शुक्रवार, मार्च ३०, २००७

एक डाव भुताचा

शाळा कॉलेजात असताना परिक्षा आली कि वादळ, भूकंप, दंगल वगैरे काहीतरी होऊन परिक्षा पुढे ढकलली जावी असं वाटायचं. आता ही परिक्षा कधी एकदाची संपतिये असं झालं असताना 'वॉशिंगटन बोर्ड ऑफ प्रोफेशनल इंजीनियर्स' चं पत्र कि मी एक फॉर्म भरायला विसरल्याने एप्रिल मध्ये परिक्षा देऊ शकत नाही!
च्यायला पोपट!!
मी आऊच्या काऊला सांगुन ठेवलेलं माझ्या परिक्षेबद्दल.
आता परत अभ्यास, परत टेन्शन, आणि ऐन फुटबॉल सीझन च्या स्टार्टला परिक्षा!
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे 'रिव्ह्यू क्लास' आत्ता अटेंड करतोय तो पुन्हा करावा लागणार नाही. :)

त्या रिव्ह्यू क्लासवरुन आठवलं - आयटमचं भूत!
त्याचं झालं असं कि या क्लाससाठी मला युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटन मध्ये जावं लागतं. पार्किंगच्या आणि ट्राफिकच्या (जागतिक) प्रश्नाने बरीचशी जनता बसने येते. मला बसने वगैरे जायचं म्हणजे लई वैताग येतो. मग मी रेहमान ची गाणी वगैरे ऐकत १५ मिनिटांच्या रस्त्यावर तासभर काढुन युनिव्हर्सिटीत पोचतो.

पहिल्याच दिवशी वर्गात गेलो तर - आयटम पहिल्या बाकड्यावर बसलेली दिसली.
मी सवयीने शेवटच्या रांगेत गेलो.
आयटम म्हणजे - उंच, नाजुक, ब्राऊन ब्लॉन्ड केस, नाजुक चष्मा वगैरे.
क्लासमध्ये आणखी पोरी नाहियेत असं नाही, पण मास्तर शिकवत असताना ही हरणासारखी मान पुढे ओढुन पाण्याच्या बाटलीतुन पाणी (अर्थात नाजूकपणे) पिते आणि (मागच्या बाकावरुन) समोर बघणाऱ्या अनेक माना मग आपसुक उजवीकडे वळताना दिसतात.
आयटमचं पाणी पिणं, चष्मा नीट बसवणं, आसनं बदलणं - हे अडीच तास अखंडपणे चालू असतं.

तर पहिल्याच दिवशी पार्किंग लॉटकडे चालत जाताना कुणीतरी तिला विचारलं - तु कुठे रहातेस?
ती म्हणे - रेडमंड.
च्यायला मी पण रेडमंडलाच चाललेलो.
ती बस स्टॉपकडे जाताना मी विचार केला कि तिला विचारावं का कि मी सोडु का?
म्हणजे त्यामागचा (आणखी एक) उदात्त हेतू म्हणजे - दोघं असल्यावर एच.ओ.व्ही. (हाय ऑक्युपन्सी व्हेहीकल) लेन मध्ये गाडी चालवता येईल आणि ट्राफिक आपसुकच टळेल.
पण च्यायला (तेंडल्यासारखं) फुटवर्क आणि टायमिंग - दोन्ही गंडलं.
बॉल गेल्यावर बॅट फिरली.
ती बस स्टॉपकडे चालत गेली.
पण तिचं भूत गाडीत येऊन बसलं!

म्हणजे झालं असं कि पार्किंग लॉटमधुन गाडी काढुन कॅम्पस रोडवर संथपणे जायला लागलो.
म्युजिक सिस्टिम वर 'तु हि रे....' सुरू झालं.
तेव्हा वाटलं, आयटम गाडीत असती तर मी ते पटकन बंद करुन नॅशनल पब्लिक रेडिओ किंवा तत्सम काहीतरी लावलं असतं.
मग ती म्हणाली असती - असु दे ना! (या एका 'ना' ने पुरुषांच्या जगात किती उलथापालथ होते हे पोरीबाळींना काय कळणार....)
मग तिने मला गाण्याबद्दल विचारलं असतं.
मग मी तिला म्हणालो असतो - हा पिक्चर वेगळाच. याला लव्ह स्टोरी, अ व्हायलंट लव्ह स्टोरी, किंवा लव्ह ड्युरिंग रायट्स वगैरे कसलीच विशेषणं फिट्‍ होत नाहीत. आमच्याकडे ना, एकतर हिंदु मुसलमान वगैरे लग्न चालत नाहीत. खेडेगावामध्ये वगैरे तर नाहीच नाही. तर पिक्चरची स्टोरी अशी कि -
तो, ती, निळंशार पालम्पुर, समुद्र, किल्ला....
किल्ला - हां....तर तिथे हे गाणं घडतं.
म्हणजे हा पिक्चर आला तेव्हा याच्यासारखं काही आम्ही कधी पाहिलंच नव्हतं.
म्हणजे आमच्याकडे प्रेम वगैरे प्रकार असतो आणि तो आमच्या पिक्चरमध्ये रापचिक प्रकारे वगैरे दाखवतातही, पण हे म्हणजे अगदीच 'रॉ' होतं.
अगदी खरं वाटावं एवढं रॉ....
अजुन कशात काही नाही आणि व्याकुळ होऊन हीरो रडतोय.
अजुन कशात काही नाही आणि सगळं काही सोडुन हीरोईन जीव तोडुन पळत येतिए.
अजुन कशात काही नाही आणि जगातली शेवटचीच असल्याप्रमाणे प्रत्येक लाट किनाऱ्यावर आपटतेय....
अजुन कशात काही नाही आणि आम्ही चिंब भिजत पिक्चर बघतोय....

मला त्या काळात तो हीरोने घातलेला पट्ट्या-पट्ट्याचा टी-शर्ट घ्यायचा होता.
पुढे जाऊन त्याच्यासारखं 'जर्नालिजम' करावं का असा विचार केल्याचंही आठवतंय.
हीरोचं नाव? अरविंद स्वामी.
ते सोड.
हिरोईन होती मनीषा कोईराला!
तिचे वडिल कि आजोबा नेपाळचे पंतप्रधान वगैरे होते, पण ती ऍक्टिंग करायची.
का?
ते महत्वाचं नाहिये.
तर हिरोईन मनीषा होती.
असं म्हटल्यावर तुफान हळहळ आणि गुदगुल्या वगैरे वगैरे आम्हाला तेव्हाही व्हायच्या आणि आताही होतात!
कारण....
ते जाऊ दे.
पण या पिक्चरने तुफान कॉन्ट्रोव्हर्सी झालेली. म्हणजे जनतेच्या धार्मिक भावना वगैरे दुखावल्या.
नाही या गाण्याने नाही, पण दंगली, राजकारण, राममंदीर वगैरे....

संगीत?
रेहमान. सवालच नाय....
साधना मावशीच्या घरी कुठल्याशा पूजेला व्हि.डि.ओ. वर 'रोजा' नामक कुठलासा मद्रासी पिक्चर लागलेला. खतरनाक स्टार्ट वगैरे झाल्यावर 'दिल है छोटासा...' म्हणत धबधब्या खालच्या लोखंडी शिडीवर उभं राहुन आम्ही - बरसणारा रेहमान झेलायचा प्रयत्न तेव्हा जो सुरू केला तो आजतागायत चालू आहे....

हे पुढचं ऐक.
बोगद्यात जाता जाता हे गाणं सुरू होतं.
बोगद्यात अंधार.
आय नो - ते ऑबव्हिअस आहे, पण तरीही.
अंधार.
मागुन कुठुन आर्त - राजस्थानी वाटावेत असे 'जिनके सर हो इष्ककी छॉंव....' चे सूर येईतो बोगद्यातुन बाहेर पडता पडता जगण्याची टोटल उर्मी एकेक ठेक्यात तोलत शाहरुख जे....
आई शपत - तुला कसा माहित शाहरुख?
हा....तोच.
पण तो पिक्चर 'वीर जारा' कि झारा होता.
अशा चुका होतात लोकांकडुन अधे मधे.

मी गाडी फास्ट तर चालवत नाहिये ना?
पण मला सवयीचा आहे रस्ता.
शिवाय स्पीड लिमिटला गाडी चालवली कि मला मी आयुष्यातला वेळ वाया घालवतोय असं वाटतं.
म्हणजे तो वाचवुन मी काही फार तीर मारतो अशातला भाग नाही, पण वाटतं.

च्यामारी - 'जब पास है तो एहसास है तू' चा अर्थ....
एवढ्या डीटेल मध्ये नको जाऊस.
आमच्या सारखा गुलजार 'फील' करायला शीक.
म्हणजे त्याचं असं कि - गुलजार गुलजार म्हणजे काय चीज आहे, ते आम्हाला 'माया मेमसाब' पाह्यल्यावर कळलं. म्हणजे एकतर पिक्चर टॅक्स-फ्री, ते पण 'वेस्ट-एंड' ला, शिवाय त्यात दीपा साहीचा एक बोल्ड सीन आहे वगैरे आवश्यक माहिती काढून मी आणि योगेश तो पहायला गेलेलो.
१५ ऑगस्ट १९९३ ला!
आता काय करणार....रहातं असलं काही माझ्या लक्षात....
हो तर - बोल्ड सीन होताच, आणि तो कधी नव्हे ते पिक्चरच्या कथानकासाठी आवश्यकही होता, पण 'इस दिल मे बस कर देखो तो....यह शहर बडा पुराना है' ने एवढं झपाटलं कि त्या एका दिलापायी हजार शहरं बदलत आम्ही अजुन भटकतोय....

तर सांगायचा मुद्दा असा कि गुलजार असा फील करायचा असतो!
पण तो सगळ्यांनाच झेपत नाही.
खोटं कशाला बोला, कधी कधी मला पण झेपत नाही.
नाही ग्रेस वगैरे एवढा अवघड नाहिये, पण एकंदर अवघडच.
म्हणजे नाही कळला तरी अवघड आणि कळला तर आणखीनच अवघड....

या गाण्यात लडाखमधल्या कुठल्याशा तळ्याकाठी एका चादरीत शाहरुख आणि मनीषा जे काही करतात - नाही ते एवढं ऑबव्हिअस नाहिये, पण ते हिंदी पिक्चरमध्ये न भूतो न भविष्यति आहे. सतरंगी गात ते दोघे जे काही एक रूप, एक रंग होतात आणि त्यावर शाहरुख एका सूफी धुनीत जे पिसाळल्यासारखं नाचतो, ते लक्ष्मीनारायण मध्ये अपर-स्टॉल्स मध्ये बसुन जेव्हा पाह्यलं तेव्हा वाटलं कि आता या पिक्चरनंतर मणिरत्नम, रेहमान, गुलजार, मनीषा, शाहरुख या सगळ्यांनीच संन्यास घ्यावा....
कारण पर्फेक्शन कॅनॉट बी इम्प्रुव्हड्‍.....
बऱ्याच लोकांना हा पिक्चर पटला नाही आणि मला त्यांना तो ग्रेट का आहे ते कधीच समजावुन देता आलं नाही.

असो.
चार गाण्यात घरी - नॉट बॅड!

आठवड्यात दोन दिवस क्लास - आणि या दोन दिवसांत क्लासवरुन येताना मी आणि आयटमचं भूत.
आणि आमच्या गप्पा!

गम्मत आहे.
हे बरेच दिवस मनात घोळत होतं, पण लिहायला जमलं नव्हतं.
भूत पण शिस्तीने फक्त क्लासवरुन येतानाच गाडीत असायचं.
पण आज हे लिहायला घेतलं आणि क्लासवरुन येताना आयटमचं भूत हरवलं.
किंवा यायला विसरलं.
आज आयटमने स्वत:ची गाडी आणलेली.
कदाचित ते तिच्याबरोबरच गेलं असेल.

भुताबरोबर गप्पा मारताना कधी पडला नव्हता तो प्रश्न पोस्ट लिहायला घेतल्यावर पडला.
प्रश्न म्हणजे असा कि जणु काही अभ्या म्हणतोय कि मामा काय हे - आता लग्न बिग्न झालंय तुझं!
मग मी पण विचारात पडलो.
च्यायला हो की!
मग असं भूत गाडीत येऊन बसलंच कसं?
मी त्याला बसु दिलंही कसं?
पण का कुणास ठाऊक, मला याबद्दल फारसं गिल्टी वगैरे वाटत नाही.
भूत मी न विचारता आलं.
बसलं.
आणि आम्ही (खरं तर मी) रेहमानच्या गाण्यांवर आठवणींना उजाळा दिला - हे खरं.
आठवणींना उजाळा तो पण कसला?
१५ ऑगस्ट १९९३ च्या त्या रात्रीचा?
कि 'बॉम्बे' पाह्यल्यावर पहिल्यांदा प्रकर्षाने प्रेमात पडावंसं वाटलेलं - त्याचा?
काय माहित.
तसं आज मी भुताला मिस पण केलं नाही.
त्यात एक बबन रस्ता अडवुन स्पीड लिमिट मधे गाडी चालवत होता. त्याला ओव्हरटेक करेपर्यंत घर जवळ पण आलेलं.

तर मी या भुताला अभ्याच्या त्या 'टुटा सितारा तो...' च्या पोस्टमधल्या मित्राप्रमाणे मानतो.
कदाचित भुताला त्या तुटलेल्या सिताऱ्यात इंटरेस्ट नसेलही, पण मी त्याला माझा इंटरेस्ट न चुकता ऐकवतो.
या निमित्ताने मग ते भूत मला आवडणाऱ्या गोष्टी मला का आवडतात ते नव्याने आठवायला लावतं.
सवयीच्या आवडी मग फक्त सवय न रहाता फक्त आवडी म्हणुन रहातात.
त्यांची उगमस्थळं आठवली कि कात काढल्यासारखं 'नविन' वाटतं.

पुढे जाऊन जर्नालिजम कधी केलं नाही.
टी-शर्ट बद्दल तर सपशेल विसरुनच गेलो.
स्वत:च्याच शहरात अजुन भटकतोय आणि सापडत नाहिये.
पण त्या बुरुजावरच्या लाटांचा ध्रोंकार अजुन ऐकु येतोय.
तेव्हा लागलेली ओढ आणि ओल अजुन जाणवतेय.

आणि का कुणास ठाऊक -
बरं वाटतंय....

रविवार, फेब्रुवारी २५, २००७

एक बरबाद पंधरा ऑगस्ट

आज दुपारी टी.व्ही. वर 'हंट फॉर रेड ऑक्टोबर' लागलेला.
मग तो बघुन झाल्यावर कम्युनिज्म, रशियन एकॉनॉमी, अफघाणिस्तान यावर माधुरीशी सविस्तर गप्पा मारल्या.
हल्ली मला अभ्यास करायला लावण्यापासुन परावृत्त करण्यासाठी मी माधुरीशी कुठल्याही विषयावर गप्पा मारतो!
परवा तिची आई तिला कुठल्यातरी नातेवाईकाबद्दल सांगत होती. मुलगी नको म्हणुन त्या नातेवाईकाने बायकोस पाचव्या महिन्यात ऍबॉर्शन करायला भाग पाडलं.
माधुरीला तो सगळा प्रकार भयानक 'सिक' वाटला.
मी म्हटलं - खरंय, काही लोक करतात तसं. तसं करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण हॅलो - इट हॅपन्स! आज जेवायला काय आहे?
माधुरी म्हणे - तुला काहीच कसं वाटत नाही?
म्हटलं - बाई, आज तुम्ही सकाळपास्नं काय केलंत? आठव - उठुन कॉफी, मग माझ्यासाठी 'टर्की सॅन्डविच' (डोशाचं पीठ नीट भिजलं नव्हतं म्हणुन टर्की सॅन्डविच - आनंद आहे), मग मेल चेक, मग सिऍटल टाईम्स आणि मायक्रोसॉफ्ट वेबसाईट वर जाऊन काल मायक्रोसॉफ्टला जो 'बिलियन डॉलरचा' फटका बसला त्याची बातमी, गूगल, सिस्को वर नजर -
मग?
मग काय? टेक्नॉलॉजी पेज सोडुन कधी फ्रंट पेज वाचलंयस? मी मागचे वीस वर्ष वाचतोय. अशा प्रकारांवर राग येऊन येऊन रागच आता एवढा बोथट झालाय कि....
पण अशा गोष्टिंबद्दल काहीच नाही करायचं?
वेल, आपल्यापुढे दोन पर्याय आहेत - एकतर काहीच नाही करायचं, गप्प बसायचं किंवा निदान आपल्यापुरती न्याय्य वाटेल अशी कृती करायची. अशा माणसांशी संबंध तोडायचे, अशांचे अपराध चव्हाट्यावर आणायचे, अशा लोकांना निर्भीडपणे त्यांनी केलेल्या कृत्यांचा जाब विचारायचा. आहे हिंमत? असेल तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला असं कर किंवा तसं सांगणार नाही. तुला योग्य वाटेल ते कर - आय ऍम शुअर तू करशील ते योग्यच करशील.

आता त्या नातेवाईकाची शामत नाही.
बऱ्याच लोकांना माझं व्यक्तिमत्व आक्रमक वाटतं.
याचं कारण त्यांनी माझ्या बायकोला (अजुन) पाहिलेलं नाहिये.
'इजाझत' मधली 'सुधा' आठवतिये?
माधुरी बऱ्याचदा मला सुधा सारखी वाटते - सच और सही!
ती ज्या एकाग्रतेने (आणि आक्रमकपणे) कुठलाही प्रॉब्लेम सोडवते ते पाहिलं कि मला मी तिचा प्रतिस्पर्धी नसल्याबद्दल 'बरंच बरं' वाटतं!
यावेळचे दोन पर्याय मी सुचवले पण युजुअली तिचे फंडे वाईट क्लिअर असतात.
तिला भेटायच्या आधी मी बऱ्याच गोष्टिंबाबत सतत वैतागलेला असायचो - मराठी साहित्य/चित्रपट यांची परिस्थिती ते रस्त्यावरचं ट्राफिक. पण ती 'शॉशॅन्क' मधल्या रेडच्या थंडपणे 'गेट बिझी लिव्हिंग ऑर गेट बिझी डाइंग' म्हणते आणि मुख्य म्हणजे ते आचरणात आणते.
जाऊदे माझं 'बायको पुराण' खूप झालं नाहीतर 'कसं काय' वरुन संगिताचं टिकास्त्र यायचं - मराठी ब्लॉग्ज बायकोत फार गुरफटलेत म्हणुन! :)

हल्ली कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं.
एकेकाळी 'एक बरबाद पंधरा ऑगस्ट' वाचुनही पेटणारा मी हल्ली कुठल्याही सामाजिक प्रश्नांबाबत थंड का झालोय? रादर थंड झालोय का?
तर उत्तर - हो आणि नाही.
हो - कारण त्याने नुसतीच चिडचिड होते, कृती शून्य. मग आणखी चिडचिड आणि त्याचा हातातल्या कामांवर होणारा परिणाम.
नाही - कारण प्रचंड विचार करुन आणि देशाचं भलं करण्याचे प्लॅन्स आखुन आपण शेवटी वेळ येते तेव्हा बदल करु शकतो का? मग ते महत्वाचं नाही का - असा प्रश्न पडतो.
मग आजुबाजुला कुणी गरज नसताना राखीव जागा अडवायला लागला, हुंडा घ्यायला लागला, मुलगी नको म्हणुन भ्रुणहत्या करायला लागला, भ्रष्टाचार करु लागला कि मी त्या व्यक्तीला त्या कृत्याचा जाब विचारणे ही माझी नैतिक जबाबदारी मानतो. ती जर सगळ्यांनीच पाळली तर या गुन्ह्यांना मिळणारं 'सामाजिक संरक्षण' कमी होईल असं माझं (अर्थात वैयक्तिक) मत.
ए.पी.जे. अब्दुल कलामांना एकाने एकदा विचारलं - भ्रष्टाचार दूर कसा होऊ शकेल?
त्यांचं उत्तर असं होतं कि भ्रष्टाचार तीनच लोक दूर करु शकतात - तुमचे पालक आणि तुमचे प्राथमिक शिक्षक.
हे नैतिकतेचे धडे तुम्हाला तुमच्या पालकांकडुन अथवा शिक्षकांकडुन मिळाले नसतील तर तुमचं दुर्दैव!
मिळाले असतील आणि तरीही तुम्ही षंढत्वाचा पर्याय स्विकारला असाल - तर तुमच्या पोरांचं दुर्दैव!!
वर उद्या तो नातेवाईक प्राणी त्याला जाब विचारल्याबद्दल आमच्यावरच डाफरला कि भाऊ - अमेरिकेत बसुन असे फंडे पाडणं सोपंय, इथे हुंड्यावाचुन पोरींची लग्न अडतात - तर काय करायचं?
तर जमेल तेवढं करायचं.
शेवटी त्याला मला नाहीतर कुणालातरी कधी ना कधी जाब द्यावाच लागणार आहे.....

आज खरं तर लिहायला काही 'सलग' विषय नाहिये.
दरम्यान फोरसिथचं 'आयकॉन' पूर्ण केलं (ते सध्या माधुरी वाचतेय), स्टीफन किंगचं 'डिफरंट सीझन्स' वाचलं. (बहुतेक ह्याचा उल्लेख आधीच्या कुठल्यातरी पोस्टमध्ये 'थ्री सीझन्स' म्हणुन केलेला). गंमत म्हणजे किंग भयकथांसाठी प्रसिद्ध आहे - आणि मी त्याचं एकही 'भयानक' पुस्तक वाचलं नाहिये!
उपमन्यु चॅटर्जीचं 'इंग्लिश ऑगस्ट' मिळवायचा प्रयत्न चालू आहे. (यावर याच नावाचा एक पिक्चर निघालेला १०-१५ वर्षांपुर्वी. त्यातला शिवाजी साटमचा रोल चांगलाच लक्षात राह्यलाय.) 'हू किल्ड डॅनियल पर्ल?' हे ही मिळवायचा प्रयत्न करतोय.
पुस्तकांचा विषय फक्त 'अपडेट' देण्यासाठी.
खरंतर आज योगेशच्या अवचटांवरच्या लेखाने बऱ्याच आठवणींत नेलं.
मग माधुरीला अवचट, अन्वर काका, अरुणा काकू आणि 'जुई अन्वर अरुणा', त्यावरुन विनय सर, मुक्तांगण, पु.ल., याबद्दल भरपुर सांगितलं.
ही सगळी डिस्कशन्स 'हंट फॉर रेड ऑक्टोबर', 'कॉन्टॅक्ट' आणि 'थेल्मा ऍन्ड लुई' च्या अवतीभवती बागडत राहिली.

