिक्चर मधल्या जाणकार लोकांसोबत चांगला पिक्चर पाहून त्यावर चर्चा - सारखा आनंददायक प्रकार नाही. (बर्याचदा मीच सगळ्यात जाणकार असल्याने तो प्रकार मलाच जास्त आनंद देतो हा प्रकार वेगळा).

मग 'बापरे - वेळ कमी आहे!' करत खंबा, स्प्राईट, तीन ग्लास, (वरच्या कप्प्यात सापडलेला दोन महिन्यापुर्वी भारतातून आणलेला) चिवडा.....सॉरी - चकणा. (आम्ही चिप्स खात नाही. आमचे वजन कमी करण्याचे - अर्थात अयशस्वी - प्रयत्न चाललेत.)
जोडीला 'डरना जरुरी है' हा तद्दन मल्टिप्ले़क्स पिक्चर.
चढत असलेल्या नशेला पिक्चर साथ देईना म्हणून मग अजित ने काल उकडलेल्या (आणि अजून मायक्रोवेव्ह मध्येच असलेल्या) बटाट्यांचे चिप्स (कि असलेच काहीतरी) करायचे ठरवले. मन लावून (एकावेळेस एक) बटाट्याचे तुकडे तळणाऱ्या अजित कडे पाहून कंटाळा आला म्हणून मग मी (आयत्या) ऑडियन्स ला कमलेश वालावलकरच्या 'बाकी शून्य' चे उतारे वाचून दाखवले. (हे पुस्तक 'कोसला' च्या तोडीचं आहे यात शंकाच नाही. च्यायला हा काय, तो सलील वाघ काय किंवा ते नेमाडे काय - मराठी वरणभाताला न पचलेली ही दुर्दम्य स्वप्न आहेत.) असो.
मग थोडं 'रारंग ढांग'.
थोडं 'राधेय'.
मग महाभारतकालीन पुराणकथांवर चर्चा. (इथे माझी नेहमीच गोची होते - मला 'सीरीयसली' पांडवांची नावं 'आठवायला' लागतात).

मग विषय बदलत - पुरेल का? कि आणखी आणायची? आधी बियर पिऊ मग व्हिस्की - म्हणजे चढेल वर चर्चा करत गाडी पुन्हा 'भूक' स्टेशनावर.
मग चकण्यापेक्षा भूक महत्वाची यावर एकमत होऊन (भावी) चकणा म्हणून उकडत (अजित च्या भाषेत उकळत) असलेल्या अंड्यांची - अजित च्या हातची लाजवाब अंडाकरी! (पराग याला बैदा करी म्हणायचा.)
मग रात्री कधीतरी (होश तळ्यात मळ्यात होत) 'सायरस' च्या साथीत झोप.

रविवार नेहमीसारखाच उदास उजाडला.
आमच्या आधीच (परत) भूक हजर.
अजितला शचीचं काही सामान द्यायचं होतं, म्हणुन मग 'चिपोटले'त कार्निटाज घालून बरिटो बाउल (शचीच्या भाषेत 'बरिटो बोल') ओरपून अजित आणि विकी परतीच्या मार्गाला लागले आणि मी 'द रोड्स....', झोप, बायकोशी (फोनवर) गप्पा आणि उरलेली दारु संपवणे या वीकेंडच्या नेहमीच्या कामांमागे लागलो.

दरम्यान शनिवारी सत्यजित ला मुलगी झाली.
इला - छान नाव ठेवलंय त्याने.
सत्यजित, अनघा आणि इला.....तुम्हा तिघांचेही अभिनंदन!

Friday, July 28, 2006

वीकेंड

बास.
डिक्लेअर.
लई झालं.
हा वीक संपला.

वीकेंडला अजित आणि विकी येतायेत पिट्सबर्गहून. त्या निमित्ताने घर साफ होईल. खास काही प्लॅन नाहिये. अजित म्हणाला काही करूही नकोस. एकतर उकाडा मरणाचा आहे. वीकेंड वेदर चेक केलं तर ह्युमिडिटीही खूप. या वर्षी समर एकटाच काढायचा असल्याने एसी चालू करायचा नाही असं ठरवलं होतं. भारतातल्या सगळे ऋतू 'अंगावर' काढण्याच्या सवयीने एका फॅन ने समर टॅकल करता येतो ही खात्री पटलिये. मागच्या वर्षी जून मध्ये या जून पेक्षा ४ पट वीज जास्त वापरली होती! बिल चौपट कमीच पण बीजीई ने मला ३ डॉलरचं बक्षीसही दिलंय!
पण बहुतेक हे दोघे आल्यावर मला एसी चालू करायला लागणार.

वीकेंड ला काय करायचं?
आत्ताच थॉमस येउन गेला. वीकेंड चा काही प्लॅन आहे का विचारायला. हाइक वगैरे ला जायला आवडेल पण या दोघांचा उत्साह किती आहे त्यावर ते अवलंबून.
विकी माझा मामेभाऊ आणि अजित खूप जवळचा मित्र.

बाय द वे बाबा - ते 'सिगरेट ओढण्या एवढ्या तीव्र वैतागाचं कारण' म्हणजे लग्न. टु बी स्पेसिफ़िक - लग्नातला बॅंड!
अरे काय कटकट असते यार एकेक कार्यक्रम जमवून आणणे म्हणजे.....
शेवटी मला जसं नको होतं - अगदी त्याच प्रकारे - ते यथासांग पार पडलं.

