Wednesday, March 19, 2008

चि. विश्वनाथ - हजामा, आठव!

आज ठरवुन बोर लिहायचा विचार आहे!
आय मीन - न ठरवताही बोर लिहिणार असेल तर च्यायला ठरवुन काही केल्याचं समाधान तरी का नको?
शिवाय युजुअली मन:स्थिती जशी असेल तसं लिहिलं जातं - त्यामुळे unpretentious लिहायचं असेल आणि जसं आहे तसं दाखवायचं असेल (बघणार कोण आहे म्हणा) तर बोरियत बाहेर पडणार.

काय विशेष नाय - सकाळी उठुन बायकोबरोबर ऑफीसला जातो.
घरापासुन पाच मिनिटांच्या अंतरावर बायकोचं ऑफीस - सहाव्या मिनिटाला माझं. (च्यायला आम्ही तरीसुद्धा दोन दोन गाड्या का विकत घेऊन ठेवल्यात काय माहित).
मग ऑफिसात जरा इकडे तिकडे, मग कॉफी, मग मेल्स, मग न्युज, मग थोडं काम, मग लंच, मग काहीतरी रटाळ काम आणि मग बायकोला घेऊन घरी.
तर हा दिनक्रम - त्यामुळे त्यात लिहिण्यासारखं काय घडणार?
गोष्टी बिष्टी लिहायच्या फडतुस विचारात अडकुन सहा एक महिने घालवले (त्यात एकही गोष्ट सुचली नाही).
ऑफिसमधल्या सनसनाटी (!) घटनांमध्ये मलाच इंटरेस्ट नसतो - त्यामुळे त्यातही विशेष काही नाही.
वीकेंड्स....सगळ्यांच्या वीकेंड्स सारखे हळुहळु येतात आणि भरभर जातात. शिवाय रविवार हा आठवड्यातला सगळ्यात भीषण दिवस! त्याच्यापेक्षा गुरुवार शुक्रवार कितीतरी प्रेमळ!
सर्किट म्हणतो त्याप्रमाणे आयुष्याची पानं उलटत रहायची - मग त्यात काय लिहिणार?

बाबाची मागच्या पोस्टवरची कमेंट वाचुन वाटलं, च्यायला खरंच मी माझ्या कामाबद्दल का नाही लिहीत? जेव्हा दुनियेतली सगळी जनता एकाच प्रकारची मगझमारी करत असते - तेव्हा मी तरी ’हटके’ काम करतो....
साईट - मग ती कुठलीही असेना - हा एक भन्नाट प्रकार असतो.
पण त्याबद्दल लिहिणं म्हणजे लिखाण टेक्निकल होण्याची भिती.
टेक्निकॅलिटी शिवायचा त्याबद्दलचा दुसरा प्रॉब्लेम असा कि सिव्हिल इंजिनियरिंग - या विषयाबद्दल लिहायचं म्हणजे ते ’रारंगढांग’, ’आम्ही भगिरथाचे पुत्र’ आणि काही प्रमाणात ’द फाउंटनहेड’ च्या तोडीचं नाही झालं तर त्यात काही राम वाटणार नाही अशी एक निष्कारण भिती.
निष्कारण कारण....जे इनएव्हिटेबल आहे ते झालं तर काय - अशी भिती वाटुन घेण्यात काय हशील?

तर - प्रोफेशन बद्दल लिहावं.

तर प्रोफेशन.
एकेकाळी माझेही रविवार प्रसन्न होते! त्यावेळी वय अवघे अकरा असल्याने असेल कदाचित, पण अशाच एका प्रसन्न रविवारच्या प्रसन्न सकाळी फिजिक्स लॅबमध्ये बसुन पोंक्षे सरांबरोबर ’ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ पाहिला आणि सिव्हिल इंजिनियर बनायचं ठरवलं.
असं आता आठवतंय - पण इतर आठवणींसारखंच - एवढं धडधडीत विधान करणं योग्य का असा प्रश्न पण मनात येतोय. कारण एवढं ठरवलं वगैरे असतं तर भविष्यातल्या झका मी का मारल्या असत्या?
मे बी ’जंजीर’ बघुन जसं इन्स्पेक्टर बनावंसं वाटलेलं तसंच ’ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ बघुन सिव्हील इंजिनियरिंग बद्दल वाटलं असणार.
ठरवलं नक्की कधी याबद्दल माझंच कन्फ्युजन आहे, पण तसं वाटलेलं हे नक्की.
पुढे (गोनीदांच्या) ’आम्ही भगिरथाचे पुत्र’ ने ती ओढ वाढली.
(प्रभाकर पेंढारकरांच्या) ’रारंग ढांग’ ने आणखीनच तीव्र झाली. (हे पुस्तक वाचुन BRO - Border Roads Organization - साठी काम करण्याची इच्छा अजुनही अधुन मधुन मान वर काढते).
पण एवढं होऊनही - मी CME - म्हणजे College of Military Engineering - च्या परिक्षेला कल्टी मारली ही फॅक्ट आहे. तशीच INS शिवाजी मध्ये Naval Architecture चा प्रवेश नाकारला ही पण. कदाचित तेव्हा भोपाळच्या SSB - Service Selection Board - मध्ये ऐकलेला ’अंधे लौडे फौजमें दौडे’ हा सुविचारही त्याला कारणीभूत असेल.
मग बारावी झाल्यावर (रिझल्ट यायच्या आधीपासुनच) ’मी सिव्हिल इंजिनियरिंग करावं कि नाही’ यावर पप्पांशी घुमशान लढाया सुरू झाल्या. (पुन्हा) एवढं सगळं करुन - सुखासुखी मिळणारी सिव्हिल इंजिनियरिंगची ऍडमिशन नाकारुन मी Instrumentation & Controls या शाखेत प्रवेश घेतला!

इथे एक मेजर गोष्ट झाली. पहिलं वर्ष संपलं आणि वाचंच म्हणुन सत्यजितने माझ्या हातात ’द फाउंटनहेड’ कोंबलं. आता मेजर गोष्ट म्हणजे - या पुस्तकात मला हॉवर्ड रॉर्क रुपी देव भेटला (ज्याची जागा आजतागायत कुणी माईका लाल घेऊ शकलेला नाही) आणि त्याने मला पुढची तीन वर्ष ’जिस गांव जाना नहीं उस रस्ते चलनेसे क्या फायदा?’ म्हणत मरणाचं छळलं! ही छळवणुक सोसत आणि (एक दिवस) सिव्हिल इंजिनियर बनायची स्वप्नं पहात मी Instrumentation इंजिनियर झालो!

BE झाल्यावर (म्हणजे अगदी नुक्ता नुक्ता - गरम गरम - झाल्या झाल्या - म्हणजे शेवटचा पेपर दिल्या दिल्या) टोटल राडा.
अगदी हाथी घोडा पालकी....करत आणि Absolute विध्वंस mode मध्ये मी Instrumentation ला रामराम ठोकला, आणि स्वत:ला Civil Engineer ही पदवी प्रदान केली.
एकतर रॉर्कचं भूत मानेवर संवार आणि ’जर मला उरलेलं आयुष्य सिव्हिल इंजिनियर म्हणुन घालवायचंय तर त्याची सुरुवात आजच आणि झालीच पाहिजे’ हा एक विचार.
तर थोडक्यात सांगायचं म्हणजे - पुढे २ वर्ष भारतात कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम करुन मी अमेरिकेला कल्टी मारली. मग इथे निवांतपणे (हे जरा अगदीच निवांतपणे झालं) सिव्हिल इंजिनियरिंगचं उच्चशिक्षण वगैरे घेऊन मागचे चारेक वर्ष इमानेईतबारे (हे फक्त म्हणायला) चाकरी करतोय.

हे सगळं लिहिताना मला मी माझा रेझ्युमे इथे का लिहितोय असा प्रश्न पडायला लागलाय!

तर आता माझी आणखी जास्त लाल करण्यापेक्षा आपण भारतात सिव्हिल इंजिनियरिंगचा धंदा कसा चालतो याच्या सुरस कथा ऐकु.
म्हणजे मी सांगतो - तुम्ही ऐका.
आय मीन - वाचा.

