Wednesday, February 27, 2008

न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं

आकाश, सिद्धार्थ आणि समीर.
म्हणजे काय तर - आपण.
’दिल चाहता है’ ची पब्लिसिटी चालू होती - तेव्हा भारतात होतो. त्यावेळचा फरहान अख्तरचा इंटरव्ह्यु आठवतोय. तो म्हणे - ’हिरोचा आदि-अंत सगळ्यांनाच माहित असतो, पण कित्येक सीन्समध्ये अधुन मधुन डोकावणाऱ्या, त्याच्या जोक्सला हसणाऱ्या, त्याच्या लफड्यात त्याची मदत करणाऱ्या मित्रांचं काय होतं याची मला नेहमीच उत्सुकता असायची. म्हणुन हा पिक्चर!’
त्या मित्रांबद्दल उत्सुकता मलाही होतीच.
पिक्चर पाहिला - आवडला.
नुसताच आवडला नाही तर त्याने मागचे सहा वर्ष विचार करायला भाग पाडलं. जसे सगळेच ग्रेट पिक्चर्स करतात - मग तो ’इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड’ असो कि ’इजाजत’, ’मेमेंटो’ असो कि ’हजारों ख्वाईशे ऐसी’....
पण खरं तर ग्रेट पिक्चर्स हा या लेखाचा विषय नाहीच. डिसीएच पण नाही.
विषय - न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं.
वेळ - दुपार.
स्थळ - पॅसिफिकचा रम्य किनारा, हवा ढगाळ पण तरीही स्वच्छ, मागे कर्कश्श कोकलणारं ऍन्डीचं ड्रिल रिग.
अशा ’आई शपत!’ आणि ’आयला!’ च्या रेताड किनाऱ्यावर अडकलो कि सुचतात ते हे असे ’नदीला पाणी वेग कमी’ प्रश्न.
आता विषय निघाला आहेच डिसीएच चा तर -
प्रीती झिंटाने आकाशशी लग्न करुन चूक केली का?
पिक्चर पाहिल्यावर तसं वाटत नाही वाटत.
पण माझ्यासारखा (उल्टी खोपडीका) विचार करुन पहा -
म्हणजे असं कि - बाई, तुझं लग्न ठरलंय. अगदी बुडुक बुडुक प्रेमात नसशील त्या प्राण्याच्या पण निदान - ’शादी! और तुमसे!!’ असा तर प्रकार नाही!
अशात तुझा छावा तुला पूल खेळायला घेउन जाणार. तिथे तु मैत्रिणीशी ’मी कि नै - लग्नात कांजीवरम घालणार’ किंवा तत्सम विषयावर गहन चर्चा करत असताना एक बडे बापका (अर्थात वाया गेलेला) पोरगा भरसभेत तुझा हात धरुन वगैरे तुला प्रपोज मारणार, आणि कुठलाही - शहाणासुरता/येरागबाळा/मुंबईचा/दिल्लीचा/गेला बाजार पुण्याचा - छावा वागेल तसाच तुझा छावा त्याला काळा-निळा बदडणार.
मग माझे आई - तु त्याच टवाळाबरोबर ऑपेरा हाऊसच्या पुढे-मागे बागडायला लागल्यावर तुझ्या छाव्याने तुला शिव्या घालायच्या कि हातातल्या क्यु स्टिकचं टोक गोल करायचं?
त्याचे ’अवगुण’ काय? तर म्हणे पजेसिव्ह आहे. कोण नसतं?
आणि या आकाशचे गुण काय - तर दर आठ्वड्याला छावी बदलणे, मित्रांबरोबर टवाळक्या करणे, कुठलंही क्वालिफिकेशन नसताना डॅडींच्या बिझनेसच्या नावावर सिडनीत लफडी करणे आणि मग रडत गात कल्टी मारणे.
एवढं कमी म्हणुन मागच्या दाराने लग्नात येऊन ’चल’ म्हणणे!
(च्यायला प्रीती आकाशला ’चल फुट!’ म्हटली असती तर त्याचा कसला पोपट झाला असता!)
बरं यावर तिचा छावा बोलतो पण कसलं प्रॅक्टिकल! तो म्हणे - ’धिस इज सो एम्बॅरेसिंग!’
’मी नाही जाऊ देणार तिला याच्या बरोबर’ म्हणतो तो. मग आकाश मारे एक ढिशुम मारुन राग आवरण्याचा प्रयत्न वगैरे करत त्याला हात वगैरे देतो. (च्यायला हात द्यायला त्याच्या बापाचं काय जातंय?)
आकाशने काय एवढा दिग्विजय केला कि त्याचं सगळं चांगलं होणार? आणि त्या छाव्याची कुठली असली घोडचुक कि आऊच्या काऊ समोर त्याचा एवढा मोठा पोपट होणार?
आय गेस - दॅट्स लाईफ!
हे आणि असे प्रश्न हा पिक्चर पाडतो - म्हणुन हा पिक्चर माझ्यासाठी ग्रेट होतो. गैरसमज नको - आकाशला प्रीती मिळाल्यावर मी सुद्धा टाळ्या पिटतो, पिक्चरची तोंडभर स्तुती करतो (एनफॅक्ट या पिक्चरची करु तेवढी स्तुती कमीच होईल), चहा टाकतो आणि कल्टी मारतो.
पण हा पिक्चर - न संपता मनातल्या मनात सुरुच रहातो. प्रश्न विचारत रहातो -
आणि अशा भर दुपारी - अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांत भर घालत रहातो.

