Thursday, December 25, 2008

युगा अठ्ठाविसांची वेदना.... - तिला.

गहिऱ्या सकाळच्या पावणे अकरा प्रहरी....

या पावणेअकरा प्रहरी जर बाहेर बर्फ पडत असेल, घरी बसुन काम होत नसेल आणि तो जर बुधवार असेल तर मग तर सांगायलाच नको. समोर (अजुन न वाचलेलं) गो.नी. दांडेकरांचं ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ असेल आणि ते केवळ गिल्ट (काम करत असणं अपेक्षित असुनही न करावंसं वाटण्याची) तर मग विचारायलाच नको.
तशात काल रात्रीची भयाण स्वप्नं!
म्हणजे आईला डबलसीट घेऊन मोटसायकल वर चाललो होतो.
जंगली महाराज रस्त्यावर कुणाचा तरी फोन आला. आईच्या छोटुकल्या मोबाईलवर तो उचलला आणि मी कार चालवत नाहिए हे लक्षात आलं. दुचाकीच्या पुलाकडे टर्न मारला तशात ’कॉल वेटींग’! दिनेश दादाचा होता - त्याला म्हटलं - थांब दोन मिनिटांत करतो. असं बोलतोय न बोलतोय तो अचानक दुचाकी पूल अगदीच तोकड्या मॅन्युअल ट्रेडमिल सारखा अर्धा फूट अरुंद झाला - तो पण धळ सरळ नाही - वाकडा तिकडा! मग मोबाईल फेकुन देऊन डायरेक्ट पुलावरच उडी मारली. पुलाला धरुन लोंबकळायला लागलो. आईचं काय झालं माहित नाही, पण काही झालं नसावं, कारण एकेक करुन शेकडो लोक मला भेटायला यायला लागले तर आई ठणठणीत होती. मी ही ठणठणीतच होतो, पण का कुणास ठाऊक लोक मला भेटायला येत होते. आमचा हॉल म्हणजे ’काकडे पॅलेस’ मंगल कार्यालयाएवढा मोठा होता. उजवीकडे खुर्च्या होत्या, डावीकडे सोफ्याचे चार सेट्स. मधे मला भेटायला आलेल्या लोकांची रांग. भाऊ लोक येऊन ’चालु दे रे तुझं - आहोत आम्ही’ करुन सोफ्यांकडे वळाले. मी आपला मला माहित नसलेल्या लोकांना सिऍटल न्यु यॉर्क पासुन किती लांब आणि कॅलिफोर्नियाच्या किती वर आणि आमच्याकडे बर्फ का पडत नाही हे सांगत बसलो. बाहेर बदाबद पडणाऱ्या बर्फाकडे पहात मला या कालच्या स्वप्नातल्या आठवणी लख्ख आठवताहेत. त्यात परत गावाकडुन आलेल्या गुंठेपाटील मंडळींच्या बायका कपाळाला सोन्याचा पत्रा कि काय बांधुन! पण ते प्रकरण पत्र्यापेक्षा जाड असावं. कारण त्यावर सखुबाई नामदेवराव चव्हाण, खालच्या लाईनला A/P कवठे बुद्रुक Est 1972 आणि ते ही ऍम्ब्युलन्स वर कसं प्रतिबिंबित लिहितात - तसं लिहिलेलं. म्हणजे प्रत्येक बाईच्या पत्र्यावर वेगवेगळी नावं, गावाचं नाव वेगळं, Est लिहायचं का नाही आणि त्यावर कुठलं साल टाकायचं हे बहुतेक त्या त्या स्टाईलवर अवलंबुन. एका बाईच्या नाव आणि A/P च्या मधल्या लाईनवर Horn OK Please लिहिल्याचं आढळलं. ’हटके’ पत्रा लावण्याबद्दल त्या बाईचं कौतुक वाटल्याचं मला (अजुन) आठवतंय. भेटायला येणारे लोक मात्र माझ्या ऍक्सिडंट बद्दल विचारतच नव्हते - नुसतं आपलं अमेरिका!
