Thursday, October 11, 2012

मथुरा नगरपती....

च्यायला ये मस्त रेहनेका -
बाबा रोज दर्शन देऊन विचारपुस करतो.
त्याला रोज भेटल्या सारखं वाटतं. जबरा बरं वाटतं.
आमच्यात झोपायच्या आधी शुभंकरोती म्हणतात.
ती म्हणुन झाल्यावर आज मुक्ता ने देवबाप्पा - please fix Baba's back म्हटलं.
There goes सरफरोशी की तमन्ना....

आज लिहिण्यासारखं काही नाही.
एपिड्युरल घ्यायला हॉस्पिटल मध्ये गेलो आणि अ‍ॅनास्थेशिया द्यायच्या आधीच घोरायला लागलो.
असं बायको अगदी कामवालीलाही सांगतिए.
म्हणजे आमच्याकडे कामवाली नाही - पण असती तर तिला ही सांगितलं असतं.
अ‍ॅनास्थेशिया ची झोप घरी आल्यावर झाली.
स्टेरॉईड्स मुळे मान दुखायची थांबली.
एनीवे - "माप्रअ" (माझा प्रत्ययकारी अस्थिरोग) बद्दल आज एवढंच.

दोन गोष्टींबद्दल लिहायचं बरेच दिवस झाले डोक्यात आहे - constant (or rather my constant) need to be entertained आणि writers interested in writing about themselves and not the story.
पण त्याच्याबद्दल नंतर बोलु.
म्हणजे लेखाच्या शेवटी वगैरे आठवलं तर नंतर बोलु.
च्यायला शेवटचा निबंध बहुतेक १२ वी मध्ये लिहिला होता.
तेव्हा मराठी आवडायचं नाही - तेच संस्कृत, इतिहास, फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री, बॉटनी.
तेव्हा फक्त गणित आवडायचं - आणि हळुहळु इंग्लिश, भुगोल आणि झुलॉजी (कि झुऑलॉजी) आवडायला लागलेलं. (याचं कारण अ लॉंग लाईन ऑफ गुड मॅथ टीचर्स, शांता ताई गोखले, अवचट आणि ’माती आणि पाणी’, आणि एस. पी. मधला तो दाढी मास्तर).
पुढे इतिहास आवडायला लागला. सुचेता ताईंचे सल्ले काही वर्षांनी सापडले.
या कॉम्बिनेशन चं करियर बनवणं अवघड होतं - त्यामुळे मी त्या फंदात पडलो नाही.
च्यायला मी काय लिहितोय आणि मला काय लिहायचं होतं?
मला लिहायला बसल्यावर कोरा कागद भयंकर आवडतो असं लिहायचं होतं.
च्यायला माझ्यातुन कधी काय बाहेर पडेल हे मलाही सांगता येत नाही.
हा - तर निबंध.
तर - निबंध लिहायला अजिबात आवडत नाहीत. कारण ते दोघं मेरिट मध्ये आलेले भाऊबंधु.
म्हणजे बहिण १० वी, १२ वी दोन्ही मेरिट लिस्टमध्ये पहिली आली आणि भाऊ १० वी त पहिला आणी १२ वी त घरानेकी इज्जत मिट्टीमे मिळवणारा तिसरा!
Does anyone even remember their names? I guess one became a doctor and another an E&TC
engg and their parents wrote a book about their studies. I am guessing त्यांचं नाव अरणकल्ले कि असं
काहितरी होतं - मल्हार अरणकल्ले नाही - तो चांगला लिहितो.
एनीवे - हु गिव्ह्ज अ फ़्लाईंग फक?
या भावंडांनी पुढे पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे निबंध कसे लिहावेत यावर पुस्तक लिहिलं.
मला जितपत आठवतंय तितपत - ते पुस्तक म्हणजे ललित लेख ’ace up the sleeve' ठेऊन कसे लिहावेत याचं रक्तरंजित पोस्ट्मार्टम होतं.
म्हणजे कि वाचणाऱ्याला साधारण तीन पैसे प्रती पान मिळतात. त्याचं लक्ष कसं खेचायचं, मर्यादित शब्दांत त्याला कसं हसवायचं, थोडं इमोशनल करायचं, दोन चार सुपीक benign कुठेही खपतील अशी वाक्य आणि शेवटचा किलर पंच - इतकं रक्तरंजित.
आणि ते वाचल्यावर ’च्यायला हे मलाही जमेल कि’ असं मला आलेलं क्रुर फीलिंग.