आता इथे काही disclaimers (म्हणजे बहुतेक नकारघंटा) टाकले/टाकल्या पाहिजेत.
१) मी स्वत:ला सिव्हिल इंजिनियर असं डिक्लेअर वगैरे करुन काही फायदा झाला नाही (तो होणार नव्हताच - पण तरी - झाला नाही). रॉर्कच्या नादाला लागल्याने मला ’काम’ करायचं होतं - कुठलंही आणि कुठेही. ते मी केलं.
२) Unofficially मी designs वगैरे केली - पण officially मी contractor म्हणुन काम केलं. (तसंही designs करायला logic आणि common sense शिवाय फार काही लागत नाही - तरिही...)
३) इथे नमुद केलेले (म्हणजे करीन ते) अनुभव माझे वैयक्तिक आहेत - तुमचे अनुभव वेगळे असु शकतील.
४) इथे नमुद केलेल्या (मी सोडुन) प्रत्येक व्यक्तीचे नाव बदललेले आहे.
५) भारतात प्रचंड भ्रष्टाचार चालतो, पण भ्रष्टाचार करणारा माणुस बुद्धीने तल्लख असणं आवश्यक असतं. त्यामुळे सिस्टिम कितीही disgusting असली तरी भारतात तल्लखबुद्धी सिव्हिल इंजिनियर्सची कमी नाही. रस्त्यांवर कितीही खड्डे असोत, गटारं कितीही वाहती (अथवा न वहाणारी) असोत आणि दरवर्षी मुंबई कितीही बुडो, ही सेना - अनियमीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आणि नियमीत मिळणाऱ्या (आणि नाईलाजाने स्वीकारल्या जाणाऱ्या) लाजिरवाण्या लाचेवर - देश चालवते ही वस्तुस्थिती आहे. (तरीही त्यांनी केलेला भ्रष्टाचार समर्थनीय नाही).
६) भारतात राहुन, भ्रष्टाचार न करता सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये जागतिक तोडीचं काम करणारे लोक आहेत - अशा काही लोकांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. पण त्यांची संख्या (काळजी वाटावी एवढी) कमी आहे.

अजुन काही disclaimers आत्तातरी सुचत नाहिएत! सुचले तर जेव्हा सुचतील तेव्हा लिहीन.

मयुरेश आणि शची या जवळच्या मित्रांनी अमेरिकेला रामराम ठोकुन भारतात सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये काम करायचं ठरवलंय. Believe me - सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये (अजुनही) हा धाडसी निर्णय आहे. हा लेख त्यांच्यासाठी!
मयुरेश, शची (आणि राधा, अर्जुन) (आणि तुमच्या आधी गेलेला मंदार) - Best of luck - लढा!

----------------

कंत्राटदार हा एक भिकारचोट शब्द आहे.
कॉन्ट्रॅक्टरला कंत्राटदार कुणी म्हणत नाही. आपल्याकडे पेपरमध्ये बोली भाषेतले शब्द वापरण्याची प्रथा नाही आणि तिथे कॉन्ट्रॅक्टरचा कंत्राटदार होतो. कॉन्ट्रॅक्टर ही जगातली बहुतेक सगळ्यात बदनाम जात. यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिनकामाचे पैसे घेणे - हा आरोप या जातीवर सर्रास होतो. तो बऱ्याचदा रास्त असतो.

मी काम करायला लागलो एका नातेवाईक मामांबरोबर. ते earthwork contractor होते. खरंतर माझे आजोबा (आईचे बाबा) ही contractor होते एकेकाळी, पण त्यांच्यानंतर त्यांचा व्यवसाय कुणी चालवला नाही. पुरंदर गडावर जाणारा गाडीरस्ता त्यांनी बांधला असं आई सांगते.
तर मी माझ्या या मामांबरोबर काम करायला लागलो.
आता earthmoving contractor म्हणजे काय? तर जो contractor माती एका ठिकाणुन उचलुन दुसऱ्या ठिकाणी टाकतो त्याला earthmoving contractor म्हणतात.
आता तुम्हाला वाटेल यात विशेष ते काय?
खरं सांगु का?
काहीच नाही!
I mean - खरं तर इन जनरल - सिव्हिल इंजिनियरिंग या व्यवसायाबद्दल विशेष असं काहीच नाही. लोक जेव्हा माझाच (म्हणजे त्यांचाच) धंदा कसा महत्वाचा - याबद्दल वाद घालायला लागतात तेव्हा माझी सॉलिड चिडचिड होते! खरं सांगायचं तर कुठलाच धंदा महत्वाचा नाही किंवा सगळेच महत्वाचे - किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं - उगीच मला पटवायच्या फंदात पडु नका.
आता कृती असते एवढीशी - कि एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी नेउन टाकायची - पण त्यात हजार झंझटी येतात. म्हणजे - ही कृती करायला तुम्ही शे-पाचशे मजुर लावणार आहात कि earthmoving machinery?
हल्ली या कामासाठी मजुर (आणि माती वाहुन न्यायला गाढवं) वगैरे कुणी वापरत नाही - आमच्याकडे यासाठी JCB आणि Poclain नावाची machinery होती - आणि हो - डंपर! (खरं तर मी कार बीर नंतर चालवली - ’ड्रायव्हिंग’ शिकलो ते या डंपरवर!)

JCB हे एक ट्रॅक्टर सारखं दिसणारं मशीन असतं (याला इकडे अमेरिकेत Back hoe म्हणतात), आणि त्याला हातासारखा दिसणारा अवयव असतो! ज्याला arm म्हणतात (duh!) आणि त्याला जोडलेलं - माती उचलणारं (हाताच्या पंजासारखं) - bucket. पुढे bulldozer सारखं दिसणारं (आणि त्याच्यासारखंच वागणारं) पातं असतं. हे एक मजबूत काम करणारं यंत्र - पण इतर मोठी यंत्रं पाह्यली कि ’हे म्हणजे काहीच नाही’ असं वाटु शकेल.

Poclain ला Poclain का म्हणतात माहित नाही - खरं तर ही (poclain) एक फ्रेंच कंपनी - ज्यांनी hydarulic excavation machinery बनवायला सुरुवात केली, पण ते १९७० च्या सुमारास! नंतर ही कंपनी विकली गेली आणि blah blah blah - पण कसंतरी त्या सुमारास हे नाव भारतात पोचलं आणि या particular यंत्राला चिकटलं! - ते आजतागायत!! (अशी कित्येक नावं कित्येक गोष्टींना चिकटलेली असतात, शिवाय सिव्हिल ही इंजिनियरिंग ची अशी एक शाखा - जिथे अनपढ लोकांशी बराच संबंध येऊ शकतो - त्यामुळे साध्या सुध्या इंग्रजी शब्दांचेही भयानक अपभ्रंश पहायला मिळतात - त्या अपभ्रंशांची मुळं शोधणं हा एक जबरा exciting खेळ होऊ शकतो).

तर poclain हे एक रणगाड्यासारखं tracks वर चालणारं यंत्र असतं, आणि JCB सारखा यालाही हातासारखा अवयव असतो - फरक एवढाच कि हे यंत्र स्वत:भोवती गोल गोल फिरु शकतं - डंपर ’लोड’ करायला त्याच्यामुळे य बरं पडतं - शिवाय हे मशीन कुठेही जाऊ शकतं - काट्याकुट्यातुन, झाडाझुडपातुन, चिखल-राड्यातुन....
मी पहिल्यांदा हे मशीन पाह्यलं त्याची एक स्टोरीच आहे!

साईट होती - पुण्यापासुन तीसेक किलोमीटर वर.
असं फक्त म्हणायला!
तीसेक म्हटलं कि तीस ते शंभर - याच्या अधेमध्ये कुठेतरी असणार असं समजायचं.
या साईटबद्दल सांगायचं म्हणजे - पुणे नगर रोडवर (तीसेक किलोमीटरवर) आम्ही रस्ता (पुणे - नगर) सोडला आणि एका खेड्याकडे घुसलो.
आम्ही म्हणजे - मी, सुन्या मोहिते (contractor), आणि शंकर नावाचा poclain ऑपरेटर.
मग डांबरी रस्ता संपुन खडीचा रस्ता लागला.
मग तो संपुन बैलगाडीचा!
सगळीकडे उजाड माळरान, काट्याची झाडं (ज्याला बाभळी म्हणतात), अधुनमधुन येणाऱ्या टेकड्या, randomely पसरलेले दगड....

च्यायला या दगडाचीपण स्टोरीच आहे!
Contractor लोक (ऍटलिस्ट भारतातले - वेल, अमेरिकेतले फार काही वेगळे नसतात, पण आपण सध्यातरी भारतातल्या contractor लोकांबद्दल बोलु) फारसे शिकलेले नसतात. म्हणजे अगदीच अनपढ असतात असं नाही, पण त्यांना अर्धशिक्षित म्हणु.
काही लोक पदवीधर वगैरे पण असतात, पण B.A., B.Com. केलेले.
काही लोक डिप्लोमे (Diploma in Civil Engineering - यांना बोली भाषेत ’डिप्लोमे’ म्हणतात) असतात.
अगदी rarely वगैरे BE सापडतात, त्यांच्याकडे इतर contractor लोक कीवमिश्रीत आदराने बघतात.
यांना आयदर सॉलिड पोलिटिकल बॅकिंग असतं - किंवा हे लोक पराकोटीचे उद्विग्न असतात.
बर ते नंतर - तर contractor लोक इन जनरल (किंवा टेक्निकली) - अर्धशिक्षित असतात.
इंग्रजी शब्द वापरुन हे अर्धशिक्षण लपवण्याचा मग ते पराकोटीचा प्रयत्न करतात - हे सगळं पुढे (कदाचित) येईलच, पण इथे सांगायचं कारण म्हणजे - साधारण १ फुट diameter च्या sphere एवढ्या दगडाला - ज्याला आपण दगड किंवा छोटा दगड म्हणु शकु - अशा दगडाला हे लोक आवर्जुन boulder म्हणतात. (सुरुवातीला मला हे असे इंग्रजी शब्द वापरणं लई विनोदी वाटायचं - नंतर सवय झाली).

