Thursday, June 28, 2007

अधिवेशन - १

म.टा.!
नमस्कार!!
काल तुमच्या पेपरात तुम्ही आमचा - म्हणजे अधिवेशनाच्या निमित्ताने सिऍटल मध्ये येणाऱ्यांचा - ’तुम्हीच आमचे रिपोर्टर’ म्हणुन उल्लेख केलात म्हणुन म्हटलं - चला, रिपोर्ट पाठवु!
आता रिपोर्ट पाठवताना पहिलीच गोची म्हणजे मी एक (तुमच्या जितकी ताणु तितकी ताणल्या जाणाऱ्या संज्ञेतही) ’अर्धवट रिपोर्टर’ आहे. म्हणजे त्याचं आहे असं - कि मी सिऍटलमध्ये आहे, पण अधिवेशनासाठी नाही. म्हणजे - मी इथेच रहातो. त्यामुळे मी अधिवेशनासाठी न जाता अधिवेशनच माझ्याकडे आलंय असं तुम्ही म्हणु शकता!
आई शपत - खरं सांगतो - त्याला मी जबाबदार नाही!
ऍक्चुअली खरं सांगु का? माझ्याच गावातल्या अधिवेशनाबद्दल मी ’म.टा.’ मध्ये वाचतो! आता यात वृत्तपत्र म्हणुन तुमचं सामर्थ्य आणि मराठी माणुस म्हणुन माझा नतद्रष्टपणा किती - या घोळात आपण जायला नको! कसं?
तर - अधिवेशन.
यावर आमच्या घरात रोज चर्चा होते.
म्हणजे आई-बाबा इथे आलेत याच महिन्यात - त्यामुळे त्यांना त्याचं कोण अप्रुप. बायको मराठी शिकतेय - त्यामुळे तिलाही अप्रुप. (अर्थात त्याचं कारण ’शिवाजी’ ची तिकिटं न मिळणे हे ही असु शकतं!). आणि मला....वेल ये झोल क्या है - असं राहुन राहुन वाटतंय.
कालचं तुमचं आवाहन, त्यात परत परागनं ऑरकुट वर मेसेज ठेवला - ’अरे या अधिवेशनात असते तरी काय?’ मग म्हटलं च्यायला लिहुच. अधिवेशनात जाणारे लिहायचे ते लिहोत - आपण ’बाहेरुन’ लिहु. बर लिहायचं ते पण कुठे? तुम्ही भले लेख मागवलेत - पण पेपरात लिहिणं म्हणजे (टिपिकल मराठी) टेन्शन. त्यापेक्षा मी बापडा माझ्या ब्लॉगवर लिहितो. छापायचं तर छापा. इथे जरा बरं आहे - म्हणजे उगीच तुमच्या पानावरची जागा अडवतोय असं होणार नाही, आणि मला माझ्या संकोचांबद्दल नि:संकोच बोलता येईल.

पाल्हाळ झाला ना? जाऊ द्या.

या अधिवेशनाचे पडघम कि काय ते बरेच दिवस वाजताहेत - महाराष्ट्रात! ८-९ महिन्यांपुर्वी मी या गावात रहायला आलो तेव्हा आल्यावर मला पण कळलं - कि ’यंदा इकडे’!! पटेल आणि जाधव येताहेत माहित होतं, पण पाटेकर, भांडारकर, पिळगावकरांबद्दल या आठवड्यातच कळलं. छान!!