पिक्चर टाकावा एखादा - 'ओंकारा' अजून आला नसेल. अजित ला 'भोपाल एक्स्प्रेस' दाखवायचा विचार आहे. च्यायला त्या अंकल ची 'वॉरियर' परत करायचिये.
बाकी दारू वगैरे पीत मराठी गाणी.
विकी ला 'अवेळीच केव्हा दाटला अंधार' भलतीच आवडायला लागलिये. तो मराठी गाणी कविता वाचायला लागला याचा त्याच्या आई पेक्षा जास्त मोठा धक्का त्याला स्वत:ला बसला. आता म्हणे भारतात जेवढा मराठी बोलायचो त्या पेक्षा जास्त इथे अमेरिकेत येऊन बोलतो!
त्याला कधी कधी संदिप खरे वगैरे पण समजावून द्यावा लागतो पण काही का असेना - ब्लॉग ला आणखी एक 'हक्काचा वाचक' मिळण्याची शक्यता तर निर्माण झाली! हे ही नसे थोडके!!
बाकी संदिप हल्ली बरेचदा वैताग कविता लिहायला लागलाय. या इंडिया ट्रिप मधे इतर अनेक अशक्य प्लॅन्स सारखा त्याला भेटून झापायचा प्लॅन होता - पण राहुल म्हणे हल्ली तो फार फेमस झालाय. त्याला शेवटचं भेटून ५ वर्ष झाली. राहुलच्या लग्नातुन कल्टी मारून सिंहगड रोड ला भर दुपारी टल्ली झालो होतो, तेव्हा तो (त्याच्या जड आवाजात) म्हणाला होता - रोज काहीतरी लिहित रहा. हळूहळू कविता करायला लागशील.
बहुतेक हल्ली तो रोज एक 'काहितरी' कविता करतो. (आणि हळुहळु त्याचा दर्जा घसरत चाललाय).

भारतातल्या प्लॅन्स वरून आठवलं - अनंत सामंतांना भेटायचं होतं!
कैक वर्ष त्यांना पत्र लिहीन लिहीन म्हणत टाळाटाळ केली. ५ वर्षांपुर्वी (च्यायला पाच वर्ष पाच वर्ष फारच करतो का मी? मलाच आता असं वाटायला लागलंय कि पाच वर्षांपुर्वी माझ्या आयुष्यात बर्याच ऐतिहासिक घटना घडून गेल्यात!) निघताना (पुन्हा एकदा राहुल च्या वशिल्याने) सामंतांशी फोन वर का होईना - मनभर बोललो.
त्यांनी अगदी त्यांच्या भाचीचा वगैरे फोन नंबर देऊन भेटायला, त्यांना पत्र लिहायला आणि आवर्जून त्यांच्या गोष्टिंमधल्या न आवडलेल्या गोष्टी लिहायला सांगितलं होतं. त्या वेळेस वाटलं होतं कि त्यांच्या गोष्टींच्या एवढा प्रेमात पडल्यावर त्यांना काय कप्पाळ सांगणार मी - कि हे आवडलं नाही, सुधारणा करा म्हणून!
म्हणुन मग मागची पाच वर्ष (पुन्हा पाच वर्ष) - त्यांच्या गोष्टी परत वाचणे, कथावाचन, त्यांच्यावरचे (पॉसिबल) एन्फ़्ल्युअन्सेस (इज्राईल, जॅक लंडन, प्लॅटून आणि तत्सम वॉर मुव्हीज, मराठ्यांचा (लिहिलेला) इतिहास, आरमार) यावर थोडा रिसर्च झाला.
रिसर्च वगैरे म्हटल्यावर भारी वाटतं ना?
ऍक्चुअली तसं काही नाही - वाचत गेलो, बघत गेलो आणि असं वाटलं - अरे या माणसाने हे पाहिलं असेल... इथला रेफ़रन्स तिथून! इथे फॅक्ट सॅपते - इमॅजिनेशन सुरू. इथे इमजिनेशन संपतं - शब्दच्छळ सुरू.
कधीकधी वाटलं सामंत एवढे ग्रेट नाहीत जेवढे वाटतात, पण जितकं जास्त (त्यांच्या व्यतिरिक्त) वाचत गेलो तेवढं हे पटत गेलं कि साला माणसात धमक आहे!
थोडंफार लिहायचा प्रयत्न केला तर जाणवलं - च्यायला या तोडीचं, या विषयांवर लिहायचं म्हणजे नुस्ता बोटात नाय तर **त दम पाहिजे!
अजुनही त्यांच्या गोष्टी गरम रक्ताएवढ्या 'लाईव्ह' वाटतात!!
बरं सांगायचा मुद्दा - ते ही राहून गेलं.

च्यायला आजचा विषय काय?
अजित-विकी, वीकेंड, संदिप, सामंत.....

दारूचा मूड नाहिये.
हल्ली दारूचा वाईट नॉशिया आलाय.
तेच बिडीचं.
पण तरीही सवय म्हणून बिडी चालू.

वीकेंडच्या वैयक्तिक प्लॅन्स मधे 'द रोड्स दॅट बिल्ट अमेरिका' हे पुस्तक वाचायचंय. परवा ऑफिस च्या लॉबीत दिसलं - जॅकी (आमची सेक्रेटरी - म्हातारी आहे - आधीच सांगून ठेवतो!) म्हणली तुला पाहिजे तर घेउन जा. वाचून परत आणून दे. काल आणलंय आणि हातातुन खाली ठेववत नाहिये. अमेरिकेतल्या रोड्स च्या इतिहासाचं उत्तम फोटोंसहीत केलेलं उत्कृष्ठ वर्णन! (इतिहास आणि लिखाण - यावर अखिल भारतीय अनिच्छेबद्दल मी न बोललेलं बरं).

वीकेंडला लिहायचा मूड आला तर बघु, पण तोवर अभ्या, बाबा आणि अश्विनी यांना रिप्लाइज टाकल्याबद्दल धन्यवाद.
अमित, स्वप्ना - रिप्लाय न टाकताही ऍटलिस्ट वाचताय तरी म्हणून तुमचेही!