आता हे लिहुन झालं.
पण अजुन ड्रिलिंग चालु. समुद्र चालु. पक्षी बिक्षी पण चालु. म्हणुन मग आणखी प्रश्न.
स्वातंत्र्य म्हणजे काय?
म्हणजे मी वैयक्तिक स्वातंत्र्य वगैरे बद्दल विचारत नाहिए. इन जनरल - पंधरा ऑगस्टच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल वगैरे विचारतोय. म्हणजे त्याचं असं कि -
आताचा मी आणि स्वातंत्र्याआधीचा मी - यात काय फरक?
आताच्या मी ने देश सोडलाय - म्हणजे कायमचा नाही, पण तात्पुरता तरी - सोडलाय ना?
तर देश सोडलेल्या आताच्या मी आणि (जर सोडला असता तर) देश सोडलेल्या तेव्हाचा मी मध्ये - काय फरक?
कन्फ्युजिंग आहे ना?
मलाही तसंच वाटतंय!
ऍन्डीने सातवा ऍन्कर सुरु केला - सिल्टी फाईन मीडियम डेन्स टु डेन्स सॅन्ड - च्यायला वाळु पण तीच ती!

परवा गब्बरने मेल करुन सांगितलं - ब्रिटिशांच्या काळात भारतात इन्कम टॅक्स म्हणे ६०% होता - च्यायला म्हणजे वाईटच!
म्हणजे ब्रिटिशांच्या काळी माझे आजोबा आणि पणजोबा शेतमजुर होते - त्यांना बहुतेक इन्कम टॅक्स भरावा लागला नसणार - पण होत्या त्या तुटपुंज्या शेतीवर सारा भरायलाच लागत असणार.
अर्थात -तो अजुनही भरावा लागत असणार. आता इन्कम टॅक्सही ३३ कि ३५ टक्के झालाय.
तर ३५% म्हणजे स्वातंत्र्य आणि ६०% म्हणजे पारतंत्र्य का?
कधी नव्हे ते काय वाटतंय ते मांडताना माझाच झोल होतोय.
म्हणजे त्याचं असं कि परवा ’रंग दे बसंती’ (परत) बघताना एक प्रश्न (परत) पडला - कि असं काय होतं कि ज्याच्यामागे आख्खा देश पेटला होता? ज्याच्यासाठी लोक बिनदिक्कत आयुष्य झुगारुन देत होते? (ऍटलिस्ट असं ऐकलंय).
पारतंत्र्य पारतंत्र्य - म्हणजे त्यांना नक्की एवढं काय टोचत होतं? काहीतरी असणारच! मग स्वातंत्र्य मिळाल्यावर ती टोच संपली का? म्हणजे ६०% ची ३५%? म्हणजे स्वातंत्र्य ३५ ते ६० मधे कुठेतरी असणार.

-------------

हे लिहुन पण वर्ष वगैरे झालं असणार.
पॅसिफिकच्या रम्य वगैरे किनाऱ्यावर नक्की कुठे होतो ते आठवत नाही. आय मीन आठवतंय - पण अंधुक - आणि जे आठवतंय ते चुकही असु शकेल.
ज्या ऍन्डी नामक प्राण्याचा इथे १-२ वेळा उल्लेख आलाय - तो आठवत नाही.
उगीच बोंबलत उन्हातान्हात कसकसले प्रश्न पडत होते आणि त्यांची कुठली उत्तरं सुचत होती - ते ही आठवत नाही.
बायको आयोडेक्स कडे गेलिए - घरी जाऊन बोर होण्यापेक्षा ऑफिस साफ करु म्हटलं तर कचऱ्यात हे कागद सापडले - आणि न आठवणाऱ्या प्रश्नांची न सुचणारी उत्तरं.
साला लाईफ भी कुछ ऐसाही होगा.