तर निबंध.
मला लिहिता येतात.
आय हेट देम.

मला कोरा कागद आवडतो.
कारण मग मीच मला गोष्ट सांगत सुटतो.
इथे पण एक आठवण आहे.
पडसऱ्याला शाळेबाहेरच्या झाडावर काही पोरांना एका पिक्चरची स्टोरी सांगितली होती.
वर्षभराने तिथे गेल्यावर बरीचशी नवी पोरं - पण त्यांना माझी गोष्ट सांगणारा अशी ओळख होती.
दुसऱ्या वर्षी मी अशीच कोऱ्या कागदावरची गोष्ट सांगितली.
गोष्ट आता आठवत नाही.
कोऱ्या कागदावरच्या गोष्टी कधीच आठवत नाहीत.
शब्द मर्यादित नव्हते कदाचित भावनाही नसतील.
हे माझं झालं.
त्या गोष्टीचं काय झालं माहित नाही.
कदाचित बालमृत्यु कदाचित आख्यायिका.
Damn - I love कोरा कागद.

तर असं.
तर - मी ही दुसऱ्या कॅटॅगिरीत येतो का? self involved writer?
आय गेस येतो - म्हणजे अशा कॅटॅगिरीची खरं तर मला गरज नसावी कारण मी स्वत: सोडुन आणखी कशाबद्दलही लिहीत नाही.
मग मला या टॉपिकवर लिहावंसं का वाटलं?
आठवत नाही.
आणि ते तेवढं महत्वाचंही वाटत नाही.
कोऱ्या कागदावरच्या गोष्टी आणि कविता इंटरेस्टिंग आहेत पण.
पण च्यायला त्या सुचतात त्या फक्त मुक्ता सोबत.
आणि सुचतात तेव्हा नेमके कागद नसतात हाताशी, किंवा मी ड्राईव्ह करत असतो किंवा त्या मोमेंटची गंमत घालवायची नसते.
त्यामुळे पुन्हा लिहायला कागद कोरे रहातात.