Thursday, July 27, 2006

हुरहुर

आजचा नविन शब्द -
माझा असा समज होता कि 'भो' हा मराठी शब्द 'भो****' या शिवीचा शॉर्ट फ़ॉर्म म्हणून वापरला जातो!
पण आज कळलं कि तसं काही नसून तो एक संस्कृत शब्द आहे - इंग्रजी 'ड्यूड' ला समान अर्थी!! उदाहरणार्थ - 'कसं काय भो?' म्हणजे 'वॉस्सप ड्यूड?' - हे भारी!

दिसामाजी लिहीत जावे
(न सुचल्यास इतरांचे ढापावे?)

चलो आज एक अनुभव सांगतो -

भारतात गेलो होतो तेव्हा असाच काहीतरी वैताग झाला. लग्नाच्या काही दिवस आधी. नक्की काय ते आठवत नाही. (ऍक्चुअली आठवतंय, पण आत्ता नको - नंतर कधीतरी). पण असा वैताग कि ज्या नंतर बिडी मारणे आवश्यक. रंजू (माझा लहान भाऊ) त्याच्या 'व्हेज' रेस्टॉरंट मधे असल्या 'नॉन व्हेज' गोष्टी ठेवत नाही. १२ वाजून गेलेले. गाडी काढली, म्हटलं सुनील शेट च्या 'लिलीज गार्डन' मध्ये नक्की मिळेल.
गेलो.
वॉचमन हॉटेल चं गेट अडवून.
'बंद झालंय'
'सिगरेट पाहिजे'
'उद्या या'
'बापाला जाऊन सांग'
त्याला ढकलून गार्डन मध्ये गेलो.
ऑफिशियली बंद झालं तरी 'चंद्रप्रकाशात' 'सुरापान' जोरात चालू होतं.
दरवाजा उघडून आत गेलो तर धुराचा लोट धावून अंगावर.
झणझणीत चिकन मखनीचा जळजळ वास छातीतून पोटात.
अंधूक प्रकाशात सुनील शेट चं 'लेट नाइट' गिऱ्हाइक जोरात.
त्यांना वर बघायलाही वेळ नाही.
'सिगरेट?'
'आहे'
'गोल्ड फ़्लेक मोठी'
सुनील शेट ने वर पाहिलं, मला वाटलं आता हा माणुस मला ३ वर्षांनी बघून आनंदाने हुरळून वगैरे जाणार. ३ वर्षांच्या 'गटारी' एका रात्रीत साजर्या करणार!
पण हा माणूस मख्ख!!
'चार रुपये'
च्यामायला....बाहेर तीन ला मिळणारी सिगरेट इथे चार ला!
त्यांच्यासमोर दहा ची नोट आपटली.
त्यांनी 'टाइट' गिर्हाइकाकडे सवयीने खुन्नस ने पाहिल्यासारखं माझ्याकडं पाहिलं.
ओळख पटली.
तू कोन मी कोन (कोण नव्हे - कोन) पासून आम्ही तु कसा मी कसा वर पोचलो.
'सिगरेट चे पैसे दिले तर माराल का?' वर 'प्रश्नच नाही' ने गाडी 'काय घेणार?' कडे जायला लागली.
पण मूड नव्हता.
एमएम चं आग्रहाचं निमंत्रण टाळून बाहेर आलो.
सिगरेट पेटवली.
बाहेर - 'तो कोण समजतो स्वत:ला? लाख रुपये तासात उभे करीन' ची गुंठेपाटिलगिरी ढगात पोचलेली.
च्यायला जरा शांततेची, कुणी ओळखणार नाही - अशी जागा भारतात सापडणं मुश्किल.
पुण्यात अशक्य.
रस्त्यावरच्या दिव्याजवळच्या झाडाखालच्या अंधारात जाउन उभा राहिलो.
समोर एक ट्रक, वेड्यावाकड्या लावलेल्या स्कुटर्स, मोटरसायकल्स, रस्त्यावरची तुरळक वर्दळ आणि ते!
दोघे.
ती - अशक्त, बुटकी, आजारी. चाळिशीची असेल पण गरिबीने आणखीनंच म्हातारी दिसणारी. त्याला बिलगलेली.
तो - तिचा मुलगा असावा. १५-१६ चा.
तिला धरून उभा.
हातात कापडी पिशवी - कपडे भरलेली.
मी सिगरेट च्या धुराने डोक्यातली आग विझवायच्या प्रयत्नात.
तेवढयात एक शूर मराठा तोल सांभाळत आणि हरवलेला घोडा शोधत त्यांच्या जवळ.
'काय रं?'
'काय नाय. आय आजारी हाय. डाक्तर ला दावायाला पुन्याला आल्तो पन नातेवाइक घरात घेइनात.'
'कुटं जानार?'
'......'
जेव्हा त्यानं खिशात हात घालून काही चिल्लर काढून त्याच्या हातावर ठेवली तेव्हा खरं तर कौतुकाने मी 'याला याचा घोडा लवकर सापडो' चा आशिर्वाद दिला.
मराठा गेला.
ते तिथंच.
मी ही.
माझ्या डोक्यात कल्लोळ.
मी पुढं होऊन त्याला पैसे द्यावेत का?
कि आधी ही सिगरेट संपवावी?
मी कधी कुणाला भीक देत नाही - मग हे योग्य का?
पण तो भीक मागतंच नाहिये - मग हे अयोग्य कसं?
मी कुणाकुणाचे किती प्रॉब्लेम सोडवणार?
च्यायला खिशात पैसे किती - १० आणि २० ची नोट.
भेंडी - सुट्टे पण नाहियेत.
परत सुट्ट्यासाठी सुनील शेट कडे जाणं बरोबर दिसत नाही.
भोसडीच्या अभ्या - दोन्ही नोटा मिळून ६० सेंट होतात. भेंडी अमेरिकेत एक पाण्याची बाटली सव्वा डॉलरची घेतोस. बियरची दोन! पण कुणाला मदत करायला दानत लागते. भीक द्यायला नाही - मदत करायला दानत लागते. तुझ्यात आहे? रिटर्न्स मिळणार नाहीत म्हटल्यावर चिल्लरसाठी जीव वरखाली होतो.
तत्वांचं स्तोम कुणासाठी?
कुठे?
ती समोर तुझी गाडी.
मोकळा रस्ता.
तुला आडवायला कुणी नाही.
तू मदत केली नाहीस हे कुणाला कळणारही नाही.
जा ना....
निघुन जा.
हाकल.
का? सिगरेट संपवायचिये? आवडतिये? किती? चार कि तीन रुपये? कि फुकट? ते चालतं?
भेंचोत उभ्या उभ्या माझा पिंजरा झाला.
स्वत:चीच लाज वाटली.
खाली मान घालुन त्याच्याकडे चालायला लागलो तेव्हा जाणवलं - भेंडी याला गट्स लागतात.
मला आत्ता या क्षणी त्या अंधुक प्रकाशातली रस्त्यावरची खडी आठवतेय.
आणि माझ्या छातीवरचं दडपण.
त्याला काही न विचारता, बोलु न देता, त्याच्या खिशात पैसे ठेवताना त्याला म्हटलं - असु दे. लागतील.

