Tuesday, October 25, 2011

हर सांसमें एक कहानी हैं....

बादलोंसे काट काट के

"जे अपेक्षित असतं ते सोडुन बाकी सगळं करायला मला आवडतं" - असं परवा मंगलाला म्हटलं.
मंगला म्हणजे माझ्या शेजाऱ्याची बायको.
च्यायला लोक सुंदर पोरींना अशी अमंगळ नावं का देतात कळत नाही.
एनीवे - तर असं म्हणुन झाल्यावर माझा मीच विचार करायला लागलो कि च्यायला मी खरंच असा आहे का?
बोलुन झाल्यावर विचार करायचा - अशी माझे जुनी सवय.
म्हणजे असं मला अलिकडेच कळलं.
त्यामुळे मग मी विचार करायला लागलो.
हल्ली मला कसलाही विचार करायचा असेल तर मी जो समोर असेल त्याच्यासमोर सगळं काही बोलुन टाकतो.
बार बीर बियर जवळपास असेल तर उत्तम.
मग तारवटलेल्या डोळ्यांनी कम्प्युटर स्क्रीन समोर बसुन बोललेल्या विचारांचं रवंथ.
तर - मी असा आहे का?
परवाच्या लॉंग वीकेंडला बायकोला म्हटलं - च्यायला तुमची मजा आहे - सोमवारी सुट्टी वगैरे.
असं म्हणुन मला सुट्टी असुनही ऑफिसमध्ये जाऊन काम करत बसलो.
बायकोला बिचारीला मग भारी दया वगैरे.
मग दुसऱ्या दिवशी ऑफिस असुनही घरी टी.व्ही. बघत बसलो.

आत्ता ऑफिसात बसुन हे लिहितोय.
आता घरी जाऊन काम करावं.

---------------------------

कप्पाळ

ऑर्कुट बिर्कुट प्रकार असताना एक उसूल होता कि ज्या व्यक्तिला कधी भेटलो नाही तिला add करायचं नाही.
नदीची परिणती जशी समुद्रात होते (हे उगीचच) तसाच तो नियम फेसबुकवरही आला.
आज बऱ्याच दिवसांनी फेसबुक वर गेलो तर तिथे त्यांनी ’Find Friends’ section मध्ये मी ज्यांना भेटलोय अशा हजारो लोकांची नावा-चित्रानिशी यादी दिलिए.
आपण एका व्यक्तीला कोणे एके काळी भेटलो - म्हणजे काय?
आयला - हा असा दिसायचा! किती बदललाय आता!! एवढीच तर रिअ‍ॅक्शन होते.
मग मी विचार केला कि ज्या लोकांना व्यवस्थित ओळखतो अशाच लोकांना add करु.
म्हणुन मग दहावी पर्यंतचे batch-mates. असं म्हणुन एका मित्राला add करणार होतो तर त्याच्या यादीत १,४४६ लोक होते.
मग मूड गेला.
आपण लोकांना snippets मध्ये ओळखतो.
अशी छोटी मोठी snippets एकत्र करुन व्यक्ती बनते, पण स्वतंत्र तुकडा म्हणजे व्यक्ती नाही.

आज वाचलं कि ’टु डू’ ची प्रत्येकाची लिस्ट असते. ’टा डा’ ची झालेल्या कामांची लिस्ट बनवली कि बरं वाटतं.
या लिस्टा कधी पिच्छा सोडत नाहीत.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
मी बरंच उथळ लिहितोय पण तरी खळखळाट नाही.