Constant need to be entertained -
बहुतेक हा सार्वजनिक आजार आहे कारण टी.व्ही., थोडा पेपर आणि.....वेल मोस्ट्ली टी.व्ही. या रुपात प्रत्येकच जण आजारी असतो.
पण मी वेगळा.
असं इयत्ता पाचवीच्या पहिल्या तासाला आम्हाला शाळेत शिकवलं होतं - ते आमच्यातल्या बऱ्याच जणांनी चांगलंच मनावरही घेतलं.
ज्यांनी घेतलं नाही ते यशस्वी झाले.
ज्यांनी घेतलं ते ही यशस्वी झाले.
तर - मी वेगळा.
मला खरंच सतत एंटरटेनमेंट ची गरज आहे का हे टेस्ट करायला गेलो तर २ तास गेले आणि पहाट झाली.
माझ्यासाठी काम म्हणजे जबरा एंटरटेनमेंट आहे.
त्यात कुणाशी वाद झाले - जे कॉन्ट्रॅक्टर्स सोबत हमखास होतात.
काम फेडरल किंवा स्टेटचं असेल तर चिघळतात.
तर वाद झाले तर कामाची एंटरटेनमेंट व्हॅल्यु जबरा वाढते.
पण मला कुनाची १० मिनिटं वाट बीट पहायला लागली तर माझे मेजर झोल होतात.
स्वत:ला टॉलरेट करणं अवघड होतं.
म्हणुन मग मी सतत किंडल सोबत ठेवतो.
बस, ट्रेन मध्ये - कधी पॅसेंझर सीटवर बसावं लागलं तर तिथे.
ते विसरलं तर माझ्याकडे एव्हिएशन मॅगझीन्स ची थप्पी असते.
आणि खचाखच भरलेला ’इफ यु एव्हर गेट बोअर्ड’ नावाचा फोल्डर.
घरी आल्यावर माझ्या नेट्फ्लिक्स क्यु मध्ये ३५० पिक्चर असतात.
घरात विकत घेऊन न वाचलेली दहा तरी पुस्तकं बुक शेल्फ वर असतात.
लाब्ररीची दोन चार ड्यु डेट पार केलेली पुस्तकं बेडरुम, रेस्टरुम, हॉल मध्ये पडलेली असतात.
यातुन मला कॉलेज फुटबॉल, एन एफ एल, क्रिकेट (फक्त टेस्ट आणि वन डे), आणि एन बी ए प्ले ऑफ्स, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन फायनल्स आणि मास्टर्स साठी वेळ काढावाच लागतो. त्यात इतस्तत: पसरलेले वाढदिवस, आमंत्रणं, जनरल गप्पा, गराज पार्ट्या, लीग क्रिकेट आणि तिथले मित्र हे सगळं आलंच. मी रोज टाईम्स ऑफ इंडिया, क्रिक इन्फो, तेहेलका वाचतो. अधुन मधुन इ-सकाळ, फॉरेन पॉलिसी नियमीत.
शिवाय मी बायकोशी ही अधुन मधुन बोलतो.
या सगळ्यात मुक्ता बहुतेक सगळीकडेच असते.
अरे हो - मित्र, इंडिया कॉल्स वगैरे.
मग हा असा अचानक राखीव आठवडा मिळतो - जेव्हा डॉक्टर्स घरी बसवतात आणि माझा मेजर झोल होतो.
पोंक्षे सरांशे बोललो होतो एकदा त्यांच्या ’सगळ्या छंदांना वेळ मिळत नाही’ या विषयावर. त्यांच्या मते वय वाढतं तसे छंद प्रायॉरिटाईज केले जातात, काही आपोआप गळुन पडतात.
माझं उलटं होतंय - नविन वाढताहेत आणि या लिखाणासारखे जुने परतताहेत.
असं का व्हावं?
हे सगळं २४ तासात बसवायचं म्हणजे साहजीकच कोंबाकोंबी होते.
शर्टांना इस्त्री करण्या ऐवजी नविन शर्ट घेतले जातात.
मग बायको ओरडते.
पॅंटचं ठीके -
सगळ्याच ब्ल्यु जीन्स घेतल्या कि बायकोला कळत नाही - ही जुनी कि नवीन!
एनीवे तर असं.
अधुन मधुन एखादा छंद मागे पडतो, पण मग काही दिवसांनी तो ही मुसंडी मारतो.
याला लॅक ऑफ फोकस म्हणायचं का?
यातल्या कशालाच हात लावावासा न वाटल्यास मग मी बायकोला मदत म्हणुन स्वैपाक वगैरे बनवायला लागतो.
पण मग भांडी खूप वापरल्याने पुन्हा बायकोची चिडचिड.
मी रात्री १२.३० ला झोपतो आणि साधारण ५.३० - ६.०० ला उठतो - त्यामुळे तिथे अ‍ॅडजस्टमेंटचा स्कोपच नाही.
असा मोकळा आठवडा मिळाली कि झोपतंच नाही. (किंवा ऑपरेशन टेबलवर झोपतो).
माझ्या मते तुम्ही गादीवर आडवे असाल तर शरीराला आपोआप विश्रांती मिळते - उगीच वेगळं झोपायची गरज नसते.
आणि आता सोयिस्कर झोपेचा फोबिया.
चला उद्या बायकोने बोंब मारली तर तिला सांगता येईल डॉक्टरने स्टेरॉईडचा साईड एफेक्ट इन्सॉम्निया सांगितलेला - आठवतंय ना?
एनीवे - मला स्वत:ला असं सतत एंगेज ठेवायची गरज का पडते?

तसं न करणे म्हणजे काय?

