Thursday, September 28, 2006

टिंब टिंब.

नाव - बाल्टिमोर
उच्चार - बॉल्टिमोर
लोकसंक्या - तीसेक
स्थापना - ११ सप्टेंबर २००४
शेवट - २९ सप्टेंबर २००६
ठळक घटना - अयोद्ध्या आणि तिचा राजा, बाल्टिमोर मराठी, लग्न, वेशीवरचे मन्या - निल्या, दाई, पी.जे....आम्ही बर्फात सोडलेलं त्याचं रिग, डॅनी, देवळातले जोशी बुवा, घर....
.
.
.

एकेक
नाते
तुटत
जाते
काय
उरावे
मागे
उगी
जपावे
इथले
तिथले

हुरहुरणारे धागे .........

3 comments:

  1. आज आठ महिन्यानंतर हे पोस्ट वाचतोय आणि याच्या ’पोरकेपणाबद्दल’ माझं मलाच वाईट वाटतंय!
    गंमत आहे खरी - माझ्या पोस्टला माझीच कमेंट....
    तशी कुणाची कमेंट न मिळाल्याचं दु:ख नाही - लिहिलं तेव्हाचे क्षण जबरा प्रायव्हेट होते....
    इनफॅक्ट - कुणाच्या अवांछित सहानुभुतीची कमेंट आली असती तर मीच पेटलो असतो.
    खरं तर माझ्या पोस्टला माझी कमेंट हा खरा स्वसंवाद.

    जी.एं.ची एक गोष्ट आठवतेय -

    लाल डोळ्यांचा तो पिवळा पक्षी अखेर माझ्या हातावरच आडवा झाला. त्या लाल डोळ्यांनी मोकळे निळे आभाळ आणि हिरव्या पानांतली ती काळी गोड फळे पाहिली होती. आता त्यावर काळाचा एक पातळ पडदा पसरला.
    त्या लाल डोळ्यांच्या पिवळ्या पक्षाला मी परसात पुरले आणि त्यावर एक फुलझाड लावले.
    काही दिवसांनी त्यावर एक जांभळे शालीन फुल उमलले.
    ती एकदा घरी आली असता, मी तिला ते जांभळे फुल दाखवले आणि त्या लाल डोळ्यांच्या पिवळ्या पक्षाची गोष्ट सांगितली.
    काळ्याभोर भरल्या डोळ्यांनी तिने ते जांभळे शालीन फुल खुडुन केसांत माळले आणि ती त्या घरातुन निघुन गेली.
    पुढे मी ही ते घर सोडले.
    त्या लाल डोळ्यांच्या पिवळ्या पक्षाची आठवण त्या जांभळ्या फुलाला होती.
    ती गेल्यावर तिची आठवण मला आहे.
    मी गेल्यावर माझी आठवण कुणाला राहील का?
    रहावी.
    रहावी.
    रहावी....

    -----------------

    आजही....त्या धाग्यांची आठवण मला आहे.

    राहील.

    ReplyDelete
  2. Kusumgunja ("Nirop"???) madhalya hya oli kharach sundar ahet. Post poraka rahoo naye mhanun Swami madhlya hya oli. :)

    G.A.na donhi hatanni salaam.

    तू असाच वर जा.
    अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.
    तुला जर फुले येतील -
    आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फुले यावीत व त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.
    तुला जर फुले येतील, तर अश्या सहस्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.
    तुला जर फळे येतील-
    आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सूर्यप्रकाशाचा एक एक कण सतत सुखाने नांदत राहावा.
    तुला जर फळे येतील, तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पाहा. कारण तू अश्या अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.
    मग तुझ्या बीजांची फळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणाएवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.
    त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक एक कण प्रकाशीत केला आहे.
    आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर तू त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखाच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटतं आहे. जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून पुन्हा ते आडवे उघडले व पानाचा आरसा केला; किंवा कधी तुझे पिवळे फूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखून घेतली; अगर तुझे एक लाल फळ खुडून ते दोन बोटात चेंगरत रसाचा लाल धागा काढला, तर त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.
    कारण, कुणास ठाऊक, अब्जामध्ये एक आढळणारे असे ते मूल असून ते देखील भोवतालच्या अजस्र भिंती फोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.
    आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.
    म्हणून तू त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.
    एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही,
    एक फूल गेल्याने तुझे सौंदर्य उणे भासणार नाही.
    एक फळ नाहीसे झाल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.
    इतके वैभव तुला आहे. इतके वैभव तुला मिळो!
    या साऱ्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एक पान म्हणजे माझा एक एक श्वास आहे. म्हणून तू म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.
    मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या करंज्यांप्रमाणे वर आलो आहे, हे देखील इतरांना कळू दे.
    म्हणून तू असाच वर जा.

    ReplyDelete
  3. अल्टिमेट योगेश!

    जिओ!!

    ReplyDelete