मागे न बघता रंजूकडे पोचलो तर तो वाटच बघत होता.
मला बघुन म्हणाला काय झालं?
त्याला सांगितल्यावर म्हणाला - अरे दाद्या, अशा वेळेस आधी जेवलाय का विचारायचं.
जेवू घालायचं.
तो ते पैसे स्वत:चं पोट भरायला वापरणार नाही. अशा अपरात्री त्याला कुठे काही स्वस्त मिळणारही नाही.
मी आधीच जखमी होतो. आता मला मेल्यासारखं वाटायला लागलं.
माझ्या लहान भावाला जे सुचलं ते मला का नाही?
त्या वॉचमनवर मी विनाकारण गुरकलो तो त्यांना तिथे उभं पण राहू देणार नाही.
सुनील शेट कडे मी त्यांची जेवण्याची व्यवस्था सहज करू शकलो असतो......

२ महिने झालेत पण मला तो प्रसंग अजून छळतोय.
ते दोघं सुखरूप असतील ना?

Tuesday, July 25, 2006

सिक्स्थ सेन्स

२५ जुलै - पुन्हा घरी.

अभ्या ने पाठवलेले ट्युलीप आणि कुणा श्रद्धा चे ब्लॉग्स वाचले.
च्यायला एवढ्या कन्सिस्टंट्ली चांगलं लिहिणं अवघड आहे.
पण ब्लॉग लिहायला लागल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या आणि चांगल्या कमेंट्स मिळाल्यात.
हे मराठीत लिहायल्या लागल्यामुळे कि चांगलं लिहायला लागल्यामुळे हे माहीत नाही. पण कुणीतरी मी लिहितोय ते वाचतंय हा ब्लॉग लिहाण्यामागचा हेतू सफ़ल होतोय. प्रसिद्धीचा हव्यास आहेच, तो मायक्रो लेव्हल वर का होईना पण पूर्ण होतोय.
माझी बायको मात्र अतीच. तिला काल माझं लिखाण ट्रान्सलेट करून सांगितलं. मग विचारलं मी फार सीरीयस तर लिहीत नाही ना? ती म्हणे - छे. तू छान लिहितोस. मला वाटतं तू पुस्तकं लिहावीस. (म्हणजे ती खरं बोलतिये कि टर उडवतिये हे कळणं कठीण.)

बाबा - एसी माझ्याच फ़्लाइट मध्ये होती!
मग आम्ही जी काय धमाल केली याबद्दल चा तुझा कुठलाही तर्क हा परिस्थितीपेक्षा चांगलाच असणार याबद्दल शंका नाही.

पण मायक्रोसॉफ्ट 'पिकनिक' बद्दल सांगतो.

रेडमंड मध्ये गेल्यावर (रेडमंड हे सिऍटल चं उपनगर - तिथे माझी ही दुसरी सफर) - तर तिथे गेल्यावर १ टक्का गोरे, ०.५ टक्के काळे आणि उरलेले देसी आणि चिंकू दिसतात! इतके कि आता देसी दिसला तर मी ओरडणार म्हटलो आणि ५ मिनिटातच माझा घसा दुखायला लागला. जिकडे तिकडे भटकणारे देसी, साड्या, लुंग्या, गजरे, मुलाकडे रहायला येउन एकत्र फिरायला निघालेले पालकांचे घोळके, नवर्याची वाट बघून 'एव्हनींग वॉक' ला निघालेल्या 'सॉफ्ट्वेअर प्रोफ़ेशनल्स' च्या बायका, टेल्को कपल्स, पोरी बघत फिरणारी देसींची टोळकी, 'जमान्याला न भिता' दिसेल त्या गोरीला भिडणारे ईबीसीडी (ईंडिया बॉर्न कन्फ़्यूज्ड देसी), त्यांच्यावर खार खाउन असणारे आणखी ईबीसीडीज, त्यांनी पार्किंग लॉट मध्ये केलेली बेशिस्त, पायी चालताना सिग्नल न पाळून केलेला 'हमसे है जमाना' चा माज पाहून हसायला आलं. तिच्या *****......

आता नेहमीसारखं तुम्ही माझ्यावर 'देशद्रोही' म्हणून हल्ला करण्या आधी सांगतो - हे वातावरण मला 'ओशो कम्युन' च्या वातावरणासारखंच कृत्रीम वाटलं. माझा देसींवर खार नाही. याच सगळ्या गोष्टी आपण भारतात ऍक्सेप्ट करतो. पर इधर कुछ हजम नही हुआ.

