Saturday, February 17, 2007

पचपन खंबे लाल दीवार

चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी
मी कोण आणि कसा होतो
हे मला आठवणारच नाही.

चक्रव्यूहात शिरल्यानंतर
मी आणि चक्रव्यूह यात
फक्त होती जीवघेणी जवळीक

हे मला कळणारच नाही.
चक्रव्यूहाबाहेर पडल्यावर
मी मोकळा झालो तरी
चक्रव्यूहाच्या रचनेत फरक पडणारच नाही.
मरावं कि मारावं
मारलं जावं की जीव घ्यावा
याचा कधीच निकाल लागणार नाही.
झोपेतला माणूस
झोपेतून उठून जेव्हा चालायला लागतो
तेव्हा स्वप्नातलं जग
त्याला पुन्हा दिसणारच नाही.

निर्णायक प्रकाशात
सगळं सारखंच असेल का?
एका पारड्यात षंढत्व
दुसऱ्या पारड्यात पौरुष
आणि तराजूच्या काट्यावर
नेमकं अर्धसत्य?

- दिलीप पुरुषोत्तम चित्रे (एकुण कविता - २)

भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात?
कुठलंही नातं चक्रव्यूहासारखं का भासावं?
कि प्रत्येक नातं भयानक मोहक असतं - ज्याचे धडे गर्भातच मिळतात - आणि बाहेर आल्यावर नुस्ती एका नात्यातुन दुसरीकडे ओढाताण, फरफट?
अर्धसत्यापासुन स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सत्य-असत्याच्या भेदाने एवढं कन्फ्युजन का व्हावं?
जगातल्या - आणि स्वत:तल्याही - पीटर कीटिंग्जचा कुठल्याही हॉवर्ड रॉर्कवर एवढा खार का असावा?
मन मनास उमगत नाही - आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा - हातास कसा लागावा?

गर्भाशयात असह्य झालो
की बाहेर
तिथं असह्य नकोसे झालो
की अजुन पुढे
तिथे तिथूनही सर्वत्र
बोचू नाही म्हणून
अजून अजून
पुढे पुढे पुढे
लांब लांब लांब दूर होत
गर्भाशयापासून अगोदरच्या प्रत्येक

सहन करुन शकत नाही
हे सगळं स्वत:सकट
आवडीनिवडीच्या हवाल्यावर
नेहमीच आपलं अस्ताव्यस्त गबाळ
आखडुन घ्यायला बघतो
वेळ आल्यावर म्हणून
होऊ शकत नाही
आपलं समूळ स्थलांतर
दुसरीकडे

एकदम एखाद्या परग्रहावर जाईन
मी त्यापेक्षा फट्कन
सगळं नवं अपरिचित कोरं
वस्तु व्यक्ती त्यांचे प्रकार वेगळे
लैंगिकतेच्या प्रजननाच्या पद्धतीही
विनिमय चलनवलन चालीरिती व्याख्या वेगळ्या
नवी नाती मूल्यं धेयं जातीपाती नीतिरचना
यशापयश सुखं दु:खाच्या कल्पनाही वेगळ्याच
वेगळ्या संवेदना, अनुभव तो घ्यायच्या पद्धतीही
ज्ञान-अज्ञान वेगळं
संवेदनांच्या फल:श्रुतीच वेगळ्या
विश्वाच्या श्रेयाच्या ज्ञानाच्या न्यायाच्या
सौंदर्याच्या करुणेच्या कल्पनाच
वेगळ्या त्यांच्या जागाही

तिथं थियरींच्या थापा कशा मारतील
तिथं शोध कसे लागतील
तिथं कविता कशा करतील
वाङ्‍मय कसं असेल
विषय काय असतील
मृद्‍गंध कसा असेल तिथं पाऊस
पाणी एच२ओ च असेल असं नाही
पदार्थ रेणूसूत्रं अणुभार अणुक्रमांकही कसे?
हायब्रिडायझेशनच्या बॉडिंगच्या
एनर्जीस्टोरेज-डिस्ट्रीब्यूशन-कक्षा
सुद्धा कशा इथल्यापेक्षा
चवी रंग पोत पैस कसे कसे

तिथं मी सजीवांना-नीर्जीवांना
जे कोणी जे कसे
असतील त्यांना नव्या भाषेनी
हाक मारीन नातलग करीन
माझ्याळवीन लिपिन

ते माझ्या विश्वजाणीवेचा
अतूट अंश असतील
आम्ही पूर्ण क्षमतेनी
पणाला लागलेले असू
मी त्यांना माझ्याळवीन
मी मला त्यांच्याळवीन

- सलील वाघ

-----------------------------------------

बहुतेक रद्द केलेला पिक्चर, आणि जागुन काढलेल्या रात्रीचं सार म्हणजे -

सगळा जमाखर्च बघण्यासाठी
जुनी कॅलेंडरं घेउन बसल्यावर
समजतं आपण किती निरर्थक भर्कटतो
निष्पर्ण झाडांतून सरकत जाणारा चंद्र
नदीत तरंगणारी इमारतींची प्रतिबिंब
समुद्र आकाश टेकड्या विजा सूर्य तारे
भावल्यांसारखी माणसे अन पावसाळे
हे सगळेच असतात पुन्हा पुन्हा येणारे
तरी क्षणांच्या चिमटीत पकडता आलं नाही
यातलं सगळंच आपल्याला
त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्यांचाच
आपण अभ्यास केला इमान्दारीत
उगीच जबडे दुखावले प्रश्नांच्या बडबडीनी
अन पळ काढला खरी उत्तरं आली
तेव्हा भीतीनी बसून राह्यलो
कवितेच्या टिकाऊ वळचणीला
बेमालूमपणे

- सलील वाघ


व्हईल ते जाईल.....

6 comments:

  1. भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात?

    बापरे... काय झालंय?

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Kharach... kaay zaalay? kee nusateech aswasthataa?

    ReplyDelete
  4. आयुष्यातील नाती, जबाबदाऱ्या ह्या असह्य्य होताच त्या एका चक्रव्युहाप्रमाणे का वाटतात?
    का बरं आपण त्या एका परग्रहाचा शोध घेतो, जिथे आपण पुन्हा एक नविन सुरुवात करु शकु?
    why do we find ourselves standing at the crossroads in life, in search of the way that leads to that elusive 'perfect world'?

    all the best in your search!

    ~ketan

    ReplyDelete
  5. Yes, you are right.
    Kuthetari wachlel ek wakya aathawatay -
    Roj nawa paan ulaTataana ekhadeweLee paana sampoon gelyaachach lakshaat yaayach..

    Fakt he waakya khedaana mhaNaayach kee khusheet, haa jyachaa tyaachaa aaNi tyaa tyaa weLechaa prashna!

    ReplyDelete
  6. मामा - तू ब्लॉग लिहायला लागलायेस हे कळलंच नाही! खुप दिवसांनी चक्कर मारली आज तुझ्या आणि अभ्याच्या ब्लॉगवर!

    कविता म्हटली की मला फ़क्त हायकु आणि गालिबचे चार ओळींचे शेर झेपतात! त्याच्या पलिकडे कविता गेली की मला ती उमजतच नाही! :-)

    ReplyDelete