Wednesday, October 10, 2012

माधुरी दीक्षित नेने


फोबिया म्हणजे भिती.
आज मला झोपायची भिती वाटतिए.
काल रात्री झोप लागली ते पहाटे पाच वाजता मला माझ्याच ओरडण्याने जाग आली.
उजवा खांदा मेजर दुखत होता.
तो दुखतही होता आणि हलवताही येत नव्हता.
ओरडुन ओरडुन घशाला कोरड पडली.
माधुरी, मुक्ता, सासु कुणालाही काय करावं कळेना.
मी कसंबसं एक ग्लास पाणी पिलं आणि २ आयबु प्रोफेन आणि एक नारकॉटिक घेतली.
माधुरीने ९११ कॉल केला.
त्या ऑपरेटर शी बोलल्याचं आठवतंय.
मग पॅरामेडिक्स आले, त्यांनी बसतं केलं, स्लिंग मध्ये हात अडकवला, पण मला पेन-किलर्स देऊ शकणार नाहीत असं सांगितलं.
बेडवर बसल्यावर बरंच बरं वाटलं.
थोड्या वेळाने बसल्या बसल्याच एक डुलकीही काढली.
उठल्यावर बाबाशी बोललो आणि स्वत:च ड्राईव्ह करुन डॉक्टरकडे गेलो.
त्याने सी-७ व्हर्टीब्राची डिस्क थोडी घासली गेलिए आणि स्लिप झालिए असं सांगितलं.
अधिक जाणकारांसाठी: Herniated disc of C7 Cervical Spine.
इतरांसाठी: ब्रह्मांड चा ट्रेलर पहायचा एकदम सोप्पा मार्ग!
उद्याची न्युरोसर्जनची अपॉइंटमेंट.
त्या आधी ते फुटभर लांब सुई मणक्यात घालणार आणि लिटमस पेपरने टिपल्यासारखं मणक्यात ’डाय’ सोडणार.
३ तासात घरी.
एनीवे ज्याला कुणाला सांगतोय त्याला मेजर भिती वाटतिए.
पण कदाचित ब्रह्मांडचा ट्रेलर पाह्यलाने मला काय फरक पडत नाहिए.
डॉक्टरशी बोलताना -
हा डॉक्टर सही आहे पण एकदम. बुर्सेझ कि असं काहितरी नाव आहे.
नक्की आठवत नाही - कारण त्याला भेटत असतो तेव्हा ब्रह्मांडचा ट्रेलर....
तर - डॉक्टर सही आहे.
म्हातारा आहे.
मला म्हातारे डॉक्टर आवडतात.
म्हणजे अनुभव वगैरे ठीके - पण एवढे दिवस धंद्यात राहिला म्हणजे त्याने नक्कीच चांगलं काहितरी केलेलं असणार.
एनीवे - तर डॉक्टर सही आहे.
माधुरीने विचारलं कि हा डिस्क वगैरे काय प्रकार असतो?
तर तो म्हणे कि गाडीचा कसा शॉक अ‍ॅब्झॉर्बर असतो - तसा आपला डिस्क हा प्रकार.
तो असा जनरल चुकुन घसरत नाही.
पण तुझा नवरा जर म्हणतोच आहे कि त्याचा कुठे अ‍ॅक्सिडेंट झाला नाही, तर त्याचा अर्थ त्याचं आता वय होतंय.
माझी बायको अशी एकदम डोळे मोठे हरणासारखे निरागस वगैरे करुन ऐकत राहिली.
नक्की गळ कुणी टाकलेले ते मला कळेना ते बहुतेक नारकॉटिक मुळे.
मग डॉक्टर तिला म्हणाला - आपण तुझ्या डिस्क्स तुझ्या नवऱ्याला ट्रान्स्फर करुयात का?
च्यायला मला एवढं मरणाचं दुखत असताना लोकांना मला हसवण्यात काय असुरी (या आसुरी) - तर काय असुरी आनंद मिळतो काय माहित.
तर तो पुढे म्हणे कि टेन्शन नको घेऊ - वि विल स्लॅप हिम अराउंड अ‍ॅंड ही विल बी ऑल राईट.
नाहितर नवरा बदलुन टाक - कमी, न वापरलेल्या डिस्क्स शोध. ओह बट देन मनी वोन्ट बी दॅट गुड.
मी म्हटलं मी ही नविन कार शोधतो - चांगल्या शॉक अ‍ॅब्सॉर्बर ची.
तर - पहाटेचे तीन.
आणि मला झोपेचा फोबिया.
अमली पदार्थांमुळे विचित्र स्वप्न पडतात.
म्हणजे मी सकाळी उठुन आमच्याकडे एक जुनं वापरात नसलेलं लव्ह सीट आहे - त्याला पॉलिश करत बसलो होतो असं स्वप्न पडलं.
लव्ह सीट वरुन आठवलं - परवा कुणीतरी विचारलं कि तुमचं लव्ह मॅरेज का? म्हटलं सहा वर्षांपुर्वी तर होतं बुवा. आता बहुतेक फक्त मॅरेज.
माधुरी जवळपास नसेल तर मी हेच काय - काहिही बोलु शकतो.
आंडु पांडु समझ्या क्या - मराठा है मराठा!
आणखी एक म्हणजे या प्रकाराला लव्ह सीट का म्हणतात काही माहित नाही.
अगेन - उत्सुकांनी गुगल सर्च मारावा.
आमच्या अर्ध अंडाकृती तिरक्या लव्ह सीट मध्ये लव्ह नक्की कसं करणार हे आम्हाला सहा वर्षांत समजलेलं नाहिए.
एनीवे पाठीत/खांद्यात उठणाऱ्या कळेपेक्षा तिचं अ‍ॅंटिसिपेशन जास्त दु:खद.
मी आयदर आत्ता झोप हॅल्युसिनेट करतोय किंवा मला झोप येतिए.
त्यामुळे मी आता डोळे मिटुन ग्रेस नाहीतर महानोर आठवतो.
ऑर फॉर दॅट मॅटर चंकी पाडे!
सौ. नेनेंची स्वप्नं आपल्या हॅल्युसिनेटिंग नशीबातही नाही.
उगीच कशाला अपेक्षा वाढवा!

