Wednesday, February 27, 2008

न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं

आकाश, सिद्धार्थ आणि समीर.
म्हणजे काय तर - आपण.
’दिल चाहता है’ ची पब्लिसिटी चालू होती - तेव्हा भारतात होतो. त्यावेळचा फरहान अख्तरचा इंटरव्ह्यु आठवतोय. तो म्हणे - ’हिरोचा आदि-अंत सगळ्यांनाच माहित असतो, पण कित्येक सीन्समध्ये अधुन मधुन डोकावणाऱ्या, त्याच्या जोक्सला हसणाऱ्या, त्याच्या लफड्यात त्याची मदत करणाऱ्या मित्रांचं काय होतं याची मला नेहमीच उत्सुकता असायची. म्हणुन हा पिक्चर!’
त्या मित्रांबद्दल उत्सुकता मलाही होतीच.
पिक्चर पाहिला - आवडला.
नुसताच आवडला नाही तर त्याने मागचे सहा वर्ष विचार करायला भाग पाडलं. जसे सगळेच ग्रेट पिक्चर्स करतात - मग तो ’इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड’ असो कि ’इजाजत’, ’मेमेंटो’ असो कि ’हजारों ख्वाईशे ऐसी’....
पण खरं तर ग्रेट पिक्चर्स हा या लेखाचा विषय नाहीच. डिसीएच पण नाही.
विषय - न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं.
वेळ - दुपार.
स्थळ - पॅसिफिकचा रम्य किनारा, हवा ढगाळ पण तरीही स्वच्छ, मागे कर्कश्श कोकलणारं ऍन्डीचं ड्रिल रिग.
अशा ’आई शपत!’ आणि ’आयला!’ च्या रेताड किनाऱ्यावर अडकलो कि सुचतात ते हे असे ’नदीला पाणी वेग कमी’ प्रश्न.
आता विषय निघाला आहेच डिसीएच चा तर -
प्रीती झिंटाने आकाशशी लग्न करुन चूक केली का?
पिक्चर पाहिल्यावर तसं वाटत नाही वाटत.
पण माझ्यासारखा (उल्टी खोपडीका) विचार करुन पहा -
म्हणजे असं कि - बाई, तुझं लग्न ठरलंय. अगदी बुडुक बुडुक प्रेमात नसशील त्या प्राण्याच्या पण निदान - ’शादी! और तुमसे!!’ असा तर प्रकार नाही!
अशात तुझा छावा तुला पूल खेळायला घेउन जाणार. तिथे तु मैत्रिणीशी ’मी कि नै - लग्नात कांजीवरम घालणार’ किंवा तत्सम विषयावर गहन चर्चा करत असताना एक बडे बापका (अर्थात वाया गेलेला) पोरगा भरसभेत तुझा हात धरुन वगैरे तुला प्रपोज मारणार, आणि कुठलाही - शहाणासुरता/येरागबाळा/मुंबईचा/दिल्लीचा/गेला बाजार पुण्याचा - छावा वागेल तसाच तुझा छावा त्याला काळा-निळा बदडणार.
मग माझे आई - तु त्याच टवाळाबरोबर ऑपेरा हाऊसच्या पुढे-मागे बागडायला लागल्यावर तुझ्या छाव्याने तुला शिव्या घालायच्या कि हातातल्या क्यु स्टिकचं टोक गोल करायचं?
त्याचे ’अवगुण’ काय? तर म्हणे पजेसिव्ह आहे. कोण नसतं?
आणि या आकाशचे गुण काय - तर दर आठ्वड्याला छावी बदलणे, मित्रांबरोबर टवाळक्या करणे, कुठलंही क्वालिफिकेशन नसताना डॅडींच्या बिझनेसच्या नावावर सिडनीत लफडी करणे आणि मग रडत गात कल्टी मारणे.
एवढं कमी म्हणुन मागच्या दाराने लग्नात येऊन ’चल’ म्हणणे!
(च्यायला प्रीती आकाशला ’चल फुट!’ म्हटली असती तर त्याचा कसला पोपट झाला असता!)
बरं यावर तिचा छावा बोलतो पण कसलं प्रॅक्टिकल! तो म्हणे - ’धिस इज सो एम्बॅरेसिंग!’
’मी नाही जाऊ देणार तिला याच्या बरोबर’ म्हणतो तो. मग आकाश मारे एक ढिशुम मारुन राग आवरण्याचा प्रयत्न वगैरे करत त्याला हात वगैरे देतो. (च्यायला हात द्यायला त्याच्या बापाचं काय जातंय?)
आकाशने काय एवढा दिग्विजय केला कि त्याचं सगळं चांगलं होणार? आणि त्या छाव्याची कुठली असली घोडचुक कि आऊच्या काऊ समोर त्याचा एवढा मोठा पोपट होणार?
आय गेस - दॅट्स लाईफ!
हे आणि असे प्रश्न हा पिक्चर पाडतो - म्हणुन हा पिक्चर माझ्यासाठी ग्रेट होतो. गैरसमज नको - आकाशला प्रीती मिळाल्यावर मी सुद्धा टाळ्या पिटतो, पिक्चरची तोंडभर स्तुती करतो (एनफॅक्ट या पिक्चरची करु तेवढी स्तुती कमीच होईल), चहा टाकतो आणि कल्टी मारतो.
पण हा पिक्चर - न संपता मनातल्या मनात सुरुच रहातो. प्रश्न विचारत रहातो -
आणि अशा भर दुपारी - अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांत भर घालत रहातो.