काल ’४९ अप’ नावाची एक डॉक्युमेंट्री बघत होतो. म्हणजे इंग्लंडमध्ये बीबीसी कि कुणीतरी अशी शक्कल लढवली कि आपण ७ वर्ष वयाच्या एका लहान मुलांच्या ग्रुपचा इंटरव्ह्यु घेऊ या. मग सात सात वर्षांनी त्यांना भेटुन त्यांच्याशी बोलु. असे सात सात करत ते आता ४९ वयाचे झालेत.
सगळेच.
आय मीन होणारच - डि.एन.ए. पासुन प्रत्येक गोष्ट वेगळी असणाऱ्या प्रत्येक आयुष्यात तेवढी एकच गोष्ट कॉमन - वेळ.
डॉक्युमेन्ट्री दोनेक तासांची आहे - मी अर्धाच तास पाहिलिए - आज घरी जाऊन कंप्लिट करीन. पण जी अडीच आयुष्यं पाहिली त्यातलं पहिलं म्हणजे - त्याचं नाव आठवत नाही - म्हणुन त्याला ब्रुस म्हणु.
तर ब्रुसला सात वर्षाचा असताना घोडे आवडत. त्याला जॉकी व्हायचं होतं. १४ व्या वर्षी तो एका तबेल्यात कामालाही लागला होता. पोरीबाळींत इंटरेस्ट नाही म्हणत होता. जॉकी व्हायला जमलं नाही तर काय करणार तर म्हणे - माहित नाही, मे बी टॅक्सी चालवीन. २१ व्या वर्षी ब्रुस टॅक्सी चालवत होता आणि त्याचा जोरदार प्रेमभंग झाला होता. आता पोरिबाळींपासुन लांब रहाणार म्हणत होता. २८ व्या वर्षी ब्रुसचं लग्न झालं होतं. नवरा बायको लाजत लाजत कॅमेऱ्यासमोर - तीन वर्षांपुर्वी कसे भेटलो सांगत होते. डिस्कोत भेटलो, आवडलो, लग्न केलं. प्रेम म्हणजे काय तर दोघांनाही सांगता येईना. आता ब्रुसच्या बायकोचं नाव काय ठेवायचं? तिला डेमी म्हणु. तर ब्रुसने स्वत:ची टॅक्सी घेतली होती. खरंतर २ टॅक्सीज घेऊन ब्रुस आणि डेमी दोघंही कॅबी झाले होते. आयुष्यात एक मुलगा हवा - असं ब्रुसचं तेव्हाचं स्वप्न.
३५ व्या वर्षी त्यांना दोन मुलं - मोठा मुलगा, धाकटी मुलगी. च्यायला आता आणखी नावं! तर मुलाचं नाव किम्बल आणि मुलीचं मिसी. मुलं घरात बागडत असताना ब्रुस आणि डेमी डायनिंग टेबलशी एकमेकांकडे बघुन मख्ख. लाईफ टफ असतं म्हणत होते. भांडतो एकमेकांशी, कधी कधी वाटतं कि डिव्होर्स घ्यावा. पण यु हॅव टु वर्क ऑन इट - यु नो! मग आढ्याकडे बघत परत पुटपुटतो - लाईफ इज टफ!
४२ व्या वर्षी ब्रुस, डेमी, किम्बल आणि मिसी मध्ये आणखी एक भर - डेना! मनोज कुमार, आशा पारेख वगैरे चेहरे पाहिल्यावर आता कसं वाटतं - तसं ब्रुस आणि डेमीकडे पाहिल्यावर वाटतं. अंधुकशी ओळख. बाकी निराशा. आणि शांतता. दोघं एकमेकांना केवळ सहन करताहेत. त्याच्या बागेत गेल्यावर म्हणतो - मागच्या वेळेस छोटी होती ती झाडं बघा किती मोठी झालिएत! पण ते झाड बघा - कुणीतरी म्हटलं कि त्याच्या फांद्यांवर पाणी मारा, तर ते झाड मरुन गेलं - लाईफ इज टफ! यु नो!! देशात सुळसुळाट झालेल्या देसी, पाकिस्तानी लोकांबद्दल बोलायला लागला कि त्याचा तिळपापड होतो - हा आमचा देश आहे म्हणतो. आमच्यासारखे वागा.
४९ व्या वर्षी ब्रुस आणि डेमीने देश सोडलाय - दोघं स्पेनमध्ये रहातात आणि धमाल करतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं कि ही ती ’हीच ती’ का! इंग्लंडमधल्या घरावर सेकंड मॉर्टगेज काढुन आणि दोन्ही टॅक्सीज विकुन त्यांनी स्पेनध्ये एक हॉलिडे होम विकत घेतलंय. टाईल्स पासुन प्रत्येक गोष्टीत भांडत प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगताहेत. जवळंच मोठं टुरिस्ट कॉम्प्लेक्स बनतंय. तिथे एक स्पोर्ट्‍स बार सुरु करायचा ब्रुसचा विचार आहे. किम्बल जॉब करतो इंग्लंडमध्ये. मिसीला हायस्कुल मध्ये असतानाच मुलगी झाली. छावा पळुन गेला म्हणे. पण तरी आता ती जबाबदार झालिए म्हणे. पोस्ट ऑफिसमध्ये काम करते - पहाटे पाच वाजता उठुन जाते. तिचा बॉयफ्रेंड तिची काळजी घेतो. त्या मानाने डेना चांगलीच समजुतदार - आणि हुशार.
लाईफ इज टफ - बट वी आर हॅपी - इती ब्रुस.