-----------------------

एका कोळियाने

Contrary to our perception, creative people are very disciplined - असं काल एका पेपर मध्ये वाचलं.
उदा. हेमिंग्वे. (समानार्थी - मार्लन ब्रॅन्डो).
उशीरा उठणे, निवांत आवरणे, मग बार गाठणे, तिथेच टाईमपास, मग रात्री उशिरापर्यंत दारुकाम, गप्पा टप्पा, पोरी बाळी - अशी त्याची लाईफस्टाईल.
असं ऐकुन होतो.
जगावं तर असं - असा नेहमी डोक्यात विचार.
अधुन मधुन स्फुर्ती वगैरे आली कि लिखाण.
मग त्यातुन 'Old man and the sea' वगैरे पुस्तकं, literature चं Nobel वगैरे.
पण काल कळलं कि स्फुर्ती असो नसो, विषय असो नसो - हेमिंग्वे रोज ठरल्या वेळेत लिहायचाच.
जबरा जमलेल्या गप्पांच्या फडातुन पिकासो - मला हे चित्र पूर्ण करायचंय - म्हणुन निघुन जायचा.
वारसा हक्क आणि थोड्याफार प्रयत्नांतुन मिळालेल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर ’आळस आणि बेशिस्त हे माझे जन्मसिद्ध हक्क आहेत आणि ते मी मिळवणारच’ च्या धर्तीवर चाललेल्या आयुष्याला अशी काही snippets हादरवुन जातात.
बरेच दिवस डोक्यात होतं म्हणुन आज Differential Equations चं पुस्तक उघडुन बसलो आणि M-3 चे फंडे आठवायला लागले.
इतका सुंदर विषय इतक्या लोकांना इतका बोर का वाटतो?
Second year मध्ये गणिताच्या मास्तराशी आपण Fourier Series का शिकतोय म्हणुन वर्गात वाद घातला होता.
कुठलीही गोष्ट का करतोय हे कळल्यावर क्लिष्ट गोष्ट ’एवढीही’ क्लिष्ट वाटत नाही.
तसं कारण कळलं तर आळस आणि बेशिस्त थांबेल का?
’ज्याने वेळ सांभाळली त्याने आयुष्य सांभाळलं’ असं एका व.पुं. च्या पुस्तकात वाचलं होतं -

हेमिंग्वे ने वेळ सांभाळली का?

------------------------------------------------

जोडे

’The only advantage of being rich is - you can tell a stupid person that he is stupid' असं डेव्ह म्हणतो.
खरं खोटं त्यालाच माहित.
मागच्या वेळेस क्रिकेट खेळलो होतो तेव्हाचे चिखलात माखलेले शूज दाराबाहेर ठेवलेले.
ते दाराबाहेरही चांगले दिसत नाहीत म्हणुन बायकोने व्हरांड्याच्या कोपऱ्यात ठेवले.
शनिवारी कित्येक पावसात भिजेलेल ते शूज मी व्हरांड्यातच पण पावसाबाहेर हलवले.
मग रविवारी क्रिकेट टीम ने व्हॉलिबॉल खेळायचं का असं विचारलं.
५ वाजता ते लोक घ्यायला येणार होते.
मग साडे चारला मला शूजची आठवण झाली.
मग ते ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा ड्रायर मध्ये वाळवावेत याचा विचार करुन शेवटी ड्रायरमध्ये टाकले.
अर्धा तास त्यांची धडाम धुडुम ऐकल्यावर शूजच्या काळजीने ड्रायर उघडला.
शूज मस्त वाळलेले, पण ड्रायरची वाट लागलेली.
आत सगळी माती वगैरे.
आणि आख्या ड्रायरभर वाळलेल्या मातीचे सिमेट्रिकल धब्बे.
मग बायको वैतागली.
तिला म्हटलं मी साफ करतो, पण खेळुन आल्यावर - मग बायको अजुन वैतागली.
मित्र ५ म्हणुन साडे पाचला आले - त्यामुळे अर्धा तास बाहेर थंडीत कुडकुडायला लागलं.

वरचा सुविचार बायकोला सांगितला असता तर तिला निदान श्रीमंत झाल्याचं सूख तरी मिळालं असतं!

--------------------------------------------------------------

गीला गीला पानी.

भेंडी नखरे तरी किती!
पोट भूक म्हणतं किंवा तहान म्हणतं.
आणि त्याचं निमित्त करुन त्याला पाण्याची गरज असताना आपण ते पाणी घेतो, त्यात कॉफी मिसळतो, मग दूध, साखर किंवा साखर आणि कार्बोनेट वगैरे करतो, किंवा आणझी काय काय साखरेबरोबर....
H आणि O च्या नावाखाली OH वगैरे ही add होतं....
आणि प्रत्येक गोष्टीत आपण ’पाणी घालणे’ उपमा वापरतो.
अरे - आपण पाणी नाही घालत, पाण्यात काय काय घालतो!
आज भर दुपारी - ते पण ऑफिसात OH जास्त झाल्याने मी काहिच्या काही लिहितोय.
Christamas Party - दुसरं काय?
आता ३० मिलियन च्या प्रोजेक्ट चं पे एस्टिमेट करा. उगीच नाही economy डुबत!

---------------------

वतना वे...

मी तुसडा कि मी भगवा बैरागी
मद्यपी वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
पण नाव ठेववत नाही....

आज एक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आणि नॉट सो अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पोस्ट वाच
लं. दोन्ही चांगली जमलेली.
त्यामुळे वाचल्याचं समाधान वाटलं.
रुटीन मधल्या लोकांना रुटीन सोडुन काही करायला लावल्याने (आपला) दिवस चांगला जातो - असं एक वाक्य वाचलं आणि ’हं!’ अशी रिअ‍ॅक्शन झाली.
बायको बरोबर छंद शेअर करण्याहुन मोठं सूख नाही.
असल्यास मला माहित नाही.