Tuesday, October 09, 2012

लत.

वाचनाचं व्यसन लागलंय.
म्हणजे वाचन आवडतं, यड्यासारखा वाचतो वगैरे म्हणायला ठीके, पण मला व्यसन लागलंय.
म्हणजे २-४ मिनिटं मोकळी मिळाली के मला स्वस्थ बसवत नाही.
एका सायबेरियन वाघाची गोष्ट वाचली.
दुसऱ्या महायुद्धातल्या एका हेराची.
त्याने जर्मनी आणि इंग्लंड दोन्ही देशांसाठी हेरगिरी केली!
आणि दोघांकडुनही पदकं मिळवली.
स्टीव्ह कोलचं बिन लादेन बद्दलचं पुस्तक वाचतोय.
काही वर्षांपुर्वी त्याचं ’घोस्ट वॉर’ वाचलेलं - अफगाणिस्तानमधल्या यादवी बद्दलचं.
सीमोर हर्शचं ’चेन ऑफ कमांड’ वाचतोय - ९/११ नंतरच्या अमेरिकन इंटेलिजन्स सर्व्हिसबद्दलचं.
९/११ ते अबु गरीब - असं काहितरी.
सिअ‍ॅटलच्या इतिहासाबद्दल वाचलं.
डेनिस लेहानी चं ’मिस्टिक रिव्हर’ वाचलं.
त्याचं आणखी एक वाचलं - नाव आठवत नाहिये आता.
हे एवढं सगळं मागच्या ३-४ आठवड्यात.
मला व्यसन लागलंय.
माझी मान दुखायला लागलिए.
आता मी ’माझा प्रत्ययकारी अस्थिरोग’ असा लेख लिहायचा विचार करतोय.
मान दुखायला लागली तरी वाचत राहिलो.
मग दुर्लक्ष करवेना म्हणुन हॉस्पिटल मध्ये गेलो.
त्यांनी आयबु प्रोफेन आणि नारकॉटिक्स दिली.
मी अमली पदार्थ कधी वापरले नाहीत - त्यामुळं त्यांना म्हटलं कि ओ.के. मद्यपदार्थ ठीके, अमली वगैरे नाही.
रात्री खांदे आणि मान असे कपाळात गेले कि अमली तर अमली असा प्रकार झाला.
ते कमी म्हणुन सोमवारी सकाळी उठुन बघतो तर माझा ग्लॅड्सन स्मॉल झालेला.
म्हणुन आज इमर्जन्सी रुम नको - खऱ्याखुऱ्या डॉक्टरकडे जाऊ म्हणुन ’कुणी डॉक्टर आहे का डॉक्टर’ करत फिरलो.
एक आजोबा सापडले.
त्यांनी पाठ नाही - मानेचं दुखणं आहे असं सांगितलं.
बहुतेक डिस्क स्लिप झालिए.
मग जहाल अमली - व्हॅलियम!
मग एम.आर.आय.
उद्या आजोबांशी परत बैठक.
भेंडी हॉस्पिटलमध्ये बेडवर एकटाच पडुन होतो तेव्हा वाटलं कि च्यायला एवढंच?
धिस इस इट?
च्यायला इथुन सुटलो तर रोज लिहीन.
म्हणुन लिखाण.