तर कुठे होतो आपण - हां - तर आम्ही असे डोंगर, बाभळी, भरपुर गवत आणि इतस्तत: विखुरलेले ’बोल्डर’ यांच्यामधुन गेलेली बैलगाडीची वाट फॉलो करत जात राहिलो.
अधुन मधुन बाभळी, गवत आणि बोल्डर - यांचं प्रमाण कमीजास्त होत होतं, पण तेवढंच.
इथे कुठलातरी मेजर प्रोजेक्ट चालु असेल अशी सुतरामही शंका वाटत नव्हती.
अशात - आपण मस्तपैकी हातातल्या काठीने आजुबाजुचं गवत हाणत जात असताना अचानक समोर गवा दिसावा - तशी दाण्‍कन ती हवेली आमच्यासमोर आली!
आय मीन - it was ridiculous!
इथे आजुबजुला काहीच नाही, रस्ता नाही, बाभळीचं जंगल, अशात कोण मरायला इथे रहाणार - असा प्रश्न आम्हा तिघांनाही पडला.
हवेली ऐतिहासिक वाटत होती.
ऑफकोर्स - तिचं आता खंडहर झालं होतं - पण एकेकाळची शान लपत नव्हती.
कुंपणात गवत माजलेलं - दारं-खिडक्या लोकांनी बाकायदा (म्हणजे बा च्या कायद्यानं) पळवलेली.
मागं उरलेला आणि आत अडकलेला - अनामिक इतिहास!
हे बघत आम्ही हवेलीच्या गेटसमोर थांबलो.
जीप बंद केली.
आणि पहिल्यांदाच भरदुपारी रातकिड्यांचा प्रचंड गोंगाट ऐकु आला!
प्रचंड कलकलाट करणारं ते स्तब्ध रान, काळी पडत चाललेली ती कोठी कि हवेली, आणि जीपने उडवलेला धुरळा खाली बसला कि आपले पुतळे होऊन आपणही या इतिहासाचा भाग होणार असं काहीसं आलेलं फीलिंग.
फारशी चर्चा न करता तिथुन कल्टी मारलीच पाहिजे यावर एकमत झालं.
मग आम्ही (ताबडतोब) तिथुन कल्टी मारली.

अंदाजाने थोडा वेळ गवतातुन जात राहिलो आणि अचानक हिरालाल कोठारींची हिरवीगार केळीची बाग दिसली.
काम इथेच चालु होतं.
हिरव्यागारीचं कारण म्हणजे - बाजुने वहाणारी, तुडुंब भरलेली, संथ नदी!
हिरालाल कोठारी आणि केळी - यांचा खरंतर बादरायणही संबंध नाही. पण कुठल्यातरी शासकीय अधिकाऱ्याने कोठारींना सांगितलं कि ’कोठारी - आता तुम्ही शेतकरी व्हा!’ म्हणुन कोठारी शेतकरी झाले.
म्हणजे - कागदावर!
पैसे कमावणे हा कोठारींचा एक आवडता छंद (आणि conscience धुवुन बिवुन स्वच्छ करण्या करता वेळ मिळेल तेव्हा तिरुपतीच्या खेपा घालणे - हा दुसरा). त्यात चोरांपासुन (म्हणजे - शासनापासुन) पैसा वाचवायचा असेल तर दाखवायला म्हणुन शेतीसारखा टॅक्स-फ्री धंदा नाही!
त्यात शासनाने केळीशेती वाढावी म्हणुन भरमसाठ सबसिडी डिक्लेअर केलेली.
म्हणुन केळी.
आणि अगदी काहीच न लावता पैसा लाटायचा हे बरं दिसत नाही म्हणुन हा प्रपंच, आय मीन - प्रोजेक्ट.
शेती ’लेव्हल करणे’.
शेती ’लेव्हल करणे’ हा सधन शेतकऱ्यांचा (आणखी एक) आवडता छंद. (इतर छंदांसाठी चौफुला वगैरे आहेच, अधिक माहितीसाठी एका माजी गृहमंत्र्यांना गाठावे). कारण शेती अशी ’लेव्हल’ असेल तर मोठमोठी यंत्रं वापरुन शेती करणं सोयिस्कर ठरतं.
हे सिद्ध करणारं संशोधन उपलब्ध आहे.
पण कुठे? तर अमेरिकेत!
यावर अवचटांनी ’माती आणि पाणी’ मध्ये लई भारी लिहिलंय.
एनीवे - तर तिथे मी पहिल्यांदा poclain पाह्यलं.
शंकर म्हणाला - ’चलिए भैय्या - आपको अंदरसे मिशन दिखा दुं!’ (राज ठाकरे - तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे कि महाराष्ट्रात रहायचं असेल तर पराभुत राजकारणाचं प्रतीक असलेला मरणप्राय बिहार तुम्हाला महाराष्ट्रात निर्माण करता येणार नाही. पण असं असुनही 'मावळत्या उन्हात, केवड्याच्या/बाभळीच्या बनात’ poclain चालवायला मराठी माणुस मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे).
तर मी शंकरला म्हटलं - ’चलो, दिखा दो!’
तुम्ही लोक gaming या प्रकाराचे रसिक असाल तर तुम्हाला joy stick म्हणजे काय प्रकार असतो ते माहित असेल.
असं रिमोटच्या आकारचं खेळणं असतं.
अशा त्या खेळण्याने हे अजस्त्र धुड हलतं.
अजस्त्र म्हणजे केवढं तर त्याच्या दोन बकेटमध्ये डंपर नुसता भरत नाही, तर वजनाने कुरकुरायला लागतो! त्याचं बकेट म्हणजे एक मोठा हौद असतो ज्यात पाच-सात माणसं आरामात मावतील. आणि हे सगळं - शिवाय tracks आणि गरगर motion - या joystick ने चालतं. (ही मशीन्स अमेरिकादी देशांत विकसित झाल्याने) operator ल बसायला प्रशस्त आणि AC केबिन असते.
त्या केबिनमध्ये बसवुन शंकरने मला त्याचं काम समजावुन सांगितलं.
तेवढ्यात सुन्या म्हणाला - ’चल अभि, तुला गंमत दाखवतो!’
मी त्या रणगाड्यातुन उतरता उतरता सुन्या आणि शंकरमध्ये काही खाणाखुणा झाल्या आणि मी आणि सुन्या बकेट बघायला गेलो.
त्या अजस्त्र बकेटला तीक्ष्ण लोखंडी वगैरे दात होते.
सुन्या म्हणे - ’जा बकेटमध्ये!’
म्हटलं - ’कशाला?’
’अरे जा तर - गंमत दाखवतो!’
’भाय मेरे - काय करणार आहेस ते सांग आधी’.
तर सुन्या म्हणे - ’अरे काय घाबरतो!’
असं म्हणुन सुन्या बकेटमध्ये जाऊन literally 'बसला'!
मग भीड चेपवत मी पण जाऊन बसलो.
मग शंकरने हत्तीच्या सोंडेच्या टोकासारखं बकेट आत वळवलं आणि त्याच सोंडेसारखा poclain चा हात वर उचलला. वर उचलत सरळ केला.
आता आम्ही जमिनीपासुन पंचवीसेक फुटांवर - हवेत!
तिथुन नदी, केळीची हिरवीगार बाग, त्याच्यापलिकडचं गवताचं पिवळंशार रान आणि बाभळी - नको इतक्या स्पष्ट दिसायला लागल्या.
वीस वर्षांचा होऊन ओरडणं प्रशस्त दिसत नाही म्हणुन मीपण ’सही है मॅन, सही है मॅन’ असं मोठयाने (आणि परत परत) म्हणायला लागलो!
मग शंकरने खालुन आम्हाला ’थम्स अप’ केलं. हसत हसत सुन्याने पण केलं. मला काहीच न कळल्याने मी पण.
मग शंकरने तो poclain चा हात मशिनभोवती बऱ्याच वेळा गोल गोल फिरवला! आयची आण - आजतागायत अमेरिकेतल्या कुठल्याही रोलर कोस्टरमध्ये माझी एवढी फाटली नाहिए जेवढी त्या दिवशी शंकरच्या poclain मध्ये फाटली!
खाली आल्यावर मग मलाही सहत सहत टाळ्या देणाऱ्या सुन्या आणि शंकर बरोबर हसायला लागलं! (हे सहत सहत चुकुन झालेलं नाहिए - ती चक्कर आठवली कि माझी अक्षरं अजुनही पुढे मागे होतात).
मग सुन्याने मला ’प्रोजेक्ट’ समजावुन सांगितला.
त्यात विशेष काही नव्हतं - इकडची माती तिकडे.
सिव्हिल इंजिनियरिंग - particularly construction - मध्ये इंजिनियरिंग पेक्षा मॅनेजमेंट - मशीन्स आणि माणसांचं - महत्वाचं ठरतं. १९९९ मध्ये मी पहिल्यांदा जेव्हा poclain (आतुन) पहिलं तेव्हा आम्ही ते तासाला रु.१२००/- या दराने भाड्याने देत होतो. त्याची किंमत तेव्हा - ४५ लाख रुपये होती. असं असताना हे मशीन रोज कमीत कमी १२ तास चालणं आवश्यक होतं. इतकं चालवल्यावर मशीनचं आयुष्य चार सहा वर्षापेक्षा जास्त असु शकत नाही. अशावेळेस डिझेल, इंजीन किंवा हायड्रॉलिक ऑईल, किंवा इतर मेकॅनिकल ब्रेकडाऊन्स मुळे मशीन २-४ तास न वापरता उभं ठेवणं परवडत नव्हतं. अजुनही नाही. शिवाय प्रॉब्लेम कितीही छोटा असला तरी असल्या अशक्य जागी - जिथे सायकल मेकॅनिक मिळणं मुश्किल - तिथे हे मशीन दुरुस्त करणं दुरापास्त होतं. मग अशावेळेस २-३ Operators (एक आजारी पडला तर काय घ्या!), स्पेअर पार्ट्स, ऑईल्स वगैरे तयार ठेवायला लागायचं.
एनीवे - हे सगळं कधी तर अजुन मी BE पण व्हायचो होतो.