मी सात ते एकोणपन्नास च्या अधे मधे!

बायकोचा फोन आला - अजुन थोडा वेळ थांब म्हणाली.
मला थांबायला लागलं कि प्रश्न पडायला लागतात.
उगीच कुणाचं काय नि कुणाचं काय!
जॉशुआ वेइट्झकिन नावाच्या एका अमेरिकन चेस प्लेयरवरचा एक पिक्चर बघत होतो. नाव - ’सर्चिंग फॉर बॉबी फिशर’.
बॉबी फिशर हा ही एक चेस प्लेयर.
त्याचं झालं असं कि बॉबी फिशर वयाच्या सातव्या वर्षापासुन बुद्धिबळाच्या सामर्थ्यावर लोकांना थक्क करायला लागला. वयाने, अनुभवाने आणि गणतीत मोठ्या असणाऱ्या लोकांना लीलया हरवायला लागला. हसत खेळत वीस वीस लोकांशी एकाच वेळी लढत त्याचा आत्मविश्वास दुणावला. अशात वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप आली. अमेरिका रशिया एकमेकांवर कुरघोडी करायला सदैव तत्पर. आणि चेसमध्ये आपला हात धरणारं कुणी नाही अशी रशियाची दर्पोक्ती. ’मी रशियाला हरवीन’ असं फिशर म्हणाला आणि लढायला आईसलंडला गेला. पण स्पर्धेशिवाय इतर बाबतींमुळेच त्याचं नाव गाजायला लागलं. म्हणे मागासलेला देश आहे हा - का तर तिथे बोलिंग ऍलीज नव्हत्या!
पण घुमशानपणे त्याने बोरिस स्पास्कीला हरवलं आणि रातोरात तो अमेरिकेत स्टार झाला!
अमेरिकेचा पहिला बुद्धिबळ विश्वविजेता!
बॉबी फिशर हे नाव गाजु लागलं.
’मी माझा शब्द पाळला - रशियाला हरवलं’ करत बॉबी फिशर भाषणं ठोकायला लागला.
हे सगळं चालु असताना बॉबी फिशर कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी एक अचाट खेळी खेळला.

बॉबी फिशर गायब झाला.

पुढे ’फिडे’ वगैरे आलं, त्यांनी बॉबी फिशरला आव्हान दिलं कि - ये, लढ, नाहीतर दुसरं कुणीतरी विश्वविजेता होईल, पण कुठलाही मागमुस मागे न ठेवता बॉबी फिशर बेपत्ता झाला तो झाला.