व्यसनातुन सुटायला नविन व्यसन....

पिक्चर कुणाच्या पॉंट ऑफ व्ह्यु मधुन बघतो याने किती फरक पडतो?
कुठल्याही कृतीमागची भावना कळली कि त्या कृतीबद्दल सहानुभुती निर्माण होते का?
म्हणुन आपले मित्र नेहमी छान का?
म्हणुन ओये लक्की मध्ये अभय देओल त्याच त्या परेश रावल कडुन परत परत गंडतो का?
रिअल लाईफ मधला परेश रावल कसा ओळखावा?
कि सच - याद नहीं जूते कहा उतार आये थे?

परवा मुंबई पुणे मुंबई पाहिला.
आणि डिप्रेशन मध्ये गेलो.
प्रेमपट पाहिल्यावर प्रेमात पडल्याची आठवण येणं साहजिक आहे का?
कि ते ही पिक्चरच्या दर्जावर अवलंबुन?
बिफोर सनराईजने हुरुहुर लागते.
मुंबई पुणे ने डिप्रेशन का यावं?
पिक्चरमध्ये कधितरी कळतंच कि अरे हेच ते!
मग तरी हेच ते तेच ते असावेत असं का वाटावं?
पिक्चर संपुच नये असंही?
परत परत वर्षानुवर्षे गाडं ’इजाजत’ वर येऊनच का अडावं?
परवा दो नैना और एक कहानी मुक्ताला गाऊन दाखवलं
तिला इतकं आवडलं कि ती ही ते गुणगुणते माझ्या सोबत.
आम्हाला गाणी बनवायला आवडतात.
काल काय तर
I sleep up
Baba sleeps down
when I ned help
Baba comes to town.
एनीवे - तर तिला दो नैना दाखवलं परवा.
मग ती त्याची अम्मा का?
आणि ते त्याचे बाबा का?
मग त्याची अम्मा कुठे गेली?
का?
मग शेवटी तिला त्याची गोष्ट सांगावी लागली.
मग मुक्ता धो धो रडली.
Please dont leave me करत.
मग तिला सिमेटरी, अंत्यविधी हे प्रकार काय असतात सांगितलं.
आपण हिंदु आहोत हे ही.
आणि वेडी बिडी आहेस का? असं कुणी जात नाही - १०० वर्ष झाल्यावरच लोक जातात.
आणि गेल्यावर पटकन सगळ्यात आवडत्या व्यक्तीच्या पोटी जन्माला येतात.
तिला ही कल्पना जबरा आवडली.
तिका मोठेपणी प्रिन्सेस व्हायचंय.
आणि ती तिच्या castle च्या शेजारी माझ्यासाठी घर बांधणार आहे. (अम्मासाठी नाही).
म्हणजे मग तिला कधी भिती वाटली कि ती माझ्या घरी येऊन झोपू शकेल.
आणि माझी १०० वर्ष संपली कि मी तिच्या किंवा तिच्या पोराबाळांच्या पोटी जन्म घ्यायचं प्रॉमिस केलंय.
आणि तिने (अम्माला सांगु नको म्हणुन) मग मला पाहिजे तेवढे चिप्स आणि चॉकलेट्स द्यायचं कबूल केलंय....

तुम्ही से जनमूं तो शायद मुझे पनाह मिले.....

Sunday, October 07, 2012

गणित वगैरे.