आता एक प्रॉब्लेम आहे -
त्याचं आहे असं कि - मला थोडक्यात बोलता येत नाही.
म्हणजे - या अधिवेशनाबद्दल किंवा याच्या निमित्ताने म्हणा - मराठी माणसाबद्दल बोलायचं म्हणजे - सलीलच्या शब्दांत - मागे जाऊन बरंच पुढे जावं लागतं. म्हणजे कसं, तर विसर्जनाच्या मिरवणुकीत नुसता दगडुशेट चा फोटो दाखवला तर सगळं पोचतं का? नाही. मग ढोल ताशांचे आवाज शब्दांतुन पोचवायला लागतात - तसं.
तर - मराठी माणुस.
म्हणजे - अमेरिकेतला मराठी माणुस.
हा एक तुफान विचित्र प्रकार आहे.
म्हणजे त्याचं असं कि - गुल्टी (म्हणजे तेलुगु) म्हटला कि चिरु (चिरंजीवी हो! त्याचं ते ’लाडकं’ नाव आहे), लुंगी म्हटला कि रजनी, मल्लु म्हटला कि ’लॅन्ड ऑफ लगुन्स’, बंगाली - रसगुल्ला - हे कसे टिपिकल प्रकार. पण मराठी म्हटलं कि - अंधार!
नाहीतर प्रकाश!!
किंवा जे असेल ते - पण चित्र काहीच नाही.
म्हणजे हे मला प्रकर्षाने कि काय ते - जाणवतं. म्हणजे नाना आपला, माधुरी आपली, मंगेशकर ही आपले - पण आता हे लोक ’सगळ्यांचेच’ इतके आहेत कि ’केवळ माझा सह्यकडा’ म्हणायला ’सह्यकड्या’ शिवाय काही दिवा घेऊनही सापडत नाही.
बरं - इथलं म्हणालात तर - अमेरिकेत मराठी माणुस मुळात रहातंच नाही!
म्हणजे - रहातो, पण घरात. म्हणजे अगदी दाराबाहेर ’अपमान होईल’ वगैरे पाट्या नसतात, पण तरी - रहातो घरात!
मग मॉल्स मध्ये वगैरे कुजबुजत मराठी ऐकु येतं पण त्याची झेप संभाषणापर्यंत जात नाही. गेलीच आणि ’चला चहा मारु’ ऐकलंत तर खुशाल जागं व्हायचा प्रयत्न करावा.

तर - अशा अस्तित्व नसलेल्या, अथवा ते अस्तित्व यशस्वीरित्या लपवलेल्या लोकांचा सोहळा वगैरे म्हणजे - य झकास. मग आल्याआल्या खटॅक करुन मी मराठी मंडळाची वेबसाईट तपासली. अर्थात ती इंग्लिशमध्ये होती. मग मला इंग्लिश शिकल्याबद्दल बरं वाटलं. मग मी शिस्तीत तिकिट वगैरे किती आहे ते बघु म्हटलं. माणशी १७५ डॉलर - फक्त! १०० डॉलर कि काय ते - फराळाच्या कुपनचे - एक्स्ट्रा! मला मराठी असण्याचा अभिमान वगैरे आहे, पण २७५ गुणिले ४ - म्हणजे मी भारतात जाऊन (परत) येतो. तरी अधिवेशन वगैरे म्हणजे छानच.

सॉरी - हे कदाचित थोडं सारकॅस्टिक वाटत असेल तर खरंच सॉरी. कारण मराठी माणसांनी एकत्र येऊन असा काही कार्यक्रम करणं आणि ’आवाज कुणाचा’ ऐकवणं हे खरंतर स्तुत्यच. आणि शिवाय यात माझा काहिही सहभाग नसताना मी त्यावर नाराजीचा सूर काढणं हे ही चूक. पण आहे हे असं आहे. मला असं वाटतं - आणि वृत्तपत्र म्हणुन तुम्हालाही खऱ्यातच इंटरेस्ट आहे ना? कि तुम्हीही अजुन ’जलसा’ च्या आसपास घुटमळताय?