मग भावांच्या टोळक्यात जाऊन बसलो. तिथे काय झालं ते डिटेलमध्ये सांगितलं - मग सगळेच हसायला लागले. कुणीतरी मी फेकुन दिलेला फोन आणुन दिला. त्याला जरा खरचटलं होतं. मग जीपमधुन कात्रज बायपासने कोंढवा कि असं कुठेतरी जायला लागलो तर कात्रजला पोलीस दिसला. त्याला टाळुन पुढे गेल्यावर वाटलं कि हे बरोबर नाही - त्याला त्याचा हप्ता दिलाच पाहिजे. म्हणुन मग हायवेलाच रिव्हर्स मारुन परत आलो. पण तो पोलिस पण अमेरिकेच्याच गप्पा मारायला लागला. आणि त्याने अमेरिकेला न्यायला माझ्यासोबत खाऊ पाठवला. एवढं कमी म्हणुन एक माजी छावी तिच्या भावाला बरोबर घेऊन भेटायला आली. तर कुणीही नातेवाईक तिच्याशी बरोबर बोलेनात. म्हणुन तिची चिडचीड झाली. मग मी तिला जाऊन म्हणालो कि हे बघ बाई, तु माझ्याशी जसं वागलीस त्यामुळे माझे हे आप्तस्वकीय तुझ्याशी असे वागणार हे स्वाभाविक आहे, पण तु त्यांना भेटण्यासाठी मुळात आलीच नसल्याने त्यांच्या वागणुकीचा तुझ्यावर प्रभाव का पडावा? हे बहुतेक तिला पटलं असावं. कारण तो प्रभाव नाहीसा झालेला मला बहुतेक दिसला. मग मी तिला ’पण मी तुझ्याशी बोलणं योग्य नाही’ म्हणुन उसाचा रस प्यायला गेलो. पहाटे साडे तीनला जाग आली तेव्हा थंडी वाजायला लागली. म्हणुन ऊब निर्माण करण्यासाठी लॅपटॉप मांडीवर घेऊन बसलो. पुरेशी ऊब निर्माण झाल्यावर लिहायला लागलो. एक दळभद्री पॅरेग्राफ लिहून लॅपटॉप ठेऊन देऊन झोपुन गेलो. झोपता झोपता व्हिस्कीचा उग्र दर्प आला. ’बाप रे!’ म्हणुन बायकोच्या तोंडाचा वास घेतल्यावर कळलं कि उग्र दर्प मीच साईड टेबलवर अर्धवट ठेवलेल्या ग्लासातुन येतोय. उगीच व्हिस्की वाया जायला नको म्हणुन ती प्यावी का असा विचार केला पण म्हटलं - कायको रिस्क! हाच वास उद्या सकाळी ऑफिसात यायचा. म्हणुन मग झाकायला इतर काही योग्य न मिळाल्याने दांडेकरांना सॉरी म्हणुन भ्रमणगाथा ग्लासवर ठेवलं आणि एकदाचा झोपी गेलो. परत एकदा उगीच बायकोपासुन लपवायला नको म्हणुन बायकोला झोपेतुन उठवुन स्वप्नाबद्दल - म्हणजे मला पडलेल्या स्वप्नाबद्दल (छावीचा पार्ट वगळुन) सांगितलं. मग बायको ’झोप आता’ म्हणाली. म्हणुन मग झोपी गेलो.