अभ्यास टाळण्यासाठी काहीही....

शनिवार, फेब्रुवारी १७, २००७

पचपन खंबे लाल दीवार

चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी
मी कोण आणि कसा होतो
हे मला आठवणारच नाही.

चक्रव्यूहात शिरल्यानंतर
मी आणि चक्रव्यूह यात
फक्त होती जीवघेणी जवळीक

हे मला कळणारच नाही.
चक्रव्यूहाबाहेर पडल्यावर
मी मोकळा झालो तरी
चक्रव्यूहाच्या रचनेत फरक पडणारच नाही.
मरावं कि मारावं
मारलं जावं की जीव घ्यावा
याचा कधीच निकाल लागणार नाही.
झोपेतला माणूस
झोपेतून उठून जेव्हा चालायला लागतो
तेव्हा स्वप्नातलं जग
त्याला पुन्हा दिसणारच नाही.

निर्णायक प्रकाशात
सगळं सारखंच असेल का?
एका पारड्यात षंढत्व
दुसऱ्या पारड्यात पौरुष
आणि तराजूच्या काट्यावर
नेमकं अर्धसत्य?

- दिलीप पुरुषोत्तम चित्रे (एकुण कविता - २)

भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात?
कुठलंही नातं चक्रव्यूहासारखं का भासावं?
कि प्रत्येक नातं भयानक मोहक असतं - ज्याचे धडे गर्भातच मिळतात - आणि बाहेर आल्यावर नुस्ती एका नात्यातुन दुसरीकडे ओढाताण, फरफट?
अर्धसत्यापासुन स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सत्य-असत्याच्या भेदाने एवढं कन्फ्युजन का व्हावं?
जगातल्या - आणि स्वत:तल्याही - पीटर कीटिंग्जचा कुठल्याही हॉवर्ड रॉर्कवर एवढा खार का असावा?
मन मनास उमगत नाही - आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा - हातास कसा लागावा?

गर्भाशयात असह्य झालो
की बाहेर
तिथं असह्य नकोसे झालो
की अजुन पुढे
तिथे तिथूनही सर्वत्र
बोचू नाही म्हणून
अजून अजून
पुढे पुढे पुढे
लांब लांब लांब दूर होत
गर्भाशयापासून अगोदरच्या प्रत्येक

सहन करुन शकत नाही
हे सगळं स्वत:सकट
आवडीनिवडीच्या हवाल्यावर
नेहमीच आपलं अस्ताव्यस्त गबाळ
आखडुन घ्यायला बघतो
वेळ आल्यावर म्हणून
होऊ शकत नाही
आपलं समूळ स्थलांतर
दुसरीकडे

एकदम एखाद्या परग्रहावर जाईन
मी त्यापेक्षा फट्कन
सगळं नवं अपरिचित कोरं
वस्तु व्यक्ती त्यांचे प्रकार वेगळे
लैंगिकतेच्या प्रजननाच्या पद्धतीही
विनिमय चलनवलन चालीरिती व्याख्या वेगळ्या
नवी नाती मूल्यं धेयं जातीपाती नीतिरचना
यशापयश सुखं दु:खाच्या कल्पनाही वेगळ्याच
वेगळ्या संवेदना, अनुभव तो घ्यायच्या पद्धतीही
ज्ञान-अज्ञान वेगळं
संवेदनांच्या फल:श्रुतीच वेगळ्या
विश्वाच्या श्रेयाच्या ज्ञानाच्या न्यायाच्या
सौंदर्याच्या करुणेच्या कल्पनाच
वेगळ्या त्यांच्या जागाही

तिथं थियरींच्या थापा कशा मारतील
तिथं शोध कसे लागतील
तिथं कविता कशा करतील
वाङ्‍मय कसं असेल
विषय काय असतील
मृद्‍गंध कसा असेल तिथं पाऊस
पाणी एच२ओ च असेल असं नाही
पदार्थ रेणूसूत्रं अणुभार अणुक्रमांकही कसे?
हायब्रिडायझेशनच्या बॉडिंगच्या
एनर्जीस्टोरेज-डिस्ट्रीब्यूशन-कक्षा
सुद्धा कशा इथल्यापेक्षा
चवी रंग पोत पैस कसे कसे

तिथं मी सजीवांना-नीर्जीवांना
जे कोणी जे कसे
असतील त्यांना नव्या भाषेनी
हाक मारीन नातलग करीन
माझ्याळवीन लिपिन

ते माझ्या विश्वजाणीवेचा
अतूट अंश असतील
आम्ही पूर्ण क्षमतेनी
पणाला लागलेले असू
मी त्यांना माझ्याळवीन
मी मला त्यांच्याळवीन

- सलील वाघ

-----------------------------------------

बहुतेक रद्द केलेला पिक्चर, आणि जागुन काढलेल्या रात्रीचं सार म्हणजे -

सगळा जमाखर्च बघण्यासाठी
जुनी कॅलेंडरं घेउन बसल्यावर
समजतं आपण किती निरर्थक भर्कटतो
निष्पर्ण झाडांतून सरकत जाणारा चंद्र
नदीत तरंगणारी इमारतींची प्रतिबिंब
समुद्र आकाश टेकड्या विजा सूर्य तारे
भावल्यांसारखी माणसे अन पावसाळे
हे सगळेच असतात पुन्हा पुन्हा येणारे
तरी क्षणांच्या चिमटीत पकडता आलं नाही
यातलं सगळंच आपल्याला
त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्यांचाच
आपण अभ्यास केला इमान्दारीत
उगीच जबडे दुखावले प्रश्नांच्या बडबडीनी
अन पळ काढला खरी उत्तरं आली
तेव्हा भीतीनी बसून राह्यलो
कवितेच्या टिकाऊ वळचणीला
बेमालूमपणे

- सलील वाघ


व्हईल ते जाईल.....

शनिवार, जानेवारी १३, २००७

हजाम

आज 'एन.पी.आर.' वर एका पोलीश माणसाचे 'केस कापून घेण्याचे' अनुभव ऐकले आणि धमाल आली. म्हटलं हा एक चांगला विषय आहे लिहायला! - माझ्या आयुष्यातले न्हावी!!

भोरला यायच्या आधीच्या न्हाव्यांबद्दल फारसं आठवत नाही.
नाही म्हणायला तोपर्यंत - 'चम्मन गोटा लाल बटाटा, उद्या सकाळी पेढे वाटा' म्हणायला शिकलो होतो. आणखी एक आठवण म्हणजे - कुणी मला तसं म्हटलं तर - 'माझ्या डोक्यात छोटे छोटे चाऊ झालेले, म्हणुन बाबांनी माझे केस कापले' असं (बहुतेक) आईने म्हणायला शिकवलं होतं.

भोरची आठवण म्हणजे - आमराई आळीच्या कोपऱ्यावर एक (निळा रंग दिलेलं) न्हाव्याचं दुकान होतं. त्याच्या काचेवर मस्तपैकी 'कोंबडा' पाडलेला अमिताभ कुणीतरी रंगवलेला. तो काळ म्हणजे आम्ही लोक अमिताभचे 'मर्द', 'आखरी रास्ता', 'गिरफ्तार' वगैरे पाहुन येडे झालेले! मग तो 'कोंबडा' पाडायचे कोण प्रयत्न!! आमच्या वाड्यामागे वाळी शेजारच्या चिंचेच्या झाडाखाली क्रिकेट खेळुन झाल्यावर जनतेची 'सभा' भरायची. (त्याच वाड्यामागे वडील लोकांनी नेट वगैरे लावून 'आऊटडोर' बॅडमिंटन कोर्ट केलेलं - त्याबद्दल नंतर) तर त्या सभेत 'मोठ्या' (म्हणजे वय वर्ष १०-१२) लोकांचे दंडात बेटकुळी काढणे, हाताने केलेल्या बिड्या ओढणे, हाताने विटा फोडणे वगैरे प्रकार चालायचे. ही मोठी पोरं 'डेंजर' होती. त्यांनी फाटक वाड्यामागे बेडकाला दोरा बांधुन आणि त्याचं आमिष दाखवुन साप बिळातुन बाहेर काढुन मारलेला व्यवस्थित आठवतोय.
बर तर सांगायचा मुद्दा म्हणजे ते लोक केस वळवायचे आणखीनच डेंजर उपाय सांगायचे - म्हणजे फुंकणी तापवुन ती केसातुन फिरवायची वगैरे. असले प्रयोग तर रमेश आणि बंटी पण करायचे नाहीत - तिथे आपली काय....
केस वळवायला २५ रुपये लागतात ही माहिती काढण्या एवढं 'डेरिंग' मात्र माझ्यात आलेलं तोपर्यंत.
पण पप्पा तिथे काय कुठल्याच न्हाव्याकडे जाऊ द्यायचे नाहीत. दर महिन्याला एखाद्या रविवारी सकाळी एक न्हावी आमच्या घरी यायचा आणि घरासमोरच्या बागेत (पोत्यावर) बसुन रंजूचे आणि माझे केस (नको इतके) बारीक कापायचा.

पुण्याला आल्यावर भारतज्योतीचं 'श्रीनिवास' रेग्युलर झालं. का कुणास ठाऊक पण त्या न्हाव्याचं नाव पण श्रीनिवास होतं असा माझा दाट संशय आहे! पण तोपर्यंत (कोण्या एका) शाहरुखची 'फौजी' बघुन केस वळवायची आस जाऊन 'सोल्जर कट' ची सवय लागलेली. (नाही म्हणायला 'गंगा जमुना सरस्वती', 'अजुबा' वगैरे आल्यावर अमिताभ स्टाईल केस ठेवणं म्हणजे जरा धाडसाचंच झालेलं) 'श्रीनिवास' केस कापायचा पण मस्त - म्हणजे केस ओढले वगैरे जायचे नाहीत. नाहितर लहानपणी न्हावी म्हणजे लही सासुरवास असायचा. ते त्यांचं साग्रसंगीत गळ्यात 'बेडशीट' बांधणं (च्यायला गळफास लावल्यासारखं वाटायचं), (माझी) मान पर्फेक्ट अवघडलेल्या ऍंगलमध्ये ठेवणं, कात्रीची लई किरकिर करुन शेवटी कानाला लागेल असा कंगवा फिरवणं, मानेवरचे केस वस्तऱ्याने परफेक्ट दुखेल असं कापणं वगैरे वगैरे.....इन्फॅक्ट न्हाव्याने न सांगता त्याच्या पोजीशनप्रमाणे मान कलवायला मला जेव्हा जमलं तेव्हा मला 'आपण मोठे झालोयत' हे पुरेपुर पटलं!
पण श्रीनिवास चांगला होता. प्रॉब्लेम एवढाच होता कि रविवारी सकाळी त्याच्याकडे 'य' गर्दी असायची आणि तो नेहमी माझ्या नंतर आलेल्या लोकांची कटींग माझ्याआधी करायचा. माझ्या भिडस्तपणाने मी काही म्हणायचो नाही पण य वैताग यायचा. च्यायला घरी परत जाऊन (बळजबरी आंघोळ करुन) खेळायला जाईपर्यंत मित्रांच्या आया त्यांना हाकापण मारायला लागलेल्या असायच्या!

न्हाव्याच्या दुकानातलं (फिल्मी) साहित्य हा एका नविन लेखाचा विषय होईल, पण जे न पाहे रवी ते पाहे न्हावी असं म्हणण्याएवढी पुस्तकं न्हाव्याच्या दुकानात सापडायची. इंटरनेटपुर्वीच्या बॉलीवुड गॉसीप साठी न्हाव्याच्या दुकानाला पर्याय नसायचा.

आमच्या गावच्या एका नाव्ह्याने जवळच त्याचं दुकान टाकलेलं. पप्पा पुण्यात असायचे तेव्हा त्याच्याकडे जायचे आणि आम्हाला आग्रह करायचे कि त्याच्याकडे जा म्हणुन. मला त्याच्याकडे जायला फारसं आवडायचं नाही - कारण त्याला गावच्या चांभारचौकशांमध्ये (!) फार रस असायचा.
(यावरुन आठवलं - न्हाव्याच्या दुकानात रेग्युलर सापडणारी 'रोमियो गॅंग' पाहिलिये कुणी? हे शुक्रजंतू रोजच्या रोज चकचकित दाढी करून आणि मायक्रोस्कोपिक कटींग करून आख्खा दिवस संध्याकाळच्या 'कट्ट्या'साठी जगतात - असो.)

एनी वे - कॉलेज मध्ये होस्टेल मध्ये असताना पहिल्यांदा दाढी केली - तेव्हा त्या न्हाव्याने माझी 'कात काढलिए' असं वाटण्याएवढं फ्रेश वाटलेलं! तो एक न्हावी चांगला होता. त्याची (लेडीज होस्टेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर) टपरी होती. मला दाढी करायला आवडायचं नाही. लहानपणा पासून पप्पांची (प्रणय रॉय सारखी) दाढी बघुन मी पण दाढी (यायची) वाट पाहिलेली. मग महिन्या दोन महिन्याने जेव्हा कटिंगकरता जायचो तेव्हा दाढी करायचो. अर्थात तेव्हा दाढी फार यायचीही नाही....
यायला लागल्यावर कॉलेज मध्ये दाढी, शबनम साठी प्रसिद्ध झालो होतो (असं नंतर पॅऱ्या म्हणाला - त्याच्या मते मी नेहमी काहीतरी वेगळं करायचो आणि जे करायचो त्याची फॅशन व्हायची - हे ऐकुन मला एवढं 'भरुन' आलेलं कि सांगता सोय नाही. आता कळतंय पॅऱ्या फक्त 'चुना' लावत होता.....)
तो प्राणी नुसता कटिंगच नाही तर फुल टु तेल मालीश पण करायचा. ते एवढं भारी वाटायचं कि मी दर महिन्याला कटिंग करायला लागलेलो. शिवाय जेव्हा पुण्यात कटिंग दर रु.२५/- व्हायला लागलेले, तेव्हाही हा रु. १०/- आकारायचा.
पुढे त्याने त्याच्या दुकानात एक पोऱ्या ठेवला आणि मी जुनं गिऱ्हाईक म्हणुन त्याचा 'गिनी पिग' बनायला लागलो. पण तोपर्यंत ईंजीनियरींग संपायला आलेलं - शिवाय विविध वैताग चालू होतेच - मग सरसकट केस आणि दाढी वाढवली.

अरे हो - हे सांगायलाच विसरलो - 'फाऊंटनहेड' वाचल्यापासुन 'केस कसे कापायचेत?' हे न्हाव्याला सांगणं बंद केलं. बंद केलं म्हणजे - त्याच्या या प्रश्नावर 'हे बघ बाबा - मी माझे केस बघू शकत नाही. इतरांना ते कसे वाटतात याबद्दल मला पर्वा नाही. तू 'प्रोफेशनल'. मी तुला केसांबद्दल काही सांगणं म्हणजे तुझ्या स्किल बद्दल अविश्वास दाखवण्यासारखं आहे. मी 'तुझ्या'कडे आलोय याचा अर्थ माझा तुझ्या स्किलवर विश्वास आहे - बाकी माझ्या 'डोक्याचं' काय करायचं हा तुझा प्रश्न!' असं उत्तर द्यायला लागलो.
यात ऍन रँडचं लॉजिक प्रॅक्टिकली किती पॉसीबल आहे हे पडताळायचा हेतू होताच, तसाच - बघू तरी काय होतंय, केस काय महिन्यात परत येतील असा विश्वासही होता.
माझा अनुभव असा कि - कुठल्याही न्हाव्याला असली काही 'फिलॉसॉफी' ऐकवली कि त्याला मी 'ठार येडा' आहे असं वाटतं, पण मी काहीच सजेशन देत नाही म्हटल्यावर ती कटिंग त्याच्यासाठी 'प्रतिष्ठेची' बनते. तो त्यावर एवढी मेहनत घेतो कि वाटतं - बरं झालं याला काही सांगितलं नाही - असे काप आणि तसे काप म्हणुन!

पुण्याला परत आलो तेव्हा गाववाल्याकडे जायला लागलो - तो मन लावुन केस कापायचा.
आणि मुख्य म्हणजे भरपुर वेळ कापायचा.
तो काळ असा होता कि केसांशी खेळायला न्हाव्याशिवाय काही पर्याय नव्हता!

त्याच्या ड्रॉप ईयर मध्ये गिऱ्या त्याच्या मामाच्या दुकानात जाऊन 'हजामगिरीचं' ट्रेनिंग घ्यायला लागल्याचं कळलं तेव्हा गिऱ्यावर भयंकर भडकलो.
केवळ वडिलांशी वाद म्हणुन मेरिट मध्ये आलेल्या मुलाने त्यांना राग आणण्यासाठी इंजीनियरींग मध्ये 'ड्रॉप' घेणं मी समजू शकतो. (ऍटलीस्ट तेव्हा समजू शकत होतो) पण डायरेक्ट 'हजामगिरी' सुरू करायची म्हणजे अतीच. मला 'जरासी जिंदगी' मधला डॉ. लागु आणि कमल हसनचा सीन आठवला.
पण गिऱ्या भलताच 'कूल' निघाला. म्हणे - अभ्या, उद्या नोकरी नाही मिळाली किंवा इकॉनॉमी डुबली तरी माझ्या हातचं हे स्किल कुणी कधी घेऊ शकणार नाही....

खरंय गिऱ्या -
हे आणि या सारख्या कुठल्याही 'स्किल' बद्दल आदर बाळगायला अमेरिकेत आल्यावर शिकलो.
म्हणजे - अमेरिका काही मला (आदराने) चावली वगैरे नाही, पण तिने (खिशाला) चटका मात्र दिला.
पहिल्यांदा १५ डॉलर मोजून झिंज्या (असम) कापुन घरी परतताना जे डिप्रेशन आलेलं, ते फॉल च्या जादूनेच जाऊ शकलं होतं....
२-३ वेळा त्या केस उपटणाऱ्या (कापणाऱ्या नव्हे) बाईकडे जाऊन आल्यावर शेवटी शिस्तीत अथेन्स मध्ये एक 'बलुतेदार' न्हावी शोधला. (त्याच्या आधी एवढी वाईट परिस्थिती आलेली कि टब मध्ये (मी) बसुन अतनुने माझे केस कापले होते). हा (खरं तर हे - तिघं जण होते ते) शिस्तीत केस कापायचा. अगदी भारतातल्या न्हाव्यासारखे. फक्त त्याची टायमिंग्ज विचित्र होती. म्हणजे - तो फक्त स. १० ते दु. ४ - या वेळेतच काम करायचा. त्यामुळे त्याच्याकडे जायचं म्हणजे पैशाबरोबरच क्लासेस, जॉब, रिसर्च, सगळं 'मॅनेज' करायला लागायचं. (त्याची टायमिंग बघुन वाटायचं - ही बहुतेक त्याची दुसरीच 'शाखा' असणार - पहिली सदाशिवात नाही तर गेला बाजार आप्पा बळवंत च्या जवळपास)
एकाच बाबतीत त्याची भारतातल्या न्हाव्यांवर मात म्हणजे - त्याच्या दुकानातली मासिकं!
त्याच्या कडे वर्षभरातले झाडुन सगळे - प्लेबॉय, हस्लर वगैरे चे 'खंड' असायचे.
माझ्या वेळेअभावी त्याच्याकडे अशाच वेळी जायला जमायचं जेव्हा त्याच्याकडे रांग नसायची. आणि मला कधी नव्हे ते कटिंगसाठी वाट न पहाण्याचा खेद व्हायचा.

(वाईट) अनुभवातुन शिकुन बाल्टिमोरलाही असाच 'बलुतेदार' शोधुन ईमानदारीत दोन वर्ष त्याच्याकडे काढली.
सिऍटलला आलो तेव्हा - आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांबरोबरच - न्हाव्याचा प्रश्न सोडवणंही क्रमप्राप्त होतं. 'ग्रेट क्लिप्स' मध्ये केस कापल्यावर सलग महिनाभर कंपल्सरी टोपी वापरली.
मागच्या तीन महिन्यात केस एवढे वाढले कि रोजच्या रोज माधुरीची भुणभुण - केस काप म्हणुन!
भायलोग - 'अरे संसार संसार' म्हणताना हजार शक्याशक्यतांचा हजारो वर्ष विचार करुन झालेला. एवढ्या मंथनातुन 'बायकोची केस कापण्याबद्दल भुणभुण' ही शक्यता कशी सुटली कळत नाही. क्रायसिस मॅनेजमेंट मध्ये मी बाप असुनही (कारण बरेचसे क्रायसिस माझीच पिल्लं असतात) ह्या क्रायसिस वर - चांगला न्हावी नाही - याशिवाय माझ्याकडे उत्तरच नव्हतं....
घर सोडल्यापासुन लग्न करेपर्यंत - मधली जवळपास (आई ते बायको मधली - आणि शांततेची) १२ वर्ष - संपल्याची (क्रूर) जाणीव मला व्हायला लागली.
शेवटी ३-४ दुकानांची टेहाळणी केल्यावर (हे करायला फार विशेष स्किल लागत नाही - बाहेर पडणाऱ्यांचे चेहरे पाह्यचे. लोक स्वत:च ते लपवत असतील तर पुढे जायचं) मी एका दुकानात घुसलो.
इथे मला जो अनुभव आला तो वर्णनातीत आहे!
ती बाई एका पोरीचे 'आयब्रोज' करत होती. (याला 'करत होती' म्हणतात कि आणखी काही माहित नाही).
तिने बसायला सांगितलं.
चहा आणि कुकीज आणुन दिल्या!
यावर माझे सगळे ऍन्टिने (बूस्टर्स सकट) बाहेर आले.
च्यायला केस कापायच्या आधी एवढं आगत-स्वागत.....'बाई - रेट काय?' हे तरी कसं विचारणार?
तेवढ्यात तिला कुणाचा तरी फोन आला - अपॉइन्टमेन्ट साठी.
त्या प्राण्याने बहुतेक तिला 'किती होतील?' विचारलं.
तिने 'अठरा' म्हटल्यावर माझा जीव (हातातल्या चहाच्या) भांड्यात पडला!
तिने 'स्पेशल कटिंग - ३ डॉलर एक्स्ट्रा' म्हटल्यावर मी म्हटलं - नको नॉर्मलच कर. पण मला नक्की फरक कळला नाही. एकतर (जिवापाड जपुन - प्रसंगी जिवावर उदार होऊन - वाढवलेले) केस माझे जाणार. मग ते कसे जाणार याने काय फरक पडतो?
पण बहुतेक - फक्त कात्रीने कापायला ३ डॉलर एक्स्ट्रा असं गणित होतं.
तिनं केस मन (आणि वेळ) लावुन कापले.
तिचं नाव फाजी.
वय ५० एक असेल.
(लग्नानंतर बायकोसमोर कुठल्याही पोरीचं नाव घेतलं कि मीच पटकन 'लग्न झालंय किंवा ठरलंय किंवा वय वर्ष ५० च्या आसपास' हे सांगुन टाकतो. माधुरीला काही प्रॉब्लेम नसतो - पण मलाच 'हायसं' वाटतं!)
फाजी ईराणची आहे.
वडिल पारशी होते - मुंबईत वाढले.
तिने आणखी कोण नातेवाईक कुठे असतात हे न विचारता सांगुनही टाकलं.
आणि मला - लग्न झालंय का? (बायकोलापण इकडेच यायला सांग केस कापायला) - मुलं किती? (ती होतील तेव्हा त्यांनाही इकडे आण - आम्ही स्पेशल 'विमानावर' बसुन त्यांची कटिंग करतो वगैरे सांगितलं) आणखीही कायकाय विचारत बसली.
एकुण काय - न्हाव्यांच्या चांभारचौकशा संपत नाही. (बाय द वे, विशेष नोंद - मला थोड्याही चौकशा करणारा चांभार कधीच भेटलेला नाही)

तुम्हा लोकांना असं फीलिंग कधी आलंय कि नाही माहित नाही - कदाचित वारंवार घर बदलल्याने अभ्याला आलं असेल - पण फाजी च्या दुकानातुन बाहेर पडल्यावर 'चांगला न्हावी (कि न्हावीण) मिळाल्याचं' गार-गार फीलिंग आलं....

