Tuesday, October 20, 2015

रात का सिरा


तारीखही अमेरिकन व्हायला लागलिए.
माझ्यासारखी.
कि मी ही अमेरिकन झालोय?
अमेरिकन किंवा भारतीय किंवा गेला बाजार कुणीही होणं म्हणजे काय?
पासपोर्ट ही आयडेंटिटी असेल तर....
आयडेंटिटी म्हणजे काय? तर एका व्यक्तीला किवा वस्तुला दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तुपासुन ओळखता येणं. पण मग माझ्यासारखे दिसणारे अभिजित् बाठे नाव लावणारे किती असतील? आणि मग प्रत्येकाची आयडेंटिटी साठी धडपड का?
प्रत्येक झाड वेगळं असुनही झाडंना आयडेंटिफाय करतात.
तसंच माणसांनाही.
त्यामुळे तसा मी हायब्रीड.
कुठलं बीज कुठे!

त्याचा आणि तिचा डिव्होर्स होतोय!
म्हणजे झालाय.
म्हणजे मागच्या डिसेंबरातच झाला पण तिला माहितीच नव्हतं.
नकळतपणे झालेल्या बालविवाहासारखा नकळत प्रौढ घटस्फोट.
मध्ये भरडले जाणारे त्यांच्यासकट त्यांचे सगळे.
आम्हीही....

आता विमान उडेल.
उडालं.
आता सगळं वाळवंट दिसेल.
मग सॅन बर्नार्डिन्हो डोंगर.
मग तळी, नद्या, रस्ते, गाड्या आणि त्यातली माणसं.
नकळत जगणारी, मरणारी, नकळत पेरली आणि उगवली जाणारी हायब्रीड माणसं....

लिहायला लागलं कि सुचत जातं.
पेनाचं आणि डोक्यातल्या विचारांचं नातं असावं.
लिहिणं ही गरज कि चाळा?
दिवसभर पाहिलेल्या जागांसारखी दिवसभराची प्रतिबिंबं स्वप्नातल्यासारखी कागदावर उतरतात.
तुटलेला डोंगर
आटलेल्या नद्या
आणि त्यांच्यावरची तळी.
त्यातलेही सॅन बर्नार्डिन्होचे ऍल्युव्हिअल फॅन्स.
लिहिताना डोक्यातले विचार संपतात ती समाधी का?
कि नुसतीच अफरातफर?
डोंगर.
डोंगरांच्या सावल्या.
सावल्यांची झाडं.
झाडांच्या दऱ्या.
दऱ्यांच्या नद्या.
मग सगळे ढग.
माझा मेघदूत होतोय.
जमिनीवर आकाशाचे विचार आणि आकाशात गुलजारचे.
आसमॉंके पार शायद और कोई आसमॉं होगा!

चायनीज लोक मराठी माणसांसारखेच ऑब्नॉक्शियस असतात.
ही बाई शेजारी उभं राहुन मी लिहितोय ते वाचायचा प्रयत्न करतिए.
तिला बहुतेक त्यातलं माझ्यापेक्षा जास्त कळत असेल.
नाहीतर मेघ ऑलरेडी तिच्यापर्यंत पोचला असेल!
विचार स्वच्छ असले कि अक्षर भयंकर येत असावं बहुतेक.
आता बाजुला गर्दी जमलिए.
एकमेकांशी निरर्थक बोलणारी माणसं आणि मला दिसणारे त्यांचे पाय.
गुलाबी शुज ग्रँड कॅन्यन ट्रिप बद्दल बोलताहेत.

हे सगळं दोन दिवसांपुर्वीचं.
आधीचं सगळंच दोन दिवसांपुर्वीचं.
त्याच्या आधीचं असतंच काय?

कोणते प्रश्न पडतात, पडावेसे वाटतांत, पडायला हवेत याचं काही गणित नसतं. कि हे गणित ज्यांना जमलं त्यांचं लाईफ सुलझलं?