एवढं असं काही धडाधड लिहिल्याला तब्बल आठ महिने झाल्याने मला आता बरं वाटतंय. भारताच्या ट्रिपेत यंदा कळ्या सुरुवातीलाच भेटला. अजुनही राग म्हणुन ९५ साली सुरु केलेल्या इंजिनियरिंग चे दोन पेपर मुद्दाम ठेवलेत म्हणाला. हल्ली कॉलेजच ’दे रे, दे रे’ करत त्याच्या मागे लागलंय. त्या सब्जेक्ट्सचे बाहेर क्लासेस घेतो पण ’देत नाही - जा!’ ऍटिट्युड कायम. इतर वेळात सकाळी दहावी बारावी सायन्स चे क्लासेस, दुपारी CAT चे क्लासेस, संध्याकाळी CA आणि CS चा अभ्यास, आणि रात्री स्पॅनिश शिकतो. अस्खलित तमिळ बोलु शकतो म्हणाला. रजनी(कांत)ला भेटुन आला, कमल(हसन)ला भेटला. कुठलीही गोष्ट अस्खलित करणाऱ्या कळ्याच्या अस्खलित तमिळवरही शंका आली नाही. मग पॅरी भेटला. बायकोने पोराचं नाव ’रुद्र’ ठेवायला परवानगी तरी कशी दिली यावर म्हणाला - अरे बायको ना! ती म्हणे आमचे ज्योतिषी म्हणतात कि अशा नावाने मुलाचा स्वभाव रुद्र होईल. मग मी तिला म्हणालो - हे मला पटतंय, म्हणुन मग आपण आपल्या पोराचं नाव पैसा ठेऊ! (दे टाळी)!! राहुलला भेटलो, त्याने नविन फ्लॅट घेतला. मग मी संदीपला शिव्या घातल्या आणि राहुलला ’वॉक द लाईन’ची स्टोरी सांगितली. मग त्याने हल्ली ब्लॉग का लिहीत नाही विचारलं आणि ट्युलिप किती भारी लिहिते हे जरा जास्तच तिखट मीट लावुन सांगितलं. मग मी जनतेला माझ्या पोरीचे व्हिडिओज दाखवले. मग योगेशला भेटलो आणि ’अभिषेक’ मध्ये पावभाजी खाल्ली. अजुन लिहालला सुरु न केलेल्या पुस्तकाबद्दल बोललो. घरी येताना थंड वाऱ्याने सर्दी खोकला झाला. मग मी गावाला गेलो. आज्जी बाप्पुंना भेटलो. बालाजीचं मंदीर जोरात यंदा. विहीर तुडुंब. त्यात विरुळा दिसला. Handicam ने त्याचं शूटिंग केलं. काका गाळ काढायचं म्हणाले. सिताफळाची झाडं पाहिली, शेवग्याचं झाड पाहिलं, पेरुची बाग (लांबुन) पाहिली. झेंडु लावावा का - यावर जनतेला विचार करताना पाहिलं. घरी येऊन जेवलो - गावाला आता केबल आलिए, म्हणुन थोडा टि.व्ही. पाहिला. मग परत आलो. मग त्याच्या आधी राहुलबरोबर जाऊन सलील वाघला भेटलो. तो ई-मेल कर म्हणाला. मग ’बेगम बर्वे’ पाहिलं. बुधवार रात्रीची अस्सल सदाशिवपेठी गर्दी यशवंतराववर ओसंडुन वहायला लागल्यावर उलटी होईल असं वाटायला लागलं. म्हणुन मानकरांच्या केबीनमध्ये जाऊन बसलो. सोनावण्यांच्या फोनमुळे मानकरांनी उभेंकरवी फ्री पासेस पाठवले. नाटक ठीक होतं, मला झोप लागली. कजरीतुन साड्या ड्रेसेस घेतले, जयहिंद मधुन शर्ट पॅंट, श्रीमंत मधुन कुर्ता, गाडगीळांकडुन बायकोसाठी सोन्याचा पत्रा घ्यायचा विचार केला पण भाव वाढल्याने आयडिया ड्रॉप केली. मध्येच गिऱ्याला जाऊन भेटलो. त्यानेही फ्लॅट घेतला - दुसरा घेतोय. गजा टिंबर मार्केट मध्ये काम करतो म्हणाला - कुणी कुणी कुठे कुठे. गिऱ्याला म्हटलं मला तुझा अभिमान वाटतो. गहिऱ्या दुपारच्या पावणे बाराव्या प्रहरी मी भारताच्या आठवणी आठवायचा प्रयत्न करतोय. कांताताईला भेटायला गेलो, आत्तु भेटायला आली. संवेदला भेटलो, गणेशला भेटलो - तो Lynch on Lynch वाचत होता म्हणुन मग आम्ही Ganesh on Ganesh अशी चर्चा केली. चहा पिलो बिडी मारली.