चला - एक प्रश्न तर सुटला.

नेक्स्ट.....?

रविवार, जानेवारी ०७, २००७

चर्च के पीछे

चांद चुराके लाया हु
चल बैठे चर्चके पीछॆ....

गुलजारचं हे कुठल्यातरी पिक्चरमधलं गाणं आज सकाळपास्नं तोंडात बसलंय आणि क्रिकेट बघण्यासाठी जागून काढलेल्या सतरा (अनाकलनीय आणि वर्णनातीत) रात्री विसरायला मदत करतंय....

ह्या नविन लॅपटॉपवर 'की-पॅड' शी मी अजुन 'जुस्तजू' चालू आहे - त्यामुळे 'नवसाक्षरा'च्या चुका होतायेत....

मीनव्हाईल - 'पुलित्झर' घेतलेल्या स्टीव्ह कोल चं 'घोस्ट वॉर' पूर्ण केलं. माधुरीला वाचनाची आवड लागावी म्हणून वेळ मिळेल तेव्हा 'बॉर्डर्स' मध्ये जाऊन कॉफी आणि वाचन - हा उपक्रम सुरू करून बरेच दिवस झाले. सुरुवातीच्या दिवसांतच 'घोस्ट वॉर्स' हातात पडलं आणि वेडा झालो.
पुस्तकाचं 'कॅप्शन' 'कोट' करायचं म्हटलं तर - 'घोस्ट वॉर्स - दि सिक्रेट हिस्टरी ऑफ़ सी.आय.ए., अफगाणिस्तान, ऍन्ड बिन लादेन, फ़्रॉम सोव्हिएत इनव्हेजन टु सप्टेंबर १०, २००१' असं करावं लागेल.

आय.ए.एस. चा विचार - अविदाच्या राजीनाम्याच्या दिवशीच सोडून दिला.
शाळेतली शेवटची एक-दोन वर्षं ते इंजीनीयरींगची सुरुवात - या दरम्यान लही टिंब टिंब बनुन अविदा ला देव वगैरे मानलेला. मिन्ना त्याच्या एम-८० वर अविदाच्या राजीनाम्याची खबर घेऊन आलेला तो दिवस अजुन आठवतोय. फॉल्स आयडॉल्स पेक्षा - आता 'आपण' काय करायचं - हा विचार मोठा होता....
इंजीनियरींग सोडून प्रबोधिनीचा 'पूर्णवेळ कार्यकर्ता' होणे वगैरे ऑप्शन्स होते, पण - दुपार ते संध्याकाळ या दरम्यान - उत्साह ओसरला आणि 'गैय्या' बरोबर सूर्यास्त पहाताना 'हजाम बनलो' ही भावना प्रबळ झाली....

'प्रशासकीय सेवे'तला जोष गेला, पण त्या दरम्यान ओळख झालेल्या 'इंडियन फॉरेन सर्व्हिस' मधला इंटरेस्ट वाढला. पण या वेळेस हा इंटरेस्ट फक्त इंटरेस्टच ठेवायचा असं ठरवलं.
टु कट द लॉंग स्टोरी शॉर्ट - जेव्हापासून पेपर वाचायला सुरुवात केली तेव्हापासुन - व्ही.पी., मंडल, बोफोर्स पासुन, 'सेने'चा उदयास्त, आणि 'राष्ट्रवादी'च्या निर्मितीपर्यंत 'सकाळ' आणि 'इंडियन एक्सप्रेस' च्या पाचव्या कि सातव्या पानावर - बर्लिन वॉल, कम्युनिस्ट रशियाचा अस्त, बोस्निया वगैरे जोरात असायचं. लोकल राजकारणाएवढंच ते ही इंटरेस्टिंग वाटायचं, पण ते फार फॉलो करणं अवघड व्हायचं. ( नाही म्हणायला ८७ मध्ये आम्हाला संगणक शिकवणारे रानडे मास्तर 'आय.एफ.एस.' झाले तेव्हा ते प्रकरण काय असतं ते माहीत नव्हतं, पण त्यांची भारताच्या इतर देशांशी नात्यावरची काही व्याख्यानं ऐकली होती).
अजुन पण असं वाटतं कि च्यायला काय माहितिये? सिद्धेश ने असंच बसल्या बसल्या युरोप, एशियातल्या सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या इतक्या सहज सांगितल्या होत्या कि मला सगळं वाचन वगैरे व्यर्थ वाटायला लागलेलं.
बाल्टिमोर मध्ये थॉमस विचारायचा कि तू पेपर का वाचतोस? त्याला त्यात काही पॉईट वाटायचा नाही. आणि माझं 'कारण मला ते आवडतं' हे कारण त्याला पटायचं नाही. मग त्याला म्हटलं कि पेपर वाचणं म्हणजे एखादं धमाल आणि 'निरंतर' पुस्तक वाचण्यासारखं असतं. त्यात कुठल्याही बॉलिवुडपटाला साजेसा मिर्च-मसाला ठासुन भरलेला असतो. पण कुठल्याही नविन छंदासारखं इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पेशन्स ची तयारी हवी. त्याला ते किती जमलंय ते माहित नाही, पण माझं पेपर वाचायचं व्यसन कधीच जाणार नाही हे नक्की. कुठल्याही नविन शहरात गेल्यावर तिथले जमतील ते पेपर वाचणे आणि विकत घेऊन घरी आणणे हा खरं तर पप्पांचा छंद. मी अमेरिकेतुन पहिल्यांदा घरी येताना 'काय आणु?' वर पप्पांचं उत्तर 'पेपर' होतं! मग त्यांच्यासाठी कोलंबस मधुन 'कोलंबस डिस्पॅच', लंडन मधुन 'टाईम्स', आणि दुबईतुन 'खलीज टाईम्स' घेऊन गेलेलो.

'घोस्ट वॉर्स' मध्ये अमेरिका, पाकिस्तान, अफघाणिस्तान, साउदी अरेबिया, भारत - आणि इतर मध्य एशियातल्या देशांच्या नात्यातली गुंतागुंत कळली. 'खुदा गवाह' मध्ये पहिलेले ते डोंगर आणि वाळवंट जरा आणखीनच मोहक आणि गूढ वाटायला लागले. बाकी काही नाही तरी अफघाणिस्तान (आणि अर्शद वारसी) साठी तरी 'काबुल एक्सप्रेस' बघावासा वाटला. तसचं स्टीव्ह कोल ची बाकीची पुस्तकंही वाचावीशी वाटली.

नविन वर्षाच्या 'निश्चय (लांबलचक) यादी'त वर्षात सहा चांगली पुस्तकं वाचायची हे ठरवलंय, पण आता २० एप्रिल पर्यंत वाचन बंद!
एक (फाडू) परिक्षा देतोय. त्याचे फॉर्म्स भरता-भरताच दमछाक झालिए. आणि अभ्यासाला तर अजुन सुरुवात करायचिए....

बाकी - दमछाक २००६ संपलं याचा लही आनंद झाला.
ठळक घटना म्हणजे - लग्न, त्यासाठीची इंडिया ट्रिप, जॉब चेन्ज, बाल्टिमोर सोडुन सिऍटलला जाणे. थोडक्यात सगळ्या ठळक घटना लग्नाशी निगडीत होत्या, आणि त्या सगळ्यांनी लय दमवलं. नुस्ती धावपळ.....

२००७ मध्ये 'विश्रांती' घ्यायचं ठरवतोय!
फक्त ही परिक्षा, घर घेणे वगैरे कामं झाली कि विश्रांतीच विश्रांती....

आणखी काही सुचत नाहिये, पण मागच्या एक-दोन महिन्याच्या मरगळीनंतर ऍटलिस्ट काहीतरी लिहिता आलंय....हे ही नसे थोडके!

खरं तर आजचं लिखाण इथेच संपवलं होतं - पण बरेच दिवस आठवत होतो ती सलील ची कविता पुन्हा एकदा सापडली. इथवर वाचून कंटाळला नसलात तर - ही कविता नक्कीच आवडेल -


कुठे कुठे काही नाही
टप्प्यामध्ये काही नाही
मातीसुद्धा वेळेपुर्वी
कुशीमध्ये घेणार नाही
कुठे कुठेच काही नाही
कुठे कुठे कुणी नाही
टप्प्यामध्ये नसलेल्याला
हाका आता देणार नाही
घडल्यापैकी काही काही
तुझ्यापुढे मांडणार नाही
एकदाच फक्त भेटुन जा
आहे असं भासवुन जा

पूर्वीसारखं वाहून जाणं
जमेल असं वाटत नाही
थ्रूआउट व्याकुळ होणं
जमेल असं वाटत नाही
झाली शकलं जपूनसुद्धा
काही मिळेल वाटत नाही
रोख ठोक सवालांतून
सूट मिळेल वाटत नाही

वेगळ्या वेगळ्या प्रवाहांशी
नाती जोडणं भाग आहे
दिलखुलास खाणाखुणा
रद्द करणं भाग आहे
गदारोळात गदारोळात
सामील होणं भाग आहे
ममत्वाचे धीमे सू
सुप्त करणं भाग आहे

स्टाईलबाज असलं काही
माझ्याच्यानी होणार नाही
खोटे रंग उडून गेलेत
पुन्हा देणं जमणार नाही

घेउन काही येऊ नको
बाकी काही ठेवु नको
फक्त थोडी असून जा
आहे असं सांगुन जा
दूरवर.....कुठेतरी
निदान आहेस इतकं पुरे
असेनास का नावापुरती
निदान आहेस इतकं पुरे
बेपत्ताच्या.....कुशीमध्ये
असलेल्याला इतकं पुरे
आघातांवर आघातांनी
चेपलेल्याला इतकं पुरे

गांडूगीरी केल्याशिवाय
किंमत नाही अग्दी कबूल
आपणसुद्धा सगळ्यांसारखंच
गांडू व्हावं अग्दी कबूल
माणसं इथं जगतात कशी
हेच मला नवल वाटतं
श्वास मूळ धरतो कसा
हेच मला नवल वाटतं
जग असंच गांडू असणार
असंच आता गृहीत धरु
आपण तरी काय करणार
असंच आता गृहीत धरु

तरी सुद्धा झगडल्यावर
आपलं चक्रं नक्की मिळेल
एकट्या दुकट्या संघर्षाचं
हसं झालं तरी चालेल
नव्या त्रिज्या नवे व्यास
नवे परीघ खुले होतील
कंपनांच्या आयामाच्या
सारी दिशा खुल्या होतील

खूप खूप दिवसांपासून
फक्त माझ्या तुझ्या साठी
फार फार खोलपणे
फक्त माझ्या तुझ्या साठी
अगदी अगदी तुझंमाझं
एक नातं जपलं आहे
तळव्यावरच्या फोडासारखं
म्हणतात तसं जपलं आहे

पुण्यामध्ये आलीयस म्हणून
पुणं किती चांगलं वाटतंय
कितीतरी दिवसांनंतर
माझं मलाच विषेश वाटतंय
स्वत:शिवाय माझ्याकडे
फक्त स्वत: मीच आहे
माझ्याकरता जामीन राह्यला
फक्त स्वत: मीच आहे

अजूनसुद्धा भरकटलेल्या
निष्कर्षांना ओल कशी
शब्दवाही बुडबुड्यांना
अर्थण्याची ओढ कशी
चुकुनमाकुन एखादवेळी
क्वचित खरा सूर येतो
जतन केल्या निष्ठांसकट
माझा मलाच बहाल होतो
आता कधी गर्दीमध्ये
तुझं असं दिसणं नको
ओळख असून नसल्यासारखं
परक्यासारखं बघणं नको
फार चूक नसतानाही
चुकल्यासारखं वाटणं नको
तुझ्यामाझ्या अध्यायाला
आणखी तडा जाणं नको

रस्त्यांवर मी टाहोसारखा
रस्ते रस्ते पोरके पोरके
वाहनं माणसं चेंगराचेंगरी
सगळं असून ओके बोके
दुखावलेल्या विचारांनी
माझी वाईट गोची केली
वेड्यावाकड्या भटकण्यानी
शेवटी माझीच मारली गेली
फारशी लायकी नसूनसुद्धा
भुरटी माणसं पुढे गेली
बावीस वर्ष आयुष्यातली
थाड थाड उडत गेली

आता मात्र जमेल तसं
जमेल तितकं नीट करू
सगळ्यापैकी जमेल तितकं
सगळं सगळं नीट करू
मिळेल तितक्या सामग्रीनी
केंद्रबिंदू नक्की करू
उरल्यासुरल्या आयुष्याची
आशयसूत्र नक्की करू
कल्लोळाचे ताणतणाव
स्वत:मधून ढिले करू
स्वत:हूनच स्वत:पुढे
आरपार स्पष्ट होऊ
स्वत:मधल्या आधारावर
उभं विश्व उभं करु

तरी सुद्धा हरपलेलं
सारं परत कसं मिळेल
ओघ पुढे वाहून गेला
जीवन कसं नीट जुळेल
जीव तोडुन जगलो तरी
आयुष्याचं मोल काय
अलिकडच्या पलिकडच्या
इशाऱ्यांचा अर्थ काय
खुणावणाऱ्या नक्षत्राला
दुरावण्याचा अर्थ काय
जवळ जवळ येता येता
परकं व्हायचा अर्थ काय

ठरत नाही शमत नाही
कोंडाळ्यातुन तुटक होतं
जिव्हाळ्याचं कुठलंच कर्षण
आपण होन फिटत जातं
इथून पुढे गेल्यावर तर
प्रदेश धूसर विदेश होतात
संवित्तीचे.....धागेदोरे....
फाटे फुटून त्रोटक होतात
इथून पुढे गेल्यावर तर
प्रदेश धूसर विदेश होतात
संवित्तीचे.....धागेदोरे....
फाटे फुटून त्रोटक होतात

- सलील वाघ.

बुधवार, नोव्हेंबर २९, २००६

पल्प फिक्शन

उपवर मुलीला पाह्यला यावेत पाहुणे अचानक....

९४ चा शेवटचा सूर्यास्त आम्ही हट्टाने एकत्र पाह्यला.
तो मीरा नायरच्या '१९४७' च्या प्रत्येक सूर्यास्ताएवढाच प्रकर्षाने आठवतोय.

इतिहास किसी भाषाका नाम नहीं.
और न ही किसी उदात्त मानवी संबंध का नाम.
वो तो शक्तिके लिए किया गया एक नितांत अमानुष रक्तस्नान है....

उपवर मुलीला पाह्यला यावेत पाहुणे अचानक
आणि सुरु व्हावी साऱ्या घरादाराची धावपळ
तशी - तुझी स्थिती होते,
जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरी येतो.....

मी कथा लिहीत नाही.
काल्पनिक गोष्टी सांगायचा मी प्रयत्नही केलेला नाही.
काल्पनिक गोष्टी सांगायचा आणि घडलेल्या गोष्टी लिहायचा.
पण 'यात्रा' घडली हे मात्र नक्की.

पर्वत जब यात्रा के लिए आतुर होता है,
तब प्रतियात्रा नही - नदी बनना होता है....

पलंगावरची चादर सरळ करण्याच्या निमित्ताने
उचलुन नेतेस तू - मुलाचे अस्ताव्यस्त पसरलेले कपडे, त्याचे दप्तर,
किंवा - नवऱ्याने तशीच फेकलेली लुंगी.....

आठवणींचं एक भारी असतं - त्या कालच्यासारख्या आठवतात.
धुरकट होतात, पण जुन्या होत नाहीत.
एखाद्या पिक्चरसारख्या त्या मनात रहातात.
सीन्स पुढेमागे होतात.
कथा तीच रहाते.
कथा तीच - आणि तीच पात्रं.
कथा तीच?
आणि पात्रं?
राहुल म्हणतो तशी कदाचित हा ब्लॉग म्हणजे - माझ्या अनुभवांना मी दिलेली रिऍक्शन असू शकेल.
पण आठवणींना रिऍक्शन कशी देणार?

समर्पण का ऐसा एक विचार
फूल वनस्पतीकी स्वाहा वाणी है.
प्रार्थना मनुष्यकी - इसलिए इतिहास हो जानेका नाम नही.
बल्की इतिहाससे सर्वथा उदासीन होकर वनस्पती हो जानेका नाम प्रार्थना है.....

मला पाणी आणण्याच्या बहाण्याने आत जाताना
केसांवरुन फिरवतेस फणी न विसरता
आणि - चेहऱ्यावरून पावडरचा हलकासा हात....

सामंतांसारखं लिहायचं झालं तर 'यात्रा'चं 'कथानक' पुण्यात सुरू होतं.
सोलापुरात वेग घेतं.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या डब्यासारखं - भरधाव धावत - गुलबर्गा, रायचुर करत गुन्टकलला पोचतं.
अडखळतं.
अनन्तपूर, धर्मवरम शोधत तिरुपतीत भटकतं.
आणि जीव मुठीत धरुन पुण्यात परततं.
पण संपत नाही.
कदाचित 'नॉन-फिक्शन' मधलं कुठलंच कथानक कधीच संपत नाही.
आपण आपले त्याचे अर्थ लावायचे.
अर्थ तरी काय लावणार म्हणा.....
हे हे असं असं झालं.

समुद्र जब आकाशके प्रती व्याकुल होता है
तब प्रतिआकाश नही मेघ बनना होता है....

माझं आवडतं गाणं लावण्याच्या निमित्ताने शोकेसकडे जाताना
बेमालूमपणे बदलतेस गेल्या कित्येक दिवसांत न बदलेली कॅलेंडरवरची तारीख
आणि स्वत:लाही.....

आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो ती दुपार आयदर मला लख्ख आठवतिए, किंवा त्याबद्दल आम्ही इतक्यांदा बोललोय कि ती आम्ही आमच्या मनात 'रीकन्स्ट्रक्ट' केलिए....आठवत नाही.

सूर्य जब पृथ्वीके लिए आकर्षित होता है
तब प्रतिपृथ्वी नही धूप बनना होता है....

पण गायत्री म्हणते तसं माझ्या शाळेतल्या लोकांकडे इतरांकडे नसतो तो अनुभवांचा खजिना असतो हे मात्र नक्की.

यह धूप, यह मेघ, यह नदिया इतिहास नही - प्रार्थनाए है
इतिहासका उत्तर प्रतिइतिहास कभी नही होता, क्योंकी
दोनो भी एक दूसरेकी तलाश है
एक प्रश्न है तो दूसरा केवल प्रतिप्रश्न.
उत्तरही नहिं......

मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो - तुझी अशीच काहीतरी स्थिती होते.....
का होते?

- मी.
- नरेन्द्र मेहता.
- आठवत नाही.
सलील

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार -

प्रकरण क्रमांक एक न्यायप्रविष्ट एडीपीआर
अ१२४क१३एम०५ह७२
दाखलअर्ज दिनांक अक्रा सहा एक्याणौ - एडीमर्फी
बातमी : आठवणीचा गळा दाबुन खून
वेळ : दुपारी तीन ते सव्वातीन सुमारे
हवा : ढगाळ पण पावसाची चिन्हं नाहीत
स्थळ : डेक्कन फ्लायओव्हर इंटरनॅशनल
लकडीपूल अल्काटॉकीज अथवा अबंध
रंग : नारिंगी हिरवा ब्राउन काळा सोनेरी हवा तो
मात्र गोरा
इतर : नदीला पाणी वेग कमी
वर्णन : करावं तितकं कमीच
शेरा : आत्महमीची जोखीम म्हणजे शाश्वती
निष्पत्ती : वाहून जाऊ शकत नाही जी
ती मुदतपूर्व उचकी लागल्याने
सर्व कामकाज तहकूब करावे लागत आहे

(अंक शेवटचा - प्रवेश शेवटचा)
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार
आठवण जिवंत असल्याचे उघडकीस

शनिवार, नोव्हेंबर ०४, २००६

आपण यांना पाहिलंत का?