आता हे लिहुन झालं.
पण अजुन ड्रिलिंग चालु. समुद्र चालु. पक्षी बिक्षी पण चालु. म्हणुन मग आणखी प्रश्न.
स्वातंत्र्य म्हणजे काय?
म्हणजे मी वैयक्तिक स्वातंत्र्य वगैरे बद्दल विचारत नाहिए. इन जनरल - पंधरा ऑगस्टच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल वगैरे विचारतोय. म्हणजे त्याचं असं कि -
आताचा मी आणि स्वातंत्र्याआधीचा मी - यात काय फरक?
आताच्या मी ने देश सोडलाय - म्हणजे कायमचा नाही, पण तात्पुरता तरी - सोडलाय ना?
तर देश सोडलेल्या आताच्या मी आणि (जर सोडला असता तर) देश सोडलेल्या तेव्हाचा मी मध्ये - काय फरक?
कन्फ्युजिंग आहे ना?
मलाही तसंच वाटतंय!
ऍन्डीने सातवा ऍन्कर सुरु केला - सिल्टी फाईन मीडियम डेन्स टु डेन्स सॅन्ड - च्यायला वाळु पण तीच ती!

परवा गब्बरने मेल करुन सांगितलं - ब्रिटिशांच्या काळात भारतात इन्कम टॅक्स म्हणे ६०% होता - च्यायला म्हणजे वाईटच!
म्हणजे ब्रिटिशांच्या काळी माझे आजोबा आणि पणजोबा शेतमजुर होते - त्यांना बहुतेक इन्कम टॅक्स भरावा लागला नसणार - पण होत्या त्या तुटपुंज्या शेतीवर सारा भरायलाच लागत असणार.
अर्थात -तो अजुनही भरावा लागत असणार. आता इन्कम टॅक्सही ३३ कि ३५ टक्के झालाय.
तर ३५% म्हणजे स्वातंत्र्य आणि ६०% म्हणजे पारतंत्र्य का?
कधी नव्हे ते काय वाटतंय ते मांडताना माझाच झोल होतोय.
म्हणजे त्याचं असं कि परवा ’रंग दे बसंती’ (परत) बघताना एक प्रश्न (परत) पडला - कि असं काय होतं कि ज्याच्यामागे आख्खा देश पेटला होता? ज्याच्यासाठी लोक बिनदिक्कत आयुष्य झुगारुन देत होते? (ऍटलिस्ट असं ऐकलंय).
पारतंत्र्य पारतंत्र्य - म्हणजे त्यांना नक्की एवढं काय टोचत होतं? काहीतरी असणारच! मग स्वातंत्र्य मिळाल्यावर ती टोच संपली का? म्हणजे ६०% ची ३५%? म्हणजे स्वातंत्र्य ३५ ते ६० मधे कुठेतरी असणार.

-------------

हे लिहुन पण वर्ष वगैरे झालं असणार.
पॅसिफिकच्या रम्य वगैरे किनाऱ्यावर नक्की कुठे होतो ते आठवत नाही. आय मीन आठवतंय - पण अंधुक - आणि जे आठवतंय ते चुकही असु शकेल.
ज्या ऍन्डी नामक प्राण्याचा इथे १-२ वेळा उल्लेख आलाय - तो आठवत नाही.
उगीच बोंबलत उन्हातान्हात कसकसले प्रश्न पडत होते आणि त्यांची कुठली उत्तरं सुचत होती - ते ही आठवत नाही.
बायको आयोडेक्स कडे गेलिए - घरी जाऊन बोर होण्यापेक्षा ऑफिस साफ करु म्हटलं तर कचऱ्यात हे कागद सापडले - आणि न आठवणाऱ्या प्रश्नांची न सुचणारी उत्तरं.
साला लाईफ भी कुछ ऐसाही होगा.