आयोडेक्स आणि डिस्को बरोबर जेवायला गेलो. (हे शब्द माझ्या बायको समोर उच्चारलेत तर माझ्याशी गाठ आहे!). तसे चांगले लोक आहेत. दुसर्या दिवशी त्यांनी घरी बोलावलं. गेलो तर हे स्वत: गायब! मग (चिडून) बायको बरोबर 'यू मी ऍंड ड्युप्री' पाहिला (चांगला पिक्चर आहे - पहा). माझी ग्रॅड स्कूल मधली एक कलीग क्रांती (हे तिचं खरं नाव आहे) आणि तिच्या नवरयाबरोबर रविवारी लंच चा प्लॅन होता. तो तिचा दीर भारतातून आल्याने तिने रद्द केला. (बहुतेक लोक मला टाळतात. एज इट जस्ट मी ऑर .....)
च्यायला गेले ****त. (च्यायला माझ्या वाचकवर्गात अर्ध्या महिला आहेत त्यामुळे शब्द फारच गाळून वापरायला लागतायत.)

शनिवारची ऍक्च्युअल 'पिकनिक' मात्र फारच छान होती.
आय-९० हून एक्ज़िट घेतल्यापासून व्यवस्थीत दाखवलेल्या डायरेक्शन्स, शिस्तबद्ध पार्कींग, मिहिती देणारा, प्रत्येक गोष्टीची बडदास्त ठेवणार लोकांचा ताफा, वेगवेगळ्या देशांतले पदार्थ, दारू (!), पण मला सगळ्यात जास्त आवडलेला प्रकार म्हणजे बॅकग्राउंडला असलेला रांगडा पहाड.

कधी कधी मला जबरदस्त सिक्स्थ सेन्स असल्यासारखं वाटतं. साउथ ईस्ट ओहायो च्या जंगलांत मयुरेश च्या प्रोजेक्ट वरती किंवा माइक बरोबर हॉलो क्रीक मध्ये शिरल्या शिरल्या इथे भयंकर नरसंहार होऊन गेलाय असं वाटायचं - भिती वाटायची. ऍपॅलॅशीयन्स च्या पूर्वेचा ईस्ट कोस्ट मात्र जरा जास्तच माणसाळलेला वाटतो. कॅनडा कोकणातल्या एखाद्या खेडेगावासारखा प्रेमळ वाटतो. कधीही आत न शिरताही सासवडच्या पुरंदरे वाड्याची गूढता आकर्षित करते तशीच नळदुर्गाची ओढही. यातला कुठलाच इतिहास माहित नाही, किंवा असलाच तर अंधूक. पण या जागा ओढ लावतात.
तसंच काहीतरी सिऍटलच्या आजुबाजूचे डोंगर करतात.
पण भिती दाखवत नाहीत.
असं वाटतं कि समोर दिसणारा कुठलाही डोंगर चढून गेलो तर तिथले भिल्लांसारखे इंडियन्स बाणावरती खोचलेलं प्रेम घेउन मिठी मारतील. इथल्या दरीखोर्यांतल्या गोष्टी सांगतील.....म्हणतील - हा दगड 'डान्सेस विथ द वुल्व्ह्ज' चा, हे झाड 'लास्ट ऑफ द मोहिकन्स' चं, तिकडे जाउ नका - तिकडे 'लीजंड्स ऑफ़ द फ़ॉल' चे ऍंथनी हॉपकिन्स आणि ब्रॅड पिट भेटतील. हे असे इकडे या - आणि समोरच्या 'आमच्या' कोकणकड्याच्या शब्दातीत सौंदर्यात नि:शब्दपणे हरवून जा.

दुर्दैवाने आपल्या इतिहासाची कुठे नोंद नाही पण जावळीच्या जंगलात दिवसाढवळ्या रातकिड्यांचा आवाज कान बधीर करत इतिहासातल्या अथ पासून इती पर्यंतच्या माझ्या मातीतल्या माझ्या माणसांच्या अस्मानी सुल्तानी झुंजींची ग्वाही देतो. वासोट्याच्या दरीत, हरिश्चंद्र गडाच्या गुहेत, रतनगडाच्या नेढ्यात, तुंगवडीच्या धुक्यात 'इथे काहितरी होऊन गेलंय' ची, कुणीही कधीही न लिहिलेल्या माझ्य़ा इंडियन्स ची, त्यांच्या सांडल्या रक्ताची जाणीव - दोन वीत भाता दोन बोटं मोठा करते......म्हणजे जे जे काही होतं ते असा रानवट निसर्ग समोर शड्डू ठोकून उभा राहिल्यावर होतं.

याला भिडायला जिगरा पाहिजे.

कदाचित तो ही मला बघुन हेच म्हटला असेल!

ता. क. - हे शेवटचं वाक्य टाकताना हजारदा विचार केला.
पण म्हटलं - भेंडी जगायचं तर शान मधे जगू!
मग व्हैल ते जाइल भें****.

Monday, July 24, 2006

२४ जुलै, घरी (बाल्टिमोर)

२४ जुलै, घरी (बाल्टिमोर)

८ तास चाललेला इंटर्व्ह्यू चांगला झाला आणि जॉब मिळाला हे सांगायला विसरलोच!
पण तो जॉब ऍक्सेप्ट करायचा कि नाही हा आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा प्रश्न.
याच्यावर काही बोलण्याआधी -