बर्फात गाडी चालवत असताना ’चिठ्ठी आयी है’ आठवायचा प्रयत्न करत होतो.
आठवलं.
वेतन आणि वतन यांचा कॉन्फ़्लिक्ट धुमसत ठेवला कि आपणच आपल्याला ’डेथ बाय थाऊजंड कट्स’ देत रहातो का? असा प्रश्न पडला नाही.
वतन आणि वेतन हे शब्दखेळाचे प्रकार आहेत याची गंमत वाटुन त्यांच्याशी खेळायचा भाबडा प्रयत्न केला.

------------------------------

सिंहासन

च्यायला आज अचानक वाचलं कि बरखा दत्त आणि लॉबीइंग वगैरे काहितरी.
च्यायला लोकांना आश्चर्य कसं वाटतंय याचं मला आश्चर्य वाटतंय.

चरस पेहली आया या करप्शन?
चरस.
वो कैसे?
देख - चरस में नशा है, नशे में पॉवर है, पॉवर में करप्शन.

- हु तु तु (तब्बु आणि सुनील शेट्टी)

’इंडिया शायनिंग’ चं चरस आहे, त्यात सगळे मदहोश.
ज्याला पहिला होश येईल तो हरला.
 
--------------------------
 
उमराव जान

-6 टेम्परेचर.
परत.
खिडकीतुन बाहेर बघायचाही वैताग आलाय.
असं लिहितोय तेवढ्यात माझ्या ऑफिस समोरुन शमसा गेली.
शमसा म्हणजे आमची रिसेप्शनिस्ट.
मादक दिसण्या व्यतिरिक्त तिचं नक्की काम काय यावर आमची गॅंग बरेच दिवस विचार करतिये, पण उत्तर सापडत नाहिये.

आपके बारेमें पूछ बैठा कोई
जाने हमसे भी क्या बदहवा सी हुई
केहने वाले जो थी बात वोह ना कहीं
बात जो थी छुपानी बताने लगे....

आप से मिलके हम कुछ बदल से गए....

असं नुसरत गातोय.

शमसा पुन्हा इकडुन तिकडे घरंगळत.

आयला कामं व्हणार कशी?
 
--------------------------

धनगराच्या मेंढरानं माळरान व्यापली

माझ्या ऑफिसात मी रवी दिवाण ची दोन चित्रं लावलियेत.
दोन्हीत धनगर आणि त्याची कुटुंबं मेंढ्या हाकीत चाललियेत.
गावात जत्रेला बकरं कापायचं तर जो धनगर यायचा तो सोडुन धनगर या प्रकाराबद्दल फारशी माहिती नाही.
आकर्षण मात्र जबरदस्त.
हे आकर्षण फिरस्तीचं असेल का?
अवचटांच्या एका पुस्तकात धनगरांबद्दल बरंच वाचलेलं.
मग थोडं ’अलकेमिस्ट’ मध्ये वाचलं.
परवा ’अलकेमिस्ट’ चा उल्लेख ’जिंकी रे जिंकी’ मध्ये पाहिला.
हा चांगला पिक्चर.
’मुंबई पुणे मुंबई’ हा अफलातुन.
’लालबाग, परळ’ तोच तोच.
एनीवे - धनगरांची चित्रं पाहुन भारताची आठवण येते.
भारताची का लहानपणाची?
१० एक वर्ष परदेशात राहिल्यावर - भारत म्हणजे बालपण असं समीकरण होतंय कि काय?

--------------------------------------
 
अब तक शंभर.

काल अडीच तासाच्या प्रवासाला बर्फामुळे ५ तास लागले.
३-४ तास डेंजर प्रवास झाल्यावर म्हटलं - चला निदान थोडं ’थाई’ खाऊ.
म्हणुन पड थाई खाल्लं.
मग संध्याकाळी जे.जे. बरोबर सेबॅस्टियन नावाच्या उरुग्वेच्या प्राण्याला भेटलो.
मग कॅन ओपनर परत केलं. ३७

लोक का भांडतात?
२५ वर्षं का भांडत रहातात?
२५ वर्षं भांडुनही हरत किंवा जिंकत का नाहीत?
असं सगळं चित्रकलेचं राजकारण.