नानाची मुलाखत, अविदाचं भाषण, गेला बाजार विलासराव पण बोलणार. मग यात माझी ’मुक्ता’च्या कॅसेटवर जब्बारची आणि ’आमचा बाप....’ वर डॉ. जाधवांची सही घ्यायचं राहुन जाणार. बाकी इतर लोक म्हणजे थातुर-मातुर. मला या अधिवेशनाबद्दल उत्सुकता होती (आणि आहे) ते पटेल आणि जाधवांमुळे.
त्याचं असं आहे ना - कि इथे कुठल्याही मराठी मंडळाच्या साईटवर जाऊन पहा. जोशी, कुलकर्णी, गोखले, आगाशे पाह्यल्यावर आम्हालाच अस्पृष्य झाल्यासारखं वाटतं. मग त्यात असा बापाला ’बाप’ म्हणणारा जाधव आला कि आम्हाला घरी आल्यासारखं वाटतं! अगदी ’चित्तपावन’ गाडगीळांची उपस्थिती असुनही....!

देशमुखांमुळं नाही वाटत पण.
सॉरी विलासराव - आम्ही इथे नोकरी बोकरी करताना राजकारणावर वगैरे चर्चा करायचो, तेव्हा ’आमचा पंतप्रधान इकॉनॉमिस्ट, आणि राष्ट्रपती फिजिसिस्ट’ म्हणताना - दोन वीत भाता दोन बोटं मोठं व्हायचा. आता ’बाबांच्या’ अंगात येऊन ’ताईंना’ राष्ट्राध्यक्षाचा ’आशिर्वाद’ मिळाल्यावर त्याबद्दल आम्ही काही बोलणं उचित नाही, पण ताई - पाटिल ऐवजी शेखावतच लावा - असं ’अधिवेशनाच्या’ संध्याकाळी म्हणावंसं वाटतं! अर्थात - मराठी बाण्याची डरकाळी फोडणाऱ्या वाघाची जिथे शेळी झालीए तिथे विलासराव तुम्ही तरी काय करणार म्हणा....

जे जाधवांचं - तेच पटेलांचं.
मराठी असण्याबद्दल ज्या ज्या लोकांमुळे अभिमान वाटतो - त्यातले हे एक - पटेल. मग ज्यांनी ’मुक्ता’ दिला, ’सामना’ दिला, ’विदुषक’ दिला, त्यांच्या मांडीला मांडी लावुन निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष शिवायचं ’साठेचं काय करायचं?’ बघणं म्हणजे....पटत नाही.
निखिलचा ’साठे...’ पाह्यल्यावर ’प्रवेशमुल्य ऐच्छिक’ असुनही आणि परवडत नसतानाही खिशातले सगळे पैसे ’स्नेहसदन’ च्या दाराबाहेरच्या टोपीत टाकुन मराठी असण्याबद्दल जे बरं वाटलेलं ते - कॅलिफोर्नियातला ’साठे’ पाह्यल्यावर वाटेल कि नाही अशी रास्त शंका वाटते.

आता शंका पुराण फार झालं.
तुम्हाला उत्सुकता असेल - अधिवेशनाची.
बिल गेट्सच्या गावात, कुंद हवेत, उन उन पावसांत, दोन दोन ज्वालामुखींना साक्षी ठेऊन मराठी मावळे आलेच आहेत तर बघुयात - स्पेस नीडलला शहारे आणत तुतारी किती घुमतेय, डाऊनटाऊन हादरवत ढोल किती धडकी भरवतायत, पाईक प्लेसला स्तब्धत ताशा किती कडाडतोय आणि अटकेपारचे मराठी झेंडे खबरदार टापा वाजवत ’हर हर महादेव’ चा जोष कोणत्या टिपेला नेताहेत.....

होऊन जाऊ द्या.

Friday, June 15, 2007

आमचे बाबा आणि मी....