काल ’४९ अप’ नावाची एक डॉक्युमेंट्री बघत होतो. म्हणजे इंग्लंडमध्ये बीबीसी कि कुणीतरी अशी शक्कल लढवली कि आपण ७ वर्ष वयाच्या एका लहान मुलांच्या ग्रुपचा इंटरव्ह्यु घेऊ या. मग सात सात वर्षांनी त्यांना भेटुन त्यांच्याशी बोलु. असे सात सात करत ते आता ४९ वयाचे झालेत.
सगळेच.
आय मीन होणारच - डि.एन.ए. पासुन प्रत्येक गोष्ट वेगळी असणाऱ्या प्रत्येक आयुष्यात तेवढी एकच गोष्ट कॉमन - वेळ.
डॉक्युमेन्ट्री दोनेक तासांची आहे - मी अर्धाच तास पाहिलिए - आज घरी जाऊन कंप्लिट करीन. पण जी अडीच आयुष्यं पाहिली त्यातलं पहिलं म्हणजे - त्याचं नाव आठवत नाही - म्हणुन त्याला ब्रुस म्हणु.
तर ब्रुसला सात वर्षाचा असताना घोडे आवडत. त्याला जॉकी व्हायचं होतं. १४ व्या वर्षी तो एका तबेल्यात कामालाही लागला होता. पोरीबाळींत इंटरेस्ट नाही म्हणत होता. जॉकी व्हायला जमलं नाही तर काय करणार तर म्हणे - माहित नाही, मे बी टॅक्सी चालवीन. २१ व्या वर्षी ब्रुस टॅक्सी चालवत होता आणि त्याचा जोरदार प्रेमभंग झाला होता. आता पोरिबाळींपासुन लांब रहाणार म्हणत होता. २८ व्या वर्षी ब्रुसचं लग्न झालं होतं. नवरा बायको लाजत लाजत कॅमेऱ्यासमोर - तीन वर्षांपुर्वी कसे भेटलो सांगत होते. डिस्कोत भेटलो, आवडलो, लग्न केलं. प्रेम म्हणजे काय तर दोघांनाही सांगता येईना. आता ब्रुसच्या बायकोचं नाव काय ठेवायचं? तिला डेमी म्हणु. तर ब्रुसने स्वत:ची टॅक्सी घेतली होती. खरंतर २ टॅक्सीज घेऊन ब्रुस आणि डेमी दोघंही कॅबी झाले होते. आयुष्यात एक मुलगा हवा - असं ब्रुसचं तेव्हाचं स्वप्न.
३५ व्या वर्षी त्यांना दोन मुलं - मोठा मुलगा, धाकटी मुलगी. च्यायला आता आणखी नावं! तर मुलाचं नाव किम्बल आणि मुलीचं मिसी. मुलं घरात बागडत असताना ब्रुस आणि डेमी डायनिंग टेबलशी एकमेकांकडे बघुन मख्ख. लाईफ टफ असतं म्हणत होते. भांडतो एकमेकांशी, कधी कधी वाटतं कि डिव्होर्स घ्यावा. पण यु हॅव टु वर्क ऑन इट - यु नो! मग आढ्याकडे बघत परत पुटपुटतो - लाईफ इज टफ!
४२ व्या वर्षी ब्रुस, डेमी, किम्बल आणि मिसी मध्ये आणखी एक भर - डेना! मनोज कुमार, आशा पारेख वगैरे चेहरे पाहिल्यावर आता कसं वाटतं - तसं ब्रुस आणि डेमीकडे पाहिल्यावर वाटतं. अंधुकशी ओळख. बाकी निराशा. आणि शांतता. दोघं एकमेकांना केवळ सहन करताहेत. त्याच्या बागेत गेल्यावर म्हणतो - मागच्या वेळेस छोटी होती ती झाडं बघा किती मोठी झालिएत! पण ते झाड बघा - कुणीतरी म्हटलं कि त्याच्या फांद्यांवर पाणी मारा, तर ते झाड मरुन गेलं - लाईफ इज टफ! यु नो!! देशात सुळसुळाट झालेल्या देसी, पाकिस्तानी लोकांबद्दल बोलायला लागला कि त्याचा तिळपापड होतो - हा आमचा देश आहे म्हणतो. आमच्यासारखे वागा.
४९ व्या वर्षी ब्रुस आणि डेमीने देश सोडलाय - दोघं स्पेनमध्ये रहातात आणि धमाल करतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं कि ही ती ’हीच ती’ का! इंग्लंडमधल्या घरावर सेकंड मॉर्टगेज काढुन आणि दोन्ही टॅक्सीज विकुन त्यांनी स्पेनध्ये एक हॉलिडे होम विकत घेतलंय. टाईल्स पासुन प्रत्येक गोष्टीत भांडत प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगताहेत. जवळंच मोठं टुरिस्ट कॉम्प्लेक्स बनतंय. तिथे एक स्पोर्ट्‍स बार सुरु करायचा ब्रुसचा विचार आहे. किम्बल जॉब करतो इंग्लंडमध्ये. मिसीला हायस्कुल मध्ये असतानाच मुलगी झाली. छावा पळुन गेला म्हणे. पण तरी आता ती जबाबदार झालिए म्हणे. पोस्ट ऑफिसमध्ये काम करते - पहाटे पाच वाजता उठुन जाते. तिचा बॉयफ्रेंड तिची काळजी घेतो. त्या मानाने डेना चांगलीच समजुतदार - आणि हुशार.
लाईफ इज टफ - बट वी आर हॅपी - इती ब्रुस.

मी सात ते एकोणपन्नास च्या अधे मधे!

बायकोचा फोन आला - अजुन थोडा वेळ थांब म्हणाली.
मला थांबायला लागलं कि प्रश्न पडायला लागतात.
उगीच कुणाचं काय नि कुणाचं काय!
जॉशुआ वेइट्झकिन नावाच्या एका अमेरिकन चेस प्लेयरवरचा एक पिक्चर बघत होतो. नाव - ’सर्चिंग फॉर बॉबी फिशर’.
बॉबी फिशर हा ही एक चेस प्लेयर.
त्याचं झालं असं कि बॉबी फिशर वयाच्या सातव्या वर्षापासुन बुद्धिबळाच्या सामर्थ्यावर लोकांना थक्क करायला लागला. वयाने, अनुभवाने आणि गणतीत मोठ्या असणाऱ्या लोकांना लीलया हरवायला लागला. हसत खेळत वीस वीस लोकांशी एकाच वेळी लढत त्याचा आत्मविश्वास दुणावला. अशात वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप आली. अमेरिका रशिया एकमेकांवर कुरघोडी करायला सदैव तत्पर. आणि चेसमध्ये आपला हात धरणारं कुणी नाही अशी रशियाची दर्पोक्ती. ’मी रशियाला हरवीन’ असं फिशर म्हणाला आणि लढायला आईसलंडला गेला. पण स्पर्धेशिवाय इतर बाबतींमुळेच त्याचं नाव गाजायला लागलं. म्हणे मागासलेला देश आहे हा - का तर तिथे बोलिंग ऍलीज नव्हत्या!
पण घुमशानपणे त्याने बोरिस स्पास्कीला हरवलं आणि रातोरात तो अमेरिकेत स्टार झाला!
अमेरिकेचा पहिला बुद्धिबळ विश्वविजेता!
बॉबी फिशर हे नाव गाजु लागलं.
’मी माझा शब्द पाळला - रशियाला हरवलं’ करत बॉबी फिशर भाषणं ठोकायला लागला.
हे सगळं चालु असताना बॉबी फिशर कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी एक अचाट खेळी खेळला.