चि. विश्वनाथ यास
अनेक उत्तम आशिर्वाद.
तुझे पत्र पावले. मुंबईतली नोकरी सोडून हिमालयात रस्ते बांधण्याच्या कामावर तू दाखल झाल्याचे समजले.
एक नोकरी तू का सोडलीस हे जसे समजले नाही, तसेच दुसरी का घेतलीस हेही समजले नाही. केवळ चरितार्थाची सोय हा तुमच्या नोकरीचा उद्देश आणि चांगली नोकरी मिळवणं हा तुमच्या जीवनाचा उद्देश असतो काय, हे माझ्या सारख्या आयुष्याची संध्याकाळ झालेल्या माणसास समजणे कठीण आहे.
कारण आमच्या वेळी तसे नव्हते. निदान माझ्या बाबतीत तसे नव्हते. त्या वेळची माणसे 'स्वातंत्र्य' या शब्दाने, विचाराने झपाटलेली होती. पहावे तिकडे एकेक माणूस त्याकरिता पहाडासारखा ठाम निर्धाराने उभा राहिलेला आम्हा तरुणांना दिसे. आज त्या माणसांच्या पुतळ्यावरली धूळ कधी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने निघत असेल तर असेल. पण ज्याकरीता त्यांनी आपले जीवन अर्पण करून देशभक्तीचा, त्यागाचा वन्ही चेतवत ठेवला, त्या अग्नीची रक्षा देखील विभूती म्हणून लावण्यासाठी आता शिल्लक उरलेली दिसत नाही.
नव्या नोकरीमुळे तू मुंबईबाहेर पडलास हे एका अर्थी चांगले झाले. मुंबईचा माणूस हा सतत धावत असतो. पण दुर्दैव कि त्याचे धावणे हे सापळ्यात सापडलेल्या उंदराचे धावणे असते. कितीही धावला तरी तो ज्या जागी असतो त्याच जागी रहातो.
हिमालयात तुला निदान शांतता मिळेल, जी मुंबईच्या माणसाने कायमची गमावलेली आहे. ही शांतता स्वत:शी बोलण्यासाठी वापर. 'मी कोण?' हा विश्वातला सगळ्यात मोठा गहन प्रश्न. स्वत:ला पहाणे हा देखील साक्षात्कार होऊ शकतो. मी हे का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधणारा माणूस जसा अनावश्यक अनेक गोष्टी करणे टाळतो तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत ह्या निर्धाराने उभे रहायचे ठरवतो. ह्या गोष्टी कोणत्या हा शोध प्रत्येकाने स्वत:च घ्यायचा असतो. त्या एकदा ठरल्या की त्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता झगडणं हाच जीवनाचा उद्देश असतो असे मला वाटते.
मी या वयात जितका असायचा तितका ठीक आहे. स्वत:स सांभाळावे.
कळावे हे आशीर्वाद.

तुझा
बाबा.

हे पत्र कुणी कुणास कधी लिहिलं हे सांगायला नको.
हेच पत्र आपणच स्वत:स आणि एकमेकांस किती वेळा आणि कधी लिहिलं हे विचारायला नको.
लहानपणी - एका वाक्यात उत्तरे लिहा, गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा असे साधे सरळ प्रश्न असायचे. आता त्या काळाइतकेच तेही निरागस वाटतात......
कोरा कागद, स्वत:चेच प्रश्न, 'स्वत:च' उत्तरं
वादळ वारा
चिखल सारा
कागद - कोरा....
बाकी......शून्य!

मी कोण?
मला काय हवंय?

भिकारचोट......................
नको.

मला माझं काम आवडतं.
ते इथे बाल्टिमोर मध्ये असलं काय किंवा सिऍटल - त्याने फ़रक पडत नाही.
मला जसा पडत नाही तसाच माधुरीलाही.
आम्हाला आपापलं काम आवडणं, आम्ही एकमेकांसोबत असणं, सुखी असणं हे महत्वाचं.

पण डॉ. ब्रायसन म्हणतो तसं - तुम्हाला ते किती पैसे देतात हे महत्वाचं नसतं. पैशातून ते त्यांना तुमच्याबद्दल किती आदर आहे हे दाखवून देत असतात. च्यायला या अमेरिकन्स चे फ़ंडे क्लियर असतात - वर्क हार्ड, लिव्ह ईझी!
बघूयात.

३/४ आठवड्यांपुर्वीची एक गोष्ट सांगायचीच राहून गेलेली.
शुक्रवारी ऑफीस मध्ये एकटाच काम करत होतो. प्रत्येच जण फील्डवर गेलेला किंवा सुट्टी घेऊन घरी गेलेला. दशरथ मीटिंगमध्ये. अचानक फोन की फ़्रेडरीक मध्ये रात्री कधीतरी सिंकहोल क्रिएट झालंय. सिंकहोल म्हणजे - जमिनीला अचानकपणे पडलेला मोठ्ठा खड्डा! कार्स्ट रीजन मध्ये जमीनीखालच्या खडकांची झीज होऊन पोकळी निर्माण होते. वरच्या मातीचा भार सहन न होऊन ती खालच्या पोकळीत कोसळून खड्डा तयार होतो. पोकळी किती मोठी त्यावर खड्डा किती मोठा हे अवलंबून. एरिक (दशरथ) आणि मी तिथे पोचून बघतो तर रस्ताच गायब! शेजारच्या माइन मधले ट्रक्स कधीकधी त्या रस्त्याचा वापर करीत. इथे निसर्गाने रस्ता आणि आजुबाजूची झाडं सगळंच खाऊन टाकलेलं! तसं फ़ार मोठं सिंकहोल नव्हतं, ३० फूट बाय ३० फूटचं.....२० फूट खोल. पण हजार टेस्ट्स करून इथली जमीन कळली म्हणेपर्यंत इथली जमीन आपली महाकाय शक्ती दाखवते. शोध घेता घेता त्या भागात मागच्या ३० एक वर्षात बनलेली ६ सिंकहोल्स सापडली. शेजारून रेल्वेचे ट्रॅक्स चाललेले. नशीबाने सिंकहोलची प्रोग्रेस पलिकडच्या बाजूला होत होती. नाहीतर ट्रॅक्स बंद ठेवा, ग्राउटिंग - गैरसोय आणि कोट्यावधींचं नुकसान!
पण निसर्गावर मात नाही.
त्याच्या कलाकलाने घेत, त्याला चुचकारत, पुढच्या चाळिस पन्नास वर्षांपुरतं त्याला एक ठिगळ लावायचं!