काल रात्री आई-बाबा इथे पोहोचले.
आता इथे म्हणजे - सिऍटल मध्ये.
आय मीन - सुरुवातीला लिहायला लागल्यावर वाचणाऱ्यांना माझ्याबद्दल किती माहिती आहे, आणि मग काय ऍझ्युम करायचं आणि काय सविस्तर सांगायचं याची कल्पना होती. म्हणजे अभ्या बाबा सोडुन कुणालाच काहीच कल्पना नाहिये याची कल्पना होती.
च्यायला कल्पना हा शब्द आता दातात अडकला.
चघळताही येईना आणि काढताही.
आता कुणाला कशाची किती कल्पना आहे या विचाराने गढुळ व्हायला लागलंय.
तर -
आई-बाबा इथे - म्हणजे सिऍटलला पोहोचले.
का कुणास ठाऊक - मित्रांशी बोलताना मी माझ्या बाबांना ’बाबा’ म्हणतो.
प्रत्यक्षात पप्पा.
म्हणजे मी सुरुवातीला त्यांना प्रत्यक्षात पण बाबा म्हणायचो, पण रंजु त्यांना सुरुवातीपासुनच ’पप्पा’ म्हणायला लागला - मग मी पण रीतसर ’प्रवाहाची दिशा ओळखुन’ नामोच्चारणात बदल केले.

बाय द वे - हे लिहायला घेतलं होतं - पण मूड गेला म्हणुन फेकुन दिलं -

"मेमरी म्हणजे काय? स्मरणशक्ति? कशाची?

मला हा कागद हातात जाणवतोय. हे बेड. ही अंगावरची चादर. उजव्या बाजुने लॅम्पचा प्रकाश येतोय तो जाणतोय. या क्युबिकल शेपच्या रुम मध्ये माझ्या डायगॉनली ऑपॉजिट कोपर्यात पडलेला अंधार जाणवतोय. बाहेरचा गाड्यांचा आवाज ही. मग माझा मीच स्वत:ला का जाणवत नाहिए? मी इथे कसा आलो हे मला का आठवु नये? कसा आलो? कधी? आणि हा कोरा कागद माझ्या हातात कसा?
उजव्या बाजुला लॅम्प. त्याच्याखाली ड्रॉवर्स. पहिल्यात बायबल. दुसऱ्यात - भेंचोत! पिस्तुल!!
डोक्यात कारंज्यासारखं सर्रकन रक्त उसळवणारं, ठोका चुकवणारं, काळं तुकतुकीत पिस्तुल!
जड असेल? डॉक्टरने छातीवर ठेवलेल्या स्टेथोस्कोपसारखं धक्कादायक गार? आणि खेळण्यातलं वाटावं एवढं हलकं? खरं असेल? यात गोळी कशी भरतात? आणि हातात कसं धरतात? हे असं? एवढं हलकं एवढं छोटं पिस्तुल असं दोन हातात - समोर!
आणि असं केलं कि मृत्यु आपल्या हातात? आणि आपण यम? च्यायला नुसतं बोट हलवलं कि - मख्खन!
च्यायला जाऊदे - ठेऊन देऊ. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी! उगीच ज्याचं असेल तो आला तर विचारायचा - तु कोण? हात कशाला लावला म्हणुन.
च्यायला - मग पोपट!
मी कोण?
मला काही आठवत का नाहिये?
मेमरी म्हणजे काय? स्मरणशक्ति? कशाची?"

सध्या नाना पाटेकर ला घेऊन एक पिक्चर लिहायचा विचार आहे!
यावर मीच पोट धरधरुन हसायला पाहिजे. म्हणजे हल्ली ज्या रेट ने खातोय त्याने थोड्याच दिवसात पोट (धरता येईल एवढं) वाढेलंही, शिवाय मी नानाला ओळखत वगैरे नाही आणि मी कधी कुठला पिक्चर काय एक गोष्टही कधी लिहिली नाहिए - पण नानाला घेऊन पिक्चर लिहायचा विचार चालु.

बर तर सांगत काय होतो तर -
सूर्य उगवला प्रकाश पडला गंगु गेली पाण्याला....
तिथे तिला कोण भेटलं?
आई-बाबा!
आई-बाबा तिला काय म्हणाले?
’कोलंबस कोलंबस - छुट्टी है आयी....’
याआआआआक - हे जरा जास्तच होतंय.