बॉबी फिशर गायब झाला.

पुढे ’फिडे’ वगैरे आलं, त्यांनी बॉबी फिशरला आव्हान दिलं कि - ये, लढ, नाहीतर दुसरं कुणीतरी विश्वविजेता होईल, पण कुठलाही मागमुस मागे न ठेवता बॉबी फिशर बेपत्ता झाला तो झाला.

शाळेतुन परत येता येता बागेत बसणाऱ्या अट्टल जुगारी चरसी लोकांकडे उत्सुकतेने बघत बघत जॉशुआ वेइट्झकिन बुद्धिबळ खेळायला शिकला. आय मीन - तो खेळायला शिकला हे कुणालाच कळलं नाही. आई हात ओढत घरी न्यायचा प्रयत्न करायची आणि हा सात वर्षाचा पोरगा चरसींच्या कोंडाळ्यातुन हटायचा नाही. एकदा गम्मत म्हणुन एका भिकारी पण नावाजलेल्या जुगाऱ्याला त्याच्या आईने पाच रुपये देऊन जॉशुआशी खेळायला सांगितलं. दोन मिनिटांच्या स्पीडचेस मध्ये जॉशुआ हरला, पण दोन मिनिटं पुरी होता होता ’जॉश वेइट्झकिन’ या नावाचा रुतबा बागेतल्या अट्टल चरसींना कळला होता. सात वर्षाचा जॉश तेव्हापासुन बागेत आला कि बिड्या विझायला लागल्या आणि डोकी खाजायला लागली!
जॉशचे बाबा बेसबॉल रिपोर्टर होते.
जॉशने बॅट ऐवजी प्यादं उचललं याचं त्यांना क्षणभर वाईट वाटलं, पण मग त्यांनी जॉशसाठी उत्तमोत्तम शिक्षकांचा शोध सुरु केला. शिक्षक म्हणुन त्यांना बेन किंग्जले सापडला - सर बेन किंग्जले! बुद्धिबळापायी स्वत:चं आयुष्य उधळलेला आणि अनेक आयुष्य उध्वस्त झालेली पाहिलेला - जुना जाणता शिक्षक. त्याच्या कडुन शिकत बागेतल्या अवलिया लॉरेन्स फिशबर्नशी टपोरी बुद्धिबळं लढत जॉश धमाल आणायला लागला.

पहिली स्पर्धा खेळेपर्यंत.

जॉशचं दुर्दैव म्हणजे खेळलेली पहिलीच स्पर्धा जॉश जिंकला.
इतके दिवस ’आपल्या बाळात गुण आहेत’ एवढंच माहित असलेल्या जॉशच्या बाबांना पहिल्यांदाच आपल्या बाळात किती किती गुण आहेत याची प्रचिती आली. प्रत्येक स्पर्धेगणिक त्यांची मान अभिमानत गेली आणि जॉशला हरायची भिती वाटायला लागली. राणी बाहेर काढु नकोस, पेशन्स ठेव म्हणणारा बेन किंग्जले, धुंवाधार लढ - पटाशी नाही तर प्रतिस्पर्ध्याशी लढ म्हणणारा लॉरेन्स - जॉशला समजु शकले नाही. ते काम केलं जॉशच्या आईने. न बोलता. जॉशने बुद्धिबळ सोडलं. चूक लक्षात आल्यावर सगळ्यांनीच मग जॉशला असं कर, तसं कर सांगणं थांबवलं.
आणि अशात अचानक - जॉश खेळायला लागला. बेन किंग्जले म्हणाला तसं - पटावर प्यादी न ठेवता.
पटाशी न खेळता, प्रतिस्पर्ध्याशी न खेळता - स्वत:शी खेळायला लागला.
पुढच्या चालीचा विचार न करता - पुढच्या पंधरा चालींचा विचार करु लागला.
आणि जॉश वेइट्झकिन स्वत:साठी जिंकु लागला.
पिक्चर संपला तेव्हा जॉश वेइट्झकिन - अमेरिकेचा अठरा वर्षांखालील - बुद्धिबळ विजेता होता आणि त्याला बॉबी फिशर बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ’मी बॉबी फिशर नाही!’ हे खमक्यात सांगु लागला होता.

एवढं होऊन - गेला तसा अचानक बॉबी फिशर परत आला!
सतरा वर्षांनी!!
फिरुन बोरिस स्पास्कीशी लढला.
फिरुन जिंकला आणि पुन्हा बेपत्ता झाला.

पण यंदा परत आला नाही.
दोन-तीन पॅरेग्राफ्स पुर्वी त्याला विकीपीडिया वर शोधुन काढलं तर कळलं कि बॉबी फिशर मागच्याच महिन्यात गेला....


लेखाला टायटल तर दिलंय ’न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं’, पण लिहितोय तसा भलतेच प्रश्न पडत चाललेत आणि भलभलत्याच प्रश्नांची उत्तरं मिळत चाललिएत. आता हे लिहिलंय तर पब्लिश करावं का?
करुन टाकावं - कारण अजुन वर्षभर थांबुन त्यात काही सुसुत्रता येईल कि नाही ही शंका आहेच.
वर्षभरापुर्वी आठवलेले डीसीएच, विचार करायला लागणारे आरडीबी, काल परवाचे ’४९ अप’ आणि बॉबी फिशर....

बायकोने मला वाट पहायला लावणं बंद केलं पाहिजे.

24 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. Prashnanchya Uttarat punha prashnach samor yayla lagle ki doka bhanbhanayla lagta...ani chhod na yaar..mhanun sodun dila ki ratri jhopet kadhitari tya prashnacha uttar sapadta...agdi sahaj.