मागच्या आठवड्यात कॅरनने फोन करून माझा व्हिसा ट्रान्स्फर झाल्याचं सांगितलं आणि मनात आलं - च्यायला....आता परत सकाळी उठा....दात, दाढी, ऑफिस.
काम वगैरे ठीक, पण घरी येऊन मरगळ....वीकेंडची वाट बघणं....
पण सरळ चालत्या पायी आला तर तो (माझा) व्हिसा कसला?
मग कंपनीने मला कॅनडा ची वारी करायला सांगितलं!
विषेश काही नाही - मस्तपैकी व्हॅंकुव्हरला जायचं, हॉटेल मध्ये रहायचं, एक दिवस इकडे तिकडे भटकायचं आणि परत यायचं.
व्हॅंकुव्हर तर व्हॅंकुव्हर - आपलं काय?

लॉयरशी मीटिंगनंतर तडमडत डाऊनटाऊनला गेलो कॅनडाचा व्हिसा काढायला.
पोचायला उशीरच झालेला, पण म्हटलं ऍटलिस्ट व्हिसा ऑफिसची टायमिंग्ज काय आहेत ते तर पाहुन येऊ.
बाकी पार्किंगच्या बाबतीत सिऍटल हे जगातल्या इतर कुठल्याही शहरासारखंच. बकाल.
अर्ध्या तासाच्या पार्किंगसाठी ३ डॉलर सुट्टे नव्हते - म्हणुन क्रेडिट कार्ड वापरायला गेलो तर त्या मशिनने ९ डॉलरची पावती दिली!
च्यामायला या मशिनच्या....
या काऊन्स्युलेट बिल्डिंगमध्येच आधी एका कंपनीच्या इंटर्व्ह्युला आलेलो. म्हटलं उगीच इथे कुणी भेटायला नको - नाहीतर पोपट!
अपेक्षेप्रमाणेच वेळ संपून गेलेली.
सोमवारची वेळ विचारून परत पार्किंग लॉट मध्ये आलो.
मशीनने दिवसभरासाठी आधीच चार्ज केलेलं, मग त्या मशिनपाशीच जाऊन उभा राहिलो.
एक पोरगी आली पार्किंगचे पैसे भरायला - तिला म्हटलं पार्किंग करायचंय का? हा घे माझा दिवसभराचा पार्किंग पास.
ती खुश.
लही भरभरुन 'थॅंक यू' म्हटली!
गार गार वाटलं.
खुशी किसीकोभी हो - अपना दिल गाता है!

वीकेंडला आयोडेक्स, डिस्को, शालीनी आणि दाढीला जेवायला बोलावलं होतं.
म्हटलं 'हाऊस वॉर्मिंग' करू.
खरं तर त्याच्या आधीच्या वीकेंडलाच बोलावलेलं - वाटलं, पहिली दिवाळी - घरी पाहुणेरावळे हवेत. पण अमेरिकेत गर्दी जमवणं वाईट अवघड असतं. त्यात शालिनी, दाढीच्या मुलाचा - 'आदर्श'चा वाढदिवस.
त्यांना दोन मुलं - आदर्श आणि विकास.
मनोज कुमारच्या पिक्चरमधली नावं वाटतात ना! खरंतर ही शक्यताही नाकारता येत नाही, कारण शालिनीचे वडिल तेलुगु मधले मोठे चित्रपट निर्माते आहेत!!
पण मला ही दोन पोरं धमाल आवडतात.
आदर्श पाच वर्षांचा आणि विकास तीन.
मला तेलुगु येत नाही हे कळल्यावर ही दोघंजणं माझ्याशी आवर्जून आणि फक्त इंग्लिशमध्येच बोलतात - जे रघूचा सन्माननीय अपवाद सोडला तर समस्त गुल्टी समाजातल्या कुणालाही जमत नाही!
त्यांची आणि माझी चांगलीच गट्टी जमलिए.
आदर्शला माझ्यापेक्षा चांगला मासा काढता येतो!
आणि आदर्श जे काही करेल ते विकास तत्परतने रिपीट करतो!!
आदर्शला जेवणाआधी 'वदनि कवल घेता' म्हणायला शिकवलं - त्याला ते लक्षात रहाणं अशक्य आहे, पण त्यानं ते माझ्या उच्चारांकडे नीट लक्ष देऊन न अडखळता माझ्यामागे रिपीट केलं. आनंदाची गोष्ट म्हणजे डायपर वगैरे सांभाळत विकासही न हलता त्याच्याबरोबर 'सत्यनारायणाच्या तन्मयतेने' हात जोडून उभा राहिला!
जेवणानंतर त्या दोघांना (त्यांच्या मनाविरुद्ध) झोपवण्याचा (आश्चर्यजनक) कार्यक्रम दाढी आणि शालिनीने कसा पार पाडला त्यांचं त्यांना ठाऊक.
आमचा जेवणाचा मेन्यु पण अवाढव्य होता - चिप्स, साल्सा, चिकन, स्पॅघेटी (मी बनवलेले), साधा भात, मसाले भात, बटाट्याची भाजी, गाजराची भाजी(!), सांबार.
आणि डेजर्टला सूफले!
खरं तर मेन्यु (एवढा) वाढायचं कारण मी.
म्हणजे मलाही स्वैपाक बनवता येतो - हे दाखवायची संधी आणखी कधी मिळणार होती?
कधी कधी मला वाटतं आम्ही दोघेही आदर्श आणि विकासपेक्षा वेगळे नाही.
असलोच तर त्यांच्यापेक्षा असमंजस असू, कारण माझं चिकन चांगलं कि तिचं सांबार यावर आमची घनघोर (लाटणं/गदा) युद्ध होतात.
उच्चार शुद्ध असुनही आम्ही जेवणाच्या पुढे-मागे एकही मंत्र म्हणत नाही.
(आणि मला माधुरी पेक्षा चांगला मासा काढता येतो.)

डेजर्ट खाताना आम्ही माझी 'लेव्हल ऑरेंज' नावाची शॉर्ट फिल्म बघितली.
माझी शॉर्ट फिल्म वगैरे फक्त म्हणायला - मी त्यात फक्त ऍक्ट केलेलं.
त्या शॉर्ट फिल्मची एक गंमतच झाली होती.
तीन वर्षांपुर्वी मी 'टॅको बेल' मध्ये लाईनीत उभा राहून 'बीन बरिटो कि सेवन लेयर बरिटो' या माझ्या रोजच्या दिव्यात अडकलो असताना एक बाई माझ्याकडे पाहतिए असं वाटलं.
मी संशयास्पद हसुन 'हॅलो' म्हटलं तर ती बया - आपल्याकडे तद्दन फालतू पिक्चर मध्ये कसा डायरेक्टर दोन हात जुळवून 'फ्रेम' मधून हिरोईनकडे बघतो तशा आविर्भावात - माझ्याकडे बघतच राहिली.
च्यायला लाईन पुढे सरकेना, बरिटोचा प्रश्न सुटेना आणि वर हा पोपट!
मग ती म्हणे - 'आय हॅव्ह सीन यू समव्हेअर. आर यू ऍन ऍक्टर?'
'मोठ्या पडद्याच्या' ज्या कल्पनाविलासी स्वप्नाची मी जन्मभर वाट पाहिली ते असं 'टॅको बेल'मध्ये भेटल्याने डावा मेंदू हबकलेला असताना उजवा मेंदू बोलून गेला - 'छे! तो मी नव्हेच!!' (तुला जो वाटतोय तो भारतात असतो. त्याला तिकडे अभिषेक बच्चन म्हणतात वगैरे वगैरे - मनातल्या मनात).
पण तिला लोकांना असे धक्के द्यायची सवय असावी.
कारण अजिबात निराश न होता तिने - 'बट वुड यू बी इंटरेस्टेड इन ऍक्टिंग?' विचारलं.
आईशपथ सांगतो - 'तुम्हाला माझ्या मॅनेजर शी बोलावं लागेल - या गोष्टी तो हॅन्डल करतो' - असा रानटी जोक टाकायची लई सुरसुरी आलेली, पण चेहऱ्यावर नक्की कुठले भाव दाखवावेत याच्या कन्फ्युजन मध्ये मी तिला 'हो हो, अवश्य' म्हणुन गेलो.
तिने माझा फोन नंबर घेतला, स्वत: माझ्या अपेक्षेप्रमाणे डायरेक्टर नसून 'कास्टिंग डायरेक्टर' आहे हे सांगितलं, आणि 'स्क्रीन टेस्ट' साठी मला फोन करेल हे सांगुन, माझ्या दोन्ही मेंदुंना झिणझिणत ठेऊन मला शुद्धी यायच्या आत ती निघुनही गेली.

त्या काळात मी नुकताच माधुरीला भेटलेलो.
तिला हे सांगितल्यावर माझे एकाचवेळचे हजार धंदे बघुन तिलाही काळजी वाटली असणार, कारण तिच्या एकाही प्रश्नाला धड उत्तर न दिल्याने ती म्हणे - 'ते काही नाही - उद्या डायरेक्टरला भेटायला मी ही येणार.'
म्हटलं चल.
'डॉन्कीज' मध्ये कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर, फोटोग्राफर वगैरे माझ्या (बोल)बच्चनगिरीवर तुफान खुश.
त्यांनी माधुरीलाही रोल ऑफर केला - माझ्या बायकोचा!
पण माधुरी अजिबात तयार होईना.
(पुढे तो रोल आमच्याच डिपार्टमेन्टच्या 'बबली'ने केला.
बबली हे एक सुबक, सुंदर, ठेंगणी प्रकरण होतं.
ते इथे - अमेरिकेत कॉलेजला बुरखा घालुन यायचं आणि तमाम जनतेला घायाळ करुन जायचं.....)
मी मारे ओम पुरिच्या 'अर्धसत्य'च्या पोटतिडिकेने रोल केला. (त्यातला बेस्ट पार्ट 'एडिटिंग' मध्ये वगळण्यात आला.)
सगळेच शिकत असल्याने अधुन मधुन पिझ्झा शिवाय ईतर कुठलंही मानधन मिळालं नाही पण तो एक खूप चांगला अनुभव होता. त्याबद्दल कधीतरी लिहिलंच पाहिजे.

तर त्या दिवशी माझी शॉर्ट फिल्म पाहून आम्ही 'पिक्शनरी' नावाचा गेम खेळलो.
हा एक 'डंब शॅरड्स' सारखा खेळ असतो. म्हणजे आम्ही दोन टीम्स बनवलेल्या. पहिल्यात मी, आयोडेक्स आणि शालिनी. दुसऱ्यात दाढी, डिस्को आणि माधुरी.
टीममधला एकजण एक पत्ता उचलणार, त्यातल्या शब्दाबद्दल एका मिनिटात आम्हाला चित्र काढुन क्ल्यू देणार. तो शब्द आम्ही ओळखला कि आम्ही जिंकलो, मग कवडी खेळून 'व्यापार' सारखं एकेक घर पुढे जायचं.
दाढी आणि शालिनी लई तावातावाने भांडत खेळतात.
पण धमाल येते.
मागचे दोन्ही गेम्स जिंकुन माझी टीम २-० ने पुढे आहे.

व्हॅन्कुव्हरच्या अनुभवाबद्दल लिहायचंय, आणखी एकदोन विषयांबद्दलही (आवाज कुणाचा, श्रुती, ऑपरेशन यात्रा), पण ते नंतर.
या वीकेंडला माधुरीच्या एका कलीगच्या काचेच्या कारखान्याला भेट द्यायचिए - त्याबद्दलही नंतर.
दरम्यान - बरेच दिवस (आळशीपणे) न केलेला प्रकार म्हणजे 'वाचकांची दखल'.
अभ्या, बाबा, योगेश, मॉन्सुर के, ऍनोनिमस, 'मनोहर मनोहर', स्नेहल, सोनाली, ट्युलीप, अश्विनी - तुमच्या कमेन्ट्स वाचल्या कि लिहावंसं वाटतं!
नितीन, निलेश, सिद्धेश, सत्यजित, प्रभु, अमित, रुचा, स्वप्ना, विकी, गायत्री - तुम्ही वाचताय हे कळवल्याबद्दल धन्यवाद.
ब्लॉग लिहायला लागल्यावर कुणी वाचेल कि नाही असा प्रश्न होता, तिथपासुन हे प्रकरण सोनाली, अजेय, निखिल हे जुने मैत्र अचानक भेटेपर्यंत पोचेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
सोनाली - आय होप तु हा ब्लॉग तुझ्या आईला वाचून दाखवत नाहिएस, नाहीतर ती पुण्याहुन फोन करुन - 'काय रे गधड्या, असं लिहितात होय? सांगु का तुझ्या आईला फोन करुन?' म्हणेल!!
अजेय - इथली कुठलीच पात्रं काल्पनिक नाहीत. 'अभ्या', 'बाबा' आतले आवाज वगैरे नाहीत तर चांगले 'बाहेरचे' आवाज आहेत, जे मला बहुधा कानाखाली ऐकु येतात. आणि तू जसं म्हणतोस - कि हेच मलाही असंच वाटलं होतं....तर मी ती कॉम्प्लिमेन्ट समजतो. एकदा मला संदीपने विचारलं कि तू कविता का नाही करत? मी त्याला म्हटलं कि अरे तू मला वाटतं ते एवढ्या चांगल्या शब्दात सांगतोस तर मी कशाला हात पाय हलवु? तर तो म्हणे की हे म्हणजे पुरण पोळी विकत आणण्या सारखं आहे! काही का असेना - विसुभाऊंच्या शब्दात 'सह अनुभुती' तर आहे ना....तेवढं पुरे.
निखिल - ब्लॉग वाचुन 'माझ्या आयुष्यात नक्की चाललंय काय?' चा तुझा गोंधळ मी समजू शकतो. कारण तो प्रश्न मलाही पडलाय!

शेवटी 'ब्लॉग ब्लॉग' म्हणजे तरी नक्की काय? - हा प्रश्न पडायला नुकतीच सुरुवातच झाली होती, तेवढ्यात 'देजा वू' सारखी राहुल ची ही मेल आली.
नेहमीच्या आळशीपणे त्याने ती 'रोमन मराठी'त पाठवली -

डियर अभि,

कसा आहेस?
बेकारी काय म्हणतिए? :)
तुझे ब्लॉग रेग्युलर वाचतो.
त्यातुन तुझे बऱ्यापैकी अपडेट्स पण मिळतात.
ब्लॉगची रेग्युलर आठवण येते म्हणजे चांगले असतात हे स्पेशली सांगायला नको...)
खरंच वाचनीय असतात.....
खरं तर ब्लॉगला कमेंट द्यायला हरकत नाही.
पण नाही जमले....
सबब सांगायची झाली तर....तुझे ब्लॉग्ज ऑफिसमध्ये ऍक्सेस करतो आणि प्रिंट घेऊन घरी जाऊन वाचतो.....
ऑफिस मध्ये वाचत नाही. तसा वेळ नसतो आणि मूडही.....
नंतर घरी वाचताना रिप्लाय सुचतो, पण नेट नसते....
तर या झाल्या सबबी.....इंडियन स्टाईल :)
एनीवे....
ब्लॉग संस्कृतीशी जुळवुन घ्यायचा प्रयत्न चालू आहे.
मराठीमध्ये रिप्लाय कसा करायचा ते बघायला हवं.....
पण ब्लॉग म्हणजे ललित वाड्मय (हा शब्द मला मराठीमध्ये लिहिता येत नाही पण इंग्लिश स्पेलिंग सोपे आहे :)) नव्हे.
ब्लॉग म्हणजे हप्त्याहप्त्याने लिहिलेली ऑटोबायोग्राफी नव्हे....आणि ईमानदारीत लिहिलेली डायरी पण नव्हे.....
मग नक्की काय????
खरं सांगायचं तर ब्लॉग म्हणजे तुझ्या एक्सपीरियन्सला तू दिलेली रिऍक्शन असे मानले तर त्या रिऍक्शनला मी कशी रिऍक्शन देणार.....
आणि नुसते - मी वाचले. छान आहे. असा कोरडा रिप्लाय तरी कसा देणार??
कदाचित मी गोष्ट जास्त कॉम्प्लिकेट करतोय....असो.....
पण तू लिहीत रहा.....
मोकळा होत असशील तर खूपच छान.....

कळव....

- राहुल.


हुं.....माझ्या अनुभवांना मी दिलेली रिऍक्शन!
सही है!!
पण एका माणसाकडे असे सांगण्यासारखे अनुभव तरी असतात किती?
ते संपले कि मग काय करायचं?
आणि 'मोकळा' वगैरे किती होतो हाही प्रश्नच आहे.
कारण लिहावंसं वाटतं, पण लिहायला बसलो कि विचार क्रमाक्रमाने थोडेच येतात?
याच पोस्टचं सांगायचं तर - कॅनडा, हाऊस वॉर्मिंग, 'लेव्हल ऑरेंज' आणि वाचक - या प्रत्येकाबद्दल कुणालाच न्याय न देता बोललो.
म्हणजे काय? तर काही नाही.
जोपर्यंत लिहायला लागल्यावर 'बाहेर यायला' विचारांची फायटिंग होतिए तोपर्यंत लिहीत राहु.
तोपर्यंत -
तलाश जारी......

बुधवार, ऑक्टोबर २५, २००६

मुखवटे आणि चेहरे

हॅलोवीन हा एक अमेरिकन सण.
अमेरिकेतले बहुतेक सण तसे वीकेन्ड बघुन साजरे केले जातात - दिवाळी सकट! (आमच्या युनिव्हर्सिटीत तर हॉल कधी अव्हेलेबल होतोय हे पाहून दिवाळीचा 'मुहूर्त' ठरायचा).
पण ख्रिसमस, ४ जुलै आणि हॅलोवीन - तारखा पाहून साजरे होतात.
पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेव्हा अभ्यास आणि पैशाच्या टेन्शनमध्ये हॅलोवीन काय - फॉल (शिशिर - हो ना?) कधी सुरू झाला याचाही पत्ता लागला नव्हता. नाही म्हणायला पहिल्यांदा कटिंग करुन येत होतो तेव्हा रस्त्यापलिकडचं झाड बघुन - काचेपलिकडुन आपल्याकडे कुणी रंगपंचमीचा लाल-पिवळ्या रंगांनी भरलेला फुगा फेकावा आणि तो काचेवर फुटल्याचं लक्षात न येऊन आपण त्याकडे अवाक होऊन पहावं तसा - मी रंगांच्या त्या स्फोटाने दचकलो होतो.
रंगांची निर्भेळ दंगल - सवालच नाय.
पण पहिला फॉल म्हणजे फक्त अभ्यास आणि काम.
तसा ऍथेन्स (ओहायो मधलं - ग्रीस मधलं नव्हे) मधे प्रत्येकच वीकेन्ड दणक्यात साजरा व्हायचा, पण हॅलोवीनची शान काही औरच! (असं फक्त ऐकलं होतं).
वीकेन्ड - पर्टिक्युलर्ली शुक्रवार, शनिवार - ची संध्याकाळ म्हणजे नविन भाबडी जनता - नटुन थटुन रात्री घरुन निघणाऱ्यांना (बुधवारात जाणाऱ्यांना निरोप देण्याच्या तुच्छतेने) - अपटाऊन क्या? जाओ जाओ ऐष करो - म्हणायची. (अमेरिकेबद्दल असणाऱ्या अनेक गैरसमजांपैकी सगळ्यात मोठा म्हणजे - अमेरिकन्सना नैतिकता हा प्रकार माहित नसतो. त्याबद्दल नंतर कधीतरी).
अर्जुन मला पहिल्याच वीकेन्डला अपटाऊन ला घेऊन गेलेला.
आमच्याकडे अपटाऊन म्हणजे - इतर शहरांतल्या डाऊनटाऊन्स सारखा प्रकार. फरक म्हणजे आमच्या अपटाऊन मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रस्ता संपेपर्यंत बार्स. पिग स्किन, रेड ब्रिक टॅव्हर्न, सी.आय., पॉपर्स, टोनीज - हे प्रसिद्ध.
तिथे जाऊन आम्ही एक-एक बियर प्यालो आणि पूल खेळलो. बार मध्ये फारशी गर्दी पण नव्हती. त्यामुळे त्या तुच्छतेचं कारण मला कधी कळलं नव्हतं.
पण पहिल्या क्वार्टर मध्ये तरी (अकॅडमिक क्वार्टर - व्हिस्कीची नव्हे) परत कधी अपटाऊन ला जायचा योग आला नव्हता.
दरम्यान मिड-टर्म्स बरोबरच हॅलोवीनची वातावरण निर्मिती होत होती.

हॅलोवीन हा इथला भुताखेतांचा सण.
त्यामागची दंतकथा अशी कि आयर्लंडच्या 'सेल्टिक' जमाती ३१ ऑक्टोबर हा 'समर' चा शेवटचा दिवस मानीत. १ नोव्हेंबर हा 'ऑल सेन्ट्स डे'. या समरच्या शेवटच्या दिवशी - त्या वर्षात वारलेल्या लोकांचे आत्मे 'शरीर' शोधत भटकत. आणि सगळ्यात सुंदर दिसणाऱ्या शरीराला 'झपाटत'. त्यामुळे त्या दिवशी/रात्री लोक घरातले दिवे वगैरे घालवून, चित्र-विचित्र (शक्यतो भुताखेताचे) पोशाख करुन बसत - जेणेकरुन 'भटकती आत्मा' आली तरी तिने मला शोधु नये! ही प्रथा हे आयरिश लोक १९ व्या शतकाच्या मध्यात अमेरिकेत घेऊन आले.
कळ्या म्हणायचा - प्रत्येक भन्नाट कल्पनेचा जन्म एशियात होतो, युरोपियन्स तिला सिस्टिम देतात आणि अमेरिकन्स तिचा धंदा करतात - तसं आता हॅलोवीनचा धंदा (नव्हे सण - एकुण एक) झालाय.
जनता पम्पकिन्स (मोठे भोपळे) विकत घेऊन ते वाळवते, आणि आतला गर काढून त्यावर (भुताचे) डोळे, नाक, तोंड कोरून घराबाहेर ठेवते. शिवाय चित्र विचित्र पोशाख आणुन स्वत: नटते आणि आपल्या पोराबाळांना नटवते. मग मुलं टोळी करुन आपापल्या आळीतला प्रत्येक दरवाजा ठोठावतात आणि 'ट्रिक ऑर ट्रीट' ओरडुन स्वत:च्या पोशाखाचं कौतुक करून घेऊन चॉकलेट वगैरे मिळवतात. (आपल्या संक्रांती/दसऱ्या सारखं - त्यामुळे त्या दिवशी एक परडीभर चॉकलेट्स घरी येणाऱ्या 'भुतांसाठी' तयार ठेवावी लागतात.)