मशीन वगैरे बघुन झाल्यावर जवळच्या एका विहिरीपाशी जाऊन बसलो - हिरवीगार झाडी, मागची नदी, केळीचं बन - सगळाच खतरनाक प्रकार होता. तिथे स्वैपाकाला ठेवलेल्या आजीबाईंनी मग आम्हाला गरम गरम भाकऱ्या आणि बोंबलाचं कालवण आणुन दिलं.
आता इथे नमुद केलंच पाहिजे म्हणजे - (शिवाय माझं लेखन ’प्रॉडक्टिव्ह’ वगैरे करण्यासाठी तुमच्यापैकी मला कुणी जेवायला वगैरे बोलावलंच तर) संगीत, खवैय्येगिरी वगैरे प्रकारांबद्दल अगदी ’अहाहा’ करुन हळहळ वगैरे व्यक्त करणारे लोक असतात.
मी त्यातला नाही.
मी काहीही खाऊ शकतो, काही न खाताही राहु शकतो. फक्त जेव्हा जेवीन तेव्हा मला ’क्वान्टिटी’ लागते - क्वालिटीशी माझं फारसं देणंघेणं नसतं. (MS करताना मी Taco Bell मध्ये जाऊन ७५ पैशांचा ’बीन बरिटो’ खाल्ला होता. रोज. सलग सहा महिने!)
एवढं सगळं असुन त्या वातावरणात खाल्लेलं बोंबलाचं कालवण आठवुन अजुनही तोंडाला पाणी सुटतं.
तट्ट जेवण झाल्यावर नदीत राईड मारुन यायची कि तिथेच झाडाखाली पडी टाकायची असा विचार सुन्या करायला लागला. म्हटलं - अरे आपण इथे काम करायला आलोय - पडी काय टाकायची?
तर सुन्या म्हणे - अरे अभि, आपण कामच करतोय! ही मशीन्स चालु आहेत ना - म्हणजे आपले मीटर पूर्ण क्षमतेने चालु आहेत - त्यातला कुठला बंद न पडु देणं हे आपलं काम.
मला Civil Engineering मध्ये दिग्विजय करायचे होते - आणि मला वाटायला लागलं - च्यायला मी इथे वेळ वाया घालवतोय.
पण तिथे, मग तिथुन पुढे, मग ब्रायसन बरोबर स्कुल मध्ये, एरिक, शिवा, सुरी बरोबर अमेरिकेत - कळत गेलं कि Civil Engineering म्हणजे एक युद्ध असतं.
एक असं युद्ध जिथे सैनिक जन्मभर खंदक खोदत रहातात - शत्रुपासुन बचावासाठी.
शत्रु म्हणजे निसर्ग -
स्थपति!
त्याच्याबद्दलचं, त्याला समजण्याचा प्रयत्न करणारं शास्त्र ते - स्थापत्य!

हे निसर्ग वगैरे प्रकारावरुन आणखी एक आठवण आठवली.
भोपाळला SSB च्या interview च्या वेळेस interview घेणारा कमांडर म्हणाला - मी तुला मला एक प्रश्न विचारायची संधी दिली तर काय विचारशील?
मी म्हटलं - तुमचं शिक्षण काय?
तो म्हणे - मी मेकॅनिकल इंजिनियर आहे.
मग म्हटलं - आणखी एक प्रश्न....
तर तो म्हणे - एकाची संधी होती, एक झाला.
म्हटलं ठीक आहे.
तर तो म्हणे - मी प्रत्येक interview मध्ये प्रत्येकाला ही संधी देतो आणि प्रत्येकाचे प्रश्न ठराविक असतात, पण आत्तापर्यंत ’माझं शिक्षण किती’ - हे कधी कुणी मला विचारलं नव्हतं. तुला असा प्रश्न का विचारावासा वाटला?
मी म्हटलं - तुम्ही अशी संधी प्रत्येकाला देता हे बाहेर येऊन प्रत्येक जण सांगतो - मग प्रत्येक जण काहीतरी जबरा प्रश्न विचारुन तुम्हाला थक्क वगैरे कसं करायचं याचे आराखडे बांधतो - मला ती सगळी चुत्येगिरी वाटली. पण तरी - मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला याचं कारण ऐकायचं असेल तर मला दुसरा प्रश्न विचारणं आवश्यक आहे.
तर तो म्हणे - विचार.
म्हटलं - मेकॅनिकल इंजिनियर असुनही, infact मेकॅनिकल इंजिनियर असल्यानेच - तुम्हाला Indian Navy चा motto ’शं नो वरुण:’ ऐवजी ’शं नो यंत्र:’ करावासा कधी वाटला नाही का?
तर त्यावर तो (काळा कभिन्न) कमांडर हसला आणि म्हणाला - तुझं वय (मग कागद चाळुन - ) सतरा असल्याने तुला असं वाटणं साहजिक आहे, पण तंत्रज्ञान कितीही पुढारलं आणि शत्रुला नेस्तनाबुत करण्याची तुमची ताकद कितीही वाढली तरी निसर्गाला टक्कर देऊन नेहमीच त्यावर विजय मिळवतील अशी यंत्र अजुन बनली नाहीत. Navy जॉईन कर - ऍटलिस्ट अशी यंत्र बनवायचा अटेम्प्ट करता येईल तुला.
(मला अजुनही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, पण) तेव्हा मला त्याचं उत्तर फारसं पटलं नव्हतं!

च्यायला फाटा कुठे फुटला?
तर खंदक!
Civil Engineering मध्ये प्रत्येक सैनिक जन्मभर असे खंदक खोदत रहातो - स्वत:भोवती, सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाभोवती, प्रत्येकासाठी, प्रत्येकाकडुन असे खंदक खोदुन घेत रहाणं हा त्याचा व्यवसाय बनतो. जुन्या जाणत्या सैनिकांनी निसर्गाचा संहार पाहिलेला असतो. त्यांच्याकडुन शिकत, कधीकधी त्यांच्याशीही लढत, जो सैनिक लढत आणि कणा शाबुत ठेऊन दिवसाच्या शेवटी त्याची स्टोरी सांगायला जिवंत रहातो - तो झाड.
बाकीची लव्हाळी.

हे नंतर कळलं पण.
कळत गेलं - अजुन कळतंय.
पण तेव्हा माझी सॉलिड चिडचिड होत होती.
निसर्गाचा संहार मी लिंबाळ्यात पाहिला होता, जेव्हा याच navy चे भाऊबंद याच poclain ने खड्डे करत होते, याच डंपर्समधुन प्रेतं येत होती, पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या त्या प्रेतांनी हेच खड्डे भरत होते, त्यांच्यावर हेच बुलडोझर्स माती ढकलत होते....
इयत्ता अकरावीत होतो, पण तोवर मी कधी प्रेत पाहिलं नव्हतं.
लिंबाळ्यात इतकी पाहिली कि काही न वाटण्याएवढा बधीर झालो होतो.
त्या बधीरतेत जीपमध्ये बसुन केळी खाताना आलेला एक अनुभव सांगता सांगवत नाहिए....

च्यायला हे असं काही स्क्रीनवर उमटलं कि असं वाटतं कि माझ्या लहानपणी मला आलेल्या विदारक वगैरे - म्हणजे ’दीवार’ मधल्या ’मेरा बाप चोर है’ सारख्या अनुभवांमुळे तर मी Civil Engineer नाही ना झालो! (मग मला - मी earthquake resistant structures वगैरे बांधुन हजारो लोकांचे जीव वगैरे वाचवुन हीरो होतोय वगैरे वगैरे स्वप्न पडायला लागतात).
वेल, मी हीरो नाही.
आय मीन - अजुनतरी नाही.
त्याचा निवाडा व्हायला अजुन बरीच वर्ष जायचीत.
हीरो रॉर्क असतो, अमिताभ असतो, 'प्रहार’ चा नाना असतो, ’धारावी’ चा ओम पुरी असतो, (its funny but) ’राम जाने’तला शाहरुख असतो आणि माझ्याशी जागतिक युद्धं करुनही मला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक लढाईत लढायला उकसवणारा माझ्या बापासारखा बाप असतो!