  ReplyDelete
 3. विचार करायला लावणारे, प्रश्न पाडणारे पोस्ट. दिवसभर डोक्यात राहिले. आणि आणखी प्रश्न पडले. डिसीएचबद्दल बोलायच तर याच रॅशनलायझेशनही करता येईल. पण त्यापेक्षा जास्त गंमत पुढे काय होईल याच्या प्रश्नात आहे. समजा नंतर प्रीती-आमिरच पटल नाही आणि तिला रोहीत परत भेटला तर? आमिरने मूळ स्वभावावर जाऊन लग्नानंतर दोनतीन वर्षांनी परत अफेअर्स करायला सुरूवात केली तर? अशा प्रश्नांमध्ये विशेष हे की जे उत्तर तुम्ही काढाल ते बरोबर असू शकते. गणितातल्याप्रमाणे २ + २ चे एकच उत्तर इथे नाहीये. सर्व उत्तरे बरोबर, कुठलेच चूक नाही.

  दुसरा मुद्दा हा की उत्तरे शोधून काय होणार अशी अपेक्षा आहे? 'बरोबर' उत्तर सापडले तर समाधान वाटेल का? इथे पोस्ट का आवडले त्याचे आणखी एक कारण सापडले. हे प्रश्न सरळसरळ एक्झिस्टेंशिअलिझमचे आहेत. एक्झिस्टेंशिअलिझमचा आवडता प्रश्न म्हणजे या सर्वांचा अर्थ काय? आणि याचीही वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी उत्तरे आहेत. मला आवडलेले उत्तर कमूचे आहे. त्याच्यानुसार आयुष्याला काही अर्थ नाही कारण आयुष्य अब्सर्ड आहे. आणि जर तुम्ही याचे उत्तर शोधायला गेलात तर हातात काहीच येणार नाही. पण जोपर्यंत तुम्हाला असे प्रश्न आहेत याची जाणीव नाही तोपर्यंत तुम्ही सुखी आयुष्य जगाल.

  ReplyDelete
 4. tu lihilela, hey aavadla, hey pratyek veles saangaaylaach paahije kaa??
  ha prashna mala padla aahe :D

  DCH madhe preity baddal tulaa jo prashna padla - chaaylaa!! now tht u say, it actually doesnt make sense why she married aamir!
  porin chya dokyaat nakki kaay chaalta - haa ajun ek dusra prashna!! ;-)

  RDB mala pan aavadlela. pan mi tyaacyaavar itkaa kaahi vichaar kela navhta. mala actually soha cha "maar do usko" var itka hasu aala hota - ki hee nakki kaay mhantiye... tithun pudhe, mala to cinema director's free spirit/creativity vaatlela... pan wot exactly is independence? is it just reduction of income-tax rate? prashna chaangla aahe..

  Bobby Fisher gelaa, tevha TOI madhe tyaachi ek mast quote aali hoti. Asked who was the greatest player in the world, he once replied: "It's nice to be modest, but it would be stupid if I did not tell the truth. It is Fischer."

  hyaala maaz mhanaaych? or is it supreme confidence in himself?
  mala padlela ajun ek prashna.

  well, such Qs keep coming back to the mind like the waves of the sea. just like ohoti/bharti, s'times they reach our mind.. s'times they stay away..
  madhunach ekhaada hurricane yeta.. tevha, tyaancha ek ugra roop aaplyaala dista.. naahitar most of the times, they appear peaceful..

  am actually hoping ur wife gives u more opportunities to do this kind of introspection.. and u keep sharing such Qs with us..

  basically, moh aavrat nahi..
  baaasss!! ithech thaambto mi aata :)

  ReplyDelete
 5. मस्त लिहीलंयेस मामा. तुझ्या मागच्या बऱ्याच पोस्ट्स नंतर हे खूप वेगळं ओरिजिनल आणि अनरिपिटिटिव्ह झालंय. ताकदीनं लिहीलंयेस, आणि कण्टेण्टही सॉलिड आहे. गुड पोस्ट!

  राज ची कॉमेण्टही मस्त आहे. एक्झिस्टेंशिअलिझमचे प्रश्न आजकाल मलाही अती छळताहेत.

  DCH चा प्रश्न एकदम व्हॅलिड. आणि त्या ४९ बद्दलही उत्सुकता वाटतेय. आपल्या ग्रूपने जर असे इण्टरव्ह्यू रेकॉर्ड करून ठेवले तर? अजूनही वेळ गेली नाहीये - करायची का सुरुवात? सगळे भेटूया. :)

  ReplyDelete
 6. पारतंत्र्य पारतंत्र्य - म्हणजे त्यांना नक्की एवढं काय टोचत होतं? काहीतरी असणारच! मग स्वातंत्र्य मिळाल्यावर ती टोच संपली का? म्हणजे ६०% ची ३५%? म्हणजे स्वातंत्र्य ३५ ते ६० मधे कुठेतरी असणार.

  Toch nahi sampli, samvedana samplya apalya kadachit...ata 60% pan tochanar nahit....good on you...

  ReplyDelete
 7. 'दिल चाहता है' वरून तुला पडलेल्या प्रश्नातच बराच वेळ गेला. मग पुढे वाचलं तर लक्षात आलं की तू बरंच काय काय म्हणतो आहेस.

  विचार करायला लावणारं पोस्ट अर्थातच. पण त्यात काही नवीन नाही.

  तुझ्या बायकोला कल्पनाही नाहीय ती नक्की किती महत्त्वाचं काम करतेय त्याची. प्लीज तिला काही कळू देऊ नको.