अजुन काही आठवत नाही.

एस्कलेटर कसा हात पाय न हलवता वरुन खाली आणि खालुन वर पोचवतो, तसंच अमेरिकेत किंवा इतर देशांत एअरपोर्ट्सवर जमिनीवरच पट्टे असतात. त्यावर उभं राहिलं कि एका जागुन दुसर्या जागी (आपोआप) जाता येतं. त्यावर हळू चाललं तरी भराभर चालण्याच्या स्पीडने चाल्लोय असं (बाहेरुन पहाताना) वाटतं. भारतात गेल्यावर तसं वाटलं. भारतात रॅट रेसचा उत्साह ओसंडून वहात होता, प्रत्येक जण पैशाबद्दलच बोलत होता, प्रत्येक जण धावत होता. एवढी धावपळ नुसती बघुनच मला थकायला झालं. मला माझी परिस्थिती त्या एस्कॅलेटरवरच्या प्रवाशासारखी वाटली. अमेरिका माझा एस्कॅलेटर. म्हणुन बाहेरुन पहाणाऱ्याला मी ’स्पीड’ने चाललोय असं वाटणार. त्यावरुन उतरलं कि मी या रेस मध्ये कितपत टिकणार असं वाटायला लागलं. म्हणजे स्वत:बद्दल डाऊट नाही, पण असं कि - योगेश सांगत होता, हल्ली KG च्या ऍडमिशन साठी नुसतं डोनेशन नसतं - मुलांच्या परिक्षा असतात, त्यांच्या पालकांचे इंटर्व्ह्यु असतात. त्याला म्हटलं अरे त्यात नविन ते काय - ते तर मी जायच्या आधीही होतंच की! तर तो म्हणे अरे हे काही नाही - हल्ली पालकांच्या साठी लेखी परिक्षा सुरु झाल्यात, आणि हे कमी म्हणुन त्या परिक्षांसाठी क्लासही! आता या रेसमध्ये मी सहभागी होणार नाही हे नक्कीच, पण अशा आणखी किती रेसेस, याची कल्पना कराविशी वाटली नाही. विकी म्हणाला - तु आता काही परत येत नाही. मुळात जायचं नसुनही गेलो आता यायचं असुनही शंका सुरु झाल्यात - त्या यायच्या किंवा रहायच्या किंवा अशा काही नाही. वेगळ्याच आहेत. नक्की काय पाहिजे याच्या शंका - मग जे पाहिजे ते कुठे मिळणार हा (अजुनतरी) दुय्यम प्रश्न.

आज चालायला प्रारंभ जरा लवकरच केला आहे.
वैशाख नुकताच लागला आहे. नऊदहाचा सुमार झाला, कि नर्मदाकाठ सपाटुन तापतो. वाटेनं महामूर फुफाटा. पात्रांत गरम झालेली पांढरी स्वच्छ वाळू. तिच्यात तर फुटाणे भाजुन घेता येतील. पाऊल घालायची सोय नाही.
आजही हे अग्निकांड सुरू होऊन गेलं आहे. माझ्या पायांना भेगा पडल्या आहेत. त्यांच्यात रोज संध्याकाळी हाती लागेल त्या झाडाचा चीक भरतो. प्रदक्षिणा करणाऱ्यानं पायांत पायतण घालायचं नसतं.
पण मी त्यावर एक युक्ती शोधून काढली आहे. सरगंधाच्या वेलीनं पायांना वडाची जूनसर पानं बांधतो. आता हा उपाय काही चिरकालीक नव्हे. कारण चालूनचालून पानं फार लवकर फाटतात. पण दुसरा ईलाज काय!
आजही मी पानं बांधली होती. पण मुळी बेलाचं बंधनच टिकेना. मग वेदनांनी ठणकणारं मन बाजूला काढून ठेवलं, अन फाटून चीध्या झालेले पाय जंजाळीक तापलेल्या धुळीच्या स्वाधीन केले.