मणिपुर बद्दल वाचतोय सध्या.
च्यायला काव्य शास्त्र विनोदांत एवढं पुढं असणाऱ्या राज्यात बंडाळी का?
कि राज्य, गुलामी आणि बंड आपल्या रक्तांतच आहे?
तेव्हाचे राजे आणि आताचे राज्यकर्ते यांत फरक काय?
मी अजुनही पुण्यात रहात असल्यासारखा का बोलतो वागतो रहातो?
सतीश तांबे म्हणतात कि संध्याकाळी फिरायला जाणं (किंवा जाता येणं) म्हणजे चैन.
तसं म्हटलं तर मी ही चैनीतच वाढलो कि!
मग मी राजा, राज्यकर्ता, गुलाम कि बंडाळ?
नागा कुकींचा उठाव राजाविरोधात होता का?
मग फक्त राजा बदलल्याने उठाव थांबतो का?
आणि नसल्यास इथुन पुढे का थांबेल?
त्यांना म्यानमार मध्ये जाऊन पकडलं/मारलं. याने उठाव बंद पडणार कि दूर जाणार?
गावांचं शहरीकरण हे शेतकरी आत्महत्येचं कारण असु शकतं का?
हवं ते न मिळाल्याने ’नकोच ते’ अवस्था?
काय हवंय हे नक्की ठरवायचं आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवायची असं विश्वनाथ मेहेंदळेचे वडील म्हणतात.
मग काय हवंय हे अतिरेक्यांचं ठरलंय का?
आणि ते काय?
स्वतंत्र देश कि स्वतंत्र राज्य?
म्हणजे नवा राजा नवं राज?
स्वतंत्र्य म्हणजे नक्की काय?
मत देण्याचा अधिकार?
७०% मतं वाया जातात – त्याचं काय?
१८ वर्षांखालील लोकांना तर तो ही अधिकार नाही – मग स्वातंत्र्य फक्त काही प्रौढांनाच का?
कि स्वातंत्र्याच्या (आणि पारतंत्र्याच्या) मर्यादा ठरवायच्या आणि त्याच्या अल्याडपल्याड जाणारे राजे, राज्यकर्ते, गुलाम आणि बंडाळ?
सैनिकांनी गाजवलं ते शौर्य याबद्दल दुमत नाही, पण शौर्य म्हणजे काय?
सीमेपल्याड जायला शौर्य लागतं.
बंदुक हातात धरायला, चालवायला, लोकं मारायला आणि एवढं कशाला नुसती मारले जाण्याची शक्यता स्विकारायलाही शौर्य लागतंच!
मग अतिरेक्यांच्या शौर्याचं काय?
कि ते गनिमी कावा करतात म्हणुन ते शौर्य नाही?
सैनिक सैनिकांशी भांडतात आणि राजे/राज्यकर्ते जिंकतात.
च्यायला सगळंच गंडलंय.
सीमा नष्ट झाल्या म्हणजे हे सगळं थांबेल का?
सीमा सीमा म्हणजे काय?
फारसीमध्ये सीमा म्हणजे चेहरा!
सीमा म्हणजे जकात वसुल करण्याचा अधिकार का?
मणिपुर ची चित्रं पाह्यली.
पीसफुल वाटली.
दुसऱ्या महायुद्धातल्या फ्रान्स सारखी.
च्यायला युद्ध, गदारोळी, बंड आणि राज्य – याशिवाय लाईफ नाही का?
दु:खं नि जखमा बऱ्या कधीच होत नाहीत, फक्त त्यांची वेदना बदलते.
अनेक वेदनांनी माणुस निबर होत असावा.
व्हेन अ पर्सन लेट्स गो ऑफ हिज डिग्निटी – द पॉसिबिलिटीज आर एंडलेस....
डिग्निटी म्हणजे काय?
आपल्यापुरत्या सत्यासाठी उभं रहायची तयारी?
आपल्यापुरतं काय आणि सत्य तरी काय?
कशालाच (आपल्यापुरता) अर्थ नाही.
असण्याचीही गरज काय?
मणिपुर.
मणिपुर.
तिथले नाट्यप्रकार आणि तिथले बलात्कार.
तिथली सेना आणि त्यांचे विजय.
’हम मारते हे – गिनते नही’ वर इथले जयघोष.
रक्त रक्त रक्ताचे पाय....

पायलटने लाईट बंद केल्यावर लक्षात आलं कि विचार करायला उजेडाची गरज नसते.
कप्पाळ!
बाहेर लख्ख अंधार.
वरुन पडणारा चंद्रासारखा कागदावरचा लख्ख उजेड.
आणि कपाळाआडचा मी लख्ख आंधळा.
ए+आंधळा = यांधळा.

माझं लिहुन झालंय का?
उगीच आपला काही न लिहिता विचार करत बसलोय.
लिहिताना विचार करायचा नसतो.
तो आधी आणि नंतर.
आधीच.
नंतर फक्त शुद्धलेखनाच्या चुका.
जगण्याचंही तसंच असावं!
मागच्या आठवणी म्हणजे शुद्धलेखनाच्या चुका.
छावीचा ठाव घेऊन बराच काळ लोटला.
ही शुद्धलेखनाची चुक!
ही शुद्ध लेखनाची चुक!!
ही शुद्ध चुक!!!
चुक!!!!