  ReplyDelete
 8. असं काय होतं कि ज्याच्यामागे आख्खा देश पेटला होता? ज्याच्यासाठी लोक बिनदिक्कत आयुष्य झुगारुन देत होते? (ऍटलिस्ट असं ऐकलंय).
  पारतंत्र्य पारतंत्र्य - म्हणजे त्यांना नक्की एवढं काय टोचत होतं? काहीतरी असणारच! मग स्वातंत्र्य मिळाल्यावर ती टोच संपली का?

  kharach swatantrya mhanje asa kay hota? khrach swatantrya asa kahi hota ka? asa kahi asta ka? ka nustach manacha khel? paratantryachi janeev nasnaare lok khare tar swatantrach na?

  konas thauk.....

  jaunde....

  lekh chan zalay...

  ReplyDelete
 9. aadhich kay kami hote mhaNun aata tyat ya prashananchi bhar...prashna paaDat paaDat vachla ni prashNanchi zoLi jaD zali ya samadhanavar soDun dila...shivay aapaN ekTech nahi he samadhan free madhe! :)

  ReplyDelete
 10. मला फारसं नाही अपील झालं पोस्ट :(
  कदाचित तू म्हणतो तसं जुनं असल्यानं बाठे-टच नुक्ता-नुक्ता जाणवत असेल..

  ReplyDelete
 11. hmm kharach v4 karayala lavanara post aahe...
  bhannat prashn padatat...malahi padatat... pan mi majhya parine uttar shodhate tyachii.... samadhan sapadalelya uttaravar milatach asa nahi.... pan tarihi... haa khel chalu asatoch....

  ReplyDelete
 12. ((PARTANTRYA))

  Mama - pratyek yugaachi swat:chi ek political reality asate. Tya political reality madhye oppressed groups asataat; kinwa te tase swat:la samzat asatat. Tya existing political reality la badlun swat:warache nirbandh oppressed lokanna zugarun dyawe ase manatun satat waatat asate. Pratyekalach te shakya hot nahi.

  60% tax he tya oppression che ek roop... Ashi barich roope asatat... SagaLyaat mahatwache mhaNaje oppressed lokanche swat:ache "astitva" matter karat naahi hey feeling... Te faar waait... KiDya mungipeksha aapli kimmat faar jaast naahi hey feeling khatarnaak... This breeds rebels... Yashaswi zaale tar Oppressed lokanchya puDhachya piDhyanche te hero - swatantrya senani - krantikarak!

  ((DCH))

  DCH baddalchya analysis madhala ek missing ingredient - preetila akash cha "dagaD" (shabd aahe ka lakshaat?) khare tar awaDat nasatoch navra mhanun - ti tichi majboori asate... DagaDacha kahi dosh naahi hey kharech - pan lagna compromise war based asawe ka??

  ((Andy che drill))

  I sometimes envy the outdoorsy nature of your job - esp when the weather is as nice as you described. Arent there any windy, wet, snowy days? :-)

  May your luck last!

  Baba.

  PS: Google account cha problem yetoye mhanun anon comment.

  ReplyDelete
 13. अवो बाठे सायेब, तुम्ही तर त्या चोर बाईचा पार इस्कोटच केला की वो......लयी गाsssssssssर वाटलं बगा....आवडलं आपल्याला

  ReplyDelete
 14. कायद्यानं जायचं तर मी तुला खो देऊ शकत नाही खरं तर! पण जाम उत्सुकता आहे तुला काय म्हणायचंय यावर त्याबद्दल. लिहिशील का?
  http://meghanabhuskute.blogspot.com/2008/03/blog-post_13.html

  ReplyDelete
 15. मेघना - नाही.

  ReplyDelete
 16. वेळ - १२.०१ - नेहमीप्रमाणे झोप आवश्यक आणि लिहायची खुमखुमी डोक्यावर! त्यामुळे १२.३० पर्यंत लिहुन होईल तेवढंच.

  ट्युलीप - कमेंट जरा जास्तच आवडली.
  मेघना - भावना बायकोपर्यंत पोचवल्या.
  आनंद - मला युजुअली भन्नाट स्वप्न पडतात आणि पडतील ती स्वप्नं लक्षात रहातात. पण पडलेल्या प्रश्नांची उत्तर मला स्वप्नांत मिळत नाहीत - ती युजुअली मित्रांशी बोलताना मिळतात. पण स्वप्नांबद्दल बेरेच दिवस लिहायचंय - या निमित्ताने त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  राज - एक्झिस्टेंशअलिझम बद्दल माहीत नाही - पण असे प्रश्न पडायला लागले कि लाईफ ऍब्सर्ड वाटायला लागतं हे नक्की.
  केतन - बॉबी फिशरच्या उत्तराबद्दल - याला माजच म्हणायचं आणि त्याचंच दुसरं नाव म्हणजे सुप्रीम कॉन्फिडन्स. मी शाळेत असताना कबड्डी खेळायचो - आणि ५ वी ते १० वी सलग सहा वर्ष खेळुन मोजुन ३ मॅचेस हरलो. पुढे कॉलेजात कॅप्टन झालो आणि चार वर्षात एकही मॅच हरलो नाही. मजबूत प्रॅक्टिस केल्यावर आम्ही ज्या मस्तीत मैदानात उतरायचॊ त्याला आम्ही ’माज करणे’ म्हणायचो. त्या मस्तीची झिंग काही औरच. शारिरिक मस्तीची तशीच बौद्धिक मस्तीची....
  अभ्या - डिस्कोने वास्तुशांती निमित्त मला हॅन्डीकॅम भेट दिलाय, आणि मी माझ्यापासुनच सुरुवात करायचा विचार करतोय. बायको भारतात चाललिए ३ आठवडे - त्यात बघु काही रेकॉर्ड करायला जमतंय का - मग ते youtube वर टाकीन....! :))
  स्वाती - धन्यवाद.
  कोहम - संवेदना - I dont know man....पण यावर सविस्तर लिहिलं पाहिजे.
  स्नेहल - स्वातंत्र्याची जाणीव नसणारे लोक स्वतंत्र का? हा तुला पडलेला प्रश्न फंडु आहे. त्याच्यावरचं तुझं स्वत:चं मत लिही ना!
  सेन - Thanks!
  संवेद - अरे कंबख्त! :))
  स्नेहा - असे प्रश्न पडायला लागले कि वुडी ऍलन झाल्यासारखं वाटतं! :) (पाहिले नसशील तर त्याचे पिक्चर्स अवश्य बघ).
  संवेद - I am not too proud of the words that I used in that comment - but I hope the intensity of my unfiltered feelings got across to everyone. I am not too bothered about the people who twitched after reading the comment. I am happy that I was able to stand up for a principle. If it comes to it - I will do it again - albeit with different words but even more venom.
  बाबा - Your comment deserves a post. बघुयात जमतंय का!