तर - काल आई बाबा इथे आले.
इतक्या दिवसांनी त्यांना भेटल्यावर ’कुछ पानेके लिए’ द्यावी लागणारी किंमत देवाने एका मिनिटांत खाट्‍कन वसुल केली. आजी-बाप्पुंना ’वयस्कर’ शिवायच्या कुठल्या वयांत पाहिलं नव्हतं. तसंच आई-बाबांना ’तरुण’ शिवाय कुठल्या वयांत.....

मी अमेरिकेत रहातो.
त्यामुळे मला एकटं-दुकटं रहायची, जनतेला सोयीस्कर दुर ठेवायची, आणि माझ्याच विश्वात रमण्याची सवय जुनी. आता दोनाचे चार आणि (आई-बाबा आल्याने) चाराचे आठ झाल्यावर मूड्स ची लांबी रुंदी खोली - कमी होणार आहे अशी काहितरी विचित्र जाणीव झाली. चांगली गोष्ट म्हणजे माझे डिप्रेसिंग मूड्स फार काळ टिकणार नाहीत.

तर - आई-बाबांना घेऊन घरी आलो.
दोघांनाही रंजुचं (भारतात) जेवण खालंय कि नाही याची काळजी.
शेवटी ती त्याच्याशी फोनवर बोलल्यावरच मिटली. अजुन माधुरीची आणि त्यांची ओळख होतेय तर - मराठी, हिंदी, इंग्लिश - अशा उड्या मारत गप्पा चालु झाल्या.
कुठुन तरी डायरीचा विषय निघाला - तर त्यांना म्हटलं - तुमच्यासाठी डायऱ्या आणल्यात. (च्यायला आपण मराठीत डायरीज का म्हणत नाही? असो.) इथे आहात तोवर काही लिहावंसं वाटलं तर लिहीत रहा. तर त्यावर पप्पा म्हणाले ’अरे तुझा तो मित्र कोण - कुलकर्णी?’
’अभ्या - अभिजीत कुलकर्णी!!’
’अरे काय झकास लिहितो तो!! तु का नाही त्याच्यासारखं लिहित?’
यावर माझी (पायाची) दाही बोटं तोंडात!
’पप्पा! असं काही नाही - तो चांगलं लिहितो, पण मी पण चांगलं लिहितो.’
’पण त्याचं लिखाण कसं ’रिच’ वाटतं!’
यावर आता मला पायाचे - घोटा, टाच वगैरे अवयव तोंडात जाणवायला लागले! :))
च्यायला अभ्या - तुझ्या लिखाणाला आता माझ्या घरात फॅन्स!
आणि माझं लिखाण माझी ’सख्खी’ बायको पण वाचत नाही!

आता हे लिहुनपण आठवडा झाला.
२-३ पॅरेग्राफ्स एकदोनदा लिहिले पण आठवड्याभरापुर्वीची लय पकडणं एकंदर अवघडच.