मी चाललो आहे. उजव्या हाताला माता नर्मदा वाहत्ये आहे. डाव्या बाजूला वाटेच्या पालिकडं शेतं आहेत, गुरचराईचं रान आहे, फताड्या पानांचे साग आहेत, खडक आहेत, आकाशाला भिडणारी अंजनाची झाडं आहेत. या सगळ्यामधून रेंगाळणाऱ्या वाटेवरुन मी भराभर पावलं टाकतो आहे. ती वाट मला लवकरच संपवायची आहे.
पण का?
खरंच की! हे कधी लक्षात आलं नाही. लवकर का? सावकाश का नाही? माझ्या या भ्रमणाचा - एकूण जीवनाच्याच वाटचालीचा अर्थ काय? प्रदक्षिणा उशिरानं संपली, अथवा न संपली, म्हणून काय बिघडलं?
प्रश्न तर मार्मिक आहे.
थोडं थांबून विचार केला पाहिजे याचा. पण कुठं थांबायचं?
डाव्या हाताला मोहाचं हे गरगरीत झाड आहे. बसूं या त्याच्याखाली. बुद्ध बोधीवृक्षाखाली बसला. ज्ञानेश्वर अजानवृक्षाखाली विसावले. आपण मोहाच्याच झाडाखाली बसूं या! आपल्या वाट्याला तेंच आलं. एकेकाचं भाग्य! दुसरं काय?
पण दुपारकरता पाणी आणलं पाहिजे! मग दरडीवरून खाली उतरतो. पात्रांतले खडकही अपार तापले आहेत. मूंडकगतीनं वाळूचं सहारा ओलंडीत प्रवाहाजवळ पोचतों.
वा! वा! काय पाणी आहे?
मला वाटतं, पंचमहाभूतांचं शरीर आहे ना, त्यांतलं जलतत्व या जातीचं असावं. कसं आहे कोण जाणे, पण या जातीचं व्हावं. किंबहुना इतर चारी महाभूतांच्या जागाही अशाच हिरव्या, नितळ, अति स्वच्छ पाण्याचं शरीर व्हावं.
काय मजा येईल! मग माझ्या शरीरात चाललेली प्रत्येक क्रिया मला बाहेरुन पाहतां येईल. अन्न कसा प्रवास करतं, ते पचतं कसं, त्याचं रक्त कसं बनतं, हृदय कसं, त्याचं स्पंदन कसं, मनाचे व्यापार कसे -
अरे!
हे तर जगालाही सहजगत्या दिसुं शकेल! माझ्या मनांत हेलकावे खाणाऱ्या वासना, अन् त्यांनी निर्माण केलेली घाण जर कुणाला दिसली तर -
पण नर्मदामैयाचं पाणी मात्र अति देखणं आहे. त्याकडे किती पाहिलं, तरी तृप्ती होतच नाही. दिवसा, राट्री - रात्रीला डोळे फुटावेत, अन् तिनं हे पाण्याचं अपार रूप पाहून धन्य होऊन जावं.
कडू भोपळा कोरून केलेला कमंडलू पाण्यानं भरला, अन् मोहाच्या झाडाकडे निघणार, एवढ्यांत काही तरी गंमत दिसली. जरा जवळ जावं म्हणून माझ्या पलीकडे पाण्यांत एक खडक होता त्यावर उडी मारून उभा राहिलों.
वा वा! कसं हे जीवसृष्टीचं दर्शन! पडदा नाही, बुरखा नाही, भय नाही, शंकोच नाही. मनांत उठलेला तरंग निष्कपटपणानं आकाररूप होऊन बाहेर उमटायचा!
मला वाटतं, त्या जोडींतली एक कासवी असावी. दुसरा तिचा प्रियकर. आकार मोठ्या परातीएवढाले. दोघं शिवाशिवी खेळताहेत. कासवी लबाड आहे. एका ठिकाणीं जळांत स्थिर राहत्ये. प्रियकर जवळ आला, की सुळ्कन् खाली बुडी देत्ये. कासव आंधळ्यासारखा पाण्यातल्यां खडकांना टकरा देत तिच्या मागं धावतो.