असं असताना - विहिरीशेजारच्या त्या झाडाखाली, सतरंजीवर झोपुन, काम करणाऱ्या अजस्त्र यंत्रांकडं पहात - माझी चिडचिड होत होती.
ज्या शत्रुची इतके दिवस वाट पाहिली, तो शत्रु मला दिसत नव्हता.
त्याच्याशी लढायला तो लढाईच करत नव्हता.
नको तेव्हा झाड बनुन मलाच सावली देत होता

विहिरीशेजारच्या त्या झाडाखाली, सतरंजीवर झोपुन, मनात एकच विचार घुमत होता -

आत्ता - माझ्याजागी - रॉर्क असता तर -

त्याने काय केलं असतं?

-------------------

(मला ते भाग बिग पाडुन लिहायला आवडत नाही - शिवाय हे म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारखं लांबतच चाललंय -
त्यामुळे इथुन पुढचं - इथेच).

-------------------

उत्खनन

सिव्हिल मध्ये एक भारी असतं - पावसाळ्यात (This is incomplete - will work on it offline and publish it whenever ready).

35 comments:

  1. संवेद - मे बी मागच्या पोस्टवर लिहिलेल्या कमेंटमध्ये म्हटलंय तेवढ्यापण विनाकारण मी लिहीत नाही. पण आता जेव्हा जेव्हा लिहितो तेव्हा तेव्हा ’मी हे का करतोय?’ असा प्रश्न छळायला लागलाय. Hopefully - त्यातनं कही सापडलं तर लिहीन.

    आत्ता (आणि हे) लिहायचं कारण म्हणजे - ’बायको गेली माहेरी - काम करी पीतांबरी’ ही जाहिरात आठवतिए का? मी शाळेत होतो तेव्हापासुन वाटायचं कि माझी बायको माहेरी जाईल तेव्हा मी पण हे वाक्य "टाकीन"! पण लग्न होऊन दीड-दोन वर्ष झाली तरी बायको माहेरी जायचं नावंच घेत नव्हती! :)))))
    ती शेवटी परवा महिन्याभरासाठी गेली - आता ’चंगळ’ वगैरे म्हणुन मी तातडीने ’खंबा’ वगैरे घेऊन आलो. पण घरी आल्यावर तासाभरातच बोर व्हायला लागलं.

    म्हणुन लिखाण!

    शिवाय नवोदित ब्लॉग लिहिणाऱ्यांनो - कमेंट्सच्या संख्येने निराश होऊ नका. स्वत:च्याच ब्लॉगवर स्वत:च कमेंट्स लिहुन(ही) बरं वाटु शकतं!
    (हे म्हणजे स्वत:च स्वत:ला मत देण्यासारखं झालं - पण चल्ता है ना! अगदीच deposit तर जप्त नाही होत!!)

    ReplyDelete
  2. Hello,
    ज्या शत्रुची इतके दिवस वाट पाहिली, तो शत्रु मला दिसत नव्हता.
    त्याच्याशी लढायला तो लढाईच करत नव्हता.
    नको तेव्हा झाड बनुन मलाच सावली देत होता
    Sahiiii....
    Khup manapasun lihita.
    Civil engg profession mhanje maze ek kaka mala aathavtat. Tyancha bolana khupa khup 'rough' aahe(eka wakyat min 1 shivi asate). May be tumhi mhanta tya pramane ardhashikshit ani ashikshit lokan barobar kam kelyamule asel. Pan civil engg. mhatala ki aathavata te fakt 'rough' bolana.
    BTW tumachi bhasha changli aahe.

    ReplyDelete
  3. Mastach jamala ahe lekh( ki atmakathan?).mi itkyatach blogs wachayla suruwat keli (asa kahi ahe hech mahiti navhata adhi), tumache barech lekh awadalet. tumachi shaili khup oghawati ahe. Niyamit lihit ja.

    By the way te selection howunahi SSB la culti maran kahi tumachya profile madhye fit hot nahi tenvha jamala tar pudhachya post madhye tyachi karan spashta karal ka?

    ReplyDelete
  4. All abstract.. all related to thoughts..How can u write so simple and touching..I really liked
    your blog..Keep Writing regularly..

    ReplyDelete
  5. सहीच!!
    आधी इतकं मोठं पोस्ट वाचुन वाटलं नाही की मी हे पुर्ण वाचु शकेन.. पण वाचायल्या लागल्यावर पोस्ट संपल्यावर वाईट वाटलं... नाही पुर्ण झालं हो! अजुन लांब चालेल.. पण लिहा!

    पोंक्षे सरांबरोबर पिक्चर पाहिला.. प्रबोधिनीचे का तुम्ही?

    रविवार भीषण आणि गुरु-शुक्रवार प्रेमळ का हा फंडा राहिलाच का बहुतेक?

    पण एकुण वाचुन भारी छान वाटलं!! एकेकाळी ही पुस्तकं आणि "धरण" वाचुन मलाही civil engg किन्वा architect व्हायचं होतं! पण गणिताने घात केला! तुम्ही instru. engg. होऊनही पुढे हवं तेच केलतं..मस्तच!! त्यामुळे अजुन एक्द.. "तुम्ही नक्कीच प्रबोधिनीचेच!! हो ना?"

    आणि पोस्ट्प्रमाणे तुमची कमेंट सही :)
    ट्रीक वापरुन बघावी म्हणत्ये!!

    तुम्ही भागांमधे लिहित नसाल तरी ह्याच्यापुढे अजुन वाचायचं आहे.. लयी interesting आहे!!

    ReplyDelete
  6. कधी नव्हे तो मला हे वाचायला कंटाळा येतोय. गुड इन पार्टस्. पण सॉरी... नाही जमलीय भट्टी.:(

    ReplyDelete
  7. acbbbaaapppre!!! kevadha moTTha post! :-D

    pan majja ali vachayala. samorasamor basun gappa maralyas asa vaTala.

    for a change, non-saahityik posts vachayala barr vaTata na, tasa! :D

    ReplyDelete
  8. खरंतर अजून ह्यापुढचंही लिहिल्यावर मगच टाकूयात कमेन्ट असा विचार करत होते पण ते कधी येतय काय माहीत आणि मग आत्तापर्यन्तचं वाचल्यावर काय वाटलेलं तेही विसरायला होईल (शिवाय तु भाग बिग पाडून लिहिणार नसलास तर परत ह्याच पोस्टच्या खाली लिहिल्यावर नक्की कुठपर्यन्त वाचलेलं तेही कळणार नाही:P)म्हणून मग आत्ताच.
    तर पोस्ट आवडलं. सुरुवात (नेहमीप्रमाणेच) बोरींग पण नंतरच्या त्या कंत्राटदार,बोल्डर,पोक्लेन आणि हवेली,बाभळीने सॉलीड ग्रीप आणली.
    तु तुझे विचार जसे जंप होत जातात तसा लिहित जातोस आणि मग आमचीही वाचताना रोलरकोस्टर राईड होते की:))पण मजा आली.
    बाकी काही असो.. शेवटी फ़ाऊंटनहेड फ़िलॉसॉफीच्याच भाषेत बोलायचं तर yu have got to love what yu do, yu have to believe in what yu do and yu got to have passion for what yu do.. बहुतेक तुझ्याकडे हे सगळं असावं असं आत्तापर्यन्तचं वाचून तरी वाटतय.

    ReplyDelete
  9. अजिबात बोर झालं नाही वाचताना. त्यामुळे पहिला परिच्छेद उगीच.

    बर्‍‍याचदा मस्त वाटलं वाचताना - म्हणजे विशेषतः "दुनिया गेली उडत, आपण सिविलच करणार शेवटी" attitude!.

    पण मधेमधे जरा लय आगाऊपणा नि attitude मारताय राव असं वाटलं...त्यावर..."बर्र...माफ!" एवढीच प्रतिक्रिया...

    एकूणात...पसार्‍यातलं बरंचसं सामान ओळखीचं वाटलं, नि ते मस्त वाटलं...

    बाकी खळखळाट लपवायचा फसलेला प्रयत्न म्हणून सोडून दिलं... :P:P:D

    ReplyDelete
  10. एक वेगळं पोस्ट. वाचताना याचा शेवट कसा होणार आहे याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे गंमत वाढली. तुम्ही लोक त्या कोठीत आत जाणार असे शेवटपर्यंत वाटत होते पण कल्टी मारलीत. :-)

    दुसरी जाणवलेली गोष्ट म्हणजे वाचताना तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारतोय असे वाटत रहाते. कदाचित बोलताना आपण जसे विषय बदलत रहातो तसेच तू पोस्टमध्येही बदलतोस म्हणूनही असेल.