परवा पप्पांचा फोन आला ऑफिसमध्ये.
म्हटलं ’कसे आहात? जेवण वगैरे केलंत का? कुठला पिक्चर बघताय?’
तर पप्पा म्हणे - ’अरे आम्ही बेलव्ह्यु मधुन बोलतोय.’
मी उडालोच! बेलव्ह्यु आमच्या शेजारचं गाव/सबर्ब/किंवा जे आहे ते - पण चालत जाण्याएवढं जवळ नक्कीच नाही!
तर पप्पा म्हणे - ’अरे त्यात काय? खालच्या बस स्टॉपवर आलो. तिथुन येईल ती पहिली बस घेतली, मग शेवटच्या स्टॉपला उतरलो! मग ड्रायव्हरने सांगितलं कि हे बेलव्ह्यु!!’
’अहो पप्पा पण....’
’अरे गम्मत ऐक - आम्हाला माहितच नव्हतं कि इथे बसमध्ये पर्फेक्ट चेन्ज लागतं - आम्ही दहा डॉलर दिले तर ड्रायव्हर म्हणाला - असु दे, सुट्टे नाही तरी बसा. मग आम्ही स्टॉपला उतरल्यावर पैसे सुट्टे करायला इथल्या बॅंक मध्ये गेलो.’
’बॅंकमध्ये! अहो पप्पा, इथे असं कुठेही.....’
’तर तिथे आम्हाला तिथली असिस्टंट मॅनेजर भेटली. तिचं नाव स्वाती! मुंबईची निघाली!! मग तिच्याशी आम्ही गप्पा मारल्या!’
ऍपॅरन्ट्ली - या स्वाती नावाच्या (मराठी) बाईंनी माझ्या आई-बाबांच्या तिसऱ्या दिवशीच्या धाडसाचं अमाप कौतुक करुन त्यांना बेलव्ह्युची ढोबळ माहिती दिली. सुट्टे पैसे वगैरे दिलेच, पण त्या कुठे रहातात, इथे किती वर्ष झाली आहेत, मुली काय करतात, जॉब किती वर्ष झाला, ग्रीन कार्ड - वगैरे बित्तंबातमी दिली.
त्यांनी जेवढी माहिती दिली त्यावर आमचे पप्पा म्हणजे लगेच - ’अरे दाद्या, इथली बॅन्किंग सिस्टिम पण आपल्या सारखीच आहे! फक्त इथे इंटरनेट चा वापर जास्त - एवढाच फरक. बाकी सगळं तेच!’
आता माझ्यावर - ’पप्पा - तुम्ही त्या बॅन्केत जॉईन वगैरे तर नाही झालात ना!’ म्हणायची वेळ आली होती! म्हणजे पप्पांचे ऑफिसर्स आणि अकाऊन्टन्ट्स गोव्याहुन इथे फोन करुन ’सर, बाठे साब से एक प्रॉब्लेम डिस्कस करना था’ म्हणणार आणि पप्पा इथे - या बिल गेट्स नामक माणसाला साधं ग्रॅजुएट होता नाही आलं, कर्ज फेडण्याची गॅरन्टी काय - याचा विचार करत बसणार!
म्हटलं ’पप्पा - आता आहात तिथेच थांबा - मी तुम्हाला न्यायला येतो.’
’अरे कशाला? हे काय आम्ही स्टॉपवरच आहोत. इथुन २३३ पकडली कि डायरेक्ट घरी!’
’बर पप्पा - आता तिथे आहातच तर समोर एक कन्स्ट्रक्शन चाललंय ते दिसतंय का?’
’समोर म्हणजे?’
’म्हणजे स्टॉप वर उभं राहिलं कि दोन दिशांना दोन मोठ्‍या बिल्डिंग्ज चं कन्स्ट्रक्शन चाललेलं दिसेल.’
’खुप खोल गेलेत रे पण बिल्डिंग बांधायला!’
’हो - ते अंडरग्राउंड पार्किंग - त्या दोन्ही बिल्डिंग्जची फाऊंडेशन आम्ही डिझाईन केली. डीप फाऊंडेशन ही आमची स्पेशालिटी! बरं बस किती वाजता आहे माहिती आहे ना? चुकू नका. आणि तो सेलफोन आहे ना बरोबर? फोन करत रहा!!’
त्यानंतर दीड तास त्यांचा पत्ता नाही!
फोन केला तर ’आलोच’ म्हणाले.
मग अर्ध्या तासाने आले.
म्हटलं - एवढा वेळ कसा लागला?
तर म्हणे - ’अरे चुकुन २३२ पकडली. म्हणजे २३३ येत नव्हती, मग २३२ आल्यावर ड्रायव्हरला विचारलं आपल्या रोडवर जाते का? तर तो हो म्हणाला. पण ती तुझ्या ऑफिसशेजारच्या कॉर्नरपासुन भलतीकडेच वळाली. मग डोंगराडोंगरातुन जात राहिली. मग ड्रायव्हर म्हणाला - हा तुमचा रोड!’
’बापरे! मग?’
’मग काय? मग आम्ही रस्ता क्रॉस करुन उलट्या डायरेक्शनला आलो. मग जी बस आली त्या ड्रायव्हरला म्हटलं - बाबा रे, आम्हाला इथे जायचंय - तुझी बस जाते का? तर तो म्हणे - ऍक्चुअली मी घरी चाललोय, माझी शिफ्ट संपली. पण मी जाता जाता तुम्हाला घरी सोडतो.’
’पप्पा!’
’अरे त्यात काय?’
मग आमच्यात जे ’बाप-बेटा’ डिस्कशन झालं ते इथे लिहिलं तर माझी (पुन्हा एकदा) खरडपट्टी होईल! :))

