Saturday, September 09, 2006

'बाकी शून्य' बद्दल -

जून मध्ये आमच्या शेवटच्या भेटीत राहुलने आवर्जून 'बाकी काही घे न घे - हे पुस्तक घेच' चा आग्रह केला आणि घेउन आलो.
'एम टी आयवा मारु' (पुन्हा), 'फाईव्ह पॉइंट समवन', आणि 'दा विन्सी कोड' च्या नादात महिना उलटला.
एकट्यानेच चिपोटलेत लंच ला जायचा कंटाळा आला एका रविवारी म्हणून मग 'बाकी शून्य' घेउन गेलो.
पहाटे तीन वाजता वाचून संपलं (संपवलं नाही) आणि 'वाचलेच पाहिजे असे काही....' च्या लांबलचक यादीत हे पुस्तक मानाचं स्थान मिळवुन बसलं.
काल ट्युलीपने हे पुस्तक हाणून पाडलं आणि 'खेद वाटला - आश्चर्य नाही' ची सवयीची भावना निर्माण झाली.

मला 'मोठा झालो' ही जाणीव लई सूख देउन जाते. लहाणपण त्रासाचं होतं अशातला भाग नाही, पण एकतर रात गई, बात गई - निघुन गेल्या काळाबद्दल किती झुरायचं - ही एक बाजू आणि दुसरी म्हणजे (आई पप्पांनी तुफान स्वातंत्र्य देउनही) हजार रेस्ट्रिक्शन्स वाटायची. म्हणजे आजुबाजुला भरपूर माणसं दिसायची, पण कळायची नाहीत. ही माणसं मोठी आहेत, पण त्यांनी त्यांच्या लहानपणी काय (काय) केलं असेल याबद्दलची उत्सुकता वाटायची. मग हीच माणसं कुठलीतरी 'भयानक कृती' करायची - म्हणजे (जनरली) प्रेम, लग्न, परिक्षा न देणं अथवा नापास होणं अथवा कमी टक्के पाडणं (मोठ्यांच्या द्रृष्टीने एकुण एकच), नोकरी सोडणं, आत्महत्या अथवा व्यसनं (हे ही एकुण एक) - आणि मग इतर सगळी मोठी लोकं एकत्र येउन यांना (युजुअली पाठीवर) शिव्या घालायची. हे 'भयानक कृती' करणारे लोक असं का करतात याबद्दलही आश्चर्य वाटायचं पण मी लहान असल्याने लोक मला 'फुल स्टोरी' सांगत नाहीत हे माहिती असायचं.
कसं वागायला पाहिजे चे धडे घेताना - 'मीच का?' आणि 'असंच का?' बरोबरच 'सगळेच असंच वागतात का?' याबद्दल भयानक (आणि रास्त) शंका वाटायची. 'कुठे जात आम्ही पुढे काय आहे' याबद्दल तुफान कन्फ्युजन व्हायचं.

त्यामानाने मोठा झाल्यावर धमाल असते - अभ्यास केल्याचे पैसे मिळतात, (माझ्या) उरल्या वेळेत काय करावं (हे मला) हे सांगणारं कुणी नसतं, तसंच कुणाशी कसं वागावं, काय पहावं, वाचावं, ऐकावं, खावं (प्यावं) हे ही. घरापासून दूर राहिल्यावर नात्यांचा बागुलबुवा ही नसतो. आयुष्य 'क्रुज कंट्रोल' वर टाकून छंद जोपासता येतात.
पण तरीही - आजुबाजुची माणसं अजुनही कळत नाहीत.
अमर्याद स्वातंत्र्यातही टोचायला लागल्यावर मीच माझ्यावर घातलेली बंधनंही जाणवायला लागतात.
पण फरक म्हणजे - (अभ्याच्या भाषेत) वाढत्या वयाने असेल कदाचित, पण आता ही लोकं आणि त्यांची आयुष्य 'कन्फ़्युजींग' न वाटता 'फॅसिनेटिंग' वाटायला लागतात. म्हणजे कळ्याने (मेरिट लिस्ट गाजवूनही) इंजिनियरींग कंप्लिट का केलं नसेल, अजेयचा संन्यास, सौरवचं स्वत:वर सुऱ्याने वार करून घ्यायचं वेड.....

परवा बाबाला फोन केला.
तो म्हणे 'हजारों ख्वाईशें ऐसी' बघतोय.
इतर कुठला पिक्चर असता तर त्याला तो बंद करायला लावला असता, पण 'हजारों...' मुळं 'दोन तासाने फोन करतो' म्हटलं.
बाबाचं एक चांगलं आहे - तो एक उत्कृष्ठ श्रोता आहे.
त्याने - मामा, तुला या पिक्चर मध्ये (एवढं) काय आवडलं? विचारलं आणि पुढचे दोन तास ऐकत बसला.
मला त्यातली 'इनएव्हिटॅबिलिटी' आवडली.
पिक्चर मधलं सत्तरच्या दशकातलं वातावरण, संगीत, अभिनय (चित्रांगदा....कहर), संवाद अल्टिमेट आहेतच, पण हा पिक्चर हजार ठिकाणी 'घसरू' शकला असता - तो घसरू न देणं - हे श्रेय दिग्दर्शकाचं.....
हे हे असं असं झालं.
बास.
आता त्याचे जे जे अर्थ लावायचे - ते तुमचे तुम्ही लावा.
हा एक 'ऍडल्ट' पिक्चर आहे - तो 'पर्सेंटेज ऑफ स्किन' साठी नव्हे तर 'पर्सेंटेज ऑफ सेन्सिबिलिटी' साठी.