धबधबा धबधब्याच्या टोकावरुन खाली उडी मारतो का?
नसावा.
वर खालीचं सोयरसुतक धबधब्याला नसावं.
एनर्जी ट्रान्स्फ़र मुळे पोटेन्शिअल डिफरन्स निर्माण होणार आणि पोटेन्शिअल एनर्जीचं रुपांतर धबधब्यात होणार.

शंभर शब्दांना शंभर सेकंदांचं बंधन घातलं पाहिजे.
 
-------------------------------

स्थलांतराचे पाऊस.

दर वेळेस पिक्चर बघताना ’ही स्टोरी कुणालातरी सांगायलाच पाहिजे’ किंवा ’च्यायला इथे मी असतो तर काय केलं असतं’ असा विचार करतच बघायला पाहिजे असं काही नाही.
किंवा या वीकेंडला हे हे पिक्चर पाहिले - अशी लिस्ट करणं हा ही मुर्खपणाच.
एकापाठोपाठ एक जबरी पिक्चर्स पाहिले.
मजा आली.
विचार बिचार नंतर होईल.
एकच स्टोरी परत परत सांगितली कि पंच पॉइंट्स आणि पंचलाईन्स आपोआपच ओळखीच्या होतात.
कविता ऐकवणे हि ही अशीच पंचापंची.
पण त्यात मजा येते. ७३
पण नविन कविता ऐकुन जमाना झाला.

स्थलांतराचे पाऊस कुणाला आवडतात कुणाला आवडतही नाहीत...
तुमचं तुमच्या गावच्या कवितांवर किती प्रेम आहे यावर ते अवलंबुन आहे.
 
----------------------------- 
 
निशिगंधा वाड

च्यायला लाईफ मध्ये लई भारी काही चाललं असेल तर फालतु लिहायचा उत्साह येतो.
इथे सगळंच फालतु चालताना आणखी फालतु कसं लिहिणार?
मनसे रावण जो निकाले राम उसके मनमें है - हे ठीके हो, पण हेच फालतुपणालाही लागु होत नाही ना!
आज किटली, भाई, बाई आणि मुन्ना बरोबर जेवायला गेलो होतो.
किटली आमचा सगळ्यांचा बॉस, पण त्याला नसते कट शिजवायची भलती आवड आहे.
मग जेवणभर - आपण सगळ्यांनी एकत्र कंपनी सोडली तर मॅनेजमेंटची कसली लागेल यावर सविनोद चर्चा झाली.
पण ती अगदीच फालतु होती.

निशिगंधा वाड हे नाव मी मागचे १२-१३ वर्ष आठवायचा प्रयत्न करत होतो.
ते आत्ता आठवलं.

हा खरा फालतुपणा.
 
-------------------------------- 

चले चलो!

आयला - ये सही रेहनेका!
मायक्रो ब्लॉगिंग - १०० शब्दांचं लिमिट!
तर -
आज ऑफिसात बर्थ डे पार्टी झाली.
म्हणजे अ‍ॅक्चुअली कुणाचाच वाढदिवस नव्हता, पण मागच्या चार महिन्यातले झाडुन सगळे वाढदिवस एकत्र साजरे केले.
एकमेकांच्या अनोळखी शेजार पाजाऱ्यांशी बोलायला एकमेकांना अशा निमित्ताने निमित्त मिळतं असं काहितरी लॉजिक.
मला हल्ली डाव्या कानाने ऐकू येत नाही, त्यामुळे डाव्या बाजुने अ‍ॅरन बोलत होता त्याला हो हो म्हणत राहिलो.
आय होप त्याने मला पगार वाढ वगैरे मागितली नाही!
उजव्या बाजुच्या सिडनीने शिताफीने तिला पार्टनर आहे आणि ’ती’ ही इंजिनियर आहे हे पोचवलं.
मग घुटका घुटका दारु पीत बसलो.
आता लिहिताना सिडनीशी काय बोललो ते लख्ख आठव नाहिये.
 
---------------------------------- 
 
फैज

और भी गम है जमानेमें मुहब्बत के सिवा।

असं मी नाही - फैज म्हणतो.
म्हणजे फैज मुहम्मद फैज मधला फैज (बहुतेक).
म्हणजे हे तीन विविध लोक नसुन एकच माणुस आहे आणि तो फैज नावाने लिहितो.
म्हणजे - लिहायचा.
असं त्याने का लिहिलं माहित नाही.
असं मी इथे का लिहिलं मलाही माहित नाही.
काल वाचलं - आज लिहिलं - उगीच डोक्याला ताप नको.

तर असं.

----------------------------------

दिवस १ - ऑम्लेट

सकाळी उशीरा उठुन करण्याचा प्रकार.