बऱ्याचदा बऱ्याच लोकांना मी एक विक्षिप्त माणुस वाटतो (आणि तो मी आहे ही). पण वैयक्तिकरित्या मी माझ्या बाबांएवढा धमाल विक्षिप्त माणुस पाह्यला नाहिये. मला मागचे सहा वर्ष अमेरिकेत काढुनही बसने वगैरे जायचं म्हणजे दडपण येतं. मग मी ट्राफिकवर चरफडत पंधरा मिनिटाच्या रस्त्याला तासभर घालवतो. आणि यांना जुम्मा जुम्मा आठवडा नाही झाला तर इथल्या बसेस ची व्यवस्थित माहिती! परवा पाईक प्लेस मार्केटला गेलो तर तिथे एक गुबगुबीत भिकारी अंगाला फुगे वगैरे बांधुन आणि हरतर्हेच्या झिरमिळ्‍या लावुन भीक मागत होता. त्याला बघुन आम्ही हसलो वगैरे इथपर्यंत ठीक, पण पप्पांनी मस्तपैकी त्याच्याकडे जाऊन शेक-हॅन्ड वगैरे करुन त्याच्याबरोबर फोटो वगैरे काढुन घेतला! फोटोत दोघेही अगदी जुन्या मित्रांप्रमाणे हसताना दिसताहेत!
त्यांचा फंडा म्हणजे - हे काय? घरातुन निघायचं, गाडीत बसायचं, तु दाखवशील ते बघायचं आणि परत यायचं? त्यात काय गंमत? खरी गंमत चुकण्यात, शोधण्यात, अनुभवण्यात, भरकटण्यात, अनोळखी लोकांशी ओळखीचं बोलण्यात असते!
त्यांचा हा फंडा ऐकल्यावर - ’पप्पा! मी पाचवीत असताना सायकलवर शाळेत जायचा हट्‍ट धरला होता - तेव्हा एक्झॅक्टली हेच म्हणालो होतो!’ असं म्हणायचा मोह झाला होता, पण तो मी आवरला.

काल ते डाऊनटाऊन, वॉटरफ्रंट वगैरे फिरुन आले.
कसे गेलात विचारलं तर - अरे त्यात काय? २३३ ने बेअर क्रीक ला, तिथुन ५४५ ने सरळ डाऊनटाऊन. नाहीतर बेलव्ह्युला जाऊन पण जाता येतं.
बरं ही माहिती कशी मिळाली तर - ’गुगल’ आहे ना! सगळी टाईमटेबल आहेत त्यावर.
आता मला झिणझिण्या जाणवायला लागलेल्या.
म्हटलं - छान. आता इथुन पुढे आम्ही सिऍटलमध्ये कुठे चुकलो कि तुम्हाला भारतात फोन करुन विचारतो - पप्पा...घरी कसं जायचं? :))