ऍथेन्स हे एक युनिव्हर्सीटी टाऊन.
इथं हॅलोवीन हा 'युनीक' प्रकार आहे.
(भारतीयांसाठी आणखीनच युनीक कारण हा एकच दिवस असा कि जेव्हा या वीस हजार लोकसंख्येच्या गावात चाळीस हजार लोक जमतात आणि एकाच वेळेस अपटाऊन ला येतात. पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर दिसणारी गर्दी इथे प्रकटते.)
या परेड मध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसतो.
तुम्ही त्यात सामील होणार नसाल तर तुम्हाला तो येड्याचा बाजार वाटतो. (त्यात सामील झालात तरी तेच वाटतं - पण 'येडे होऊन' तसं वाटायला मजा येते.)
प्रत्येक जण चेहरा रंगवून, मुखवटा घालून नाहीतर अतरंगी कपडे घालून दिसेल त्याला 'हॅपी हॅलोवीन' करत असतो.
पहिल्या वर्षी तुम्ही कुणालाच ओळखत नसता, दुसऱ्या वर्षी तुम्हाला कळतं कि कुणीच ओळखीचं दिसत नाहिये कारण सगळ्यांनी मुखवटे घातलेत, तिसऱ्या वर्षी तुम्ही एवढे 'टल्ली' असता कि सगळेच मुखवटे ओळखीचे वाटायला लागतात, चौथ्या वर्षी मुखवटेच एवढे खरे वाटायला लागतात कि तुम्ही दर वर्षी या दिवशी ऍथेन्स मध्ये असण्याचे अशक्य प्लॅन्स मित्रांबरोबर बनवायला लागता.....
ऍथेन्समध्ये पाहिलेल्या चार हॅलोविन्स मधली सगळ्यात मोठी चूक आम्ही (म्हणजे मी, अजित आणि सिद्धेशने) पहिल्याच हॅलोवीनला केली - ती म्हणजे आमच्या ग्रुप मधल्या एकमेव कपल बरोबर हॅलोवीन परेड पहायला गेलो!
चूक म्हणजे.....
त्याचं असं आहे कि मॉब सायकॉलॉजी हा एक अजब प्रकार असतो.
इतर दिवशी सरळ साधा दिसणारा माणुस 'मॉब' मध्ये गेल्यावर एकदम 'शूर' होतो. मग तो पाकिटमाराला जसा बदडतो, तसाच मध्ये पडणाऱ्या पोलिसालाही, तो जसा 'अजाणत्याला' मदत करायला धजावतो तसाच 'अजाणतीला' चिमटे काढायलाही.
इथे 'अशा' शूरांचा प्रॉब्लेम नसतो. त्यासाठी उमद्या घोड्यांवरचे 'मामा' लोक उमद्या गर्दीवर चौखूर घोडी उधळायला आणि उन्मत्त शुक्रजंतुंच्या धुंदीला काळ्या तुकतुकीत सोट्याने रट्टे लावायला सदैव तयार असतात.
इथे प्रॉब्लेम असतो मुली!
म्हणजे 'काही' मुली - पण शेवटी काय.....
म्हणजे गर्दीचा फायदा(!) उठवुन तोकड्या कपड्यात वावरणं वगैरे ठीक, पण या पोरी शिस्तीत फ्लॅश करतात. (फ्लॅश करणे म्हणजे शुद्ध मराठीत - छाती दाखवणे).
खरं तर हे अवैध/इल्लिगल/गैरकानुनी आहे, पण 'मामा' लोकही त्याकडे (लक्षपुर्वक) दुर्लक्ष करतात.
या पोरी - परेड बघण्याच्या नावाखाली - कोर्ट स्ट्रीटच्या (दोन्ही) बाजूच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनींत.
खाली गर्दी ('हमारी मांगे पुरी करो' च्या ईमानदारीत) 'शो युअर टिट्स' ओरडत.
आणि वर या पोरी गर्दीला यथेच्छ तिष्ठवत 'गॅस' वर ठेऊन.
पोरी 'अतीच' करायला लागल्या तर गर्दी निराशेने (आणि नव्या हुरुपाने) पुढच्या गॅलरीकडे जाते.
सेल फोन या 'दैवी चमत्कारा'ने 'प्रॉडक्टिव्ह स्पॉट्स' सांगितले-मागितले जातात.
दर वर्षीच्या हॅलोवीनचे (अनऑफिशियल) 'स्कोर' ठेवले जातात.

पहिल्या हॅलोवीनला या गोष्टी 'वरण-भात' कपल बरोबर असताना करणं भलतंच अवघड गेलं.....
पहिल्या हॅलोवीनची आमची चिडचिड म्हणजे -
अरे तो बघ - बाघबान सारखा वाघ रंगवुन आलाय अंगावर.
ती बघ - स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बनून आलिए.
तो बघ स्पायडरमॅन, ती बघ सुपर(वु)मॅन?....
एवढंच!
'हमारी मांगे....' सुरू झालं कि आमचं आपलं 'चला पुढे - अजुन केवढं बघायचंय'-'हो ना!'.

य चिडचिड.

त्यामानाने दुसरा हॅलोवीन चांगला गेला.
बरंच ठरवूनही मी 'कॉस्च्यूम' घ्यायला विसरलो.
पण काहीतरी करायचंच हे ठरवलेलं.
माझ्या बरोबरचे कुणीच 'ड्रेस अप' होईनात.
मग मीच - जीन्स, टी शर्ट, त्यावर टाय, त्यावर बनियन आणि मग अमितायू कडे जाऊन मस्त पैकी तोंडावर मिळेल तो रंग जमेल तसा फासला.
रघूच्या उषाला 'भो' केलं तर ती एवढं दचकली कि तिला अजुन आठवतंय.

तिसऱ्या हॅलोवीनला केस वाढवण्याच्या प्रयत्नांत होतो.
मग ते (अर्धवट पोनीटेल) वाढलेले केस 'अग्नीपथ' मधल्या मिथुन सारखे 'जेल' लावुन चिप्प बसवले.
दाढी वाढवलेली, ती पण जेल लावुन 'त्रिकोणी' केली.
(थोडं आणखी जेल उरलं होतं म्हणुन) मिशा सालव्हादोर दाली सारख्या वर वळवल्या.

चौथ्या हॅलोवीनला अमितायूने काळा झगा आणि भुताचा उभट चेहऱ्याचा 'कवटी' मास्क दिला.
माधुरीला तयार रहायला सांगुन आलेलो.
म्हटलं तिला 'थोडं' सरप्राईज देऊ.
माधुरी रेस्टरुममध्ये आरशासमोर टिकली लावत उभी होती.
तिच्या घराच्या दरवाजातुन उगीच 'माधुरी - हे बघ, हे बघ' करत तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पण ती कपाळाचा सेन्ट्रॉईड शोधण्यात गुंग.
लावलेल्या मास्क बद्दल टोटल विसरुन 'च्यायला काय हे' करत तिच्याकडे जायला लागलो तर ती एवढी किंचाळली कि मीच घराबाहेर धावलो!
मग पार्किंग लॉट मध्ये लोकांना भुताच्या मागे माधुरी झाडू घेऊन धावतानाचा 'कॉमिक' सीन दिसला असणार!!

.......

साप, फटाके, रंग, क्रिकेट, दंगली, सॉफ़्ट्वेअर - हीच आपली संस्कृती - हे जेवढं खोटं, तेवढंच - युद्ध, अनैतिकता, रंगद्वेश, पैसा, पार्टिज म्हणजे अमेरिकन संस्कृती हे ही.
मग मुखवटे कुठले आणि कुठले चेहरे - हे ज्याचं त्यानं शोधायचं.

काय दाखवायचं.....
हा ज्याचा त्याचा प्रश्न.....

सोमवार, ऑक्टोबर २३, २००६

अख्तर ऍन्ड अख्तर

हल्ली 'फाईव्ह पॉइंट समवन' पुन्हा एकदा वाचतोय.
हे एक असं पुस्तक आहे कि कधीही कुठेही कुठल्याही पानापासुन वाचायला सुरुवात करावी आणि गुंगुन जावं....'दिल चाहता है' सारखं!
रायन, हरी, आलोक - अजित, सिध, कळ्या, मन्या, निल्या, रव्या, अभ्या, बाबाची आठवण करुन देतात.

आजचा 'बेकारी'चा पहिला दिवस चांगला गेला.
आमच्या एच. आर. डिरेक्टर, ब्रान्च मॅनेजर - यांचे झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी वगैरे व्यक्त करणारे फोन आले.
३ बियर, १ तास व्यायाम, निवांत लंच आणि मग ताणून झोप - हे सगळं माधुरी घरी यायच्या आत उरकलं!
उद्यापासून रोज एक ट्रेक करायचा असा विचार केला. इनफॅक्ट आजच 'लिटल साय' ला जाऊन येणार होतो.

बाय द वे - मागच्या एका पोस्ट मधे वर्णन केलेला तो 'रांगडा पहाड' वगैरे म्हणजे 'माऊंट साय'!
मागच्या वीकेंडला माधुरी आणि मी 'लिटल साय' केला (माऊंट साय चा बेस कॅंप म्हणू).
निघायला तसा उशीरच झालेला आम्हाला, पण माधुरीने न दमता, तक्रार न करता तो ३ तासांचा ट्रेक कंप्लिट केला. तसा फार अवघड नव्हता - फारतर सिंहगड चढण्याएवढा. 'ट्रेक' म्हटल्यावर 'वर' पोचल्यावर भारावून जायची वगैरे सवय झालिए भारतात, इथे तसं काही होत नाही. मग आपलं आपण उगीच कुठल्या सुळक्यावर बसुन इथल्या रेड इंडियन्सच्या इतिहासावर तर्क करत बसायचे.
जाताना कुठल्याशा युरोपियन देशातले ट्रेकर्स रॅपलिंग करताना दिसले. येताना अंधार पडेपर्यंत त्यांचं रॅपलिंग चालू होतं.
मध्येच आम्हाला सिऍटलच्या एका ट्रेकर च्या स्मरणार्थ स्थापलेलं एक बाकडं दिसलं - तो एव्हरेस्ट सर करुन उतरताना बेपत्ता झाला. कोण कुठचा तो हिमालयात येऊन हरवतो, आणि कोण कुठचे आम्ही त्याला श्रद्धांजली वहातो.....

येताना (उतरताना) वाट चुकलो.
एकतर जंगल, निसरडी वाट शोधण्याचा वायफळ प्रयत्न, आणि एवढा वेळ 'अस्वल दिसलं तर काय करायचं' याची मी बिल्ट-अप केलेली भिती यामुळे माधुरी प्रचंड घाबरली. पण माझा अनुभव असा कि दोन पैकी एक माणुस घाबरला कि दुसरा आपोआप शूर होतो!
शूर वगैरे ठीक, वाट लगेच सापडली आणि सूर्यास्ताच्या आत खाली पोचलो हे ही ठीक, पण खरंच अस्वल दिसलं असतं तर काय केलं असतं - हे इमॅजिन करुनच भिती वाटते.

अस्वल दिसण्याची भिती वाटली तर काय करावं?
अस्वल शोधण्याचा प्रयत्न करावा.
ऍटॅक द प्रॉब्लेम!
'ऍटॅक द प्रॉब्लेम' वरुन व.पुं. ची एक कविता आठवली. ती त्यांच्या पुस्तकात होती हे आठवतंय, पण त्यांचीच होती का - याबद्दल शंका आहे.
शिवाय मी 'व.पु.' 'कोट' करतोय या विचारानेच मला 'अळणी' वाटतंय....असो.

बेदम आठवण आली तर काय करावं?
बेदम आठवण काढावी!
माळेचे मणी न मोजता
जपाची माळ ओढावी!

आणखी दोन कडवी आठवताएत, पण ते इथे फारसं रेलेव्हंट नाहिये.

हे सगळं आधी लिहिलेलं - का? ते आठवत नाही.
आज बेकारीचा चौथा दिवस - रोज एक ट्रेक वगैरे प्रकार काही झाला नाही.
दरम्यान 'सतरंजी' ने मी परत आल्यावर मला सिऍटल डाऊनटाऊन मधली एक बिल्डिंग फाऊंडेशन डिझाईन साठी द्यायचं ठरवलंय. आत्तापर्यंत ४ ब्रिजेस, हायवेज, काही छाट्छुट बिल्डिंग्ज याची फाऊंडेशन्स डिझाईन केलिएत, पण ही माझी पहिलीच 'हाय राईज' बिल्डिंग असेल. (हॉवर्ड रॉर्क च्या बरोबर नाय तर नाय - ऍटलिस्ट 'पाया'शी तरी पोचता येईल!)

गुरुवारी ऑफिसमध्ये ५ तासांचं फर्स्ट एड आणि सी.पी.आर. ट्रेनिंग अटेंड करायला गेलो होतो. तिथे अत्यंत सुत्ती (तेलुगु शब्द) जखमांपासुन ते - बोट तुटलं तर आधी बोट शोधा, मग ते बर्फात न ठेवता पाण्यात धुवुन खिशात ठेवा - असलं ट्रेनिंग.
तो मास्तर (जो दिवसा 'फायरफायटर' म्हणुन काम करतो आणि 'फावल्या वेळात' हे सगळे धंदे करतो) या सगळ्या गोष्टी इतक्या एकसुरात सांगत होता कि - मला वाटलं मी चुकुन 'इमर्जन्सी वॉर्ड' मधल्या नर्सेसच्या ट्रेनिंगसाठी वगैरे आलोय कि काय!
होपफुली जॉबसाईट वर या गोष्टी उपयोगात आणण्याची गरज पडणार नाही, पण ट्रेक्समध्ये चांगलाच उपयोग होऊ शकेल.

मी ऑल्मोस्ट विसरलोच सांगायला - ट्रेनिंगच्या वेळेस एक अत्यंत 'फ ट का' मुलगी माझ्याशेजारी येऊन बसली.
म्हणजे एसी, बीसी, एमसी वगैरे कॅटॅगरी नाही.
हिच्यासाठी मला नविन 'फ ट का' कॅटॅगरी ओपन करायला लागली.
आईशपथ सांगतो - मी तिथे आधी बसलो होतो. (बाबा - फॉर युअर काईंड इन्फॉरमेशन....)
मला मीटिंग्ज मध्ये बोर व्हायला लागलं कि मी डाव्या हाताने लिहायला लागतो.
माझा डाव्या हाताचा स्पीड कमी आहे, पण मी अगदी आवर्जुन डाव्या हाताने मी माझ्या शेजारी बसली होती हे लिहुन ठेवलं. म्हटलं घरी जाऊन माधुरीची 'य' चिडचिड करू.

या ट्रेनिंगमध्ये कुणाच्या घशात काही अडकलं तर काय करायचं याचं प्रात्यक्षिक आमच्या मास्तरने माझ्यावर केलं.
म्हणजे अगदी साग्रसंगीत!
मी आपला वर्गाकडे तोंड करुन उभा. (जनतेसमोर उभं राहिल्याने कान आपसुक तापलेले.)
मग तो मागुन येउन खांद्यावर हात ठेऊन म्हणणार - तू ठीक आहेस का? तुझी काही मदत करु का? वगैरे वगैरे.
मग - हे बघा, खोकत असलेल्या माणसाचा श्वास अडकलेला असेल, तो तुमच्याशी बोलु शकणार नाही.
असे त्याच्या मागे उभे रहा.
त्याच्या दोन पायांच्या मध्ये तुमचं उजवं पाऊल ठेवा.
मग त्याला त्याचे हात दोन्ही बाजूने उचलायला सांगा.
मग त्याला मागुन मिठी मारुन तुमचे हात त्याच्या पोटासमोर नेऊन पकडा.....

तोपर्यंत वर्गात खसखस पिकायला लागली होती.
मी त्याला म्हणणारच होतो कि - भाय मेरे, तुम आदमी तो ठीक टाईप के हो ना?
मला कळेना हा रॅगिंगचा वगैरे तर प्रकार नाही ना!
तेवढ्यात तो म्हणे - मग पकड घट्ट करुन दोन्ही हातांच्या जॉईंटने पोटावर जोरात हिसका द्या.
च्यायला घशात काय, पोटात अडकलेलंही बाहेर पडलं असतं!

मग तो म्हणे आता हेच प्रात्यक्षिक आपापल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीवर ट्राय करा!
प्रकाश पडायला एक क्षण अंमळ जास्तच लागला.
उजेड पडल्यावर एकाच क्षणात मला - तुताऱ्या, ताशे, ढोल, ड्रम्स सगळं ऐकायला यायला लागलं.
प्रात्यक्षिकावेळी वर्गासमोर उभं राहून तापलेले माझे कान आता आग ओकायला लागले.
आम्ही (म्हणजे आम्ही दोघेही) अवघडुन उभे.
हे कुठंही लिहायचं नाही हे माझ्या डाव्या हाताने उजव्या हातालाही सांगितलं!
कारण या प्रकारावरची माधुरीची चिडचिड मला जन्मभर पुरली असती.
मग मी कंबरेत किती वाकुन तिच्या पोटासमोर हात नेले हे माधुरीला आठवुन सांगताना आम्हा दोघांचीही हसुन हसुन पुरेवाट झाली!
त्या पोरीने अगदी मला विचारलंही - 'आरंट यू सपोज्ड टु बी क्लोजर टु मी?'
पण तिला बोलुन गेलो - 'इट्स ऑलराईट - यू गॉट इट, राईट?'
च्यायला असले अनुभव लग्नाच्या आधी का नाही येत! (प्रचंड चिडचिड)

आज बेकारीचा सहावा दिवस.
आज अख्तरची (जावेद - शोएब नव्हे) 'आज तीसरा दिन है' ही कविता आठवतिए.
काल 'डॉन' पाहिला.
'दिल चाहता है' च्या स्केल वर याला १० पैकी १० पॉईंट्स दिलेच पाहिजेत!!!
स्टोरी कळायच्या आत लवकरात लवकर हा पिक्चर बघुन घ्या. फरहान अख्तरने त्याच्यावर (मी) टाकलेला विश्वास सार्थ ठरवलाय़.
जुना 'डॉन' मला फारसा आठवत नाही, पण तो पाहुन याच्यापेक्षा जास्त आनंद झालेलाही आठवत नाही!
एका पॉईंटला तर मला एवढा धक्का बसला कि माझ्या 'व्हॉट?' वर चार लोकांनी माझ्याकडं वळुन बघितलं.

परवा लिहायचं होतं पण विसरलो - 'डिपार्टेड' पाहिला. जॅक निकल्सन पिक्चर मधे असल्यावर डि कॅप्रिओ, मॅट डेमन, ऍलेक बाल्डविन, मार्टिन शीन, या नावांची तशी गरज नसते.
ती का नसते हे निकल्सन या पिक्चर मध्ये सिद्ध करुन दाखवतो!
सांगायचा मुद्दा असा कि 'डॉन' ने 'डिपार्टेड' एवढंच खिळवुन ठेवलं!!
शाहरुख निकल्सन एवढा 'मोठा' ऍक्टर नसेलही, पण त्याने 'डॉन' अमिताभच्या तोडीचा केलाय यात शंकाच नाही!!!
कुणीतरी आतातरी या दोन्ही डॉन्सना घेऊन 'शक्ति' करा रे......

मंगळवार, ऑक्टोबर १७, २००६

तिथून पुढे

आज एका मीटिंग मधुन बाहेर बोलावुन आमच्या एच.आर. च्या बाईने मला घरी जायला सांगितलं!!!
सस्पेंशन!!!
माझ्या आयुष्यात नॉर्मल गोष्टी कधी होतच नाहीत का?
माधुरी ला मेसेज ठेवुन घरी आलोय, आणि दिवाळीसाठी शंकरपाळ्या करायच्या कि लाडू - यावर विचार करतोय.
आत्तातरी 'हाऊस हजबंड' ही कन्सेप्ट भयानक सुंदर वाटतिए!
दिवाळीसाठी भारतात जाउन यायची कन्सेप्टही चांगली आहे.
आधी एक बियर मारतो - म्हणजे विचारांत सुसुत्रता येईल. :)

इट वर्क्स!
माधुरीच्या ऑफिस मध्ये सतत 'मोराल बूस्टिंग' एव्हेंट्स चालू असतात.
परवा सामान आलं आणि आम्ही आपापली ढीगभर पुस्तकं आपापल्या ऑफिसमध्ये हलवली. (म्हणजे मी! माधुरी ने फक्त सूचना केल्या). रग्गड काम केल्यावर मला एक्स-बॉक्स (थोड्या वेळापुरता) आणि गारगार पेप्सीचं बक्षीस मिळालं. ते खेळत असताना मला अशाच कुठल्यातरी 'मोराल' इव्हेंट मध्ये उरलेल्या डझनभर बीयरच्या बाटल्या सापडल्या.
त्या मी शिस्तीत ढापल्या.
ऑफिस मधुन हाकलल्यावर घरी आलोय, शूजही न काढता खरोखरचा 'बेकार' बनुन फुकटची बियर पीत ब्लॉग लिहितोय.
मला सांगा - सुख म्हणजे नक्की काय असतं.....

फार टेन्शनची गोष्ट नाहिये - कंपनीच्या वकिलाने व्हिसा ट्रान्सफर ऍप्लिकेशन पाठवायला उशीर केला, आणि कंपनीने मी लवकर जॉईन व्हावं याची घाई. मी जॉईन झालोय याचा वकिलाला पत्ताही नाही. या नादात उगीच कॉम्प्लिकेशन नको म्हणुन कंपनीने आणि वकिलाने मिळुन मला थोड्या दिवसांपुरता घरी बसवायचा निर्णय घेतला.
आता या अनप्लॅन्ड व्हेकेशन मध्ये काय करावं हा सध्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न!
बाल्टिमोर मध्ये असतो तर घरी बसुन - दारु पीत, पिक्चर बघत आणि एखादं चांगलं पुस्तक वाचत - एन्जॉय केलं असतं. एक मिनीट - नाहीतरी मी आत्ता काय करतोय? बियर पीत माधुरीला २-४ पिक्चर आणायला सांगितलेत! चिकन रविवारी केलेलं - आज बटाट्याची सेक्साट भाजी करावी!