    ReplyDelete
  11. मित्रा,

    तुझा ब्लॉग का वाचतो? कारण तो कोपऱ्यावर पानाच्या गादीपाशी मारलेल्या गप्पांसारखा खूप जवळचा वाटतो. कथासूत्र वगैरे मला बऱ्याचदा तुझ्या लिखाणात सापडत नाही. मी शोधतही नाही. ओळीमागून ओळ वाचत जावी. पुढची वाचावी वाहवा म्हणावं आणि मागची सोडून द्यावी, असा काहीसा तुझा ब्लॉग आहे.

    आणि म्हणूनच मला तो आवडतो. असंच लिहीत राहा आम्ही वाचत राहू.

    ReplyDelete
  12. proclain, dumper aaNi barachasaa bumper.....lihilays chaan....avadala....pan purna vachun zala nahi....zala ki punha sangen

    ReplyDelete
  13. suruvaat bore nahi, pan slow.. halu-halu momentum yet gela.. adhun-madhun vishayantar naahi.. pan jasa aapla mann kasa chanchal asta, tase ikadche-tikadche vichaar.. aani shevat apratim!

    keep fighting! :)

    ReplyDelete
  14. छान लेख. पण 'त्या' हवेली बद्दल काही लिहाल असं वाटून शेवट पर्यंत वाचला तर काहीच नाही.
    अशा ऍबस्ट्रॅक्ट लेखन प्रकाराला आता एक वेगळं नाव द्यायला हवं. 'मुक्तक' किंवा 'प्रवाह' किंवा 'आवर्त' वगैरे...

    आणि शिर्षकाचा काय अर्थ घ्यायचा?

    ReplyDelete
  15. अभिजीता, आता तुझ्या दोन कॉमेन्टसच एक उत्तर देतो. त्या आधी, तुझे मनःपुर्वक आभार. जरा formalवाटतय का? वाटु दे. तुझी का लिहावं वरची reaction बरच सांगुन जाते. त्याचा स्वतंत्र पोस्ट झाला असता हा भाग वेगळा. पण believe me लिहीता राहा, तुला बरं वाटेल आणि आम्हालाही.
    आता या पोस्ट विषयी. नेहमी सारखं बाठेय पद्धतीनं तुझ्या या ही पोस्टला बेशिस्त शिस्त आहेच. पण तुझी ति style तर आवडतेना..बेफाम!
    आम्ही सारे, बहुतेक, एसीत खुर्च्या गरम करणारे त्यामुळे तुझी "कंत्राटगिरी" वेगळीच वाटली.

    तुझ्या SSB interviewत काळ्या कमांडरच उत्तर वाचून परत एकदा आयवा मारु ची आठवण आली रे (मेघना मारणार नक्की मला..)
    आणि लिंबाळ्याचा उल्लेखं लातुरचा भुकंप आठ्वुन गेला
    मजा आ गया दोस्त!!

    ReplyDelete
  16. काल माझ्या PC चे झोल होत होते - त्यात भाग्यश्री ने लिहिलेली कमेंट हरवली आणि मी एक भलीमोठी पोस्ट/कमेंट लिहिली होती ती पण.

    एनीवे - हे पोस्ट अजुन पूर्ण व्हायचंय त्यामुळे - closure साठी usually जश्या प्रति-कमेंट लिहितो - तशा लिहाव्याशा वाटत नाहिएत. त्याच्यामुळे सगळ्यांनाच सरसकट धन्यवाद.

    काही मुद्दे उपस्थित होताहेत ज्यांच्यावर आत्ता प्रकाश टाकला तर पुढे (जेव्हा कधी आणि जर काही) लिहीन तेव्हा तुम्हाला समजायला सोपं जाईल:

    १)लेखाची लांबी -
    याचा विचार मी ही केला, पण ते म्हणजे मला आशुतोष गोवारिकरला ’लगान’, ’स्वदेस’ आणि ’जोधा-अकबर’ दीड तासाचे करायला सांगण्यासारखं वाटलं.
    शिवाय देवाने अनलिमिटेड स्पेस दिलिए तर घ्या पाय पसरुन - असाही एक विचार.
    आणि लेको - च्यायला मी जर लिहु शकतो, तर तुमचं वाचायचं (तुम्ही स्वत:वर ओढवुन घेतलेलं) काम तर कितीतरी सोपं - तक्रारी काय करताय?

    २) शिव्या -
    मला काही ठराविकच येतात - अधिक शिकायचा प्रयत्न चालु. इंजिनियरिंग फर्स्ट इयरला असताना (’च्यायला’ सोडुन - if that counts) पहिली शिवी दिली. मग शिस्तीत मित्रांना विचारुन विचारुन लिस्ट बनवली. तेव्हापासुन सराव करण्याचा प्रयत्न करतोय. नविन शिवी वापरात काढली कि कसे झोल होतात हे संकल्प द्रविडने समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला - पण, जाऊ दे - तो वेगळाच विषय आहे.
    एकतर पुण्याने माझी भाषा पारच बाटवलिए - तो influence काढुन टाकण्याच्या प्रयत्नात जन्म चाललाय.

    ३) लेखाची सुरुवात बोर होते -
    या एकाच बाबतीत मी consistent आहे. ती तशी होते ते मलाही माहितिये. मी actually असाही विचार केलाय कि लिहुन झाल्यावर पहिला paragraph डिलीट करावा.
    पण ते म्हणजे मला match संपल्यावर सेहवाग आणि जाफरला गोळ्या घालण्याइतकं क्रुर वाटतं!
    Fab four बघायचे असतील तर जाफर, चोप्रा, बांगर, आणि अधुन मधुन द्रविड वगैरे सहन करावेच लागतील!

    ४) Fountainhead ची philosophy आणि attitude -
    या खरंतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानतच नाही. माझ्यासाठी तरी attitude is everything. उथळ पाण्याचा खळखळाट म्हणजे मला - कल्पनादारिद्र्य म्हणायचंय. Fountainhead ची जी philosophy ट्युलीप म्हणतिए, ती तत्वत: मान्य - ती पटली आणि म्हणुनच ती follow करण्याचा प्रयत्न केला, पण I dont know कि ती (किंवा तिचं माझं interpretation) तेव्हा कितपत आचरणात होती आणि आता किती उरलंय.
    Philosophy वगैरे ठीक आहे, पण ती जगायला ते म्हणतात ना - ’दिव्य ध्येय कि ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता है’ - तसं असावं लागतं. कुणाच्या किती सदिच्छा त्यावेळच्या मला होत्या काय माहित, आणि ते दिव्य ध्येयपण अधुनमधुन धूसर होतं, त्याची वाट चालणं मग....

    Well, मी ती चाललो कि नाही - I dont know. Judgement day ला अजुन बराच अवकाश आहे, आणि ते होईल तेव्हा - तपस्वी नाय तर नाय - अनुयायी चा शिक्का बसला तरी लई झालं.

    Whatever - the point is - माझ्या बेशिस्तीत हे किती regularly आणि कसं complete करीन ते माहित नाही, आणि त्यातुन कुठली philosophy मांडायचा वगैरे प्रयत्नही नाहिए. काही लोकांना असंबद्ध वाटेल, बेशिस्त वाटेल, गप्पा वाटतील, attitude वाटेल (आणि खरं सांगु का - तो आहे ही - पण मी जिथे जिथे ’माज’ करु शकतो तिथे तिथे तो करतोच करतो - usually लोकांना माझ्या बद्दल ’कळते’ ती पहिली गोष्ट (आणि बऱ्याचदा शेवटची) ती हीच - तरिही लोक मला (अक्षरश:) ’सहन’ का करतात हे बऱ्याचदा मला स्वत:लाही कळत नाही)

    तर - कसंही वाटेल -
    हे घे संवेद - आणखी एक - मी का लिहितो - अजुनही माहित नाही. लिहायच्या process बद्दल ऐकायचं असेल तरी सांगण्यासारखं काही नाही. आय मीन मी इथे (या लेखात) पुढे काय लिहिणार आहे ते ही माहित नाही.
    Infact लेखाची सुरुवात केली तेव्हा सांगायचं ते वेगळंच होतं - म्हणजे JCB, Poclain, dumper वगैरे वापरुन काय काय केलं ते सांगायचं होतं - तिथुन त्या हवेलीपर्यंत कसा काय पोचलो काय माहित. मग परत नेव्ही, लातुर - असे फाटे फुटत गेले.