डोळे चुरचुरताहेत, पण झोप येईना.
सिऍटलमध्ये पोचल्यावर कॅब.
मग घर.
मग झोप.
अंथरुण पाहुन पाय पसरावेत.
अंथरुण नसल्यास?
हल्ली लोक उद्गारवाचक चिन्हांपेक्षा एमोटिकॉन्स जास्त वापरायला लागलेत.
ते ही उद्गारवाचकच म्हणा!
उद्गार-वाचक.
मी लिहिलेलं वाचणारा खरोखरंच ’उद्गार’ वाचक!
इथे दात दाखवुन हसणे हा एमोटिकॉन योग्य ठरावा.
कुणास ठाऊक कुणी जमिनीवर लोळुनही हसायला लागेल!!
प्रत्येक देशाचे आपापले उद्गार आणि आपापले वाचक.
सिऍटलमध्ये मला सॉफ्टवेअर इंजिनियर समजतात.
पाम स्प्रिंग्जमध्ये ट्रक ड्रायव्हर!
उद्गार वेगळे.
वाचक वेगळे.
सगळेच चुक.

रिमोर्स नसेल तर गिल्ट नसावी.
रिमोर्स म्हणजे पश्चात्ताप.
गिल्ट ला काय म्हणावे?
गुन्हा?
मग पश्चात्ताप नसेल तर गुन्हेगाराला ’उगीच का जेल!’ असा वैताग येत असावा का?

तो आणि ती पुन्हा एकत्र आले असं माधुरी म्हणाली.
आनंदात दिसताहेत.
असं तडकाफडकी एकत्र येण्याआधी त्यांनी आपापल्या जागा ठरवुन घेतल्या पाहिजेत.
सगळ्यांच्याच लग्नाच्या कल्पना चुकीच्या असतात.

काही गोष्टी काही उंचीवरुनच दिसतात.
म्हणुन विचारांनी उंच लोकांना द्रष्टे म्हणत असावेत.
सध्याच्या जगातले द्रष्टे कोण?
कि सर्वसाधारणपणे कुणी कुणी कशाकशातला द्रष्टा असतो.
असं इकडुन तिकडुन दृष्टी उधार घ्यायची आणि आपलंच आपण बघत बसायचं?
यांधळ्या!

भारतात ब्राह्मण मराठा वाद पुन्हा पेटलाय.
वाळवंटातुन गेलेले कालवे.
एक नदी आली आली आणि गेली गेली.
हे कालवे बहुतेक कोलोरॅडो नदीतुन आणले असावेत.
शोधायला हवं.
च्यायला धरणं बांधायची किंवा (रेड) इंडियन्सना मारायचं तर असं पाहिजे.
एकदाच मारुन टाका.
कटकट नको.
मग जन्मानुजन्म शेती करत बसा मक्याची.
वरती धरण दिसलं.
खाली शेती.
तर ब्राह्मणांची आणि मराठ्यांची परत पेटलिए.
मला ब्राह्मण आवडत नाहीत. सनातनी चुत्ये.
मराठे तर अजिबात आवडत नाहीत. अगाध अज्ञानी चुत्ये.
टिळक आणि शाहु महाराजांना द्रष्टे बिष्टे समजतात.
मग हे भांडणारे लोक द्रष्टे असणार.
मग आता ब्राह्मणांतला कोणतरी उठुन स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्काची मागणी पुन्हा करणार.
झोपेतनं उठुन रोज रोज माणुन द्रष्टा होत असावा.

नारळाची झाडं कोकणात का आहेत?
ती उंच का असतात?
करणी व्यतिरिक्त नारळात पाण्याचं कारण काय असावं?
हे प्रश्न महत्वाचे नाहीत तर त्यांचा विचार का करावा?
नारळ्याच्या काथ्यापासुन वॉटर रिटेनिंग मॅट्स तयार करुन सॉईल कॉन्झर्व्हेशन करता येईल. जमिनीची धूप कमी करता येईल. ऑर्गॅनिक फिल्टर्स!
च्यायला हे आख्खंच्या आख्खं वाळवंट बनलंय या ऍल्युव्हियल फ्लोज नी! थोरले डोंगर असे वाळु बनुन का वहातात?
या डोंगरांवर एकही झाड का नाही?
इग्नोर करायला शिकणं हा यशस्वी लग्नाचा मंत्र असावा.
चिरकाळ टिकणारं हा यशस्वीचा अर्थ असावा.

चला आता अक्षरश: जमिनीवर उतरु.


(तुम इन सब को छोडके कैसे कल सुबह जाओगी?)