काल ठरवलं कि एक गोष्ट नियमीत करायची.
अ‍ॅक्चुअली दोन.
एक आपोआप झाली.
दुसरी विसरलो.
अडचणीत आल्यावरच देवाची आठवण का होते?
देवाचीच का?
कि अडचणीच्या इंटेन्सिटी वर कोण आठवणार हे ठरतं?
मग मित्र/मैत्रीण, भाऊ बहीण, आई-बाबा हे देवत्वाचे टप्पे झाले का?
म्हणजे मग बायको नंतर डायरेक्ट देवच भेटत असावा.
फारसा विचार न करुनही बायकोचं हेच मत असावं.
माझेच पैसे मीच स्टॉक मध्ये गुंतवले.
आता गुंतवले तर रोज बघु त्यांचं कसं चाललंय असं म्हणुन रिमाईंडर टाकलं स्वत:ला कि रोज स्टॉकमार्केट चेक करायचं.
पण रोज हा प्रकार पेनफुल होतो.
म्हणजे किमती रोज वर खाली व्हायच्या त्या होतात - आपण त्या रोज बघुन फरक पडत नाही.
दुसरं म्हणजे - भेंडी विकायचंच नाही तर ’विकलं तर किती येतील’ याचा हिशोब का?
पण च्यायला याचाच हिशोब नेहमीच.
गाडी घेताना रिसेल व्हॅल्यु काय येईल?
घर घेतलं तर किंमत किती वाढेल?
३८ मैल अंतर तीस मिनिटात ताशी ६० मैलाच्या लिमिटने कसं पार करता येईल?
मामा कुठे असतो?
स्पीड कुठे वाढवायचा?
स्पीड लिमिटच्या किती वर अ‍ॅक्सिडेंटची शक्यता किती वाढते?
जी वाढते ती लिनिअर कि लॉगॅरिद्मिक स्केल ने? याचं कुणीतरी इक्वेशन लिहिलं पाहिजे.
आणि मग त्याचं कुणीतरी अ‍ॅप्लिकेशन बनवलं पाहिजे.
म्हणजे मग घरातुन बाहेर पडताना आपोआप स्क्रीन वर पॉप अप विन्डो येईल - भेंडी जायलाच पाहिजे का?
आणि च्यायला पॉप अप, रिमाईंडर, अलार्म, ट्वीट, स्टेटस अपडेट, मेसेज, ईमेल, व्हॉईसमेल याच्या जंजाळात वेळ, अंतर, पैसा, महत्व, गरज, समाधान याची इक्वेशन्स लिनीअर बायलॅटरल कधीच नसताना लिमिट्स, डेरिव्हेटिव्हज आणि काय नाय तर सगळंच जंजाळ इटिग्रेशनच्या पिशवीत कोंबुन बाकी जे उरेल त्याला कॉन्स्टंट म्हणायचं.
म्हणजे मग आपण उद्याच्या पॅराबोलांचे आडाखे बंधायला मोकळे.
आडाखे चुकले कि देव आहेच.
मुक्ताला झोप येत नाहिये.
असं झालं कि ती अंधारात ती चित्र बनवायला लागते.
नाहीतर कविता करायला.
नाहितर तिच्या बाहुल्यांना गोष्टी सांगायला लागते.
हल्ली तिला गणित शिकवतोय.
म्हणजे मग तिलाही इक्वेशन्स ची सवय लागेल.
भेंडी मी वाईट आहे.
काल मित्रांसोबत गप्पा मारत बसलो असताना जेफ आला.
त्याला म्हटलं माझं वय काय गेस कर बरं.
तो म्हणे ४८.
च्यायला मी ३४ आहे म्हटल्यावर तो म्हणे - मी ३४ च म्हणणार होतो, पण तुम्ही लोक हसाल असं वाटल्याने ४८ म्हटलं.
त्याला म्हटलं च्यायला ३४ कुठे आणि ४८ कुठे?
जेफ गंडलाय.
जेफचं गणित चुकलंय.
गणितं चुकलेले लोक सुखी असतात का?
जेफला ३ वर्षांपासुन ओळखतो.
कॉंट्रॅक्टर खड्ड्यात साचलेलं पाणी पंप करुन बाजुला नेत होता.
तिथुन ते पाणी फिरुन खड्ड्यात परत येत होतं.
च्यायला हा सुपीकपणा कुणी केला हे शोधायला गेलो तर एका ट्रकच्या मागे हा धार मारत उभा असलेला दिसला.