'हजारों....' चं विषयांतर 'इनएव्हिटॅबिलिटी' च्या उदाहरणासाठी.
'बाकी शून्य' मला असंच 'इनएव्हिटेबल' वाटलं.
बऱ्यापैकी सुखी (श्रीमंत नव्हे) घर, शाळा, (मध्ये मेरिट), कॉलेज, इंजीनियरींग, नाटक पिक्चर चा छंद, यशस्वी नोकरी, युपीएस्सीची तयारी इथपर्यंत सरळसोट मार्गाने आलेला एक तरुण व्यसनाधीन होतो आणि संन्यास घेतो. यादरम्यान त्याच्या डोक्यात असणारी सेक्शुऍलिटी....
पुस्तक न वाचलेल्या परिक्षकांनो - या दोन वाक्यांवर तुमची पानभर परिक्षणं लिहा.
डोक्याला झंझट नको असलेल्या लोकांनो - या माणसाला चूत्या समजा व पुढे चला.
वाचनाचं वेड असलेल्या लोकांनो - असलं काही 'वाईट' वाचून तुमचं 'चांगलं' वाचण्याचा हुरुप वाढावा म्हणुन तरी हे पुस्तक वाचा.
पुस्तक विकत घेउन वाचणारांनो - तुमचं अभिनंदन.

या दोन वाक्यांच्या अधेमधे पाचशे वीस पानं घडतात.
'काजळमाया'ची सुरुवात जी.ए. थोरौच्या ज्या 'इफ अ मॅन डजंट कीप पेस विथ हिज कंपॅनियन्स - परहॅप्स - ही हिअर्स अ डिफरंट ड्रमर' वाक्यानं करतात, त्या वाक्यातला ड्रम या पाचशे वीस पानांत ऐकू येतो.
एस.एल.भैरप्पा जे मनमंथन करुन व्यक्तिरेखा - आणि कन्नड साहित्य - मराठीच्या 'कैक तीर पल्याड' घेऊन जातात - ते मंथन या पाचशे वीस पानांत घडतं.
कळ्या, अजेय, सौरव, आशा, दाई, सुभाष दादा, राधिका - जे कन्फ़्युजन देतात ते ही पानं काही अंशी उलगडतात.
यातल्या नायकाचं आयुष्य स्टिफन किंगच्या 'रीटा हेयवर्थ ऍंड शॉशॅंक रिडेम्प्शन' च्या ताकदीनं रेंगाळतं.
यातला नायक मला माझ्यात आणि माझ्या प्रत्येक मित्रांत दिसतो - जो मला 'कोसला'तही दिसला होता.
हे पुस्तक ऍडल्ट आहे यात वादच नाही - पण ते स्किनसाठी नव्हे तर सेन्सिबिलिटी साठी त्याहुनही जास्त त्याच्या इनेव्हिटॅबिलिटी साठी.....
या 'दोन वाक्यी' तरुणाची 'पाचशे वीस' पानी 'फुल स्टोरी' सांगुन हे पुस्तक मला 'मोठं' करतं.....

इती.

मी पुस्तक परिक्षक नाही.
या पुस्तकाचं एकही परिक्षण मी वाचलेलंही नाही.
एवढं सगळं - तुम्हाला पुस्तक आवडावं यासाठी नाही.
होता है, चल्ता है, दुनिया है - कधी कुठलं पुस्तक आवडुन नावडतं, नावडुन आवडतं, 'हर कुत्तेका दिन होता है' सारखं 'हर किताब का दिन होता है'.
आणि नाहीच आवडलं तरी 'परहॅप्स वी हिअर अ डिफरंट ड्रमर' ही शक्यता उरतेच ना?

त्या शक्यतेस.....चिअर्स!

12 comments:

  1. आपलं लेखन आवडलं. "बाकी शुन्य" अजून वाचलं नाहिये- पण वाचायच्या यादीत बरेच दिवस होतं.

    ReplyDelete
  2. Baki ek shoonya vachale nahiye...
    parixane khup vachali ahet... donhi prakarachi... pan vachvese vatat navate... ata kadachit vikat gheunach vachen... thanks :-))

    ReplyDelete
  3. भन्नाट लिहिता तुम्ही!
    आयवा मारु, 'फाईव्ह पॉइंट समवन' झालेय आता बाकी शुन्य वाचेन.
    -मंजिरी

    ReplyDelete
  4. मामा, तुझा वाचकवर्ग वाढतोय! दरवेळी नविन माणसं बघतो मी तूझ्या कॉमेंट्स मध्ये! हे कसलं लक्षण अजून? :-) Keep it up!