शूज काढायचा कंटाळा आलाय.
ते बायको कडुन काढुन घ्यावेत! (च्यायला - आयुष्यात यापेक्षा जास्त लाड काय असू शकतात?)
नको - असा काही उल्लेख जरी केला तरी लॉन्ड्री करावी लागेल.

पण ऍटलिस्ट वीकेंड ला केलेले दिवाळीचे प्लॅन्स - म्हणजे दारास तोरण, उंबऱ्याबाहेर रांगोळी, शंकरपाळ्या, झालंच तर एखादा आकाशकंदील, 'आयकिया'तुन आणलेल्या ढीगभर पणत्या घरभर लावता येतील.
नाहीतर खरंच आठवड्याभरासाठी भारतात जाता येईल. पप्पांना पुण्याला बोलावता येईल, नाहीतर आई-रंजू-पप्पांबरोबर गोव्यात दिवाळी करता येईल.
'मधुरा'ला तिकिट विचारलंय, बघुया उद्याच्या कॅरन आणि लॉयरबरोबरच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये काय होतंय ते!
गावाला आज्जींचीही तब्येत थोडी खराब आहे. आज्जी-बाप्पुंना काल एक छोटंसं पत्र पाठवलं.....
मी ३-४ वर्षांपुर्वी पाठवलेलं पत्र त्यांनी अजुन जपून ठेवलंय....

बाकी इतके दिवस शंका होती तो माधुरीचा 'एस्थेटिक सेन्स' भन्नाट निघाला - तिने घराची ऍरेंजमेंट अल्टिमेट केलिए. माझं एवढं सामान येऊनही कुठे गर्दी वाटत नाहिए. पण मला सगळ्यात जास्त आवडलेला प्रकार म्हणजे आमचं पुस्तकांचं कॅबिनेट!
माझी सगळी मराठी-इंग्लिश पुस्तकं व्यवस्थित बसली - वाईट गोष्ट म्हणजे फक्त नविन पुस्तकांसाठी जागा उरली नाहिए. परवा माधुरीची चिडचिड पत्करुनही नॉर्मन मॅकलीनचं 'अ रिव्हर रन्स थ्रु इट' आणि फोरसिथचं 'डॉग्ज ऑफ वॉर' घेतलं - त्या बदल्यात त्याच दिवशी मला माझी सगळी पुस्तकं लावायला मात्र लागली!

हात लांब करुन (सोयिस्करपणे) पहिलं पुस्तक हाताशी लागलं - 'सलील वाघ - निवडक कविता'.
त्यातली पहिली कविता -

तिथून पुढे

कधी आठवणीनी
पोनीटेल हेलकावत
जाणारी तू
डोळ्यासमोर आली की
एका झटक्यात शॉक सारखं
सगळं
डोळ्यापुढे तरळतं
कालपरवासारखं

कॉलेज
क्लास
परीक्षा
रिझल्ट
आयुष्य
मी
वाचन
चर्चा
वाद
पुस्तकं रॉय
आणि तत्वज्ञान

आणि ह्या सगळ्यांमधे
डेन्सर मिडियमकडून
जशा वेव्हज रिफ्लेक्ट होतात
तशा कविता
सगळंच

मुठभर हे श्वास
अजून रोखून ठेवलेत
तू आलीस की
मिळेल तो बिंदु पकडुन
पुन्हा जगायला श्रीकारापासून.

रविवार, ऑक्टोबर १५, २००६

मित्राचं पत्र!

हा आठवडा तुफान मिक्स्ड गेला.
तुफान काम आणि तुफान बोअर.
सिऍटल ला आलो, आणि टी.व्ही. ही किती जीवनावश्यक वस्तू आहे याची जाणीव झाली! नेट वर दिवसच्या दिवस कसा जातो - पत्ता लागत नाही. पण नेटवर कंपल्सरी टाईमपास करावा म्हणजे बोरच.
डिस्को आणि आयोडेक्स एअरपोर्टवर घ्यायला आलेले. लही गार-गार वाटलं.....
ते म्हणे - पहिला वीकेंड, तुमची सामान लावायची गडबड असेल, आपण पुढच्या वीकेंडला भेटू. सामान तर अजुन पोहोचलं नव्हतं, म्हणुन मग आम्ही 'राम गोपाल वर्मा' (आमचा कॅसेटवाला - 'रामू' सारखा दिसतो म्हणुन इथुन पुढे तो रामू) च्या 'मयुरी' मधुन 'ओंकारा' आणुन पाहिला.
आवडला.
'सरत घोडोंपे लगाते है सेरोंपे नहीं....' - खलास.....
'ओंकारा'ने अपेक्षा खूपच वाढवुन ठेवलेल्या, पण आनंदाची गोष्ट म्हणजे त्याने अपेक्षा पूर्ण केल्या. अगदीच खोड काढायची तर विशाल ने 'हाय इंपॅक्ट' सॉंग्जवर थोडी अधिक मेहनत घ्यायला हवी.
टी. व्ही. नसल्याने मग 'कंपनी','दीवाना मुझसा नही' (!), आणि एकदाचा 'मुन्नाभाई' पाहिला. अभ्याने त्याच्या पोस्टवर त्याबद्दल लिहिलयच, त्यामुळे इथे उगीच जागा अडवत नाही.
पण आवडला.
भरभरके.

खरं तर एवढं मागच्या आठवड्यात लिहिलेलं, पण पोस्ट पूर्ण करायला वेळ मिळाला नाही.
मागच्या आठवड्यात वेळ नव्हता, तर या आठवड्यात विषय!
तरी नमुद केलंच पाहिजे ते म्हणजे -
शुक्रवारी संध्याकाळी घरी येताना माधुरी रामू कडुन 'कभी अलविदा ना केहना' आणि 'डोर' घेऊन आली. जनतेने शिव्या घातल्याने 'अलविदा...' चं धाडस बरेच दिवस केलं नव्हतं. 'डोर' बद्दल थोडं बरं वाचलं होतं, शिवाय कुकुनूर वगैरे... पण त्यालाही हात लावला नव्हता.

'अलविदा...' फालतु पिक्चर आहे हे माहिती होतं, पण आणलाय तर बघु म्हटलं.
हा आता फालतु होईल, मग होईल, करत वाट बघत राहिलो, आणि पिक्चर सुंदर संवाद, संवेदनशील हाताळणी वगैरे वगैरे च्या जोरावर चांगलाच 'इन्व्हॉल्व्ह' करत गेला! इतरांच्या वैयक्तिक मतांबद्दल आदर बाळगुनही - मला पिक्चर आवडला.
'डोर' बद्दल सांगायचं झालं तर - एवढा सुंदर पिक्चर मी बरेच दिवसात काय, बऱ्याच वर्षात पाह्यल्याचं आठवत नाही.
नितांत सुंदर.
वर्णनच करवत नाहिये.
नागेश कुकुनूर चे पाहिलेले सगळेच पिक्चर आवडले, पण हे प्रकरण काही वेगळंच आहे.
पाहिलाच पाहिजे असा चित्रपट.
मी कॅसेट विकत घेऊन संग्रही ठेवणार आहे. गुल पनाग ला आधी एकदा पाहिलं होतं, चांगली ऍक्ट्रेस आहे, पण आयेशा तकिया हे एक अफलातून प्रकरण आहे.... आणि श्रेयस तळपदे - वा, क्या बात है.....

शिफ्टिंग करताना राहुल चं एक पत्र सापडलं.
राहुल - सॉरी, तुला न विचारताच ते इथे पोस्ट करतोय. पण एका जुन्या पत्रांच्या पेटीत तुझं पत्र सापडलं आणि चार वर्ष लहान झालो. खरं तर कुठली गोष्ट 'मिस' करत हळवं वगैरे होत बसण्याचा माझा स्वभाव नाही, पण हे पत्र तुझी उणीव जाणवुन गेलं.
पत्रास उत्तर पाठवल्याचं लक्षात नाही, तू पत्रोत्तरासाठी पानभर 'पॉइंट्स' देऊनही!
त्यातला पहिला पॉइंट म्हणजे -
'तू मधे एका मैत्रिणीबद्दल लिहिलं होतं.
ते पेटलं कि विझून गेलं?'
हाहाहा - वाचून मौज वाटली! २००२, म्हणजे अजुन माधुरीला भेटलो नव्हतो, त्या काळतली कुणी मैत्रीणही आठवत नाही, म्हणजे नक्कीच विझून गेलं.....

२२ मार्च २००२,

डियर अभि,

आज महाशिवरात्र.
ताप आलाय.
दिवसभर घरातच बसून आहे.
त्यामुळे माझ्या घरात सर्वत्र शांतता.
ताप आला कि ते २-३ दिवस मी एखाद्या काळाच्या लहानशा बेटावर असतो.
शांत.
एकटा.
आगापीछा नसलेला.
या दिवसात घरातच थांबल्यामुळे खूप प्युअर वाटतं.
जगाच्या स्वार्थी उद्योगांपासून दूर. शांत.
पण हे २-३ दिवसच ठीक आहे. जगात असं अधांतरी राहून उपयोग नाही. कधी ना कधी प्रवाहात सामील व्हावंच लागतं.

आज शेजारच्या इमारतीभोवतालचं रान साफ केलं. छोटी-मोठी सगळी झाडं तोडून टाकली. काय उपयोगी, काय निरुपयोगी हे ठरवणारे आपण कोण? तरीही आपण ती जबाबदारी उगीचच आपल्या खांद्यावर घेतो. असंच एक ना अनेक.

तुला हे सगळं खूप स्लो (विलंबित ख्यालासारखं) वाटत असेल. पण आपण - आपल्या आत - आपलं भोवताल हेच सगळं असतं. फक्त आपण ते नीट बघत नाही सवड काढून. ज्याला स्वत:ची कंपनी बोर होत नाही त्याचं उत्तम चाललंय असं समजावं.

तू खूप फिरलास, खूप पाह्यलंस, आता कसं वाटतंय? यशस्वी झाल्यानंतर. मनासारखं?

इकडे सामाजिक चित्र खूप बोअर आहे. अयोध्येवरून परत पेटणार असं दिसतंय. वाजपेयी महंतांशी फक्त चर्चा करतायत. हे महंत पाहिले की थेट रामाच्या काळातले वाटतात. केव्हापासून आंघोळ राहिलिय त्यांची. असो.

अनंत सामंतांचं 'अविरत' वाचलं.
'त्रिमाकाली मादाम' पण वाचलं.
तू?
अविरत बद्दल थोडंसं -
'अविरत' एक हारलेली कादंबरी वाटते. भरकटलेली पण नाही म्हणणार. हारलेलीच. विराज लॉस्ट इन लाईफ वाटतो. फक्त सामंतांच्या जीवनावेगासाठी शेवटपर्यंत वाचली. तुला काय वाटलं होतं ते कळव. त्यामानानं त्रिमाकासी मादाम खूपच जमीनीवर आहे. आवेग कमी. पण रिऍलिटी आहे. अस्तित्ववाद वगैरे.

फोटो पाह्यले. आवडले.
तू खरंच विमान उडवलंस?

टेस्ट छान. माझा स्कोर ५६ आला.
पटलं बरचसं. खूपच.
पण हे लोक निगेटिव्ह पॉइंट्स डायरेक्ट सांगत नाहीत. धार खूप कमी करतात. नॉन-पॉझिटिव्ह म्हणता येईल.

संदीपची नविन कॅसेट आली - तरुणाई.
मिळली का? कुणी येणार असेल तर सांग. पाठवुन देईन. एक दिवाळी अंक पण पाठवायचाय. सेतुबंध. बरचसं ट्रान्सलेटेड मटेरिअल आहे. कथा आहेत. रेन-मॅन ची स्टोरी आहे. वाचताना तुझी आठवण आली. आता अशा भरभरून स्टोरीज सांगायला कोणी नाही.

आई-बाबा मजेत.
विद्याला मुलगी झाली. संदीपलाही मुलगी झाली.
बायको छान. आता कुठं सूर जुळायला लागलेत. (वादी-विसंवादी) म्हणजे अजुन जुळवणी चालूच आहे. बहराच्या प्रतिक्षेत आहे. आता कुठं पालवी फुटायला लागली आहे. खूप काळजी घेते माझी. त्यामानाने मीच अपुरा पडतो. तुला माहितिये माझी बेफिकिरी नडते.

तुटक-तुटक लिहितोय ना? सहज विचार येत नाहीत. त्यामुळे खूप गोष्टी अर्धवट होतात. काही उपाय?
कविता पण खूपच कमी. तुला पत्रात दरवेळी एक नविन द्यायची असं ठरवुयात.
आता ही एक...

जिवंत रहाशीलच तू कुठेतरी
या जगाच्या पाठीवर.
याबाबतीत झुरळानंतर
माणसाचाच नंबर लागतो.
पण मित्रा नुसतं जिवंत राहुन भागत नाही.
जिवंत असण्याची खूण सापडावी लागते.

काल रात्री आकाश पाह्यलंस?
नाही? परवा....तेरवा.....
गेल्या किती रात्री आकाशाकडे नजर लावून
शांत किंवा अस्वस्थ झालास?
तर ती एक जिवंत असण्याची खूण आहे.

रातराणी.... रातराणी म्हटल्यावर काय आठवतं?
मदमस्त गंधाळलेल्या
किती धुंद रात्री आठवतात?
तर ती ही एक जिवंत असण्याची खूण आहे.

पैसा.... हो मिळवला कि
नाव.... हो येतं कि छापून अधुनमधून पेपरात.
कविता.... हो बारा संग्रह छापून झाले.
एखादी कविता उराशी गच्च कवटाळून
मरावंसं वाटलं का कधी?
ती ही एक जिवंत असण्याची खूण आहे.

कवितेचं पुस्तक चाळतोस का अधुनमधून
त्यातल्या कवितांवर आपण केलेल्या खुणा
पाहतोस का कधी डोळे भरून?
मग एक मोठा श्वास घेऊन मिटतोस का पुस्तक
आणि सहन न होऊन वाचायला घेतोस का
आजच्या ताज्या घडामोडींचं वर्तमानपत्र
- ही मरायला टेकल्याची खूण आहे.

तेच पुस्तक चाळत चाळत कधी शेवटी-शेवटी पोचलास
आणि जाळीदार पिंपळपान पाहून हळुवार झालास
तर हाक दे....
मी अजुन तिथंच आहे....
तशीच.... तुझी वाट पहात!!

यावेळी एवढंच.

- राहुल.

ता.क. लवकर उत्तर लिही.
पत्र आणि कवितेवर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

राहुल - पानभर 'पॉइंट्स' अजुन समोर आहेत, रेलेव्हंट आहेत (पहिला पॉइंट सोडून दॅट इज...), चार वर्ष पत्रोत्तराच्या दिरंगाईसाठी थाप तरी कुठली शोधणार? त्यामुळे आता 'ओल्ड फॅशन्ड' पत्रच लिहितो!

भेटुच....

गुरुवार, सप्टेंबर २८, २००६

टिंब टिंब.

नाव - बाल्टिमोर
उच्चार - बॉल्टिमोर
लोकसंक्या - तीसेक
स्थापना - ११ सप्टेंबर २००४
शेवट - २९ सप्टेंबर २००६
ठळक घटना - अयोद्ध्या आणि तिचा राजा, बाल्टिमोर मराठी, लग्न, वेशीवरचे मन्या - निल्या, दाई, पी.जे....आम्ही बर्फात सोडलेलं त्याचं रिग, डॅनी, देवळातले जोशी बुवा, घर....
.
.
.

एकेक
नाते
तुटत
जाते
काय
उरावे
मागे
उगी
जपावे
इथले
तिथले

हुरहुरणारे धागे .........

मंगळवार, सप्टेंबर २६, २००६

व्हर्चुअल x धन्या = रिऍलिटी

घर मोकळं.
मोकळं म्हणजे - कंप्लिट मोकळं!
काल दुपारी सामान हलवलं तेव्हा लक्षात नाही आलं, पण संध्याकाळी घरी आल्यावर 'उजेड' पडला कि घरात अंधार आहे.
स्वैपाकघरात आणि रेस्टरूममध्ये दिवे होते, पण इतर घराचं काय?
या दोन-तीन मोकळ्या दिवसांसाठी स्टीफन किंग चं 'थ्री सीझन्स' वाचायला ठेवलेलं, पण उजेडाअभावी ते शक्य नव्हतं. (शिवाय ते वाचत रेस्टरुम मध्ये तरी किती वेळ बसणार म्हणा....)
डायनिंग रूमचा बल्ब गेल्याला बरेच दिवस झालेले, पण तो बदलायला पुरेशी स्फुर्ती नव्हती.
आता बदलुया म्हटलं तर घरात एक खुर्चीही नाही.
पण आता स्फुर्ती तर भरपूर....
मग म्हटलं काहीही करुन हा बल्ब लावायचाच.
रिकामे कार्डबोर्ड बॉक्स एकमेकांवर रचून वानरपराक्रम करत त्या डुगडुगणाऱ्या बॉक्सेस वर चढलो आणि एकदाचा बल्ब लावला.
स्विच ऑन केल्यावर पुन्हा एकदा 'प्रकाश' पडला कि बल्ब पुर्वीच गेलेला.
च्यामारी.....
मग लाथा मारुन बॉक्सेस इकडे तिकडे फेकले.
मग ते पुन्हा एकत्र करून त्यांचं पिरॅमिड करुन बघत बसलो.

खामोशी का हासील भी इक लंबी सी खामोशी है....!

च्यायला - कशाला या फंदात पडा, वेड लागेल!
मग म्हटलं परवा सुरु केलेलं एक 'पिल्लू' कंप्लिट करु......

-----

गब्बर विस्कॉन्सिन चा.
त्याला या एरियामध्ये (मी आणि दाई सोडुन) एकही मित्र नाही - इनफ़ॅक्ट आम्हीही त्याला शक्य तितकं टाळतोच.
परवा त्याच्याशी गप्पा मारत होतो त्यावेळेस असाच विषय निघाला - मी त्याला म्हटलं कि माझा अगदी जवळचा मित्र डी.सी. मध्ये रहातो, पण त्याला भेटायला झालं नाही दोन वर्षात. तो म्हणाला कि - देन यु शुड मीट हिम बिफोर यु लीव्ह.
मग मनावर घेतलं कि काहीही करुन या वीकेंडला धन्याला भेटायचंच.
शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधुन निघताना त्याला मेसेज ठेवला कि अजुन डी.सी. मध्ये असशील तर भेटायचं का?
शनिवारी सकाळी त्याचा मेसेज कि भेटुयात.
शनिवारी संध्याकाळी भेटायचं ठरलं.
शुक्रवारची संध्याकाळ आणि आख्खा शनिवार पॅकिंग करत बसलो, पण मूव्हर्सनी टांग मारली. बहुतेक मंगळवारी किंवा बुधवारी सामान पाठवुन देईन. बरं झालं टी.व्ही. पॅक नव्हता केला, नाहीतर उगीच जनतेला फोन करून पीळ मारत बसलो असतो.

दोन वर्षांपुर्वी बाल्टिमोर ला आलो तेव्हा धन्या डी.सी. मध्ये आहे याचं लही भारी वाटलं होतं! मधे चार वर्षांच्या गॅप नंतर आम्हाला परत रेग्युलरली भेटता येणार होतं.
आल्याआल्या तिसऱ्याच आठवड्यात भेटलोही!
त्या दिवशी ऑफीस मधुन मला माझा भलाथोरला करकरीत फोर्ड एफ-१५० ट्रक मिळालेला.
इथे ट्रक म्हणजे मोठ्या जीप सारखा प्रकार असतो. भारतात माझ्या साईट वर डंपर वरती ड्रायव्हिंग शिकलेलो, पण ट्रक कधी चालवला नव्हता. रँडी म्हणाला या वीकेंड ला कुठेतरी फिरुन ये, म्हणजे प्रॅक्टिस होईल. म्हटलं चला, धन्याला इंप्रेस करू. मग आम्ही रीतसर 'गटारीचा' प्लॅन केला. त्याच्याकडे पोचलो तर तो खाली येऊन उभाच होता. पार्किंग कुठे करू म्हटलं तर तो म्हणे लाव रे कुठेही! पार्किंग लॉटच्या गर्दीत मुश्किलीने तो ट्रक बसवून आम्ही वर गेलो. मग हाइनिकेन बरोबर आमटी भात वगैरे खात त्याच्या गॅलरीत गप्पा रंगत गेल्या.
गप्पा आणि हाइनिकेन.
आणि करोना.
मग बडवायजर.....
त्याच्या घराशेजारी बहुतेक जंगल वगैरे असावं, कारण डोळे फाडुनही बाहेरचं काही दिसत नव्हतं. (ते कदाचित रात्र होती म्हणुनही असेल. किंवा दारु!). शेजारच्या बिल्डिंगमधल्या पोरांची गाणी त्या जंगलात घुमुन आम्हाला ऐकु येत होती. त्यांना टसल म्हणुन आम्हीही जोरजोरात गाणी म्हणायला लागलो.
मधे कधीतरी धन्याचा चिंकु रूममेट आला. त्याचं इंग्लिश कळण्यासारखं होतं, म्हणुन त्याचं कौतुक वाटलं. त्याला संदिपचं 'एवढंच ना....' भयंकर आवडलं - अगदी वन्स मोर मिळण्याएवढं!
हळुहळु शेजारच्या बिल्डिंग मधली पोरं दमली, तशाच आमच्या गप्पाही पेंगायला लागल्या.....
मागच्या चार वर्षांचा बॅकलॉग भरल्यावर आम्ही जुन्या जखमांच्या 'आय डोंट नो यु डोंट नो' गप्पांवर जायला लागलेलो.....
तेवढ्यात माझी अंगठी खाली पडली!
भें.....डी.
तीन मजले!
ते पण खालच्या झुडुपांत!!
धन्याला म्हटलं - 'चल खाली. शोधू.'
तो म्हणे - 'येडा ए का? इथुन बेडरुम पर्यंत जाता येईल का नाही माहीत नाही. खाली जरी पोचलो तरी वर कसे येणार?'
खाली अंधार.
त्याच्याकडे टॉर्च नाही.
एकतर बिड्या पण आम्ही काड्या पुरवुन पुरवुन ओढत होतो.
पण प्रॉब्लेम जसजसे वाढले तसतसं आम्हाला ती अंगठी शोधणं लही भारी वाटायला लागलं!
गेलो खाली.
वर नक्की त्याची गॅलरी कुठली, तिथुन मला किती झुडपं, किती मोठी, कुठे दिसली वगैरे 'ग्लोबल पोजीशनिंग' झाल्यावर शेवटच्या बिडीसाठी एक काडी 'रीजर्व्ह' करुन अंगठी शोधायला लागलो. चार वेळा 'मटके' मारल्यावर पाचव्या काडीवर अंगठी सापडली!
मग वर जाण्याआधी खालीच पार्कींग लॉटमध्ये शेवटचा झुरका मारायचं ठरलं.
धन्या बिडी पेटवेपर्यंत मी बळंच इकडेतिकडे बघायला लागलो.
'भेंडी - धन्या, ट्रक कुठंय?'
'असेल रे.'
'यडा हे का? अरे इथंच तर लावला होता!'
कितीही चढली तरी ट्रकची कार होत नाही हे (अनुभवावरुन) माहिती होतं.
रॅंडी, दशरथ, तीन आठवड्यापुर्वी सुरू केलेला जॉब, परवाच टाकलेलं एच-वन चं ऍप्लिकेशन पाव सेकंदात तरळून गेलं!
खचलोच!!
धन्या ढिम्म.
'धन्या - फोन आणलायस का? ९११ कॉल करू.'
धन्या आपला झुरके मारत - 'सापडेल. टेंशन नको घेउ.'
'अरे टेंशन नको घेउ म्हणजे काय? च्यायला कुणी ढापला असला तर?'
'टो झाला असेल. इथे करतात नेहमी.'
'नेहमी म्हणजे काय? घरी बोअर झालं कि लोकांचे ट्रक टो करतात काय इथे?'
'अरे इथे फक्त रेसीडंट्स पार्किंग आहे. कुणाला पार्किंग मिळालं नसेल, त्यानं फोन केला टोइंग सर्व्हिस ला. उद्या मिळेल. जाउ आपण आणायला.'
'अरे पण तुच म्हणालास ना - कुठेही लाव!'
'मला काय माहित टो करतील!'
'......!'
धन्या फुल कॉन्फ़िडन्सने असली वाक्य टाकतो तेव्हा समोरचा कुठलाही माणुस माझ्यापेक्षाही मोठा 'आ' वासतो हे मी लहानपणापासुन बघत आलेलो.
मग आम्ही पार्किंग लॉट मधल्या एका फलकावरुन टोइंग कंपनीचा फोन नंबर घेऊन त्यांना फोन केला. ट्रक त्यांनीच नेलेला.
दुसऱ्या दिवशी मग यथावकाश तो परत आणणे वगैरे.....