पुन्हा ती वर आली. ती जणुं पाताळलोकांतून धावत वर उमटली. मला ऐंकूं येत नाही - कारण कासवं मोठ्याने बोलत नाहीत, केवळ इसापाची कासवंच बोलतात! पण बहुधा आता कासवी हसत असावी.
तो चिडला असावासा दिसतो. हें कासवीला कळलं आहे. ती आपले फताडे पाय हलवीत एका ठायी स्थिरावली आहे. तिने विचार केला असेल, कि पुरे झालं. येईना का बिचारा जवळ! करु या चार पाऊसपाण्याच्या गोष्टी.
कासवानं आपला फताडा, गिळगिळीत पाय कासवीच्या खांद्यावर ठेवला आहे. दोघांची तोंडं एका ठायीं मिळाली आहेत, तोंच -
"नर्मदे हर!"
मी चमकून मागे पाहिलं. बहुधा तो माझ्याच संप्रदायातला साथी असावा. खाद्यावर पोटोबाच्या आहुतीचं सामान लादलेली पिशवी आहे. गळ्यांत भली टपोरी रुद्राक्षांची माळ. भस्म फासलंय अंगाला. इतकं कि मला एकदम मोहरममधल्या वाघाची आठवण झाली. कसंबसं हसू दाबत मी प्रतिसाद दिली.
"हर नर्मदे!"
पण तेवढ्यानं माझी सुटका नव्हती. अर्थ असा कि आता कूर्मक्रीडादर्शन थांबवलं पाहिजे. हा भिडू तास दोन तास खाणार. त्यानं तरी काय करावं? दिवसभर तोंड बांधून चालायचं. कुणी भला गुराखी किंवा शेतकरी वाटेंत भेटलाच तर ’नर्मदे हर - हर नर्मदे’ हा गजर व्हायचा. त्याला पुढचं गाव किती लांब ते विचारायचं. तो सांगेल ते ऐकून घ्यायचं. त्यावर चर्चा करीत बसणं निरुपयोगी आहे. कारण मैल दोन मैल, एवढ्या किरकोळ अंतराकडे हे भूमीपुत्र गंभीरपणे पाहूच शकत नाहीत. एखाद्याला विचारावं,
"का हो भैया, सरमाठी कै मैल दूरीपर है यहॉंसे?"
तो सरमाठीच्या दिशेला हात झुगारुन सहज बोलून जाईल,
"जे जहीं तो है -"
पुन्हा प्रश्न करायचं धाडस करावं,
"जे जहीं याने? कै मील -"
"होगा दूचार मील -"
"लेकीन लोगबाग तो कहते हैं कि दस मील है -"
"हो भी सकता है -"
"आपको शायद पता नहीं है!"
"अरे पता क्यों नही? एक बार गया जो था!"
"कै साल हुवे?"
"उं:! छोटा था. मॉंकी गोदमें बैठा बैठा गया था सरमाठी. वहॉं फूफाजीके घर पकौडे बने थे -"
अशा लोकांशी संगतवार असं काय बोलता येणार? मग कुणी परिक्रमावासी भेटला, की त्याच्याशी भरपूर बोलायचा मोह अनावर झाला, तर कुणीं नावं ठेवूं नयेत.
रुद्राक्षधाऱ्यानं जटाभार मागं फेकीत प्रश्न केला,
"काय पाहत होतांत?"
खरं बोलून सोय नाही. म्हणालों,
"मासे कसे खेळतात तें!"
"हां हां! पण सांभाळून बरं का!"
"का?"
"अहो, मगरमच्छ पट्कन् पाय ओढायचा?"
याचं म्हणणं काही अजिबात खोटं नाही. नर्मदेंत मगरी फार. मीं पटकन् अलीकडील थडीवर उडी मारली. मग फुशारकीनं म्हणालों,
"माणसाला काय करतो मगरमच्छ!"