    बाकी वाचनाबद्दल आपल्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत ह्यात शंकाच नाही! शिव्या घालणार आहेस हे माहितीये, तरीही सांगतोय की तूला एखादं पूस्तक आवडलंय म्हणजे ते "अवजड" असेल अशी उगाचच भीती वाटते - कदाचित तू जी ए, द्स्तयेवस्की आणि तत्सम लेखकांचा मूक्त उल्लेख केल्यामूळे मी आपला घाबरून जात असेल! ;-)

    मी अनिल अवचट, फ़ॉरसिथ, रॉबिन कूक, किंवा गेला बाजार प्रेम पॅनिकर, शिरिष कणेकर, इत्यादि वा़चणारा... तूझी पूस्तकांची चॉइस निराळीच!

    "द डायरी ऑफ़ अ यंग गर्ल" नावाचं ऍन फ़्रॅन्क नावाच्या एका ज्यू मुलीने नाझींपासून वाचायचा प्रयत्न करत जगताना लिहिलेलं पूस्तक मी घेऊन आलोय पण सब्जेक्ट मॅटरच मला इतके depressing वाटतं की मी ते पुस्तक संध्याकाळी थकून आल्यावर उघडूच शकत नाही! ते पडलंय आणि फ़ॉरसिथचं The Negotiator मला attract करत राहतं.

    आता मी "करंटा" आहे असं तू म्हणशील.

    पण मी म्हणेन - perhaps we hear a different drummer!

    बाबा.

    ReplyDelete
  5. रैना, शंतनु, मंजिरी - प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
    तुम्हालाही हे पुस्तक आवडो - या शुभेच्छा!
    आणि या बाबाला नेहमी सांगतो तसं - सगळ्यांच्याच आवडी सारख्या नसतात. तसंच प्रत्येकाच्या पुस्तकांमधल्या इनव्हॉल्व्हेंट्स ही....
    मी जरा जास्तच इनव्हॉल्व्ह होऊन पुस्तक वाचतो (मान्य - माझी लाल!), त्यामुळे वाचनाप्रमाणे माझे मूड्स ही बदलतात. हे पुस्तक वाचुनही मी काही दिवस वेगळ्याच विचारात होतो.
    तुम्हाला हे पुस्तक आवडेलच याची गॅरंटी नाही.
    मला आवडलं इतकंच.
    बाबा - 'डायरी ऑफ ऍन फ्रॅंक' नक्की वाच - कितीही डिप्रेसिंग वाटलं तरी.
    दारात उभ्या रहिलेल्या मृत्यूला दारं खिडक्या बंद करून बाहेरच तंगवता येतं - हे शिकशील!
    'निगोशिएटर' एवढं 'सुसाट' पुस्तक फार कमी वेळा वाचायला मिळतं हे मात्र नक्की.
    बाकी भैरप्पा किंवा जी.ए. यांचे उल्लेख (दोस्तोवस्की मी अजुन वाचला नाहिये) केवळ पुस्तकाचा विषय तसा होता म्हणुन, नाहितर अवचट, फोरसिथ ही आपापल्या विषयातले बापच!
    आणि बाबा - उगीच मला पुस्तक परिक्षक बनवु नकोस. च्यायला हल्ली माझ्यापेक्षा जास्त वाचन तुझंच चाललंय!

    ReplyDelete
  6. वाचकवर्ग वाढतोय हे classes कडून masses कडे जाण्याचं + ve(?) लक्षण म्हणता येईल की:P
    :D

    ReplyDelete
  7. mama, tula tulip ne TomaNa maralaye! kaLala ka? ;)

    ReplyDelete
  8. ऍक्चुअली नाही कळला!
    म्हणजे नाही गुणिले नाही म्हणजे हो, कि नाही कि बहुतेक....
    थोडक्यात वाचकवर्ग वाढतोय हे चांगलं कि वाईट (तिच्या मते) हे कळलं नाही.

    ReplyDelete
  9. ...baakI shoonya chaa collegemadhalaa ardhaa bhaag mihI kamalesh barobar jagloy!

    ReplyDelete
  10. Aayushya cruise control war takanyachi idea bhannat !
    Baki shunya wachnar.

    ReplyDelete
  11. बाकी शून्य वाचलंय....
    आणि खूप आवडलय....
    डोक्यात शिट्ट्या वाजतात आणि बर ही वाटत...
    जिवंत असल्याची virtual feeling देत हे पुस्तक....
    बाकी लेख उत्तम...!!!
    ते पुस्तक वाचून पुस्तकापेक्षा स्वतःचच परीक्षण होत एवढ खर....

    ReplyDelete
  12. Me - 'डोक्यात शिट्या वाजतात’ ही उपमा आवडली.
    जिवंत असल्याचं virtual feeling ही कन्सेप्ट मात्र कळली नाही.

    ’पुस्तक वाचुन पुस्तकापेक्षा स्वत:चंच परिक्षण’ - हे तंतोतंत.
    आणि तसं नसतं तर मी वाचीनच का? असा डोक्यात आलेला पहिला विचार!

    ReplyDelete