वेस्ट कोस्ट च्या व्होल्कॅनोप्रोन भागात मात्र असल्या ठिगळांचा काही उपयोग नाही.
तिथे निसर्गाचा संहार दिसतो.
सेंट हेलेन्स चा उद्रेक १९८० चा. वर्षभर लाव्हा ओकून हळुहळू तो शांत झाला.
माऊंट रेनीयर त्यापेक्षा कैकपट मोठा.
माधुरीच्या ऑफिस च्या खिडकीतून समोरच दिसतो.
सिऍटल्मध्ये कुठेही गेलं तरी शेजारीच असल्यासारखा वाटतो.
२००१ चा भूकंप.
इथे सॉइल मिक्विफ़ॅक्शन हा मोठा प्रॉब्लेम. भूकंपाने जमीन इतक्या लो फ़्रिक्वन्सीने इतकी हलते कि माती पाण्यापेक्षा पातळ होते. आणि पाण्यापेक्षा जड असलेलं सगळंच जमीनीत गाडलं जातं - माणसांसकट.
ते तरी एक्स्ट्रीम झालं.
भलेमोठे लॅंडस्लाईड्स तर रोजचेच.
माझी (संभाव्य) साइट बघायला माधुरीबरोबर लेक कॅचेस ला गेलो होतो.
एका बाजूला कडा, दुसऱ्या बाजुला तळं, मधला रस्ता रुंद करायचाय.
थिऑरॉटिकली एक्सायटींग वाटतंय, पण बहुतेक प्रोजेक्ट साठी भरपूर पैसा नाही. कंपनी मोठी असली तरी सध्ध्याच्या नोकरीएवढ्या स्वातंत्र्याची शाश्वती नाही. कदाचित थोडा स्ट्रगल असेल - तो किती दिवस चालेल हे माहित नाही. तो करत असताना आताच्या आइडियल जॉब सोडण्याविषयी खंत निर्माण झाली तर काय करायचं हे माहित नाही.

आताशा त्या पत्रातले प्रश्न देखील फार निरागस वाटतात.

निसर्ग तोच -
त्याची रूपं वेगळी.

प्रश्न तेच -
त्यांची उत्तरं वेगळी?

काय?

२३ जुलै, सिऍटल.

२३ जुलै, सिऍटल.

यथावकाश, मजल दरमजल करीत मी अखेर मध्यरात्रीपर्यंत माधुरी च्या घरी पोचलो.
मग काल अनपेक्षितपणे ८ तास चाललेला इंटरव्ह्यू, आजची मायक्रोसॉफ्ट्ची पिकनिक वगैरे बद्दल नंतर कधीतरी....
पण सिऍटलचे पाइन ट्रीजनी व्यापलेले व्होल्कॅनिक बॅसाल्ट आणि ग्लेशियल फ्लो ने तासलेले डोंगर बघून (पावसाळ्यात बहरलेल्या) सह्याद्रीची आठवण झाली.

गुरूवार, २० जुलै - बाल्टिमोर एअरपोर्ट.

गुरूवार, २० जुलै - बाल्टिमोर एअरपोर्ट.

अभ्या, बाबा -

सीऍटल ला चाललोय. एयरअपोर्टवर येताना युनाटेड चा मेसेज की फ़्लाइट कॅन्सल आणि उद्या या.
च्यायला असा राग आला - भांडलो, मग त्यांनी आज संध्याकाळच्या फ़्लाइट वर स्टॅंडबाय ठेवलंय. इथे एयरर्पोर्ट वर गोट्या खेळुन कंटाळा आला, मग म्हटलं चला काहीतरी लिहावं.

मागच्या वेळेस माधुरी ला सोडायला आलो होतो, पहाटे पहाटे चेक-ईन करताना फार लाईन नव्हती. बोर्डिंग पास चेक करताना तिथली फ़टाकडी "बबन" म्हणाली - मी तुला इथे पाह्यलंय, तु बऱ्याच वेळा इकडे येतोस ना?
असली व्ही आय पी ट्रीटमेंट बघून मला अगदी भरून आलं.....पण बायकोचे वटारलेले डॊळे निरोप घेताना भरायला लागले तसा (सावरून) म्हणालो - छे छे, तो मी नव्हेच!
च्यायला आज बळं कुठे दिसत नाहिये ती....

उद्या इंटरव्ह्यू आहे, आणि मला टेंशनंच येत नाहिये.
स्व्त:चेच शब्द इथे स्क्रीन वर बघताना (मराठीत) एकदम पब्लिश झाल्य़ासारखं वाटतंय.

आज अभाच्या ब्लॉग वर रिप्लाय टाकताना ज्या कवितेच्या ओळी टाकलेल्या ती पूर्ण कविता अशी -

धगधगत्या त्या मशाली वरती
मी ही वात पेटवून घेतली.
अप्रुपाचा हुरुप होता
हुशारलो, फुशारलो
कधी कधी आच लागुन
आतल्या आत शहारलो
मशालीचा आदेश आठवून माझा मीच सावरलो
आदेश होता -
प्रकाशाचा कैवार घेवून अंधाराशी वैर करा
धावून जा वार्य़ासारखे तुटून पडा तार्य़ासारखे

उंबर्य़ाबाहेर पाउल टाकलं मनामध्ये आण स्मरून
अडीच वीती भात्यामध्ये एक मूठ वादळ घेउन
अन हातामध्ये थरथरणारी माझी इवली ज्योत तेवून.
उतणार नाही मातणार नाही
घेतला वसा टाकणार नाही.

