Monday, February 10, 2014

रक्तात पेटलेल्या अगनीत सूर्यान्नो -

रक्तात पेटलेल्या अगनीत सूर्यान्नो -
तुम्ही जागे आहात कि झोपलायत हे कळत नाहिये.
म्हणजे जागे होतात तेव्हा फार जळजळ व्हायची हे आठवतंय.
पण जळजळ थांबलीए ती तुम्ही झोपलायत म्हणुन कि वय वर्षं पस्तीस - हे कळत नाहिए.
तसंही तुमचं दर्शन दुर्मीळ झालंय.
च्यायला सिअ‍ॅटलमध्ये लई ढगाळ असतं.
तर रक्तात पेटलेल्या अगनीत सूर्यान्नो -
कसं काय?
निवांत?
माझंही निवांत चाललंय.
गजर लावायचे आणि मेटाकुटीला येऊन वेळा पाळायच्या यातही धमाल असते नाही?
स्वत:च स्वत:शी वाद घालायचे, लढायचं, बोलायचं वगैरे वगैरे ठीके....
पण जळजळ बंद.
घोर, निष्काम, निर्लोभ, निर्मोही काळज्या भरपुर पण ती म्हणजे कपातली वादळं.
तुम्ही मला झोपवलंत कि मी तुम्हाला हे बऱ्याच वर्षांची तंद्री भंगल्याने बहुतेक कळत नसावं.
पण आपल्याला एकमेकांची आठवण आली नाही हे मात्र खरं.
तसे अधे मधे अचानक काही काही सूर्य पेटतात,
पण concentrate, segregate, attack आणि diffuse युजुअली वर्क होतं.
ते आणि तुम्ही इंग्रजीत पुरेसे पेटत नाही हे एक कारण असावं.
पेटणारे सूर्य पेटणार आणि यथावकाश भिजणार, विझणार हे एकेकाळी नेमाचं होतं.
मग ते ढगाळ डिप्रेशन.
आणि मग त्याच्याशी डील करायची अशी सवय लागली कि
दैदिप्यमान सकाळ, लाही लाही दुपार, टळटळीत संध्याकाळ आता उजाडत नाही.
याचं वाईट वाटुन घ्यायचं कारण नाहिए.
तुम्ही हवेहवेसे दु:ख होतात.
तुम्ही नकोसे होऊनही टळत नव्हतात म्हणुन तर जळजळ होती.
च्यायला मला पण ना - आजार टळल्याचं सोयर नाही ते नाही पण लक्षणं उतरल्याचं कोण सुतक!
तर रक्तात पेटलेल्या अगनीत सुर्यान्नो -
तुम्ही एकेकाळी मस्त प्रोपेल करायचात.
हल्ली तुम्ही ऑन डिमांड पेटत नाही याने मात्र चिडचिड होते.
भेंचोत पीटर वॉकर असे जागोजागी पेरुन ठेवलेले असतात कि सानिध्याने मशाली पेटतात
पण धगधगत नाहीत.
तर रक्तात पेटलेल्या अगनीत सुर्यान्नो -
तुम्ही जुन्या मित्रांसारखे आहात.
म्हणजे आहातही आणि असणारही आहात पण....

अधुन मधुन भेटत जा.

निदान फोन तरी!