    तर - लेख साहित्यिक नाही.
    आत्मकथन आहे, पण आत्मचरित्र नाही.
    यात कुठल्या heroic tales नाहीत कि धो धो विनोद नाहीत.
    असलंच काही तर थोडासा (तेव्हा) उडालेला धुराळा आणि आत्ता झटकतोय ती धूळ.
    चि. विश्वनाथ रारंग ढांगात गेला. तिथे त्यने पराक्रम केला - असं आपल्याला वाटतं (मागे म्हटलं तसं - हिरोईन ज्याला मिळते तो हीरो, ज्याला मिळत नाही - तो व्हिलन. म्हणुन DCH मध्ये आमीर हीरो. आपल्याला ज्याची गोष्ट सांगितली जाते - तो, म्हणुन हीरो). तर त्या अर्थाने चि. विश्वनाथ हीरो. आता इथे चि. विश्वनाथ, चि. विश्वनाथ करतोय पण त्याचं नाव - लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. त्याच्या बापाने -(च्यायला हा शब्द इथे जरा अप्रस्तुत होईल) - त्याला चि. विश्वनाथ यांस म्हणुन पत्र लिहिलं - त्यातुन स्फुर्ती वगैरे घेऊन त्याने त्याला पटलं ते केलं. पेंढारकरांनी त्याला आपल्या नजरेत हीरो बनवलंय असं मला वाटत नाही. त्यांनी (Ayn Rand पेक्षा कैकपटींनी कमी attitude दाखवत) विश्वनाथला केंद्रस्थानी ठेऊन ’असं असं झालं’ असं सांगितलंय - त्यांनीही तसे बरेच प्रश्न (कदाचित हेतुत:) अनुत्तरित ठेवलेत. पण तरी आपण पुस्तक वाचतो तेव्हा एवढे भारावुन जातो कि विश्वनाथ आपल्यासाठी हीरो ठरतो, रॉर्क ठरतो, आमीर ठरतो. नाही, ते हीरो नाहीत असं मला म्हणायचं नाही. ते हीरो आहेत असं पेंढारकर म्हणत नाहीत, फरहान अख्तर म्हणत नाही - Rand फुल टु डंकेकी चोट पे म्हणते कि रॉर्क शिवाय कुणी हीरो असणं शक्यच नाही - whatever - हे जरा abstract होतंय. बाय द वे - प्रसाद - अरे, लेखत कहीच abstract नव्हतं. जे जसं घडलं तेच लिहिलेलं. मला माझ्या लेखांत काहीच आगाऊ वाटत नाही (त्याच्या उलट कमेंट्स!).

    एनीवे - तर, विश्वनाथ आपल्या नजरेत हीरो बनतो. आर्मीच्या नाही. BRO च्या नाही. उमाला तो जे करतोय ती हीरोगिरी - म्हणजे धाडस किंवा show off कि मुर्खपणा - हे ही माहित असेल कि नाही माहित नाही. कदाचित विश्वनाथने घरी येऊन लई अभिमानाने बाबांना सांगितले असते त्याचे प्रताप तर - देशविरोधी काम केल्याने तुझा धिक्कार असो असं बाबा म्हणाले असते कि तुला जे योग्य वाटलं ते तु केलंस - त्यात काय आलिए heroism - असं म्हणाले असते? शिवाय विश्वनाथ अजुनही त्या खेडेगावात काम करायला अजुन नालायक आहे ते आहेच.
    And for that matter - does it matter what Uma, Baba, Army or BRO or we think of him? स्वत:च्या नजरेत विश्वनाथ कोण होतो? हिरो, कि ज्ञान असुनही ते वेळेत वापरण्याची कुवत/हिंमत/committment नसणारा - आणि त्यामुळे सर्जेराव आणि इतरांच्या मृत्युस कारणीभूत झालेला - एक मामुली इंजिनियर? आणि एवढ्या गमज्या करुन आर्मीतुन बाहेर पडताना कर्नल जेम्स राईटचं वाक्य शेवटी उरतंच - कि पुन्हा ’युनायटेड कन्स्ट्रक्शन’ मध्ये जाऊन विश्वनाथला तसंच upright रहाता येणार आहे का? आणि upright रहाणं म्हणजे तरी काय? लाच देणाऱ्या, घेणाऱ्यांशी भांडणं? लाच न देता घेताही फक्त पैशासाठी काम करणाऱ्यांशी भांडणं? कि फक्त हाती येईल ते काम चोख करणं? किंवा ’ईमानदारीत काम करतोय ना - बोलायची बात नश्शे’ म्हणणं?
    जे काय गाडायचे होते ते झेंडे गाडुन झाल्यावरही लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे पंचवीस सव्वीस वर्षांचा तरुण होता. दहा वर्षांनी चि. विश्वनाथच्या वडिलांनी त्याला (कदाचित) अमेरिकेत पत्र पाठवलं असतं तर त्याची सुरुवात त्यांनी अशी केली असती का?
    No, dont get me wrong - मी स्वत:ला विश्वनाथच्या जागी ठेवत नाहिए. विश्वनाथ माझ्यापेक्षा जास्त हुशार होता, त्याचं इंजिनियरिंग जजमेंट माझ्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेलं होतं आणि विश्वनाथ जे करु शकला ते त्याच्या जागी मी करु शकलो नसतो. त्यामुले विश्वनाथला हीरो माना न माना, मी हीरो नाही. (what the fuck yaar - माझं हे हीरो हीरो काय चाललंय मगाचपासुन?)
    पण एका क्षणात उठलेली उर्मी - इथे एका ऍक्सिडेंटने उठली ती - त्यावरचं एका आठवड्याचं implementation - विश्वनाथने आयुष्यभर sustain केलं असेल का?
    इथे मी येतो.
    मला त्या वेळेस ’माझ्या जागी रॉर्क असता तर त्याने काय केलं असतं असं वाटलं होतं, वाटलं असणार - नंतरही बऱ्याचदा वाटलं, अजुन वाटतं’ पण नुसतं वाटुन मी रॉर्क होत नाही (मला रॉर्क व्हायचंही नाहिए - but I guess you get the point) अनुयायीही होतो कि नाही माहित नाही.
    इथे मी येतो - कारण आजच्या मी ला तेव्हाचा मी आठवतो आणि तेव्हाच्या विश्वनाथचं पुढे काय झालं असेल याचे आडाखे बांधत - आजचा मी आजच्या विश्वनाथची कॉलर पकडुन दरडावतो -
    ’चि. विश्वनाथ - हजामा, आठव!’

    बहुतेक सगळे points cover झालेत. तूर्तास मी एवढा पेटलोय कि पुढे मी काय लिहिणार आहे (आणि चि. विश्वनाथला किती हाणणार आहे) याबद्दल मला य भिती वाटायला लागलिए.

    त्याच्यामुळे कल्टी.
    (आणि मी खरंच एवढं abstract लिहित नाही हो! I guess you should just ignore my comments and just read my posts - that too if you absolutely dont have anything else to read - its OK if you skip them too!!)

    ReplyDelete
  17. ऍबस्ट्रॅक्ट, इंट्रेस्टिंग, साहित्यिक, आत्मपर... खड्ड्यात गेल्या डेफिनिशन्स. लिही यार तू. बर्‍याचदा जाम मजा येते वाचायला आणि नंतर डोक्याचा कीस काढायला.

    ReplyDelete
  18. अजून एक अनाहूत सल्ला. प्रत्येक लेखाच्या शीर्षकाची ष्टोरी लिहीत जा ना, जाम धमाल येते. अर्थात प्रत्येक पोस्ट वगैरे म्हटलं की, ते जरा 'नियमित', 'रुटीन' वगैरे शिव्या दिल्यागत वाटून ते तू अज्याबात न करण्याची शक्यता जास्त आहे. पण तरी. जमेल तेव्हा.

    ReplyDelete
  19. प्रत्येकवेळी मी कमेंट लिहायण्यासाठी जरा वेळ लावतेच आणि मग तोपर्यंत इतरांच्या कमेंटमधून ऍबस्ट्रॅक्ट किंवा जरा जड वगैरे शब्द दिसले की मग पळून जाते. मग तोपर्यंत तुझं धन्यवाद वालं एक कमेंट येतं आणि ते वाचून झाल्यावर वेगळंच काहीतरी लिहायची इच्छा होते आणी मूळ पोस्टवर काय वाटलं ते विसरूनच जाते. म्हणजे जसं मला आत्ता तुझी लेटेस्ट कमेंट वाचून तुझ्या त्या DCH मधला आमीर हीरो आहे की नाही किंवा स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय यावरच काहीतरी सुचतंय. असो.
    मला ही पोस्ट आवडली, अगदी सुरुवातीपासून. त्याला एक कारण म्हणजे दीडेक वर्ष सलग सोबत राहिल्यावर एअरपोर्टवरून घरी आल्यावर बायकॊ(किंवा नवरा)घरात नाहीये याचं फिलींग कसं असेल ते मी एकदा अनुभवलंय. त्यामुळे सुरुवातीपासून पोस्ट आवडली. आणि नंतर तर मी अगदी एखाद्या मोठ्या कादंबरीत कसे छोटे मोठे कथानक तुकड्य़ांत येत राहतात आणि आपण गुंग होऊन जातं तसं वाटलं पण ती कादंबरीची पानं अगदी मेन मुद्द्यावर येऊन फाटलीत आणि एकदम शेवटच वाचायला मिळाला असं वाटलं. आता मधले तुकडे परत वाचायला मिळाले तर कसं वाटेल सध्यातरी सांगता येणार नाही.
    मेघना म्हणाली तसं टायटल का दिलं हेही वाचायला मजा येते. -विद्या.