शाळेतुन परत येता येता बागेत बसणाऱ्या अट्टल जुगारी चरसी लोकांकडे उत्सुकतेने बघत बघत जॉशुआ वेइट्झकिन बुद्धिबळ खेळायला शिकला. आय मीन - तो खेळायला शिकला हे कुणालाच कळलं नाही. आई हात ओढत घरी न्यायचा प्रयत्न करायची आणि हा सात वर्षाचा पोरगा चरसींच्या कोंडाळ्यातुन हटायचा नाही. एकदा गम्मत म्हणुन एका भिकारी पण नावाजलेल्या जुगाऱ्याला त्याच्या आईने पाच रुपये देऊन जॉशुआशी खेळायला सांगितलं. दोन मिनिटांच्या स्पीडचेस मध्ये जॉशुआ हरला, पण दोन मिनिटं पुरी होता होता ’जॉश वेइट्झकिन’ या नावाचा रुतबा बागेतल्या अट्टल चरसींना कळला होता. सात वर्षाचा जॉश तेव्हापासुन बागेत आला कि बिड्या विझायला लागल्या आणि डोकी खाजायला लागली!
जॉशचे बाबा बेसबॉल रिपोर्टर होते.
जॉशने बॅट ऐवजी प्यादं उचललं याचं त्यांना क्षणभर वाईट वाटलं, पण मग त्यांनी जॉशसाठी उत्तमोत्तम शिक्षकांचा शोध सुरु केला. शिक्षक म्हणुन त्यांना बेन किंग्जले सापडला - सर बेन किंग्जले! बुद्धिबळापायी स्वत:चं आयुष्य उधळलेला आणि अनेक आयुष्य उध्वस्त झालेली पाहिलेला - जुना जाणता शिक्षक. त्याच्या कडुन शिकत बागेतल्या अवलिया लॉरेन्स फिशबर्नशी टपोरी बुद्धिबळं लढत जॉश धमाल आणायला लागला.

पहिली स्पर्धा खेळेपर्यंत.

जॉशचं दुर्दैव म्हणजे खेळलेली पहिलीच स्पर्धा जॉश जिंकला.
इतके दिवस ’आपल्या बाळात गुण आहेत’ एवढंच माहित असलेल्या जॉशच्या बाबांना पहिल्यांदाच आपल्या बाळात किती किती गुण आहेत याची प्रचिती आली. प्रत्येक स्पर्धेगणिक त्यांची मान अभिमानत गेली आणि जॉशला हरायची भिती वाटायला लागली. राणी बाहेर काढु नकोस, पेशन्स ठेव म्हणणारा बेन किंग्जले, धुंवाधार लढ - पटाशी नाही तर प्रतिस्पर्ध्याशी लढ म्हणणारा लॉरेन्स - जॉशला समजु शकले नाही. ते काम केलं जॉशच्या आईने. न बोलता. जॉशने बुद्धिबळ सोडलं. चूक लक्षात आल्यावर सगळ्यांनीच मग जॉशला असं कर, तसं कर सांगणं थांबवलं.
आणि अशात अचानक - जॉश खेळायला लागला. बेन किंग्जले म्हणाला तसं - पटावर प्यादी न ठेवता.
पटाशी न खेळता, प्रतिस्पर्ध्याशी न खेळता - स्वत:शी खेळायला लागला.
पुढच्या चालीचा विचार न करता - पुढच्या पंधरा चालींचा विचार करु लागला.
आणि जॉश वेइट्झकिन स्वत:साठी जिंकु लागला.
पिक्चर संपला तेव्हा जॉश वेइट्झकिन - अमेरिकेचा अठरा वर्षांखालील - बुद्धिबळ विजेता होता आणि त्याला बॉबी फिशर बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ’मी बॉबी फिशर नाही!’ हे खमक्यात सांगु लागला होता.

एवढं होऊन - गेला तसा अचानक बॉबी फिशर परत आला!
सतरा वर्षांनी!!
फिरुन बोरिस स्पास्कीशी लढला.
फिरुन जिंकला आणि पुन्हा बेपत्ता झाला.

पण यंदा परत आला नाही.
दोन-तीन पॅरेग्राफ्स पुर्वी त्याला विकीपीडिया वर शोधुन काढलं तर कळलं कि बॉबी फिशर मागच्याच महिन्यात गेला....


लेखाला टायटल तर दिलंय ’न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं’, पण लिहितोय तसा भलतेच प्रश्न पडत चाललेत आणि भलभलत्याच प्रश्नांची उत्तरं मिळत चाललिएत. आता हे लिहिलंय तर पब्लिश करावं का?
करुन टाकावं - कारण अजुन वर्षभर थांबुन त्यात काही सुसुत्रता येईल कि नाही ही शंका आहेच.
वर्षभरापुर्वी आठवलेले डीसीएच, विचार करायला लागणारे आरडीबी, काल परवाचे ’४९ अप’ आणि बॉबी फिशर....

बायकोने मला वाट पहायला लावणं बंद केलं पाहिजे.