कधी कधी कुठून कुठून धावून येते बर्फ़वादळ
आग्नेयाचे वायव्याचे द्वंद्व सुरू होते तुंबळ
इवली दिवली सांभाळताना उडते माझी तारांबळ
पण तत्स्वितू: स्मरण - करता कुठुनसे येते बळ
प्रकाशयात्रा सुरु होते समोर ध्रुव ठेउन अढळ.

अंधारातही लुकलुकणारे काजवे कधी खुणावतात
हिरवा पिवळा उजेड दाखवीत दिमाखात गुण्गुणतात
वादळाला भीत नाही अशी शेखी मिरवतात
जडावलेला वेडा जीव काजव्यांवरती लुब्ध होतो
रसरशीत तेजोगर्भ हाती असून विसरून जातो
पण उजाडण्यापुर्वीच जेव्हा त्यांचा उसना उजेड संपतो
तेव्हा सत्य कळुन चुकते
त्यांचे तेज वांझ होते
यात्रा पुन्हा सुरु होते.

प्रकाशातही जपलेली माझी इवली ज्योत पाहून
मोहरलेले पतंग येतात गुंजन करीत कुठून कुठून
याहून मोठे तेज त्यांनी पाहिले नसते आधी कधी
म्हणून जातात वेडावून
प्रकाशकांक्षी पतंगांचे सोनपंखी रूप बघून
बिनदिक्कत अर्पणाची त्यांची आतूर उर्मी बघून
कळत नकळत लळा लागतो
यात्रा थांबते मुक्काम वाढतो.

पण दुरून कुठून येतो पुकार
खोल आतून उठतो हुंकार
'भासाचा का घेतोस ध्यास?
पतंग जळेल विझेल वात.
मीलनाचे सूख कसले
चिरंतनाच्या अंधारात?
पतंगाचे प्रेम सत्य पण ज्योत जळणे त्याहून सत्य'

ज्योत पुन्हा उजळते
यात्रा पुन्हा सुरु होते.

ऐकले आहे कुणाकडून
हलाहलाचा वारसा मिळतो
अमृताच्या पुत्रांसाठी
देवपुत्र व्हायचे असेल -
कंठातच ताना जिरतील
ओठांआडच गाणी विरतील....

पण कुणास ठावूक असेही होइल -
गाणे गाणे स्फ़ुरत राहील
स्फ़ुरता स्फ़ुरता गीताला त्या
हलाहलाचा डंख मिळेल तांडवाचा ताल मिळेल

एवढे एक माहित आहे -
समीधेच्या जन्मा गेलो
इंधनाचे धन माझे
ज्वाळेमध्ये हसू बघते
चंदनाचे मन माझे.

एक मात्र नक्की
जातकुळी सुटणार नाही
यात्रा काही थांबणार नाही
पेटली ज्योत विझणार नाही
पेटली ज्योत विझणार नाही.

च्यायला शाळेत शिकलेली कविता बहुतेक पूर्णपणे आठवतीये.
ती बहुतेक वेळा नको तेव्हाच आठवते आणि 'कुठे जात आम्ही पुढे काय आहे?' सारखे प्रश्न विचारते - जसे आज अभ्याने विचारले. त्याल आणि बाबाला येड्यात काढलं, पण तो प्रश्न मला पडलाच नाहिये असं नाहिये.
फक्त अमेरिकेत आल्यापासुन अशा वांझोट्या प्रश्नांना गरजेपेक्षा जास्त भाव देणं बंद केलंय.

च्यायला आता हे काय?
हे पण प्लेन २० मिनिट लेट. त्यात ७५ लोक स्टॅंडबाय वर - शिकागो मध्ये वेदर खराब असल्याने माझी आख्खीच फ़्लाईट कॅन्सल झालेली.....
ही मिळाली तरी शिकागोत जाउन पुढच्या फ़्लाईटसाठी मगझमारी करा, जाउदे फार विचार करायचा नाही. लिहीताना मजा येतेय ना - चालू द्या.

पहिल्या जॉब च्या वेळेस जॉब मिळेल का - ही काळजी होती.
आता तो घ्यायचा कि नाही हा प्रश्न आहे - म्हणजे छानच!

च्यायला १० मिनिटांपुर्वी समोर येउन बसलेली एसी कुठे गेली ? (एसी म्हणजे अप्सरा कॅटॅगरी, इतर म्हणजे एमसी आणि बीसी - माल कॅटॅगरी आणि बायको कॅटॅगरी!) आणखी एक - कुठली सुंदर पोरगी कुठल्या हजामा बरोबर फिरताना पाहिली (च्यायला त्या पोरींना असे हजाम कुठून मिळतात काय माहीत? आम्ही काय मेलो होतो?) कि ते भाउ बहीण आहेत असं समजावं. (म्हणजे आपली जळजळ कमी होते.)
अर्थात - हे फक्त विनोद आहेत. माझं माझ्या बायकोवर १०० टक्के (म्हणजे जे काय असेल ते) प्रेम आहे आणि मी कुठल्या (सुंदर) पोरीकडे बघतही नाही.

ही एसी कुठे गेली.....

चला तिला एक छान नाव देउ.
अरे हो - हे सांगायचंच राहिलं - असी म्हणजे नितांत सुंदर अप्सरा. जिच्याबद्दल 'माल' आणि 'बायको' या दोन्ही प्रकारचे विचार होवू शकत नाहीत. थोडक्यात जिला पाहिल्यावर 'अपली लायकी नाही' हे आपल्याला कुणी न सांगताही पटतं, ती म्हणजे ती एसी!
एसी च्या बरोबरची (जी कुठल्याच कॅटॅगरीत बसत नाही) एक मासिक वाचत बसलिये.
मागच्या पानावर.......
एसी आली, एसी आली.....

च्यायला पळत पळत आली आणि बॅग घेउन गेली.