"अरे बाबा असं बोलूं नकोस. जवान आहेस. गरम रक्त असंच बोलत असतं. पण काल सकाळीच एक तुझ्याएवढा मुलगा मगरमच्छानं ओढून नेला -"
"तुम्ही पाहिला?"
"न पाहिला म्हणून काय झालं? थोरामोठ्यांनी सांगून ठेवलंय, ते काय खोटं आहे?"
"काय सांगितलंय् थोरामोठ्यांनी?"
"की रानांत वाघ बलवान्, अन् पाण्यांत मगरमच्छ -"
पराभव कबूल करणं मला रुचलं नाही. म्हणालो,
"आपण नर्मदेचे पुत्र. परिक्रमावासी. आपल्याला काय करतो मगरमच्छ?"
हें ऐकलं मात्र, अन् रुद्राक्षधारी खवळला. तो डोळे वटारुन म्हणाला,
"परिक्रमावासी हो?"
"हो ना! तेंच तर -"
"और फिर नर्मदाजीको उलांघकर खडे थे?"
नर्मदा केवळ भडोचजवळ काय ती ओलांडून पार व्हायची. एरवी कधीही तिला पाय लावायचा नाही. म्हणजे पाण्यांत उतरायचं नाही. किनाऱ्याला सोडून एखादा खडक असेल, त्यावरही पाय देऊन उभं रहायचं नाही. नर्मदा ओलांडल्याचा दोष पदरीं येतो. किनाऱ्यावर बसुन स्नान करायचं. भुरभुर माता हर गंगे!
हा कठोर दंडक आहे. पाळायला हवा. अन् मी तो मोडला होता. कारण परिक्रमा अशानं खंडीत होते, हे मला मान्य नव्हतं. मी हसून बोललों,
"बाबाजी रेवामाता आमची आई आहे ना?"
"मग?"
"काही नाही. पण मूल नाही आईच्या मांडीवर खेळत? तसं हे -"
"तूं कुठला?"
गाडं भलतीकडेच चाललं. ताळ्यावर आणलं पाहिजे. म्हणालों,
"मी कुठला का असेना! तूर्त तर परिक्रमा करतोंय्."
"पडशी दिसत नाही तुझ्याजवळ ती? अंथरुण-पांघरुण?"
आता प्रकरण निकरावर येत चाललं. मी सावरण्याचा यत्न करीत म्हणालों,
"महाराज, मी पडशीबिडशी नाही बाळगीत. अंथरुण-पांघरुण रेवामातेचा काठ अन् आकाश."
"मग जेवतोस कुठं?"
"जो न मागता वाढील त्याच्या दारीं बसून."
छे! तापलंच गाडं! पडशी उतरून दोन्ही हात कमरेवर ठेवून तो म्हणाला,
"तूं लबाड आहेस!"
"कशावरून?"
"तू परिकम्मेचे नियम पाळीत नाहीस. अरे, तुझ्यासारख्या नकली गोट्यांनीच तर परिकम्मा-मार्ग बिघडवून टाकला आहे. सदावर्ते बंद पडत चालली आहेत. आमच्यासारख्या निरंजनमूर्तींनाही वेळेवर शिधा-आटा मिळत नाही! काल एका सदावर्तवाल्यानं लेकानं तूपच दिलं नाही! त्याचा सत्यानाश होवो -"
मी म्हटलं बरी फट सापडली. थोडी परनिंदा करावी. म्हणालों,
"हो ना! काही लोक फार लबाड असतात -"
पण प्रकरण अगदीच भडकलं.
"तुझ्यासारखे धतुंदरबाबाजी भेटतात ना त्यांना? मग ते तसेच व्हायचे! छे! तुम्हाला मोकळं सोडून भागायचं नाही. चला माझ्याबरोबर -"
"कुठं?"
"पोलिसचौकीवर."