पण त्यानंतर दोन वर्ष धन्याला भेटायला झालं नव्हतं!
गब्बरला एअरपोर्टवर ड्रॉप करुन फोनवर धन्याला 'पार्क ऍंड राइड' मध्ये गाडी पार्क करायला सांगितली.
गळाभर भेटलो तर 'य़ु. एस. ला गेल्यावर लोकांनी म्हटलं पाहिजे - भारतातुन कुणी सांड आलाय' म्हणणाऱ्या धन्याची तब्येत दोन वर्षांत खराब झाल्यासारखी वाटली.
डायेटिंग करतोय म्हणाला.
तो हल्ली बिडीवरुन 'सिगार' वर घसरलाय (कि चढलाय)!
मग 'आय नो यु डोंट नो, यु नो आय डोंट नो' गोष्टी करत आम्ही माझ्या ऑफिस मध्ये गाडी पार्क करुन 'अकबर' ला गेलो. 'ताजमहल' बरोबर चिकन विंदालू आणि मटण बिर्यानीवर तुटुन पडलो.
जेऊन दमल्यावर 'लोवेनब्राऊ' चा सिक्स पॅक घेऊन इनर हार्बर ला फिरायला गेलो.
तिथे जातानाही धन्या जुन्याच कॉन्फिडन्स ने - लाव रे कुठेही, कोण बघतंय म्हणत होता, पण मी 'ब्लॉक' च्या मागे रीतसर पार्किंग मध्ये गाडी लावली.
इनर हार्बर मला भयानक आवडतं. ईएसपीएन झोन, हार्ड रॉक कॅफे, शेजारचं बॅंबू हाऊस, ऍक्वेरियम, मग कॅलिफोर्निया पिझ्झा किचन ने सुरू झालेली रांग आयमॅक्स पर्यंत चालू रहाते. माधुरी आणि मी वेळ मिळेल तेव्हा इथे यायचो. आणि तिथे पार्क केलेल्या हरतर्हेच्या 'याच' मधुन फिरायची स्वप्नं बघायचो. इथे रात्री उशिरापर्यंत 'लाईव्ह म्युजिक' चालू असतं.
परत आलो तर 'ईल्लिगल पार्किंग' साठी तिकिट मिळालेलं!
धन्या बरोबर असला कि काहीही शक्य असतं.
हा एक मित्र असा आहे कि त्याला इतर मित्रांएवढं कधी भेटलो नाही, पण त्याची प्रत्येक भेट लक्षात राहिली.
त्याचा तो 'एनिथिंग इज पॉसिबल' कॉन्फ़िडन्स.
नियतीने कितीही मारली तरी तिच्याच छाताडावर बसुन वर दोन रट्टे लावण्याची जिद्द....
खिशात पैसे नसताना, कुणाचाही वरदहस्त डोक्यावर नसताना त्याने सहा वर्षांपुर्वी 'अलका' जवळच्या दुचाकी पुलावर पान खात त्याचा भविष्याचा प्लॅन सागितला, तेव्हा धन्यावर भयंकर विश्वास असुनही - मला काळजी वाटली होती!
कशात काही नसताना, खिशात धमक नसताना - 'धन्या सांगतोय ना शक्य आहे, मग शक्य आहे' च्या विश्वासावर मी ही अमेरिका गाठलेली. तो २ ऑगस्ट ला निघालेला, म्हणुन पुढच्या २ ऑगस्ट ला.....
हल्ली धन्या 'व्हर्चुअल रिऍलिटी' मध्ये लही भारी काम करतो.
मला त्यातलं काही कळत नाही, पण २००२ चा 'बेस्ट रिसर्च पेपर इन यू.एस.', टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, सकाळ - यातल्या त्याच्या मुलाखती त्याचं काम सिद्ध करतात.
त्याच्या कडे पाहिलं कि त्याचा 'लॉ ऑफ ऍव्हरेजेस' सिद्धांत पटतो.
त्याचा सिद्धांत आणि तो.
आयुष्यातल्या प्रत्येक 'व्हर्चुअल' सिद्धांताला केवळ जिद्दीच्या जोरावर 'रिऍलिटी'त आणु शकणारा हा माणुस माझा मित्र आहे - हे जाणवुन माझं मलाच बरं वाटतं.
त्याच्याशी अशा अनेक भेटी वारंवार व्हाव्यात - दर वेळी पार्किंग साठी दंड झाला तरीही....

शुक्रवार, सप्टेंबर १५, २००६

दशद्वार

समर ऑफ नाइंटी सिक्स.....
पहिल्या सेम च्या डिस्टिंक्शन च्या जोरावर घातलेला धुमाकुळ.
परिक्षेच्या अल्याड-पल्याड वाचलेली - कळ्या नि सत्यजित ने दिलेली - 'दशद्वार से सोपान तक', 'आमचा बाप अन आम्ही', 'काजळमाया', आणि 'द फाउंटनहेड'.
मिन्ना शी अविदा च्या राजीनाम्यावर झालेले वाद.
भाबडं ऊन नि एकट्या कविता....

आज मिन्ना ची माझ्या शाळेचा पर्यवेक्षक झाल्याची मेल आली आणि कधीकाळी वाचल्या पुस्तकासारखा 'समर ऑफ नाइंटी सिक्स' ओझरता दिसला.

आंबेडकरांबद्दल खराखुरा आदर 'आमचा बाप...' ने शिकवला आणि - जो मणक्यात हरतो तो खरा 'दलित' - हे ही. शाळेत वडापावची ऐपत नसताना आंबेडकरांच्या 'दिवसाला एका सॅंडवीच वर पीएचडी' ची 'जय भीम - कुठंही हिंड' च्या जोशात प्रमाणाबाहेर टवाळी करायचो. अस्पृश्यतेवर मात करुन कोलंबिया युनिव्हर्सिटीतून पोलिटिकल सायन्स आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी मिळवलेला हा माणुस भारतात परतुन फक्त कायदा किंवा राजकारण नव्हे तर सोम्यागोम्याचं आयुष्य कसा पालटवु शकतो हे या पुस्तकात आणि आजुबाजुच्या अनेक मित्रांत दिसलं.
आज दळभद्री कारणं सांगुन भारतात परतायचं टाळणाऱ्या माझ्यासारख्या माझ्यांची कीव आली आणि 'दलित' झाल्यासारखं वाटलं.

'काजळमाया' ने प्रचंड डिप्रेशन आणलं.
'अजुन बरेच वर्षे जी.ए. वाचायचा नाही' हे ठरवून नि पाळूनही 'काजळमायाची काजळी' अजुन जिथे तिथे सापडते. काजळमायाची काजळी आणि फाउंटनहेड चा उजेड!
हे पुस्तक वाचताना आलेली 'धिस इज इट' ची भावना आज इतके वर्ष टिकेल हे तेव्हा सांगुनही खरं वाटलं नसतं!!
हरिवंशराय बच्चनच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडाचं नाव 'दशद्वार से सोपान तक'!
दशद्वार त्यांच्या पहिल्या घराचं नाव - सोपान शेवटच्या.

पण आजचा विषय ही पुस्तकं नाहिच.
काल माधुरीला आमच्या नविन घराच्या चाव्या मिळाल्या.
गुल्टी प्रथेप्रमाणे तिने तिच्या बहीण आणि मेव्हण्याबरोबर नविन घरी जाऊन दूध उतू जावू देवून वगैरे 'वास्तुशांत' केली.
मग फोन वर तिची अखंड बडबड - इथे असं आहे, तिथे ते ठेऊ, खुर्च्यांची कव्हर्स, शेजारी कोण रहातं, बाहेर झाडांची दाटी किती, तुझे जुने कपडे आणि बाथरुम मधलं मॅट आणलंस तर खबरदार!
माझा सगळ्याच गोष्टींत जीव अडकतो. (च्यायला हे कंफरटर - रेड क्रॉस, विशाल, सिध, अजित आणि मागच्या चार वर्षांत घरी आलेले अनेक मित्र एवढा प्रवास करुन माझ्यापर्यंत पोहोचलंय....ते काय असंच टाकुन द्यायचं?)
तिच्या सगळ्या गोष्टींना हो हो म्हणुन मी ते मॅटच काय घरातली रद्दीही घेउन सिऍटल ला जायचा विचार करतोय!
तिला कॉन्व्हर्सेशन मोनोपोलाइज करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हैदराबाद ला जाताना तिच्या (न पिणाऱ्या) बाबांसोबत स्टील च्या ग्लासातुन कशी हेयवर्ड-५००० पिली याची 'रोमहर्षक' गोष्ट सांगितली. आश्चर्य म्हणजे तिलाही ती खरी वाटली! असं कुणी हळुच 'बाटलीत' आल्यावर धमाल येते!!
मग तिला म्हटलं - चल आपल्या नव्या घराला एक छान नाव देऊ!
तिला काही सुचेना.
ती म्हणे 'अभिजित-माधुरी' म्हणुयात.
च्यायला हे काय नाव झालं?
त्यापेक्षा त्याचा शॉर्ट फॉर्म करुन 'अधुरी' म्हणू वगैरे विनोद झाले.
मग तिला म्हटलं 'दशद्वार' ठेऊ!
तिला त्यामागची गोष्ट सांगितली.
बच्चन.
मधुशाला.
'दशद्वार'.
'सोपान'.
आणिही सुचेल ते.
तिलाही नाव आवडलं....

आमचं 'सोपान' कुठे असेल - माहित नाही.
या घराला दहा दारं नसतीलही -
पण या घराला सुखाच्या, एकमेकांबद्दलच्या आदराच्या, प्रेमाच्या दाही दिशा खुल्या राहो ही 'स्थपती' कडे प्रार्थना.

शनिवार, सप्टेंबर ०९, २००६

'बाकी शून्य' बद्दल -

जून मध्ये आमच्या शेवटच्या भेटीत राहुलने आवर्जून 'बाकी काही घे न घे - हे पुस्तक घेच' चा आग्रह केला आणि घेउन आलो.
'एम टी आयवा मारु' (पुन्हा), 'फाईव्ह पॉइंट समवन', आणि 'दा विन्सी कोड' च्या नादात महिना उलटला.
एकट्यानेच चिपोटलेत लंच ला जायचा कंटाळा आला एका रविवारी म्हणून मग 'बाकी शून्य' घेउन गेलो.
पहाटे तीन वाजता वाचून संपलं (संपवलं नाही) आणि 'वाचलेच पाहिजे असे काही....' च्या लांबलचक यादीत हे पुस्तक मानाचं स्थान मिळवुन बसलं.
काल ट्युलीपने हे पुस्तक हाणून पाडलं आणि 'खेद वाटला - आश्चर्य नाही' ची सवयीची भावना निर्माण झाली.

मला 'मोठा झालो' ही जाणीव लई सूख देउन जाते. लहाणपण त्रासाचं होतं अशातला भाग नाही, पण एकतर रात गई, बात गई - निघुन गेल्या काळाबद्दल किती झुरायचं - ही एक बाजू आणि दुसरी म्हणजे (आई पप्पांनी तुफान स्वातंत्र्य देउनही) हजार रेस्ट्रिक्शन्स वाटायची. म्हणजे आजुबाजुला भरपूर माणसं दिसायची, पण कळायची नाहीत. ही माणसं मोठी आहेत, पण त्यांनी त्यांच्या लहानपणी काय (काय) केलं असेल याबद्दलची उत्सुकता वाटायची. मग हीच माणसं कुठलीतरी 'भयानक कृती' करायची - म्हणजे (जनरली) प्रेम, लग्न, परिक्षा न देणं अथवा नापास होणं अथवा कमी टक्के पाडणं (मोठ्यांच्या द्रृष्टीने एकुण एकच), नोकरी सोडणं, आत्महत्या अथवा व्यसनं (हे ही एकुण एक) - आणि मग इतर सगळी मोठी लोकं एकत्र येउन यांना (युजुअली पाठीवर) शिव्या घालायची. हे 'भयानक कृती' करणारे लोक असं का करतात याबद्दलही आश्चर्य वाटायचं पण मी लहान असल्याने लोक मला 'फुल स्टोरी' सांगत नाहीत हे माहिती असायचं.
कसं वागायला पाहिजे चे धडे घेताना - 'मीच का?' आणि 'असंच का?' बरोबरच 'सगळेच असंच वागतात का?' याबद्दल भयानक (आणि रास्त) शंका वाटायची. 'कुठे जात आम्ही पुढे काय आहे' याबद्दल तुफान कन्फ्युजन व्हायचं.

त्यामानाने मोठा झाल्यावर धमाल असते - अभ्यास केल्याचे पैसे मिळतात, (माझ्या) उरल्या वेळेत काय करावं (हे मला) हे सांगणारं कुणी नसतं, तसंच कुणाशी कसं वागावं, काय पहावं, वाचावं, ऐकावं, खावं (प्यावं) हे ही. घरापासून दूर राहिल्यावर नात्यांचा बागुलबुवा ही नसतो. आयुष्य 'क्रुज कंट्रोल' वर टाकून छंद जोपासता येतात.
पण तरीही - आजुबाजुची माणसं अजुनही कळत नाहीत.
अमर्याद स्वातंत्र्यातही टोचायला लागल्यावर मीच माझ्यावर घातलेली बंधनंही जाणवायला लागतात.
पण फरक म्हणजे - (अभ्याच्या भाषेत) वाढत्या वयाने असेल कदाचित, पण आता ही लोकं आणि त्यांची आयुष्य 'कन्फ़्युजींग' न वाटता 'फॅसिनेटिंग' वाटायला लागतात. म्हणजे कळ्याने (मेरिट लिस्ट गाजवूनही) इंजिनियरींग कंप्लिट का केलं नसेल, अजेयचा संन्यास, सौरवचं स्वत:वर सुऱ्याने वार करून घ्यायचं वेड.....

परवा बाबाला फोन केला.
तो म्हणे 'हजारों ख्वाईशें ऐसी' बघतोय.
इतर कुठला पिक्चर असता तर त्याला तो बंद करायला लावला असता, पण 'हजारों...' मुळं 'दोन तासाने फोन करतो' म्हटलं.
बाबाचं एक चांगलं आहे - तो एक उत्कृष्ठ श्रोता आहे.
त्याने - मामा, तुला या पिक्चर मध्ये (एवढं) काय आवडलं? विचारलं आणि पुढचे दोन तास ऐकत बसला.
मला त्यातली 'इनएव्हिटॅबिलिटी' आवडली.
पिक्चर मधलं सत्तरच्या दशकातलं वातावरण, संगीत, अभिनय (चित्रांगदा....कहर), संवाद अल्टिमेट आहेतच, पण हा पिक्चर हजार ठिकाणी 'घसरू' शकला असता - तो घसरू न देणं - हे श्रेय दिग्दर्शकाचं.....
हे हे असं असं झालं.
बास.
आता त्याचे जे जे अर्थ लावायचे - ते तुमचे तुम्ही लावा.
हा एक 'ऍडल्ट' पिक्चर आहे - तो 'पर्सेंटेज ऑफ स्किन' साठी नव्हे तर 'पर्सेंटेज ऑफ सेन्सिबिलिटी' साठी.

'हजारों....' चं विषयांतर 'इनएव्हिटॅबिलिटी' च्या उदाहरणासाठी.
'बाकी शून्य' मला असंच 'इनएव्हिटेबल' वाटलं.
बऱ्यापैकी सुखी (श्रीमंत नव्हे) घर, शाळा, (मध्ये मेरिट), कॉलेज, इंजीनियरींग, नाटक पिक्चर चा छंद, यशस्वी नोकरी, युपीएस्सीची तयारी इथपर्यंत सरळसोट मार्गाने आलेला एक तरुण व्यसनाधीन होतो आणि संन्यास घेतो. यादरम्यान त्याच्या डोक्यात असणारी सेक्शुऍलिटी....
पुस्तक न वाचलेल्या परिक्षकांनो - या दोन वाक्यांवर तुमची पानभर परिक्षणं लिहा.
डोक्याला झंझट नको असलेल्या लोकांनो - या माणसाला चूत्या समजा व पुढे चला.
वाचनाचं वेड असलेल्या लोकांनो - असलं काही 'वाईट' वाचून तुमचं 'चांगलं' वाचण्याचा हुरुप वाढावा म्हणुन तरी हे पुस्तक वाचा.
पुस्तक विकत घेउन वाचणारांनो - तुमचं अभिनंदन.

या दोन वाक्यांच्या अधेमधे पाचशे वीस पानं घडतात.
'काजळमाया'ची सुरुवात जी.ए. थोरौच्या ज्या 'इफ अ मॅन डजंट कीप पेस विथ हिज कंपॅनियन्स - परहॅप्स - ही हिअर्स अ डिफरंट ड्रमर' वाक्यानं करतात, त्या वाक्यातला ड्रम या पाचशे वीस पानांत ऐकू येतो.
एस.एल.भैरप्पा जे मनमंथन करुन व्यक्तिरेखा - आणि कन्नड साहित्य - मराठीच्या 'कैक तीर पल्याड' घेऊन जातात - ते मंथन या पाचशे वीस पानांत घडतं.
कळ्या, अजेय, सौरव, आशा, दाई, सुभाष दादा, राधिका - जे कन्फ़्युजन देतात ते ही पानं काही अंशी उलगडतात.
यातल्या नायकाचं आयुष्य स्टिफन किंगच्या 'रीटा हेयवर्थ ऍंड शॉशॅंक रिडेम्प्शन' च्या ताकदीनं रेंगाळतं.
यातला नायक मला माझ्यात आणि माझ्या प्रत्येक मित्रांत दिसतो - जो मला 'कोसला'तही दिसला होता.
हे पुस्तक ऍडल्ट आहे यात वादच नाही - पण ते स्किनसाठी नव्हे तर सेन्सिबिलिटी साठी त्याहुनही जास्त त्याच्या इनेव्हिटॅबिलिटी साठी.....
या 'दोन वाक्यी' तरुणाची 'पाचशे वीस' पानी 'फुल स्टोरी' सांगुन हे पुस्तक मला 'मोठं' करतं.....

इती.

मी पुस्तक परिक्षक नाही.
या पुस्तकाचं एकही परिक्षण मी वाचलेलंही नाही.
एवढं सगळं - तुम्हाला पुस्तक आवडावं यासाठी नाही.
होता है, चल्ता है, दुनिया है - कधी कुठलं पुस्तक आवडुन नावडतं, नावडुन आवडतं, 'हर कुत्तेका दिन होता है' सारखं 'हर किताब का दिन होता है'.
आणि नाहीच आवडलं तरी 'परहॅप्स वी हिअर अ डिफरंट ड्रमर' ही शक्यता उरतेच ना?

त्या शक्यतेस.....चिअर्स!

रविवार, सप्टेंबर ०३, २००६

हे योद्ध्या.....

मागच्या महिन्यात लास व्हेगास एअरपोर्ट वर रात्र जागून काढावी लागली तेव्हा आवर्जून फोन करुन रंजूला 'तुझ्या गावात' आहे हे सांगितलं होतं......

नेहमीप्रमाणे तू दु:ख देउन गेलास - ९२ मध्ये विंबल्डन जिंकुन आणि आज यु.एस. ओपन मध्ये हरुन.....
तुझ्या जिंकलेल्या प्रत्येक सेट वर २५ जोर मारुन उपयोग झाला नाही. तू तिसरा सेट घेतल्यावर - उद्या काहिही करून 'फ्लशिंग मेडोज' वर रॉडिकशी मॅचच्या वेळी असेन असा नवस बोलुनही.....

तुझा शेवट अटळ होता.
तुझ्या प्रत्येक पावलावर अश्रु - विधिलिखित होते.
पण मागचा आठवडाभर तू जिवापाड झुंजलास.
तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेसा.......