त्याचं गणित चुकलंय म्हणलं ना? ते असं.
एनीवे.
तेव्हा तो ५० होता.
पुढच्या वर्षी त्याने लग्न केलं.
त्यानंतर महिन्याभरातच बहुतेक त्याच्या बायकोला कॅन्सर झाला.
पण त्यांचं छान चाललंय.
रोज येतो, मर मर काम करतो, घरी जातो - डोक्याला ताप नाय.
काल रात्री मधुरी आणि तिची आई आणि मुक्ता रात्री बाहेर चक्कर मारायला गेले.
वांगडु आणि मी घरी.
मग तो उठुन रडायला लागला म्हणुन त्याला चंद्राची गोष्ट सांगायला लागलो.
मग म्हटलं ’रात्र सुंदर’ गाऊ.
ते रात्र सुंदर, चंद्र सुंदर ठीके, पण मग रात्र ओला शब्द बिब्द मागायला लागली.
मग त्याला - बाबा रे तुझ्या साठी ट्विंकल ट्विंकल योग्य आहे म्हटलं.
गणपतीत कधितरी मुक्ताला गणपतीची गोष्ट सांगितली कि गणेशाची अम्मा शॉवर घेत असताना त्याचे बाबा बाथरुम मध्ये जायला लागले.
त्याने जाऊ दिलं नाही म्हणुन - त्यांचं नाव शिवा.
तर त्यांनी म्हणुन त्याचं डोकं कट केलं.
आणि मग हॉस्पिटल मध्ये दुसरं डोकं नसल्याने डॉक्टरांनी त्याला हत्तीचं डोकं लावलं.
आणि मग आपण त्याला गणपती बाप्पा म्हणायला लागलो.
हो तो बेबी एलीफंट होता.
नाही तो ऑलरेडी मेलेला होता.
दोन मिनिटं विचार करुन मुक्ता म्हणाली कि अम्मा शॉवर घेत असताना मी बाथरुमपाशी उभी रहाणार नाही!
पोरं पण ना....
पण यु ट्युबवर शोधुन रात्र सुंदर सापडलं नाही.
लोकप्रिय संदीप खरे बराच सापडला - पण तो पोकळ होता.
हल्ली तर त्यातही रिमिक्स प्रकार आलाय.
म्हणजे त्याचं असं ना - कि कुणाची तरी आई बहीण मित्र मैत्रीण खांदा किंवा मानदुखीच्या वेदनेनं तडपत असताना कुणीतरी विचार केला असणार कि च्यायला एवढं शिकुन माझा उपयोग काय? म्हणुन मग त्या माणसाने कुठलातरी बाम वगैरे शोधुन काढला असणार. मग फार विचार करुन अत्यंत योग्य असं किंवा ’हु गिव्हज अ फक’ म्हणुन फेकलेलं ’झंडु बाम’ असं नाव त्या माणसाने दिलं असणार. मग ते प्रसिद्ध वगैरे झालं असणार. मग दुसर्या तिसऱ्या पिढीत कुणीतरी एकावर एक फ्री अशी स्किम किंवा ’रस्त्यात खड्डा, खड्ड्यात पाय, खिशात झंडु बाम, घाबरतो काय’ असं काहितरी ब्रीदवाक्य बनवलं असणार. अ‍ॅड एजन्सीमध्ये लोक इक्वेशन्सना कवितेत मांडत असावेत काय? संदीपला विचारायला पाहिजे. कारण त्याची गाणी आणि तो - हल्ली जाहिराती वाटायला लागलेत.
एनीवे.
तर हे असं अती होतं.
मानदुखीवर डॉक्टरने काल नारकॉटिक्स सबस्क्राईब केली.
त्याला म्हटलं च्यायला असलं डेंजर मी कधी काही घेतलं नाही.
सतीश म्हणे अरे लग्न होऊन सहा वर्षं झाली ना?
मग नारकॉटिक्सनेही फरक पडणार नाही.
चमच्या चमच्याने बधीरपणा तुला भरवण्यात आल्याने तु संत झालायस!
त्याला जाम हसलो.
आज एकापाठोपाठ एक तीन गोळ्या घेउनही ढिम्म परिणाम नाही.
उद्या आपण नारकॉटिक्सची भाजी करु.
आज बास.