लिगाड चिकटातंय्. झटकून टाकलं पाहिजे. थोडं उग्र रूप दाखवलं, तर कदाचित् बला टळेल. नाही तर पोलिसचं शुक्लकाष्ठ मागं लागायचं. हे भोपाळी पोलिस म्हणजे प्रतिनरकासुर आहेत. अनेकदा तो त्रास भोगावा लागला आहे. तर मग छानदार सोंग काढलं पाहिजे.
डोळॆ वटारुन म्हणालो,
"येत नाही जा! अरे, मला पोलिस काय करणार! अवधूत आम्ही. आम्ही कुणाची पर्वा करीत नाहीं. पोलिस तुम्हा माणसांना भिववतील. आम्हाला कुणाची भीति? नाहं मनुष्यो, नच देवक्षयो! आम्हाला पाणी भिववीत नाही, आग जाळीत नाही, वारा उडवीत नाही-अच्छेद्योSयमदाह्योSयमविकार्योSयमुच्यते!"
भडाभड काही कठिण उच्चारांचे श्लोक म्हटले. कांही गोखाण्डं, काहीं स्वजौसमौट्‍!अन् तो भला माणूस गर्भगळीत होऊन टकाटका बघत उभा राहिला. मग आणिकच वात्रटपणा सुचला. पाणी उचललं हातांत. अइउण्ऋलृक् या महामंत्रांनी तें अभिषिक्त केलं, अन् त्याच्याकडे धावूं लागलों. चुळुक उगारून.
जो का पळाला आहे म्हणून सांगू तो मोहरमचा वाघ! धावतां धावतां तापून आग झालेल्या वाळूंत पडला देखील. पडशी एकीकडे. घोंगडी एकीकडे. हातांतली दोरबाटली एकीकडे. कसाबसा धांदरटासारखा उठला, अन् सामान गोळा करून माझ्याकडे दृष्टी न वळवतांच त्यानं पुन्हा धूम ठोकली!
वाईट वाटलं. उगीच बिचाऱ्याला या आगीत लोळावं लागलं. पण मी काय तरी करुं? प्रकरण अगदी हातघाईवर आलं, म्हणजे माणूस शस्त्रं बाहेर काढतो.


पोस्ट इथेच संपवणार होतो पण हा प्रसंग इथे का लिहिला हे कोणी ना कोणी तरी विचारणारच आणि मग त्याचं उत्तरही द्यावंसं वाटणार - मग ते आताच का देऊ नये. तर उत्तर असं कि - ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकाबद्दल जेव्हा पासुन (सिरियसली) वाचायला लागलो तेव्हापासुन ऐकुन होतो, पण आकर्षक टायटल सोडून आणखी काहिही माहिती नव्हतं. खरं सांगायचं तर अजुनही नाही. अजुनतरी हा कुणीतरी तपस्वी यात्रेचे सर्वमान्य नियम झुगारुन - अनावश्यक वाटणारी लिमिटेशन्स न मानुन यात्रेवर निघालाय. तो कुठुन कुठे, कधी आणि कसा पोचणार आहे, हे अजुन तरी माहित नाही. इप्सित स्थळी पोचणार कि नाही हे ही. या सगळ्या unknowns मध्ये त्याचे फंडे interesting वाटताहेत. प्रदक्षिणा मारुन तो पुन्हा जिथुन सुरुवात केली तिथेच पोचणार असला तरीही! आणि तसंही कुठलाही माणुस एका ठिकाणुन निघुन काही वर्षांनी, महिन्यांनी, दिवसांनी पुन्हा तिथेच किंवा कुठेतरी पोचतोच - आणि जेव्हा कधी जिथे कुठे पोचतो तेव्हा त्याने प्रवासाच्या सुरुवातीपेक्षा जास्त कमावलेलंच असतं. फक्त जे कमावलं तेच कमावायचं होतं का - हा महत्वाचा प्रश्न!

भ्रमणगाथा continues....

(शीर्षक आणि उतारा संदर्भ - ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ - गो.नी. दांडेकर - प्रथम प्रकाशन १९५६)

पुढचं पोस्ट - Adaptation वर.
लवकरच.