तू म्हणालास - हा स्कोअर बोर्ड सांगतोय मी हरलो, पण तुम्ही मला जिंकवलं........
तुला काय माहित - तू आवडूनही तुझा प्रत्येक पराभव मी कसा 'प्रेडिक्ट' केला होता.......
तुझं करियर.
तुझं पहिलं लग्न.
तुझं टक्कल.
आणि जेव्हा तू 'डाउन ऍंड आऊट' होतास तेव्हा मी तुला कसं 'हाऊ ऑब्व्हियस!' म्हणुन वगळून टाकलं होतं.
तुझ्यासाठी - मॅव्हरिक, बॉर्न गॅंब्लर, बस्ट - अशी विशेषणं तयार ठेवली होती........
पण तू -
तू लॉजिक डिफाय करत, लढत, खेळत, जिंकत राहिलास!
तुझ्या युद्धात स्कोअरबोर्ड होता -
माझ्या युद्धात नव्हता, नाही.
असता तर बहुतेक मॅचेस मध्ये पाच-पाच सेट्स, टायब्रेक्स, तुझ्यासारखा बेसलाइन प्ले आणि कुणास ठाउक तुझ्यासारखी झुंज दिसली असती.....
प्रेडिक्शन्स डिफाय करत माझीही लढाई चालू आहे.
सांगायचा तेव्हा माझा स्कोअरबोर्ड सांगायचं ते सांगो, पण तू मला वेळोवेळी जिंकवलंस.....जिओ!

बेशिस्त बुद्धिमत्तेला वश करुन जिद्दिच्या बळावर जग जिंकता येतं - तू शिकवलंस.
तुफान फाइट मारुनही पराभव झाला तर (आणि विजय झाला तरीही) 'इट्स ओ.के. टु क्राय' - तू शिकवलंस.
वेळोवेळी राखेतुन झेप घेऊन - 'जीवनाबद्दल उमेद बाळगा - जीवन तुम्हाला उमेद देईल' हे वचन 'स्वगत' मध्ये खोटं पाडणाऱ्या दळवींना हरवता येऊ शकतं - तू शिकवलंस.
भल्याभल्यांशी भिडून तगता येतं - तू शिकवलंस.
ओव्हरअचीव्हिंग पोरीशी लग्न करुन जगता येतं - तू शिकवलंस.
आणि हे सगळं निकोप मनाने करता येतं - हे ही तूच शिकवलंस.

आज तू आमचे आभार मानलेस - तुझी स्वप्नं पहायला तुला आमच्या खांद्यावर उभं राहू दिल्याबद्दल.....
पण त्या बदल्यात तू आम्हाला वेळोवेळी जी उमेद दिलीस, त्राग्या, त्रासातून आई-पप्पा, रंजू बरोबर (जेवणं खोळंबवून) जे क्षण दिलेस, आणि थरथरती वात तेवायला जी धगधगती मशाल दिलीस - त्याबद्दल - तुझे आभार!

२१ वर्ष मॅन.....
मला 'कळायच्या आधीपासुन' लढणाऱ्या योद्ध्यांपैकी तू शेवटचा.
शेवटचा पॉइंट जिंकणारा जिथे विजेता ठरतो अशा खेळात आज शेवटचा शब्द तुझा!

लढ.

सोमवार, ऑगस्ट २८, २००६

कुण्य़ा दोघांची भ्रमणगाथा

अगासीने तिसरा सेट घेतला!
ले भेंचोत!!
लढ!!!
अमेरिकन ओपनच्या पहिल्याच राऊंडमध्ये पावेल शी लढताना दोन सेट टायब्रेक मधे १-१ झाल्यावर तिसऱ्यात आन्द्रे ४-० मागे पडला, तेव्हा त्याच्याबरोबरच माझाही इतिहास डोळ्य़ांसमोरुन तरळून गेला. २१ वर्षांपुर्वी तो खेळायला लागला तेव्हा मी टेनिस कधी बघितलंही नव्हतं.
जेव्हा बघायला लागलो तेव्हा डाइव्ह्ज मारुन पॉइंट घेणारा बोरिस बेकर भयंकर आवडायचा. मग त्याची जागा लेंडलने घेतली. थोडे दिवस स्टिफन एड्बर्गचाही (अभ्याच्या भाषेत) पंखा झालो. मग कुरियर.
दुसर्य़ा बाजूला स्टेफी मनावरची अनभिषिक्त साम्राद्नी झाली होती. (आणि आजतागायत तिची जागा कुणी घेऊ शकलेलं नाहिये - बायकोचा 'सन्माननीय' अपवाद सोडून दॅट इज....)
आंद्रेला तसा पाहिला होता, आणि तो लक्षातही राहिला होता, पण मुख्यत: त्याच्या पोनीटेलमुळे.
९२ च्या विंबल्डन फायनलमधे त्याने गोरान इव्हानिसेविक ला हरवलं तेव्हा खरं तर सूतक बरेच दिवस लांबलं होतं. इव्हानिसेविक पुढे विंबल्डन फायनल ला जात राहिला आणि हरत राहिला - जिंकेपर्यंत.
कुरियर मध्येच कुठेतरी गायब झाला. होता तोवर जबरा होता.
सॅंप्रास आला आणि हजामापासुन सुरू होऊन गळ्यातला ताईत झाला.

चौथ्या सेट मधे अगासी ३-० पुढे आहे.
लवकर झोपायचं ठरवूनही मॅच सोडवत नाहिये आणि अगासिच्या विजयाच्या वेगापुढे लिखाणाचा वेग कमी पडतोय.

९० च्या सुरुवातिला अगासी नजरेत आला, अपेक्षेप्रमाणे चमकला आणि अपेक्षेप्रमाणेच भरकटला.
९२ च्या कॉंपिटिशन सक्सेस रिव्ह्यू मधला त्या वेळच्या विंबल्डन विजेत्या अगासी आणि स्टेफीचा बॉलरुम डान्सचा ब्लॅक अऍंड व्हाइट फोटो मात्र पुढे कित्येक वर्ष (खरं तर स्टेफी साठी) टेबलावर राहिला.
ब्रुक शील्ड्स आली.
गेली.
गेलेले केस परत आले नाहीत.
तो 'डाऊन ऍंड आऊट' झाला तेव्हा त्यानं खरी ओढ लावायला सुरुवात केली.
अभ्या, बाबा - तुम्ही लोक म्हणता तसं कदाचित माझ्यातलं (तुमच्या मते) इन्हेरिटंट पेसीमिज्म त्याला कारण असेल कदाचित!

अगासी ४-१.
अगासी ५-१.

'भेंचोत हरणार नाय' ची जिगर, बेशिस्त बुद्धिमत्ता, रिबेल वृत्ती.....

अगासी ५-२ सर्व्ह करतोय आणि रडतोय!

अगासी जिंकला.
ले!!!!!!!!!!!!!!!!!!

लंबी खामोशी.....आणि - ब्लिस.

खूप लिहायचंय.
नक्कीच लिहीन, पण हे पोस्ट केलंच पाहिजे!

शनिवार, ऑगस्ट २६, २००६

नातिचरामि

ट्युलीप ने आठवण करुन दिल्यावर लही उत्साहाने लिहिलेल्या माझ्या मागच्या पोस्टचा कंटेंट अभ्याने हाणुन पाडला.
मग वैताग येऊन पोस्टच डिलीट करुन टाकला.
एकतर च्यामारी मागच्या महिनाभरात तीन वेळा आख्खी अमेरिका फिरताना मेघना पेठेंचं 'नातिचरामी' वाचुन डिप्रेशन मध्ये गेलेलो. बायको भारतात, चारपैकी कुठला जॉब घ्यायचा यावर विचार करकरून डोक्याचा भुगा, 'मी जॉब सोडतोय लवकरच' हे सांगितल्यावर खचलेल्या 'दशरथ' ला पाहून मलाच वनवासात जावंसं वाटलेलं, मग नियमीत दारु सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न......
हे सगळं असं ठरवून एकत्र अंगावर आलं आणि ऑफिसमध्ये बसवेना.
बाहेर पडलो.
कोपर्यावरच्या बबनकडून सिगरेट घेतली.
बाहेर सावलीत उभा राहुन सिगरेट मारु म्हटलं तर एक म्हातारा बबन भीक मागितल्यासारखं काहितरी पुटपुटला - त्याला मानेनंच नाही म्हटलं.
तर तो परत मागे येउन त्याच्या आयुष्यातले इथ्यंभूत प्रॉब्लेम्स सांगायला लागला.
मलाही काम-धंदा नव्हता, म्हणुन ऐकत बसलो.
खरं तर निदान त्याला तरी त्याचं मन मोकळं करता येतंय याचंच जास्त बरं वाटलं.
त्याला शेजारच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये 'करी चिकन' जेवू घातलं.
परत आलो तर 'रामे' निघालेला.
आज त्याचा शेवटचा दिवस.
जन्मापासुनची पस्तिस-चाळीस वर्ष - अगदी शाळा, कॉलेज, दोन नोकर्या आणि दोन लग्न - बाल्टिमोर मध्ये काढलेला हा सहा फुटी धिप्पाड जिम्नॅस्ट का कुणास ठाउक पण सगळं बेचबाचके बायकोच्या गावाला - कॅनडातल्या ओटावाला - मूव्ह होतोय.
च्य़ायला तो पिंकीला बॅज रिटर्न करत असताना त्याच्याकडे बघवलं नाही.
आज दशरथ सांगत होता कि (डॉ.) सूरी सव्हीस वर्षांनी पहिल्यांदाच भारतात गेलाय! (डॉ.) नेसिक एकदा अजितला म्हणालेला - फॅमिली आणि फ्रेंड्स साठी भारतात परत जाणार असशील तर त्यात काही पॉइंट नाही. कारण फॅमिलीला तू कधीही इकडे आणू शकतोस - रक्ताची नाती कधीच दूर जात नसतात. फ्रेंड्सचं म्हणशील तर - व्हेन यू गो बॅक, दे आर आयदर नॉट देअर ऑर दे आर नो लॉंगर युअर फ्रेंड्स!
च्यायला वाक्य ऐकून अंगावर शहारा आला होता.....
मग सूरी भारतात का गेला असावा?
शिवेवरच्या मरिआईच्या पायावर डोकं टेकवायला, म्हसोबाला नारळ फोडायला, बैलगाडीच्या उरल्या चाकाकडे बघत रडणार्या पोपट्याला बघायला कि दादांच्या काठीने उंची मोजायला?

च्यामायला - करोगे याद तो हर बात याद आयेगी......

पहाट होतिये.
'सेहर' मध्ये अर्शद वारसी म्हणतो कि - सूरजकी पेहली किरणे जब तनपर पडती है, तो मन कि थकान दूर होती है!
बघुयात.

गुरुवार, ऑगस्ट २४, २००६

(नमूद केलेच पाहिजेत असे काही -
(डॉ.) आशिष - मेसेज मिळाला - पण नतद्रष्टाला रिप्लाय करायला वेळ (कि वंगण) नाही!
माया - 'माझीको माझी न रहने दिया तो.....' वर अडकून पडलोय.
अमित - यू आर दि मॅन - थोडि कळ काढ.
सिध - (तलाश व्हायची तेव्हा होवो पण) चर्चा जारी)

सोमवार, जुलै ३१, २००६

स्पॅघेटी ते बरिटो 'बोल'

वीकेंड चांगला गेला.

शुक्रवारी मीच अजित ला म्हटलेलं कि घरीच जेवू. बटाट्याची भाजी करीन.
तो सहाला निघाला पिट्सबर्गहून, पण मला ऑफ़िसमधून निघता निघता आठ वाजले. तिथुन पुढे (मागच्या महिन्याभरात न केलेली) ग्रोसरी, मग तांदुळ विसरलो म्हणून परत हेलपाटा, घरी येउन बटाटे उकडायला ठेवले तेवढ्यात लक्षात आलं कि (माधुरी ने वारंवार आठवण देउनही) टोमॅटो प्युरी राह्यली. तोवर हे लोक बेल्टवेवर पोचलेले. अजित 'चिपोटले' मध्ये जाण्यात फार उत्सुक नव्हता. देसी रेस्टॉरंट मध्ये मी. अजितला जबरा भूक लागलेली. घरही आवरायचं होतंच. मग म्हटलं उगीच घाई करण्यापेक्षा पटकन होईल अशी स्पॅघेटी करावी. (न विसरता आणलेली) बिअर आणि स्पॅघेटी मस्त बेत होइल.

हल्ली मी स्पॅघेटी छान करायला शिकलोय. पुर्वी नूडल्स सारखी करायचो. फूड नेटवर्क वर बघून बघून बर्याच सुधारणा होतायेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात - फोडणी टाकुन कांद्याच्या आधी ढोबळी मिरची थोडी बारीक चिरुन फ्राय करायची. मग थोडा मोठा कापलेला कांदा (लांब नव्हे, मोठा) थोडा कच्चा राहिल असा फ्राय करायचा. आलं लसुण तव्याला चिकटून काळे पडतात, त्यामुळे तिकडे लक्ष द्यायचं, बाजुला स्पॅघेटी शिजत असतेच. मग काय - थोडा मसाला, भरपूर स्पॅघेटी सॉस, मीठ - स्पॅघेटी वाईट होऊच शकत नाही. पुढच्या वेळेस रेड वाइन मध्ये मॅरिनेट केलेलं चिकन वापरायचा विचार करतोय. मीटबॉल वगैरे अजून करता येत नाही म्हणून बीफ ची भूक चिकन वर....
बॅकग्राऊंडला छान गाणी, निवांत केलेला राजमा अथवा चिकन, हाताशी असणारी, जिभेवर (अजुन) विरघळणारी, पॅलेट मध्ये रेंगाळणारी लालचुटुक मर्लो, मी सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवतोय याकडे लक्ष द्यायला माधुरी असेल तर दुधात साखर!....
स्वैपाक बनवणे 'कॅन बी अ व्हेरी रेलॅक्सिंग एक्सपीरियन्स'!!
कधी बायकोला कामाच्या रगाड्यातून सुट्टी देऊन असा प्रकार करुन पहा.....मर्लो काय मार्गारिटाचीही परवानगी मिळेल!!!

टी.व्ही. वर पकाउ कार्यक्रम आणि थोडा 'मुन्नाभाई' बघत जेवण झालं. मग रात्री उशिरापर्यंत गप्पा. मी पुढच्या ब्लॉग वर काय लिहिणार याबद्दल अजित आणि विकी चे तर्क ऐकुन मात्र मजा आली. अजितचं सकाळ संध्याकाळ पल्लवीला 'हाजरी' देणं चालू होतं. तिला ह्याचे (हार्ड ड्रिंक्स ने) सर्दी घालवण्याचे प्रकार ऐकून नक्कीच टेंशन आलं असणार.

शनिवार उशिरा उजाडला.
मी उठेपर्यंत दोघंही तयारही होऊन बसलेले.
तिघांनाही खूप (बफे शिवाय न भागणारी) भूक लागलेली -
अजित (सद्ध्या) नॉनव्हेज खात नाही, म्हणून चायनीज कटअप. मला तो उर्मट मालक आवडत नाही म्हणून 'इंडिया पॅलेस'. म्हणून मग 'अकबर' ला निघालो होतो ते 'काठमांडु किचन' ला पोचलो! (जाते थे जापान पहोंच गये चीन समझ गये ना!). मग (सहनाववतू सहनौ भुनक्तु म्हणुन) मटण, चिकन, (अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी) बटाट्याची भाजी, पालक पनीर, खीर, गुलाबजाम असा (खाते पिते घरके बढते बच्चोंका) आहार करून बाहेर पडताना चालवंत नव्हतं.

तिथुन निघून गनपावडर फॉल्स जवळच्या माझ्या आवडत्या स्टील ट्रस ब्रिज कडे निघालो ते एका दाट जंगलानं वेढलेल्या तळ्यापाशी जाऊन पोहोचलो. (परत एकदा - जाते थे जापान.....).
फोन वर बोलता बोलता अजित जंगलात हरवला! (म्हणून याला आम्ही कुठे नेत नाही.)
जंगलात!
ते ही फोन वर बोलत!
मग - 'जातोय कुठे? येईल' म्हणत मी आणि विकी तळ्याकाठी बदकं आणि बगळे बघत बिडी मारत बसलो.
परत निघालो ते आम्हीपण गंडलो. च्यायला अजित माझी चप्पल घालून फिरत होता म्हणून मी माझी (लग्नातली) कोल्हापुरी घालून बाहेर पडलेलो. (असं जंगलात हरवणार माहित असतं तर शूज नसते घातले?). मग चपलांवरून घसरत गाड्यांच्या आवाजाच्या दिशेने जात मध्येच दाट जंगल साफ करून आकाशातून पडलेल्या मीटिऑरॉईड सारख्या दगडाजवळ पोहोचलो.
विकीने हात देऊन वर खेचलं.
तेवढ्यात फोन वाजला.
त्या किर्र जंगलात उंच दगडावर उभं राहुन (फोन वर) बोलताना मला टारझन झाल्यासारखं वाटलं!
फोन वर अजित.
'अभ्या कुठंयस?'
'मला माहित नाय मी कुठंय, तुला काय कप्पाळ सांगू?'
एका कानात अजित तर दुसर्यात विकी - 'आवाज आवाज' कि असंच काहीतरी - म्हणत ओरडत होता.
मग अजित 'अभ्या थोडा हाल' म्हणाला.
तो कुठंय माहिती नसल्याने मी शंकरपाळी शेप मध्ये चारी दिशांनी हललो.
मग 'दिसला दिसला' ची आरोळी. (दोन्ही कानात).
अजित आमच्या पासुन ३०-४० फुटांवर. मध्ये थोडा उतार आणि त्यावर गवत. पण त्याला आमच्यापर्यंत पोचायला १० मिनिटं लागली.
मधेच तो 'अरे अभ्या मधे पाणी दिसतंय' म्हणाला.
'च्य़ायला पाण्यातल्या मगरी वगैरे नाही का दिसत?' म्हणायची हुक्की मनातच ठेवत त्याला येऊ दिला.

तिथुन निघून मग अंकलकडुन 'बीईंग सायरस', 'डरना जरुरी है', मॅंगो ज्यूस आणि 'पॅडोनिया लिकर्स' मधुन जॅक डॅनियल्स चा खंबा घेऊन घरी आलो.
टी सी एम वर 'ट्वेल्व्ह ऍंग्री मेन' लागलेला. मी अजुन हेन्री फोंडा चा वाइट पिक्चर बघायचोय, पण हा म्हणजे ड्रामा मधला कहर पिक्चर. विकी ने पाहिला नव्हता. मग अजित ने झोपून, मी पेंगत आणि विकी ने जागून - तो पिक्चर बघितला. मग तो संपल्यावर यथासांग चर्चा. पिक्चर मधल्या जाणकार लोकांसोबत चांगला पिक्चर पाहून त्यावर चर्चा - सारखा आनंददायक प्रकार नाही. (बर्याचदा मीच सगळ्यात जाणकार असल्याने तो प्रकार मलाच जास्त आनंद देतो हा प्रकार वेगळा).

मग 'बापरे - वेळ कमी आहे!' करत खंबा, स्प्राईट, तीन ग्लास, (वरच्या कप्प्यात सापडलेला दोन महिन्यापुर्वी भारतातून आणलेला) चिवडा.....सॉरी - चकणा. (आम्ही चिप्स खात नाही. आमचे वजन कमी करण्याचे - अर्थात अयशस्वी - प्रयत्न चाललेत.)
जोडीला 'डरना जरुरी है' हा तद्दन मल्टिप्ले़क्स पिक्चर.
चढत असलेल्या नशेला पिक्चर साथ देईना म्हणून मग अजित ने काल उकडलेल्या (आणि अजून मायक्रोवेव्ह मध्येच असलेल्या) बटाट्यांचे चिप्स (कि असलेच काहीतरी) करायचे ठरवले. मन लावून (एकावेळेस एक) बटाट्याचे तुकडे तळणाऱ्या अजित कडे पाहून कंटाळा आला म्हणून मग मी (आयत्या) ऑडियन्स ला कमलेश वालावलकरच्या 'बाकी शून्य' चे उतारे वाचून दाखवले. (हे पुस्तक 'कोसला' च्या तोडीचं आहे यात शंकाच नाही. च्यायला हा काय, तो सलील वाघ काय किंवा ते नेमाडे काय - मराठी वरणभाताला न पचलेली ही दुर्दम्य स्वप्न आहेत.) असो.
मग थोडं 'रारंग ढांग'.
थोडं 'राधेय'.
मग महाभारतकालीन पुराणकथांवर चर्चा. (इथे माझी नेहमीच गोची होते - मला 'सीरीयसली' पांडवांची नावं 'आठवायला' लागतात).

मग विषय बदलत - पुरेल का? कि आणखी आणायची? आधी बियर पिऊ मग व्हिस्की - म्हणजे चढेल वर चर्चा करत गाडी पुन्हा 'भूक' स्टेशनावर.
मग चकण्यापेक्षा भूक महत्वाची यावर एकमत होऊन (भावी) चकणा म्हणून उकडत (अजित च्या भाषेत उकळत) असलेल्या अंड्यांची - अजित च्या हातची लाजवाब अंडाकरी! (पराग याला बैदा करी म्हणायचा.)
मग रात्री कधीतरी (होश तळ्यात मळ्यात होत) 'सायरस' च्या साथीत झोप.

रविवार नेहमीसारखाच उदास उजाडला.
आमच्या आधीच (परत) भूक हजर.
अजितला शचीचं काही सामान द्यायचं होतं, म्हणुन मग 'चिपोटले'त कार्निटाज घालून बरिटो बाउल (शचीच्या भाषेत 'बरिटो बोल') ओरपून अजित आणि विकी परतीच्या मार्गाला लागले आणि मी 'द रोड्स....', झोप, बायकोशी (फोनवर) गप्पा आणि उरलेली दारु संपवणे या वीकेंडच्या नेहमीच्या कामांमागे लागलो.

दरम्यान शनिवारी सत्यजित ला मुलगी झाली.
इला - छान नाव ठेवलंय त्याने.
सत्यजित, अनघा आणि इला.....तुम्हा तिघांचेही अभिनंदन!