    ReplyDelete
  20. he asach lihit raha....boltos tasachya tasa....post mhanun comment mhanun vattel tasa...meghana mhantey tasa...vachtana chhan vaTTa!

    ReplyDelete
  21. baryachada mala kay comment dyayachi te suchat nahi. nustach chhan, aavadala lekh mhanun khardoon jana jeevavar yeta. tevha meghanachya shabdant mhanto -- vachtana afaat aavadatay, lihit raha.

    ReplyDelete
  22. बापरे...प्रतिक्रीये मध्ये सुद्धा केवढ लिहीलयं, anyway... वाचायला खूप आवडलं, जस बरेच जणांनी म्ह्टलं.. गप्पा मारल्यासारख वाटत. काही दिवसांपुर्वी सुरुवात वाचून सोडून दिलं होतं...पण एवढ्या प्रतिक्रीया बघून पुर्ण वाचायचं ठरवलं.

    ReplyDelete
  23. माझं थोडं कन्फ्युजन झालंय -
    हे पोस्ट आणखी इथेच लांबवायचं कि याच्यासाठी नवाच ब्लॉग सुरु करायचा असं. त्यात परत नव्या लिखाणावर नविन कमेंट्स येत जातात.
    त्यामुळे तुर्तास - माझं कन्फ्युजन मिटेपर्यंत आणि कमेंट्समुळे आणखी तिकडम टाळाण्यासाठी - (तूर्तास) एका व्यक्तिसाठी एका पोस्टवर एकच कमेंट असा नियम मीच करतोय.
    म्हणुन सध्या multiple comments डिलीट करणं चालु आहे. शिवाय कमेंट्स ची संख्या वाढली कि लिहिण्यावर दडपण वगैरे येतं हे मुद्दे वेगळेच.

    तरी कळावे गैरसमज नसावा.

    ReplyDelete
  24. कळलं नाही नेमकं. कॉमेण्ट्सचा लिखाणावर कसा परिणाम होईल? राहू देत की सगळ्या कॉमेण्ट्स. लिहीणाऱ्यांनी किती प्रेमाने लिहिल्या असतील.

    त्यांच्या कॉमेण्ट्स डिलीट करणं म्हणजे ’त्या’ कुत्र्याच्या लाथ घालण्यासारखं ठरेल - करवेल तुझ्याच्याने तसं? त्यापेक्षा लिहीणाऱ्यांना तो आनंद मिळू दे रे. ;)

    ReplyDelete
  25. ती कमेंट मधे उल्लेख केलेली भाग्यश्री मीच आहे का? मी मागच्या पोस्टला कमेंट दिली, ती दिसतीय अजुन..मग या पोस्ट्वरची कमेंट हरवली का? पण मी इथे कमेंट दिली होती का?? :( ओह गॉड.. मला काहीच सुधरत नाहीय..
    बहुतेक तुझी ही कमेंट वाचल्याचा परिणाम.. :)
    एनीवे.. सगळे म्हणतात तसंच.. वाचताना आवडतंय.. सो लीहीत रहा! ( थोडं जड जातं कधी कधी.. असं भंजाळायला होतं मग.. )
    बाय द वे.. नावाची स्टोरी आवडली..!

    ReplyDelete
  26. त्यांच्या कॉमेण्ट्स डिलीट करणं म्हणजे ’त्या’ कुत्र्याच्या लाथ घालण्यासारखं ठरेल - करवेल तुझ्याच्याने तसं? त्यापेक्षा लिहीणाऱ्यांना तो आनंद मिळू दे रे. ;)
    ...what a comparison!! :)

    ReplyDelete
  27. संवेद - कुत्र्याने लाथ मारणे हा अगदीच विनोदी प्रकार आहे. अभ्याने इथे त्याचा उल्लेख केलाय, पण त्याचा reference म्हणजे आमचं मागच्या वीकेंडला फोनवर झालेलं बोलणं आणि मी त्याला सांगितलेली एका पिक्चरची गोष्ट!
    कृपया इथे तो उल्लेख कुणीही out of context घेऊ नये.

    ReplyDelete
  28. Mama,

    Chhan aahe re post! Deja vu!

    Faar purvi ekda punyala tujhya ghari aalo hoto teva ratri maralelya gappach tu post war lihilya sarakhe waatle! :-)

    Fakt ek shabd teva aapan khoop discuss kela hota - hya post madhye aala nahiye: EXCAVATION.

    Baba.

    PS: I have got over blogging mhanun ha ushir comment dyayala!

    Aata mala weL miLato teva "kaame" asatat. Examples:

    1. Pori sobat soapwater bubbles kheLane... Jaam majaa yete tila aani mala pan!

    2. Dancing at home with her on our favourite songs. This can be a cartoon or a chaiya chaiya or a BBC child program or even a cricket match when I am excited! :-) Like I was watching veeru score his triple the other day!

    3. When you live with a child, you "learn" to see the world as they do. It is revealing! Its amazing how simple life can be and how complicated the "grown ups" can make it! I am learning to make life simple again! Its fun!

    ReplyDelete
  29. question- may be this has been asked in one of the comments and I missed it. but would like an answer.

    tar question- Fountainhead wachun tula civil engineer vavasa ka vatla? roark architect ahe , engineer nahi.

    come to think of it, another question- do you write like you talk? this question has a direct refference to one of henry miller's novels(i think Sexus) but will elaborate later.

    ReplyDelete
  30. मतकरी - सही प्रश्न विचारलात! I dont think मला हा प्रश्न याआधी कुणी विचारलाय.
    खरं सांगायचं तर रॉर्क मला बऱ्याच नंतर - म्हणजे इंजिनियरिंग करताना सापडला. शाळेत असताना इमारतींच्या भौमितिक प्रतिकृती बनवायचो (3 dimensional models) - ती आवड होतीच शिवाय इतर influences. इंजिनियरिंग च्या आधी आर्चिटेक्चरचा विचार केला होता, पण somehow मला माझं temperament आर्किटेक्चरसाठी योग्य नाही असं वाटलं. Somehoe I felt like architecture was more interpretive - where people can have opinions about the work you do. I somehow hated that human element - and this was before I had read Roark. आता विचार करताना वाटतं कि Roark वाचल्यावर inspiration पेक्षा identification जास्त झालं. I mean - here was a guy who wanted to be something and he did it. I was about to loose my way when I read Roark. Though eventually I did loose my way and did BE in I&C, the novel - and Roark in particular bugged me. But still, though Roark was an Architech, I never felt like becoming an Architect. My architect friends consider him as an impractical - what is your take on it?
    Comparitively - Engineering came easily. I loved Maths, rest was just logic and common sense. Even now - I dont have to worry about the aesthetics if I am designing a retaining wall or a drilled shaft or stabilizing a slope.

    आता तुम्ही हा प्रश्न खरं तर विचारला नाहिएत - पण sometimes I do feel the pain that I am doing the foundations and someone else is getting to do the fun part (superstructure), but hopefully things will be different in a few years.

    Do I write like I talk? Yes.
    Almost exactly. But having said that, now I am a bit worried - since you mentioned Henry Miller! I hope you are not getting at something nasty! :)

    ReplyDelete
  31. you are worried aboutsomeone else being nasty? now thats amusing ,to say the least.

    btw there is no nastiness there, the book mentions that people used to ask him why he doesnt he write like he talks? and also suggests that eventually when he did ,he was a success.

    to get back to Mr.Roark, i dont think saying that roark is impractical would be fair. . actually he is a very ayn rand character who doesnt give a s**t about anyone else(and keating is the opposite) ,sort of an ideal for all individuals.once he understands the problem, he deals with it on his own terms,period.

    there actually are a few of these in the profession. late Nari Gandhi was one of the few. there is a story that when designing a bungalow for a parsi (and a very fat)client, he designed an extremly narrow staircase. the man obviously said that Nari should widen it, because he will never be able to use it otherwise. Nari said the staircase remains, its you ,who should get thinner.
    this story was told by a parsi architect who new Nari very well.and i think it probably is true.

    ReplyDelete
  32. zakkkas
    kaay lihav kaLat nahi paN wachun man sunna hot*
    lahi bhari lihiyoyassssss....
    lihit raha....

    ReplyDelete
  33. abhi
    ranju here,,,,,,,,,
    abhijit bathe ko gussa kya aata hai????????????????
    he title lagna aadhi thik hot* lagna nantarhi thik aaahe paN aaaata nako.............
    title (wachatana tayatale wach)
    badal
    ki*nwa asa chalaNar nahi ka?
    ki
    ABHIJIT BATHE la anand ka hot nahi??????????????
    jara wichar kar aaaaNi tayatal badal



















































    asach pakawawatoy pan
































    badalach.
    boleto......
    munna bhai MBBS sarakh..
    boy friend BOLETO............



    TARIPAN


    boy friend BOLETO............

    ReplyDelete
  34. ranjit cha point patala - "ABHIJIT BATHE la anand ka hot nahi?" - yavar (aatm)snshodhan vhayalach pahije. :)

    ReplyDelete
  35. just too good. I was laughing while reading this in U-Bahn and everybody around got startled. Don't stop writing.

    ReplyDelete