ब्रेड -
शक्यतो शिळा नसावा.
म्हणजे अगदी बुरशी वगैरे नको.
जुना - थोडासाच वास येणारा वगैरे चालतो.
तर हा ब्रेड टोस्टरमध्ये टाकुन फ्रिज उघडावा.

विचार -
ब्रेड भाजत असताना ऑम्लेटचा विचार सोडुन त्याच्या हरलेल्या सावत्र भावाचा - म्हणजे स्क्रॅम्बल्ड एगचा विचार करावा.
हा विचार करताना तुमच्या बापजन्मात कुणी स्क्रॅम्बल्ड एग काळं का गोरं पाहिलं नसलं तरी चालतं.
त्यात टाकायला दूध नसल्याने बियर टाकावी का?
हा ही विचार करायला बंदी नाही.

अंडी -
दोन गोरी गोमटी.
ती फोडताना जरा आदराने.

इतर फालतू -
हाताला लागेल ते.
कांदा, ढोबळी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो.
सगळं अगदी चमचा चमचा.
एक लांब हिरवी मिरची.
हीचं उभं पोट फाडुन आतल्या बिया काढाव्यात.
मग उरलेली कातडी आडवी सोलावी.
ऑम्लेट करताना चव मिठापुरती, आणि रंगसंगती महत्वाची.
बाकी तेल, लोणी, पार्मिजिआन चीज, अमूल चीज आणि वरुन उगाच किडे म्हणुन जिरे.
इतर फालतू मधलं काहीही नसलं तरी चालतं.
भलतंच असलं तरी चालतं.
हॅम बीम पण तुफान लागतं.

कृती -
तेल तव्यावर पसरावं.
अंदाजाने चालतं.
हे विसरलात तर अंडं तुमची आणि तुम्ही त्याची आय भईण काढता.
कुठलीही स्प्रिंग किंवा फोर्कने अंडं सोन्याचा रंग येईपर्यंत ढवळावं.
मग मीठ आणि वर सांगितलेल्या गोष्टी त्यात रॅन्डमली टाकुन हे मिश्रण तव्यावर ओतावं.
इकडे तिकडे पसरलेले टोमॅटोचे तुकडे सिमेट्रिकली लावुन डिझाईन तयार करावं.
मग पार्मिजियान चीज बिनधास्त शिडकावं.
आता काढलंच आहे तर अमूल बटरचा एक काप पण टाकावा.
येवढं सगळं करेपर्यंत कंटाळा येतो.
म्हणुन मग ऑम्लेट उलटण्याच्या फंदात न पडता कुणी बघत नाहिए असं पाहुन दुसर्‍या तव्याने झाकुण टाकावं.
आता काय करायचं हा विचार करताना मग टोस्टरमधल्या भाजुन गार पडलेल्या ब्रेडची आठवण येते.
मग ’तू भी क्या याद करेगा’ म्हणत त्यावर लोणी फासावं.

प्लेट बीट -
कुठलीही गोल प्लेट चालते.
शक्यतो सिरॅमिक असावी.
का ते माहित नाही.
शिवाय ती गोल असावी, कारण तवा गोल वापरला तर कितीही प्रयत्न केला तरी ऑम्लेट गोल होतं.

ऑम्लेट अर्धं कच्चं असतानाच गॅस बंद करावा.
कारण ते तव्यावर शिजलं तर प्लेटवर पोचेपर्यंत त्याचा जीव जातो.

मग खावं.

ड्रेस कोड -
ऑम्लेटचा आणि कपड्यांचा थेट काही संबंध नाही.
कपडे घालून बनवलं तर बहुतेक चांगलं लागत असावं.

5 comments:

  1. Falatu.Evdha type karnyat vel vaya ghalvanyapeksha ajun don omlet khaun zale asate.

    ReplyDelete
  2. Quotes ani Reactions (Ani Sandeep Khare chakka 2 velela:) ).......good!

    ReplyDelete
  3. 'कारण तवा गोल वापरला तर कितीही प्रयत्न केला तरी ऑम्लेट गोल होतं. ' he vachun mothya tavyavar chota omlet karaycha asafal praytna athavla ani hasu aala. :) Ugach vedyasarkhi office madhe ase vachun ektach hasun pan 4 ek varsha jhalit. :) maja aali.
    'Nice post' etc lihaychi ichha hot nahiye. karan he post mhanje eka vichar vachtana kelela vichar dusarya minitala badlun dusarikadech net hota tyamule post kasa ahe vichar karayla velach milala nahi. :)

    ReplyDelete