  १२.३३ - The End.

  ReplyDelete
 17. दादांनु, ये ना चालसे...अरे लिही की मित्रा की तू का लिहितोस ते? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात रे आणि आमचं नां भारी प्रेम आहे तुझ्या लिखाणावर :) आणि तू असंच का लिहितोस ते नक्की interesting असणार बघ. लिही की...किती भाव खावा...

  ReplyDelete
 18. संवेद - I know - मी न लिहिणं म्हणजे भाव खाणं होईल, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्नच मुळात चुत्याप्स वाटतो - हे मूळ कारण.
  आता मला तसं का वाटतं हे सांगतो - Hopefully त्यातुन तुला मी का लिहितो याची कारणं सापडतील.
  प्रश्न चुत्याप्स कारण - आपण day to day life मध्ये अशा हजार गोष्टी करतो ज्या जीवनावश्यक असतातच असं काही नाही. I mean - जेवतात, झोपतात, श्वास घेतात सगळेच - म्हणुन मग त्या गोष्टींबद्दल ’आपण हे का करतो’ म्हणणं मुर्खपणाचं ठरेल. राहिला प्रश्न optional गोष्टींचा, तर काही लोक पिक्चर बघतात, काही गाणी ऐकतात, काही लोक काहीच करत नाहीत, बहुतेक तसंच - मी लिहितो. मला याच्यापेक्षा जास्त logical explaination खरंच सुचत नाही. शिवाय माझी बायको म्हणते तसं - हे एक जबरा unproductive काम आहे. घर आवरणे, कपड्यांना इस्त्री करणे, अधुन मधुन बायकोला स्वैपाकादी गोष्टीत मदत करणे - ही कामं लिहिण्यापेक्षा नक्कीच जास्त productive आहेत.
  मी basically एक महा आळशी माणुस आहे. ज्या ज्या गोष्टी मी करणं अपेक्षित असतं - म्हणजे लहानपणी अभ्यास करणे आणि वडिलधाऱ्यांचं ऐकणे, मोठेपणी नोकरी करणे, कर्ता म्हणुन कुटुंब चालवणे - या गोष्टींचा मला भयंकर कंटाळा. या गोष्टी टाळुन जे काही म्हणुन असतं त्यात मला भारी रस. क्रिकेट खेळणे आणि बघणे, पिक्चर्स, पुस्तकं, गप्पा टप्पा, चर्चा आणि वांझोटे विचार - म्हणुनच मला भयंकर प्रिय. त्यातपण कमीत कमी शक्ती जिथे खर्च होईल अशा गोष्टी करण्याकडे ओढा - म्हणुन वाचनापेक्षा पिक्चर जास्त.
  एनीवे - विषय आहे कि मी का लिहितो - उत्तर - I dont know.
  वेल - मी एकटाच लिहित नाही - infact - selected लोकच लिहितात असंही नाही. प्रत्येकालाच लहानपणी वगैरे लिहायला शिकवतात आणि नाईलाजाने प्रत्येकजण ते शिकतो. (मी ज्याच्याबरोबर गोट्या खेळायचो अशा एका शेंबड्या पोराने मला लिहिता येत नाही असं चिडवलं - म्हणुन मी घरी जाऊन रडुन गोंधळ घातला आणि ताबडतोब मुळाक्षरं वगैरे गिरवली अशी एक दंतकथा आई सांगते - असो).
  तर शाळेत असताना निबंध वगैरे प्रत्येक जणच लिहितो, मी पण लिहायचो. आणि मी कधी मराठीत वगैरे पहिला आल्याचं मला आठवत नाही. (नाही म्हणायला सातवी कि आठवीत असताना - मराठी साहित्य परिषदेच्या परिक्षेला बसलो होतो. अभ्यासक्रम म्हणुन ’श्यामची आई’ होतं. हिवाळी शिबिराच्या शेवटच्या दिवशी हट्टाने आई-पप्पांसोबत ’शिवा’ बघुन परतताना ’बापरे, उद्या सकाळी परिक्षा आहे!’ असं आठवलं, पण शेवटच्या मिनिटाला अभ्यास करुन काय उपयोग - हे माझं मत बहुतेक आईलाही पटलं असावं कारण सकाळी परिक्षेला गेलो आणि विचारलेल्या कुठल्याही प्रश्नावर ’श्यामची आई’ या पुस्तकाबद्दलची ’माझी मतं’ लिहुन आलो. त्या परिक्षेत गावड्या महाराष्ट्रात पहिला आला आणि मी दुसरा - पण मला ती सगळीच चुत्येगिरी वाटली. शिवाय टि.म.वी. च्या संस्कृतच्या परिक्षा मी अगदीच काठावर पास व्हायचो - गावड्या तिथे पण पहिल्या पाचात वगैरे असायचा - त्यामुळे मला मराठी साहित्य परिषद बंडल वाटली).
  तर - लिहितात सगळेच, शिवाय लिहिणं या प्रकारात एकंदरच efforts जास्त लागतात, त्यामुळे - netsurfing, channel surfing, मिळेल तो पिक्चर बघणे - या गोष्टी अजीर्ण झाल्या कि (असं होईपर्यंत - रात्री खुप खुप उशीर झालेला असतो - ही एक आणखी महत्वाची गोष्ट) वाचन किंवा लिखाण असे दोनच पर्याय उरतात. मग एखादं चांगलं पुस्तक हातात नसेल, किंवा library चा दंड फारच झाल्याने त्यांनी माझं account बंद केलं असेल तर मग - नाईलाजाने काहीतरी लिहिलं जातं.
  आमच्या शाळेत compulsory काहीच नसायचं (असं फक्त म्हणायला - खरं तर लई गोष्टी compulsory होत्या) तरी ’दैनंदिनी’ लिहिण्याबद्दल लई दम दिला जायचा - त्यामुळे शुद्धलेखनाव्यतिरिक्त काही लिहायची सवय लागली. पुढे पत्र लिहिणे या प्रकाराबद्दल लईच fascination वाढलं, मग त्यात मित्रांना, आई-पप्पांना, आणि छावीला तर नको इतकी पत्रं लिहिली. लिखाणाची आठवण एवढीच. ’तुझ्या पेक्षा तुझी पत्रं जास्त आवडतात’ असं म्हणुन छावीने मला (नाजुक) लाथ वगैरे मारली म्हणुन मग मी पाच सहा वर्ष लिखाणावर बहिष्कार घातला (जसं काही मी विख्यात लेखक वगैरे होतो)....
  पण आईने लिहायला उद्युक्त केल्याचं आणि पप्पांनी ’लिही लिही’ म्हणुन पकवल्याचं आठवतंय - अजुनही प्रत्येक India call ला पप्पांचं ते पालुपद ठरलेलं.