स्टारबक्स मध्ये एवढ्या चित्रविचित्र नावाच्या कॉफ्या असतात कि मी माधुरीला ऑर्डर करायला सांगतो. आई-पप्पा रोज नविन कॉफी ट्राय करतात. (कुठलीही कॉफी पुरेशी गोड नसते हाच फक्त प्रॉब्लेम). क्रीम आणि हाफ ऍन्ड हाफ कि आणखी काहीतरी मधला फरक त्यांनीच मला समजावुन सांगितला!
जाऊ दे! आता मी माझ्या अज्ञानाचं आणखी प्रदर्शन करणं चांगलं नाही.
मग आता मी पण आई-पप्पांना अमेरिका दाखवण्याच्या फंदात न पडता त्यांच्या सोबत अमेरिका शोधण्याचा विचार करतोय.
त्यांच्या नजरेतुन मला ती वेगळी दिसायलाही लागलिये. म्हणजे आमच्या खालच्या प्राण्याने (!) - पक्ष्यांना दाणे आणि पाणी वाढण्याची कशी सिस्टिम केलिए, तिथे कुठकुठले पक्षी येतात, आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये देसी किती, सकाळी मुलांना सोडायला जाणाऱ्या पालकांशी त्यांच्या कशा ओळखी होताहेत वगैरे....

हे इथवर लिहुन झाल्यावर विचार केला कि आता या पोस्टला टायटल काय द्यावं?
परवा जेवुन झाल्यावर बडीशेप खात डायनिंग टेबलवर आमच्या गप्पा चाललेल्या. मी माधुरीला मराठी शीक म्हणुन पिळत होतो. तर ती म्हणे तुम्ही लोक काय बोलताय हे कळण्याएवढं मराठी कळतंय मला, मग आणखी का शिकायचं?
म्हटलं - बाकी काही नाही तर माझा ब्लॉग वाचायला लागशील!
तर त्यावर तिने डायरेक्ट पप्पांनाच विचारलं - हा जेवढ्या उड्या मारतो तेवढं खरंच चांगलं लिहितो का हो?
मग पप्पांनी बडीशेप चघळत, टेबल क्लॉथकडे पहात तब्बल ५-७ सेकंद विचार केला!
तोवर मी गॅसवर!!
मग शांतपणे म्हणाले - ही नीड्स इम्प्रुव्हमेंट!
झालं - आता बायकोच्या हाती नविन कोलीत.

घरी फोन केला - काय चाललंय विचारायला.
आई म्हणे - अरे आत्ताच ’सेंट ऑफ अ वुमन’ पाहुन झाला आणि पप्पा तुझा ब्लॉग वाचुन दाखवताहेत आणि मी ऐकतिए.
झालं!
मी ब्लॉगला ’आमचा बाप आन मी!’ असं नरेन्द्र जाधवांच्या पुस्तकांचं अपभ्रंशीत नाव देणार होतो. पण मग मला पप्पांच्या एका फोनची आठवण झाली.
पहाटे तीन वाजता पप्पांचा फोन.
’अरे तो तुझा ’हजाम’ नावाचा लेख वाचला. काय सुंदर लिहिलायस रे तो!’
अमिताव घोष म्हणतो कि कुठलाही लेखक हा गुदगुल्यांवर जगतो. मग मी पण (ताड्‍कन) उठुन वगैरे बसलो. मग म्हटलं - ’हजाम इज ओ.के., तुम्हाला आणखी काय आवडलं?’
’बाकीचं ठीक आहे, थोडे शब्द वगैरे बदल पण.’
च्यायला झालं - आता घरातुनच सेन्सॉर.
तरी बरं - बायकोला मराठी येत नाही!

आता आधीच्या अमेरिकेबाबतच्या फंड्यांना छेदत ब्लॉगबद्दल ’शोधण्या’ ऐवजी ’दाखवण्याची’ सुरुवात करायला हवी....