  एवढा पाल्हाळ लावुन मी एवढं लिहिलंय पण यात ’मी का लिहितो’ याचं कारण मला तरी सापडलेलं नाही - तुला सापडलं असेल तर तु महान आहेस.
  ’व्यक्त होणे ही गरज वाटते’ वगैरे वाक्य मला चुत्येगिरी वाटतात. ’मला जगाला आग लावाविशी वाटतिए’ किंवा ’Little miss sunshine बघुन मला जन्म घेतल्याबद्दल धन्य धन्य वाटतंय’ ही किंवा अशी वाक्य स्वत:शी बोलता येतात, बायकोला सांगता येतात, नाहीतर ती ऐकायला नेहमीच तयार (या बाबतीत मी भलताच lucky आहे) मित्र असतात - मग कुठे ते net चालु करुन लिहा बिहा आणि ते वाचुन जगात काही फरक पडेल अशी अपेक्षा करा!
  तरी मी का लिहितो - may be - सवय! उगीच इकडे तिकडे लिहुन ठेवायचो (आई मग ते कागद गोळा करुन ठेवायची), पत्रं लिहायचो, मागच्या एक-दोन वर्षात blog नावाचं नविन खेळणं सापडलंय म्हणुन इथे लिहितो - त्याचं नाविन्य already सरायला लागलंय - त्यामुळे इथे मुक्काम अजुन किती हे पण माहित नाही. (यावरुन आठवलं - मी ७५ पैशाची आंतरदेशीय पत्र घेऊन पत्रं लिहायचो, मग डिंक वगैरे लावुन ती बंद करायचो आणि ती पत्रं कुणालाच पाठवायचो नाही - यावर पॅऱ्या लई उचकायचा - म्हणायचा - ’भाड्या मामा, atleast ते पैसे तरी नको खर्च करु!’ बहुतेक पुढे काही वर्षांनी ती पत्रं मी त्यालाच पाठवली - एएएनीवे...)

  मग इतकी रामकहाणी ऐकुन रामाची सीता कोण? (या प्रश्नावर एकदा मी instinctively ’आई’ म्हणाल्याचं लख्ख आठवतंय!).
  बघ - मेघनाला जे एका शब्दात सांगितलं ते तुला सांगायला आख्खं पान बिन घेतलं मी.

  Gawd....मी इतका वेळ का घालवतो!....

  ReplyDelete
 19. tujhi last comment majorr awdli !! :)

  ReplyDelete
 20. mala kuthe sapadlay uttar... mat wicharshil tar khoop confusing ahe he... karan jya wyaktila ti janeevch nahi tichyasathi ti swatantrach na? mag apn bajula basun ka samjawnyacha ghat ghalaycha ki baba re tuzyawar anyay hotoy.. aaplyala kay mahite ?? maru de chayayla tech asel barobar asa watata... pan roj nawra marto tari baai mhanali ki ag pori hech barobar tar mag ?? ghalaycha ghat ki nahi ani te barobar ka chuk... tyahipeksha changla ki waeet? he ek udaharan zala asa anek babtit hota mala...

  ReplyDelete
 21. या नंतरचं पोस्ट का काढलं? सिव्हिल इंजीनिअरिंग वरचं? छान जमलं होतं की !

  ReplyDelete